विषय क्र. १ - एक शापित सौंदर्य "मधुबाला"

Submitted by बागेश्री on 28 August, 2012 - 08:25

१४ फेब्रुवारी!!
तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित "प्रेमदिन" सरकून गेला असावा....
भारतातही हा दिवस थाटामाटात साजरा केला'च' जावा, असं मला वाटण्याचं एकमेव कारण म्हणजे, सौंदर्यवती 'मधुबाला' हिचा जन्मदिन!!

प्रेमासारख्या सुंदर गोष्टीचा 'इजहार' एका लावण्यवतीच्या जन्मदिनी करण्यास हरकत नसावी!! किंवा 'इजहार, इकरार' झालेला असल्यास ह्या सुंदर दिनी गोड-गुलाबी फुलं देण्यास हरकत नसावीच..... तिचा जीवनपट पाहिल्यास तिच्या आठवणीत, 'एखादे प्रेम सफल व्हावे' म्हणून शुभेच्छा देण्यास हाच दिवस योग्य ठरावा!!

तर, मित्र- मैत्रिणींनो,
आजवर मी मधूचा एकही चित्रपट पाहिलेला नाही, पण तिचं अवघ '३६ वर्षांचं' काहीसं, गूढ आयुष्य मला नेहमीच भुरळ घालत आलं आहे...
ह्या गाथाचित्रशती स्पर्धेनिमित्त हाच जीवनपट माझ्या शब्दांतून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतेय!

दिनांक १४ फेब्रुवारी १९३३ रोजी, श्री अताऊल्लाखान (मूळ पठाणी), ह्यांना दिल्लीच्या निवासस्थानी कन्यारत्न प्राप्त झाले, हे रत्न अवघ्या भारताला काही काळासाठी काबीज करेल ह्याची जाणीव खुद्द त्या माता- पित्यालाही नसावी!
नाकी डोळी नीटस, सुंदर कांतीच्या ह्या मुलीचे 'मुमताज़ जहान बेगम देहलावी' असे नामकरण झाले!
देहलावी कुटुंबियांच्या अकरा पैकी हे पाचवे अपत्य!

मुमताज़ च्या जन्मानंतर काही कालावधीच अताऊल्ला खान ह्यांना 'इम्पेरिअल टबोको कंपनी' च्या नोकरी वरून कमी करण्यात आले (आजवर वाचलेल्या विविध लेखांतील माहितीनुसार अताऊल्लांचा भयंकर तापट स्वभाव आणि अतिमहत्त्वाकांक्षा ही कारणे लक्षात येतात)... इथून कुटुंबाचे हलाखीचे जिणे सुरू झाले... एका वेळच्या खाण्याची मारामार आणि घरात तब्बल १३ तोंडे, ह्यांचा ताळमेळ त्या घरच्या कुटंबप्रमुखाच्या तर्‍हेवाईक स्वभावामुळे बसता बसेना... पर्यायी घरात अशांतीच अधिक.. टक्के टोणपे खात, ही नाही ती नोकरी कर (प्रत्येक ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर, वाद उपटून खानसाहेब पुढील ठिकाणी रवाना होत असत) असे दिवस सरत होते, त्यातच त्यांना त्यांच्या दोन मुलांना प्रदीर्घ आजारपण व योग्य उपचार न मिळाल्यापायी गमवावे लागले!

"दिल्ली हमें राज़ ना आई" म्हणत, हा कुटुंबमेळा
"जिसका कोई नही, उसकी मुंबई" ह्या तत्वावर, आमच्या मुंबईत दाखल झाला..

अवघ्या नऊ वर्षांची मुमताज़ आता घरची परिस्थीती चांगलीच उमजून होती.
चलचित्रपट जोमात असतानाचा हा काळ!
"तुम्हारी बिटियाँ खुबसुरत है, किसी पिक्चर मे काम क्यो नही करवाते" असे सल्ले वारंवार ऐकलेल्या अताऊल्लाची महत्वाकांक्षा न बळावली तरच नवल...
आणि सुरू झाल्या "बॉम्बे टॉकीज स्टूडियो" च्या वार्‍या...

अताऊल्लांच्या प्रयत्नांच्या शर्थीने "बेबी मुमताज" रूपेरी पडद्यावर साकारली गेली, १९४२ साली, "बसंत" ह्या चित्रपटातून..
बसंतने बॉक्स ऑफिसवर बर्‍यापैकी काम केले!
एक 'चाईल्ड आर्टिस्ट' म्हणून सुरू झालेला हा प्रवास सुरूच राहणार होता, आता तिच्या अंतापर्यंत!

baby mumtaj.JPG

अताऊल्लाखान स्वतःच्या तापट स्वभावाला मूरड घालत इथे जम बसवण्याचा अतोनात प्रयत्न करू लागले, आणि अंगच्या कलागुणांच्या बळावर ही चाईल्ड आर्टिस्ट- बेबी मुमताज़ गाजू लागली..

त्या काळच्या सुप्रसिद्ध नायिका 'देविका राणी' ह्यांनी, बेबी मुमताज़ चा प्रसन्न वावर, आकर्षक देहबोलीवर लुब्ध होत तिचे "मधुबाला" नामकरण केले! ती सर्वांची लाडकी मधू झाली, घराचा चरितार्थ चालविण्याचे मुख्य साधन झाली, अताऊल्लाखानांच्या महत्त्वाकांक्षेची दुधार तलवार झाली...

- चित्रपटसृष्टीतील घोडदौड
मधूची खर्‍या अर्थाने घोडदौड सुरू झाली ती चित्रपट 'नील कमल' पासून.. ती अवघ्या १४ वर्षांची असताना, किदार शर्मा लिखीत, दिग्दर्शीत चित्रपट तिला मिळाला ज्यात 'राज कपूर' प्रमुख नायक होते, १९४७ साली प्रदर्शित ह्या चित्रपटाने फार कमाई केली नसली तरी, नवतरूण युवतीचे स्वागत जोरदार झाले, इथे तिच्या अभिनयापेक्षा तिच्या रुपाचे कौतुक जास्त झाले...

आता ही रुपयौवना, तारुण्याच्या 'धोक्याच्या वरिसात' पदार्पण करती झाली, वय १६!
तिच्या डोळ्यांच्या अदाकारीने, कमनीय बांध्याने दिलखूलास हास्याने अनेकांच्या काळजांचा ठाव घेणारी, ही मनमोहिनी अवतरली रूपेरी पडद्यावर "महल" चित्रपटातून....!
मुरलेला अभिनेता अशोक कुमार ह्यांना घेऊन बॉम्बे टॉकीज स्टूडिओ ने १९४९ मधे आणलेल्या ह्या चित्रपटातून खर्‍या अर्थाने ३ लोक प्रकाशझोतात मधे आणले गेले-
स्वरसम्राज्ञी - लता मंगेशकर
दिग्दर्शक - कमल अमरोही
आणि लिडिंग अ‍ॅक्ट्रेस- मधूबाला!!!
"आयेगा आनेवाला" ह्या गाण्याने जी धूम केली त्या काळात, ती हे गाणे आताही ऐकल्यास कपाळावरून डोळ्यांवर ओढणी घेऊन, तिरके कटाक्ष टाकणारी मधू आठवतेच!

aayegaa anewala.JPGआजारपण-
मधू जितकी मोहक होती, तितकीच काहीशी गूढही.. लोकांमधे फार मिसळण्याचा तिचा स्वभाव नव्हता, परिस्थितीशी चार हात करत वर आलेल्या ह्या मूलीत मात्र लाघवीपणा ओतप्रोत होता, कामाशी एकनिष्ठ, कर्तव्यात कसूर न पडू देणार्‍या ह्या अप्सरेला पहिला शाप होता तो असाध्य आजाराचा- 'वर्निक्युलार सेप्टल डिफेक्ट- हृदयात छिद्र असणे"

apsara madhu.JPG

१९५० साली, आजसारखे प्रगत तंत्रज्ञान भारतात असते, तर कदाचित मधूचा जीवनप्रवास वेगळा असता, अजून हसरा हसता, आनंदी असता...
प्रत्येक स्वर्गीय सौंदर्यावर शापांची खैरात असावी...

तिचे हे आजारपण चित्रपट्सृष्टीपासून बराच काळ लपवून ठेवण्यात आले... ह्या आजारपणा दरम्यान घरून तिची फार काळजी घेतली जायची, घरचेच अन्न, ठराविक एका विहीरीतलेच पाणी तिला दिल्या जायचे! मधू शिवाय घरात कमावणारे कुणी नसल्यानेही असेल कदाचित!

समीक्षकांनी सातत्याने 'तिच्या अभिनय क्षमतेपेक्षा तिचे रूप वरचढ आहे' अशी शेरेबाजी केली, ह्यालाही कारण होते, तिला चित्रपट, भूमिका हे सारे निवडण्याचा तसा अधिकारच नव्हता... भावंडांचे शिक्षण आणि घराच्या जबाबदारीपुढे येईल तो चित्रपट/ भूमिका साकारायची इतकेच तिच्या ध्यानी- मनी बिंबवण्यात आले होते!

महल चित्रपटाच्या यशानंतर, म्हणजे साधारण १९५०-५४ ह्या कालावधीत (आजारपण बळावताना) तिने २४ चित्रपटांत कामे केली, घरासाठी, घरातल्यांसाठी..! तिच्याकडे वेळ कमी होता, तिच्या अर्थार्जनात खंड नव्हता.....केलेले अर्थार्जन, करू घातलेले अर्थार्जन ह्या सगळ्यांचा हिशेब मात्र एकाच व्यक्तीकडे होता- अताऊल्लाखान!!!!

१९५४ साली 'बहोत दिन हुवे' नावाच्या चित्रपट निर्मितीप्रक्रिये दरम्यान मधूला रक्ताची उलटी झाली आणि प्रसारमाध्यमांनी ह्या प्रकरणाला उठाव दिला! (हा चित्रपट मात्र इतरही काही कारणास्तव पूर्ण झाला नाही)

-मधू - चमकता सितारा!
तिने त्या दरम्यान एकाच चित्रपटात काम करण्यासाठी स्वतःहून तयारी दाखवली, ज्यात तिला तिचे अभिनयाचे कसब आजमावयाचे होते, बिमल रॉयचा 'बिरज बहू' (१९५४) एका कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट साकारून तिला स्वतःतला कलाकार जगासमोर आणायचा होता, बिमलदांशी बोलणी होत असताना, तिने तिची ही इच्छा बोलून दाखवलीही, पण ती सिनेतारा (थोडक्यात अताऊल्लाखान) तिचे काम करण्याचे जे मूल्य मागेल ते आपल्याला परवडणारे नाही, असा स्वतःशीच विचार करून, बिमलदांनी हा चित्रपट नव्याने उभरणार्‍या कामिनी कौशल ला दिला... हे कळाल्यानंतर हवालदिल मधूने 'मी, बिरज बहू एका रूपयाच्या मूल्यावर केला असता' असे उद्गार काढले... चित्रपटसृष्टीतील तिची प्रतिमा तिला कशी हवी होती, ते ह्या प्रसंगावरून जाणवते!

तिच्या रुप- सौंदर्याची ची नोंद भारतीयांनीच घेतली असे नाही, तर त्या काळी 'हॉलीवूडच्या" काही मॅगझीन्स नेही तिला डोक्यावर घेतले- थियेटर आर्ट्स त्यातलेच एक! १९५२ साली त्यांनी मधूचा एक पूर्ण पानभर फोटो छापून आणला, एक गूढ स्वर्गीय सौंदर्य असा तिचा उल्लेख केला गेला आणि ह्या लेखाचा मथळा होता "दि बिगेस्ट स्टार इन द वर्ल्ड"!!

जगभरातून कौतूकाची फुलं उधळली जाताना, ती मात्र त्रस्त होती, आजारपणाने, मनाजोगते वागण्याची मुभा नसल्याने... हळवी होत गेली, हळवीच होत गेली...आता घर आणि कुटुंबीयांनाचे तिने सर्वस्व मानल्याने, त्यांच्यासाठी निर्णय घेताना तिला फारसा विचारही करावा लागत नसे !!

मध्यंतरीच्या काळात (साधारण १९५५-५८) तिने केलेला प्रत्येक चित्रपट पडला, तो काळ तिच्यासाठी पडताच असावा... 'बॉक्स ऑफिस पॉइजन" अशी प्रसारमाध्यमांनी उपाधी दिली..

पुन्हा १९५८ नंतर 'हावडा ब्रिज' पासून कमान उंचावली.. ती उंचच राहिली.... "मेरा नाम चिं ची चू" , त्यानंतर "आईये मेहरबान..." ही गाणी आजही हिट आहेत!

madhudee.JPG- पहिले प्रेम
मुहम्मद युसुफ खान- दिलीपकुमार- दिलीपसाब!!!
ह्या एका व्यक्तीवर तिने जीवापाड प्रेम केले, जीव ओतून प्रेम केले!!
'ज्वार भाटा'च्या चित्रिकरणाच्यावेळी दिलीपसाब ह्यांना भेटलेली बेबी मुमताज़, 'तराना' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी त्यांच्या प्रेमात पडली, तिनेच पहिला 'इजहार' कळविला, सेटवरच चित्रिकरणादरम्यान, एक एवलेसे प्रेमपत्र लिहून... मग 'इकरार' दिलीपकुमारचा ..
आनंदाचे हे काही क्षण मात्र मधू दिलखूलास जगली, जगण्याची सारी शक्ती एकवटण्यासाठी 'हे काही क्षण' तिला पुरेसे ठरले, हेच सुदैव की दुर्दैव, की फक्त भाव भावनांचा खेळ- हे मधुच जाणो!

५ वर्षे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या ह्या प्रेमी युगूलाला वेगळे करण्यासाठी नियती सरसावून होतीच, इतक्या वाईट पद्धतीने की दोघांचे प्रेम शेवटी कोर्टात उभे राहिले!

मधुला असलेला आणखी एक शाप... प्रेमभंग!

नया दौर (१९५६ दरम्यान) च्या चित्रिकरण भोपाल येथे केले जावे अशी चित्रपट दिग्दर्शक 'बी सी चोप्रा' ह्यांनी जाहिर केले, भोपाल येथे हे संपूर्ण युनीट जाण्याचे नियोजिल्यानंतर, अताऊल्लाखानाने 'माझ्या मुलीबरोबर एकांत वेळ घालवण्यासाठी केलेला हा कट आहे' असा आरोप दिलीपकुमारवर करत, मधुबालेला ह्या चित्रपटातून निवृत्त होण्यास सांगितले, वडिलांचे म्हणणे मान्य करत मधूने चित्रपट सोडताच, चोप्राजींनी तिला कोर्टात खेचले, चित्रपटाचे अ‍ॅडवान्स घेतलेले पैसे तिच्याकडून वसूल करण्यात आले... नया दौर 'वैजयंतीमाला' ला घेऊन पूर्ण करण्यात आला...
ह्या कोर्ट केस मध्ये हार झाल्यानंतर अताऊल्लाखान आणि मधुबाला ह्यांना मात्र प्रसारमाध्यमे आणि सामान्य लोकांचे ताशेरे सोसावे लागले...

ह्या काळात मधू- दिलीप दूरावले, कायमचेच! हृदयाला खरोखरच छेद गेला!

-मुघल्-ए-आझ़म
आयुष्यात इतक्या उठाठेवी एकीकडे घडत असताना, दुसरीकडे दुखरी 'अनारकली' खर्‍या अर्थाने जन्म घेत होती! भावविश्वात प्रचंड उलाढाल असलेली एक अनारकली जगाला भूलवणारी अदाकारी साकारत होती...

के असिफ, कृत 'मुघल-ए आझम़' बनण्यास तब्बल ९ वर्षे लागली! १९५१-६०!!
काय घडलं नव्हतं मधूच्या आयुष्यात ह्या काळात?
१९५० ला समजलेलं आजारपण,
१९५१-५६ प्रेम, प्रेमभंग, कोर्टकेस
१९५५-५८ बॉक्स ऑफिस पॉईजन चा ठपका!!

संपूर्णपणे ढासळलेली मधूबाला आणि नव्याने जन्मलेली अनारकली!!

mughal e aazam.JPG

हा योगायोग असावा?
जगातली एक सुंदर कलाकृती निर्माण करताना, तिचे ज्या व्यक्तीवर प्रेम होते तोच ९ वर्षे सोबत होता... प्रेमभंगानंतरही सोबत होता...त्याच्याचबरोबर प्रेमाचे क्षण दाखवताना तिला त्रास होत होता.. हे चित्रिकरणही बर्‍याच ताणतणावाखाली (१९५६ प्रेमभंगानंतर) साकारू लागले..दररोज आतून जळणारी मधुबाला तेव्हा तिच्या भावंडांनी, आईने, अताऊल्लाखानाने बघितली!!

मुघल्-ए-आझम़ च्या वेळेस तास न तास चित्रीकरण, अनेक तास ढणाणत्या दिव्यांखाली उभे राहून मेक-अप ह्यामुळे तिची तब्बेत पार ढासळाली दिलीप कुमारचे असूनही नसण्याने तिच्याकडून तिची उरली सुरली इच्छाशक्ती काढून घेतली..

५ ऑगस्ट १९६० रोजी इतिहास जिवंत झाला, एक नवा इतिहास कोरत..
सलीम- अनारकलीचा मुघल- ए -आझम़ पप्रदर्शित झाला!!
असे म्हणातात, ह्या चित्रपट इतका गाजला की तब्बल १५ वर्षे सुपरहिट होता, १९७५ ला शोले येईपर्यंत मुघल्-ए-आझम़ सुपरहिट म्हणून नावाजला गेला!

-शेवटाची काही वर्षे आणि निरोप!
१९६० मध्ये, प्रतिथयश गायक 'किशोर कुमार' ह्यांच्याशी मधुबालेचा विवाह संपन्न झाला, ती किशोरदांना १९५८ च्या 'चलती का नाम गाडी' चित्रपटादरम्यान भेटली, लगेच ६१ साली 'झुमरू' प्रदर्शित झाला.

त्यांच्या विवाहास मात्र किशोरदाचे पालक उपस्थित नव्हते कारण हा विवाह त्यांना अमान्य होता. जातीय फरकामुळे किशोरदाच्या घरी तिला स्विकारण्यात आलेच नाही.

१९६१ च्या सुरुवातीला मधू-किशोर लंडनला गेले, तिथे तज्ञांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला- केल्यास तिच्या वाचण्याची खात्री फार कमी असल्याचे सांगून!!
शस्त्रक्रिया न केल्यास वर्षभर ती जगेल असेही सांगण्यात आले!

भारतात येताच तिला किशोरदाने तिच्या वांद्रा येथील निवासस्थानी सोडले, मधू परतली.. एकटीच!

लग्न करूनही विवाहसौख्य न लाभल्याचा शाप!

१९६१- ६९ पर्यंत ती तिथेच होती..
हया काळातही ती दिलीपसाब ह्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत असे... किशोरदा जमेल तसे तिला भेटून जात!

ह्या काळातही तिचे, चित्रपटावरचे प्रेम तसूभरानेही कमी झाले नाही.. ह्या काळात तिने केलेले, 'हाफ टिकीट', 'शराबी' बॉक्स ऑफिसवर बर्‍यापैकी चालले. आणखी इतर चित्रपटातही कामे करण्यास तिने सुरूवात केली होती, परंतू तिच्या ढासळत्या तब्बेतीने तिला वेळोवेळी हजर राहण्याचे जमेना, दिग्दर्शकांना तिचे 'डमी' घेऊन काही सीन पूर्ण करावे लागले... जेव्हा 'अभिनय' करणे आता अशक्य असल्याचा मधूच्या शरिराने निर्वाळा दिला, तेव्हा ही शांत न बसता दिग्दर्शनाकडे वळाली..

हलकासा रंग उडालेली, जराशी कोमेजलेली मधू 'फर्ज और इश्क' चे दिग्दर्शन करू लागली... दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण होऊच शकला नाही!

पण ती, तिच्या ह्या क्षेत्रात उच्च पदावर असताना,
तिचे निखळ हसणे, तिचा 'चार्म' तेव्हाच्या कुणाही कलाकारात नव्हता, असे म्हणणारे लाखो आहेत (देव आनंद हे म्हणत असत).. त्यात तिला प्रत्यक्ष पाहणारे आहेत आणि रुपेरी पडद्यावर पाहणारेही..

तिचे लोकांशी फार न बोलणे, प्रसार माध्यमांच्या संपर्कात न रहाणे, प्रेमप्रकरण, प्रेमातला दुरावा, लग्न, लग्नानंतरही स्वगृही राहणे, कोर्ट कचेरी ह्यामूळे सामान्य प्रेक्षकवर्गाकरिता तिच्या भोवतालचे 'गूढतेचे' वलय कायम गडद राहिले!

लंडनच्या तज्ञ डॉक्टरांनी उत्तर देऊन टाकल्यावरही तब्बल ८ वर्षे मधु ह्या जगात होती, झुंजली, त्रासली, कोलमडलल्या भाव विश्वाने खचली, उदासशी ही मधु मात्र जगत राहिली, शेवटपर्यंत चित्रपटसृष्टीला योगदान देत देत...

२३ फेब्रुवारी १९६९ साली एक सुंदर, तेजस्वी, आत्मसन्मान जोपासणारी ज्योत पंचतत्वात विलीन झाली! तिच्या ३६ व्या वाढदिवसानंतर काही दिवसातच...

एक स्वर्गीय सौंदर्य, त्याला 'अल्पायुषाचाही' शाप हवाच होता का?

------------------------------------------------------------------------------------
(मधूचे काही फोटो, तिच्या घरातीलही काही, ती किती साधी रहात असे त्याचे उदाहरण)
सर्व फोटो आंतर्जालावरून साभार!

madubala14.JPGmadubala15.JPGmadubala16.JPGmadubala20.JPG

कलर ईफेक्ट!
madubala18.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स दोस्तहो! Happy

मोसे रुठ गया मोरा सावरीया" ह्या गाण्यातला अभिनय बघाच>> पाहिलाय तो मोकिमी, चित्रपट नसतील तरी टिव्ही वर गाणी लागली की धावत जाऊन बघते
(आधी टिव्हीवर मधू दिसली की बाबा मला हाक मारून बोलवत असत तिची गाणी पहायला, आता नवरोबा बोलावतो Happy )

वर्षूतै, धन्स गो.. हो बघेनच सगळे चित्रपट!

बेफी, खूप आभारी आहे, मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल... Happy

तिच्या अभिनयाचा कस लागेल, अशा भुमिका मात्र तिला अगदी कमीच मिळाल्या.>>
दिनेशदा, तसे नव्हते, तिला चोखंदळ पणे भुमिका निवडण्यास वाव नव्हता, चित्रपट हे चरितार्थाचे साधन होते म्हणून, आला पिक्चर की टाक करून असा सपाटा होता...

ती निवर्तल्यानंतर, दिलीपसाब म्हणाले होते,
"ती अजून काही वर्षे जगती आणि चोखंदळपणे भुमिका निवडती, तर तिच्या काळातल्या, तिच्या बरोबरीच्या अनेकांना तिने घरी बसवले असते....."

अच्छा जी मै हारी चलो मान जाओं ना....

अशीच मिन्नतवारी करण्यात जन्म गेलेली मधुबाला खरच शापीत म्हणता येईल. तिच्यानंतर कित्येक वर्षे गेली पण तिच्या नावाचा उल्लेख झाला कि काळ थांबल्यासारखा वाटतो. त्या जमान्यातल्या काका मामांचे उसासे पहायला मिळतात. शशीकपूर सारख्या सभ्य अभिनेत्यानेही तिच्यासारखं सौंदर्य पुन्हा होणार नाही असं प्रशस्तिपत्रक दिलंय.

मधुबालावरचा हा लेख पण अभ्यासपूर्ण झालाय. मला वाटतं तिचा सिनेमा पाहील्यावर दुसरा लेख लिहावा असं नक्कीच वाटेल.

( त्या काळी जन्म घेता न आल्याने हळहळणारा - Kiran )

वर कोणी म्हणाले आहे की ती प्रत्यक्षात सुंदर होती.

हे खरेच असावे कारण मधूबालाच्या मेक अप मनने मुलाखतीत सांगितले होते की या बाईच्या चेहर्‍यावर फक्त एक पावडरचा पफ यापेक्षा आम्हाला काही करावेच लागत नाही. कोणत्याही अ‍ॅन्गलमधून ती सुंदरच दिसते.

अरे देवा! एकतर मधुबालाचे फोटो टाकायचं पातक केलत... (त्यातही तो शेवटचा फोटो: यम आला तर तो व त्याचा रेडाही घटकाभर बघत थांबेल! आम्ही पामर बघतानाच "खपलो".) वरती त्याला "शापित" सौंदर्यही म्हणताय..
मधुबाला या नावातलं विष/नशा आधीच कमी आहे का?

हाच एक लेख आधी शेवटून मग वरती वाचला Happy चांगला लिहीलाय.. मधुबाला हा एक अवखळ झराच. त्याला हातात पकडणे कठीणच तिथे शब्द तरी कसे पुरे पडणार..?

तरिही
>>'वर्निक्युलार सेप्टल डिफेक्ट- हृदयात छिद्र असणे
तिला पाहिल्यावर हा "रोग" जडलेले अनेक (पुरूष) मात्र अजून जिवंत आहेत याला काय म्हणावे? सुदैव का नियतीची थट्टा?

पुन्हा एकदा तो शेवटचा फोटो: "तिरपा कटाक्ष भोळा.. आम्ही ईथे दिवाणे"..
(हमखास निद्रानाश!)

तिला पाहिल्यावर हा "रोग" जडलेले अनेक (पुरूष) मात्र अजून जिवंत आहेत याला काय म्हणावे? सुदैव का नियतीची थट्टा?<<< Happy

बागेश्री, एका अप्सरेच्या देह-पटलामागे एक व्याधीग्रस्त,परिस्थितीने त्रस्त स्त्री आहे हे तुझा लेख वाचताना जाणवत राहिलं..खूप सहृदयतेने लिहिलंस.
तिची ती गूढता मृत्यू अन दु:खांच्या सान्निध्यातून आलीय असं मला वाटतं..

मागे एकदा आशा भोसलेंनी तिची आठवण सांगीतलेली आठवते.

बहुतेक "अच्छा जी मै हारी" चे रेकॉर्डिंग होते. त्या आत गात होत्या आणि तेंव्हा त्या सिनेमाची हीरॉइन आपल्या गायीकेला भेटायला आली. ती कुठल्या तरी सेट वरुन तडक आली होती. तिने निळ्या रंगाचा आम्रपाली घातला होता. आशा बाईंनी तिच्या सौंदर्या कडे स्तिमीत होउन पहात राहिल्या. त्यांनी लिहिले आहे की पडद्या पेक्षा ती १० पटीने सुरेख दिसत होती.

ह्या वरुनच तिच्या सौंदर्याची प्रचिती यावी. पण शेवटी ते शापित सौंदर्य होते.

नंदिनी अगदी, अगदी >>>चित्रीकरणादरम्यान तिच्या पायांत खर्‍या बेड्या घातल्या होत्या. <<< अन तेव्हा ती खरोखरी प्रचंड आजारी होती. त्या वजनदार साखळ्यांनी तिला धड उभही राहता येत नव्हतं असं एकेठिकाणी वाचलय.

"मुघलेआझमची शोकांतिका सत्यात उतरली. तो अभिनयसम्राट झाला, शहेनशाह झाला, ती मात्र आठवणीपुरती एका थडग्यात उरली." आईगं!

अजुनही मधुचे पोस्टर्स नवीन कलाकारांच्या बरोबरीने विकले जातात यातच तीची पॉप्युलरिटी आहे नाही का??

लेख छानच झालाय!

शुभेच्छा!

हमखास निद्रानाश!>> योग Happy
अजुनही मधुचे पोस्टर्स नवीन कलाकारांच्या बरोबरीने विकले जातात यातच तीची पॉप्युलरिटी आहे नाही का??>> असं सौंदर्य विरळेच..

तिचा नुसता फोटो पाहुन हि सुगुन मिळतो. असा आनंद सर्वाना देणार्‍या नाजुक शरीराच्या आणि नाजुक मनाच्या मधुला शेवटी शारीरिक आणि मानसिक यातना सोसव्या लागाव्या केवढा हा देवदुर्विलास. त्तुझ्या नियंत्रणाला सलाम बाइ. तुला निवांत वेळ मिळो म्हणुन खुप खुप शुभेछ्या अशि वेळ लवकर येवो आणि आम्हाला पुन्हा एक अती सुंदर लेख वाचायला मिळो.

मोकिमी "निळ्या रंगाचा आम्रपाली">>>>>>>>>>>>>> आम्रपाली काय आहे?? ड्रेस चा पॅटर्न होता का अनारकलीसारखा?

बागेश्री....

लेखाच्या नावातच इतके सौंदर्य दडलेले आहे की ते जरी शापीत असले आणि ते लुप्त होऊन आज जवळपास ४०-४५ वर्षे होऊन गेली तरी तिच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या पिढीलाही त्या स्वर्गीत सौंदर्याची भुरळ पडते म्हणजे ते किती विलक्षण होते याची प्रचिती तुमच्या लेखातून येते.

१०० वर्षाचा इतिहास असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील शेकडो चांदण्यांना असे हे 'अमरत्वा'चे भाग्य लाभलेले नाही. '...यासम हीच' असेच सारे म्हणत राहतील.

तिच्या सौंदर्यावर तसेच इथल्या लोकप्रियतेचर लुब्ध होऊन 'थिएटर आर्टस' या अमेरिकन मॅगेझिनची टीम सन १९५२ मध्ये तिच्या मुलाखतीसाठी मुंबईत आली होती. फोटो सेशन आणि मुलाखत नंतर त्या मॅगेझिनमध्ये प्रसिद्ध झाले.....त्या लेखाचे शीर्षकच असे होते "The Biggest Star in the World (And She is Not in Beverly Hills)'.....ती खास अमेरिकन सलामी या रुपगर्वितेसाठी.

अशोक पाटील

नंदिनी,
त्या लिस्ट मधे परिणीताची विद्या बालन पण, बर्‍या पैकी कॉपी केलीये तिने मधुबालाच्या अदांची !

खरं आहे अशोकजी अगदी..
तिचा 'थियेटर आर्ट्स' चा उल्लेखही केलाय ह्या वरिल लेखात... आणि 'बिगेस्ट स्टार ऑफ द वर्ल्ड' चा ही Happy
मधु सम मधुच, हेच खरे!!

हो....तो उल्लेख मी वाचला होताच....पण त्या लेखाच्या शीर्षकाची पंचलाईन होती.....(And She is Not in Beverly Hills)....त्यामुळे हॉलिवूडच्या स्टुडिओ प्रमुखांचे तिच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष गेले होते. Venus of India हे नामाधिमानही तिला त्यावेळीच मिळाले..... बेव्हर्ली हिल्सच्या व्याख्येत व्हीनस = मेरिलिन मन्रो...इतकेच होते. मधुबालाने त्या विश्वासाला शह दिला असे मानले गेले होते.

कलाकाराचे चित्रपट पाहिलेले नसतील पण तो फेवरीट कलाकार असेल तर त्याबद्दल लिहू नये, असा गाथाचित्रशती स्पर्धेचा नियम तर नाही ना??

बागेश्री, भरपूर मेहनत घेत लिहीलेला हा लेख असल्याचे जाणवले. वर कोणी म्हटल्याप्रमाणे मधूबालाला मधू संबोधन्याइतकी तुझी मनात तिच्याशी जवळीक असल्याचे जाणवले.
शुभेच्छा.

माझ्या खोलीत तिचा एक ब्लॅक आनि व्हाईट, ओढणीतले पाणी पिळतानाचे पोस्टर होते, काही वर्शांपूर्वीपर्यते मी ते जपले होत. तिचे प्रसन्न हसू पाहिले की कामातून घरी आलेला सगळा थकवा निघुन जात असे. Happy

आम्रपाली काय आहे?? ड्रेस चा पॅटर्न होता का अनारकलीसारखा?>>>

हा ड्रेस चा पॅटर्न आहे. बहुतेकदा भरतनाट्यम च्या नर्तिका असा पोषाख करतात. इतरही करतात. ह्या ड्रेस पॅटर्न ला प्रसिध्धी मिळाली ती वैजयंती मालाच्या "आम्रपाली" पासुन. आर्थात पारंपारिक पोषाखात आणि "आम्रपाली" सिनेमाच्या पोषाखात खुप फरक आहे. आर्थात पुर्वी पासुन हा ड्रेस आहे, पण ह्या सिनेमा पासुन खुपच लौकीक झाला इतकेच...

4695C34D-DB73-43A7-ACD5-73B8146C5DCB.jpg

कसला डोम्बल्याचा आलाय शापित सौंदर्य. एका स्त्रीलंपट माणसाची दहावी का बारावी बायको झाली आणि जन्मभर रडत मेली.
डोक्यात भेदर भरलेली असली कि असे पहावयास मिळते .
मुलीना नक्की काय पाहिजे असते ते इतिहासकारांना नाही कळले कि भाविश्याकाराना

वाचक, मनःपूर्वक आभारी आहे Happy
मानुषी, धन्स गो!

नितीन वाचक,
चला लेख लिहायला घेऊ, असे म्हटले आणि ३० मिनीटात तयार झालेला हा लेख नाहीच..

मी चित्रपट पाहिलेले असोत, नसोत- मी तिच्याशी निगडीत होते... तिच्या ह्या वरच्या फोटोजमधून, तिच्यावरल्या लिखानातून, तिच्यावर चित्रीत केलेल्या गाण्यांमधून, तिच्या मी इथे लावलेल्या प्रत्येक प्रोफाईल पिक्चर्स मधून, तिच्या गूढतेतुन, तिच्या शापित आयूष्यातून!
मधुचा प्रत्येक फोटो, तिची प्रत्येक माहिती बर्‍यापैकी माझ्याकडे असूनही एक समग्र संकलन करण्यास मी माझा भरपूरसा वेळ 'गुंतवला' आहे...
अर्थात हे काही जणांपर्यत पोहोचलंय/ पोहोचतंय, काहींपर्यंत नाही, चालायचंच!
प्रत्येकजण वेगळा, त्याचे मतही वेगळे...

सार्‍यांची आभारी आहे, दोस्तहो.

Pages