विषय क्रमांक १: तिसरी मंजिल

Submitted by वैशाली_आर्या on 24 August, 2012 - 07:46

"मी तुझ्याकडे आत्ता येत आहे, जर तू दरवाजा नाही उघडलास तर मी जीव देंइन", असं म्हणून एक मुलगी रागा रागात गाडी घेउन निघते. भन्नाट वेगात जंगलातून गाडी जात असते. एका ठिकाणी गाडी बिघडल्याने पाणी बघायला उतरते. अचानक खोदण्याचा आवाज येतो. ती आवाजाचा कानोसा घेत पुढे जाते. अंधारात दोन व्यक्ती एक प्रेत पुरताना दिसतात. मुलगी घाबरते, पायाखालचा दगड सरकतो आणि त्या व्यक्तिंच मुलीकड़े लक्ष जातं. मुलगी पळत सुटते, गाडीत जाऊन गाडी सुरु करते आणि पाठलाग सुरु होतो. मुलगी एका इमारती समोर गाडी थांबवते. एक, दोन, तीन करत मजले चढून जाते, मागे पाठलाग करणारा. "दरवाजा खोलो rocky दरवाजा खोलो.. " म्हणत दरवाजा ठोठावते आणि ऐकू येते एक किंकाळी

९०% लोकानी हा चित्रपट ओळखला असेल. बाकीच्या १०% ना माझ्या लिखाणा मुळे कळला नसेल. हि गोष्ट मला बाबांनी सांगितलेली, मी वय वर्ष १०/१२ असेन तेव्हा. तीन दिवस "तिसरी मंजिल" ची गोष्ट बाबा सांगत होते. वरील प्रमाणे सुरु झालेली गोष्ट मग rocky राणा साहेबांचा हात सोडतो अशी संपली आणि माझ्या जीवात जीव आला. तीन दिवस भारावल्या सारखी हि गोष्ट मी ऐकली. सिनेमागृहात जाऊन सिनेमा पहायला मिळण्याची शक्यता शून्य होती. साधारण ४ ५ वर्षांनी व्हिडीओवर हा पिक्चर पाहिला. अहाहा इतका मस्त चित्रपट. गाणी तर हिरे मोती. शंकर जयकिशन सोडून आर डी बरोबर काम करण्याचा शम्मीचा निर्णय थोडाफार लादलेला पण कसला जमलाय.

हा पिक्चर परीकथा अनुभवाव्या असा अनुभवलाय मी. बाबांची गोष्ट सांगण्याची हातोटी काय भन्नाट होती की चित्रपट डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. त्यामुळे व्हिडीओवर बघताना चित्रपट कापलेला लागेच कळला.

चित्रपटांशी बाबांनीच ओळख करून दिली. गंगा जमुना, शोले, दिवार, तिसरी मंजिल, चायना टाऊन, मदर इंडिया बाबांच्या दिलके करीब आहेत एकदम. शम्मी बाबांच्या आणि त्यामुळेच माझ्या मर्म बंधातली ठेव. बाबा कोणे एके काळी फेमस स्टुडिओ मध्ये नोकरीला होते आणि शम्मी, राज, देव ह्यांच्या बरोबर बसून त्यांनी बरेच पिक्चर पाहिले, ह्या गोष्टीचा मला अजूनही हेवा वाटतो. शम्मी गेला तेव्हा फोन आला होता बाबांचा "शम्मी गेला... आज ताडदेवला असतो तर गेलो असतो".

व्हिडीओवर पिक्चर बघणाऱ्या पिढीची मी. पैसे काढून, टीव्ही आणि व्हिडिओ प्लेयर भाड्याने आणायचा आणि तीन पिक्चर एका रात्रीत बघायचे, दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीतला हा एक मुख्य कार्यक्रम असायचा. सुरक्षा, बर्निंग म्यान आणि स्वर्ग असे भन्नाट पिक्चर एका रात्रीत पाहिले जायचे. शनिवार रविवारी दूरदर्शन वरचे पिक्चर न चुकता पहायचे मी. ताडदेवला गेल्यावर एकतरी पिक्चर ठरलेला असायचा. मिनर्व्हा, मराठा मंदिर, डायना, गंगा जमुना अशी भरपूर चित्रपट गृहे घराच्या जवळ होती.

नोकरी लागल्यावर प्रदर्शित झालेला प्रत्येक चित्रपट पहायचा असं जवळ जवळ दोन वर्ष केलं मी. नील एंड निक्की पासून १५ पार्क अवेन्यू पर्यंत सगळेच पिक्चर पाहिले मी टक्क पैसे मोजून. कसे का काहीका असेना, ह्या चित्रपटांनी एक मस्त गम्मत आणली आयुष्यात. लहानपणी इतकं वेड होता मला की रविवारी त्यासाठी खेळ चुकवायचे मी. ह्या पिक्चर मध्ये आपलं गाव दाखवलं आहे, असं एकदा बहिणीला सांगितलेलं आठवतंय मला. लहानपणी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम बघितल्यावर निदान दोन दिवस तरी मी भक्त शिरोमणी असायचे. चित्रपट आपल्यावर प्रचंड परिणाम करतात. बघून बघून चांगले, वाईट, टुकार ह्यातला फरक कळायला लागतो. एकेकाळी पहिल्या १५ मिनिटात हिरो आणि खलनायक नाही कळला तर पिक्चर मधला रस संपायचा माझा. मारामारी नाही तर काय पिक्चर पाहायचा असं बरेच वर्ष मत होतं माझा. म्हणूनच जानेभी दो यारो मी खूप उशिरा पाहिला.

मत बदललं. पिक्चर ने हसवावं, रडवाव, रक्त उसळवाव, शांत शांत करावं, विचार करायला लावावं किंवा विचार विसारवायाला लावावं. दोन तीन तास चित्रपट गृह असो किंवा TV आपल्याला गुंतवून ठेवाव. बस चांगला चित्रपट हाच !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखाची सुरूवात तर खूपच आवडली.
लेख मात्र जरा आवरता घेतला आहे अस वाटलं.
>> बाबा कोणे एके काळी फेमस स्टुडिओ मध्ये नोकरीला होते आणि शम्मी, राज, देव ह्यांच्या बरोबर बसून त्यांनी बरेच पिक्चर पाहिले, ह्या गोष्टीचा मला अजूनही हेवा वाटतो.
तुमच्या बाबांचे फेमस स्टुडियोमधले काही अनुभव, किंवा शम्मी, राज, देव इ. बरोबर सिनेमा बघताना झालेल्या चर्चेतून जाणवलेले ह्या कलाकारांचे वेगळेपण (म्हणजे सामान्य प्रेक्षकांपेक्षा) अशा काही विषयांवर छान लेख लिहिता येईल / येतील Happy

मत बदललं. पिक्चर ने हसवावं, रडवाव, रक्त उसळवाव, शांत शांत करावं, विचार करायला लावावं किंवा विचार विसारवायाला लावावं. दोन तीन तास चित्रपट गृह असो किंवा TV आपल्याला गुंतवून ठेवाव. बस चांगला चित्रपट हाच !!!!<<< अप्रतिमच

लेख छोटासाच आहे. पण शेवट फार मस्त आहे Happy

आमचे बाबापण असेच आम्हाला सिनेमांच्या "स्टोर्‍या" सांगायचे. कित्येक सिनेमे आधी आम्ही त्यांच्या स्टोर्‍यांमार्फतच पाहिलेत. नंतर प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना जाणवायचं, की एकही सीन, एकही गाणं सांगताना आगे-मागे झालेलं नव्हतं.

तीसरी मंझील माझा अतिशय आवडता सिनेमा. मी माझ्या मुलाजवळ इतकं वर्णन केलंय त्याचं, की 'सस्पेन्स थ्रिलर असावा तर असा...'

बाबा कोणे एके काळी फेमस स्टुडिओ मध्ये नोकरीला होते आणि शम्मी, राज, देव ह्यांच्या बरोबर बसून त्यांनी बरेच पिक्चर पाहिले >>> जबरीच की !!

.