होता एक दिवस असा ....

Submitted by तनवीर सिद्दीकी on 18 August, 2012 - 06:23

तो 'दिवस'च किती छान होता..!!

दिवसभर काबाडकष्ट करून 'दिवस' जेव्हा घरी यायचा
'रात्र' चुलीवर भाकऱ्या थापत बसलेली असायची
वंशाचा 'दिवा' क्षणार्धात उजळायचा
दिवसाने त्याच्या डोळ्यातले मोती मोजायचे
रात्रीने दोघांकडे प्रेमाने पाहायचे
जरासे इथे तिथे करपलेले चंद्र सर्वांनी आनंदाने गिळायचे
आणि
रात्रीच्या खांद्यावर हात ठेवून
सूर्याला कडेवर घेवून
दिवसाने उगाचच आभाळातले चंद्र मोजायचे..

आभाळात मिणमिणते तारे बघूनच खुश असणाऱ्या सूर्याकडे बघत
मग थकून दिवस मालवायचा एकदाचा
सर्वापासून लपवलेला आकाशातला चंद्र
त्याच्या डायरीत चिकटायचा एकदाचा..

आणि रात्रीच्या केसात हात फिरवत
रिकाम्या खिश्यात भरून ठेवलेली स्वप्ने
थेट पुढच्या सकाळीच उठायची..
छान होत अगदी..

तो 'दिवस'च किती छान होता..!!

आता राहिलं नाही तसं काही..!!
रात्रीला झगमगाटी ताऱ्यांच व्यसन लागणे
सूर्याने रोज हट्ट करून चंद्राला मागणे
शेवटी वाटे झालेच दिवसरात्रीचे...

आता एकटाच राहतो दिवस
पूर्ण जगाचा पसारा आवरतो
त्यात मिसळतो..

रोज भेटण्याचा प्रसंगही येतो
तसा रात्रीला
'संधिप्रकाश' सोबत असताना -सूर्य पाहत नसताना....
नजरभेटेत सांत्वन करतोही खरा
पण रात्रच जिंकते शेवटी
रोजच..

आणि दिवस बिचारा मग
खिश्यातल्या डायरीतला थोडा चंद्र
संधिप्रकाशाच्या हातावर ठेवून निघून जातो
पुटपुटत..
रोजच..

'अगदी त्याच्या बापासारखाच आहे नातू आमचा..!!'

******
आता बस
सूर्य सोबत असणाऱ्या दिवसात
एक दिवस असतो आठवत

तो 'दिवस'च किती छान होता..!!

( आता गमवायला तरी कुठे काय आहे?)

तनवीर सिद्दिकी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhan Happy