केबिनमधील माझ्या टेबलावरच्या महत्वाच्या फायलींची मी साडेअकरालाच आवराआवर सुरू केली तेव्हा माझ्या सेक्रेटरीला उकळ्या फुटल्या. "जेमतेम तीन तास काम करूनच हा घरी निघालाय! व्वा, देवा, तुला लक्ष लक्ष प्रणाम!" ही तिच्या मनात उमटलेली वाक्यं मला स्पष्ट ऐकू आली. "घरून फोन बीन आलाच तर मी मीटींगमधे आहे असंच सांगा" असं तिला बजावून मी बाहेर पडलो. सेक्रेटरी तशी हुशारच होती. "हा आता कुणाला तरी घेऊन मॆटिनीला जाऊन बसणार" हेही तिच्या मनातलं वाक्य मला ऐकू आलं, अगदी माझ्या गाडीत बसताबसता.
खरं होतं ते. मी मॆटिनीलाच निघालो होतो, चक्क चोरून. गाडी चालवता चालवताच मला हसू फुटलं. मला सवयच होती चोरून पिक्चर पहाण्याची. अगदी शाळेत असल्यापासून. आजीच्या पैशाच्या डब्यातून मारलेले आठ आणे! त्या आठ आण्यांची सर आजच्या आठशे रुपयांना नाही. ब्रह्मांड मिळायचं विकत तेवढ्या पैशांत. दोन शो पाहून शाळेत परतायचं आणि दिनकर शिपायानं बाजूला ठेवलेलं दप्तर घेऊन घरी जायचं. एकदा दिनकर भेटला नाही आणि दप्तराविना घरी गेलो तेव्हा फटाके वाजलेलेही कानात चांगले ऐकू येतात अजून.
'सांगत्ये ऐका'तले ते भन्नाट नाच. माझं टक लावून पहाणं. द एंड झाल्यावर लाईट पेटले तेव्हा शेजारच्या खुर्चीवर दिसलेले आमचे हेडमास्तर.
आत्ता गाडी चालवतानाही माझा हात कानाखाली जातोय. काहीतरी हुळहुळतंय.
प्रॆक्टीस मेक्स यू परफेक्ट. मीही तरबेज बनलोच. सिनेमा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच पोचणे. सर्वात मागची खुर्ची पकडून दबा धरून बसणे. येणारा प्रत्येक प्रेक्षक फिल्टर करणे. दरवेळी आठ आठ आणे कशाला मारायचे. आजीची स्वातंत्र्य पेन्शन केव्हा येते ते ठाऊक असायचंच. तेव्हां त्या सुमाराला एकदमच पुढची बेगमी करून ठेवणे. शाळेत दप्तर ठेवण्याचा मूर्खपणा थांबवून ते शाळेबाहेरच एका घनदाट झाडावर ठेवणे, इत्यादी सावधानता बाळगता बाळगता मी परफेक्ट झालो. भीती उरली नाही. चित्रपट अधिक चवीने पहाणे शक्य झाले. चोरून पाहिलेल्या त्या चित्रपटांतून मी खूपच रस ग्रहण केला आणि आनंद प्राप्त केला.
असे किती आणि कोणते चित्रपट चोरून पाहिले मी? ’किती’चे उत्तर ’खूपच’. ’कोणते?’ अगदी शम्मीकपूरच्या जंगली, देवानंदच्या जब प्यार किसीसे, राज कपूरच्या जिस देशमें पासून थेट सांगत्ये ऐका, गणगौळण, काही खरं नाही, घरचं झालं थोडं, अवघाची संसार, ते वळू, शाळा, टिंग्या, आणि देऊळ पर्यंत.
हिंदी चित्रपट शाळा बुडवून पहायला खूप मित्र येत. पण मराठी सिनेमे पहायला? क्वचितच एखादा सोबती मिळे. पण त्यामुळंच तर मी हे सिनेमे शांतपणे व एकाग्रचित्त होऊन पाहू शकलो. असं एकाग्र होऊन चित्रपट पहाण्यात एक वेगळी अनुभूती, शहाणपण, आनंद, आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा एखाद्या कलेचं आपण अशा डोळसपणे आकलन करू पहातो तेव्हां एक प्रकारचं धाडसही आपल्या अंगी येत असतं. आता ’चोरून पहाणं’, व ’धाडस’ या विरोधी चीजा एकत्र कशा असे म्हणाल तर मी तरी काय सांगणार! पण तसे होते खरे. म्हणूनतर ’सांगत्ये ऐका’ चोरून पहाताना मी घाबरलो तर होतोच, छातीत धडधडतही होतं, हेडमास्तरांनी शेजारच्या खुर्चीवरून मला पाहिल्यावर तर मी घाबरून जवळजवळ मेलोच. पण तरीही त्यांनी नंतर जेव्हां विचारलं, "काय आवडलं रे तुला त्या सिनेमात?" तेव्हां मी सरळ सांगितलं, "जयश्री गडकर."
तर लक्ष देऊन ते मराठी सिनेमे पाहिले म्हणून आज ’माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट’ कसा असेल ते आपल्याला सांगू शकणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या मनात आलेल्या एका प्रश्नाचंही उत्तर मला दिलं पाहिजेच. आपण नक्कीच विचाराल, ’जंगली, जब प्यार, सांगत्ये ऐका’पर्यंत ठीक आहे, पण वळू, देऊळ, शाळा तर आजचे चित्रपट. आता या वयातही हे सिनेमे ’चोरून’ पहायची का वेळ यावी?
या प्रश्नाचेही उत्तर मी धाडसाने देऊ शकेन. ’शामची आई, पोस्टातली मुलगी, कन्यादानपासून पाठलाग, पांडू हवालदार, सामना, माहेरची साडी ते वळू, टिंग्यापर्यंत. युगं लोटली पण मराठी चित्रपटाकडं पहाण्याचा मराठी माणसाचा दृष्टीकोन बदलत, बदलला, बदलणार नाही असेच दिसते. मराठी सिनेमे म्हणजे न बघण्यालायक, बेकार कथानकाचे, नुसतं आपलं टॆण, टॆण, टॆण, टॆण, ढुमाक, साडीच्या पदरावर महापूर, संगीत-झीरो लेव्हलचं, दिग्दर्शन......ते काय असतं वगैरे, वगैरे मतंच अजून जिथंतिथं विखुरलेली आहेत. पत्नीला सिनेमाला येतेस का असं विचारलं तर ती खुषीत तयार होते. पण ’मराठी सिनेमा’ म्हटलं की हल्लाबोल. शेवटी मला माघार घेऊन हिंदी सिनेमाला जाणं भाग पडतं. तीच गोष्ट ऒफिसातल्या किंवा इतर मित्रांबाबत. तर यामुळंच मला मराठी चित्रपट चोरूनच पहावे लागतात.
खरे तर माझी मराठी चित्रपटाबाबतीतील अपेक्षा चार ओळीतही सांगता येईल, पण विस्तृत पार्श्वभूमीशिवाय कुठल्याच गोष्टीला मजा येत नाही. खरे ना?
सिनेमाचे सर्वात महत्वाचे अंग म्हणजे ’निर्माता’ असे माझे मत आहे. काळाच्या ओघात आता याचे विस्मरण होत चालले आहे. पण पूर्वी जेमिनी, प्रभात, एव्हीएम, आर.के., नवकेतन, राजकमल इत्यादी संस्थांनी, व के.असिफ, अमरोही, राजा परांजपे, अनंत माने या व्यक्तींनी सुंदर सुंदर चित्रपटांची निर्मिती केली. किंबहुना ते चित्रपट अधिक सुंदर वाटले ते ती त्यांची निर्मिती होती म्हणून. जेमिनीची दोन छोटी बाळे व बिगुल....सिनेमाभर दिसत आणि ऐकू येत रहायचा.
आजही मी कुणा देशद्रोह्याने काढलेला सिनेमा पहायला जाऊ शकत नाही. चुकूनमाकून गेलो तरी एंजॊय करू शकत नाही. म्हणून मला दिलसे वाटते की माझ्या अपेक्षेतल्या मराठी चित्रपटावर निर्माता म्हणून नाव झळकावे ते निष्पाप, निर्मळ ’प्रभात फिल्म्स.’ दुसरे तिसरे कोणीही नको.
दिग्दर्शकाची खुर्ची अर्थातच सुपर क्लास फिल्म्स देणारे कै. राजा परांजपे यांची. दुर्दैवाने ते आता नाहीत. त्यांच्या जवळपास येणारा दिग्दर्शक शोधायला गेलो तर तो मला दिसला तो टिंग्या या चित्रपटात, संजय हडवळे यांच्या रुपात. अतिशय संयमित, टू द फॆक्ट, संवेदनशील दिग्दर्शन!
चित्रपटाचा विषय मला 'देऊळ'सारखा समाजातील एखाद्या समस्येचं विश्लेषण करणारा, अंधश्रद्धांवर आसूड ओढणारा, किंवा 'शाळा'प्रमाणं तरल भावविश्वात घेऊन जाणारा असा हवा. अंधश्रद्धेचा विषय असेल तर मी विशेष सल्लागार होण्याची विनंती श्री. नरेन्द्र दाभोळकर यांना जरूर करीन.(पण ते परीक्षक मंडळात तर नाहीत ना?). कसेही असो, पण ’माणूस’ व ’माणसाच्या दैनंदिन जीवनातील अडचणी’ यावर आधारलेलाच मराठी चित्रपट मला आवडेल.
गाण्यांबद्दल काय लिहू? मी खूप गाणी ऐकलीत. पण मराठी चित्रपटांत खरी मजा आली ती, "फिरत्या चाकावरशी देशी मातीला आकार. तसेच आकाशी झेप घेरे पांखरा, किंवा देहाची तिजोरी, नका जाऊ सोडून रंगमहाल, या आणि अशा गाण्यांनी. गदिमा आणि जगदीश खेबुडकर यांनी मराठी गीतांना नजाकत दिली, कर्तव्यबुद्धी दिली, स्वत:ची ओळख दिली. दुर्दैवाने तेही आज नाहीत. मला वाटते मायबोलीवर स्पर्धा घेऊन नवीन जबरदस्त गीतकार शोधण्याची वेळ आली आहे. शिवाय मायबोलीवर खरेच उत्तम क्षमता असलेले काही कवी/कवयित्री आहेत असे मला वाटते. मी मायबोलीवर आपले शब्दप्रभुत्व सिद्ध केलेल्या प्राजु, बेफिकीर, शामली, बागेश्री, व इतर काहींना उत्तमोत्तम गीते/गझला लिहिण्यास आमंत्रित करेन
माझ्या अपेक्षेतील मराठी चित्रपटास संगीत देण्याबाबत अजय-अतुल या जोडगोळीने मला पुरते भारून टाकले आहे. पण अवधूतजीही कमी नाहीत. नवे गीतकार, व अनुभवी संगीतकार हे कॊंबिनेशन खचितच मजा आणेल, आणि शिवाय धंद्याच्या दृष्टीने तरूण पिढीला तिकीटबारीकडे वळवेल-असा मला विश्वास वाटतो- पण मी मूर्ख, स्टुपिड, इडीयट आहे हेही इथे समजून घ्यावेच लागेल.
माझ्या मराठी चित्रपटात एक जबरदस्त आई हवी जी सुलोचनाबाईंइतकीच हळुवार, व इंदिरा चिटणीसांप्रमाणे फणसाळ असेल. रीमा लागू नक्कीच आवडेल.
वडलांच्या भूमिकेत, स्वतःचीच लेक समजून विधवा सुनेचं कन्यादान करणारे दादा साळवी. व्वा, शिकलेली बायको आणि कन्यादानमधल्या त्यांच्या बापभूमिका कशा विसरू? तेच हवेत मला.
आलोच. नायक-नायिकेपर्यंत पोचतोच एवढ्यात. पण आणखी एक अतिमहत्वाची पोझिशन राहूनच गेली. ती तर दिग्दर्शकाच्या तोडीची. ’एडीटर’ची. हिंदी चित्रपट बॊबी डोळ्यांपुढं आणा, अरुणा इराणी, "ए...फसा" म्हणते आणि क्षणात इकडे भन्नाट वेगानं दौडणारी ऋषी-डिंपलची बाईक दिसते. किंवा, ऋषी जमिनीवर धाडकन कोसळतो आणि टिपेला गेलेल्या आवाजातूनच गाणं फुटतं, "बेशक मंदीर मस्जिद तोडो!" खरंच, राजकपूरच्या एडिटींगला तोड नाही.
गायक-गायिका? सुधीर फडके, आशा भोसले, श्रेया, सुनिधी, स्वप्नील
नायक: तो साठीच्या दशकातील अजरामर, हळुवार प्रेमवीर, राजा गोसावी
आणि नायिका? सुकोमल, बोलक्या चेहऱ्याची ’बाई मी विकत घेतला शाम. म्हणणारी ’सीमा’
तुम्ही म्हणाल, "ही गेलेली मंडळी आणायची तरी कशी?"
मी म्हणतो, "मग राजीव गांधींनी कम्प्युटर्स आणले तरी कशाला?"
तर असा आहे माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट. आता काय राहिलंय सांगायचं? निर्मात्यापासून सहाय्यक अभिनेत्यांपर्यंत सर्व काही सांगितलं. काय म्हणता? विनोदी अभिनेता? ओ, हो, हो. तो काय, कोणीही घ्या हो...पण अशोक सराफ सोडून.
आणि चित्रपटाचं नाव? ’माणसाच्या पाठीवर.’
बर. मी येतो आता. मेटिनीचा ’पाठलाग’ टाकायचाय. तिकिट खिडकी उघडलीय. आणि नंतर तीनचा ’काकस्पर्श.’
कुणाला बोलू नका हो. चोरून आलोय. अधिकृतपणे ऒफिसातच आहे. मिटींगमध्ये. माझ्या सिंहासनावर बसून व्यवस्थापनाशी सामना करतो आहे बोनससाठी.
छान जमलाय! मस्त लहान असताना
छान जमलाय! मस्त
लहान असताना चोरून सिनेमा बघायचात तेव्हाचे अगदी वातावरण डोळ्यापुढे उभे राहिले.
दादा कोंडक्यांच्या सिनेमात अचरटपणाचा कळस व्हायच्या आधी त्यांचे सिनेमे चांगले होते. विनोद खट्याळ कॅटेगरीत मोडणारा होता. बघायला मजा येते. सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव आणि पांडू हवालदार ह्यात फार मस्त भट्टी जमलीये सिनेमाची. एकटा जीव.. मध्ये दादा स्वतःच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्या बा कडे जातात तो सीन अफलातून आहे!! भारताचे चॅपलिन म्हणतात त्याना कधी कधी ते अगदी काहीच्या काही नाही वाटत.
वैद्यबुवा: प्रतिसादाबद्दल ऋणी
वैद्यबुवा: प्रतिसादाबद्दल ऋणी आहे. दादांबद्दलच्या आपल्या विधानांशीही सहमत आहे. आपल्या दृष्टीकोनास मान देऊन मी तो उल्लेख काढून टाकत आहे.
Aaho, te fakta majha mat
Aaho, te fakta majha mat aahe. Yewha majkur badalu wagaire naka krupaya.
Dadanchya cinemanbaddal mi suddha ashich samjut karun ghewun motha jhaalo.
Nanter mhanje agadi nokari wagaire laaglyawer pahilyanda mi tyanchi cineme swatantra drushtikinatun paahile aani tewha khupach awadle.
प्रद्युम्नजी : जर मजकूर
प्रद्युम्नजी : जर मजकूर बदलायचाच असेल, तर जयश्री गडकरांबद्दल असलेला मजकूरसुद्धा लिखाणाशी सुसंगत नाही. चित्रपटप्रेम, त्याच्याशी निगडीत आठवणी ( अगदी कुठल्याही वयातल्या आणि अवस्थेतल्या लिहिण्यासाठी पहिला विषय आहे की...) ज्या शब्दांत आल्या आहेत, एक सर्वसाधारण वाचक म्हणून, तुमचं जयश्रीजींबद्दल असणारं चांगलं मत गढूळ करतंय असं वाटतं. चुभूद्याघ्या. राग नको
आवडेश एकदम झक्कास ....
आवडेश
एकदम झक्कास ....
Harshalc जी. आपल्या
Harshalc जी.
आपल्या प्रतिसादासाठी आभार.
जयश्रीबाईंबद्दल लिहिताना कुणाचेही मत त्यांच्याविषयी गढूळ करण्याचा हेतू नव्हता. मी स्वतःही या थोर कलावतीचा आदरच करतो. लेखात आलेल्या ओळी मुख्यत्वे दोन कारणांसाठी होत्या:-
१) हलकासा शृंगार संयत भाषेत इंट्रोड्यूस करण्यासाठी..
२) लहानपणी जयश्री गडकर व सांगत्ये ऐका आवडले तरी मोठेपणी माझ्या अपे़क्षेतल्या मराठी चित्रपटाची नायिका जयश्रीबाई नसून सीमाजी आहेत. मला माझ्या अपेक्षेतील मराठी चित्रपटाला 'माझ्यासारखा' शाळा चुकवून 'ते' पहाणारा चोरटा प्रेक्षक नको आहे, हे सूचित करण्यासाठी.
म्हणूनच हे उल्लेख विषयाला सोडून नाहीत असे मला वाटले. पण आप॑ल्या व इतर काही मित्रांच्या सल्ल्यावर विचार करून मी हा उल्लेख काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर आपण लिहितो कुणासाठी? रसिकांसाठीच.
पुन्हा एकदा आभार.
झक्क जमलाय लेख. हलका फुलका
झक्क जमलाय लेख.
हलका फुलका तरीही अभ्यासपूर्ण ! स्पर्धेतला हा तिसरा विषय अशा पद्धतीने देखील मांडता येईल हे किती छान दाखवलंय लेखात. या निमित्ताने तुम्ही नियमित लिहीलं पाहीजे हे लक्षात आलं
विशालजी, Kiran: आभारी आहे.
विशालजी, Kiran:
आभारी आहे. आपल्या प्रतिक्रियांमुळे खूप लिहावेसे वाटत आहे.
सुंदरच! बदल भावला. धन्यवाद.
सुंदरच!
बदल भावला.
धन्यवाद.
आवडला लेख. हे चोरून चित्रपट
आवडला लेख.
हे चोरून चित्रपट पहायचं थ्रिल काही औरच.
अखेर आपण लिहितो कुणासाठी? रसिकांसाठीच.>>> नै, नै, नै. ते आपलं आपल्यासाठीच. जो रिलेट होईल त्याला आवडेल नाही त्याला नाही आवडणार. जास्त चिंता कशाला?
लेख छान आहे..... शुभेच्छा
लेख छान आहे..... शुभेच्छा
विभाग्रज, ट्यागो, वर्षा
विभाग्रज, ट्यागो, वर्षा हार्दिक आभार.
आज शेवटचा दिवस. स्वतःसह
आज शेवटचा दिवस. स्वतःसह सर्व स्पर्धकांना हार्दीक शुभेच्छा
लहान असताना चोरून सिनेमा
लहान असताना चोरून सिनेमा बघायचात तेव्हाचे अगदी वातावरण डोळ्यापुढे उभे राहिले >>> अगदी अगदी. तुमची लेखनशैली छानच आहे. असेच लिहित रहा. शुभेच्छा !
खरंच बक्षीसपात्र लेख आहे.
खरंच बक्षीसपात्र लेख आहे. आवडला.