अभूतप्रेम

Submitted by तनवीर सिद्दीकी on 18 August, 2012 - 06:15

'अजून एक बनव' - एका हाताने ग्लास सांभाळत आणि एका हात टेबलावर ठेवून स्वत:ला सावरत शाहिद अस्पष्ट बोलला.
'बस..बस..पुरे..आधीच चढलिये तुला..' - लोकेशने समजूत घातली..
'@#%&, टाक रे..' .. शाहिदचा स्वर आता थोडा भिजून हलका झाला होता..
'अरे पण झाल तरी काय?..कोणी काही बोललं का? ती काही बोलली का ?... आपण काहीतरी मार्ग काढूच की..सांग तरी... ' - लोकेश

शाहिद आपल्याच तंद्रीत होता. समोरची पूर्ण बाटली एकट्यानेच संपवणे ही जणू काही काहीतरी मोठी महत्वाची जबाबदारी आपल्या अंगावर टाकली गेली आहे अश्या अविर्भावात तो पटापट एक-एक पेग रिचवत होता. लोकेश काहीतरी विचारतोय, एक-दोन पेग रागात, जास्त चढल्याने त्याच्या शर्टवर पडून शर्ट भिजलाय, त्याला काही काही भान नव्हते. डोक्यात विचारांचे तांडव चालले होते. डोळ्यासमोर झापड येत होती. तो शांत आकाशाकडे बघत अधून मधून ग्लास तोंडाला लावत शांत बसला होता. चेहऱ्यावर कुठलाच भाव नाही... राग, द्वेष, ईर्ष्या... कसलेच नाही..लोकेश ही एव्हाना विचारून दमला होता. त्यानेही शाहीदला थोडा वेळ एकटाच सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पाठीवर एक सहानुभूती मिश्र मैत्रीची एक थाप मारत तो उठून तो खाली आपल्या रूमवर आला.

शाहिद अजून गच्चीवरच होता. रातकिड्याचा आवाजच काय तो फक्त शांततेशी लढत होता. फक्त एक-दोनच झुरके ओढलेली सिगरेट हातातच जळून अर्ध्यापर्यंत आली होती. मध्यरात्रीला मिनिटाभराचा अवकाश असेल..!! सोसायटीच्या रखवालदाराच्या शिट्या धूसर ऐकायला येत होत्या..आणि त्यात कुत्र्याची भू-भू.. ..पण शाहीदची शून्यावस्था मात्र काही भंग होत नव्हती. तो असंच अजून..आपला आभाळात अंधार मोजत..!!.. आणि त्यात हा विचारांचा गदारोळ...!!

.....किती आनंदात गेला होता तो!! किती दिवसांनी त्याच्या महत्प्रयासाला देव पावल्यासारखे वाटले होते. आणि आता?.. आता तर सगळी स्वप्ने,सगळ्या इच्छा धूसर झाल्यागत दिसत होत्या. ''देव देतो आणि कर्म नेते'' अस म्हणतात पण यात देव देवून चुकला की कर्म हिसकावून घेवून जातंय म्हणून दोषी हेच काही उलगडत नव्हत. आयुष्यात अश्या किचकट अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जावे लागेल असं त्याने कधी उभ्या जन्मात तर सोडा पण 'आडव्या' स्वप्नात ही विचार केला नव्हता. सर्वच विधिलिखित असते हे मान्य, पण अचानक एवढ्या मोठा पेचप्रसंग आयुष्यात यावा अन त्यात देवाने मानसिक रित्या हतबल आणि भावनिक रित्या मृत करून टाकावे हेच त्याला पटत नव्हते. 'हे अस का झाल?' , 'मग झालंच तर माझ्याबरोबरच का झाल?', 'आता मी काय करू?', 'मी हा निर्णय एकटा घ्यायच्या लायकीचा आहे?', 'निर्णय चुकला तर?' - असे भरपूर प्रश्नबाण हृदयावर वार करत होते. पण निरसनासाठी कुठला प्रश्न पहिले विचारत घ्यावा हा प्रश्न सुटत नव्हता. मेंदू मूक वाटत होता. श्वास बधीर झाला होता.आकाशातल्या अंधाराबरोबर जणू त्याच्या उघड्या सताड डोळ्यासमोरच्या दु:खकाळोखाची स्पर्धाच चालू होती..!!

एव्हाना कुत्र्यांचा आरडओरडा उतरणीला आला होता.जग नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या दैनदिनिच्या युध्दासाठी सज्ज होण्यासाठी निद्रा राणीबरोबर आराम करत होते.चांदण्या आभाळाचे पांघरून घेवून अधून मधून एक-दोन डुलक्या मारून वामकुक्षीचा आस्वाद घेत होत्या.दारूची संपलेली बाटलीही टेबलावर शांतपणे पहुडली होती.एवढावेळ साथ देणारी न ओढलेली सिगरेटही त्याच्या हृदया प्रमाणेच पण एका ठराविक मर्यादेपर्यंत जाळून त्याच्या बोटापर्यंत आली होती. एक हलकासा चटका त्याच्या बोटांना लागला तोच तो भानावर आला. अंधुकशी, हलकीशी वेदनामय किंकाळी देत त्याने थोटूक भिरकावून दिल. अर्धवट उघड्या डोळ्यांनी आजूबाजूचा वेळेचा अन परिस्थितीचा कानोसा घेतला. काहीतरी माचीस वगैरे शोधत काळोखात अंधाराचा अंदाज घेत उठण्याचा प्रयत्न करू लागला. एक आकृती त्याच्याजवळ लगबगीने त्याला सावरायला येताना त्याच्या दिशेने सरकताना त्याला दिसली.

तो लोकेश होता..!!

शाहिदचा हात पटकन आपल्या मानेमागे खेचत लोकेशने त्याला उभे केले. आणि खडसावत बोलला.
'@#%&..चल पुरे आता..जेवून घेवू..थोडा आराम कर आता..जास्त झाली आहे तुला '

शाहिदला काय झाले आहे नक्की? उद्या विचारतो..अस मनाशी ठरवत लोकेशने शाहिदला खाली रूमवर आणले.

x x x x x x x x x x

चित्रात, स्वप्नात, चित्रपटात, गोष्टीत, कवितेत अगदी उघड्या डोळ्यांच्या बाहुपाशात दिसणारी भावी जोडीदाराची संकल्पना 'मधु' या व्यक्तिमत्त्वाशी अचूक जुळली याचा अतोनात आनंद शाहिदला गगनात मावेनासा झाला. अगदी पहिल्या भेटीत जेव्हा हस्तांदोलन करताना मधु जेव्हा त्याच्यासमोर आली तेव्हा त्याच्या हृदयाचा एक ठोका तर चुकलाच..!! ''वो जो भी होगी जब भी मेरे सामने आयेगी ना, तो दिल मे गिटार बजेगी देखना..'' अस जेव्हा तो आपल्या स्वप्नाळू दुनियेत विरून लोकेशला सांगायचा त्याची पूर्ती आज झाल्यासारखी त्याला वाटत होती.तिचा आज ऑफिस मधला पहिलाच दिवस होता . ओळखीपाळखीचा कार्यक्रम चालू होता . तिने समोर येवून एक'प्रोफेशनल' स्मितहास्य दिल. शाहिद सुखावून गेला. त्याला ते प्रोफेशनल' स्मितहास्य पण फार अगदी मनमोहक वाटल तो मधूच्या पहिल्याच नजरभेटीत घायाळ झाला होता.त्या भिरभिरेपणात त्या सोंदर्यवतीचा हात त्याच्या हातात पाच मिनिटे असंच अटकून आहे अन तो नाजूकपणे विळख्यातून सुटण्याची धडपड करत आहे याची त्याला शुद्धच नव्हती. लोकेश बाजूला आपल्या पाळीची वाट पाहत होता. त्यानेही शाहीदला नकळत कोपरा मारून जागे करण्याचा प्रयत्न केला. पण तेही व्यर्थ..!! शेवटी पहिल्या भेटीतच बुजगावणे झालेल्या शाहीदला पूर्व अवस्थेत आणण्यासाठी एका मंजुळ आवाजाची वातावरणात 'इंट्री' झाली होती.

''मी मधु.. मधु कामतेकर'' ..
''अ?..हो..हो.... मी शाहिद.. शाहिद खान....''
''Nice to meet you'' - परत मंजुळ आवाज
मधुनेच अप्रत्यक्षरीत्या 'झाली की ओळख आता तरी हात सोडा' असा भाव डोळ्यात आणत सांगितले.
''Ohh Sorry...'' तिचा हात अजून आपण बावळट सारख धरून ठेवलाय याची जाणीव त्याला झाली आणि लगेच हात सैल झाले. ती पुढे सरकली. शाहिद मान खाजवत ओशाळून खाली बघू लागला. आजूबाजूला काही दबके हास्यफवारे फुटलेत हे त्याच्या कानाने टिपले पण खाली बघत असल्याने पुढे जावून पण खास मागे वळून मधूने खास शाहिदला दिलेला प्रेमळ अन कुतुहूल पूर्ण 'लुक' मात्र त्याच्या नजरेतून चुकलंच..!!

''ती बघत होती तुझ्याकडे..'' - कैन्टीन मध्ये लोकेश चा मिस्कीलपूर्ण खडा..!!
''नाही रे नसेल..खर काय?'' - शाहिदला उत्तर हवेच होते..
''................................'' -लोकेशच मंद हास्य..
''सांग रे..खर काय?..'' - शाहिदची बेचैनी आकाशापर्यंत पहोचली.
''जेवा गप्प....तू काय मोठा राजा आहेस?....का बघेल तुला ती?'' - लोकेश अजूनही थट्टेच्याच मूड मध्ये
'असू दे.. चल जेव..आपल्याला काय?..' शाहिद ने विषय संपवला..

.....
........
मधु..मधु यशवंत कामतेकर..
वय -..२५ वर्ष २ महिने १४ तास आणि २७ मिनिटे
उंची- ५ फुट ६ इंच.
वर्ण - गोरा.
अजूनही अविवाहित..!!
डिझायनिंग विभागात कारकून..

त्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत शाहिदने नकळत इथ्यंभूत माहिती काढलीदेखील..!! अर्थात त्या गोष्टीचा अंदाज कोणालाच आला नाही म्हणा. पण एका छुप्या एकतर्फी प्रेम कहाणीची सुरवात मात्र ऑफिसमध्ये सुरू झाली होती.....

x x x x x x x x x x

प्रेम..!! या शब्दाच खर अस्तित्व काय?. जात काय ?. नक्की व्याख्या काय ?.. कोणीच सांगू शकत नाही. पण प्रेमात माणूस आपल्या अस्तित्वापलिकड़े स्वप्न बघू लागतो . अशक्य गोष्टीही शक्य वाटू लागतात . मग ते कधीही आणि कोणावरही झालेल असो ..!! त्याचे सर्व दोष एकतर अचानक आवडू लागतात नाहीतर किमान त्या सर्व उणीवाशी तडजोड करण्याची भावना आणि ताकद आपल्यात येते . समोरचा जसा असेल तसा स्वीकार करण्याची मानसिकता तयार होते . आणि एकंदरीत आपल्या आवडीचा जीव त्याच्या असणाऱ्या सर्व चांगल्या वाईट सवयीबरोबर कसा मनात रुततो काही कळतच नाही ….

शाहिदलाही असंच काहीतरी झाल होत ..!!. संपूर्ण तन-मन-श्वासात 'मधु' नावाचा एक जहाल विषाणू फार वेगात संक्रमित होत होता. खंबीर मनाला प्रेमाची बुरशी लागत होती.

तसं दोघांच्या स्वभावाचा-व्यक्तिमत्वाचा एकत्रित विचार करून जर अनुमान काढला तर जशी क्षितिजाची दोन टोके..!! मधु तशी कमी बोलणारी..मितभाषी..जवळ जवळ कंटाळवाणीच. आणि शाहिद हसरा-बोलका- बडबड्या दिलखुश माणूस. मधु तशी सोज्जवळ..पण वक्तशीर. कोणाच्या जास्त अध्यात मध्यात नसणारी. दिवसभर काम एके काम आणि मर्यादित बोलण हसण आणि मग घर. अगदी जेवताना सुद्धा सर्वात जास्त मिसळायची नाही. त्रयास्थसारखी घोळक्यात असून पण एकटीच. याउलट शाहिद तसा कामात ठीक ठाक पण उनाडक्या..कामाचा जास्त बाऊ न करणारा.. ह्याला चिडव, त्याची खेच अस मजेशीर जीवन जगत पूर्ण ऑफिसच वातावरण ही मजेशीर ठेवणारा..करणारा.. सर्व जण त्याला पसंद करत..आणि या साहेबांची गाडी मात्र वेगळ्याच स्टेशनवर थांबली होती. आणि त्यामुळे त्याने मधुच्या नीरस जीवनात मैत्री आणि प्रेमाचा रंग ओतण्याचा चंग बांधला.

''काय मधु?.. काय आणलाय डब्यात?.''. - आतापर्यंतच दुसर संभाषण..

मधु ने न बोलता डबा पुढे केला.. आता कारल्याची भाजी होती.

तसा शाहिदला राग यायला हवा होता. सर्वजण एकत्र बसले होते. आणि मधूने 'हव तर घे' अश्या स्वरुपात डबा पुढे केला होता.

''अग मधु, या ऑफिसमध्ये बोलायचे पैसे कापत नाहीत पगारातून.. बोलण फुकट आहे..बोलत जा बिनधास्त..''

क्षणभर सर्वजण शांत. एकतर मधु जास्त बोलत नाही..तिच वैयक्तिक आयुष्य. त्यात हा टोमणा. ओळख ना पाळख..काय रिस्पोंस देईल देव जाणे..!!

''हा हा हा हा .....'' ती चक्क हसली..मधु कामतेकर..चक्क मनमोकळेपणाने हसली.. सर्वजण खूप खुश झाले..

''अरे बापरे, तू हसतेस पण..?...'' - शाहिद चा टोमणा नंबर दोन..

''हा हा हा हा.. हो मग..!!'' - मधूला तो हलकासा विनोद खूप आवडला होता बहुतेक..!!

''नशीब आमच...बर उत्तर नाही दिलंस तू?... भाजीच नाव काय आत डब्यात चिकटवलय काय?.. मला तर कळलीच नाही कुठली भाजी ही?..''

''अरे वेड्या..कारल्याची भाजी ती..घे मस्त आहे..'' - इति मधु..( पहिल्याच बोलण्यात थेट 'वेडा' म्हणते..?..सर्वजण क्षणभर कुतुहुलाने चूप.. )

आपण अचानक शाहिदला वेडा बोललोय हे मधु लाही उमगल.. ती ओशाळली..

''ओह्ह. सॉरी हा..चुकून..'' - मधु ओशाळली होती..

''राहू दे ग..माझ टोपण नाव आहे ते..'' - शाहिदकडे सर्व गोष्टीवर उत्तरे होती..

हसत मिसळत डबा खाण्याचा कार्यक्रम संपला. यावेळी मधु ही मनपूर्वक सामील झाली होती. यावेळी मात्र लपत लपत शाहिद आणि मधुच डोळ्याने झालेलं संभाषण सर्व मंडळीकडून हुकल होत...!!

आता सर्व सुरळीत चालू होत.

सर्वच स्वभाववैशिष्टे भिन्न असून पण हळू हळू शाहिद मधु कडे खेचला जावू लागला होता. तिच कमी बोलण, कमी हसण पण त्याला आवडायला लागल होत. मध्ये मध्ये फुकटच काहीतरी काम काढून मधुशी संवाद करायचा. तिला बोलत करायचा. हसवायचा. तसं मधूलाही शाहिद विषयी एक आकर्षण होतंच. तिलाही त्याच्याबरोबर वेळ घालवण आवडायचं. हळू हळू मधूही शाहिदच्या स्वभावशी समरूप होवू लागली. ऑफिस मध्ये कामासोबत इतर सर्व गप्पा टप्पात मधु सुद्धा सहभागी होवू लागली होती. जेवण करताना शाहिद च्या विनोद कौशल्यावर दाद देण्यात एका मंजुळ आवाजाची भर पडत चालली होती. पण या सर्वा समोरच्या मैत्रीला प्रेम म्हणता येईल का? मधूला मी असं काही 'विशेष' आवडत असेल का? - शाहिदच्या मनात अधेमध्ये शंकेची पाल चुकचुके. पण निदान आपल्या प्रयत्नाने, वागण्या बोलल्याने मधूच्या वागण्यात बदल झालंय ना...पुरे..बाकी प्रेम वगैरे विचारता येईलच की नंतर..

बदल..!! अगदी सोपेपणात विचार केला तर दोन उपशब्दाच संकुल..म्हणजे बल आणि दल..एखाद्या दलात स्वत:ला सामावून घेण्यासाठी बलपूर्वक केलेला प्रयास. मग ते बल तुम्ही लावा किंवा कोणी दुसऱ्याने. पण व्याख्या अशीच ठरते..नाही?..असे प्रसंग आपल्या जीवनात अनेकदा येतात..मग ते जीवनाविषयी असो, स्वत:च्या परिस्तिथी विषयी किंवा सभोवतालच्या समाजाच्या आपल्या विषयीच्या गरजेविषयी.. पण बदल हे होतंच असतात..होतातच.. फारतर त्याला सुधारित नाव म्हणून अनुकूलन म्हणू आपण फारतर..

मधूचा स्वभाव मनमोकळा झाला होता. नेहमी तिची नजर शाहिदला शोधत असायची. जेवताना धमाल उडत होती. आजकाल संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पण दोघा-तिघांनी त्यांना एकत्र फिरताना पाहिलं होत. शाहिद अचानक कामात वक्तशीर झाला होता. त्याचे सिगरेटचे प्रमाण फार कमी झाले होते.

आणि अचानक एके दिवशी शाहिद ने एका संध्याकाळी मधूला प्रोपोझ केलाच...!!!

x x x x x x x x x x x

दिवसभर श्वेतवर्ण दिसणारे फेसाळलेले समुद्राचे पाणी सूर्याचे लालसर रंग वापरून त्याच्या अफाट शक्तीला रोखणाऱ्या मळक्या कट्ट्याला आदळत होते..कमी जास्त उंचीच्या लाटा कोणालाही न जुमानता, कोणालाही न विचारता आपल्या कौशल्याचा खेळ किनाऱ्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याना दाखवत होत्या..अधून कुतुहुलाचे पडणारे कटाक्ष बहुतेक त्यांना सुखावत असावेत..!!!! रस्तावरच्या फेरीवाल्यांना , भिखारयाच्या 'सुरेल' गाण्यांना तिथून अंगठाभर दिसणाऱ्या हाजीअलीच्या आवारातून दिलेली अजान व्यत्यय आणत होती..!! कमी वेळ असणारी पण आस्तिक म्हणवणारी काही दुरूनच ओठांना बोटे चाटत पुढे जात होती, थोडा जास्त वेळ असलेली आणि आस्तिक ही म्हणवून घेणारी जरास थांबून जमल्यास एक दोन ओळ्या पुटपुटून, नाहीतर डोळे बंद करून, हसून-रडून -चिंतीत काहीतरी करत आणि परत पूर्ववत होत पुढे पावले टाकत होती..जास्तच वेळ असलेली आणि अस्तीकतेची व्याख्या दिसणारी भल्या मोठ्या अंगाच्या सागराच्या उदरातून कोरलेल्या चिंचोळ्या पायवाटेतून दर्गा दर्शनाला पळत होती...तिथून परतणारी माणसे काही 'सिक कबाब' दाबत होती तर काही रांगेतल्या पहिल्या 'भिकारयाकडून' बंदे सुटे करून पुढच्या सर्व 'भिकाऱ्यांना' ( भिकारी कंसात लिहिणे भागच होते..!! नाही?..) वाटत जात होते...( त्यापेक्षा त्यालाच पैसे देवून 'सबलोक बाट लो रे' असं जमल असते...असो...देवाला दिसणार कसे?...)

अरुणदेवाची 'शिफ्ट' आता संपण्यातच जमा होती. दिवसभर ऊन-घाम-जीवन वाटून दमलेला भास्कर आता 'अरबीत' डुंबण्यात सज्ज होत होता..त्याचा कारभाराचा हलकाच कार्यभार सांभाळण्यासाठी रस्त्यावरच्या नीट मोजमाप करून खोचलेल्या खांबाच्या शिरातली ठिपके(बल्ब) आता हसू लागले होते..वाहनाची वर्दळ वाढू लागली होती..दमलेली पाखरे घोळक्यात आपापल्या घरी परतताना दिसत होती..'जोडप्यांचा' ऋतू चालू झाला होता..फेरीवालाच्या आवाजाला आता जोर चढला होता. दिवसभर आयुष्याशी कुस्ती खेळणारी आणि रोड क्रॉस करून हाजी ला प्रणाम करणारी सर्व डोकी आता त्याला विसरून पुढच्या वळणावरच्या 'क्रॉसरोड' समोर पाणी पुरी,रगडा साठी रांग लावत होती..चंद्र राखणीसाठी तयारी करत, इथून तिथून 'इंट्री' मारत पोझिशन ठरवत होता..

या बदलत्या वातावरणाला भिक ना घालता एक संथ पण अखंड धूर हाजीला कट्ट्यावर दिसत होता आणि त्या धुरामागाचा चेहरा मात्र आस्तिक-वेळ -नास्तिक-काहीही या सर्व कल्पना ना सुरुंग लावत हाजीकडे एकटक बघत होता..कोणाचीतरी वाट पाहत..

एकामागून एक 'वूदंग गरम' मात्र थोड्या थोड्या अंतराने समुद्राचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत होती..उरलेल्या जळक्या राखेच्या आधारावर...!!!!!

'' काय रे साल्या, उतरली का तुझी ?'' लोकेश ने मागून पाठीवर थाप मारली . एव्हाना शाहिदची सिगरेट संपली होती .
'' मी ठीक आहे आता '' - शाहिद ने स्पष्ट केले .
'' मग इथे का बोलावलस ?.. अरे हो तुला गम्मत माहितीये ?.. आज मधु पण आली नव्हती ..आम्हाला वाटल ..'' - लोकेश ने डोळा माराला ..
'' मी दिवसभर मधु बरोबरच होतो ..इथेच..'' - शाहिद ने समुद्राकडे बघत अजून एक गौप्यस्फोट केला..
''अरे वाह्ह.. मग?..काय विशेष?..प्रोपोझ वगैरे केलास की काय?''
''कालच संध्याकाळीच केला होता..''- शाहिदचा अजून एक गौप्यस्फोट
''च्यायला..मग नाही बोलली होती वाटत..अच्छा म्हणून एवढा प्यालास काय?....काय झाल?..काय कारण?.. जात, धर्म, पैसा, की अजून काही?..अरे मित्रा आयुष्यात बदल हे करून घ्यायचेच असतात. आयुष्य जे आपणास जे दाखवत जाते ना, त्या हिशोबाने बदलत जायचं असत.. हे सगळ तिला तू समजावलं असशिलच... आता नाही ऐकत तर काय करणार..?..जावू दे रे..... अजून कोणीतरी चांगली भेटेल रे...... बर झाल लवकरच कळाल उत्तर तुला.. चल निघू.. होता है, दुनिया है..बस अपने आप को दुनिया के रंग मे ढालते चलो और आगे बढो..चल ''- लोकेश त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता..
''ती मला हो बोललीये..'' - शाहिदची नजर बोलताना अजूनही समुद्राकडेच...
''मला समजलं नाही..'' लोकेश बुचकळ्यात पडला..'' म्हणजे ती हो बोलली आणि तुला टेन्शन आहे..चक्क पिण्याएवढ?..या जगातला तू पहिला माणूस असशील ज्याला मुलीने होकार देवूनसुद्धा एवढ टेन्शन येवून त्याने दारू प्यावी..!!

एव्हाना शाहिद ने दुसरी सिगरेट पेटवली होती.

''बोल बे'' - लोकेश किंचित चिडला..
''हम्म..ऐक तर..''

''मधु कामतेकर..यशवंत आणि कोमल कामतेकर यांची एकुलत एक अपत्य. कुटुंब मुळचे लंडनला स्थायिक. लहानपणापासून अगदी ऐशो आरामात वाढलेली. अभ्यासात, खेळात निपुण. बापाचा पसरलेला बिझनेस. फक्त तोंडाने बोलाव की ती वस्तू घरात हजर. शाळेत पण सर्वांना आवडत अस ते मुल. लहानपणापासून जाम बडबड, खेळकर अगदी माझ्यासारख..१० वर्षापूर्वी तिचे आई वडील वारले तेव्हा पासून ती अशी गप्प गप्प राहते. भारतात तिची मावशी राहते ती तिला इथे घेवून आली. तेव्हापासून इथेच आहे.....''

''पण मग यात वाईट काय आहे?.. थोडे बदल तर जीवनात होतातच की रे..थोडी फार तडजोड करावी लागतेच रे..आणि आता तर ती पण हसमुख झालीये'' - लोकेश समजूत घालत होता.. आता शाहिद कडून घेतलेली अर्धी सिगरेट लोकेशच्या ओठात होती.

''१० वर्षापूर्वी तिचे आई वडील का मेले माहित आहे?''
''नाही. काही अपघात?..''
'' त्या आधी मधू कामतेकर.......'' शाहिद ने सिनेमैटेक पोझ घेतला.
''काय?..'' - लोकेश अजूनही बुचकळ्यात.
'' त्या आधी मधू कामतेकर हा एक मुलगा होता..'' - आता पहिल्यांदा शाहिदने लोकेशकडे पाहीले.
''What?.. तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का?...काळाची उतरली नाही वाटत..!!.'' - लोकेश ला स्वत:च्या कानावर किंवा शाहिद च्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.
''हो'' - शाहिद ने थंडपणे सांगितले.
''You mean Sex Change?.. लिंगबदल?..'' - लोकेश ला मुद्दा स्पष्ट करावासा वाटला.
''Yup..''
''चल घरी जावू..बस झाल प्रेम..चल उठ..''

शाहिद अजूनही उठला नव्हता..अजून भरपूर सांगायचे होते त्याला..त्याने नजरेनेच लोकेश ला थांब म्हणून सांगितले.

''चार वर्षानंतर मुलगा जन्माला आला त्यामुळे कामतेकर परिवार फार खुश होते. खूप जल्लोषाने मधूच जगात स्वागत झाल.आणि त्यानंतर संगोपनातही काही कसर राहिली नव्हती. त्याचे लाड,मागण्या सर्वच हाताच्या फोडासारख्या जपल्या जायच्या. पैशाची कमतरता नव्हतीच. सर्व सुरळीत चालू होते. पण जसं जसं एकुलत एक अपत्य मोठ ह्यायला लागल तेव्हा एक फार मोठी त्रुटी दिसू लागली होती. मधूचा आवाज तसा लहानपासुनच बायकी. ठीक आहे असेही दोष असतात म्हणून आई बाबांनी पहिले पहिले दुर्लक्षित केले. पण शाळेत जावू लागल्यानंतर त्यांना 'मधु' मध्ये छोटे छोटे पण अमुलाग्र बदल दिसायला लागले होते. बदल म्हणण्यापेक्षा त्रुटीच म्हणा. त्याला मुलींचे कपडे घालायला आवडायचे, त्यांच्यासारख नटण, मुरडण, वगैरे वगैरे. शाळेतपण तो जास्त मुलींमध्ये मिसळलेला असायचा. लहान असताना विरंगुळा समजून या सर्व गोष्टी दुर्लक्षित होत होत्या. पण नंतर मात्र हा बदल त्याच्या बोलण्या-चालण्यात जाणवू लागला होता. आता आई बाबानाही ही गोष्ट नजरेत यायला लागली होती. पण मधू लहान असल्याने दमदाटी आणि हलकी फुलकी मारहाण करून त्याला सुधारवण्याचा प्रयत्न केला जात होता. पण सर्वच विफल..!! शाळेतून काढून त्याला फक्त मुलांच्या शाळेत टाकण्यात आले. पण त्याच्या सवयी काही बदलत नव्हत्या. एव्हाना मधूलाही त्रास ह्वायला लागला होता. शाळेत मुलांकडून चिडवल जाण, मग त्यात दुबळ ठरून मार खाण, कोणी लवकर मैत्री न करणं या सामाजिक अव्हेलनांना तो शिकार होवू लागला होता. तो मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या विकृत आणि आजारी पडू लागला होता. एक-दोनदा अजाणपणे तो आई बाबानाही ''मी एकटा का?, मला सर्व जण चिडवतात का?, माझ्याशी कोणी मैत्री का करत नाही? '' वगैरे विचारे तर त्यावर आई बाबाही निरुत्तर असायचे. तेही उडवा उडवीची उत्तरे देवून त्यालाच दमदाटी करत. त्यानाही तसा त्रास होत होता. एकुलता एक मुलगा अन तोही असं निघावा- त्यांना भार सहन होत नव्हता. मधू समलिंगी तर नाही ना?..असं ही एक वाईट विचार त्यांच्या मनात येवून गेला. शेवटी खूप विचार करून त्यांनी एका मोठ्या डॉक्टरशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला. मधूची पूर्ण शाब्दिक, शारीरिक आणि मानसिक तपासणी झाली. आणि अहवालात मांडण्यात आलेले निष्कर्ष फार किचकट आणि धक्कादायक होते...''

बोलता बोलता शाहिद थोडासा थांबला. त्याने लोकेशला नजरेने खुण करून सिगरेट पेटवायला सांगितले.
मग?..पुढे?.. - लोकेश.

'' कसं असत लोकेश, आतापर्यंत आपण मानवाचे दोनच मुख्यता: विभागात मोजणी करत आलो आहोत - स्त्री आणि पुरुष. त्या नंतर इतर उपविभाग निघाले ही गोष्ट वेगळी पण तितकीच खरी आहे . पण बहुतांशी विभाग दोनच. या विभागात गणना करताना मुख्यता: थोडाश्या परीक्षा/निरीक्षणे असतात. जसं सोनोग्राफी द्वारे लिंगनिश्चिती किंवा जन्माला आल्यावर या व्यक्तीचे शरीर रचनात्मक आणि जनुकीय घटक. पण अजून एक गोष्ट जी या सर्वा इतकीच महत्वाची असूनही विचारत घेतली जात नाही ती म्हणजे त्या व्यक्तीची स्वत:च्या लिंगाबद्दल असणारी जाणीव - याला GENDER IDENTITY पण म्हणतात. मधू मध्ये हाच प्रोब्लम होता.

मधू दिसण्यात मुलगा होता. तरी त्याच्यात पुरुष नावाच्या लिंगाविषयी मानसिक जाणीव नव्हती. त्याला स्त्री या लिंगाशी जास्त आकर्षण होते, जाणीव होती. लहानपणापासून या जाणिवेकडे झालेली दुर्लक्षपणा त्याला अजून त्यात ओढत गेला. त्याला मुलींचे कपडे घालणे, त्यांच्यातच मिसळणे आवडू लागले. शाळा बदल्यानंतर त्याचा हाच स्वभाव त्याचा एकटेपणाचे कारण बनू लागला. तो स्वत:ला मुलांमध्ये SECURE समझू शकत नव्हता..- अहवाल बघून आई वडिलांची तर दातखीळच बसली.. काय करावे कळत नव्हते.. पण विज्ञानात यालाही एक उत्तर होते..

डॉक्टर पुढे म्हणाले की जर असंच मधू ला ठेवलं तर तो मोठा होवून अशी एक विकृती बनेल ज्याला नेहमी असं मानसिक त्रास होईल की आपला आत्मा जणू चुकीच्या शरीरात बंदिस्त झाला आहे आणि हा समज त्याला एकतर जगू देणार नाही किंवा तेवढी मानसिकता मग मधू मध्ये तयार करावी लागेल जी सोपी गोष्ट नाही. पण यावर दुसरा उपाय म्हणजे लिंगबदल करून घेणे. हे कायदेशीर आहे आणि त्याच्या आरोग्यासाठी पण बर. किमान त्याला समाजात भिन्नलिंगी म्हणून तरी जगात येईल..

मधूच्या आईवडिलांनी क्रांतिकारक निर्णय घेतला. त्यांनी मधू च लिंगबदल करायचं ठरवलं. पण त्यांना ते स्वत:लाच मानसिकरीत्या झेलता आल नाही. मधू असल्याने नाव बदलाव लागल नाही. पण मुलाची मुलगी झाली. समाजाने ते स्वीकारलं नाही. इज्जतीचे वाभाडे निघाले. कामतेकर परिवाराला वाळीत टाकण्यात आले. त्यांचा कारभार, नाती गोती यावर फरक पडायला लागला. वडील त्या धक्क्याने वारले. मग मागोमाग थोड्या दिवसाने आई पण. मधू आता पूर्णपणे अनाथ झाली. तिची आत्या तिला भारतात घेवून आली. तिच शिक्षण वगैरे मग इथेच झाल. ..- पुढच जवळ पास तुला माहीतच आहे. '' - शाहिद ने एक मोठा श्वास घेतला. एक छोटासा अश्रू नकळत समुद्रात पडला होता.

''काही नाही रे, दुसरी कोणीतरी भेटेल तुला. देवाचे आभार मान की तुला हे सर्व आधीच माहित पडल..आणि त्या मधूचाही विचार आता सोडून दे '' - लोकेश समजूत घालत होता.

शाहिद हसला. अगदी मंद.पण अगदी दिलखुलास ...मनापासून. लोकेशला चूकचुकल्यासारखे झाले.

''काय झाल?''
''मी मधू बरोबरच लग्न करणार आहे..'' - शाहिद. आता समोरचा समुद्रही लोकेशसारखाच चकित झाला होता.
''काय?.. Are You OK?.. You mean you and Madhu..?...'' - लोकेश ला विश्वास बसतनव्हता
''हो.''
''पण का?' I mean you deserve much better than her yaar...""

''तसं नाही रे. हे बघ माणूस आयुष्यात सर्वच हव तसं मिळवू शकत नाही. किंबहुना त्याला सर्व मिळालेले त्याच्या आवडीचे असतेच असेही नाही. त्यात बदल होत राहतात. काहीवेळा काळ बदलतो अन काहीवेळा आपण. एखाद्या मुलीला प्रेम करताना लग्न करतना आपण फारतर आजपर्यंत काय काय गृहीत धरतो?..जात , धर्म , करियर, शिक्षण आणि अश्याच छोट्या मोठ्ठ्या तडजोडी नाहीत का ?.. त्यात आपण काही बदल अपेक्षित धरतो काही समोरचा. तर काही अपेक्षा काळाकडून असतात. बरोबर ना?..

आणि नाहीतरी मधूला वाटल असत तर मला काय कोणालाच हे सत्य कधीही कळाल नसत. तशी गरजच नव्हती. ती आता एक परिपूर्ण स्त्री आहे. खंबीर आहे. शरीराने आणि मनानेही. सामाजिक पातळीवर तिचा झालेला छळ- अस्वीकार, भोगी आलेल्या अवहेलना, आमरण साथ देत आलेले एकटेपण, भावनांचा गदारोळ आणि वैयक्तिक आयुष्याची अस्वस्थ वाटचाल या सर्वातून स्वत:ला सावरून ती या निर्दयी जगासमोर जगात आहेच ना..?.. या गोष्टीत कोणी तरी तिला समजून घेईल अशीच तिची छोटीशी इच्छा..!! त्या अजान पोरीला याचीही कल्पना आहे की तीने हे सर्व मला सांगितलं खर पण जर मी पण अविश्वासू निघालो तर परत तेच सर्व दु:ख डोंगर तिला पुन्हा दिसतील. पण नाही..ती ला मी आवडतो . खूप प्रेम करते ती माझ्यावर. माझही तितकंच प्रेम आहे तिच्यावर. कालच तिने मला सर्व सांगितलं. खूप वाईट वाटल मला. म्हणून तर ती दारू आणि धिंगाणा. पण आज पूर्णवेळ इथेच बसून विचार केला. अगदी सरळ आणि प्रात्यकक्षिकतेने ..

मला माहितीये की फक्त मधुच हे गुपित असंच टिकवून ठेवून- माझ्यापुरतच मर्यादित ठेवून पण पण मी तिची मदत करू शकतो. पण मन ऐकत नाही. मी खर प्रेम केलंय तिच्यावर. माणूस बदलत जाणाऱ्या किंवा सर्व गोष्टीमुळे आपल्यात आलेल्या बदलांना अनुकूलन म्हणतो, प्रगती म्हणतो, क्रांती म्हणतो. पूर्वीपासून चालत आलेल्या आणि मनाला न पटणाऱ्या अघोरी रूढी परंपरातून आणि प्रथाथून आपण कधीच बाहेर आलो आहोत . ते तर मानवाने बनवलेले आहेत. हा तर नैसर्गिक बदल रे. याला आपण का स्वीकारू नये?..''

- शाहिदच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने स्वत:ला आणि त्याला लोकेशने त्याला एवढा गंभीर पाहिलं होत. तेही असं क्रांतिकारी निर्णय घेताना ..!!

''हे गुपित आपल्या दोघातच राहिल असं मला विश्वास आहे ..- शाहिद ने भुवया वर करून लोकेशला शंकायुक्त विचारलं..
'' बस क्या..'' - लोकेशने होकारार्थी मान हलवली.

दोन मित्र लगेच मजा मस्करी करत खांद्यात खांदा घालून निघाले होते. रात्र जन्माला येत होती..

x x x x x x x x x x

आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शाहिद ने जेवताना भर ऑफिस मध्येच मधूला लग्नाची मागणी घातली तेव्हा ती गडबडून गेली होती. हसावं की रडावं तिला कळत नव्हते. तिला अतोनात आनंद झाला होता. लाजून लाजून ती लाल झाली होती. सर्वीकडे टाळ्या चा आवाज, जल्लोष होत होता.लाजत लाजत अचानक रडायला लागली अन शाहिदला धावत येवून घट्ट मिठीत विसावली.ती का रडतेय?.. अस थोड्या लोकांना चुकचुकलच.. तेवढ्यात लोकेश बोलला.

'' लग्नात उशीर होतोय. विरह सहन होत नाहीये बहुतेक..म्हणून वाईट वाटतंय ना..?..होय ना वहिनी?..'' - अन परत एक हास्यतुषार..

चटकन मधू लाजत शाहिद पासून दूर पळाली. अन दूर उभ राहून हसायला लागली. अगदी निखळ..सोज्जवळ.. जर कालचा समुद्र जर ते हसू पाहत असता तर शाहिदने त्याला नक्की सांगितलं असत....

''बघ रे, तुझ्या रुंदीशी स्पर्धा करायला माझ्या बायकोच- मधुच हसूच पुरेस आहे..लावतो का पैज?."

तनवीर सिद्दिकी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेन्डर आयडेटीटी फॉल्ट म्हणजे शरीर पुरुषाचे पण भावना स्त्रीच्या!
स्त्रीविषयी आर्कषण नव्हे.

तरी पण एक वेगळा विषय निवडल्याबद्द्ल बरे वाट्ले.

पुलेशु

गोष्ट ठीक आहे, विषय वेगळा अन लिहीण्याची धाटणीही आवडली. Happy

अभूतप्रेम म्हणजे काय? अद्भुत प्रेम म्हणायचेय का ?

बदल..!! अगदी सोपेपणात विचार केला तर दोन उपशब्दाच संकुल..म्हणजे बल आणि दल..एखाद्या दलात स्वत:ला सामावून घेण्यासाठी बलपूर्वक केलेला प्रयास. मग ते बल तुम्ही लावा किंवा कोणी दुसऱ्याने. >>+१. आवड्ली.. Happy

फेसबूकवर तुमच्या कविता वाचल्या होत्या... वेगळी आणि दखलपात्र लेखनशैली!!
ही कथाही तशीच!! वेगळा विचार... मांडणी आवडली...

छान आहे

कसे राहिले होते वाचायचे
अजून खूप वाचायचे बाकी आहे मायबोलीवर

thank you मायबोली

विषय वेगळा आहे, लिखाणाची पद्धतही आवडली
पण शाहिद ने इतकी दारू प्यायचं काही कारण नव्हतं, कारण तो क्लियर होता ना मधुच्या बाबतीत? Uhoh