"भोलागडी"

Submitted by श्रीमत् on 18 August, 2012 - 07:47

“ बोरणे” सातारा जिल्ह्यातील छोटेसे खेडे पण आज आदर्श ग्राम पुरस्कारामुळे जिल्ह्यात नावारुपाला आलेलं. गाव तसं छोटसच पणं निसर्गरम्य. परळी पासुन पुढे घाट रस्त्याने सज्जणगडला वळसा मारुन गेल की रस्त्यावरच बोरण्याची वेस खुणावते. गावात जेमतेम ८०-९० घरं. त्यात गाव दोन आवाडात विभागलेल. वरच आवाड आणि खालच आवाड. रस्त्याला लागुनच जिथुन एसटी वळते तिथे पिठाची गिरणी जिच्या चिमणीचा सतत होणारा कुक्क कुक्क आवाज गावच्या निरामय शांततेत एक वेगळाच नाद ऊमटवत असतो. तर वरच्याच बाजुला पाण्याची टाकी आणि तीसं एक घरं तिथुनच अजुन वर गेल की डोंगराच्या घळीतच विसावलेल ऋषी आईच देवस्थान. गावच्या यात्रेच्या वेळी तळातल्या केदारेश्वराच्या मंदीरापासुन ऋषी आईच्या घळीपर्यंत आब्दागिर्‍या नाचवत आणि नवसकरयांचे दंडस्तान घालत जाण्याची प्रथा आहे. मग तिथे पोहचलं की गावच्या “नानु” गुरवाच्या अंगात ही ऋषी आई येते व गावावर येणारया संकटाची पुर्व कल्पणा देते असा ग्रामस्थांचा समज. आणि कित्येक वेळेला ऋषी आईने दिलेल कौल तंतोतत बरोबर लागले असल्यामुळे त्रुषी आईच्या निर्णया विरुध जाण्याची कोणाचीच टाप नसते. आणि तसे कोणी केल्याचा प्रयत्न केलाच तर गावचं पंच मंडळ त्याला योग्य ती शिक्षा देते.

खालच्या आवाडात केदारेश्वराच कौलारु मंदीर.गाभार्‍यात केदारेश्वराची कातळात कोरलेली ठाशीव कोरीव मुर्ती आणि तिला लावलेल पांढरे भोर डोळे. मंदीराच्या गाभार्‍यात बसुन कुठुनही पाहील तरी देव आपल्याकडेच पाहात आहे अस प्रत्येकाला वाटणार. मंदीराच्या मधोमध फार पुर्वी कुणी तरी नवसकर्‍याने वाहीलेली पितळेची घंटा जी आजही तीन्ही प्रहर नानु गुरव वाजवतो. गावात एखाद चांगल वा वाईट काही झाल तर घंटेच्या विशिष्ट टोलांवरुन लोकांना घटनेचा अंदाज येतो. मंदीराच्या बाहेरच करुणं नजरेणे देवाकडे पाहणारा नंदी आणि त्याच्या गळ्यात दगडातच कोरलेली घंटा पाहुन आपोआप आपला हात त्याच्या पाठीवरुन फिरवला जातो. नंदीच्या थोडं बाजुलाचं धाग्यांचा कंबर-पट्टा घातलेलं आणि आपल्या पारंब्या अस्ताव्यस्त सोडलेलं वडाचं मोठ्ठं झाड आहे. ज्याला गावातले जुने-जाणते लोक आज्याबा (आजोबा) असे संबोधतात.ते नक्की किती जुनं आहे याच्या गप्पा त्याच्याच सावलीत पारावर बसुन पान तंबाखु खात जुनी जाणती मानसं मोठ्या अभिमानाने रंगवतात.

चौथरा ऊतरुन खाली गेल की सिमेंटचा कायमस्वरुपी बांधलेला रंगमंच जिथे जत्रेत दिवसा तमाशाचा फड आणि रात्री गावातल्याच पोरांचं एखाद नाटक असतं. तिथुनच जरा पुढे उजव्या हाताला वळुन सरळ चालत गेलं कि पुढं कुस्त्यांच मैदान जिथे यात्रा भरण्याच्या दिवशी संध्याकाळी कुस्त्यांना सुरवात होते. अगदी पाच वर्षाच्या गण्यापासुण चाळीसीला पोहचलेले खाशाबा सर्वजण आपआपले दंड या रांगड्या मातीत थोपटवतात.सुरवात नारळाच्या कुस्ती पासुण होते ती नंतर हजारांच्या आणि ईभ्रतीच्या घरात पोहचते.मग त्यात गावातल्याच एखाद्या बहाद्दराने जर द्सर्‍या गावातल्या एखाद्या नामचीन मल्लाला आभाळ दाखवलं तर गुलाल ऊधळत बैलगाडीतुन पठ्याची जंगी मिरवणुक ठरलेली.

जत्रेच्या रात्री देवाच्या सासण काठ्या नाचवत ऋषी आईचा छबीना गावतल्या मंदीरापासुन निघतो. गावातल्या प्रत्येक घरासमोरुन फिरत फिरत शेवटी गावतल्या चांदणी चौकात सर्व गावकरी जमतात आणि ढोल झांजेच्या तालावर “डाव” म्हणजेच पारंपारिक न्रुत्य सादर करतात. त्यांनंतर गावातलचं लहाण पोरांचं कला पथक मास्तरांच्या शिट्टीच्या तालावर गोफ विणत छान लेझीमप्रकार सादर करतं. त्यात पथकात गर्दीतल्या कोणां ना कोणाचं लेकरु असल्यामुळे सार्‍या बघ्यांच्या चेहर्‍यावर कौतुक आणि अभिमानमिश्रित भाव दाटतात.

मंदीराच्या मागेच पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शाळा आणि आजुबाजुला आंब्या फणसाची भरपुर झाडं त्यामुळे सकाळी शाळा असेपर्यंत चिल्या पिल्यांची चीव चीव आणि दुपारनंतर पक्ष्यांची किलबिल सतत परिसरात ऐकु येते. मंदीराच्या समोरच्या उतरंडीच्या रस्त्यावरुन खाली सरळ उतरत गेल की खालचं आवाड लागतं जिथे पन्नास एक घर असतील. आणि तिथुन पुढे डाव्या हाताला वळालं की “ती”वाट सुरु होते. होय तीच वाट कारण लोक दिवसा सुद्धा त्या वाटेचे नाव घ्यायचे नाहीत. कारण फार पुर्वी कधी जत्रेतच ऋषी आईने तस सांगितल होतं. त्या वाटेच नाव “भोलागडी” . भोलागडीचा रस्ता दोन्ही बाजुंनी जगंल असल्यामुळे एकदम शांत. दिवसा सुद्धा एखादा वाटसरु त्या रस्त्याने जात असेल तर केदारेश्वराच नाव घेतच जाणार. त्यातच मधुनच एखादा सरडा वैगरे गवतातुन सळसळ करत गेला तर भर दिवसा अंगावरचे सगळे केस सावधान स्तिथीत आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे सहसा एकटं कुणीच त्या वाटेला जात नसे आणि त्यातही काही काम पडल तर दिवस उजाडल्यानंतर लोक समुह करुन एकत्र जात आणि संध्याकाळ व्ह्यायच्या आत घरी परतत. त्यात भिती दायक म्हणजे गावचा म्ह्सवटा याच भोलागडीच्या वाटेवर. या म्ह्सवट्याच्याही वेगवेळ्या कथा गावातले लोक सांगतात. कोणी सांगतो म्हसवट्याच्या पुढे जो माळ आहे तो भुताचा माळ आहे. दर आमावस्येला रात्री तिथुन वेताळाची पालखी निघते, ढोलांचे आवाज येतात आणि मशाली नाचवल्या जातात. त्यात चुकुन जर तुम्ही कधी “त्यात” सापडलात तर काही आरडा ओरडा न करता त्यांच्या सारखंच नाचत पुढे जात राहायचं आणि तरी पण त्यांना तुमचा वास आलाच तर…...?! ह्या प्रकाराची वाच्यता कुठेच करायची नसल्यामुळे सर्वजण गप्प राहाणेच पसंद करतात. ह्या सर्वा मागे कारणही तसेच आहे. दरवर्षी भोलागडी यात्रेआधी एक तरी बळी घ्यायचीच आणि आत्तापर्यंत भोलागडीने भरपुर जणांचा बळी घेतला होता. त्यात लग्नाच्या वराडा सकट पाच सहा मिलेट्रीतल्या लोकांचापण समावेश होतां. बाजुच्याच गावतले काही तरुन सैन्यातुन स्वेच्छानिव्रुत्ती घेऊन घरी आले. पण ते घरी पोहचलेच नाहीत. त्यांच पुढे काय झाल याच ऊत्तर फक्त भोलागडीलाच माहीत आहे.

म्ह्सवट्याच्या बाजुलाल एक छोटस तळं आहे. त्याला सर्वजण बांबर असे संबोधतात. या तळ्यातल्या पाण्यानेच केदाराला आंघोळ घालण्याची प्रथा आहे. कारण कोणत्याही व्यक्तीचा त्या पाण्यास स्पर्श होत नसल्यामुळे तेच पानी देवाच्या आंघोळीस योग्य आहे असे नानु गुरवाचे मत त्यामुळे तोच फक्त भल्या पहाटे उठुन भोलागडीत जायचा आणि बांबरा वरुन पाणी आणुन देवाला आंघोळ घालायचा. त्याच्या अंगात ऋषी आईच ठान असल्यामुळे त्याला कशाचीच भीती वाटत नाही ह्याचा लोकांना हेवा वाटायचा. आजुबाजुच्या गावातही त्याचा दबदबा होता. कुठुन-कुठुन लोक त्याला आपले प्रश्न वि्चारायला येत मग कोणाच लग्न जमत नसेल. मुल होत नसेल. भावकीचा तंटा, जमीण जुमला असले सतराशे साठ प्रश्न घेऊन लोक नानु गुरवाकडे येतं.

"नानु गुरव" साठीच्या आसपास झुकलेला. पाच साडे पाच फुट उंची. मध्यम आंगकाठी सावळा रंग. अंगात नेहमी सदरा लेंगा. कपाळाला गुलालाचा टिळा. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा. चेहर्यावर दाडीच खुंट वाढवलेलं. लांब राखलेले जटाधारी केसं आणि करडी नजर यामुळे पाहताक्षणी ह्यो कुणीतरी पावरबाज भगत आहे याची जाणीव होणार. गावातली सगळी लहाण पोरं त्याला दबकुणच राहायची. बायको फार पुर्वीच कधीतरी वारली त्यानंतर त्यानेच एकुलत्या एक पोराला लहाणाचं मोठ केलं पण मुलाच्या लग्नानंतर नवीन सुनेच आणि नानु गुरवाच कधी पटलंच नाही मग मुलगा त्याच्या बायकोला घेऊन कायमचाच ईचलकरंजीला निघुण गेला तो परत आलाच नाही. कुणी सांगतं तो तिकडं गिरणीत काम करतो म्हणुन. त्यामुळे देवदेवस्की करुणच नानु गुरव त्याचा चरितार्थ चालवत होता.
नानु गुरवाच्या आंगातल्या वार्‍यानेच सुचवल की दरवरर्षी यात्रे आधी बांबरावर रेड्याचा बळी दिला तर कोणतीही जीवितहानी होणार नाही. तेव्हापासुन भोलागडीत रेड्याचा बळी देण्याची प्रथा गावात रुळली होती. परंतु आबासाहेबांच्या समाजप्रबोधनामुळे गेल्या आठ-दहा वर्षात गावात बदलाचे वारे वाहु लागले होते.

“आबासाहेब” सैन्यातुन निव्रुत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुळ गावीच राहण्याचा विचार केला. सैन्यातील सवयीप्रमाणे नेहमी दाढी केलेली. गव्हाळ वर्ण आनि ओठांवरील तलवारकट आणि जोडीला निसर्गदत्त शरीराची देणगी त्यामुळे पाहताक्षणी समोरील व्यक्तीवर त्यांची छाप पडणारच. गावातल्या तरुणांनी शिकुन बाहेर न जाता गावातच राहुन गावचा विकास साधावा असा त्यांचा आग्रह.
पुढाकाराने त्यांनी बळीची प्रथा बंद पडली, गावात प्राथमिक शाळा सुरु झाली, घरोघरी शौचालये आली, बायोगॅसची निर्मीती करण्यात आली, वीज आली त्यामुळे गावात मनोरंजणाची साधणे उपलब्ध होऊ लागली. तालुक्याच्या काही कंपण्यामध्ये भुमी पुत्रांना कामे मिळावी यासाठी त्यांनी भरपुर आंदोलणे केली आणि त्यात त्यांना यशही आले. गावातली शिकलेली पोरं शहरात न जाता गावातच राहु लागली. घरापुढे आता एखाद दुसरी दुचाकी दिसु लागली. त्यांच्या हातात मोबाईल दिसु लागले. गावात महिलांचे बचत गट स्थापण केले जाऊ लागले एकंदर गावात आर्थिक सुबत्ता येऊ लागली. त्याचाच परिणाम गेल्याच वर्षी गावाला “आदर्श ग्राम”पुरस्कार जाहीर झाला. आणि गावात एक चैतन्याची लहर उसळली जो-तो आबासाहेबांच कौतुक करु लागला. परंतु रुपयाला दोन बाजु असतात काही जुन्या खोडांना बळीची प्रथा बंद पडली हे अजिबात पसंद नव्हते. त्यात अग्रक्रम होता तात्या सरपंचांचा.

"तात्या सरपंच" गौरवर्ण कांती, सतत पानं खाऊन रंगलेले ओठ, अंगात सदरा आणि त्यावर नेहरु जॅकेट. नेहमी शुभ्र धोतर आणि डावी भुवयी वर करुण बोलण्याची सवय.गावचे सरपंच आणि पंचायत समीतीचे अध्यक्ष आणि यंदा खासदारकीचे संभाव्य उमेदवार यामुळे आवाजात आपोआप आलेला माज.

आबांची वाढती लोकप्रियता पाहुन सरपंच मनातुन त्यांच्यावर जळायला लागला होता. आणि या आगीत तेल ओतण्याच काम नानु गुरव करु लागला. अंध श्रद्धा निर्मुलणामुळे त्याच्या भगतगिरीलाही ओहोटी लागत होती. त्याने कित्येकदा ताकीद ही दिली तुम्ही ऋषी आईच म्हणनं टाळताय पण लक्षात ठेवा झोपलेली "भोलागडी" जागी झाली तर परत किती जणांचा बळी घेईल ते ॠषी आईच जाणो. नाही म्हणता गावातल्या जुन्या लोकांना ह्या घटनांचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या काळजात चर्रर्र.. व्हायचं पण तरण्या कमावत्या पोरांपुढं त्यांच काय चालायच नाही. शेवटी व्ह्यायच नाही तेच झाल दोन वर्षांपुर्वीच भोलागडीचा रस्ता जिथुन सुरु होतो त्याच्या थोडे अगोदर आबासाहेबांच शेत होतं.त्या शेतात त्यांनी तात्या सरपंच आणि नानु गुरवा्ची मते झुगारुन प्राथमिक शाळेत शिकवणारया शिंदे सरांना ग्राम फंडातुन घर बांधण्याची परवाणगी दिली. एकतर येवढ्या वर कोणी शिक्षक टिकत नसे आणि आलाच तर लगेच बदलीचा तगादा लावत असे यात विध्यार्थ्यांचे नाहक नुकसाण व्हायचे यावर तोडगा म्हणुन एखाद्या शिक्षकाला ईथेच त्याच्या कुटुंबासह राहण्याची व्यवस्था केली तर प्रश्न कायमचा सुटेल म्हणुन आबासाहेबानी शिंदे सरांना गावातच राहण्याची विनंती केली.

शिंदे सर त्यांच्या दोन्ही मुलांना आजोळी ठेऊन बायकोसह गावात राहायला आले पण जेमतेम सहा महिनेच झाले असतील. सर त्यांच्या मुलांना आजोळाहुन आणायला गेले असताना त्यांच्या बायकोने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. नानु गुरवानेच विशिष्ट आवाजात घंटा वाजवुन सार्‍या गावाला कल्पणा दिली घटनेनंतर तात्काळ आबांनी गुरुजींशी संपर्क केला असता ना त्यांचा फोन लागेना वर त्यांच्या सासुरवाडीत चौकशी केली असता कळाले की गुरुजी तिकडे आलेच नाहीत. सुरवातीला सर्वांनाच काहीतरी काळ-बेरं असण्याचा संशय आला. गावात निरनिराळ्या चर्चाना उधान आलं मास्तराची बायको म्हणे वागायला नीट नव्हती, मास्तर नेहमीच तिच्यावर संशय घ्यायचा. सर्वांनी निष्कर्श काढला की गुरुजींनीच आपल्या बायकोचा खुन करुन तिला फासावर लटकावले आणि पोलिसांपासुन वाचण्यासाठी पोबारा केला. परंतु पंचनामा आणि तपासावरुन काहीच निष्पन्न न झाल्यामुळे सर्वांच्या भुवया आपोआप टवकारल्या गेल्या कारण यात्रेच्या हप्ताभर आधीच ही घटणा घडली होती. नानु गुरवसह सर्वांना भोलागडी परत खुणाऊ लागली. गत वर्षीच्या यात्रेतही ॠषी आईने कौल दीला होता जुन्या प्रथा बंद पाडाल तर असंच होईल म्हनुन. आता गावात दोन गट निर्माण होऊ लागले होते नानु गुरव, तात्या सरपंच आणि सुधारक आबासाहेब.

"आसक्या ऍए…. "आसक्या आरं ऊठ आता उन्ह वर आल्याती. गेलं दहा ईस दीस झाल तालमीचा बी पत्ता न्हाय तुझ्या. अशानं यंदाच्या जत्रतं नारळावर कुस्ती लढणार हायस व्हयं. चल ऊठ आता. हे तालुक्याला पेन्शन आणायला गेलंत. ते यायच्या आधी आवारल पायजे नायतर तु उंडागशील गावभर, मला मेलीला सतराशेसाठ प्रश्नांची ऊत्तरं द्यावी लागत्यात. आधीच तु तालमीच खाडं करतुयास तर ह्यांच मला रोज ऐकुण घ्यावं लागतयं. त्यात हे दिसभर गावच्या प्रश्नांच्या मागं मी म्हणते माणसांण जरा शेरिराला आराम द्यायला पायजेल का नको. आईच्या बोलण्यानं आसक्या न हळुच डोक्यावरची वाकाळ बाजुला केली आणि माडीच्या खिडकीतुन बाहेर पाहीले. बाहेर छान रिमझिम पाऊस पडत होता. आईनं सकाळीच लावलेल्या रेडिओवर आशा ताईंचं छान येरे घना……… चालु होते आणि त्या सुरांमध्ये आईचे सुर खो घालत होते. एकंदर त्याला अजिबात उठण्याची ईच्छा होत नव्हती पण आबा यायच्या आत खरंच आवरलं पाहिजे नाहीतर ते सैन्यातल्या शिस्तीतला बडगा दाखवल्या शिवाय राहणार नाहीत हे त्याला चांगलच ठाउक होतं त्याने हळुच आपली नजर आईकडे वळवली. आई त्याच्यासाठीच कोपर्‍यातल्या बंबामधुन आंघोळीच पाणी बाहेर काढत होती.
"आसक्या" उर्फ अशोक आबा कदम जेमतेम पंचवीशीतला तरुण, उंची पाच फुट दहा इंच, गव्हाळ वर्ण, तालमीत कमावलेल शरीर आणि कुस्तीत कमावलेल नाव यामुळे तालुक्यात तो चांगलाच प्रसिध्द होतां.तालुक्याच्याचं कॉलेजमधुन त्याने आपल महाविद्द्यालयीन शिक्षण पुर्ण केल होतं.
आणि आबांच्या शब्दाखातरच तो गावातल्या शाळेत पोरांना शिकवण्याच काम करत होता. मास्तरांच्या प्रकरणामुळे नवीन कोणी मास्तर गावात यायला तयार नव्हते. त्यामुळे नवीन मास्तर येईपर्यंत तरी त्याला पर्याय नव्हता. आणि असला तरी उक्ती प्रमाणे क्रुती या आबासाहेबांच्या वक्तव्याला धरुन गावासाठी काहीतरी करण्याची उर्मी बाळगुण चालणारा तो होता. त्यात आबासाहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे नुकताच त्यांच्या “बोरणे” गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे आबासाहेबांचा सुपुत्र त्यांच्यासारखाच नाव कमावणार ह्याची सर्वांनाच खात्री होती.

अशोक ने आंघोळ केली आणि न्याहारीसाठी तो आई समोर बसला, तशी आईची टकळी पुन्हा सुरु झाली. आसक्या एक ईचारु गेलं? दहा-पंधरा दीस झालं. ना तुझ तालमीवर ध्यान ना जेवणावर. सांच्याला जातोस ते रातच्यालाच घरला येतोस. लेकरा रात्र वैर्‍याची हाय आता यात्रा पंधरा दिवसांवर आली हाय. त्यात माझ्या मनात उगाच धाकधुक लागुन राह्तीया. त्यो नानु गुरव म्हणत होता ह्या वर्षी भोलागडी गप्प बसणार न्हाय म्हणुन. आणि तसंच झालं बघं. तात्या सरपंचाची तरणीताठी पोर सुमी गेलं दहा दिस झाल येड्यावाणी करतीया. मध्येच रातच्याला किंचाळत उठतीया. शुन्यात नजर लाऊन बसतीया. मधीच घोगर्‍या आवाजात काय बी बडबडती त्यांना घेऊन या. माझी पोरं कुठं हायतं? मला भोलागडीत जायचयं आणि मध्येच ऊठुन भोलागडीच्या दिशेने पळायला लागते. गावातली लोक म्हणतात कि तिला मास्तराच्या बायकोने झपाटलयं खर खोटं देव जाणो. सोन्यासारी पोरं, बाप हाय आक्करमाशी पण पोरीन कुणाच वाईट केल व्हत? चांगल ठरल्याल लगीन मोडलं नवरा म्हण मंबईला ईंजीनिअर होता. देवा त्या निष्पाप लेकराला बर कर रे बाबा.

"आई तुला आता कळलच आहे तर सांगतो. मास्तर गायब होण्या आधीच्या रात्री त्यांचा मला फोन आला होता. बोलताना काहीशा घाबर्‍या आवाजात ते मला एवढच म्हणाले अशोकराव... अशोकराव.... मला तुम्हाला..........! ईतक्यात अचानक फोन कट झाला. आणि दुसर्या दिवशीच मास्तरांच हे अस प्रकरण झालं. गावात नाना वावग्या उठल्यात. तात्या सरपंचासह सर्व लोकांना वाटतय की आबांच्या नवीन प्रथांमुळे परत काहीतरी वाईट होणार म्हणुन. काही लोक म्हणतात मध्यरात्री भोलागडीतुन बाईच्या जोराने किंकाळण्याचे आवाज येतात. हे बघ आजच्या विज्ञाननिष्ठ जगात माझा भुता-खेतांवर आजिबात विश्वास नाही. तरीही ही लोक ह्या जुन्या चालीरीतींना पकडुन स्वताचा अहंकार आणि मोठेपणा वाढवण्यासाठी आबांच्या नावाला काळीमा लावण्याचा प्रयत्न करत असतील तर मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणारच. आणि मला आतुन काहीतरी जाणीव होत आहे नक्कीच मास्तरांना काहीतरी कळाल असणार ज्यामुळे हे सर्व महाभारत घडतय ह्या सर्वांचा नक्कीच नानु गुरव आणि तात्या सरपंचाशी काहीतरी जवळचा संबंध असला पाहीजे.

"आर पण तु एकटा दुकटा रातच्याला असं फिरतोस ते भी भोलागडीच्या दिशेनं, मला काय धा पोर हायती? ते काय न्हाय आजपासुन तु साळा सुटली की येळेवर घरी येत जा बघु, “त्या गुरवाला नी तात्याला काय नागवं नाचायच हाय त्ये नाचु दे त्यो बसलाय ना तिथ वर त्यो बघतोय सर्वांना वरुणं. आई तु नाहक काळजी करतेस. पहीली गोष्ट मी एकटा अजिबात नाही. गावातल्या सर्व तरुन पोरांना यात्रेच्या आधी ह्या प्रकरणाचा छडा लावायचा आहे. आम्हाला पण बघुदे ती “भोलागडी” काय करते ते. आरं पण मी म्हणते ईषाची परीक्षा कराचं का? आर आमच्या ल्हानपणी तुझी आजी आमासनी नावं बी घिऊन द्याची नाय त्या वाटंच. वरच्या आवाडातला त्यो लगंडा किसन्या असाच यात्रं आधी गायब झाला. कुणी म्हणतं त्यो सरपाणं (जळाऊ लाकडं) आनायला भोलागडीच्या दिशेने गेला होतां तो परत आलाच न्हाय. एकदा साळुंकं वाडीच्या दोघा तिघांनी भोलागडीतुन जाताना त्याच्या काठीचा आवाज एकला व्हता मागं वळुन पायलं तर किसण्या काठीचा आधार घेत पाय फेकत-फेकत हळु हळु बांभराच्या दिशेने चाल्ला व्हतां. ह्ये नक्की त्योच हाय का म्हुण बगाया गेले तर किसण्या गायबं. मग पुरी वाट संपपतुर त्यास्नी त्यो काठीचा आवाज ऍकु येत होता. मग काय घरी गेल्याव तिघांनी बी आंग धरलं.आईच्या गोष्टीवर अशोक एकदम शांत झाला आणि नंतर मोठ्याने हसत-हसतच म्हणाला. आई आता मलाबी किसण्या तात्याला भेटावसं वाटतय. तेव्हा मंगल बाई त्याला काहीश्या दरडावणीच्या स्वरातच बोलल्या, “ त्ये तुमच ईद्न्यान बिदन्यान मला काय कळत न्हाय पण ज्या आर्थी आपण देवाची पुजा करतो त्या अर्थी दुष्ट ताकद बी असते या ईश्वात. एकदमच न्हाय मानुन कस चाललं समधं. शेवटचा घास खात अशोक हसतच आईसमोरुन उठला.
क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users