पं. विष्णु दिगंबर पलुस्कर - कर्तृत्व आणि प्रवास

Submitted by agaiki on 22 August, 2012 - 15:20

नमस्कार-
काल २१ आगष्ट, बरोबर ८१ वर्षापूर्वी म्हणजे २१ आगष्ट १९३१ ह्या दिवशी पं. विष्णु दिगंबर पलुस्कर निधन पावले. त्यांच्या आयुष्याचा आढावा घेणारा एक लेख लॉस एन्जेलिस येथील श्री. शशीकांत पानट यांनी लिहिला आहे तो आपल्या वाचनार्थ येथे प्रसिध्द करीत आहे. ह्या निमित्ताने त्यांनी केलेल्या भव्य कार्यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे एव्हढाच उदेश्य!
धन्यवाद,
आकाश
हा लेख येथे प्रकाशीत करण्यारिता श्री. शशीकांत पानट यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहे.
----------------------------------------------------------------------------------------

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर - कर्तृत्व आणि प्रवास

श्री. विष्णु दिगंबर पलुस्करांचा जन्म आगष्ट १८, १८७२ रोजी कुरुंदवाड येथे झाला. त्या काळी ब्रिटीशांचे राज्य असल्याने कुरुंदवाड हे गांव डेक्कन डिव्हीजन मुंबई प्रेसिडेंसी मध्ये आहे असा ऊल्लेख कागदोपत्री आढळतो. वि.दि. पलुस्करांचे वडील श्री. दिगंबर गोपाळ पलुस्कर हे ऊत्तम गायक होते. उदर-निर्वाहासाठी ते किर्तने करीत असत. आणि त्या माध्यमांतून त्यांच्या गायनाचा रियाज कायम चालू असे.

वि.दिं.चे शिक्षण कुरुंदवाडच्या प्राथमिक शाळेत झाले. त्या काळी दत्त-जयंतीचा ऊत्सव मोठ्या प्रमाणावर करीत असत. दिवाळी सणाच्या वेळी आपण जसे फटाके, फुलबाज्या, भुई-नळे ह्यांनी सण साजरा करतो, तसेच दत्त जयंतीला देखील करण्याची प्रथा होती. ईसवी सन १८८५ मध्ये म्हणजे वि.दि. केवळ १३ वर्षांचे असतांना, दत्त-जयंतीच्या मिरवणूकींत एक मोठा फटाका/भुई-नळा ऊडाला, त्याचा स्फोट झाला आणि विष्णुच्या दिशेनेच आला. त्यामध्ये विष्णुचे तोंड भाजले आणि डोळ्यांस जबर दुखापत झाली. गांवातल्या गांवात पुश्कळ ईलाज केले पण भाजलेले तोंड जरी बरे झाले तरी डोळे मात्र अधू झाले. त्यांना मिरजेच्या ईस्पितळांत तेथील मुख्य डाक्टर श्री. किशोर भडभडे ह्याण्च्याकडे नेण्यांत आलं परंतू त्या प्रयत्नांना यश आलं नाही. एव्हढ्या कोवळ्या वयांत विष्णुची दृष्टी अधू झाली. केवळ त्याच्यावरच नव्हे तर सा-या कुटूंबावरच संकट कोसळले आणि दुख्खाचं सांवट पसरलं! दिगंबरपंतांना तर काय करावं तेच कळेना! कांहीही करून आपल्या मुलाची दृष्टी परत यावी असं त्यांना वाटे, परंतू त्या काळच्या तोडक्या मोडक्या तुटपुंज्या अशा यंत्र सामुग्रीच्या जोरावर जमेल तेव्हढे प्रयत्न करूनही विष्णुचं अंधत्व गेलं नाही. आता आपल्या मुलाला वाचतां येणार नाही, लिहितां येणार नाही अशा खिन्न मन:स्थितीत त्याचं शिक्षण कसं होणार ह्याचीच त्यांना सतत काळजी होती.

मात्र ईतक्या नकारात्मक परिस्थितीत देखील विष्णुची उपजतच असलेली गायनाची कला मात्र त्यांच्या नजरेंतून सुटली नाही. अंधत्व आल्यानं शाळेत जावून लेखन-वाचन करण तर शक्यच नव्हतं! डाक्टर भडभडे ह्यांनी अशा परिस्थितीत विष्णुला गायन शिकवावं असं सुचविलं. एखाद्या ऊत्तम गुरुकडे जावून त्याने गायनकला आत्मसात करावी अशी शिफारस केली. केवळ किर्तनावरच ऊदर निर्वाह करणा-या दिगंबरपंतांना ऊत्तम गुरुंकडे शिकण्याचा खर्च कसा परवडणार? शेवटी डाक्टर भडभडेंच्याच ओळखीने त्यांनी मिरजच्या महाराजांकडे विष्णुची शिफारस केली. विष्णुच्या अंगच्या ऊपजत गुणांमूळे त्याला बाळकृष्णबुवा ईचलकरंजीकरांकडे संगीत शिक्षणाची संधी मिळाली. त्याचे शिक्षण १८८७ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी सुरू झाले तिथे त्याला पूढील नऊ वर्षे म्हणजे ईसवी सन १८९६ पर्यंत ते मिळाले. हळू हळू विष्णु गुरुजींना गायनाच्या मैफिलीत साथ करू लागला.

प्रत्येक गुरुचं असं स्वप्न असतं की आपला शिष्य तयार व्हावा, आपल्याला येणारे सारे गायनाचे प्रकार शिष्याने आत्मसात करावे आणि आपले नांव काढावे. विष्णु गुरुजींच्याबरोबर साथ करू लागला की ईतक्या ऊत्तमरित्या करी की कधी कधी तो गुरुपेक्षांही वरचढ आहे की काय असे वाटू लागे.

त्याकाळी गायक मंडळींना आणि एकंदरीत संगीताला समाजांत मानाचं स्थान नव्हतं! गायनाची कला ही फक्त सरकारी दरबारीच असायची, ती लोकांपर्यंत आणायला हवी असे त्यांना प्रकर्षाने वाटत असे. एखाद्या समारंभांत पट्टेवाल्याला निमंत्रण असे पण गायकाला कस्पटासमान लेखले जाई. शेकडो/हजारो मंडळींना संगीताचा अमाप आनंद देणा-या आपल्या गुरुंना समाजांत मानाचं स्थान नाही हे त्यांच्या मनाला पटत नसे, आपल्या गुरुंना मिळणारी अशी वागणूक विष्णु दिगंबरांना अजिबात आवडत नसे. कलावंताची ही दु:स्थिती नाहीशी करण्यासाठी त्यांनी मनाशी दृढ संकल्प केला आणि अशा वैचारिक भूमिकेंतुन त्यांनी मिरज सोडून स्वत:च्या पायावर ऊभे राहून ह्या दृष्टीने प्रयत्न करायचे ठरविले. आपले एक निकटचे स्नेही श्री. केशवराव पटवर्धन ह्यांच्याकडून थोडे आर्थिक सहाय्य मिळविले. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी ह्या संकल्पनेकडे जाण्यासाठी पहिले पावूल ऊचलले आणि आपल्या दोन सहका-रांसमवेत, कनिष्ठ गुरुबंधू श्री.श्रीकृष्ण हेर्लेकर आणि दूसरे कनिष्ठ बंधू श्री. बळवंतराव काणे ह्यांच्यासह १८९६ सालच्या नारळी पौर्णिमेच्या मध्यरात्री मिरजेला रामराम ठोकला.

मिरजेहून ते औंधला पोहोचले व तेथून सातारा शहरी पोहोचले. आयुष्यांतली स्वत:ची पहिली मैफिल त्यांनी सातारा शहरांत केली. ऊत्तर भारतांतल्या शहरांत जावून तेथल्या संगीताच्या वारशांचा अभ्यास त्यांना करावासा वाटे. बडोदा आणि ग्वाल्हेर शहरांतल्या शाही, राजे रजवाड्यांकडॆ जावून आपल्या कलेचे दिग्दर्शन करावे असेही त्यांना वाटे. बडोदा शह्रांत त्यांनी आपला मुक्काम ठोकला. तेथील राम मंदिरांत राहून तेथे त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांचे सुस्वर गायन ऐकायला लोकांच्या धुंडीच्या धुंडी येवू लागल्या. त्यांची सर्वत्र किर्ती पसरू लागली. बडोद्याच्या महाराणीसाहेब जमनाबाई ह्यांनी त्यांना राजवायांत गायनासाठी आमंत्रित केले. त्यांचा श्रीफल आणि ३०० रूपये बिदागी देवून सत्कार केला. त्याक्लाळी ३०० रूपये ही खूप मोठे रक्कम समजली जात असे. मात्र एव्हढ्या सत्कारानंतर वि. दिं. नी बडोदा सोडून जावे अशी शिफारस त्यांनी केली. राजदरबारी असलेल्या अनेक गायकांचा राग ह्या नविन कलाकारावर होवून त्यांच्या जीवाला काही धोका होवू नये म्हणून त्यांनी बडोदा सोडणे आवश्यक होते. जाण्यापूर्वी त्यांनी वि.दिं. ना अनेक शिफारसपत्रेही दिली व त्यांचा त्यांना भविष्यांत खूप फायदा झाला.

पलुस्करांच्या मनांत निराळेच विचार येत होते. त्या काळच्या प्रथेप्रमाणे गायनाच्या सर्व मैफिली देवळांत अथवा राज दरबारांत होत असत. त्या सर्व साधारण श्रोत्यांसमोर व्हाव्या असे पलुस्करांना वाटे. सर्व साधारण श्रोत्यांपर्यंत गायनकला पोहोचायला हेवी असे त्यांना वाटे. त्यांचा तसा प्रयत्नही होता आणि आग्रहही! त्याकाळचा अशा पद्धतीचा विचार हा ख-या अर्थाने "Out of Box Thinking " असाच वाटणारा होता. परंतू पलुस्करांच्या "मनाला पटेल अशा वागण्याचा" प्रयोग त्यांनी सौराष्ट्रांत ’पहिली जाहीर मैफिल’ करून पुराव्यासहित सिद्ध केला. नुसतीच जाहीर मैफिल न करतां त्यासाठी थोडीफार तिकिट विक्रीही केली. संगीताच्या जाहीर मैफिलीला श्रोत्यांना दर आकारून आमंत्रित करण्याचा पहिला मान विष्णु दिगंबर पलुस्करांनी मिळविला. संगीत आपल्यापुरते मर्यादित न ठेवतां सर्वसाधारण व्यक्तीला संगीत शिकता आले पाहिजे, वैयक्तिक ध्येयपुर्तीतच न थांबतां संगीत कला केवळ विशिष्ठ व्यक्तीपुरतीच मर्यादित न ठेवतां कुणालाही ती शिकता आली पाहिजे आणि ह्या कार्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे अशा विचारांनी ते पछाडले. ह्या सर्व शिष्यगणांना शिकविण्यासाठी संगीत शिकविणारे देखील आपण निर्माण केले पाहिजेत हा सर्वगामी विचार त्यांनी केला. आजच्या युगांत जगांतल्या कोणत्याही प्रगत राष्ट्रांतल्या Corporate च्या वातावरणांत लोकप्रिय असणारी "Train the Trainer" ही संकल्पना पलुस्करांनी शंभर वर्षांपूर्वीच राबविली होती. अर्थांतच अशा मोठ्या कामासाठी आर्थिक सहाय्य देखील तेव्हढेच लागेल ह्याचीही पुरेपुर कल्पना त्यांना होतीच. समजा तेही मिळविले असते तरी मार्ग कंतकांनी भरलेला होता. कारण त्या काळी संगीताचे शिक्षण फक्त समाजांतल्या प्रतिष्ठीत व्यक्तींपुरतेच मर्यादित होते. समाजांतील सर्व साधारण व्यक्तींना संगीत शिकविण्याचे माध्यमच अस्तित्वांत नव्हते. संगीताची कला ही फक्त प्रतिष्ठीत व्यक्तींनाच गाता येइल आणि ईतरांना ती गाताच येणार नाही अथवा शिकतांच येणार नाही असे त्यांना वाटेना. आणि असं हे माध्यम जर आपण त्यांना ऊपलब्ध करून दिलं नाही तर पुढील अनेक पिढ्या ऊत्तमोत्तम संगीतकारांना मुकतील एव्हढी अफ़ाट दूरदृष्टी वि.दिं. ना होती. आणि त्याही पुढची पायरी म्हणजे हे शिक्षण समाजांतल्या अनेक व्यक्तींनी घ्यावं, आणि संगीताच्या झुंडीच्या झुंडी तयार व्हाव्या असं त्यांचं स्वप्न होतं.!

त्या काळच्या पारंपारिक पद्धतीनुसार केवळ देवळाच्या गाभा-यांत अथवा राजप्रासादांत निमंत्रित पाहुण्यांसमोरच केलेल्या संगीत मैफिलीऐवजी त्यांनी संगीताच्या जाहीर मैफिली आणि त्या देखील तिकीटं लावून करायला सुरुवात केली. संगीताचा प्रसार जनतेच्या माध्यमांतून सर्व साधारण माणसांपर्यंत पोहोचविणे हा तर ऊद्देश्य होताच परंतु त्याबरोबरच ह्या अफाट कार्यासाठी धन गोळा करणं हाही ऊद्देश्य होता.
वि.दिं.च्या ह्या दूरदृष्टीला हवं तसं स्वरूप प्राप्त व्हायला वेळ लागला नाही. जे संगीत कानावर पडण्यासाठी पूर्वी हर-प्रयत्न करावे लागत असत, ते अगदी विनासायास आणि सहजासहजी ऐकायची संधी लोकांना मिळू लागली. ते संगीत ऐकून ज्यांच्या अंगी संगीताचे ऊपजत गुण आहेत असे अनेक शिष्य पूढे आले आणि त्यांचा खूप मोठा असा शिष्यवर्ग तयार झाला. पण अशा शुभ-कार्यांत अडचणी आल्या नाहीत तरच नवल!

अर्थांतच पलुस्करांची ही हालचाल राजेरजवाड्यांकडॆ वर्षानुवर्षे संगीत गात जीवन व्यतीत करणा-या परंतू मोजक्याच अशा संगीतकारांना अजिबात आवडली नाही. आपल्या कार्यावर श्रद्धा असलेल्या पलुस्करांनी मात्र त्यांना अजिबात भीक घातली नाही आणि आपलं कार्य ते नेटानं पुढं चालवू लागले. आणि हे करतांना ज्या ग्वाल्हेर घराण्याचं शिक्षण त्यांना सुरुवातीला मिळालं होतं त्याचा त्यांना खूपच ऊपयोग झाला. त्यांच्या गायनाची किर्ती सारीकडे पसरली. गुरु आपटे, पंडीत शंकर, श्री.आमिरखान ह्या सर्वांनी पलुस्करांची खूप स्तुती केली. महाराज माधराव ह्यांनी त्यांना राजवाड्यांत आमंत्रण देवून त्यांची मैफिल करविली. एव्हढंच नव्हे तर त्यांचा यथायोग्य सत्कार करून आणि भरपूर बिदागी देवून पलुस्करांना मथुरेच्या आणि भरतपूरच्या राजांकडे जाण्यासाठी स्वत:ळ्हून शिफारसपत्रे दिली.

सदैव ज्ञानाचीच कांस धरणा-या पलुस्करांनी मथुरेंत जावून हिंदी, संस्कृत आणि ब्रिज भाषेंतल्या संगीताचा अभ्यास केला. मथुरेंत असतांनाच त्यांना पंडीत चौबे भेटले. पंडीत चौबे हे त्या काळी ध्रुपद संगीतांतले जाणकार समजले जात असत. परंतू त्याकाळच्या रिवाजानुसार संगीताचे ईतर प्रकार लोकप्रिय होत चालले होते आणि ध्रुपद हा प्रकार लोप पावत चालला होता. तरीही पंडीत चौबे ह्यांच्याकडून त्यांनी ध्रुपद गायकीचे धडे घेतले.

पलुस्कर त्यानंतर दिल्लीला पोहोचले. ई.सन १८९८ मध्ये ते पंडीत तोलाराम ह्यांना भेटले. पंडीत तोलाराम ह्यांनी पलुस्करांना जालंदरला होणा-या श्री. हरीभल्ला संगीत संमेलनाचे जाहीर आमंत्रण दिले. त्या संमेलनांत वयाच्या केवळ २६ व्या वर्षी पलुस्करांनी दिलेल्या मैफिलीमुळे एका रात्रीत त्यांची किर्ती आख्या पंजाब राज्यांत पोहोचली.

एव्हढी सारी किर्ती मिळूनही पलुस्करांच्या मनांत संगीताबद्दल अजूनही खूप खूप करायला पाहिजे हे विचार होतेच. आतांपर्यंत संगीत हे मुखोद्गत पद्धतीनेच गायले जाई आणि शिकविले जाई. संगीताच्या जाणकाराला असलेले ऊत्तम ज्ञान त्या व्यक्तीबरोबरच अस्ताला जात असे. ही मौखिककला संगीतलिपीमध्ये लिहिण्याचं त्यांनी ठरविलं. त्याच वेळी पंडीत विष्णु नारायण भातखंडे ह्यांनी देखील पाश्चिमात्य धर्तीवर ही लिपी लिहायला सुरुवात केली होती.परंतू पाश्चिमात्य धर्तीवर अथवा पद्धतीवर लिहिलेली लिपी ही भारतीय संगीतांत चपखल बसत नाही हे त्यांच्या लक्षांत आलं. ह्या सर्व गोष्टींची विचार पूर्वक जाणीव ठेवून पलुस्करांनी स्वत:ची अशी "संगीत लिपी" तयार केली आणि ती पूढे आपल्या भारतीय संगीताला "न्याय" देवू शकली! केव्हढी ही दूरदृष्टी आणि कष्ट!

ह्या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे पलुस्करांनी "गंधर्व-विद्द्यालयाची" स्थापना मे ५, १९०१ ह्या दिवशी लाहोर येथे केली. पलुस्करांचं आयुष्यभर बाळगलेलं स्वप्न त्या दिवशी पूर्ण झालं!

वास्तविक ही घटना भारतीय संगीताच्या ईतिहासांत सुवर्ण अक्षरांनीच लिहायला हवी!. ह्या पूर्वी राजे रजवाड्यांच्या मदतीवरच अधारलेली अशी संगीत संस्था प्रस्थापित झालेली होती. गंधर्व महाविद्द्यालयाची स्थापना ही भारतांत प्रथमच जनतेच्या मदतीवर चालणारी अशी संस्था निर्माण झाली. समाजांत त्यावेळी अस्तित्वांत असलेल्या ’गुरूकुल’ पद्धतीला देखील ह्या संस्थेच्या स्थापनेमूळे थोडा हादरा बसला. संगीत शिकण्याची इच्छा असलेल्या शिष्याने गुरूच्या घरी राहून, गुरूची सेवा करून संगीत शिकण्याच्या पिढ्यानपिढ्या रूजलेल्या प्रथेला, गंधर्व महाविद्द्यालयाच्या स्थापनेमूळे पहिला तडा गेला!

गंधर्व महाविद्द्यालयांतून तयार झालेल्या सुरुवातीच्या शिष्यांचे पूढे मोठे संगीतकार झाले, त्यातून संगीत शिकविणारे गुरूही निर्माण झाले. समाजांतील लोकांना ह्या विद्द्यालया-विषयी एक प्रकारचा आदर निर्माण झाला. आणि त्याही पेक्षां महत्वाचा बदल असा झाला की पूर्वीच्या राजे-रजवाड्यांमधून तयार झालेल्या संगीतकारांविषयी समाजामधला तात्पुरता आदर अथवा कमी आदर ही परिस्थिती महाविद्द्यालयांतून तयार झालेल्या संगीतकारांच्या बाबतीत बदलली. त्यांना समाज आदरपूर्वक वागवू लागला. जो समाज पूर्वी संगीत कलाकारांना आदराने वागवित नसे, त्या समाजाची संगीतकारांकडॆ आदराने पाहाण्याची वृत्ती ही एक क्रांतिकारी घटना गंधर्व महाविद्द्यालयाच्या स्थापनेमूळे झाली त्याबद्दल भारतीय संगीत संस्था पलुस्करांची सदैव रूणी राहिल. संगीताचा राज-दरबारांतून जनतेच्या गृहा-गृहांत हा प्रवास घडविण्याचे शिल्पकार म्हणून पलुस्कर आजन्म ओळखले जातील.

सन १९०८ च्या सप्टेंबरमध्ये पलुस्कर मुंबईला पोहोचले. गंधर्व महाविद्द्यालयाची स्थापनाही त्यांनी तेथे केली. लाहोरच्या गंधर्व महाविद्द्यालयाची शाखा म्हणून ती समजली गेली!

समाजांत पलुस्करांची लोक-प्रियता खूपच वाढली! आणि विद्द्यालयाचं कामही खूपच वाढत गेलं! विद्द्यार्थी-शिष्यगण वाढले. येणा-या प्रत्येक शिष्याला सामावून घेण्याची त्यांची वृत्ती होती. त्या सर्वांसाठी रहायला ऊपयोगी पडावी म्हणून त्यांनी मोठी इमारतही बांधली. शिष्यांसाठी वसती-गृहे बांधली. त्याचा खर्च सांभाळण्यासाठी संगीताच्या पुष्कळ मैफिली केल्या. त्यांतून मिळालेल्या पैशांनी सर्व खर्च भागावा असे त्यांना वाटे. पण शिकणा-या विद्द्यार्थ्यांची संख्या आणि त्यासाठी होणारा खर्च, ह्याचे आणि त्यांच्या संगीत मैफिलींच्या मिळकतीचे प्रमाण व्यस्तच राहिले. कर्ज काढून गंधर्व विद्द्यालय चालविणे ह्यापेक्षां त्यांना दुसरा पर्यायच नव्हता. हळू हळू कर्ज फिटून विद्द्यालयाला बरे दिवस यावेत अशीच त्यांची अपेक्षा आणि ईच्छा होती. परंतू नियतीच्या मनांत दूसरेच असावे.

ईसवी सन १९२४ मध्ये अशाच एका संगीत दौ-यावर असतांना त्यांच्या अपरोक्ष सावकार मंडळींनी त्यांच्या कर्जापोटी तारण ठेवलेल्या ईमारतींचा ताबा घेतला. एव्हढ्या प्रयत्ना-नंतर आणि परिश्रमा-नंतर स्वत: कर्ज बाजारी होवून ऊभारलेल्या स्वप्नांचा असा चुराडा झाला. सावकारांनी इमारती लिलावाच्या भावांत विकून टाकल्या आणि मिळेल तेव्हढी रक्कम वसूल केली. ह्या घटनेमूळे त्यांना एव्हढा मोठा धक्का बसला की ते वयाच्या केवळ ५२ व्या वर्षी खचून गेले.

आपल्या स्वप्नांचा असा चुराडा स्वत:च्याच डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना कशातच गोडी वाटेना. अशा परिस्थितीत त्यांनी आपला मुक्काम नाशिकल हलविला. मात्र एव्हांना मुंबईचे गंधर्व महाविद्द्यालय जरी बंद झाले तरी त्यांच्या कार्याचा ईतका मोठा प्रसार झाला होता की सर्व हिंदुस्थानभर ठिकठिकाणी त्यांच्या विद्द्यालयाच्या शाखा म्हणून अनेक संगीत संस्था शिष्य मंडळी चालवित होते. पलुस्करांनी संगीत शिक्षणासाठी साठ-सत्तर पुस्तके लिहून काढली होती त्याचा त्यांना ऊपयोग होत होता. नाशिकला त्यांचे कायमचे वास्तव्य झाल्यानंतर ते रामभक्तीकडे वळले. सर्व देशभर रामायणावर प्रवचने देत ते प्रवास करीत.

१९३० मध्ये पलुस्कर नेपाळला रामायणाच्या प्रवचनासाठी गेले परंतू तो प्रवास त्या काळी फारसा सुखसोयीचा नव्हता. त्या प्रवासाचा त्यांना खूप शीण झाला. नेपाळहून आल्यावर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. ही बातमी मिरजेचे अघिपती श्री. बाळासाहेब पटवर्धन ह्यांच्या कानावर जातांच जून १९३१ मध्ये त्यांनी पलुस्करांना औषधोपचारासाठी मिरजेला नेले. आणि त्या सा-यांचा काहेही ऊपयोग न होता ह्या महापुरूषाने २१ आगष्ट १९३१ मध्ये आपला देह टाकला. आयुष्याची सुरूवात जिथे झाली तिथेच ईश्वराने त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आणले. हाही एक योगायोगच म्हणायचा!

--शशिकांत विष्णु पानट
Thousand Oaks CA. 91320 USA

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख!

कुमार गंधर्वांचे गुरु बी. आर. देवधर. त्यांचे गुरु पलुस्कर. देवधरांच्या 'थोर संगीतकार' या पुस्तकात त्यांच्या 'गुरुजींवर' छान चरित्रलेख आहे. त्याची आठवण झाली.

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्यासारखी संगीताची चाकोरी सोडून एक आगळीवेगळी वाट निर्माण करणारी द्रष्टी मंडळी फारच थोडी. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा सुंदर लेख.
मनापासून धन्यवाद.

पलुस्करांचे कार्य खरोखरीच अनेक दृष्टीने मोठे आहे.. या लेखातून त्याचा सुंदर आढावा घेतला गेला आहे. लेख ईथे दिल्याबद्दल अनेक आभार!

लहानपणी गंधर्व महाविद्यालयात परीक्षा द्यायला जायचे ... खरच त्याना खूप मोठे क्रेडिट जाते गाण्याला समाजांत मानाचं स्थान मिळवून देण्यासाठि

उत्तम लेख आहे. शशिकांत पानट यांचे आभार! Happy

पंडितजींनी 'वंदे मातरम'ला चाल लावली होती त्याची आठवण झाली. तसेच इ.स. १९१५ पासून काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरम गायची पद्धत त्यांनी सुरू केली होती. इ.स. १९२३ च्या काकीनाडा येथल्या काँग्रेस अधिवेशनात महमंद अली (कोणाचा मित्र ओळखा पाहू!) याने त्या गायनावर आक्षेप घेतला. पंडितजींनी त्यास जराही भीक न घालता गायन पूर्ण केले.

त्यांच्या नावे मुंबईला गिरगावात 'पंडित पलुस्कर चौक' (जुना ऑपेरा हाउस) आहे.

-गा.पै.

पलुस्कर आमचे शेजारी .... गेल्या महिन्यात आम्ही एकरूप झालो .. ( आमच्यामधली भिंत पडली !) Proud

आठ दिवसापूर्वी गावात पलुस्कर आणि भू गंधर्व रहिमतखॉ संगीत रजनी झाली .. कुणीतरी पुण्याचे गायक आले होते. छान कार्यक्रम होता.