माणसांच्या मनातले झरे जेव्हा मनावर आदळायला सुरुवात होते, तेव्हाच त्यांच्या लाटा होतात. या लाटांमध्ये माणसाच्या मनातले लाखो करोडो विचार धुमसत असतात, उसळ्या मारत असतात. पण तेव्हा बहुधा या विचारांची चांगली-वाईट अशी फाळणी झालेली नसते. केरसुणीच्या एका फटकार्या बरोबर जमिनीवरच कचरा आणि त्यासोबत एखाद्या तुटलेल्या माळेतला हरवलेला मणी देखील झिडकारला जावा ना... तसं काहीसा या विचारांचं होत असावं. पण तो केरात सापडलेला मणी आपण उचलतोच असा नाही. कारण एकदा तुटलेली माळ पुन्हा नव्याने ओवून घालण्यात आणी दागिना म्हणून मिरवण्यात ती माळ न तुटता घातली असता जो आनंद असतो तो मिळत नाही. तेवढा नाविन्य नसावा कदाचित...
माळेच एक ठीक आहे पण मनातल्या विचारांचं गणित या लाटेसरशी चुकणं हे बरोबर नाही. कारण एखाद्या मोठ्या लाटेच्या फटकार्याने जहाज उलटून बेचिराख व्हावं तसे हे विचार तकलादू आणि टाकाऊ विचारांबरोबर वाहून गेले तर त्या विचारांना मूर्तरूप येउच शकणार नाही. बरेचदा असं होतंही की आपण काही विचार करत असताना कोणीतरी हाक मारली की त्याला 'ओ' देऊन आपण परत आपल्या कामात मिसळून जातो पण तेवढ्यात तो विचार मात्र हरवून जातो. आणि पुढे त्या विचाराचा एखादा चान्गला लेख होणार असतो तो राहूनच जातो. किन्वा एका खोलीतून दुसर्या खोलीत जातो काहीतरी आणायला पण तिथे गेल्यावर आठवतच नाही इथे का आलो ते...
मला वाटतं की या विचारांची गुंफण होणं आवश्यक आहे. आज आपण काय काय विचार केले याचा आपण कधी विचार करतो का? असा विचार करण्यासाठी स्वतःसाठी थोडासा शांत वेळ काढणं आवश्यक आहे. माझ्या मते ध्यान किंवा मेडीटेशन हे त्यावरचा उत्तर असू शकतं. पहिल्या पहिल्यांदा काहीच आठवणार नाही पण एकदा सवय झाली की आपोआपच सगळे विचार सरळ रेषेत उभे राहू लागतील. मग त्यांची विभागणी करता येऊ लागेल. साहजिकच मग आजच्या विचारातले किती विचार हे खरोखर विचार करावे असे होते तेही समजेल. आणि मग आपला मेंदू जो अनावश्यक विचार करण्यात गुंतल्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी करूच शकत नसतो ते व्हायला लागेल. त्यामुळे नुसते विचार स्थिरच होणार नाहीत पण आपल्याला दिवसा अखेरीला हिशोब द्यायचाय म्हणलं की दिवसभरातल्या विचारांची व्यर्थता आपसूकच तपासली जाईल. हळूहळू विचारांची गल्लत कमी होईल आणि वड्याच तेल वांग्यावर न निघता ते वड्यालाच जाईल!!
कोणी म्हणेल विचारांनाही शिस्त लावली तर मग कल्पकतेच काय?? ती तर आकाशात झेपावणार्या विचारांनीच येते. तिला मर्यादा नसतात... 'आउट ऑफ द बॉक्स' विचार करण्याही जर निर्बंध आले तर कल्पनेलाही कुंपण पडेल... पण तसा नाहीए. मला वाटतं उंचच उंच झेपावू पाहणार्या कल्पना या बाकीच्या निरुपयोगी; बर्याचदा उपद्रवी विचारांमुळेच खाली खेचल्या जातात. एका दिवसात जमणारी गोष्ट नक्कीच नाही ही कारण माणसाचा मनच जिथे इतकं अतर्क्य तिथे विचारांना लगाम घालणं अवघडच!! पण प्रयत्न करायला काय हरकत आहे???
विचाराचा विचार
Submitted by जाह्नवीके on 25 August, 2012 - 11:03
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा