विषय १- रुपेरी पडद्यावरील शेवटची कृष्णधवल ललितकृती- 'सरस्वतीचंद्र '

Submitted by भारती.. on 20 August, 2012 - 06:36

रुपेरी पडद्यावरील शेवटची कृष्णधवल ललितकृती- 'सरस्वतीचंद्र '

काय असतं प्रेम म्हणजे? वयात आल्यापासून शरीर करीत असलेला आसक्तीचा उच्चार? माणसाने आपल्या नैसर्गिक प्रेरणेला दिलेलं एक गोंडस नाव? वंशसातत्यासाठी निसर्गाने निर्माण केलेलं मृगजळ? जे आयुष्यभर भुलवतं कथानकांच्या रुपात, उमलतं परिमळतं कवितांच्या आत्म्यात? धुंद भोवरे रेखतं गाण्यांच्या पाण्यात ? अनंत तरंग उमटवतं जे रुपेरी पडद्यांवर फिल्मी अंदाजाने ? देश,काळ ,स्थळांच्या मर्यादांना नामोहरम करतं जे,ते प्रेम..मनस्वी व्यक्तीसाठी जे आजच्या जगातही कदाचित अगदी एकदाच नसेल,पण क्वचितच जुळून येतं,आयुष्यावर आपली तप्तमुद्रा उमटवतं ते..

त्या प्रेमाची एक अत्यंत भारतीय चित्रकथा- सरस्वतीचंद्र.

' सौ साल पेहलकी बात है..' तिचा आज काय अन्वय? जीवन इतकं वितरण तत्त्वांनी ,विपणन कौशल्यांनी ग्रस्त झाल्यावर? नीतीमूल्ये इतकी बदलल्यावर? रोजचे मथळे वाचून, चॅनेल्सचा रंगीबेरंगी मारा अन कचरा साहून झाल्यावर आपली काय बिशाद या जुनाट कालबाह्य सिनेमाच्या नावाचाही उल्लेख करण्याची?

आहे! माझी इच्छा आहे त्या प्रेमाच्या शोकात्म स्फटिकीकृत कहाणीला पुनः आठवण्याची, जागवण्याची. नूतनजींनी अभिनीत केलेल्या कुण्या एका कुमुदसुंदरीचा तिच्या काळातला हा मनस्वी जीवनप्रवास भारतीय स्त्रीच्या आत्मचरित्रात अजूनही कुठे ना कुठेतरी प्रतिबिंबित होतो,कधी विझून जातो,कधी झगमगून जातो.मनीष या अल्पजीवी अभिनेत्याने रंगवलेला उत्कट सरस्वतीचंद्र प्रेमातलं ते अटळ नैराश्य पचवून जगायला पुनः सिद्ध होतो /सिद्ध करतो...

'सरस्वतीचंद्र ' लिहिली गेली एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. विसाव्या शतकाच्या पहाटे.गोवर्धनराम त्रिपाठींची गुजराथी महाकादंबरी. गोविंद सरैयांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतीय चित्रसृष्टीतला शेवटचा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट. वर्ष १९६८-६९. अनेकार्थांनी एक मैलाचा दगड म्हणावा असा सिनेमा..त्यातली प्रेमाची त्यागावर आधारित व्याख्या. एक स्मरणशिल्प होऊन काळप्रवाहाच्या किनार्‍यावर थांबलेली कहाणी.

व्यक्तिगत आयुष्यात लहानपणीच आईच्या प्रेमाला पारखा झालेला ,सावत्र आईच्या डोळ्यात खुपणारा सरस्वतीचंद्र .तत्त्वनिष्ठ,,नवविचारांनी भारलेला.नवशिक्षणाच्या संस्कारांनी समृद्ध कवीमनाचा. वडिलांनी ठरवलेले लग्न त्याला मान्य नाहीय. सधन सात्त्विक मातापित्यांच्या छायेखाली वाढणारी त्याची वाग्दत्त वधू कुमुदसुंदरी मात्र त्याच्यासाठी एक गोड आश्चर्य आहे.त्याच्या पत्राला ती उत्तर देते चक्क अन किती काव्यमय-'फूल तुम्हे भेजा है खतमे' -मुग्ध तरीही धीट प्रेमाचा त्या काळात नक्की थरारून टाकणारा आविष्कार..

saras3.jpg

'खतसे जी भरताही नही अब नैन मिले तो चैन मिले'-एखादी कमलकळी उमलत जावी तशी दोघांची पर्युत्सुकता. आधुनिक विचारांनी भारलेला सरस्वतीचंद्र आता दूर राहूच शकत नाही! नियोजित वधूगृही येऊन पोचतो अन थोड्याशा धिटाईचे रोमांचक क्षण दोघेही अनुभवतात..पुष्करिणीवर पहुडलेलं चांदणं आणि रात्रीच्या शीतल झुळुकांमध्ये डोलणारी कमळं हीच काय ती साक्षीला.कठोर कर्तव्यपालन अन ध्येयवाद ,घरातली प्रेमशून्यता यातून घडलेला सरस्वती इथे आपल्या पहिल्या अन एकमात्र उत्कट प्रेमाचा आविष्कार करतोय कुमुदकडे..या प्रेमात आसक्तीचे तीव्र प्रकटन आहे 'ये काम-कमान भवैं तेरी पलकोंके किनारे कजरारे..माथेपर सिन्दूरी सूरज होठोंके दहकते अंगारे'.. पण हे फक्त शारिरीक प्रेम नाही.एका उदात्त अन अभावग्रस्त आत्म्याला एक निरागस प्रेममय किनारा मिळालाय.'तनभी सुंदर मनभी सुंदर तू सुंदरताकी मूरत है. .किसी औरको शायद कम होगी मुझे तेरी बहुत जरूरत हैं ' असं विधान त्याने केल्यावर कुमुद सर्वांगी शहारतेय,मोहरतेय. हे मोहरणं नूतनच व्यक्त करू जाणे.. आसक्ती अन अशरीर पवित्र प्रेमाचे रंग एकमेकात मिसळताहेत.. या चित्रपटातील सर्वच गीतांप्रमाणे 'चंदन सा बदन' हे गीतही कथानकात गोडव्यासारखे विरघळलेले अमर आत्मसंगीत.मुकेशजींच्या या गीतात लागलेल्या आवाजातली अवीट गोडी लताच्या याच बोलांवरच्या गीतावरही मात करणारी,अतीव आकर्षणाच्या संयमी प्रकटनाबरोबरच खोल शोकात्म असा हा आवाज पुढल्या अनर्थांची इषत-सूचना देतो जणू.

saras6.jpg

मग खंडित होतो हा स्वप्नकाळ.सावत्र आईच्या जाचाने ,कारस्थानांमुळे सरस्वतीचंद्राला घर सोडावे लागतेय..कुमुदला आपल्याला विसरण्याचे पत्राद्वारा विनवून तो पुनः भरकटतोय दिशाहीन..इकडे कुमुदला लग्नाआधीची प्रेमपत्रे अन प्रेमालाप कलंकित करताहेत.आईवडील नाईलाजाने व्यसनी व्यभिचारी जमीनदार प्रमादशी तिचं लग्न लावून देतात. दुर्दैवाचे दशावतार स्त्रीच्या अथांग सहनशक्तीच्या बळावर पचवू पहाणार्‍या कुमुदवर अजून एक वज्राघात! सरस्वतीचंद्र तिच्या सासरच्या घरी येऊन पोचतो योगायोगाने 'नवीनचंद्र' असे अज्ञातवासीय नाव धारण करून. नियतीने दूर नेलेले दोन प्रेमी जीव पुन; एका छ्ताखाली पण विपर्यस्त परिस्थितीत.अभिमानिनी कुमुद आपल्या वैवाहिक जीवनाचे धिंडवडे अतिथी म्हणून अलेल्या सरस्वतीपासून लपवायचा प्रयत्न करते.'मैं तो भूल चली बाबूलका देस' लतादिदीने अमर केलेल्या गोड गुर्जर सुरावटीमध्ये गृहच्छिद्र अन आसू लपवत सण साजरा करणारी कुमुद.पण दोघांमध्ये मधल्या अंधारकाळाबद्दल किती संवाद राहून गेलाय..तो अटळपणे जुळताना पुनः गैरसमज,कलंकभय,नवर्‍याने दावेदारासारखा साधलेला ब्लॅकमेलचा डाव.या सगळ्यातून वाट काढत वहाणारी एक निरामय शोकात्म प्रेमाची निर्झरिणी.

आता कुमुद घरातून माहेरी पाठवली गेलीय बदनाम होऊन. अन आत्महत्येच्या प्रयत्नात संन्यासिनींच्या हाती लागलीय.तिचं मन मोठ्या कष्टाने सावरत असताना आयुष्यात तिसर्‍यांदा सरस्वतीचंद्र या भ्रमंतीत तिला भेटतोय नियतीच्या क्रूर थट्टेसारखा..आज मात्र आपल्या कायम दडपल्या गेलेल्या प्रेरणांवर ताबा ठेवणं तिला जड जातंय.'मेरा बैरागी मन डोल गया' ती निद्रिस्त सरस्वतीचंद्रासमोर कबूल करतेय..आसक्ती अन परावृत्तीच्या छाया पडछायांची ही पाठशिवण चित्रपटभर आहे. भारतीय अंतर्मनातले नीती अनीतीचे स्थलकालसापेक्ष आंदोल.
पण तिला माहिती नाहीय की ती विधवा झालीय. तिला हे सांगायचं काम त्याच क्रूर नियतीने सरस्वतीवर सोपवलंय.

आता तसा समाजाचा विरोध कमी झाल्यासारखा वाटतोय. नवमताचे वारे त्यांना नव्या भविष्याकडे न्यायला तयार आहेत.कुमुदच्या सासरमाहेरच्या घरातले वडीलधारे,सरस्वतीचंद्र व कुमुदसुंदरीला वेगवेगळ्या टप्प्यावर आधी आश्रय नंतर आशिर्वाद देणारे मठातले संन्यासी संन्यासिनी सगळे आता सिद्ध आहेत या दु:खी चिरविरही प्रेमिकांना एकत्र आणायला.

पण..

स्त्री नावाचं कोडं अन त्यातून भारतीय स्त्री.अभावांचं प्रभावात रुपांतर करणारी. तर कुमुदसुंदरी आता लहानग्या आईवेगळ्या दीराचे संगोपन करायला सिद्ध झालीय.त्याग आणि त्याग !दुसरं काही उरलेलं नाही तिच्या जीवनात. ती सरस्वतीला आपल्या लहान बहिणीशी, कुसुमसुंदरीशी लग्न करायला विनवते.नाहीतरी पहिल्या भेटीत तो खोडकर कुसुमलाच तर कुमुद समजला होता !कुमुद त्याचा त्रागा हळूवारपणे निपटून काढते. अली रझांनी लिहिलेली पटकथा इथे चरमबिंदूला पोचते. गीतकार इंदीवरजींची लेखणी नवे आव्हान उचलते.'छोड दे सारी दुनिया किसिके लिये ये मुनासिब नही आदमीके लिये.."शुभ्रवस्त्रांकित संन्यासिनी उघड्याबोडक्या डोंगरमाळांमधून सरस्वतीचंद्राच्या मागून धावत त्याला विनवतेय. 'तनसे तनका मीलन ना हो पाया तो क्या, मनसे मनका मीलन कोई कम तो नही'..सगळ्या कथानकाचा मथितार्थ इंदीवरजी लिहून गेलेत..'खुशबू आती रहे दूरही से सही, सामने हो चमन कोई कम तो नही..' प्रेमाचा नवा अर्थ,नव्या संदर्भात जीवनाचा स्वीकार.लताच्या आवाजाला शोभणारा स्वरालंकार.जराही बोजड न होता अंतरात्म्याला स्पर्शणारे एक उपदेशपर गीत.
saras1.jpg

का? एका आदर्शवत प्रेमाच्या वाट्याला तडजोडीचे हे उदात्तीकरण का ?

विसाव्या शतकाच्या पहाटे बदलत आहेत ते फक्त बाह्य आविष्कार.आणि आजही शहरे महानगरे सोडल्यास दिसते ते काय ? ते प्राचीन भारतीय अंतर्मन अजूनही अविचलित आहे.मध्ययुगात पोसलेले स्त्रीच्या दमनाचे,पावित्र्याचे स्तोम तसेच आहे.ही फितुरी बाह्य सामाजिक संप्रेरकांइतकीच आतूनही आहे.कुमुदच्या छिन्नभिन्न मनात शृंगाराला जागा उरलेली नाही..ती मूल न प्रसवताच सगळ्यांची आई झालीय-सनातन आई-त्याग करणारी,कुटुंबाची प्रतिष्ठा आपल्या वैयक्तिक सुखापेक्षा मोठी मानणारी. मोठा विवाद,सामाजिक टीका टाळणारी.

कथानकाच्या सुरुवातीला सरस्वतीचंद्र समाजसेवा करण्यासाठी विवाहाला तयार नाहीय,तसं पत्र तो कुमुदला लिहितो.. कथानकाच्या शेवटी कुमुद तिच्या प्राणप्रिय सरस्वतीला नाकारतेय.जीवनात स्वीकारून प्रेमात नाकारतेय.

या कहाणीचे नाव सरस्वतीचंद्र.पण त्यात कुमुदसुंदरीचे रंग आभाळभर कधी होत जातात कळतच नाही..नूतनच्या कृष्णधवल चित्रपटांतील उज्ज्वल कारकीर्दीवरचा हा शेवटचा मानाचा शिरपेच ..वयाची तिशी नक्कीच ओलांडलेल्या नूतनने एका स्त्री-चरित्रातली रूप-भाव-स्थित्यंतरे तिच्या अमोघ अभिनयाच्या बळावर लीलया पेललीत. खरं तर हा सगळा सिनेमा तिने आपल्या 'समर्थ' बाहूंवर वाहून नेलाय .त्याच वर्षी रिलीज झालेल्या रंगीत 'आराधना' आणि 'दो रास्ते' या ब्लॉकबस्टर चित्रपटांना भारी पडलेला असा हा कथानकप्रधान सिनेमा यशस्वी करण्याचं निर्विवाद श्रेय नूतनचं.तिचा प्रणय,तिचं घरंदाजपण, तिची असहाय घुसमट,तिचा आकांत. ती,ती,ती.

एक उल्लेख केल्याशिवाय रहावत नाहीय. 'नूतनच्या अंगाला चंदनाचा सुगंध निसर्गतःच होता' -हे शोभना समर्थ अन तनुजानेही नूतनच्या संदर्भात वारंवार केलेलं विधान. ती वारल्यावरही हा सुगंध भोवती घोटाळे तेव्हा तिचा आत्मा भेटीला आलाय असे शोभनाबाईंना जाणवे !!.. ती एक योगभ्रष्ट नि:संग व्यक्ती होती असं शोभनाबाईंनी लिहिलेलं आठवल्यावर 'चंदनसा बदन' हे गाणं नूतनवरच चित्रित होण्यातला व ही भूमिका तिचं सोनं होण्यासाठी नूतनलाच मिळण्यातला विधीसंकेत कळतो! एरवी त्या भूमिकेसाठी निम्मीचा विचार चालला होता असं दिग्दर्शक गोविंद सरैयांनी मुंबई समाचारला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. तो अनर्थ टळला हे किती चांगले झाले! असो.

त्या तुलनेत सरस्वतीचंद्र झालेल्या मनीषचा अभिनय अगदी फिका,काहीसा अवघडलेला,त्याच्या ज्ञात हिंदी कारकीर्दीतला एकमात्र..पण पुनः नूतनच्या झंझावाताशेजारी हे सौम्यरंग खुलून दिसतात. त्याच्या मूळ कादंबरीत अभिप्रेत असलेल्या व्यक्तिरेखेशी सुसंगत वाटतात.शेवटी त्यागाच्या वेदीवर बळी गेलेलं त्याचं नाराज प्रेम आपली सहानुभूती मिळवून जातं . हे सगळं असं साजरं होतं याचंही कारण नूतनच पुनः!! ती,ती,ती.

saras5.jpg

कशाकशाबद्दल लिहावं? नायक नायिकेचा अभिनय? साहित्यमूल्यांनी ओतप्रोत संवाद व गीते? लतादिदी व मुकेशजींच्या झुळझुळत्या स्वरांनी नटलेले स्वर्गीय संगीत? कृष्णधवलतेतही फुटून फुटून वहाणारे प्राचीन सधन गुजराथी वाड्यांच्या महालांच्या ,तलावांच्या सुशोभित पाळ्यांच्या नेपथ्यातील सुंदरतेचे झरे ? नरिमन इराणींच्या या भव्य बॅकड्रॉप्सनाही त्या वर्षी- १९६९ - राष्ट्रीय बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसंच अली रझांच्या संवादांना फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.गोविंद सरैया पुनः अशी निर्मिती करू शकले नाहीत.

अशी ही एक अमर प्रेमकहाणी.लौकिकार्थाने अपूर्ण प्रेमाचं उन्नयन चितारणारी.दुष्टतेशी सुष्ट तत्त्वांनी केलेला प्रतिकार.नियतीने पदरात टाकलेल्या पराभवांच्या पैलतीरावर जाणं.विशाल होताहोता मुक्त होणं. याला जीवन ऐसे नाव..गुजराती साहित्य विश्वातील या महाकादंबरीला रुपेरी पडद्यावर तोलामोलाने आणणारे श्रेष्ठ दिग्दर्शक,कलाकार ..गीतकार इंदीवरचा शब्द शब्द भाववृत्तींचे सूक्ष्म रंगतरंग चितारणारा.. संगीतकार कल्याणजी आनंदजींनी त्या शब्दांवर अजरामर स्वरांचं गारूड केलेलं..त्यासाठी त्यांनाही त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला ..पुरस्कार दरवर्षी मिळतातच, पण अभिजात कलाकृतीची निर्मिती नेहमी होतेच असे नाही.

या शेवटच्या कृष्णधवलपटाने एका सिनेयुगाचा अस्त परमोच्च पातळीवर जाऊनच दिमाखाने केला.

कथेतलं तत्त्वकाव्य हरवू न देता अवीट गोडीचा 'सरस्वतीचंद्र' भुरळ घालतच रहातो ...

भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर!!!

निव्वळ अप्रतिम!

खुप लहान असताना पहिला होता, या निमीत्ताने आणि तुमच्या लेखाच्या पार्श्वभुमीवर पुन्हा पहावासा वाटतो आहे!

लेख आणि प्रतिक्रीया दोन्ही खुप सुंदर!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! Happy

अप्रतिम लेख.
बेफींशी सहमत.
सरस्वती चंद्र लहानपणी पाहिलेला अंधुकसा आठवतोय. पण गाणी सगळी अप्रतिम नी संपुर्ण तोंड्पाठ आहेत. लेख वाचुन पुन्हा पहावासा वाटतोय.

खूप आभार कौतुक,सखी,सस्मित.या सिनेमाचं अपील माझ्यासाठी सूक्ष्म सूक्ष्म स्तरांपर्यंत पाझरत जाणारं होतं. त्याच्या त्रुटींसकट. ते पोचवण्याचा हा प्रयत्न होता..

फारच सुरेख लेख... अगदी त्या सिनेमातल्या हिंदी येवढाच शुध्द मराठीत लिहिलेला... एकही शब्द वावगा नाही.

ह्या सिनेमाची आठवण म्हणजे " मै तो भुल चली " ह्या गाण्यावर आम्ही शाळेच्या कार्येक्रमात नाच बसवला होता. ते गाणं त्या काळात प्रचंड हीट होत. सगळीच गाणी.

नुतनच्या नवर्‍याची भुमिका रमेश देव ने केली होती. त्यात तो दारुडा आणि बाहेरख्याली दाखवला आहे.

सुंदर. खास करून आपली लेखन शैलीच खुप छान आहे.

हा चित्रपट तर आवडीचा आहेच. आणि त्यातील अप्रतिम गाणी देखिल. इंदीवर यांच्या उल्लेखासाठी खुप खुप धन्यवाद. कारण माझ्या अनुभवाप्रमाणे कोणत्याही चित्रपट लेखामध्ये त्यातील स्टार मंडळीनाच अधिक महत्व दिले जाते. पटकथकार-संगीतकार हे ही असतातच परंतू गीतकारच्याच ओळीला पळी-पोळी चुकते. असो.

आसक्ती अन परावृत्तीच्या छाया पडछायांची ही पाठशिवण इ. वाक्यरचना आणि,

प्रेमाच्या वाट्याला तडजोडीचे हे उदात्तीकरण का ? ----> इ.लेखनाच्या अनुषगाने मधे मधे सहज आलेले प्रश्न म्हणजे वरवर साध्या वाटनार्‍या विषयाला अधिक खोल जाऊन पहाण्यास एखाद्या तत्वचिंतकास नक्कीच प्रवृत्त करतात.

_________ या चित्रपटतील गाणी,मुकेशचा स्वर या बद्द्ल काय सांगावे?

तेरे सुर मे हमने जब ये जिंदगीके सुर पाये,
पता न चला कब, कणकणमें हम बिखर गए|
.... इतकेच म्हणू शकतो.

................. सुधाकर..

अप्रतिम लिहिलेय..
खरे तर न पाहिलेल्या आणि ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटावरचा लेख म्हणून प्रतिक्रिया पाहूनच वाचायचा की नाही हे ठरवूया असा विचार केला होता.. पण आज रविवारी निवांतपणे लेख वाचण्यासाठी काढलेल्या वेळात हा वेळ अगदी वसूल झाला.. खूपच छान..

सुधाकर,अगो,श्री,अभिषेक, धन्यवाद.

होय सुधाकर,तुमच्याशी सहमत. भल्याभल्यांना सर्वसर्व माहीत असतं पण गीतकार कित्येकदा माहीत नसतो, अनुल्लेखित असतो.. त्याला पुरेसं श्रेय देण्याची पद्धतच नाही.. अगदी गाण्यांवर भारावून बोलणारी लिहिणारी मंडळीही बहुधा संगीतकार,गायकांवरच्,पडद्यावरच्या अभिनेत्यांच्या मुखाभिनयावर जास्त बोलतात.

याची खंत आपण कवीमंडळींनी नाही करायची तर कोण करणार :((

श्री,अभिषेक,अगो, खरं आहे ,ब्लॅक अँड व्हाईट शी रिलेट करण्यापासून आपण दूर दूर चाललोय पण जुनं साहित्य/सिनेमा असंच कधीतरी निवांतपणे एखाद्या खजिन्यासारखं मानवी भावभावनांची श्रीमंती उलगडून दाखवतं (उदा. शरदचंद्रांच्या कादंबर्‍या ..) तेव्हा आपण स्तिमित होतो..

रोमातून वाचत होतो. आज सर्वांना प्रतिसाद देण्यासाठी लॉइन केले आहे

तुमचा हा लेख शाम ह्यांच्या प्रोजेक्टर सार्खा दर्जेदार आहे, माझ्या निवडक १० मधे, आणखीन काही बोलावे काय?

आणखीन काय बोलणार? मी वाचक, खूप आभार.

कालबाह्य काही नसतेच, विस्मरणात जातात अनेक सुंदर कलाकृती .तिन्ही काळांच्या पटावर आपली जाणीव खेळत ठेवणे..शंभर वर्षांचा आढावा घेण्याची ही श्रीशिल्लक.

Pages