विषय क्रमांक १: तिसरी मंजिल

Submitted by वैशाली_आर्या on 24 August, 2012 - 07:46

"मी तुझ्याकडे आत्ता येत आहे, जर तू दरवाजा नाही उघडलास तर मी जीव देंइन", असं म्हणून एक मुलगी रागा रागात गाडी घेउन निघते. भन्नाट वेगात जंगलातून गाडी जात असते. एका ठिकाणी गाडी बिघडल्याने पाणी बघायला उतरते. अचानक खोदण्याचा आवाज येतो. ती आवाजाचा कानोसा घेत पुढे जाते. अंधारात दोन व्यक्ती एक प्रेत पुरताना दिसतात. मुलगी घाबरते, पायाखालचा दगड सरकतो आणि त्या व्यक्तिंच मुलीकड़े लक्ष जातं. मुलगी पळत सुटते, गाडीत जाऊन गाडी सुरु करते आणि पाठलाग सुरु होतो. मुलगी एका इमारती समोर गाडी थांबवते. एक, दोन, तीन करत मजले चढून जाते, मागे पाठलाग करणारा. "दरवाजा खोलो rocky दरवाजा खोलो.. " म्हणत दरवाजा ठोठावते आणि ऐकू येते एक किंकाळी

९०% लोकानी हा चित्रपट ओळखला असेल. बाकीच्या १०% ना माझ्या लिखाणा मुळे कळला नसेल. ही गोष्ट मला बाबांनी सांगितलेली, मी वय वर्ष १०/१२ असेन तेव्हा. तीन दिवस "तिसरी मंजिल" ची गोष्ट बाबा सांगत होते. वरील प्रमाणे सुरु झालेली गोष्ट मग rocky राणा साहेबांचा हात सोडतो अशी संपली आणि माझ्या जीवात जीव आला. तीन दिवस भारावल्या सारखी हि गोष्ट मी ऐकली. सिनेमागृहात जाऊन सिनेमा पहायला मिळण्याची शक्यता शून्य होती. साधारण ४ ५ वर्षांनी व्हिडीओवर हा पिक्चर पाहिला. अहाहा इतका मस्त चित्रपट. गाणी तर हिरे मोती. शंकर जयकिशन सोडून आर डी बरोबर काम करण्याचा शम्मीचा निर्णय थोडाफार लादलेला पण कसला जमलाय.

हा पिक्चर परीकथा अनुभवाव्या असा अनुभवलाय मी. बाबांची गोष्ट सांगण्याची हातोटी काय भन्नाट होती की चित्रपट डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. त्यामुळे व्हिडीओवर बघताना चित्रपट कापलेला लागेच कळला.

चित्रपटांशी बाबांनीच ओळख करून दिली. गंगा जमुना, शोले, दिवार, तिसरी मंजिल, चायना टाऊन, मदर इंडिया बाबांच्या दिलके करीब आहेत एकदम. शम्मी बाबांच्या आणि त्यामुळेच माझ्या मर्म बंधातली ठेव. बाबा कोणे एके काळी फेमस स्टुडिओ मध्ये नोकरीला होते आणि शम्मी, राज, देव ह्यांच्या बरोबर बसून त्यांनी बरेच पिक्चर पाहिले, ह्या गोष्टीचा मला अजूनही हेवा वाटतो. शम्मी गेला तेव्हा फोन आला होता बाबांचा "शम्मी गेला... आज ताडदेवला असतो तर गेलो असतो".

व्हिडीओवर पिक्चर बघणाऱ्या पिढीची मी. पैसे काढून, टीव्ही आणि व्हिडिओ प्लेयर भाड्याने आणायचा आणि तीन पिक्चर एका रात्रीत बघायचे, दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीतला हा एक मुख्य कार्यक्रम असायचा. सुरक्षा, बर्निंग म्यान आणि स्वर्ग असे भन्नाट पिक्चर एका रात्रीत पाहिले जायचे. शनिवार रविवारी दूरदर्शन वरचे पिक्चर न चुकता पहायचे मी. ताडदेवला गेल्यावर एकतरी पिक्चर ठरलेला असायचा. मिनर्व्हा, मराठा मंदिर, डायना, गंगा जमुना अशी भरपूर चित्रपट गृहे घराच्या जवळ होती.

नोकरी लागल्यावर प्रदर्शित झालेला प्रत्येक चित्रपट पहायचा असं जवळ जवळ दोन वर्ष केलं मी. नील एंड निक्की पासून १५ पार्क अवेन्यू पर्यंत सगळेच पिक्चर पाहिले मी टक्क पैसे मोजून. कसे का काहीका असेना, ह्या चित्रपटांनी एक मस्त गम्मत आणली आयुष्यात. लहानपणी इतकं वेड होता मला की रविवारी त्यासाठी खेळ चुकवायचे मी. ह्या पिक्चर मध्ये आपलं गाव दाखवलं आहे, असं एकदा बहिणीला सांगितलेलं आठवतंय मला. लहानपणी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम बघितल्यावर निदान दोन दिवस तरी मी भक्त शिरोमणी असायचे. चित्रपट आपल्यावर प्रचंड परिणाम करतात. बघून बघून चांगले, वाईट, टुकार ह्यातला फरक कळायला लागतो. एकेकाळी पहिल्या १५ मिनिटात हिरो आणि खलनायक नाही कळला तर पिक्चर मधला रस संपायचा माझा. मारामारी नाही तर काय पिक्चर पाहायचा असं बरेच वर्ष मत होतं माझा. म्हणूनच जानेभी दो यारो मी खूप उशिरा पाहिला.

मत बदललं. पिक्चर ने हसवावं, रडवाव, रक्त उसळवाव, शांत शांत करावं, विचार करायला लावावं किंवा विचार विसरवायाला लावावं. दोन तीन तास चित्रपट गृह असो किंवा TV आपल्याला गुंतवून ठेवाव. बस चांगला चित्रपट हाच !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शम्मी माझ्या चि़कण्या हिरोंमध्ये येतो. Happy

तिसरी मंजिल बद्दल अजुन लिहयला हवे होते असे वाटले. शिर्षक पहाता लेख अपूर्ण वाटतो.

मी नताशा
ह्म्म्म...मलाही वाटलं असं...पण अगं माझीच मर्यादा आहे...मला इतकचं झेपल्..जसं सुचल तसं लिहित गेल्..आणि थांबाव वाटलं तेव्हा थांबले...

स्पर्धा फक्त कारण्..पण विषय इतका जिव्हाळ्याचा की लिहिल्या शिवाय रहावलं नाही..

वैशाली, तिसरी मंझिल हा माझ्यापण अति आवडीचा सिनेमा. फार कमी लिहिलं आहे सिनेमाबद्दल तुम्ही. अजून एडिट करून अवश्य लिहा.

गाणी तर सर्वच आवडीची आहेत. खास करून ओ हसीना जुल्फोंवाली आणि तुमने मुझे देखा आणि ओ मेरे सोना रे सोना, आजा आजा मै हू प्यार तेरा हे गाणं शम्मीमुळे बघावंसं वाटतं त्यामधे आशा पारेख नाचायला लागली की मी तरी डोळे बंद करून घेते. पण माझं सर्वात आवडीचं गाणं "दिवाना मुझसा नही इस अंबरके नीचे" शम्मी कपूर म्हणजे रॉ एनर्जी. ती एनर्जी गोल्डीने अचूक् वापरली आहे या सिनेमामधेल.

या सिनेमामधला शम्मीला खुनी कोण कळतं हा शॉट अप्रतिम रीत्या घेतला आहे. शम्मीच्या क्लोजपमधे पूर्ण सिनेमाचा थरार आहे.

मलाही हा सिनेमा खूप आवडतो. गाणी अफाट चांगली आहेत. महम्मद रफी आशा भोसले आणि आरडी यांनी कमाल केली आहे.
एक मजेची गोष्ट म्ह्णजे आपले लाडके सुपरहिरो सलमान खान यांचे वडिल सलीम खान ह्या सिनेमात एका छोट्या भूमिकेत आहेत. बहुधा रॉकीच्या मित्राच्या. सलीम साहेब नट बनायलाच सिनेमा सृष्टीत आले पण तिथे फार जमले नाही म्हणून पटकथा लेखक बनले आणि तिथे कमाल केली.
विजय आनंद हा माझा एक आवडता दिग्दर्शक. ह्या सिनेमाचा सस्पेन्स, वेग ह्याचे श्रेय विजय आनंदकडे जाते. एखाद्या गाण्याचे उत्तम चित्रीकरण कसे करावे हे याच्याकडून शिकावे.
४० वर्षे उलटून गेली तरी हा माझ्या मते एक चिरतरूण चित्रपट आहे.

अगं, लिही ना! अजुन लिही, खुप खुप लिही. माझा खुप आवडता सिनेमा, इतक्यांदा पाहिला, की आइने बंदी आणली......
शिर्षक पाहुन आले.
जरुर लिही आजुन.......

मस्त विषय, मस्त सुरुवात, प्लीज पूर्ण लिहा एक एक गाणे काय छान आहे - तुमने मुझे देखा, दिवाना मुझसा नाही...

>>पिक्चर ने हसवावं, रडवाव, रक्त उसळवाव, शांत शांत करावं, विचार करायला लावावं किंवा विचार विसरवायाला लावावं >> +१ एकदम सहमत!

थोडकंच पण मस्त लिहिलंय! शम्मी कपूर माझाही आवडता नट.

प्रचंड आवडता चित्रपट ! हा विषय घेतल्याबद्दल आभार आणि शुभेच्छा....

’तिसरी मंझील’ हा मला वाटतं पंचमदांचा , एखाद्या मोठ्या स्टार आणि दिग्दर्षकाबरोबर केलेला पहिलाच चित्रपट होता. या आधी ममहुदच्या एक-दोन चित्रपटातुन खरेतर पंचमदांनी काही अतिशय सुंदर गाणी दिलेली होती. पण तेवढाच काय तो अनुभव...

राज, शम्मी वगैरे स्टार शंकर-जयकिशनचे फॅन होते. मुळात पंचमची गाठ शंकर-जयकिशन, ओ.पी.नय्यर, मदनमोहन, नौशाद, सी.रामचंद्र, रोशन, सलील चोधरी आणि दस्तुरखुद्द स्वत:चे वडिल एस.डी.बर्मन यांच्याशी होती. तशात नासिर हुसेनने 'तिसरी मंझील' करायचा ठरवलं. 'जब प्यार किसीसे होता है' च्या प्रचंड यशानंतर त्याला परत एकदा देव आनंदबरोबर काम करायचं होतं. त्यावेळी एक प्रगल्भ दिग्दर्शक म्हणून गोल्डीचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे त्याने गोल्डी (विजय आनंद)शी बोलणी करुन हा चित्रपट करायचं ठरवलं. त्यानुसार "तिसरी मंझील'चा हिरो असणार होता 'देव आनंद' !

पंचमदांची ताकद ओळखुन असणार्‍या गोल्डीने पंचमदांना संधी द्यायचं ठरवलं आणि तसे नासिर कडुन कबुलही करुन घेतले. पण त्यानंतर कुठल्याश्या क्षुल्लक कारणावरुन देव आणि नासिर हुसैन यांच्यात काहीतरी वाद झाला आणि देव ने या चित्रपटात काम करायला नकार दिला. झालं, पंचमदा परत निराश झाले. कारण नव्या पात्र योजनेनुसार हिरो असणार होता शम्मी कपुर आणि शम्मी शंकर-जयकिशनचा भक्त होता. साहजिकच त्याने त्यांचाच आग्रह धरला. असेही एका नवोदित संगीतकारांच्या हाताखाली काम करण्याची त्याची तयारी नव्हती. पण गोल्डीने कसेबसे एका बैठकीसाठी शम्मीला तयार केले.
"तू पंचमच्या चाली ऐक, नाही आवडल्या तर तू म्हणतोस तसेच होइल." त्यावर शम्मी ऐकायला तयार झाला.

आता संगीतात प्रचंड बदल करावा लागणार होता. पंचमने आधी काही रचना तयार केल्या होत्या, पण त्या आता चालणार नव्हत्या, कारण त्या देव साठी होत्या. देव एक कमालीचा मृदु, कोमल, रोमँटीक माणुस तर शम्मीचं व्यक्तीमत्व अतिशय मस्तीखोर, धुसमुसळं... ! त्यामुळे पंचमला तिसरी मंझीलच्या संगीताचा बाज एकदम बदलुन टाकावा लागला.

त्या बैठकीत जेव्हा पंचमदांनी शम्मीला "ओ हसिना जुल्फोवाली..." ची चाल ऐकवली आणि शम्मी वेडाच झाला. "आजा आजा" ची जगावेगळी चाल ऐकल्यावर शम्मीला ते गाणं त्याच्याचसाठी असल्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतर शम्मीने त्याच्या आवडत्या 'पहाडी धुन' मध्ये काहीतरी ऐकवण्याची इच्छा पंचमकडे व्यक्त केली आणि पंचमने त्याला ऐकवलं...
"दिवाना मुझसा नाही........."

शम्मीने उठुन अगदी कडकडून मिठीच मारली पंचमला. चित्रपटाच्या संगीताने नंतर जो काही भव्य-दिव्य इतिहास घडवला तो जगजाहीर आहेच.

एवढं पाल्हाळ लावायचं कारण हेच की मला 'तिसरी मंझील' आवडायचं कारण हे की त्याने माझ्या आवडत्या 'पंचमदांना' स्वतःचं नाव आणि स्थान दिलं. Happy

^^^^^^ क्या बात विशालभाऊ, मस्त आठवण सांगितलीत..

तिसरी मंजिल ला स्पर्धेत घेतले याबद्दलही आभार..
हा माझ्या जमान्याचा चित्रपट नसला तरी लहाणपणी परत परत पाहिलेल्या काही जुन्या चित्रपटांपैकी एक...
इतका आवडता की कोई शम्मी कपूर बोले तो तिसरी मंजिल..

विशाल Happy

तिसरी मंझिलमधे ओ मेरे सोना रे सोना गाण्यामधे शम्मी ती बॅग घेऊन जे काय करतो ते अ फ ला तू न आहे. ती बॅग म्हणजे या गाण्यामधलं एक महत्त्वाचं पात्र बनून राहते.