''यदाकदाचित''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 21 August, 2012 - 02:51

तडफडताना हसणे सुद्धा यदाकदाचित
जमेल खोटे रडणे सुद्धा यदाकदाचित

शिकून झाले तिळतिळ मरणे या देहाचे
जमेल आता जगणे सुद्धा यदाकदाचित

तारस्वरातच ओरड केली आयुष्याची
जमेलही कुजबुजणे सुद्धा यदाकदाचित

रडले माझ्या प्रेतावरती कालच....त्यांना
रुचेल माझे नसणे सुद्धा यदाकदाचित

अस्तित्वाची खूण तुझी ''कैलास''नसावी
जमेल मागे उरणे सुद्धा यदाकदाचित

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तारस्वरातच ओरड केली आयुष्याची
जमेलही कुजबुजणे सुद्धा यदाकदाचित

रडले माझ्या प्रेतावरती कालच....त्यांना
रुचेल माझे नसणे सुद्धा यदाकदाचित <<<

सुंदर व वेगळे शेर

सर्वच शेर बर्‍यापैकी आवडले

आपले इथे बर्‍याच दिवसानी येणे खूप आवडले .धन्यवाद

शिकून झाले तिळतिळ मरणे या देहाचे
जमेल आता जगणे सुद्धा यदाकदाचित> वा

तारस्वरातच ओरड केली आयुष्याची
जमेलही कुजबुजणे सुद्धा यदाकदाचित> सुंदर खयाल आहे हा

रडले माझ्या प्रेतावरती कालच....त्यांना
रुचेल माझे नसणे सुद्धा यदाकदाचित
>> वास्तव!

मस्त गझल डॉक!

'यदाकदाचित'चा अर्थ 'if perhaps' (मराठीत 'जर चुकूनमाकून') असा होतो.
(उदा. : यदाकदाचित मी तिथे आलेच तर तुम्हाला कळवेन.)
या गझलेत यमक हे 'कदाचित' या अर्थी येतंय सगळ्या शेरांमधे - 'यदाकदाचित' या अर्थी नव्हे.)

रडले माझ्या प्रेतावरती कालच....त्यांना
रुचेल माझे नसणे सुद्धा यदाकदाचित

छान शेर.

या गझलेत यमक हे 'कदाचित' या अर्थी येतंय सगळ्या शेरांमधे - 'यदाकदाचित' या अर्थी नव्हे.)
<<<

बाई, हे पटले नाही. तुम्ही यदाकदाचित या शब्दाचा जो अर्थ (चुकुनमाकुन - असा) सांगता आहात तो योग्यच, पण याच गझलेत यदाकदाचित या रदीफेऐवजी 'चुकूनमाकुन' अशी रदीफ कल्पून पाहा, सर्व शेर सुलभच वाटावेत.

(कदाचित असे तर नाही, की 'कदाचित' या अर्थाच्या अपेक्षेने आपण 'यदाकदाचित' हा शब्द वाचत गेला असावात)

Happy

>> यदाकदाचित या शब्दाचा जो अर्थ (चुकुनमाकुन - असा)
नाही. 'जर' चुकूनमाकून असा. त्या 'जर' (यदा)चं काय? Happy

अच्छा, माझेच वाचताना मिस झालेले दिसते. तुम्ही 'चुकूनमाकून' असे म्हणत नसून 'जर चुकूनमाकून' असे म्हणत आहात. पण मला वाटते की यदाकदाचितचा अर्थ नुसताच चुकुनमाकुन असाही होतोच! Happy

हो पण यदाकदाचित या शब्दाचा अर्थ जर 'जर चुकूनमाकून' असा होत असेल आणि त्यातील 'यदा' हे तुम्ही (म्हणजे सगळेच) 'जर' या शब्दापुरते घेत असतील तर कदाचित (या उरलेल्या भागाचा) मधून 'चुकूनमाकून' ही छटा येत नाही ना? Happy

>> यदाकदाचितचा अर्थ नुसताच चुकुनमाकुन असाही होतोच!
माझ्या माहितीनुसार नाही होत.

डॉक्टर, तुमचा धागा हायजॅक करत असल्याबद्दल क्षमस्व. Happy

बेफी, perhaps असाच अर्थ त्या 'कदाचित'चा आहे. संपूर्ण शब्दप्रयोगाच्या जवळपास जाणारा म्हणून (ज्या पद्धतीने मराठीत वापरलेला पाहिला आहे त्यानुसार) 'जर चुकूनमाकून' असा पर्याय दिला होता.

'यदाकदाचित आपण भेटलोच तर हे अधिक सविस्तर बोलू' या वाक्याचा अर्थ 'आपलं भेटणं निश्चित नाही. कदाचित भेटूही. जर भेटलो(च) तर हे अधिक सविस्तर बोलू' इतका सगळा होतो. Happy

कदाचित - होण्याची शक्यता

यदाकदाचित - जमलेच तर (होण्याची शक्यता कदाचितपेक्षा'ही' कमी, पण काहीतरी विशिष्ट कारण - जे अस्तित्वात येणे बरेच शक्य आहे - असे घडले तर हमखास होणार)

चुकूनमाकून - होणार नाहीच आहे, पण अगदीच काही विशेष घडून झाले तर झाले

मला या छटा अश्या वाटतात Happy

माझ्या माहितीनुसार नाही होत<<<<

वरील छटा (मीच) लिहिल्यानंतर तुमचे म्हणणे मान्य आहे की नुसताच 'चुकूनमाकून' असा अर्थ होत नाही

हम्म्म्म्म

यदाकदाचित या शब्दाचा अर्थ 'जर चुकूनमाकून' असा घेतल्यास शेर गडबडतात हे पटलेच (म्हणजे पहिल्याच प्रतिसादात पटले होते) Happy फक्त यदाकदाचित (अनेकदा बोलताना) 'एखादवेळेस' या अर्थाने बोलले जाण्याचा, बोलण्याचा अनुभव असल्याने मला यदाकदाचित हे योग्य वाटत आहे. (काही वेळा असे म्हणतात. 'यदाकदाचित जमेलसुद्धा! यात त्या यदाकदाचितला 'एखादवेळेस' ची छटा दिली जाते, पण कदाचित हे फक्त बोलतानाच होत असावे, माहीत नाही)

(कैलासराव, 'सुद्धा' हा शब्द आधीच्या शब्दाला जोडून मात्र हवा)

स्वातीताई, आपले म्हणणे मान्य आहे.... यदाकदाचित = जर कदाचित......

जमेल खोटे रडणे सुद्धा यदाकदाचित= जर खोटाखोटा रडलो तर असे रडणे कदाचित जमेल सुद्धा

बाकीच्या ओळी सुद्धा आपण अश्याच अर्थाने वाचल्या तर यदाकदाचित ची समर्पकता जाणवेल...

डॉ.कैलास गायकवाड

वाद बरेच टाप्पे टोणपे खावून इथवर आलेलाच आहे तर मी एक बाब नमूद करू इच्छितो
(माझे अगाध ज्ञान (स्वयम्घोषित!!) पाजळण्याची एक सन्धी.दिल्याबद्दल आधी धन्यवाद .......;))

यदा या शब्दाचा एक अर्थ 'जेन्व्हा' (when) असाही होतो(यदा यदाहि धर्मस्य..........)
कदाचित चा अर्थ ' केन्व्हा(कदा).तरी....शक्यतो !!' (then ..if it's possible)असा आशादर्शक काढला जातो [या ठि़काणीतरी]
जेन्व्हा केन्व्हा हे असे होणे शक्य होईल तेन्व्हा =कधीनकधीतरी हा मराठीतला अर्थ मलातरी योग्य वाटत आहे मी तरी तो असाच काढला आहे

एकुणात....कधीनकधीतरी असे होईल हा या रदिफेचा अभिप्रेतार्थ आहे तो १००% बरोबरच आहे

वृत्तात बसवायचा झाल्यास कधिनकधीतर हे जास्त गोड वाटते(वैयक्तिक मत)

धन्यवाद
-वैवकु

____________________

वर मी माण्ड्लेला मुद्दा कृपया खालील शेरातून अनुभवून पहावा............

शिकून झाले तिळतिळ मरणे या देहाचे
जमेल आता जगणे सुद्धा कधिनकधीतर

पुनश्च धन्यवाद Happy

रडले माझ्या प्रेतावरती कालच....त्यांना
रुचेल माझे नसणे सुद्धा यदाकदाचित

वाह !
मनात रुतला हा शेर थेट !

.