भल्या पहाटे गजर झाला आणि पटकन अंगावरचे पांघरुण बाजूला करून सुवर्णा उठली, पांघरुणाची घडी करून तिने बिछाना आवरला आणि ती बाथरुम मध्ये शिरली. भराभर आन्हिके आवरुन ती स्वयंपाकघरात आली. महिनाभर हे नाही, ते नको असे करत सगळा बेत ठरला होता आणि आज तो दिवस उगवला होता. आज तिच्या लाडक्या अन एकुलत्या एक लेकीचा म्हणजे प्राजक्ताचा अठरावा वाढदिवस होता. सुवर्णा खूप आनंदात होती. त्याच आनंदात गुणगुणत तिने चहाला आधण ठेवले आणि फ्रिज उघडून एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. फ्रिजच्या दारावर तिने मेनूचा कागद लावूनच ठेवला होता, तिने त्याकडे एक नजर टाकली. पुलाव, कुर्मा भाजी, भाज्यांचे कटलेट, टोमॅटोचं सार आणि गाजराचा हलवा. तसा सुटसुटीतच बेत होता.
चहा घेऊन ती डायनिंग टेबलवर येऊन बसली, चहाचा पहिला घोट घेतल्यावर तिने स्वतःलाच तो मस्त झाल्याची शाबासकी दिली, ही सुवर्णाची खूप जुनी सवय, चहाच्या पहिल्या घोटालाच तो कसा झाला याची स्वतःलाच पावती देऊन टाकायची, सुनिल तिला यावरुन खूपच चिडवायचा,"अग, तूच केलास ना चहा मग स्वतःलाच काय सांगतेस छान झाला की वाईट झाला, वेडाबाई आहेस."
एक मोठा निश्वास सोडून तिने सुनिलचे विचार झटकून टाकायचा प्रयत्न केला, पण तरीही तिच्या मनात विचार आला की आज लेकीच्या वाढदिवसाला त्याचा फोन येइलच, कारण मागच्या आठवड्यातच त्यांची भेट झाली तेव्हा तो प्राजक्ताला तसं म्हणाल्याच प्राजक्ताने तिला सांगितले होते. दहा वर्ष झाली नाही का आपण वेगळे झालो त्याला? हो, प्राजक्ताचा आठवा वाढदिवस झाल्यावरच तर आपल्याला त्याने सांगितलं होत....अर्थात वेगळं होण्याचा पर्याय आपला होता....
चहाचा कप विसळून तिने पटकन निवडलेल्या भाज्या कुकरमधे उकडायला लावल्या आणि गाजरं किसायला घेतली. गाजरं किसताना पुन्हा तिच मन भूतकाळात गेलं... प्राजक्ताचा आठवा वाढदिवस....तिच्या शाळेतल्या मैत्रिणी आणि आजूबाजूची मुले-मुली मिळून पंधरा जण होते. मुलांच्या आवडीची पावभाजी अन गुलाबजाम केले होते. मदतीला सुनिल होताच आणि लाडकी मैत्रिण मोना सकाळीच आली होती. चेष्टा मस्करी करत तिघांची कामे चालली होती. संध्याकाळी पार्टी झाली, सगळे गेले आणि तिने आवराआवर करायला घेतली. प्राजक्ता पेंगुळली होती तिला सुनिलने नेऊन झोपवले. मोनाने तिघांसाठी कॉफी बनवली आणि ते तिघे कॉफीचे मग घेऊन निवांत बाहेर येऊन बसले. कसे कुणास ठाऊक मोना आणि सुनीलने एकमेकांना काहितरी खुणावल्याचे तिला जाणवले आणि तिने प्रश्नार्थक नजरेने सुनिल कडे पाहिले. सुनिलने घसा खाकरला आणि तिला म्हणाला की "माझं आणि मोनाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे..." त्यावर ती खळखळून हसली आणि म्हणाली," चेष्टा पुरे हं, सकाळपासून भरपूर चेष्टा मस्करी झाली आहे" पण दोघांचेही गंभीर चेहेरे पाहून तिचे हसू थांबले, तिने दुखावल्या नजरेने एकदा सुनिल कडे आणि एकदा मोनाकडॆ पाहिले, दोघांनीही तिच्या नजरेला नजर दिली नाही. ती हातातला कप खाली ठेवून उठली आणि प्राजक्ताच्या रुममधे निघून गेली.
बराच वेळ तिला काही सुचेना, असं कसं झालं? आणि आपल्याला का बरे कळले नाही? मोना आणि ती कॉलेजपासून एकत्र होत्या, अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी...सगळी गुपितं एकमेकींना सांगितली होती, ऑफिस मधे सुनिल भेटला, प्रेम जमलं, लग्नं ठरवलं, सगळं सगळं तिला सांगितलं होतं आणि सगळ्यात जास्त आनंद तिलाच झाला होता...मग हे कधी झाल? ते दोघे एकमेकांच्या एवढे जवळ येइपर्यंत आपण बेसावध राहिलो? नाही नाही, बेसावध नाही...आपण त्या दोघांवर विश्वासच ठेवला...मग आपलं चुकलं? नाही, त्या दोघांनी आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला....कुकरच्या शिट्टीने ती पुन्हा वर्तमानकाळांत आली..
तिने गाजराचा किस पॅनमधे भरला आणि दुध घालून पॅन गॅसवर ठेवला. तिने घड्याळात पाहिले, आठ वाजले होते म्हणजे प्राजक्ताला उठवायला हवे. ती प्राजक्ताच्या रुममधे आली. शांत झोपलेल्या प्राजक्ताकडे पाहून तिला खूप प्रसन्न वाटले, आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. तिच्याकडे असलेलं सगळं प्रेम तिने आपल्या या लाडक्या लेकीला दिलं होतं. लहानग्या प्राजक्ताला घेऊन जेव्हा ती घर सोडून निघाली तेव्हा सुनिलने तिला अडवायचा प्रयत्न केला पण मोनाशी संबंध ठेवणारच या मुद्दयावर तो ठाम होता त्यामुळे मला घटस्फोट दे आणि मोनाशी लग्न कर असे सांगून तिने प्राजक्ताला घेऊन घर सोडले. खूप दिवस प्राजक्ता बाबा कधी येणार असे विचारत असे, तिच्या बालजीवाला कळलेच नाही काय झाले होते ते...पुढे घटस्फोट झाल्यावर मग सुनिल तिला रविवारी घेऊन जात असे, नंतर मोठी झाल्यावर तिला सगळं कळलं. बाबाने आईला सोडून मोनामावशी बरोबर लग्न केलं तेव्हा ती थोडी दुखावली पण काही बोलली नाही पण त्यानंतर त्या दोघींच्या बोलण्यात तिने कधीही बाबाचा विषय काढला नाही. "खूप शहाणी होती माझी लेक...मला दुःख होईल असं ती कधीही वागली नाही, अकाली मोठी झाली होती माझी लेक..." प्रेमाने तिने प्राजक्ताच्या केसांवरून हात फिरवला आणि हलकेच तिच्या गालांवर ओठ टेकवून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्राजक्ता जागी झाली आणि तिने आईचा हात धरुन तिला बेडवर बसवले आणि तिच्या मांडीवर डोके ठेवले," आई, माझं गिफ्ट कुठेय?" सुवर्णाने तिला हलकेच थोपटल आणि म्हणाली," आधी उठा, आवरा, तुलाच काहितरी काम आहे अर्जंट असं म्हणालीस ना काल? मग ऊठ, मी आपला नाश्ता बनवते चल.." बळेच तिला उठवून सुवर्णा स्वयंपाकघरात आली. एकीकडे गाजरहलव्याकडे लक्ष देत तिने पटकन उपमा अन कॉफी केली. हलवा तयार होइपर्यंत प्राजक्ता आवरून तयार होऊनच बाहेर आली.
दोघींनी गप्पा गोष्टी करत नाश्ता केला आणि मग कॉफी पिऊन प्राजक्ता बाहेर पडली. गॅलरीतून तिला बाय करताना सुवर्णाच्या मनांत आले, केवढी मोठी झाली आपली लेक, जिन्स आणि टी शर्ट मधे खूप गोड दिसत होती ती, आणि खूप प्रेमळही होती ती, तिच्या मित्रमैत्रींणीचीही खूप लाडकी होती, खूप मोठा गोतावळा जमवला होता तिने...... अग बाई, आत्ता सगळे हजर होतील असे म्हणत सुवर्णा आत आली आणि भराभर तिने एकीकडे टोमॅटो सार बनवले आणि कटलेट तयार करुन ठेवली. पुलावची सगळी तयारी करून तिने घर आवरायला घेतले.
एकदा सगळी धूळ झटकून तिने केरवारे करुन घेतले. आणलेली फुले व्यवस्थित फुलदाणीत रचून ठेवली. मग ती प्राजक्ताच्या रुममधे गेली, रुम आवरलेली पाहून खूप खुष झाली, "शहाणी आहे माझी लेक..." तिला आठवले की कळायला लागल्यापासून कसले हट्ट केले नाहीत हिने, कायम मी जे देऊ शकते ते घेऊन आनंदात राहिली. नशिबाने चांगली नोकरी होती म्हणून कुणापुढे हात पसरावा लागला नाही, सुनिल आणि मोनाला दोन मुली झाल्यापासून त्यांचे भागवता भागवता त्यालाच पैसा पुरत होता की नाही कुणास ठाऊक पण अर्थात तिनेच पहिल्यापासून त्याच्या कडून काहीही नको असे निक्षून सांगितले होते, त्याने केलेल्या अपमानाचे शल्य इतके मोठे होते की त्यानंतर त्याच्याकडून काही घेणे दूरच पण तिने त्या दोघांशी काही संबंधच ठेवला नव्हता आणि खरोखरच ती आणि तिची लेक खूप आनंदात राहिल्या होत्या.
तिने कपाटातून लेकीसाठी आणलेली गिफ्टस मांडून ठेवली, लेकीचा अठरावा वाढदिवस होता म्हणून तिने तिच्यासाठी अठरा वेगवेगळ्या वस्तू आणल्या होत्या , त्या मांडून ठेवताना प्राजक्ता कित्ती आनंदेल हया विचारानेच सुवर्णा आनंदून गेली.
सगळं आवरून सुवर्णा तयार झाली आणि प्राजक्ताची वाट पाहू लागली. दाराची बेलं वाजली आणि प्राजक्ताची मित्रमंडळी घरात आली पण हिचा पत्ताच नाही. मुलांच्या गप्पागोष्टींनी घर भरून गेले, एकीकडे त्यांचे आदरातिथ्य करत असताना पण सुवर्णाच्या गॅलरीत फे-या चालू होत्या, कुठे बर राहिली ही? गेली तरी कुठे आहे ही? आपणही विचारलेच नाही की? अर्जंट काम आहे असं म्हणाली त्यामुळे आपणही काही विचारलेच नाही. फोन करुया का तिच्या मोबाईलवर?
इतक्यात ती लांबून येताना दिसली, तिने लांबूनच हात केला आणि सुवर्णाचा जीव भांड्यात पडला. घाईने तिला दरवाजा उघडला, सगळ्यांनी तिचा ताबा घेतला आणि मग गप्पांना ऊत आला. खाऊन पिऊन सगळे तृप्त झाले. सुवर्णाच्या अपेक्षेप्रमाणे अठरा गिफ्टस पाहून प्राजक्ता आणि तिची समस्त मित्रमंडळी खुश झाली. अचानक प्राजक्ताने आईला खुर्चीवर बसवले आणि सगळ्यांना शांत रहायला सांगून ती बोलायला लागली," फ्रेंडस, तुम्हांला माहितच आहे की माझ्या बाबांनी आम्हांला सोडून दुसरे लग्न केले आणि मला माझ्या आईने लहानाचे मोठे केले, तिने मला बाबांची कमी कधीही भासू दिली नाही, तीच माझी आई झाली आणि तीच माझे बाबा देखील झाली. माझ्या बाबांना मी आठवड्यांतून एकदा भेटत होते पण आई एवढा जिव्हाळा मला त्यांच्याकडून मिळाला नाही. मला त्याबद्दल काही म्हणायचे नाही पण आज मी अठरा वर्षांची झाले, त्यामुळे मिळू शकणा-या अधिकाराने मी आजपासून माझ्या बाबांच्या नावाऐवजी माझ्या आईचे नाव लावणार...मी आज कोर्टामधून माझे नाव बदलल्याचे सर्टिफिकेट.....
पुढचे काही सुवर्णाला ऐकूच आले नाही...तिच्या लेकीने तिला दिलेल्या गिफ्ट्च मोल तिच्याशिवाय कुणालाही कळणार नव्हत....तिच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या आणि अपमानाचे शल्य त्यात वाहून गेलं..........
सुंदर!!
सुंदर!!
अगदी छान.
अगदी छान.
खूपच छान अप्रतिम गीफ्ट
खूपच छान
अप्रतिम गीफ्ट !!!!!
डोळे ओलावले.
अगदी सुंदर!!!
अगदी सुंदर!!!
खूप सुरेख कथा आहे. मान्डणि
खूप सुरेख कथा आहे. मान्डणि फार छान केलित.
छान लिहिली आहे कथा
छान लिहिली आहे कथा
(No subject)
आवडली.
आवडली.
सुरेख.....................
सुरेख.....................
खूप छान आहे ... डोळ्यात पाणी
खूप छान आहे ... डोळ्यात पाणी आले ...
वाह! कितीही प्रेडिक्टेबल शेवट
वाह!
कितीही प्रेडिक्टेबल शेवट असला तरी डोळ्यातून टचकन पाणी आलचं
फारच छान!!! पु.ले.शु!
फारच छान!!!
पु.ले.शु!
शेवटी रडवलच या सुंदर
शेवटी रडवलच या सुंदर कथेने.....
सुरेख
सुरेख
फार छान...
फार छान...
सुंदर.
सुंदर.
आवडली.
आवडली.
सुंदर कथा, शेवटही मस्त..
सुंदर कथा, शेवटही मस्त.. डोळे ओलावणारा..
खुप सुंदर.
खुप सुंदर.
छान
छान
खूप खूप खूप
खूप खूप खूप सुंदर्........मस्त जमलेय.......
मस्त ! खुप खुप भावली कथा!
मस्त ! खुप खुप भावली कथा!
आवडली.
आवडली.
अतिशय अतिशय सुंदर, वंदना.
अतिशय अतिशय सुंदर, वंदना. छानच मांडणी... मुलं खरच आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्तं प्रगल्भं विचार करतात.
आवडलीच कथा. (आणि आटोपशीर किती... मला असं नेमकं लिहिता आलं असतं तर?... माझा फापटपसारा खूप असतो)
खरच माझ्यासुध्दा डोळ्यातून
खरच माझ्यासुध्दा डोळ्यातून पाणी आलं !!! खुप छान !!!!
छानच कथा..आवडली
छानच कथा..आवडली
चाम्गलीय. आशय छान! नाव
चाम्गलीय. आशय छान!
नाव बदलल्याचे सर्टिफिकेट असे अठराव्या वाढदिवसाच्या दिवशीच कोर्टात एका दिवसात मिळत नाही.
मूळात नाव बदलल्याचे कोर्टात फक्त स्टॅम्प पेपरवर नोटरी करता येते. मग गॅझेट किंबा अधिकृत वर्तमानपत्रात छापून आणायचे.
सुंदर , मला नाही वाटली
सुंदर , मला नाही वाटली प्रेडीक्टेबल
मस्त!!!!! आवडली....
मस्त!!!!! आवडली....
खूप छान आहे आवडली
खूप छान आहे आवडली
Pages