हिरा है सदा के लिए : आणखी एक 'रटाळ' लव्हश्टोरी..!

Submitted by A M I T on 16 August, 2012 - 05:05

(एका समसद्वारे प्राप्त झालेली ही कथा मी आपल्या परीने विस्तारली आहे. ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आणि अक्षरश: रटाळ आहे. ही कथा वाचताना वाचकांना 'कंटाळा' नामक आवडती गोष्ट आली असल्यास त्याला लेखक जबाबदार राहणार नाही. कारण लेखकाने मोठ्या चतूराईने शिर्षकातच कथा रटाळ असल्याचं नमूद केलयं.)

याआधीची एक रटाळ लवश्टोरी आपण येथे वाचू शकता.

*

शासनाने मोटरसायकल स्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचं केल्यानंतर सदाला इतका आनंद झाला, जितका आनंद एखाद्या तरूणीने "यु आर सो हॅन्डसम !" म्हटल्यावर चंकी पांडेला झाला असता.
... अ‍ॅन्ड इट्स नॉट अ जोकींग..!

या आनंदाला कारणही तेवढच गंभीर होतं.
त्यादिवशी सदाच्या आईला आणि रक्षाबंधन व भाऊबीज वगळता इतर दिवशी भावाने उधळलेले गुण शपथेवर सांगणार्‍या त्याच्या एकमेव बहीणीला दत्ताचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली.

वास्तविक दत्त मंदीरालगत दोन बोटे अंतरावर स्वर्ग नावाचं नुसत्याच पिवळ्या सोन्याचं दुकान होतं. तिथं ज्वेलरीत कोणत्या नवीन डिजाइन्स येऊ घातल्यात? हे पाहण्यासाठी बहीणीने मोठ्या चपळाईने दत्ताला दत्त म्हणून उभं केलं होतं.

निरनिराळ्या दागिन्यांनी बहीणीच्या हात, नाक, गळा, कान इत्यादी अवयवांवर अतिक्रमण केल्यानंतर माय-लेकी स्वर्गातून सडकेवर आल्या मात्र...
समोर मोटरसायकलवर सदाला आणि त्याला जवळजवळ खेटून बसलेल्या एका तरूणीला पाहताच त्या दोघी भुत पाहील्यासारख्या जागीच खिळून राहील्या. तरूणीचा खिदळण्याचा आवाज मोटरसायलच्या झुsssssप आवाजानंतर नाहीसा झाला.

सदाची आई मोटरसायकलचा ठिपका दिसेपर्यंत तिकडे पाहत राहीली. बहिण मात्र अजुनही तशीच स्तब्ध उभी होती. ती आणखी काही वेळ तशी उभी राहीली असती, तर टिव्हीवर 'स्वर्ग दुकानातील सोन्यानं मढलेला पुतळा आपोआप बाहेर आला' अशी बातमी झळकू लागली असती.

सदा घरी आला तेव्हा घरातलं वातावरण बिघडल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं शीळ घालत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला.
"कोण रे ती?" मिक्सर वीजेच्या बोर्डाला जोडीत आईने प्रश्न केला.
सदाच्या तोंडातून शीळ निघण्याऐवजी नुसतीच थुंकी बाहेर आली.
"कोण कुठली? कुठली कोण?" सदानं व्याकरण चालवलं.
तीच ती मेणका! जी तुझ्या मोटरसायकलवर तुला इतकी खेटून बसली होती की, तुम्हां दोघांमधून हवादेखील पास होत नव्हती." आरशात स्वतःच्या अंगावरले स्वर्गातले दागिने न्याहाळत आणि आरशातून नजर अजिबात न हटवता बहीण बोलली.
बहीणीचं इतकं तपशीलवार वर्णन ऐकून सदा 'हवा'लदिल की काय म्हणतात, तसा झाला.
"अच्छा ! ती होय.. ती.... गोपाळची दूरची बहीण." सदा रेडीओ जॉकीसारखा पटापटा बोलला.
"गोपाळची 'दूरची' बहीण मोटरसायकलवर तुझ्या इतकी 'जवळ' का बरे बसली होती?" नाकाची जागा बदलत बहीण बोलली.
कुणा एकाच्या बहीणीला कुणा दुसर्‍याच्या बहीणीचं हे वर्तन आवडलं नाही.
"म्हणजे त्याचं झालं असं.... मी असा मोटरसायकलवरून जात होतो. रस्त्यात......."
"सांगा एखादी खोटी कथा ! मारा थापा ! रस्त्यात चार-पाच मवाल्यांचं टोळकं त्या गोपाळच्या बहीणीचं विनयभंग करीत होते. मी थोडीशी हाणामारी करून तिला त्यांच्या तावडीतून वाचवलं आणि तिला तिच्या घरी ड्रॉप करण्यासाठी मोटरसायकलवरून जात होतो." आरशाकडे चक्क पाठ करत बहीण म्हणाली.
"तसं काही नाही." सदानं बहीणीचं 'फिल्मी' कथानक नाकारलं.
"मग?" इतका वेळ शांत असलेल्या आईने त्या संवादात आपल्या एका शब्दाची भर घातली.
"ती अशी रस्त्यातून जात असताना तिचा असा पाय मुरगाळला म्हणून, तिला दवाखान्यात घेवून जात होतो." सदाने साभिनय सांगितले.
"उंच टाचांच्या सँडल घातल्यावर आणि काय होणार?" आपल्या भुवया उंचावत बहीण म्हणाली.
"_______________?" मिक्सरचा वेग वाढवत आईने काहीतरी विचारले.
"क्काय?" विमानासारख्या त्या घरघर गोंगाटात सदाला काही ऐकूच आले नाही.
"अरे नाव काय तिचं?" मिक्सर बंद करीत आई.
"हिरा." मुद्दामच डोकं खाजवत सदा बोलला.
"मला वाट्टं, 'हिरा'च्या नादानं तू ब'हिरा' झालायसं." बहीणीने कोटी करण्याची संधी दवडली नाही.
"कुठल्या दवाखान्यात आहे ती?" प्रश्नांच्या मिक्सरमध्ये आईने बहुधा माझी 'चटणी' करण्याचे ठरवले असावे.
"लगेचच डिस्चार्ज दिला." एवढं अंतिम बोलून सदाने इतका वेळ चाललेलं कथानक डिस्कनेक्ट केलं.

....... आणि शासनाने हेल्मेट सक्ती केली.

*

"जानू, माझ्या वाढदिवसाला तू मला काय गिफ्ट देणारेस?" बागेत सदाच्या पाठीला पाठ चिकटवून बसलेली हिरा बोलली.
"प्रिये, बोल तूला काय हवयं?" प्रसन्न झालेल्या देवतेसारखं सदाने तिला विचारले.
"मला किनई काहीतरी महागडी वस्तू हवीय." बागेतलं गवत तोडीत हिरा बोलली.
क्षणभर सदाला वाळवंटात बसल्याचा भास झाला.
"ठीक आहे. मी तूला पेट्रोलमध्ये तळलेले बटाटेवडे घेउन येईन." कालच्या पेपरात वाचलेली पेट्रोल दरवाढीची बातमी आठवून सदाने विनोद करण्याचा एक व्यर्थ प्रयत्न केला.
"तुला जर थट्टा सुचत असेल तर, आम्ही नाही सांगणार काय हवयं ते." तोडलेलं गवत दूर फेकत हिरा.
"बरं बाबा, सांग काय हवयं तूला?"
"मला किनई रिंग हवीय." ओढणीचं टोक बोटाला गुंडाळीत हिरा म्हणाली.
"बस्स ! एवढच ना. तुझा लँडलाईन नंबर दे. आजच संध्याकाळी देतो रिंग हव्यातेवढ्या." सदा संता मोडमधून बाहेर यायला तयार नव्हता.
"राहू देत." हिरा हिरमुसली.
"सॉरी. आता असले पीजे मारणार नाही. प्रॉमीस." 'स्वतःचे' कान पकडत सदा.
"मला हिर्‍याची अंगठी हवीय."
"हा अनमोल हिरा असताना आणखी वेगळं कशाला काय हवयं?" हिराची हनुवटी आपल्या एका बोटाने वर उचलीत सदा बोलला.
"ह्या असल्या शब्दांना भुलणार नाही हं आम्ही. देणारेस की नाही तेवढंच सांग." सदाच्या शाब्दीक मनोर्‍यांना हिराने सुरूंग लावला.
"कबुल ! कबुल ! कबुल !" यावेळी हिराच्या अंगावर सदाने तोडलेल्या गवतांचा अभिषेक केला, तेव्हा लाजेने हिरा सदाच्या मिठीत विसावली.

*

हिराच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला.

हायवेलगत असलेल्या एका छानशा कॅफेबाहेर येवून सदाची मोटरसायकल थांबली. सदा त्यावरून पायउतार झाला आणि घाईतच कॅफेत शिरला. कॅफेच्या छप्परवजा परीसरात मांडलेल्या टेबल-खुर्च्यांमधील एका खुर्चीत हिरा घड्याळातून सदाची आणि मनातून गिफ्टची वाट पहात होती. सदाला पाहताच तिचा चेहरा आनंदानं खुलला.
"फार उशीर नाही ना झाला." जवळच्या खुर्चीत हेल्मेट ठेवीत सदा.
"विशेष नाही." गिफ्टसाठी आसुसलेली हिरा म्हणाली.
काही क्षण दोघं एकमेकांकडे नुसतीच पाहत बसली.
"माझं गिफ्ट कुठाय?" नजर वळवत हिरा बोलली.
"अरे हो. ते आणायचचं राहून गेलं. थांब आलोच." असं म्हणून सदा कॅफेबाहेर गेला.
काही वेळाने तो एक मोठ्ठाला टेडी घेऊन आला आणि त्याने तो हिरापुढे धरला. अपेक्षित गिफ्ट नसलेला पाहून हिरा प्रचंड संतापली. रागाच्या भरात तिने तो टेडी समोरील हायवेवर भिरकावून दिला.
सदा धावतच तो टेडी आणण्यासाठी हायवेवर आला..
सदा तो टेडी उचलणार, इतक्यात सदाच्या मागून भरधाव येणार्‍या एका ट्रकने सदाला धडक दिली. सदा जागीच ठार झाला.
हे दृश्य पाहताच हिरा धावतच सदाजवळ आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं सदाचं मृत शरीर तिने आपल्या कवेत घेतलं. वेड्यासारखी त्याची असंख्य चुंबने घेतली.
मग तिचं लक्ष सदाशेजारी पडलेल्या टेडीकडे गेलं. तिनं त्याला आपल्या हाती घेतलं. सदाची ती एकमेव आठवण जपून ठेवण्याचा तिने निश्चय केला.
अचानक टेडीच्या मागील पोकळ बाजूस तिला काहीतरी चमकताना दिसले. तिने ती चमकणारी वस्तू बाहेर काढली मात्र..... ती एकदम चमकली.
ती चमकणारी वस्तू म्हणजे हिर्‍याची अंगठी होती.
अंगठी काढताक्षणी लगेचच टेडीच्या आतून "हॅप्पी बर्थ डे टू यु"ची जिंगल वाजू लागली.

नकळत हिराचे डोळे डबडबले.

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्यातै +१
आणि ती आधी वाचल्याने हे सगळं पकावू वाटतय
मुळात ती कथाच पकाऊ होती. तेंव्हाही नव्हती आवडली

माझ्या आज्जीने शिकवलय.... कुणा बद्दल चांगल बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नये.. म्हणुन मी काहीच बोलणर नाही या स्टोरी बद्दल Happy

माझ्या आज्जीने शिकवलय.... कुणा बद्दल चांगल बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नये.. म्हणुन मी काहीच बोलणर नाही या स्टोरी बद्दल>>>>>>>>> + १

भला मेरी आज्जी तुम्हारी आज्जी से वयस्क कैसे गंधर्वा Proud

----- विस्थापित गंधर्व Wink