विषय क्र. १: चित्रपटातले माझे आवडते प्रसंग

Submitted by स्वप्ना_राज on 28 August, 2012 - 03:23

वेळ रात्रीची. तो आणि ती. पण दोघं ऐन नव्हाळीतले नाहीत. तो पोक्त दिसणारा आणि तिच्याही केसात रुपेरी बटा. खूप जुनी ओळख पण खर्‍या प्रेमाच्या नशिबात असलेल्या वर्षांच्या ताटातुटीने पार पुसून टाकलेली. कदाचित ते परत कधी भेटलेही नसते पण क्रूर विनोद करायची नियतीची सवय जाते कुठे? ती आता पूर्वीची अवखळ तरुणी राहिलेली नाही तर एक लोकप्रिय नेता आहे. तो एका हॉटेलचा मॅनेजर. खोलीच्या सजावटीवरून आपल्याला ओळखणारं इथं कोणीतरी आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि त्यांची परत भेट होते. हा प्रसंग कुठल्याही बागेत, रम्य तळ्याकाठी किंवा समुद्रकिनारी घडत नाही. भोवती असतात कुठल्याश्या उध्वस्त नगरीचे भग्न अवशेष. त्यांच्या भावविश्वाइतकेच किंबहुना त्यापेक्षा कमीच. सोबतीला एक विचित्र अवघडलेपण. बोलायला म्हटलं तर खूप काही, म्हटलं तर काहीही नाही.

"एक काम करे? जब् तक तुम यहा हो रोज घरपे खानेकें लिये तो आयाही करोगी. खानेके बाद घुमने निकल आया करेंगे. कमसकम् ये इमारते कुछ दिनो कें लिये तो बस जायेंगी" तो सुचवतो. त्याच्या चेहेर्‍यावर स्पष्ट लिहिलेलं की तो त्या इमारतींबद्दल बोलत नाहीये. आणि मग एकदम त्याच्या लक्षात येतं की तिच्या अंगावर शाल नाहीये. नेहमीप्रमाणे ती विसरलेली आहे. आपल्या अंगावरचा कोट तो तिच्या अंगावर घालू पहातो. तर अवघडून ती नको म्हणते. तरीही न जुमानता तो तिला घालतोच. आणि तीच सम् पकडून 'आंधी' तलं अप्रतिम गाणं सुरु होतं - तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही.

जितक्या वेळा पहाते तितक्या वेळा हा प्रसंग मला भुरळ घालतो. तुम्ही काय, मी काय, आपण कोणीच परफेक्ट नाही. मातीच्या भांड्यांना इथे तिथे तडे असायचेच. ह्या गुणदोषांसकट स्वीकारणारं कोणीतरी भेटणं ही किती अप्राप्य गोष्ट. भेटून ती व्यक्ती दुरावणं हा केव्हढा अभिशाप. आणि तरीही मनात कडवटपणा येऊ न देणं किती कठीण. पण मध्ये इतकी वर्षं जाऊनही ह्या दोघांच्या नात्यात अजूनही जिव्हाळा आहे, प्रेम आहे, एकमेकांबद्दल काळजी आहे. एका अर्थाने हा नियतीचा पराभव आहे. तिने पदरात टाकलेल्या ह्या दोन-चार क्षणांचं सोनं करतानाच कुठेतरी 'ही सोबत काही क्षणाची आहे.' ह्या अटळ सत्याची जाणीव आणि त्याचा स्वीकारसुध्दा ह्या प्रसंगात आहे. दुर्देवाने सुचित्रा सेन संपूर्ण चित्रपटात एकच एक्सप्रेशन घेऊन वावरली आहे. पण हे सगळे भाव संजीवकुमारने आपल्या अभिनयातून सुरेख दाखवले आहेत. 'डिग्निफाईड' ह्या शब्दाचा अर्थ कोणी विचारला तर ह्या चित्रपटातल्या त्याच्या व्यक्तिरेखेकडे मी खुशाल बोट दाखवेन.

तुम्ही कदाचित हसाल पण मला स्वत:ला हा प्रसंग अतिशय रोमॅन्टीक वाटतो. आणि त्याच वेळेला दरवेळी माझ्या डोळ्यातून पाणीही काढतो. नियतीत आपला पराभव स्वीकारायचा दिलदारपणा नाहीये हो. नाहीतर अश्या कितीतरी बरबाद इमारती आबाद झाल्या असत्या.

नवरात्राची चाहूल लागली की गरब्याचे, घटस्थापनेचे, आपट्याच्या पानांचे, प्लास्टीकच्या डब्यातसुध्दा जोमाने वाढणार्‍या हिरव्याचुटुक रोपट्याचे कसलेकसले वेध लागतात. पण त्यासोबतच त्या दिवसात माझ्या मनाच्या डोळ्यांसमोर पुष्पा उभी रहाते. सासरच्यांनी टाकलेली, माहेरच्यांनी वाऱ्यावर सोडलेली, कोठ्यावर गाणं गाऊन उपजीविका करणारी पुष्पा. रूढार्थाने तिच्याशी कसलंही नातं नसलेल्या आईविना वाढणार्‍या नंदुला जीव लावणारी, त्याचे लाड पुरवणारी पुष्पा. उतारवयात कोठ्यावरून हाकलून दिलेली, लोकांकडून अपमान सहन करून घेत भांडी घासणारी पुष्पा. स्त्रीच्या वाट्याला आलेल्या सगळ्या सगळ्या दुर्देवाचे दशावतार भोगणारी पुष्पा. मग एक दिवस नंदू तिला शोधत येतो. त्याला आता बायको आहे, एक मुलगा आहे. पण तरी त्याचं कुटुंब अधुरं आहे कारण त्यात त्याची आई नाही. नंदूच्या लेखी ही जागा भरून काढेल अशी अख्ख्या जगात एकच व्यक्ती आहे. आणि म्हणूनच तो तिला घरी घेऊन जायला आलाय. जेव्हा घरोघरी दुर्गादेवी आपल्या भक्तांच्या घरी जात असते तेव्हा ही आई आपल्या जन्म न दिलेल्या मुलासोबत त्याच्या घरी मानाने जात असते.

ह्या देशात बाई म्हणून जन्माला आल्याची लाज वाटावी अश्या घटना रोज पहायला आणि ऐकायला मिळत असताना माझा भाबडा आशावाद फक्त 'अमर प्रेम' मधल्या ह्या एकाच प्रसंगाने टिकवून धरलाय.

खरं तर एखादा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला त्यातला एखादा प्रसंग लक्षात रहातो. पण एक प्रसंग मला चित्रपट अजिबात न बघता फक्त त्यातलं एक गाणं पाहून प्रचंड भावलाय. चित्रपटाची कथा आईने सांगितल्यावर थोडी वेगळी वाटली. जवळपास एका रात्रीत घडलेली ही गोष्ट. नायक अगदी गरीब शेतकरी. शहरात आलेला. इथल्या चकचकाटाने भांबावलेला. एका मोठ्या इमारतीत तो चुकून शिरतो आणि मग त्यातल्या अनेक घरात चालणार्‍या अजब गोष्टी त्याला पहायला मिळतात. गैरसमजुतीतून चोर म्हणून लोक् त्याच्या मागे लागतात. जीव वाचवायला तो एका घरात शिरतो. त्या घरातली छोटी मुलगी त्याला पळून जायला दरवाजा उघडून देते. पण मार पडेल ह्या भीतीने धास्तावलेला नायक थिजून जागीच उभा रहातो. त्यावर सहजपणे ती चिमुरडी म्हणते की तू काही केलंच नाहीयेस तर का घाबरतोस? नायकाला धीर येतो. तो बाहेर पडतो. 'जागते रहो' मधलं 'जागो मोहन प्यारे' इथे सुरु होतं. नायक बाहेर पडतो तेव्हा कोणीच त्याला धरत नाही. खर्‍याला कोणाची भीती? सत्याचा नेहमीच जय हेच जणू अधोरेखित होतं. गाण्याच्या शेवटी नायक राज कपूर एका घराच्या दाराशी येतो. नुकतीच न्हाऊन शुचिर्भूत झालेली नर्गिस गाता गाता झाडांना पाणी घालत असते, पक्ष्यांना पाणी पाजत असते. 'पाण्याला नाही म्हणू नये' ही आपल्या संस्कृतीची शिकवण. गाता गाता तिचं लक्ष दाराकडे जातं तेव्हा एक परका पुरुष तिथे उभा असलेला तिला दिसतो. स्त्रीच्या मनातली आदिम भीती तिच्याही मनाचा क्षणभर ताबा घेते - पण क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी तिला कळून चुकतं की तो तहानलेला आहे. मग मात्र ती पुढे सरते. आणि त्याच्या पसरलेल्या ओंजळीत तिच्या घड्यातलं पाणी पडायला लागतं. स्त्री-पुरुषातली सगळी नाती नष्ट होऊन केवळ नर आणि मादी हेच एक नातं उरलंय की काय असं वाटावं अशी आजकालची स्थिती आहे. अतिभाबडा असला तरी म्हणूनच कदाचित मला हा प्रसंग आवडत असावा.

पाणी पाजण्यावरून आठवलं. शाळेच्या इतिहासानंतर सम्राट अशोक जो गायब झाला होता तो शाहरुखने त्याच्यावर चित्रपट काढेतो माझ्या फारसा लक्षातही नव्हता. ह्या चित्रपटानंतर मात्र मला अशोकाची प्रचंड कीव आली होती. 'अशोका' पहायचा नाही असंच मी ठरवलं होतं पण कधीतरी एकदा चॅनेल सर्फ करता करता चित्रपटाचा शेवट दृष्टीस पडला. कलिंगाचं युध्द संपलेलं होतं. जिकडेतिकडे प्रेतांचा खच पडला होता. जखमी विव्हळत होते. ह्या बरबादीतून सम्राट अशोक विषण्ण मनाने फिरत होता. त्याचं लक्ष पाणी मागणाऱ्या एका जखमीकडे गेलं. तो शत्रूपक्षातला होता. पण त्याची पर्वा ना करता अशोक त्याला पाणी द्यायला पुढे झाला. त्या जखमी माणसाच्या मनात अशोकाबद्दल एव्हढा तिरस्कार, एव्हढी घृणा की त्याने त्याच्या हातून पाणी घ्यायचं नाकारून पाण्यावाचूनच प्राण सोडला. हे पाहिलं आणि शाळेत २-४ मार्कांच्या टीपेची धनी झालेली सम्राट अशोकाची उपरती दाणकन माझ्या अंगावर आली. अजूनही कधीमधी कुठल्या चॅनेलवर 'अशोका' लागला तर चॅनेल्स स्विच करत करत का होईना पण जीवाचा आटापिटा करून मी हा प्रसंग बघतेच बघते.

'सांगा कसं जगायचं?' ह्या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्याचं. पण आपण आपलं आयुष्य जगावं आणि दुसर्‍याला त्याचं आयुष्य जगू द्यावं एव्हढी साधीसरळ गोष्ट सगळ्यांना कळली असती तर आणखी काय हवं होतं? मग आपली उत्तरं बाकीच्याना चुकीची वाटतील म्हणून आपणच आपली उत्तरं बदलतो. त्यातून हे उत्तर एखाद्या बाईचं असलं तर ते चुकीचं ठरवायला सगळा समाज पुढे सरसावतो. शंभरात एखादी एकच रोझी असते जी आपल्या उत्तरावर ठाम राहते, आपल्या निवडलेल्या वाटेने चालत रहाते, नको असलेल्या लग्नाच्या बेड्या तोडून बाहेर पडते आणि खूप दिवसांनी घेतलेल्या मोकळ्या श्वासाचा सोहळा साजरा करते. तिच्यात एव्हढा आमुलाग्र बदल घडून येतो की तिच्यावर प्रेम करणारा राजू गाईडही अवाक होतो. चालत्या ट्रकमधून मातीचं मडकं रोझी का फेकते हे गूढ मला बरेच दिवस उकललं नव्हतं. मग एका सिरियलमध्ये कोणातरी व्यक्तिरेखेचा अंत्यसंस्कार साग्रसंगीत दाखवताना मी पाहिला. पाण्याने भरलेलं मडकं जमिनीवर पडून खळ्ळकन फुटलं आणि मला रोझी आठवली. जुन्या आयुष्याला फेकून देताना तिने 'आज फिर मरनेका इरादा है' असे किती समर्पक शब्द वापरले. हे मरणं शेवटचं. तिथून पुढे फक्त भरभरून जगणं - आज फिर जीनेकी तमन्ना है. रोझीच्या नव्या आयुष्याची ही सुरुवात मला म्हणूनच खूप महत्त्वाची वाटते.

तो एक कैदी. जन्माने भारतीय पण २२ वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेला. कैदी नं ७८६ म्हणूनच त्याला सगळे ओळखतात. त्याची खरी ओळख कधीचीच पुसून गेलेली. मग एक दिवस सामिया सिद्दीकी त्याला भेटायला येते. तिची खात्री आहे की हा कैदी भारतीय गुप्तहेर नाही. त्याची खरी ओळख पटवणारे द्स्तावेज आणण्यासाठी ती भारतात येते. तिथे तिला कळतं की त्याचे आईवडिल कधीच वारलेत. ती निराश होते. पण तरीही त्याच्या घरात चालवल्या जाणार्‍या मुलींच्या शाळेत ती पोचते. तिथे काही हाती लागेल असं तिला वाटत नाही म्हणून खिन्न मनाने ती परतत असताना 'झारा, झारा' अशी हाक तिच्या कानावर पडते. ती गर्र्कन वळते. एक मुलगी पळत येत असते आणि तिच्या मागून छडी घेऊन तिला हाका मारत धावत येत असते तीही असते झारा. कैदी नं ७८६ ची, स्क्वॅड्रन लीडर वीर प्रताप सिंगची झारा. जिची बदनामी होऊ नये म्हणून त्याने २२ वर्ष परमुलुखात तुरुंगात काढलेली असतात ती झारा. वीरवरच्या प्रेमापोटी ठरलेला निकाह मोडून भारतातल्या त्याच्या गावी येऊन मुलींची शाळा चालवून त्याचं स्वप्न पूर्ण करणारी झारा.

मुलीने प्रेमाचा अव्हेर केला म्हणून सरळ तिला मारून टाकण्याचा सध्याचा ट्रेन्ड. ब्रेकअप होऊन आठवडा झाला नाही तोच दुसरा साथीदार निवडणारा फास्ट ट्रॅकचा जमाना. आजच्या काळात वीर आणि झारा खूप आऊटडेटेड वाटतात, मेलोड्रॅमॅटिक वाटतात, काल्पनिक वाटतात. म्हणूनच असेल कदाचित मला सामिया आणि झाराच्या भेटीचा हा प्रसंग खूप आवडतो.

आठवायला बसलं तर असे अनेक प्रसंग आहेत जे मी अनेक वेळा पाहू शकते - सगळ्यांना जीव लावून एक दिवस त्यांच्यातून निघून जाणार्‍या आनंदचा मृत्यू, जयच्या हातातून त्याचं लाडकं दोन्ही बाजूंना 'फेस' असलेलं नाणं पडण्याचा प्रसंग, इजाजतमधला रेखा नसीरचा निरोप घेते तो क्षण, मधुमतीमधला गुन्हेगार पकडून दिल्यानंतर मधुमतीच्या आत्म्याचं आपल्या प्रियकराला शेवटचं भेटणं, 'साहब, बीबी और गुलाम' मधलं मीनाकुमारीचं अजाणता का होईना पण आपल्याला स्पर्श केला म्हणून नोकराला रागे भरणं, 'कर्ज' मधल्या 'एक हसीना थी' च्या शेवटी मॉन्टीने आपल्या गतजन्मातल्या आई आणि बहिणीला स्टेजवर बोलावणं. इतकंच काय, तर 'अजूबा' नावाच्या टुकार चित्रपटातलं आईविना वाढलेल्या अमिताभचं, अजूबाचं, एका डॉल्फिन माश्याला 'मा' म्हणून हाक मारणं आणि त्यावर त्या डॉल्फिनचं पाण्यातून उसळी मारून येणं सुध्दा.

'कलियुग आहे बाबा' असं म्हणत आपण नको नको ते अभद्र पहायला, वाचायला आणि ऐकायला लागण्याच्या मजबूरीचं समर्थन करतोय. हे असे प्रसंग आठवले की मात्र वाटायला लागतं......

करोगे याद तो हर बात याद आयेगी
गुजरते वक्तकी हर मौज ठहर जायेगी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना लेख सकाळीच मोबाईलवरून वाचलेला पण प्रतिक्रिया आता देतेय
अप्रतिम लेख! खास स्वप्ना स्टाईल....
खुप खुप खुप आवडला
हजार मोदक तुला!
talya.giftalya.giftalya.giftalya.giftalya.gif

लेख छानच झालाय!

आंधी, अमर प्रेम, इजाजत, आनंद हे सगळे माझ्याही मनातल्या कुपीत बंद असणारे!

शुभेच्छा !

लेख आवडला...'आज फिर जीने की...' पुन्हा एकदा नव्याने कळलं.
>>>आठवायला बसलं तर असे अनेक प्रसंग आहेत जे मी अनेक वेळा पाहू शक>>>खरंच दुसरा भाग जरूर लिही. Happy

खुप मस्त विषय आणि भारी लिहिलय. आत्ता जे आठवतायेत ते लिहितोय.
१. मनोज कुमारच्या शहिद मधे शेवटचा प्रसन्ग. त्याना जेव्हा फाशी द्यायला नेत असतात. खुप रडलो होतो पहिल्यान्दा पाहाताना.
२. दो आखे बारा हाथ (जुना) मधे एक भयानक दिसनार्या कैद्याची त्याच्या मुलाना भेटायची धड्पड आणि त्याच्या आइची त्याला भेटायची धड्पड . खुप मस्त दाखवलय.
३. पिन्जरा मधे श्रीराम लागु निळु फुलेला थोबाडित मारतात. त्यानन्तरचे त्यान्चे सन्वाद.

चित्रपटातले आवडते प्रसंगात आता लगेच आठवतो तो म्हणजे
भाग मिल्खा भाग मधला. मिल्खा सैन्यात जातो. तिथे धावण्याच्या स्पर्धेत चांगली काम्गिरी करतो.
घरी येतो तर बहिण आनंदाने हरखुन जाते.
मिल्खा तिला आपला भारतीय सेनेचा कोट घालतो. आरश्यासमोर उभं करतो.
आणि तिला खिशात हात घाल असं सांगतो.
ती खिशात हात घालते. आणि त्यानंतर दिव्या दत्ताने जे काही भाव उमटवलेत चेहर्‍यावर. लाजवाब.
डोळे भरुन येतात. फक्त त्या एक्सप्रेशन्स वरुनच आपल्याला कळतं की मागे मिल्खाला पोलिस चोउकीतुन सोडवायला
बहिणीने गहाण ठेवलेले कानातले आहेत खिशात.
मी तर रडले होते त्या सीनला.

सुंदर लिहील आहेस...
अशोका बघितला नव्हता. कुठे मिळाला तर नक्की बघेन, ह्या सीन साठी तरी..

मस्त
मी परत परत वाचला. माझे आवडते प्रसंग मांडलेस अपवाद वीरझारा. मी तो ट्रान्सलेट केलाय त्यामुळे किती अत्याचार झाले काय सांगू? त्यात माझ्या साऊदिंडीयन मैत्रिणीला पहा सांगितलं होतं, तिच मित्रमंडळ आजही मला शोधतय अस ऐकून आहे.

माझा ल़क्षात राहीलेला प्रसंग म्हणजे त्रिशुल मधला, आप है मेरे नाजायज बाप
अमिताभ दाण दाण डायलॉग्ज मारून अभिनय करून जातो आणि.....

आणि संजीवकुमार फक्त एक खोकल्याची उबळ दाबण्याचा अभिनय करतो.
मला नेमक मांडता येत नाही पण हा आपला मुलगा आश्चर्य, बरच काही गमावल्याच दु:ख असं बरच काही क्षणार्धात दाखवतो आणि आपण अमिताभला विसरतो.

चित्रपटातील प्रसंग बरेच आहेत , पण हे बघितल्या बघितल्या आठवलेला प्रसंग.
मिर्झा गालीब सिरियल मधला.
सकाळच्या झुन्जुमुन्जु वेळी मिर्झा घरातुन निघतात, मशिदीच्या पहिल्या दुसर्या पायरीवरच थांबतात.
Background ला शेर सुरु असतो " ये मसाइले तसव्वुफ ये तेरा बयान गालीब , तुझे हम वली समझते जो ना बादाख्वार होता"
त्यावेळचा नसिर चा अभिनय , त्याची नजर व त्यानंतरचा घरी परतल्यावर तन्वी आझमी व नसिरचा अभिनय व संवाद .

" अब भी वक्त है जाओ सुलह करलो उससे."

"सत्तर साल से बुला रहा है वो , किस मुह से जाउ ? बेगम

अप्रतीम.

खूप छान लिहिलंय ..

माझा आवडता Mr . India मधला प्रसंग जेव्हा ती सगळी मुले २ दिवसापासून उपाशी असतात आणि श्रीदेवी त्यांच्या साठी खायला आणते व ती लहान मुलगी भुके मुळे तिच्याशी मैत्री करायला हो म्हणते , श्रीदेवी आणि अनिल कपूर च्या डोळ्यातले पाणी ते सगळं एकंदरीत बघून रडायलाच येते नेहमी.

अजून एक म्हणजे 'दिल चाहता है' चा सुरवातीचा प्रसंग जेव्हा आमिर ची प्रीती झिंटा शी पहिली भेट होते तेव्हाचा Lol ..अरे जास्त सांगत नाही ..बघाच ->
https://www.youtube.com/watch?v=pg5EgN8bXnE

छान लिहिले आहे.

3 idiots मधील चतुरच भाषण >>> मला प्रचंड राग येणारा प्रसंग >> मलापण राग येतो Angry

Pages