मराठी चित्रपटाकडून माझ्या अपेक्षा (स्पर्धेसाठी नाही.)

Submitted by दिनेश. on 17 August, 2012 - 08:09

आज चिनूक्सकडून विचारपूस झाली खरी, पण बाकिच्यांचे उत्तम लेख वाचून स्पर्धेसाठी हा लेख द्यावासा वाटला नाही.

पण लिहिलाच आहे, म्हणून इथे पोस्ट करतोय !

००००००००००००००

स्पर्धेचे केवळ निमित्त झाले, बरेच दिवस मनात जे होते, ते लिहून काढायची संधी मात्र घेतोय.मराठी चित्रपट बघणे, हि माझी मानसिक गरज असते. भारतवारीत एका खास दुकानात जाऊन, गेल्या सहा महिन्यात, कुठल्या मराठी चित्रपटांच्या सिडीज आल्यात, त्याची चौकशी करुन, मी (बहुतांशी आंधळेपणाने ) खरेदी करत असतो. मग परदेशात आलो कि त्या पुरवून पुरवून बघतो.
मराठी चित्रपट बघण्याचा, केवळ हाच एक पर्याय मला उपलब्ध आहे. यू ट्यूबवर देखील काही चित्रपट आहेतच.

बाकी नव्या चित्रपटांची समीक्षा वाचून पुढच्या वेळी, कुठल्या सिडीज घ्यायच्या, त्याची यादी करत राहतो.

मधली काही वर्षे सोडली तर मी सातत्याने मराठी चित्रपट बघतोय. सर्वच बघता येतात, असे नाही. पण जे बघतो, त्याने मराठी चित्रपटाबद्दल, आशा आणि अपेक्षा निर्माण झाल्यात, एवढे मात्र नक्की.

अत्यंत आवडले असे म्हणण्याजोगे मराठी चित्रपट येत आहेतही, पण तरी काहीतरी उणीवा राहून जातात, त्यातल्या काही इथे नोंदवायचा प्रयत्न करतो.

१) कथानक
कथा, किंवा सशक्त कथा हि मराठी चित्रपटांचा कणा होती. पण कथेबाबत मात्र, काहिशी निराशा आता
दिसते. मराठीत उत्तम साहित्य, आजही निर्माण होत असते. पण ते पडद्यावर येत नाही, आणि तसा प्रयत्न झाला, तर मूळ कलाकृतीला पुरेसा न्याय दिला जात नाही. (ताजे उदाहरण - अजिंठा )
अशा साहित्याचा शोध घेणे गरजेचे आहे.
खुपदा साहित्य तसेच्या तसे चित्रपटात आणणे शक्य असतेच असे नाही, पण याबाबतीत चित्रपटांनी नाही, तर
नाटकांनी, उत्तम कामगिरी केलीय. गमभन (शाळा) आणि रणांगण ( पानिपत ) हि ती दोन.
दोन्ही कादंबर्‍या वाचून यावर नाटक होऊ शकेल, असे सामान्य वाचकाला, वाटलेही नसते. पण रंगमंचाच्या
मर्यादा, लक्षात घेऊनही, हे दोन्ही प्रयोग नेटके झाले.
चित्रपटाला तशा (म्हणजे आर्थिक बाब सोडली तर ) मर्यादा कमी असतात.
असे साहित्यच नव्हे तर काही कथाही नीट या माध्यमासाठी फुलवता येतात. (उदा. गंध) गंध च्या बाबतीत,
गंधाचा थेट अनुभव हे माध्यम, देऊ शकत नसतानाही, केलेला प्रयोग चांगला जमला होता.
कथानक, थेट या मातीतले असावे निदान, मराठी मनाला भिडणारे असावे. हि किमान अपेक्षा.
बाकी भाषांतील साहित्य मराठी चित्रपटात आणले, तर ते थोडे कृत्रिम वाटेल. पण तोही प्रयोग करण्यासारखा
आहे. मराठीत आणताना, मात्र उत्तम रुपांतर जमायला हवे. ( उदा. हिंदी चित्रपट, रेनकोट )
अगदी सद्य स्थितीवरचे म्हणजेच मराठी माणसाचे ज्वलंत प्रश्न, आणले तरी स्वागतार्ह आहेत. (डोंबिवली फास्ट) पण त्यावर सोपी, उत्तरे मात्र नकोत.
अनेक यशस्वी ठरलेल्या मराठी चित्रपटांबाबत ( सांगत्ये ऐका, एक गाव बारा भानगडी, पाठलाग, पिंजरा, श्वास ) उत्तम कथा, हे एक महत्वाचे कारण होते.

२) पटकथा

उत्तम पटकथा, मराठीत अभावानेच दिसते. चेकमेट ची पटकथा उत्तम होती, पण तरी साधारणपणे सरळधोपटपणे, कथानक सांगणे, हाच प्रकार जास्त दिसतो.
मी अलिकडे बघितलेल्या, किनयारवांडा या आफ्रिकन चित्रपटाची पटकथा, खुपच अनोखी होती. हिंदीतही असे
प्रयोग होत असतात. मराठीतदेखील पुर्वी असे चांगले प्रयोग झाले आहेत. (उदा. मुक्काम पोस्ट ढेबेवाडी )
असे काही प्रयोग, जिथे पेक्षकाला विचार करणे, त्याचा चित्रपटातील रस कायम ठेवणे, गरजेचे आहे.

३) निर्मिती मूल्य

सध्या मराठी चित्रपटाशी संबंधित कुणाही व्यक्तीला विचारले, तर आर्थिक प्रश्न हा सर्वात जास्त भेडसावणारा
प्रश्न आहे, असे उत्तर मिळेल. पेक्षक नाही, म्हणून उत्पन्न नाही, उत्पन्न नाही म्हणून चांगली निर्मितीमूल्ये
नाहीत. म्हणून चांगली निर्मिती नाही, म्हणून प्रेक्षक नाहीत असे दुष्ट चक्र आहे.
पण तरीही निर्मिती मूल्ये मर्यादीत ठेवूनही, उत्तम निर्मिती अशक्य नाही. (उदा. गाभ्रीचा पाऊस )
चांगले भांडवल ऊभे करु शकतील असे लोक मराठीत आजही आहेत. पण त्यांनी स्वतःच निर्मिती करण्याची
हौस करण्यापेक्षा ( उदा. समांतर ) धडपडणार्‍या कलाकारांना आर्थिक सहाय्य करावे, अशी रास्त अपेक्षा आहे,
माझी.

४) दिग्दर्शन

दिग्दर्शक हा चित्रपटाचा सर्वेसर्वा असावा, अशी रास्त अपेक्षा. त्याने पुरेसा अभ्यास करुन कलाकृती सादर करावी
अशी अपेक्षा. अनेकदा एखाद्या क्षुल्लक बाबीकडे दुर्लक्ष करुन, सगळ्या चित्रपटाचा विचका केला जातो.
एकाच व्यक्तीला सर्व बाबी संभाळणे अशक्य आहे हे कबूल. पण त्या क्षेत्रातील तज्ञ माणसे, मराठीत उपलब्ध
असताना, त्यांची सेवा न घेणे, हा मात्र अविचार आहे.
उदा. बालगंधर्व ची निर्मितीमूल्ये उत्तम होती तरी कपडेपटाबाबत मात्र, केवळ हिंदीत यशस्वी झाली, म्हणून
नीता लुल्लाला ती जबाबदारी देणे, याने या सुंदर चित्रपटाचे नुकसानच केले. तिने ते काम अर्थातच मनापासून
केले नाही. बालगंधर्वांच्या साड्या हे त्याकाळात मराठी माणसाचे कौतूक होते, तसा प्रसंगही चित्रपटात आहे,
पण नीताने तो विचार केला नाही. इतकाच नाही, तर रंगाचाही विचार केला नाही. (द्रौपदी नाटकातील
प्रसंगाच्या वेळी, मागील पडदा आणि साडीचा रंग एकच होता.
गंध मधे पण, नीना कुळकर्णीच्या साडीचा पोपटी रंग, काळाशी सुसंगत नव्हता.

५) अभिनय

अभिनयाच्या बाबतीत मात्र मराठी चित्रपटसृष्टी कायम श्रीमंत राहिली आहे. फक्त गरज आहे ती भुमिकेशी
सुसंगत असे कलाकार निवडण्याची. ती देखील बहुतांशी पुर्ण होतेच, पण नेहमीच्या यशस्वी कलाकारांचा
मोह सुटताना दिसत नाही.

प्रत्येक चित्रपटात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी दिसावेत, हे कसे खपवून घ्यायचे. एकेकाळी
प्रत्येक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ असत, तसेच परत होतेय.

ज्यांनी अभिनयाचे धडे द्यावेत असे कलाकार आजही मराठीत आहेत, पण ज्यांनी ते घ्यावेत, अशी अपेक्षा आहे,
ते मात्र अजूनही, तितकेसे कष्ट घेताना दिसत नाहीत.

६) संवाद

मराठी भाषेच्या बोलीभाषा, हे या भाषेचे वैभव आहे. एकेकाळी बहुतांशी चित्रपटात कोल्हापुरी भाषा असे (कारण
निर्मिती पण तिथेच होत असे. ) पण बाकीच्या बोलीभाषा क्वचितच दिसतात. दर १० मैलावर बदलणार्‍या
भाषा सोडू, पण अगदी ठळक वैषिष्ठे जपणार्‍या बोलीभाषाही ( कोकणी, वैदर्भीय, अहिराणी, आग्री ) मराठी
चित्रपटात कमीच ऐकू येतात. खुपदा मुंबई पुण्याकडची ( हे पण मिथकच. मुंबई आणि पुण्याची भाषा वेगळी,
मुंबई, पुणे, मुंबई चित्रपटात ती ऐकू आलीच.) प्रमाण भाषाच वापरली जाते. कथानकातील पात्र ज्या ठिकाणी
राहतात, तिथली भाषा नको का वापरायला ? आणि आजही, अगदी आजची तरुण मुलेदेखील भाषेचे हे वैभव
जपतात. पण चित्रपटात मात्र हे भान राखले जात नाही. उदा. नटरंग मधे नायकाच्या वडीलांचे पात्र सोडले, तर
बाकिची पात्रे, योग्य ती भाषा बोलत नाहीत.

बोलीभाषेचे राहू द्या, संवाद नैसर्गिक सुद्धा वाटत नाहीत. या संवाद लेखकांवर मालिकांचा प्रभाव नक्कीच आहे.
तो कलाकारांच्या बोलण्यातही जाणवतो.

७) संगीत

संगीताच्या तर फारच अपेक्षा आहेत. सूंदर शब्द आणि त्याहून सुंदर चाल, हे मराठी चित्रपटाचे भूषण होते.
गदीमां, खेबुडकर, शेळके, च्या काळात गरजेनुसार केलेले गीतलेखनही, उत्तम काव्यदर्जा राखून होते.
ते कुठेतरी हरवल्यासारखे वाटतेय. आजच्या गाण्यातली शब्दकळा, जास्त साहित्यिक झाल्यासारखी
वाटते. ती विषयाला आणि पात्राच्या तोंडी गाणे असेल, त्या पात्राला शोभणारी असावी. हि अपेक्षा.
सुर्व्या आला तळपून गेला, मावळतीच्या खळी गालाला... सारखी.

संगीतकार प्रतिभावान आहेत हे नक्कीच. पण पहिल्या चित्रपटाचा उत्साह टिकवणे गरजेचे आहे. गाण्याच्या
एक साचा लोकप्रिय झाला, तर त्याच साच्याचा वापर करुन, अनेक गाणी निर्माण करणे, हे अर्थातच नाकबूल.
मी फक्त कोंबडी आणि चमेली बद्दलच नाही लिहित. साचेबद्ध लावणी किंवा एकंदरच ठराविक ढोलकीच्या तालातली गाणी, कंटाळा आणतात. मी आशा भोसलेनी गायलेल्या, काही अलिकडच्या लावण्या ऐकल्या, आणि
खुप निराश झालो. आशाच्याच आवाजातल्या अनोख्या लावण्या, आज इतक्या वर्षांनतरही जून्या वाटत नाहीत.

आशानेच नव्हे तर नव्या कलाकारांनी पण उत्तम गाणी गावीत, अशी अपेक्षा आहे. अत्यंत गुणी कलाकार
उर्मिला धनगर, फेरारी कि सवारी साठी, उत्तम लावणी गाते आणि मराठीत ती असू नये, याला काय अर्थ आहे ?

८) नृत्य

नृत्य हा मराठी चित्रपटाचा महत्वाचा हिस्सा होता असे मी म्ह्णणार नाही. मराठीत जास्त करुन लावणीनृत्यच
सादर झाले. माझ्या आठवणीत, हंसा वाडकर, जयश्री गडकर, संध्या, उमा, नर्गिस बानू, लिला गांधी यांनी
सादर केलेली अनेक नृत्ये आहेत.
या कलाकारांचा वारसा पुढे उषा चव्हाण आणि उषा नाईक या दोघींनीही चालवला. पण पुढे हि परंपरा
खुंटल्यासारखी झाली.

लावणी नृत्यांगना (सुरेखा पुणेकर, राजश्री नगरकर, माया खुटेगावकर अशा अनेक) उत्तम लावण्या इतरत्र सादर
करत असताना, नृत्यासाठीच नव्हे तर नृत्यदिग्दर्शनासाठी त्या मराठी चित्रपटात का आल्या नाहीत ?
निवडुंग मधे उत्तम नृत्ये सादर केल्यावरही, अर्चनाला नृत्यमय भुमिका का मिळाली नाही ?
आजकालची नृत्ये जोरकस असतात आणि कलाकार त्यासाठी फार मेहनत घेतात हे खरेय पण नृत्याभिनयात
मात्र कमी पडतात, हे देखील खरे आहे.
सांगत्ये ऐका मधली, काल राती बाई मजसि झोप नाही आली हि लावणी हंसाबाईंनी, केवळ मुद्राभिनयाने
सादर केलीय.
त्यामूळे जर मराठी चित्रपटात नृत्य असलेच तर ते परीपूर्ण असावे, अशी अपेक्षा.

अगदी परीपूर्ण असा चित्रपट निर्माण करणे अवघड आहे, त्यामूळे सर्व अपेक्षा नाही पूर्ण झाल्या, तरी मराठी
चित्रपट बघणे सोडणार नाही... कारण वर लिहिलेच आहे, ती माझी मानसिक गरज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशजी लेख आवडला,भावना पोचल्या.
एका छोट्याशा उल्लेखाबद्दल धन्यवाद.
निर्मला देशपांडेंच्या 'सलत सूर सनईचा' या कादंबरीचा उल्लेख.
बाईंची केवळ अप्रतिम चित्रशैलीतील अजून एक कादंबरी आहे- 'बन्सी काहेको बजाई' - नुसतं वाचतानाच मनात चित्रं सरकतात,कविता तरंगतात. हे असं लेखन पडद्यावर कोण आणेल? ते व्यावसायिकदृष्ट्या कसं यसस्वी होईल?
ले.शु.

दिनेशदा

याच विषयावर लिहायचे मनात असल्याने वेळ झाला वाचायला. आताच लिखाण हातावेगळं केलं आणि हा लेख वाचायला घेतला. एकूण एक मुद्याशी सहमत आहे. माझ्या लेखात हे मुद्दे आलेच आहेत. संगीत हा कळीचा मुद्दा तुम्ही खूप छान मांडलाय. एकूणच आपल्या अपेक्षा अवास्तव नाहीत आणि हे मुद्दे ब-याच जणांच्या मनात असण्याची शक्यता आहे हे जाणवलं.

लेख स्पर्धेसाठी नाही हे खटकतंय. द्या ना स्पर्धेत !

नंदाने काही मोजके मराठी चित्रपट केले. पण जर उत्तम कथा असत्या तर या मोठ्या कलाकार, मराठीत आल्या असत्या. साऊथवाले, कसे खेचून घेतात, अभिनेत्रींना, तसे.

पुर्वी, विलास कलंगुटकर असा एक देखणा मॉडेल होता (एल्पार ) त्याला फक्त मी एका दूरदर्शनवरच्या नाटकात बघितले. सुबोध भावे, आता प्रचंड स्थूल झालाय. उमेदीच्या काळात विक्रम गोखले, पण देखणा
होता (सावध हरीणी सावध गं ) मराठी भाषिक स्मार्ट लोक नसतील, हे शक्यच नाही.

रजत कपूर चे सदोष मराठी खपवत दोन चित्रपट आले ( लिमिटेड माणुसकी, गुलमोहोर) पण मला असह्य झाला तो.

भारती, बन्सी काहे को बजायी, माझी वाचायची राहिली. त्यांच्या आत्मचरित्रात उल्लेख आहे त्या पुस्तकाचा. पण मागच्या भेटीत मिळले नाही.

उदयन, अगदी तसाच चित्रपट होता, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी. भरपूर गाणी, लावण्या होत्या, तरी कथानक
जबरदस्त होते. पडछाया मधला पण सस्पेन्स चांगला होता.
हर्‍या नार्‍या जिंदाबाद भूतपट होता.

सी रामचंद्र यांनी स्वतः भुमिका केलेला, डिटेक्टीव्ह धनंजय असे पात्र असणारा एक चित्रपट आठवतोय, पण त्या पठडीतले चित्रपट मात्र आले नाहीत.

बूमरँग, त्यातल्या बहुतेक चित्रपटांचा मी उल्लेख केलाय. पण पुर्वी यापेक्षाही वेगळे विषय आले
होते मराठीत. फरार (जयश्री टी) असाच थरारपट होता. प्रीत तूझी माझी (अमोल पालेकर, जयश्री टी) हा
पण चांगला कॉमेडी होता. शांतता खून झाला आहे, बरा सस्पेन्स होता (हेलनचा नाच होता त्यात.)
मोठ्या बजेटचे, सुभद्रा हरण, स्त्री, किचकवध असे चित्रपट आले होते. ते द्वीभाषिक होते.

हिंदी चित्रपटात, आयटम साँग हवेच असते तशी मराठीत एखादी लावणी का नको ? दर्जेदार मात्र हवी.

राजकीय विषय, पुढारी - सिंहासन - सरकारनामा - झेंडा... इतक्यातच आटपले. बाळ ठाकरे भासमान होतील, अशी पात्रे हिंदीत आली (सरकार राज) मराठीत नाही. गुलजारच्या हू तू तू मधे, सुहासिनी मूळ्ये यांनी मराठी मुख्यमंत्री साकार केली होती. पण तशी एकही व्यक्तीरेखा मराठी चित्रपटात आलेली
आठवत नाही.

पाठलाग, अश्रुंची झाली फुले (नाटक), तो मी नव्हेच (नाटक), सासुरवाशीण, माहेरची साडी, महानंदा या
मराठी चित्रपट / नाटकावरुन हिंदी चित्रपट आले. पण उलटा प्रकार क्वचितच झाला.
पडोसन ची भ्रष्ट नक्कल मधे आली होती.

शेवटचा मालुसरा हा चांगला लष्करपट होता. रंग दे बसंती सारखा विषय, आत्माराम भेंडे यांच्या एका
मराठी नाटकाचा होता. पण मराठीत चांगले लष्करपट नाहीत. लष्करात, पराक्रम गाजवणारी, मराठा रेजिमेंट आहे, पण चित्रपटात तिचे शौर्य दिसले नाही.

परत लिहितो, उद्या (आठवून आठवून )

ब-याच गोष्टींचा उहापोह झालाय यात......... ते सर्व पटण्यासारखेही आहे
माझे मत थोडे वेगळे आहे - मुंबईत मुख्यतः हिंदी चित्रपट निर्मिती होत असल्याने व त्याच जीवावर ही इंडस्ट्री मुख्यतः चालत असल्याने सगळे तिकडेच ओढले जातात - कलाकार, तंत्रज्ञ, इतकेच काय प्रेक्षकही.......
बाकी सिनेमांसारखीच मराठी सिनेमात काही ना काही त्रुटी असतेच.......पण एक कारणही पुरेसं होतं तो सिनेमा रद्दी ठरायला...... तुलना केली तर सध्याचे काही बरे सिनेमे आहेत पण अप्रतिम म्हणवणारे बोटावर मोजता येण्यासारखेच...
शिवाय शहरी व ग्रामीण प्रेक्षकांची आवड, विषय वेगळे असणारच....... असं काय काय आहे......

दिनेश, खूप सुंदर झालाय लेख. बरेचसे मुद्दे पटले - २ सोडून

संगीतः आजचे चित्रपट संगीत खरच खूप चांगलं होतय. माझ्या सारख्या कालच्या माणसाला पण आवडतय आणि आजच्या मुलांना पण आवडतय ते. आजचा चित्रपट हा त्यांच्या पिढीचा आहे त्यामुळे त्यांच्या आवडीनुसार तो बनला तरच टिकणार, वाढणार तो. पण त्यातही अनेक सुंदर गाणी बनताहेत आजकाल. उदाहरणादाखल काही (मी वेगवेगळ्या संगीतप्रकार निवडायचा प्रयत्न केलाय):
१. लल्लाटी भंडार
२. मन उधाण वार्‍याचे
३. चिन्मया सकल हृदया
४. मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
५. कोंबडी पळाली
६. उगवली शुक्राची चांदणी

अभिनयः मला नाही वाटत की हिंदीत गाजलेले मराठी कलाकार हे तयार झाले असते / होतात मराठीत काम करायला. त्यांना तो कायम दुय्यमच वाटत आलाय - प्रसिद्धी, पैसा, स्टेटस अशा अनेक बाबतीत. नताशा, दिपांजली म्हणतात तसा मराठीत देखणा हिरो नाही. पण हिंदी मालिकात देखणे मराठी कलाकार आहेत. म्हणजे त्यांनाही मराठी चित्रपटापेक्षा हिंदी मालिका जास्त महत्वाच्या वाटतात.

अजय अतुल हिंदीत गेल्यापासून त्यांचेही मराठीकडे दुर्लक्षच झालय.

माधव,
अगदी अलिकडची काही गाणी ऐकायची राहिलीत माझी.
मराठीत तेवढा ताकदीचा दिग्दर्शक असता तर हे कलाकार खेचू शकला असता. जैत रे जै मधली स्मिताची भुमिका, मला करायला आवडली असती, असे हेमामालिनी म्हणाली होती.
पिंजरासाठी पण कुणीही अभिनेत्री तयार झाली असती..

गाण्यांबद्दल मी आताच एक सविस्तर लेख पोस्टलाय.

सचिनने एक छान चित्रपट दिला होता.
त्याचे नाव आत्मविश्वास. अगदी वेगळा विषय.
त्यातल्या कलाकारांची नावेच दडपून टाकणारी आहेत.

निलकांती पाटेकर, मधुकर तोरडमल, सचिन, वर्षा उसगांवकर, अशोक सराफ, किशोरी शहाणे, प्रशांत दामले,
अर्चना पाटकर, दया डोंगरे, सुधीर जोशी, सुनिल बर्वे, मनोरमा वागळे, जयंत धर्माधिकारी, आशालता...

पण निलकांती ने नंतर कुठलाच मराठी सिनेमा केला नाही.

हा सिनेमा आणि सरकारनामा, मी मुद्दाम थिएटरला जाऊन बघितले होते.

Pages