विषय क्र. १ : मना-मनातला "राज"

Submitted by भुंगा on 23 August, 2012 - 01:20

"तुझे देखाsssssss तो ये जाना सनम
प्यार होता है दिवाना सनम.......... तुझे देखा तो ये जाना सनम"

तरूण काळजाला हात घालणार्‍या या ओळी आजही जेंव्हा जेंव्हा कानावर पडतात, भर रस्त्यात चालतानाही हात पसरले जातात..... स्टिअरिंगवरचा हात सुटून दरवाज्याला लागेपर्यंत विस्तारत जातो....... आणि एका यःकश्चित देहाचा "राज" होतो...... बस्स.

शुभ्र पांढर्‍या पोषाखातल्या आपल्या प्रेयसीने सारे पाश तोडून धावत आपल्याकडे यावं, आपल्या बाहूत आश्वस्त होऊन विसावावं आणि मग लोकेशन कुठलंही असो, आपल्या आजुबाजुला फक्त आणि फक्त पिवळ्या फुलांची दाटी व्हावी........ झालंच तर एखादी जर्सी गाय कोपर्‍यात आपल्या गळ्यातली सूचक घंटा वाजवत रवंथ करत असावी...... अहाहा...!!!!!

ddlj.jpg

१९९५ च्या मोसमात कॉलेजात पाऊल टकल्या टाकल्या पाहिलेला आणि अनुभवलेला "राज" आजही कुठेतरी दडून आहे माझ्यात. कधी उघडपणे कधी लपून छपून तो समोर येतोच. पण तो आहे हे नक्की.

मी इथे लिहितोय ते "राज" या व्यक्तिरेखेबद्दल.... शहारुखबद्दल नाहीच.

शहारुख आवडायला कारणीभूत खरं तर त्याचा अभिनय नाही तर ९४ मधला "कभी हां कभी ना" आणि ९५ चा "दिलवाले" यातल्या त्याच्या व्यक्तिरेखा सर्वस्वी जबाबदार असाव्यात.... आहेत. त्या व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडल्याने कदाचित मग शहारुख कधी आवडू लागला ते लक्षातच आलं नाही.

यश चोप्रा प्रॉडक्शनने मध्यमवर्गीय लोकांच्या रोमांन्सच्या कल्पना खर्‍या अर्थाने ७० एमेम किंबहुना त्याहूनही लार्जर स्केलवर (काही इंग्लिश शब्दांना मराठी प्रतिशब्द असूच नयेत) नेऊन पोचवल्या. मल्टीस्टारर चित्रपटात सगळे सुपरस्टार नायक - नायिका एकत्र घेऊन थेट स्वित्झरलँडच्या स्वर्गात प्रेक्षकांना नेऊन बसवलं...... आणि मग त्या पार्श्वभूमीवर समोर दिसणारा रोमांन्स आपसूक हवाहवासा वाटायला लागला. चांदनी, लम्हे, विजय यासारखे सुमधूर संगीताने नटलेले आणि स्वर्गीय नेत्रसुख मिळवून देणारे चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरले. आणि मग ही लिस्ट अगदी १९९३ सालच्या "डर" पर्यंत येऊन पोचली.
तरीही कुठेतरी काहीतरी कमी होतं आणि ते पूर्ण करायला एक नव्या दमाचा दिग्दर्शक उगवला "आदित्य चोप्रा"............

आज आपल्या चोप्रा फॅक्टरीत लो बजेट फिल्म्स बनवून नव्या दिग्दर्शकांना संधी देऊन यशस्वी आर्थिक गणितं बसवण्यात जरी आदि चोप्रा बिझी असला तरी ,माझ्या मते तरी तो एक उत्तम कथा - पटकथाकार आहे. एखादी कथा टप्याटप्याने कशी सीन बाय सीन फुलवत न्यायची याची हातोटी त्याच्याकडे नक्कीच आहे, अगदी पहिल्या चित्रपटापासून.... एक निर्माता पेक्षा तो एक दिग्दर्शक पटकथाकार म्हणून मला जास्त आवडतो.

आमच्या ग्रूपमध्ये नेहमीच चित्रपटांची आपल्या "त्या" वयाला अनुसरून का होईना पण समिक्षा चालायची. पोस्टर्स बघून बघायचा की नाही ते ठरवलं जायचं...... किंवा मग ओळखीतून मिळणार्‍या आतल्या गोटातील बातम्यांतून ते आम्ही ठरवायचो. कधीकधी त्याकाळातही प्रिमिअर बघायला जायची संधी मिळायची.
१९९४ च्या "हम आपके है कौन" ने फॅमिली फंक्शनचे एवढे गोड डोस पाजले होते की त्याचा इफेक्ट १९९५ मध्येही तसाच होता. त्यात ग्रूपमध्ये आम्ही चार मित्र आणि सात मैत्रीणी. अश्या सोहळ्यांना एकत्रच फिरायचो. त्यामुळे मग कधी कधी अमकीची अमकी आणि तमकीचा तमका असं करत लवाजमा वाढतच जायचा. सलमान खान आणि माधुरीचा इतका उदो उदो चालायचा की त्यामुळेच मला दोघांबद्दलही तेंव्हापासूनच कंटाळा आला असावा.

आणि या सगळ्या पर्श्वभूमीवर अखेर "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" रिलीज झाला. त्याचं मेकिंग बघितलं होतं त्यामुळे हमखास हिट होणार ह्याबद्दल खात्री होतीच........ पोस्टर्सही भन्नाट होती. काय दृष्ट लागण्यासारखी जोडी होती "शहारुख- काजोल"ची.

चित्रपट सुरू होताच दिसणारी लँबॉर्गिनी...... नापास होणारा उमदा नायक...... त्याचं बक्षीस म्हणून त्याने "एक छोटीसी युरोप ट्रीप मागणं" आणि त्या बाप बेट्यातला संवाद....... मला आजही आठवतं, स्वप्नील पटकन म्हणाला होता...... "आयला हा अनुपम खेर तुझ्या बाबांसारखा आहे रे". आमच्या बाप बेट्यांच्या नात्याचं नेहमीच माझ्या मित्रांना अप्रूप होतं.... झालं, चित्रपट सुरू नाही झाला तर अनुपम खेर माझा बाप.. म्हणजे आपसूकच मी शहारूख....... पुढचा संपूर्ण चित्रपट मी पार भूमिकेत घुसूनच पाहिला होता. (आणि अजूनही त्यातून बाहेर पडलेलो नाही Proud )

शहारुख काजोलचं समांतर चालणारी आयुष्यं अचानक एका रेल्वे स्थानकावर एकमेकांना छेदतात........ गाडी सुटते......... आणि अरे आता काजोलची ट्रीप चुकणार असं वाटत असतानाच, तुमच्या मनातला "राज" स्क्रीनवर थेट दरवाज्यातून हात बाहेर काढून काजोलला खूण करतो काय....... अलगद हात हातात घेतो काय... आणि प्रेमकथेला सुरुवात होते काय...... !!!

क्षणाक्षणाला पुढे सरकत जाणार्‍या चित्रपटामुळे आदित्य चोप्रावरचा विश्वास अधिक दृढ होत गेला.... दिग्दर्शक म्हणून तो प्रचंड आवडून गेला..... आणि काश...... हे सगळं आपल्या बाबतीत घडेल..... अरे युरोप नाही तर निदान मुंबई पुणे ट्रीप तरी असू दे नशीबात........ !
त्यानंतर आजपर्यंत केलेल्या प्रत्येक ट्रेनच्या प्रवासात डब्यात शिरताना गाडी सुटेपर्यंत दरवाज्यात रेंगाळणं आणि गाडी सुटता सुटता एखादी काजोल येतेय का म्हणून इकडेतिकडे कटाक्ष टाकणं माझ्यातल्या राजने सोडलेलं नाही..... कितीवेळा नेत्रावती एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटताना "राज" होऊन दरवाज्यात उभा राहिलोय..... कधीही न फिरकलेल्या काजोलसाठी. Wink

एका परिपूर्ण युरोप ट्रीपचा अनुभव देऊन चित्रपट त्यांच्या ताटातुटीकडे येऊन पोचतो........ "मै फिरसे ये ट्रेन छोडना नही चाहती" "और मै चाहता हूं की ये ट्रेन बार-बार छुटे" हा सीन, आणि काजोलने "तुम मेरी शादी मै आओगे ना" असं विचारल्यावर सूचकपणे "नही, मै नही आउंगा" ...... खूप वाईट वाटलं होतं....... इतका समरसून सहसा मी सिनेमा पाहात नाही........ पण "राज" कुठेतरी काळजात घुसलाच होता.
संपूर्ण मध्यंतरापर्यंत त्याने केलेलं हेल्दी फ्लर्टिंग (तेंव्हा ह्या संज्ञाही अजिबात कळत नव्हत्या म्हणा), प्रंसंगागणिक त्यांच्यात फुलत जाणारं नातं..... कधी फ्लर्ट, कधी जबाबदार, कधी भावूक अश्या सर्व छटा दाखवणारा "राज" आणि त्याला तोडीस तोड बॅलन्स्ड काजोल. व्हॉट अ ट्रीट यार.....!!!!!

दिलवाले येईपर्यंत फक्त आणि फक्त "शोले" हाच सिनेमाच्या सर्व बाबतीत परिपूर्ण उतरलेला चित्रपट आहे हे माझे पक्कं मत होतं.... त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आकंठ प्रेमात होतो मी.......
पण एक रोमँटिक कथानकात जे जे हवं ते सर्व पूर्णपणे भरलेलं असं कथानक आणि त्याला तोडीस तोड सर्व बाबी असा चित्रपट म्हणजे "दिलवाले"च...... जसे शोलेच्या कित्येक प्रसंगांच्या हुबेहूब कॉपीज किंवा त्यातली कॅरॅक्टर्स, त्यांचे डायलॉग्ज्स नंतरच्या कित्येक चित्रपटांवर प्रभाव दाखवून होते तसेच दिलवाले नंतर आलेल्या कित्येक रोमँटिक चित्रपटांवर दिलवालेचा निर्विवाद प्रभाव होता........ शाहीद कपूर, जुगल हंसराज, जिमी शेरगील आणि तमाम यंग ब्रिगेड तर आजही शहारुखचा पर्यायाने त्या "राजचा" कित्ता गिरवण्यातून बाहेरच आलेले नाहीत.... डिट्टो कॉपी. (अर्थात रणबीर कपूर सारखे "सुखद" अपवाद आहेत याला).

काजोलने आईला ऐकवलेली कविता, युरो ट्रिपच्या दरम्यान राजचा "पता नही ये बादल कब हटेंगे" स्टाईल अवतार, अमरीश पुरीची जरब, फरिदा जलालने साकारलेली आई, लहान बहीण चुटकी, अमरीश आणि राजने सकाळी कबुतरांना दाणे घालतानाचा "आओ, आओ... भुर्र्र्र्र्र्र्र्र्र" तो प्रसंग....... खरं तर सगळेच प्रसंग अगदी "परफेक्ट" म्हणावे असे जुळून आलेले..... आजही तसेच लक्षात आहेत. अशी भट्टी जमलेली असते म्हणूनच मग ती सगळी कॅरॅक्टर्स, ते संवाद पुन्हा पुन्हा इतर चित्रपटांतून डोकावत राहतात.

शेवटाकडे चित्रपट येताना थोडासा भडक होत जातो खरा, ती मारामारी, रक्तबंबाळ "राज", अचानक सुटणारी ट्रेन, त्यातही वडिलांच्या परवानगीसाठी थांबलेली नायिका जरी भडक असलं तरी नवीन होतं आणि नुकतीच मिसरुडं फुटू लागलेल्या वयात तर ते फारच "थ्रिलिंग" वगैरे वाटलं होतं.......

तसंच या चित्रपटात शहारुखने तब्बल ३४ लॉकेट्स घातली होती गळ्यात. प्रत्येक ड्रेसवर वेगळं लॉकेट. त्यवेळी मोजल्याचं पुसटसं आठवतय......

या चित्रपटाचं संगीत म्हणजे तर कहर होता...... मधात बुडवून बुडवून काढलेली गाणी होती जतिन ललितची. मला वाटतं आनंद बक्षी गीतकार होते, नक्की आठवत नाही.

बापाशी मित्रासारखा वागणारा, नायिकेवर जीवापाड प्रेम करणारा, प्रसंगी अवखळ, प्रसंगी उपद्व्यापी पण त्याचबरोबर मोठ्यांचा मान राखून वागणारा पडद्यावरचा "राज" एक्दम फूल्टू आवडला होता आणि त्याने कधी परकायाप्रवेश केला माझ्यात ते कळलंच नाही...... एकदा राज जो माझ्यात शिरला तो शिरलाच......
आणि माग माझ्यातला राज खर्‍या अर्थाने उफाळून यायला १९९७ चा "परदेस" उजाडला.......

"दो दिल मिल रहे है मगर चूप्के चूपके, सबको हो रही है खबर चुपके चुपके"

माझ्या "सॅनोरिटा"ला होकार दिल्याच्याच दिवशी वर्गात मी हेच गाणं म्हटलं होतं ऑफ पिरियडला...... मी, माझा मित्र, माझी सॅनोरिटा आणि तिची जीवलग मैत्रीण या वर्गातल्या चारच जणांना त्या क्षणी त्या गाण्याचा "खराखुरा" अर्थ कळत होता.........

दिलवालेनंतर तब्बल दोन वर्षांनी मला माझी काजोल मिळाली होती, तेही कुठलीही ट्रेन मिस न करता.

तिला त्याचवेळी सांगितलं होतं मी "अब मै हूं ना... अब कोई गडबड नही होगी" आणि...........
गडबडी होतच राहिल्या आणि होतच राहिल्या Proud

अशावेळी मी फक्त एवढेच म्हणतो,

"बडे बडे देशों मे ऐसी छोटी छोटी बातें होती रेहती है"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉलेजमध्ये वाद घालताना शहारुखद्वेष्टे "हॅ तो तर काय नुसता दुसर्‍यांच्या बायकाच पळवत असतो" असे युक्तिवाद करायचे....... (पोस्ट डीडीएल्जे, कुकुहोहै,परदेस ईफेक्ट). आता भूमिका तश्या मिळतात त्याला काय करणार तो तरी...... प्रत्यक्ष आयुष्यात अहे की लॉयल Wink

ही कोणत्याही 'राज' पेक्षा तुझीच कथा जास्ती वाटतेय.
>>>>>>>>>>>>>>>
मग परिक्षकांनी मनावर घेऊन त्यावरही एक चित्रपट काढावा की राव Wink Proud

वर शीर्षकातच "सबकुछ है" दक्षेमाऊली Happy

फारच मस्त झालाय लेख!
मनातलं सगळं उतरवून काढलंस बहुधा Proud पण त्यामुळेच प्रामाणिक वाटतोय..

त्या राजबद्दल लिहिता लिहिता, तुला तुझी सेनोरिटा मिळाल्यानंतरची वाक्यं ही सही झालीत.. ती सांगड आवडली
मस्त लेख!!

छान लिहिले आहे.
मी हा बघितला त्यावेळी सुपर हिट झाला होता. लग्नाच्या प्रसंगात पडद्याभोवती लाईंटींग केले जात असे !

खूऊऊप सुंदर लिहिलंय तुम्ही. शाहरुख अत्यन्त नावडता प्राणी, पण डीडीएलजे, कभी हां.. कभी ना, खरच अपवाद! आणि तुम्ही म्हट्लं तसंच शाहरुख्च्या नाही तर राज च्या प्रेमात आकंठ बुडुन गेलेलं वय... पुन्हा समोर येउन उभे राहिले ते धुंद दिवस... ते सुंदर क्षण पुन्हा जिवंत केल्या बद्दल आभार तुमचे.

लोकांनी सीडी फुकट मिळाव्यात म्हणून लेख लिहीले आणि याने चक्क रोल मिळावा म्हणून Proud

सॉल्लीड लिहीलय रे. शाहरूख वर असूनही चांगलं लिहीलेलं असल्याने आवडलं. शाहरूख आमच्या विरोधी पक्षातला असल्याने आणि उगीचच आमीरशी वाकड्यात जात असल्याने त्याला डिच केलं होतं. त्यात त्याचं बें बें जाम खटकायचं पण तरी पण साल्याला पिक्चर्स एक से एक मिळाले.

लेखाबद्दल अभिनंदन Happy

सुंदर लेख... आवडलाच !

बरेच जण म्हणतात की त्यांना शाहरुख आवडला तो 'स्वदेस' किंवा 'चक दे' मध्ये तेव्हा मला खरेतर हसुच येते. कारण त्यातला शाहरुख हा शाहरुख नव्हताच. खरा शाहरुख दिसतो तो 'दिलवाले....' , कभी हा कभी ना, कुछ कुछ.., दिवाना, डर, अंजाम या चित्रपटात. ती त्याची खरी ओळख आहे. मला शाहरुख फारसा आवडला नाही कधीच, पण तो नावडताही नाहीये.

'गरीबांचा शाहरूख' कोण ह्या बरेच दिवस अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर फायनली मिळालं एकदाचं Proud

भुंग्या, डिडिएल्जे चा काळ आमच्या पीजी कोर्स्च्या सुवर्णदिवसातल्या आठवणी जागवणारा आहे त्यामुळे तुझ्या या लेखाने ते अप्रतिम दिवस आठवले Happy

'गरीबांचा शाहरूख' कोण ह्या बरेच दिवस अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर फायनली मिळालं एकदाचं
>>>>>>>>>>>>

Rofl

क्या बात!
शारूख आवडायचा हे आता मलाही 'गर्व के साथ ' साम्गता येईल.

नेत्रावती एक्सप्रेस?
कुठलं कॉलेज?

'गरीबांचा शाहरूख' कोण ह्या बरेच दिवस अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर फायनली मिळालं एकदाचं Proud

पण गरिबांचा भुंगा कोण हा नवीन प्रश्न निर्माण झाला Lol

सही झालाय लेख!! मला शाहरुख फक्त या सिनेमात आवड्ला!! पण गरिबांचा भुंगा कोण हा नवीन प्रश्न निर्माण झाला>>:हाहा:

किंग खान..अशक्य आत्मविश्वास,काही नव्हतं तेव्हापासून आतापर्यंत.मूर्तीमंत चार्म.या लेखाने त्याचं न ओसरणारं तरुणपण जागवलं.

आवडला लेख. DDLJ प्रचंड entertaining सिनेमा आहे ह्याबाबत दुमत नसावे. आदित्य चोप्राला परत हि भट्टी जमवताच आलेली नाही.

बरेच जण म्हणतात की त्यांना शाहरुख आवडला तो 'स्वदेस' किंवा 'चक दे' मध्ये तेव्हा मला खरेतर हसुच येते. कारण त्यातला शाहरुख हा शाहरुख नव्हताच. खरा शाहरुख दिसतो तो 'दिलवाले....' , कभी हा कभी ना, कुछ कुछ.., दिवाना, डर, अंजाम या चित्रपटात. ती त्याची खरी ओळख आहे. >> +१. त्यातला शाहरुख काढला तर ते बघणे अशक्य आहे. love him or hate him but you can't ignore him Happy

अभिषेक दादा मला म्हणायचं होतं - शाहरूखचा (कुठलाही) चित्रपट आणि डीडीएलजे (मध्ये इतर कोणीही असत तरी) यांवरचे लेख मला आवडणारच!
किती बाई एक्सप्लेन करावं लागत याला...
बिचारी अस्मिता Proud Light 1

नेत्रावती एक्सप्रेस?
कुठलं कॉलेज?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

जॉबच्या काळात मी केरळला जायचो तेंव्हाचा अनुभव आहे तो.... असाच टाकलेला ग.
कारण एरवी मी कधीच लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास नाही केलेला, वर्षातून एकदा शेगावला जाताना फक्त ट्रेनने जायचो, एरवी बाय रोडच सगळीकडे..... लाल डब्बा, अशियाड, कार झिंदाबाद...!!! आणि शेगावला जाताना काजोल शोधायची मनःस्थिती नसते ना...... (महाराजांचं नशीबच दांडगं Wink )

म्हणून ते नेत्रावती लिहिलेय...... कारण तोच एक रेग्युलर अनुभव आहे रेल्वेचा.

पण गरिबांचा भुंगा कोण हा नवीन प्रश्न निर्माण झाला
>>>>>>>>>>>>>>>>>>

किरण्या Proud

आता या प्रश्नाला पूर्णविराम द्यायला तुलाच पुन्हा एखादा ड्युआयडी जन्माला घालावा लागेल मित्रा Wink
किंवा तू काल रात्री तो घातला ही असशील Proud

छान लिहिलंय Happy कॉलेजवयीन तरुणाईचा वेडेपणा मस्त उतरलाय लेखात.

मी हा सिनेमा थिएटरमधे २ वेळा आणि टी.व्ही.वर 'य'वेळा पाहिलाय. पंधरा दिवसांपूर्वीच्या रविवारीच कुठल्यातरी चॅनलवर लागला होता. पुन्हा बसून सगळा पाहिला. शेवटची काही मिनिटं सोडली, तर आजही कुठेही कंटाळवाणा वाटत नाही.
(त्या शेवटच्या दृष्यात काजोल पळत ट्रेन पकडायला जाते, तेव्हा शाहरूख खान ज्या दारात उभा असतो, त्या डब्याचं दुसरं दार काजोलच्या जवळच असतं, तर ती पटकन त्या दारात का चढत नाही? - हा प्रश्न तेव्हा मनाला शिवलेलाही नव्हता :हाहा:)

या सिनेमातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे एक कलाकार म्हणून शाहरुखची असलेली एनर्जी !! तीच एनर्जी आधी 'कभी हा कभी ना'मधेही दिसली; आणि नंतर सर्वाधिक जाणवली ती 'चलते चलते' सिनेमात.

मस्त लिहिलय Happy

शारुख खास नाही आवडत पण काजोल आवडते Happy .. सिनेमा गाण्यांसाठी आणि सिनेमॅटोग्राफीसाठी आवडला होता Happy

स्पर्धेसाठी शुभेच्छा! Happy

आता या प्रश्नाला पूर्णविराम द्यायला तुलाच पुन्हा एखादा ड्युआयडी जन्माला घालावा लागेल मित्रा
किंवा तू काल रात्री तो घातला ही असशील >>

हात्तीच्या ! अजून कॅसेट इथंच अडकलीये होय ?
तुला इमेलमधून कळवलेल्या ( इथं जाहीर केलेल्या , आणि जाहीर करून चूक केलेल्या) त्या दोन आयडींव्यतिरिक्त अजून कुठले आयडी माझे आहेत असं तुला वाटतंय ते लिही ब्वॉ ! आपण अ‍ॅडमिन महाशयांची एकदाची साक्ष काढू. उगाच माझा ब्रह्मचारीमधला शम्मीकपूर नको व्हायला , काय म्हणता ? Proud ( तुझ्या आजूबाजूलाच त्यांचे जन्मदाते असतील Wink )

Pages