निखळ करमणुकीचा धंदा करणारा -उमदा ‘दादा’- शाहीर दादा कोंडके

Submitted by किंकर on 26 August, 2012 - 23:01

गाथाचित्रशती लेखनस्पर्धेसाठी –
१.माझी आवड / आठवण –
निखळ करमणुकीचा धंदा करणारा -उमदा ‘दादा’- शाहीर दादा कोंडके
टवाळां आवडे विनोद । उन्मत्तास नाना छंद । तामसास अप्रमाद । गोड वाटे ॥
समर्थ रामदास म्हणतात - थट्टेखोर माणसास विनोद आवडतो,अंगात माज आलेल्या माणसास नाना व्यसने आवडतात,तर तामसी माणसास दुष्कर्म करणेच गोड वाटते.
मात्र समाजाने त्यातील 'टवाळा आवडे विनोद |' एवढाच संदर्भ घेत विनोदबुद्धीला दुय्यम दर्जा देत निरुद्योगी पणाचे लक्षण ठरवले. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना विनोद, विनोदी साहित्य वा विनोदी चित्रपट अशा कलाकृतींचा निखळ आनंद घेणे हे अवघडले पणाचे वाटू लागले. त्यामुळेच की काय, पण मराठी चित्रपट समीक्षक देखील विनोदी चित्रपट किंवा विनोदी कलाकारांकडे बरेचदा दुर्लक्ष करतात.
तसा मराठी चित्रपट बराच काळ ग्रामीण कौटुंबिक जीवन किंवा तमाशापट अशा ठराविक विषयांमध्येच अडकून होता. मराठी चित्रपटांचा नायक हा विनोदी असू शकतो,हेच स्वीकारण्यास निर्माते आणि प्रेक्षक तयार नव्हते. चाकोरी बाहेर पडून राजा परांजपे, गोसावी,शरद तळवलकर, धुमाळ आणि दामू अण्णा मालवणकर अशा मान्यवर गुणीवंतांनी मराठी प्रेक्षकांना विनोदातील मनोरंजन दाखवून दिले. पण तरीही ह्या वारश्याकडे गंभीरपणे पाहणारा कलाकार सापडत नव्हता. विनोद आणि निखळ करमणूक यांची सांगड घालत यशस्वी व्यवसायिक चित्रपट देणे हे गणित जमतच नव्हते.
शेवटी सर्वसामान्य प्रेक्षकांची ही इच्छा पुरी करण्यास एक कलाकार अभिनेता पुढे आला. 'विच्छा माझी पुरी करा' या वसंत सबनीस लिखित वगनाट्यातून विनोद हा यशस्वीतेचा पाया असू शकतो हे दाखवत, हा उभरता कलाकार रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला.
तसे पहिले तर 'विच्छा' मधील हवालदाराने भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे पडद्यावर पदार्पण केले होते. पण 'सोंगाड्या' च्या रूपाने त्याने मराठी चित्रपट सृष्टीत वादळ निर्माण केले. कृष्णा कोंडके या अधिकृत नावाने एक अतिशय सामान्य जीवन जगणारा हा इसम, चित्रपट सृष्टीत मात्र शब्दशः 'दादा' ठरला आणि जगाला दादा कोंडके या नावानेच परिचित झाला.
'तांबडी माती' मधील दादा कोंडके यांच्यावर चित्रित झालेले - 'डौल मोराच्या मानाच्या रं डौल मानाचा' हे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातील गाणे, मला नेहमीच एका वेगळ्याच आठवणींच्या दुनियेत घेवून जाते. योगायोग म्हणजे या गीताचे चित्रीकरण झाले आहे माझ्या आजोळी, 'बहे'या कृष्णाकाठी वसलेल्या एका लहानश्या आणि नितांत सुंदर निसर्गरम्य खेडेगावात! त्यावेळे पासून दादा एक रुबाबदार गाडीवान म्हणून स्मरणात राहिले, पण हा त्यांचा बैलगाडीतील प्रवास वायुवेगाचा ठरेल असे तेंव्हा वाटलेच नव्हते.
खरेतर चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी दादा कोंडके यांच्या जीवन पटाकडे पाहिले तर, तो देखील एक अद्भुत चित्रपटच वाटतो. नायगाव मुंबई येथे गिरणी कामगार असलेल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या दादांचा जन्म गोकुळाष्टमीचा, म्हणून ते कृष्णा कोंडके झाले. खडतर बालपण, त्यामुळे अपना बझार मध्ये नोकरी आणि बालपणातच कुटुंबातील जिव्हाळ्याच्या माणसांचे एका पाठोपाठ एक झालेले मृत्यु यामुळे त्यांना परिस्थितीने एकाकी बनवले. पुढे लवकर घ्याव्या लागलेल्या घटस्फोटामुळे वैवाहिक सौख्य आणि कौटुंबिक जीवन अल्पकाळच लाभले. मात्र या सर्वच आघातानंतर देखील त्यांनी खचून न जाता आपल्या उपजत विनोदी वृत्तीने जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्यास सुरवात केली.
दादांचे मुळ गाव-इंगवली, तालुका-भोर येथील. त्यामुळे त्यांना जवळून घडलेले ग्रामीण जीवनाचे दर्शन, त्या वातावरणात करमणुकीचे साधन असलेल्या तमाशा विषयीची आत्मीयता यातून त्यांच्यातील विनोदी माणूस नेहमीच जागा राहिला.
बँड पथकात करावे लागलेले काम त्यांना संगीताची जाण देवून गेले. या सर्वांचा सुरेख उपयोग त्यांनी 'विच्छा माझी' मधील हवालदाराची भूमिका पार पडताना केला. पंधराशेहून अधिक प्रयोग देत त्यांनी ते वगनाट्य एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले. ते सादर करताना तत्कालीन विनोदांची पेरणी करण्याचे स्वातंत्र्य दादा अनेकदा घेत असत.
एकदा प्रयोग पाहण्यास आचार्य अत्रे आले होते. त्यावेळी आपल्या सह कलाकाराच्या तोंडी सतत असलेली शिवीगाळ ऐकून दादांनी त्याला सहज म्हणाले, "अरे! आज सकाळ पासून तू असा शिव्यांचा भडीमार करतोयस! काय आज सकाळी "दैनिक मराठा" वाचून आलास का?" या उत्स्फूर्त विनोदाने प्रेक्षागृह दणाणून सोडले होते.
या त्यांच्या हजरजबाबी पणाचा अनुभव मी स्वतः देखील घेतला आहे. त्यांच्या कामाक्षी फिल्म या संस्थेत एकदा मित्र परिवारातील आम्ही मंडळी दिवाळीनिमित्त एकत्र जमलो होतो. त्यावेळी दादा सर्वांना नववर्षाची भेट म्हणून मिठाई देत होते. आलेले एक गृहस्थ मिठाईचा पुडा आधीच घेवून बसले होते. जेंव्हा दादांनी त्यांना मिठाई घेण्यास पुढे बोलावले तेंव्हा ते गृहस्थ जागेवरूनच मी घेतला मी घेतला असे म्हणाले. गंमत म्हणजे ते एक सरकारी कर्मचारी होते. त्यांनी मिठाईचा पुडा घेतल्याचे सांगताच दादा त्यांना अगदी सहज म्हणाले "अहो तो तुम्ही सवयीप्रमाणे घेतलात, आता आम्ही देतो तो घ्या "
या विनोदी नायकाच्या यशाने अनेकांचा पोटशूळ उठत असे. मग त्यांच्या यशाचा प्रगतीचा मोकळ्या मनाने स्वीकार करण्या ऐवजी त्यांना 'द्वयर्थी शाब्दिक कसरती करणारा' असे लेबल लावून त्यांची मानहानी चालविली जात असे. पण त्यांनी त्याही गोष्टींकडे दुर्लक्षच केले.
'विच्छा' च्या यशाची चढती कमान सुरु होण्याच्या पूर्वीचा एक किस्सा आठवतो. एकदा सहकाऱ्यांबरोबर गप्पांचा फड रंगला असताना मध्येच एक मित्र उठून निघाला. दादांनी त्याला विचारले "का रे का उठून चाललास?" तो सहजच म्हणाला, "काही नाही, जरा पोटात दुखतंय" क्षणाचाही विलंब न करता दादा उद्गारले "अरे, पण आमचे तर काहीच चांगले झालेले नाही!" त्या मित्राला एक/दोन मिनटे हास्याचा एवढा कल्लोळ का उठला हे ही समजले नाही.
अर्थात द्वयर्थी विनोदांचा वापर त्यांनी नक्कीच केला, पण त्याचा इतका चपखल वापर करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकले नाही असे मला वाटते. त्यांच्या मार्मिक आणि अगदी निर्भेळ रंजक विनोदांनी ग्रामीण जीवनाची नस पकडत प्रेक्षकांची मने नुसती जिंकलीच नाहीत, तर त्यावर राज्य केले.
त्यांनी दिलेले चित्रपट रसिकांनी इतके डोक्यावर घेतले की त्यांचे एक/दोन नव्हे तर चक्क सलग नऊ चित्रपट रोप्यमोह्त्सवी झाले. आणि यामुळेच जगातील सर्वात यशस्वी निर्माता/दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंदले गेले असे म्हणतात. एक मराठी माणूस म्हणून मला या गोष्टीचा मनापासून अभिमान आहे. अर्थात त्यांचे नाव जरी यशस्वी दिग्दर्शक म्हणून नोंदले गेले असले तरी चित्रपट क्षेत्रातील त्यांचा वावर हा अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक गीतकार,लेखक असा 'सब कुछ दादा'असा राहिला आहे.
दादा हे बहुरंगी, बहुढंगी कलाकार होते. त्यांची 'विनोदी चित्रपट निर्माता' या पलीकडील प्रतिमा लोक सहजतेने स्वीकारतील की नाही याची शंका असल्याने 'माहेरची साडी' ह्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी त्यांच्या पुतण्याचे नावे केली असे म्हटले जाते. पुढे त्या चित्रपटाने केलेला व्यवसाय आणि घटनाक्रम यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. त्यानंतर आपली मुळ प्रतिमा भक्कम करण्यासाठी व या चित्रपटास उत्तर देण्यासाठी म्हणून 'सासरचे धोतर' दादांनी नेसले असे म्हणतात.
तसे म्हणाल, तर मला दादा हे चित्रपटापेक्षा चित्रपटा बाहेरील अधिक माहित होते. सेवादलात काम केलेला एक राष्ट्रभक्त, कामाक्षी देवीचा निस्सीम भक्त, यश आणि अपयश याकडे सारख्याच व्रतस्थ वृत्तीने पाहण्याची दृष्टी असणारा एक द्रष्टा कलाकार, एक प्रामाणिक निसर्गप्रेमी म्हणूनच दादा मला अधिक परिचित राहिले.
त्यांच्या निसर्गावरील भक्ती मुळेच त्यांच्या लेखणीतून द्वयर्थी विनोद पलीकडे जावून अगदी मेंढरू, कुत्रा बैल असे प्राणी व भाजीपाला, झाडे यावरील नितांत सुंदर रचना सहजतेने उतरल्या.
दादांच्या जन्माच्या वेळी त्यांची कुंडली मांडून भविष्य कर्त्याने 'ह्या मुलाच्या वाट्यास फक्त अपयशच निश्चित आहे' असे वर्तवले होते. जीवनाच्या पूर्वार्धात जणू ते भविष्यच पाठीशी राहणार असे वाटत असतानाच त्यांनी अशी काही उत्तुंग भरारी घेतली की अपयशाने त्यांच्या कडे कायमची पाठ फिरवली.
असे असले तरी काही वेळा वाटते, त्यांना आर्थिक यश जरी मिळाले तरी अयशस्वी वैवाहिक जीवन, त्यांच्या अनेक चित्रपटांची यशस्वी नायिका उषा चव्हाण यांच्या बरोबर काही काळ झालेले मतभेद, शिवसेनेबरोबर घनिष्ट संबंध असून देखील पुरी होवू न शकलेली राजकीय महत्वकांक्षा आणि नातेवाईकांबरोबर असलेले तणावपूर्ण संबंध पाहता आपले भविष्य बदलण्यात थोडे कमीच पडले का, असा प्रश्न पडतो.
त्यामुळेच या लेखाच्या सुरवातीस सांगितलेल्या समर्थ रामदासांच्या ओवी प्रमाणे टवाळा आवडे विनोद | यातील टवाळ होवून मी नेहमीच दादांच्या चित्रपटांचा आणि दादांच्या हरहुन्नरी जीवनाचा प्रवास समजावून घेण्याचा प्रयत्न कायम करत राहीन.
अगदी देव भाषा संस्कृत मध्ये देखील म्हणले आहे -काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् | व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा ||

म्हणजेच बुद्धिमान लोकांचा वेळ काव्याचा [आस्वाद घेण्यात] शास्त्राच्या [चर्चेत] आणि करमणूकी मध्ये जातो. मूर्ख लोकांचा वेळ मात्र व्यसन [करणे] झोप [कंटाळा करत ] आणि भांडणात जातो.
असे असेल तर मग दादांच्या विनोदाचा आस्वाद घेण्याची टवाळ खोरी करण्यात कसली आलीये लाज!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख किंकर , दादांविषयीच्या लेखाशिवाय हि स्पर्धा अधुरीच राहिली असती , ती कमी आपण दुर केलीत.

छानच.....!

दादा एक कवी /गीतकार म्हणून मला खूप आवडतो...
लेखक म्हणून दादांच्या शाहीरी विषयी लिहायला घेतलं होतं... पुर्ण होणार नाही बहुदा वेळेत... Sad

दादा कवी होते.. त्यांच्या काव्य प्रतिभेबद्दल लिहा.

अंजनीच्या सुता... या गाण्यात दुसरी ओळ आहे. बोला जय जय हनुमान ...... दादानी हनुमानला जुळणारी यमके अगदी साधी तरी सुंदर घेतली आहेत. आसमान, पंचप्राण , बिभिषण, भगवान , हैराण , आले प्राण

गंमत म्हणजे गीत रामायणात .... असा हा एकच श्री हनुमान ... या गाण्यात गदिमानीही हनुमानला जुळणारी यमके घेतली आहेत. त्यांचे शब्द बलवान, मधवान, धीमान असे संस्कृत प्रचुर आहेत.

चांगल लिहिल आहे पण अजुन भर घालता येइल तुम्हाला. Happy

दादांच्या चित्रपटात दिसणारं गाव मला नेहमीच भुरळ घालतं.
असं गाव तर आता गावात पण दिसत नाही. लहाणपणी पाहिलेल्या अनेक गावांची आठवण होते त्यांचे चित्रपट पाहताना. Happy

Happy कालच मनात विचार आला होता कि 'दादा कोंडके' यांच्यावर कोणी लिहील का म्हणून!!!
वा..छानच लिहिलंत . अशा कलाकाराला ट्रिब्यूट मिळायलाच पाहिजे होता.
त्यांचा हजरजबाबीपणा , सेंस ऑफ ह्यूमर, सेंस ऑफ टायमिंग, सहज अभिनय हे गुण पडद्यावर ठळकपणे नजरेत भरतात.

दादांवर द्वैअर्थाची टीका करणारे, सोवळे ओवळे भावगीताच्या गोड शिर्यावर पोसलेले तथाकथित पांढरपेशे प्रेक्षक, यांना चित्रपटात विनोद कशाशी खातात हे कधी कळले नाही. म्हणुन दादांना त्यांनी कमी कव्हरेज दिले असावे.....दुर्दैव असे की या भावगीतांचा आणि पांढरपेशा सिनेमांचा रतीब घालणार्यांचे आणि दादांच्या कलाकृतींना द्वैअर्थी म्हणणार्यांची सध्याची पिढी देल्ही बेली ,थ्री ,ईडीयट्स,अमेरीकन पाय वगैरे सिनेमे चवीने बघते, हाच दादांचा विजय आहे.
दादांना सलाम

छानच !

>>छान लेख किंकर , दादांविषयीच्या लेखाशिवाय हि स्पर्धा अधुरीच राहिली असती , ती कमी आपण दुर केलीत.

अनुमोदन..

पण दादांचं एकंदर काम व व्यक्तीमत्व मोठं आहे.. त्या मानाने लेख थोडा छोटा वाटला.

छान लेख.
एकटा जीव हे दादांचे आत्मचरित्र आवडले . ते वाचताना खरोखर धक्का बसला. त्यातले इतर कलाकारांचे उल्लेखलेले प्रसंग किती खरे खोटे माहित नाही. पण एखादे पुस्तक खोट्या संदर्भासहित प्रकाशित करणे अवघड आहे. (त्यानी सहकालाकारांचे केलेले उल्लेख खरे असतील तर त्यांच्या निर्भय पणाची दाद द्यायला हवी) . आत्मचरित्रात त्यानी वैयक्तिक आयुष्यात सुख न मिळ्याल्याचे दुख व्यक्त केले आहे.

छान लेख. दादांच्या विनोदबुद्धीला तोड नव्हती. वैयक्तिक पातळीवर मला श्लील-अश्लील हे भेद फारसे पटत नाहीत. विनोद चांगला असतो किंवा नसतो, मधलं काही नसतं. चांगला नसला तर तो विनोद फारच केविलवाणा होतो. शिवाय हल्लीच्या अमेरिकन सिटकॉमांमध्ये जसे विनोद असतात त्यापेक्षा दादांचे विनोद फार वेगळे होते अशातला भाग नाही. (जिज्ञासूंनी 'टू अँड अ हाफ मेन'चा कोणताही भाग पहावा.)

दादांच्या विच्छेचा ऑडीओ उपलब्ध आहे का?

मस्त. खरंच त्यांचा उल्लेख या स्पर्धेनिमित्ताने झाला हे खूप छान केलेत.
विच्छा पहायचे राहुनच गेले. पाहिलेच नाहीये. Sad

छानच, सुरेख लेख Happy
दादांच्याबद्दल आणखीही वाचायला आवडेल

पुरंदरे शशांक ,शैलजा ,आबासाहेब,स्मितू ,विशाल कुलकर्णी,मुक्तेश्वर कुलकर्णी,तुमचा अभिषेक अश्विनीमामी ,रैना - आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार.
श्री,योग- खरेच आहे काही उल्लेख झाले नाहीत तर सगळा सोहळाच अपुरा ठरतो.तशी हि स्पर्धा आणि दादा यांचे नाते आहे असे मला मनापासून वाटते.
शाम- आपण आपला लेख जरूर पूर्ण करा.
शेळी- दादांच्या काव्यात सहज आणि सोपेपणा पुरेपूर होता.
झकासराव- दादांच्या चित्रपटात माझे आजोळ 'बहे' येवून गेले आणि नोकरीच्या निमित्ताने भोर,इंगवली
परिसरास अनेक भेटी झाल्या त्यामुळे दादांचे चित्रपट जवळचे वाटले.
वर्ष नील -दादांच्या कलागुणांचा आपण केलेला उल्लेख अगदी योग्य आहे.
ग्रेट थिंकर - आपली तळमळ खरीच आहे.
सामी- आपले म्हणणे पूर्णतः मान्य.
राजकाशाना- आपले वैयक्तीक मत अगदी पटले.
आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

अत्यंत उत्तम लेख

फार आवडला

सर्व किस्से भारी आहेत. दैनिक मराठा, सवयीने मिठाईचा पुडा घेणे आणि आमचे काहीच चांगले झाले नाही - Lol

जबरदस्त आवडला हा लेख मला

कवठीचाफा - धन्यवाद.
ट्यागो - धन्यवाद.
बेफिकीर -आपल्या मनपूर्वक प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
नंदिनी-आभार

आवडला लेख. Happy

दादांचे चित्रपटेतर किस्से रंजक आहेत. त्यांच्या पूर्वायुष्यातील परिस्थितीबद्दल प्रथमच समजलं.

आमची पिढी कळत्या वयात येईपर्यंत 'विच्छा...'चे दादांचे प्रयोग बंद पडले होते आणि त्यांच्या सिनेमांची चलती होती. त्यांचे सिनेमे धो-धो चालले त्यामागे विच्छाची पुण्याईच असणार असं मला नेहमी वाटतं. मी त्यांचे ४-५ सिनेमे थिएटरमधे पाहिलेले आहेत. दादांच्या एंट्रीला, त्यांच्या संवादांना, अभिनयाला मिळणारी प्रेक्षकांची उस्फूर्त दाद ही केवळ त्या सिनेमांनी कमावलेली नाही - हे तेव्हाही जाणवायचं.
वगनाट्य आणि ग्रामीण विनोद यांसाठी अभिनयाचं एक वेगळं स्किल लागतं. ज्यांना हे समजत नाही, असे प्रेक्षक, समीक्षक मग दादांच्या आणि त्यांच्यासारख्या अन्य कलाकारांच्या उस्फूर्ततेला 'दादा कोंडके संस्कृती' असं म्हणून हिणवतात.

दादांच्या विच्छेचा ऑडीओ उपलब्ध आहे का?
हो.. पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील पंकज मध्ये पाहिली मी सीडी

ललितादेवी,

>> ...त्यांच्यासारख्या अन्य कलाकारांच्या उस्फूर्ततेला 'दादा कोंडके संस्कृती' असं म्हणून हिणवतात.

अगदी १००% अनुमोदन. उत्स्फूर्त विनोद सगळ्या स्तरावर लोकप्रिय आहे. मला विच्छा बघायला नाही मिळाला. पण भरत दाभोळकरांचा Son Of Bottom's Up नावाचा इंग्रजी वग पहिला होता. याची संकल्पना विच्छा वर आधारित होती (असं ऐकलंय). बिर्ला मातुश्री सभागृहात होता. साल १९८८. सगळी तथाकथित उच्चभ्रू लोकं द्‍व्यर्थी विनोदांना अगदी पोट धरधरून हसंत होती.

भाषेच्या मर्यादा होत्या, पण भरत दाभोळकर कार्यक्रम व्यवस्थित हाताळत होते. सुमारे ३ तास चालला. एव्हढा वेळ प्रेक्षकांना खिळवण्याची कला दादा कोंडके संस्कृती म्हणून झटकून निश्चितच टाकता येणार नाही.

आ.न.,
-गा.पै.

ललिता-प्रीति- आपण लेखावर दिलेली प्रतिक्रिया खरोखरच अभ्यासपूर्ण असून दादांच्या टीकाकारांना सडेतोड उत्तर आहे,आपले मनपूर्वक आभार.
दक्षिणा - आभार.
बाळू जोशी - सीडीच्या उपलब्धतेची माहिती दिलीत त्यासाठी खरेच आभार.
गामापैलवान- आपल्या प्रतिक्रियेतील माहिती मधून दादांच्या विनोद सादरीकरणाच्या पद्धतीवर व 'विच्छा' च्या संहितेवर स्वतंत्र कार्यक्रम झाल्याचे प्रथमच समजले. आपण म्हणता तसे केवळ टीका करून दादांच्या कामाकडे दुर्लक्षच करता येणार नाही हेच खरे.