वेदनांचा भारगाडा...

Submitted by सुधाकर.. on 26 August, 2012 - 11:47

नागमोडी वाट झाली चालता ही येत नाही
चालतो ती वाट आता, सोडता ही येत नाही.

वेदनांचा भारगाडा ओढता ही येत नाही.
भालरेषा ही अभागी, खोडता ही येत नाही.

दावलेसी तू कशाला इंद्रधनुचे रंग सारे?
भंगलेले स्वप्न आता, जोडता ही येत नाही.

गोवलेसी तू कशाला रेशमाचे बंध येथे?
बांधलेला जन्म आता, तोडता ही येत नाही.

काळ गेला डाव आला खेळता ही येत नाही
मांडलेला खेळ आता, मोडता ही येत नाही.

आसवांना पापणीत पेलता ही येत नाही
साचलेला आत टाहो, फोडता ही येत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात अलामत काय गृहित धरलीत सुधाकरराव? जमीनीत गडबड झाल्यागत वाटते
बाकी यन्दा तन्त्र बिन्त्र जमलेय बर्‍यापैकी..........वा वा छान!!
रचना चान्गली आहे एकन्दर

पुलेशु!!

अलामत- ओ
काफिये - खोडता,जोडता,मोडता,सोडता,फोडता इ>>>>>

त्यात 'ओढता' बसत नाही महाराज !!...असो जमिनीच्या शेरात ही सूट घेतलीत म्हणून एकवेळ चालून जाते का हे तज्ञाना विचारावे लागेल

अजून एक फुकटचा सल्ला= ओढताही ,खोडताही,जोडताही ........... असे हवे ('ता' ला 'ही' जोडा!!)

सर्वांचे मनापासून आभार.

वैभू. माझी ही गझल बिगर मतल्याची आहे असे समजून वाच.
.... ओढताही ,खोडताही,जोडताही हा तुझा फुकटचा सल्ला जरी बरोबर असला तरी मराठी भाषेच्या कोणत्या
नियमानुसार हे चुकीचे आहे.---- जोडता ही, हे शब्द शक्यतो जोडून असतात पण असावेत
असा कोणता ही नियम नाही. Happy हे मी फक्त गझलेत अज्ञ असलेल्यांना ही लयीत वाचता यावे यासाठी केले आहे.

हे मी फक्त गझलेत अज्ञ असलेल्यांना ही लयीत वाचता यावे यासाठी केले आहे>>>>>>>>>>>>>>

हे वाक्य मी असे वाचले.......
हे मी फक्त गझलेत अज्ञ असलेल्यांनाही लयीत वाचता यावे यासाठी केले आहे<<<<<<चालेल का ??

Light 1

मित्रवर्य ; आपल्या डोक्यात लवकर उजेड पडो हीच अपेक्षा...!!!!!!! Sad

आवडलीच!

दावलेसी तू कशाला इंद्रधनुचे रंग सारे?
भंगलेले स्वप्न आता, जोडता ही येत नाही
>>>
वाह!
जीमेल स्टेटस म्हणुन टाकू का हे?

मित्रवर्य ; आपल्या डोक्यात लवकर उजेड पडो हीच अपेक्षा.

---------- वभू मित्रा. तुझे सल्ले नेहमीच चांगले असतात नाही असे नाही. पण इतरांचे प्रतिसाद देखिल तू पहातो आहेस. मी तुझ्या पेक्षा अज्ञानी असेल नाही असे नाही. परंतू आज या क्षणी तुला एकच सांगावेसे वाटते की विद्या विनयाने शोभते या सुभाषिताचे तू आचरण कर. आयुषात खुप काही करू शकशील. मला खात्री आहे तू एक जातीवंत साहीत्यीक आहेस. पण स्वतःमधे अहमतेचा दोष कधीही येऊ देऊ नकोस. हे माझं फक्त तुझ्यासाठी शेवटचं सांगणं आहे.

------- तुझा,
ऑर्फि.

सुधाकरा!
तुझी गझल वाचली.आवडली! मतल्यात ओढता व खोडता असे काफिये चालत नाहीत. म्हणून पूर्ण मतला बदलावा लागेल. काही ठिकाणी वृत्ताची ओढाताण वाटली. ती टाळायचा प्रयत्न करावा. सरावाने ते तुला जमेलच. तुझे खयाल छान आहेत. शेरातील दोन ओळी जितक्या एकजीव होतात, तितकी शेराची उंची वाढते. जितकी त्यांच्यात फारकत होते, तितका शेर संदिग्ध व अस्पष्ट होतो. प्रत्येक शेरावर लिहायला वेळेचे बंधन असल्याने, मी काही शेर तुझ्या गझलेवर देत आहे, जे वाचल्यावर सदर काफिये कसे चालवले जाऊ शकतात, ते तुला कळेल. काही ठिकाणी पूर्ण नवा शेर तयार झालेला असेल. काही शेरांत तुझे अर्थ पूर्णपणे वा अंशत: असतील. तुझी ही गझल निर्दोष करण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुझी गझल अशी वाचली...............

वेदनांचा हा लळा, मज तोडताही येत नाही!
भार हा माझा कुणावर सोडताही येत नाही!!

नाइलाजाची तुझ्या देवा मला जाणीव आहे!
ही अभागी भालरेषा खोडताही येत नाही!!

काचकमळासारखी स्वप्ने कशाला पाहिली मी?
एकदा गेला तडा तर, जोडताही येत नाही!

हाय! साखळदंड मजला हे जखडती रेशमाचे;
हा गुलाबी पाश आता तोडताही येत नाही!

थाटला संसार मोठ्या मुश्किलीने चंद्रमौळी;
मांडले जे मी स्वत: ते मोडताही येत नाही!

जीवनाशी वायदा झाला....कधी रडणार नाही;
आतल्या मज आत टाहो फोडताही येत नाही!

दागिने जपतात, स्वप्ने मी तशी जपलीत सारी,
आज एकाकी तयांना सोडताही येत नाही!

........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: सुधाकर, तुझी मते कळव. वाचायला आवडेल.
..................................................................................................

देवसर--------

शेरातील दोन ओळी जितक्या एकजीव होतात, तितकी शेराची उंची वाढते. जितकी त्यांच्यात फारकत होते,
तितका शेर संदिग्ध व अस्पष्ट होतो. ...हे अगदी माझ्या मनातले बोललात. मलाही अगदी पहील्यापासून नेमके असेच वाटते. जरी मी कोणी गझल्कार नसलो तरी गझलीयत रसिक मनाची आवड ही तंतोतंत गझलेलाच सात्वीक नम्रतेने प्रणाम करते.

वेदनांचा हा लळा, मज तोडताही येत नाही!
भार हा माझा कुणावर सोडताही येत नाही!! .. तुमचा हा मतला छान आहे. पण माझी गझल बिगर मतल्याची होती
तसे मी सुरूवातिस नमुद करावयास हवे होते. हे अत्ता वाटते.

आणि दुसरे म्हणजे मी ... गालगागा ,गालगागा या प्रकारच्या वृत्त हताळणीमुळे किंवा त्याच्या अट्टाहासापायी काही चुका केल्या असतील. असेही वाटते.

------ पण एक सांगू का, शेरातील दोन ओळी जितक्या एकजीव होतात, तितकी शेराची उंची वाढते. हे तुम्ही दिलेले स्पष्टीकरण तुमच्याच येथील काही शेरांमध्ये दिसून येत नाही. ( कदाचीत वेळेच्या बंधनामूळे असेल.)

काचकमळासारखी स्वप्ने कशाला पाहिली मी?
एकदा गेला तडा तर, जोडताही येत नाही!.... हा शेर मात्र आवडला.

------------------- असो तुमच्याशी कधीतरी खुप खुप बोलायचे आहे पण नियती ते जुळू देत नाही. तरीही बोलू कधी तरी. मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद.

मतल्यात ओढता व खोडता असे काफिये चालत नाहीत. म्हणून पूर्ण मतला बदलावा लागेल. <<<<<<

हा कोणता नियम काढलात प्रोफेसर साहेब?

पण स्वतःमधे अहमतेचा दोष कधीही येऊ देऊ नकोस>>>>>(ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं.!!!)
असो.........
आपल्या माझ्याबद्दलच्या निरीक्षणाबद्दल लाख लाख आभार मित्रवर्य............आपल्या अनमोल सल्याप्रमाणे वागायचा मनापासून प्रयत्न करून पाहीन

पण इतरांचे प्रतिसाद देखिल तू पहातो आहेस. >>>>>>>होहो, पाहतो आहे !! आपणही , मी इथे खाली देत आहे तो शेर पहावाच ही विनन्ती...........

कर नेमक्या समीक्षा रे वैभवा स्वतःच्या
नुसतीच वाहवाही करणे अपाय आहे
...............-वैवकु

हे माझं फक्त तुझ्यासाठी शेवटचं सांगणं आहे.>>>>अशी निर्वाणीची भाषा बोलू नका महराज .खूप वाईट वाटते!!

हे नाते तुटल्याचेही मी किती मनाला लावुन घेतो
आंतरजालावरची ओळख आंतरजालावरचे भांडण !!.................- 'कणखर' यांचा एक शेर

वैभ्या, त्या जातीवंत सुधाकराकडे लक्ष देऊ नकोस. त्याला काय काय येत नाही ते त्याने गझलेत टाकले आहे आणि आता तुला काय काय यायला हवे ते सांगतो आहे. लक्ष देऊ नकोस तू.

येस बेफीजी करेक्टच की.

धन्यवाद ऑर्फीच्या वतीने

एकमेका साह्य करू अवघे धरू गझलपन्थ!!!!

ऑर्फी...लक्षात आलय का काही की नै अजून?

अलामत- ओ

काफिये - खोडता,जोडता,मोडता,सोडता,फोडता इ.
<<<

अलामत 'ओ' होणार नाही सुधाकरराव, ती 'अ' होईल आपल्या गझलेच्या मतल्यानुसार Happy

वैभू. माझी ही गझल बिगर मतल्याची आहे असे समजून वाच.
<<<

Rofl

लोक चुकीच्या मतल्याला मतला म्हणा म्हणून उपोषण करतात आणि हे चांगला मतला लिहून म्हणतायत बिगर मतल्याची गझल म्हणा! अहो ऑर्फीअस, अलामत 'ओ' ऐवजी 'अ' म्हणालात की प्रश्न मिटला

गझल ही बेफ्या, वैभ्या, सुधाकर आणि देवपूरकर या गुंडांच्या हातात सापडलेली असहाय्य तरुणी आहे. (हाही एक मतला होऊ शकेलच की) बेफ्या तू कालची न उतरता सकाळी लिहितोस का?

हा कोणता नियम काढलात प्रोफेसर साहेब?<<<<<<
नियम नव्हे भूषणराव, माझा एक विचार सांगितला. त्यांचे काफिये सोडताही/तोडताही...............इत्यादी असल्याने, तसेक काफिये मतल्यात आल्यास छान वाटेल असे वाटले, म्हणून मी हा विचार मांडला.
..........प्रा.सतीश देवपूरकर