आमचे बापट सर
२ जुलै २०१२ला राम बापट सर गेले. काही महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालावत होतीच. मी त्यांना शेवटचे भेटलो, तेंव्हा सकाळचे फक्त दोन तास त्यांना भेटण्या-बोलण्याची परवानगी डोक्टरांनी दिलेली होती. त्यामुळे आधी नंबर लावावा लागला, तेंव्हा भेट मिळाली. अलीकडच्या मराठी कादंबर्यांपासून ममता बॅनर्जींपर्यंत अनेक विषयांवर गप्पा झाल्या. "हेगेलविषयक एक बृहदग्रंथ निघतो आहे. त्याला प्रदीर्घ प्रस्तावना लिहायची आहे पण आताशा 'एनर्जी' फार कमी पडते, त्यामुले ते काम खूप रेंगाळलं आहे" अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. उर्जा मिळवण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जायचे, त्यांनाच उर्जा कमी पडतेय हे पाहून मला गलबलल्यासारखे झालं कारण बापट सर म्हणजे उत्साहाचा आणि नवोन्मेषाचा एक अखंड झरा हे समीकरण डोक्यात पक्कं बसलेलं होतं.
पुणे विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक ही सरांची ओळख फारच औपचारीक आणि तोकडी होईल. अखंड वाचन, व्यासंग आणि विद्यापीठाबाहेरचे व्याप - कुठे चर्चासत्र, कुठे व्याख्यान, कुठे पुस्तक प्रकाशन, कुठे एखादी कॉन्फरन्स - यात ते सतत व्यग्र असायचे. त्यामुळेच बहुदा दिलेली वेळ ते फारच क्वचित पाळत. नंतर भेटल्यावर, कपाळावरचे केस मागे सारत, थोडे ओशाळून " ओह, आय अॅम सो सॉरी.. त्याचं काय झालं...आय सिंप्ली फरगॉट.... " असं म्हणून ते पुन्हा एकदा वेळ द्यायचे. त्यांचे आजी-माजी विद्यार्थी, विविध संस्थांचे कार्यकर्ते, लेखक, प्रकाशक, मित्र, चाहते यांची घोळके सतत त्यांच्या मागावर असायचे पण त्यातून पंधरा-वीस मिनीटे जरी त्यांची भेट मिळाली तरी तीन-चार लेक्चर्सचा ऐवज अलगद हाती लागायचा. शिवाय एक 'रिडींग लिस्ट' हाती पडायची. वरती, ' गेल्या खेपेस यादी दिली होती, त्यातलं काय काय वाचून झालं?' अशी विचारणाही व्हायची.
'कोणे एके काळी सर दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स' ह्या विश्वविख्यात संस्थेत पी.एच.डी. करण्यासाठी दाखल झाले होते पण काही मतभेद झाल्याने ते अर्ध्यातूनच परत आले' अशी एक आख्यायिका वर्षानुवर्षे त्यांचे विद्यार्थी एकमेकांना आवडीने सांगत असत. ती खरी का खोटी आणि नेमके कोणत्या विषयावर मतभेद झाले होते हे विचारण्याचं धाडस मला त्यावेळी झालं नाही, आणि नंतर त्याची गरजही भासली नाही. डझनावारी विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केलं. 'दिल्लीच्या त्या संस्थेपेक्षा आमचे बापट सरच ग्रेट' हे आम्हा विद्यार्थ्यांचं लाडकं मत होतं.
राज्यशास्त्र विषयाच्या झाडून सगळ्या उपशाखांमध्ये सरांचा व्यासंग आणि वाचन होतं. फक्त राज्यशास्त्रच नव्हे तर सगळ्याच समाजशास्त्रांना त्यांची प्रज्ञा व्यापून उरली होती. वाचनाला सतत समाज निरीक्षणाची आणि चिंतनाची भक्कम जोड होती. सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकिय,शैक्षणिक आणि संस्कृतिक चळवळीत ते उत्साहाने वावरत आणि सर्वांच्या संपर्कात असत, त्यामुळे ते 'क्रियावान पंडीत' होते.
बहुतेक प्राध्यापक मंडळी वयोमानानुसार 'जुनाट' होत जातात, क्वचित दुराग्रही बनतात कारण चालू वास्तवाशी किंवा नव्या मतप्रवाहांशी त्यांचा संपर्क तुटलेला असतो पण बापट सर नेहमीच समकालीन [काँटंपररी] राहिले. नव्याचे त्यांनी अगदी खुल्या मनाने स्वागत केले, मात्र चिकित्सक समीक्षाही तितक्याच तत्परतेने आणि अधिकारवाणीने केली. अभिजात संगीत, सर्व प्रकारचं साहित्य, नवचित्रकला, नाटकं, सिनेमे या सर्व कलाप्रकारात ते तन्मयतेने आणि जागरूक रसिकतेने रंगून जात. हरेक क्षेत्रातल्या नव्या घडामोडींचा मागोवा घेत, त्यातील प्रमुख व्यक्तिंच्या संपर्कात ते रहात, आपल्या शंका आणि मतं मोकळेपणाने व्यक्त करत असत. त्यांच्या बोलण्याला नेहमीच नर्म विनोदाची झालर असे, त्यामुळे सर परखडपणे काही बोलले तरी त्यामुळे कधीच कटुता निर्माण व्हायची नाही.
राम बापटांच्या निधनाने आपण एक सदाहरित, सदा प्रफुल्ल विद्वान विचारवंत गमावला आहे.
प्रभाकर [बापू] करंदीकर..
बापटसर गेले?
बापटसर गेले? श्रध्दांजली!
बापट सर म्हणजे उत्साहाचा आणि नवोन्मेषाचा एक अखंड झरा हे समीकरण डोक्यात पक्कं बसलेलं होतं. >> अगदी अगदी!
डिबेट स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त दाद देणारे, नेहेमीच विद्यार्थ्यांच्या घोळक्यात दिसणारे बापटसर.
छान लिहिलं आहेत.