विषय- २ -हरिश्चंद्रापासून........ factory पर्यंत....

Submitted by जाह्नवीके on 23 August, 2012 - 07:14

सध्या नवर्याबरोबर परदेशी असल्याने अनेक अनुभव मिळतायत. काही अतरंगी लोक तर काही विचार करायला लावणारे प्रसंग. कधी हास्यास्पद नजराणे तर कधी आपल्याच गोष्टी नव्याने  समजल्या सारख्या.. परवाच एकांच्या घरी गेलो होतो. तेव्हा जेवणावरून विषय कपड्यांवर आला आणि मग चित्रपटांवर... मला त्यांच्या घरात थ्री idiots चित्रपटाची cd दिसली. त्या बद्दल विचारताच यजमानांच्या पत्नी म्हणाल्या, this is a very good movie..we have couple of other also...in our times, indian cinema only meant actors and actresses running around trees..but now there are some really nice movies.
        हे ऐकून मनात आलं, अरे हो की, भारतीय सिनेमा कुठून कुठे येऊन पोचला! किती बदलला! काळाच्या ओघात असो किंवा वैचारिक आणि सामाजिक प्रगल्भतेमुळे असो. "हरिश्चंद्राची factory " मध्ये एक वाक्य आहे, चित्रपटाचा विषय लोकांना माहीत असलेला हवा. अर्थात पौराणिक आणि ऐतिहासिक हेच तेव्हाच्या चित्रपटांचे विषय होते. त्यात राजा हरिश्चंद्र, अयोध्येचा राजा, माया मच्चीन्द्र, अमृत मंथन यासारखे चित्रपट 'प्रभात' ने दिले. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सिंहगड, रामशास्त्री या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांना नटवले. १९१३ पासून सुरु झालेली ही चित्रपटसृष्टी १९२० च्या दरम्यान व्यवसाय म्हणून रुजू लागली होती. संत तुकाराम, भक्त प्रल्हाद, पुंडलिक, नेताजी पालकर, शककर्ता शिवाजी हे याच काळातले काही चित्रपट!
       त्यानंतरच्या काळात तिने आपला चेहरा मोहराही बदलायला सुरुवात केली होती. हळूहळू नृत्य, ड्रामा, संगीत हा यशस्वी चित्रपटांचा फॉर्म्युला होऊ लागला. साहजिकच आपले चित्रपट वळले कौटुंबिक विषयांकडे! पण हे चित्रपट सामाजिक बांधणीला धरून म्हणजे पुरुषप्रधान होते. या चित्रपटांचे नायक आदर्श मुलगा, नवरा किंवा वडील असत. बायकोला त्रास देणारा नवरा असला तरी शेवटी मात्र सुबह का भूला रात को घर ही आता था.... म्हणजेच कुटुंब या व्यवस्थेच्या बाहेर जाणारे चित्रपट फारसे निघत नसत. त्यामधे पती भक्ती, प्रेम सन्यास,  या धाटणीचे काळजाला हात घालणारे चित्रपट निघाले.धर्मात्मा, माझा मुलगा, कुंकू, माणूस हे चित्रपट खास याच प्रकारचे होते. हिंदीमध्येही दुखीयारी, औरत, भाभी, मदर इंडिया या चित्रपटांनी भावनाप्रधान विषय हाताळले. कुटुंब व्यवस्था आली की ओघानेच यायची ती लग्न व्यवस्था आणि म्हणजेच प्रेम!! प्रेम हा आजतागायत जिवंत असलेला चित्रपटांचा विषय आहे. १९४० पर्यन्त कौटुंबिक चित्रपटांची लाट होती पण १९४५ च्या दरम्यान आलेल्या अशोक कुमार च्या 'किस्मत' नं कुमारी मातृत्वाची कथा हाताळून या लाटेला धक्का दिला.. यामुळे इथून पुढची चित्रपटांची दिशा बदलल्याचे संकेत दिले गेले. मराठी चित्रपट मात्र अजूनही  कौटुंबिक साच्यातून बाहे पडला नव्हता. दुधभात, स्वराज्याचे शिलेदार, चिमणी पाखरं (जुना), घरधनी,सांगत्ये ऐका, पाटलाच पोर हे ५०  च्या दशकातले काही चित्रपट! एक नवीन बदल म्हणजे मराठी आणि हिंदी सोडून इतरही भारतीय भाषांमध्ये याच काळात चित्रपट बनवले जाऊ लागले.
          तो काळ खूपच मोठा होता जेव्हा प्रेम हाच प्रमुख विषय धरून त्याभोवती फिरणारी पात्रं, कथानक आणि गोड शेवट असे. त्यात वैविध्य एवढंच की कधी नायक श्रीमंत तर कधी नायिका! पण यातली दरी नेहमीच आत्यंतिक होती. वास्तवात कधीच एकत्र न येणारे दोन आर्थिक वर्ग..... या विषयाला धरून तयार केलेले हे चित्रपट मनोरंजन म्हणून नक्कीच चांगले होते, पण चित्रपट मूल्य नव्हतं. बर्याचदा या चित्रपटांच्या संगीतामुळे ते अधिक भावले. परंतु हाच चित्रपटांचा सुवर्ण काल होता. राज कपूर नावाचं एक मोठं देणं याच काळात दिलं गेलं. प्यासा, श्री ४२०, आन, अंबर, बेवफा, हे या काळातले चित्रपट. मधुबाला, दिलीप कुमार, नर्गिस, गुरुदत्त या कलाकारांनी आपल्या अभिनयाने भरलेला तो काळ होता. 
         १९६० मध्ये आलेला के आसिफ यांचा मुघल-ए-आझम हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. साधना, मधुमती, हावडा ब्रिज, चलती का नाम गाडी हेही काही समस्कालीन चित्रपट! मराठी चित्रपटांचा विषय जरी बदलला नव्हता, तरी सांगीतिक प्रगती चांगली होती. जगाच्या पाठीवर, हा माझा मार्ग एकला, पाठलाग, सुंदरा मनामधे भरली, आम्ही जातो अमुच्या गावा यासारखे सुंदर गाणी असलेले चित्रपट या काळात तयार झाले. त्याचबरोबर राम गबाले, चंद्रकांत गोखले, राजा परांजपे, सुर्यकांत, जयश्री गडकर, सीमा देव, रमेश देव  यांचासारखे दिग्गज कलाकारही लाभले. 
          १९७० चा दशक एक नवीन बाज घेउन आलं ते म्हणजे 'मसाला मारके' चित्रपट.. गाणी,ड्रामा, कथानक, मारामारी, विनोद हे सगळच असलेले हे चित्रपट होते. हिंदी मधले संजीव कुमार, राजेश खन्ना, वहिदा रहेमान, आशा पारेख हे या मंतरलेल्या काळाचे काही शिल्पकार! त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, खट्टा मिठा, डॉन, सत्यं शिवं सुंदरम हे काही तुफान गाजलेले चित्रपट.  हा काळ विशेष गाजला तो रमेश सिप्पी यांच्या " शोले" मुळे. अमिताभ बच्चन च्या खात्यात आधीही अनेक चित्रपट असून या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार ची 'उंची' दिली. मराठीतही विनोदाची एन्ट्री होऊ घातली होती. अष्टविनायक, देव माणूस, झुंज, या सुखांनो या, जैत रे जैत, चानी या उत्कृष्ट चित्रपटानसोबतच आंधळा मारतोय डोळा, सोंगाड्या, आयत्या बिळावर नागोबा, चिमणराव गुंड्याभाऊ यासारखे चांगले विनोदी चित्रपटही आपली एक वेगळी जागा तयार करून गेले.
          १९८१ मध्ये आलेला 'उमराव जान' हा चित्रपट रेखाच्या अदाकारीचा आणि अभिनयाचा उत्तम नमुना होता. मराठीतही कलाकारांचा एक नवीन संच उदयाला येत होता तो म्हणजे महेश कोठारे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मिकन्त बेर्डे, वर्षा उसगावकर, सुप्रिया इत्यादी. नवरी मिळे नवर्याला, बिनकामाचा नवरा हे विनोदी चित्रपट याच काळातले काही भन्नाट चित्रपट! अशी ही बनवाबनवी म्हणजे तर विनोदाचा, अभिनयाचा कहर होता.
         १९९० पासून पुढच्या दशकानमध्ये मराठी सिनेमा, त्यात हाताळले जाणारे विषय यामध्ये खूप मोलाचा फरक पडायला सुरुवात झाली. कौटुंबिक, विनोदी चित्रपटानबरोबरच सरकारनामा, रात्र आरंभ, बनगरवाडी, दोघी, बिनधास्त  यासारखे उत्कृष्ट कथानक असलेले, अभिनयाची तोडीची जोड असलेले चित्रपट तयार होऊ लागले. हिंदीमध्ये आमीर खान, शाहरुख खान, माधुरी दिक्षित, मनीषा कोईराला, रवीना टंडन यासारखे अभिनेते या काळातले गाजलेले कलाकार होते. विषयांचा वैविध्यासारखच अभिनेत्यांकडे असलेले कलागुणही व्यापक होऊ लागले. फक्त चेहरा चांगला असून उपयोग नाही तर त्याचबरोबर गाण्याची जाण, सुदृढ शरीर, नृत्याचं अंग याही गोष्टी अंगी असणं गरजेचा झालं. या काळात एक कुठला विषय हाताळण्यापेक्षा सगळंच असलेला एक सिनेमा तयार करण्याकडे जास्त ओढा होता.
          नंतरच्या काळात भारतीय चित्रपट फक्त आधुनिकच झाला नाही तर तो मोठा झाला, समजूतदार झाला. मराठीतले मृगजळ, समांतर, कैरी, सावली, अनाहत हे चित्रपट तर हिंदी मधले लगान, पीपली लाईव्ह, धोबी घाट, यासारखे वेगळे चित्रपट या बदलाचे साक्षीदार आहेत. सामाजिक, राजकीय, वैचारिक इत्यादी कारणांमुळे हळूहळू असा बदलत गेलेला भारतीय चित्रपट आज इतक्या छान वळणावर उभा आहे, की त्याला कुठलाही विषय वर्ज्य नाही. हिंदी वा मराठी, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक कोणताही विचार चित्रपटांमधून मांडण्याची शैली जोपासली गेली. प्रेम हेच आयुष्याचं सार्थक नसून त्याचा एक भाग आहे हे वास्तव चित्रपटात दाखवलं जाऊ लागलंय. संगीत हा तर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याने बोलपटांच्या यादीतलं चित्रपटसंगीताचं महत्त्व कधीच कमी होणार नाही. जुनं संगीत उत्कृष्ट होतंच पण नवीन संगीत, त्याची बदलणारी ढब हे सुद्धा कौतुकास्पद आहेच. 
       या विषयांच्या वैविध्यामुळे या वर्तुळाच्या परीघावरची प्रत्येक गोष्ट बदलली. मग ते संगीत असो, तंत्रज्ञान असो किंवा वेशभूषा. विषयांची व्याप्ती वाढली, आवाका वाढला तसं तंत्रज्ञांना आपापल्या तंत्राची जाणच नाही तर शिक्षण आवश्यक झालं. शिक्षण आणि अनुभव यांची सांगड घालणं महत्त्वाचा झालं. भारतीय सिनेमा जागतिक झाला, काही चित्रपट महोत्सवांमध्ये भाग घेण्या पलीकडेही त्याची मजल गेली. परदेशातही भारतीय सिनेमाचा प्रेक्षक वर्ग निर्माण झाला. लगान, श्वास या चित्रपटांनी तर त्याला ऑस्कर वारीही घडवली. या सगळ्या अद्भुत प्रवासानंतर भारतीय चित्रपट शंभराव्या वर्षात पदार्पण करतोय, एक भारतीय म्हणून ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१०० वर्षांचा कालावधी फार थोडक्यात आटपवला हो..
अजून वेळ आहे, कालखंडानुसार उदाहरणे देत आपण यात भर घालावी जमेल तशी असे मला वाटते..
स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेतच.. Happy

चांगला लेख !
पण अभिषेकशी सहमत. अजुन वेळ आहे, भर घालता येइल आणि ती घालावीत अशी अपेक्षा ! Happy
आणि हो शिर्षकात एक छोटीशी टायपो झालीय, तेवढी दुरुस्त करुन घ्या. शुभेच्छा !

अभिषेक आणि विशाल.....
सूचना आणि प्रतिसादासाठी धन्यवाद...
माझ्या परीने बदल केले आहेत मी....
मायबोलीवर नवीनच आहे... तुम्हाला दोघांना इथे भेटून आनंद वाटला... मायबोली संपर्कात ठेवेलच.....
-जाह्नवी...

झुंज या चित्रपटाचा उल्लेख झाला त्यामुळे अतिशय बरे वाटले. खूप लहानपणी पाहिला होता, मन लावून पाहिला होता आणि तेव्हा अत्तिशय आवडला होता. तुम्ही उल्लेखलेली सर्वच नावे त्या त्या काळात किती महत्वाची आणि ट्रेंडसेटर्स ठरली हे पटतच आहे. चांगला लेख! धन्यवाद व शुभेच्छा

कोणत्याही चित्रपटाचे (आणि नाटकाचे) मूल्यमापन करताना त्या चित्रपटाचे (किंवा नाटकाचे) उद्देश्य "करमणूक" हे आहे की "कोणता ना कोणता ’संदेश’ देणे" हे आहे हे चित्रपट (किंवा नाटक) पाहिल्यानंतर --किंवा पुष्कळदा कलाकारांची नावे, चित्रपटाचे/नाटकाचे नाव, वगैरे गोष्टींवरून चित्रपट/नाटक पहाण्यापूर्वीही-- ठरवून आणि ते आपल्या लिखाणात प्रथम नमूद करून मग त्या कलाकृतीचे त्या उद्देश्याच्या परीघात मूल्यमापन लेखक/लेखिकेने करणे महत्त्वाचे आहे.

त्यानंतरही "करमणूक" हे उद्देश्य असलेल्या चित्रपटाचे/नाटकाचे मूल्यमापन हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक "चवी"वर अवलंबून असते. कोणाला कोणत्या "विनोदी" नटनटीचा कुठल्या तरी चित्रपटातला/नाटकातला अभिनय "पोट धरधरून" हसवणारा भासेल तर दुसर्‍या कोणाला तोच अभिनय अगदी "गावठी" भासेल. "तरुण-तरुणीं"मधले "लग्नपूर्व "प्रेम-रुसवाफुगवा" हा चिरंतन विषय असलेल्य़ा विशेषतः हिंदी (आणि काही मराठी) चित्रपटांमधला "मुख्य" नटानटींचा अभिनयही कोणाला रुचेल तर कोणाला कमालीचा हास्यास्पद वाटेल. (विशेषतः हिंदी चित्रपटांमधल्या "मुख्य" नटानटींना त्यांच्या कामांबद्दल जो प्रचंड पैसा दिला जातो त्यावरून बहुजनसमाजाला त्यांचा अभिनय "अत्यंत आवडत" असतो ही गोष्ट अर्थात्‌ उघड आहे.)