चॅम्पियन्स्

Submitted by माध्यम_प्रायोजक on 27 August, 2012 - 02:00

जागतिकीकरणाच्या रेट्यात आणि ’इंडिया शायनिंग’च्या झगमगाटात समाजातला एक फार मोठा वर्ग आहे तिथेच राहिला. त्यांच्या मूलभूत गरजा, प्राथमिक समस्या कायमच दुर्लक्षिल्या गेल्या. त्यातूनच निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांपैकी एक बालकामगारांचा भयानक प्रश्न. सरकारनं बंदी घातली, अनेक योजना सुरू केल्या, मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली, पण परिस्थिती जैसे थे राहिली. उलट शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बालकामगारांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे.

झोपडपट्टीत राहणार्‍या आणि शिक्षणाची आस बालगणार्‍या दोन भावांची गोष्ट म्हणजे 'चॅम्पियन्स्'. घरात दोन वेळचं जेवण मिळण्याची मारामार असतानाही ही मुलं शाळेत जातात. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, म्हणून त्यांचे आईवडील राबराब राबतात. आपली मुलं शिकून मोठं होण्याची स्वप्नं रोज बघणार्‍या आपल्या आईवडिलांच्या कष्टांचं चीज करण्यासाठी ही भावंडंही धडपडतात.

मात्र नियतीचे फासे उलटे पडतात. शाळा सुटते, आणि पोट भरायला मुलांना घराबाहेर पडावं लागतं.

मुंबईतल्या महापालिका शाळांमध्ये पहिलीत प्रवेश घेतलेल्या शंभर मुलांपैकी फक्त तीस मुलं दहावीची परीक्षा देतात, असं एका पाहणीत आढळलं होतं.

आपल्या सिनेमाचे दोन लहानगे हीरो परिस्थितीवर मात करून, शिकून चॅम्पियन्स् ठरतील, की त्यांचं अख्खं आयुष्य इतर लाखोंप्रमाणे रस्त्यावर मजुरी करण्यात जाईल, या प्रश्नाचं उत्तर मिळेल ’चॅम्पियन्स्’मध्ये.

Champion 8x4 banner.jpg

बालकामगार आणि त्यांचं शिक्षण या महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करणार्‍या या चित्रपटाचे मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला २०११ सालचा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शंतनु रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार मिळाले आहेत. नवव्या आंतरराष्ट्रीय पुणे चित्रपट महोत्सवात ’चॅम्पियन्स्’चा परीक्षकांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला गेला.

३१ ऑगस्ट, २०१२ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. सतत संघर्ष करत शिक्षण पूर्ण करणार्‍या 'चॅम्पियन्स्'ना दाद देण्यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जरूर पाहा.

चित्रपटातले कलाकार - ऐश्वर्या नारकर, अरुण नलावडे, अविनाश नारकर, उदय सबनीस, हृदयनाथ राणे, मृणाल चेंबुरकर, सविता गोस्वामी

बालकलाकार - शंतनु रांगणेकर, मच्छिंद्र गडकर

निर्मिती - ऐश्वर्या नारकर
संकल्पना व दिग्दर्शन - रमेश मोरे
कथा, पटकथा, संवाद - रमेश मोरे
कला - समीर दाभोळकर
छायालेखन - योगेश जानी
पार्श्वसंगीत - अमोल बावडेकर


***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालकामगार आणि त्यांचं शिक्षण या महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करणार्‍या या चित्रपटाचे मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक आहेत. >>>> खूपच चांगली व अभिमानाची गोष्ट आहे ही .....

संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा...

मध्यंतरी "आय अ‍ॅम कलाम" हा नितांतसुंदर सिनेमा पाहिला..... त्यात ही हाच विषय मांडला आहे........