चव्हाठ्यावरचो देवचार

Submitted by मनोमयी on 14 August, 2012 - 01:21

(सत्यकथा)
तसा जुना काळच म्हणावा लागेल. वालावल गावात अजून विजही पोहोचली नव्हती. रस्ते मातीचे, त्यावर धावणाऱ्या वहानांची संख्या बोटांवर मोजतायेण्या ईतपत. सरकारतर्फ़े गावात एस. टी. बस ची सुविधा होती, पण त्याही दिवसातून दोन वेळाच धावत. सकाळी आठ ची जाणारी आणि रात्री आठची येणारी. सकाळी आठ ची गाडी चुकली की कुडाळला पायीच जावे लागे. वालावल पासून कुडाळ सुमारे दहा कि.मी. लांब. कुडाळ हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे बऱ्याचश्या गावकऱ्यांना कामधंद्याच्या निमित्ताने कुडाळला धाव घेणे स्वाभावीकच होते. सकाळची बस नोकरदार वर्गाला, विक्रेत्यांना तसेच ईतर प्रवास्यांना कुडाळपर्यंत न्यायची, तर रात्रीची बस पुन्हा त्या लोकांना परत आणायची. बरं रात्रीची बस चुकली तर घर चालतच गाठावे लागे. रात्रीचे रस्त्याने चालत यावे म्हटले तर रस्त्यात मिट्ट काळोख. अंधश्रद्धा म्हणून नाक मुरडणाऱ्यांना कदाचीत खटकेल, पण गावातील लोक भुतं, देवचार, अवगती, हडळी या गोष्टींवर विश्वास ठेऊन होते. त्यामुळे ही रात्रीची बस चुकु नये,याची सर्वजण खबरदारी घेत. तरी काही लोक रात्रीचे त्या मिट्ट काळोखातून चालतही यायचे. नाही असे नाही, पण त्यांचे काळीज वाघाचे असावे कदाचीत. हे लोक अंधारात दिसावे म्हणून पलीते किंवा चुड(पेटवलेले माडाचे चुडत) यांचा वापर करत, पण ती चुड तरी बिचारी वाऱ्यावर कितीवेळ तग धरणार? तिही थोड्या वेळात भगभगुन गप्प बसे, व पुन्हा किर्र काळोख. त्यातून अमावास्येची रात्र असली म्हणजे डोळ्यांत बोट घालूनही दिसणार नाही ईतका गुडूप्प काळोख.

आजही तशीच अमावास्येची रात्र होती. बॅंकेतले काम संपवून बसस्थानकावर येण्यास सुधीरला तसा फारच ऊशीर झाला होता. कवठी गाडीची आठची वेळ कधीच टळून गेली होती. नऊ, साडेनऊ च्या सुमारास तो बसस्थानकावर पोहोचला. बसस्थानकावर अजूनही बरेचसे प्रवासी आपापल्या गाड्यांसाठी खोळंबले होते. रोजचा प्रवासी असल्यामुळे बऱ्याच जणांचा तो ओळखीचा झाला होता. आणि बॅंकेत काम करत असल्यामुळे बरेचसे चेहरे त्याच्याही ओळखीचे झाले होते. त्याला पाहताच एक म्हातारी भाजीवाली बाई म्हणाली,

"अरे सुधीरा, आज ऊशीर सो झालो तुका?, अरे! तुझी येशटी केंव्हाच गेली मारे".

हे तिचे बोल ऎकून सुधीरची पाऊले तिथेच थबकली. आता पुढे काय करावे?, त्याने क्षणभर विचार केला. त्याला अचानक आपला शेजारी बाबग्या भगताची आठवण झाली. त्याकाळी त्याची महिंद्राची जुन्या मोडेलची जिप होती. तो आपला कामधंदा आटोपून रात्री नऊच्या सुमारास घरी जाई. जाताना ओळखीचे जितके लोक जिप मद्धे शक्य होतील तेवढे तो मैत्री, शेजारधर्म, माणूसकीच्या नात्याने अकशरश: कोंबून नेई. सुधीरच्या मनात पून्हा आशा जागृत झाली. परंतू आज फारच ऊशीर झाल्यामूळे बाबग्या आहे की घरी गेला? याचा अचूक अंदाज सुधीरला बांधता येत नव्हता. जर बाबग्यासाठी थांबाव तर त्याला शोधण्यात आणखी अर्धा तास वेळ वाया जाण्याची भिती होती आणि एवढं करुनही जर बाबग्या मिळाला नाही तर सगळच मूसळ केरात. रात्र आणखी वाढण्याच्या आत सुधीरने चालत जाण्याचा निर्णय घेतला.

सुधीर तसा धिराचा होता. पण ईतक्या मिट्ट काळोखातून चालणे म्हणजे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. शिवाय दहा किमी. पाई चालणे ही देखील सामान्य गोष्ट नव्हती. तरीही तरुण सळसळणाऱ्या रक्ताचा सुधीर तसा सहजासहजी घाबरणारा नव्हता. शेवटी मनाचा ठांम निग्रह करुन तो रस्त्याला लागला.
सुरवातीस त्याला काही वाटसरुंची साथ लाभली. सहपादचाऱ्यांबरोबर चालताना त्यांच्यात रंगलेल्या गप्पा सुधीरच्याही कानात पडत होत्या. त्यांच्यातील एक जण म्हणाला,

"आज अमवास आसा, तेंव्हा बेगीना घराकडे जावक होया. अमवास म्हणजे देवचाराची रात, वाटेत खय? कोण? कसो? गावात ह्या सांगाक येणा नाय."

त्यावर दुसरा वाटसरु म्हणाला,
" चल! मेल्या! आबल्या, देवचार, अवगती असला काय्येक आसणा नाय, देवचाराक कोणी बघलो हा काय?".

त्यावर तो पहिला वाटसरु आबा म्हणाला,
"नसता काय आसता ता काय माका माहित नाय पण ईखाची परीक्षा कोण घेतला? लवकर घराकडे गेलेला बरा, त्याच्यात चव्हाठ्यावरचो देवचार लय फ़ेमस. आता येळ आसा म्हणान चलता-चलता तुका तेची गोष्ट सांगतय. अरे चव्हाठ्यावरचो देवचार म्हणजे भारीच प्रकरण बाबा. मी मी म्हणणारे हरलेत तेच्या समोर. रात्रीचो तेच्या टायमाक जर कोणी तेच्या वाटेत गावलो, तर त्याचा कायता झालाच म्हणून समजाक होया".

त्यावर तो दुसरा माणूस म्हणाला,
"चल, असा कायच जाणा नाय़. कोणतरी कायतरी ऊठवतत झाला".

या त्याच्या बोलण्यावर मघासपासून गुपचुप चालणारा तिसरा माणूस म्हणाला,
" नाय नाय सद्या, आबा सांगताहा ना, ता बरोबर आसा. मी पण खुप ठय आयकलय त्या चव्हाठ्यावरच्या देवचाराबद्दल. असा म्हणतत जर कोण गावलो तेच्या तावडीत तर ठार येडो करुन सोडता त्या माणसाक. संसारातसून ऊठयता त्येका. आमच्या शेजारचो रमलो सांगी होतो तेच्या पावण्याची गजाल, त्येचो पावणो की नाय रातीक बरोबर गावलोमारे तेच्या टायमाक”.

त्याची ती कथा ऎकून आबाने आपली कुतूहलता व्यक्त केली,
"मगे? काय झाला काय त्येचा?".

"काय होताला एक महिनो त्येचो खय्यकच पत्तो लागाक नाय. सगळे त्येका शोधून शोधून दमले".

"काय सांगतहस काय बाळग्या? मगे गावलो की नाय तो?".
आबाची कुतूहलता शिगेस पोहोचली.

"अरे आईच्यान खरा सांगतय, चव्हाठ्याच्या त्या देवचाराच्याच पारावर गावलो तो महिन्यान. बेसुद होतो तीन दिस. शुद्धीत ईलो तेंव्हा शाप वेडो मारे. माणसासुद्धा ओळखी नाय तो".

त्याच्या या गोष्टीवर तो सदा नावाचा इसम म्हणाला,
"रवांदेरे आता सोड तो इषय आमका खेका होये नसते भानगडी".

त्यावर आबा म्हणाला,
"होय रे बाबा देवाक काळजी".

सुधीर चालता चालता या त्यांच्या गोष्टी ऎकत होता. त्याच्या सुशिक्षित मनाला खरेतर या गोष्टी पटत नव्हत्या, पण तरीही शंकेची पाल त्याच्याही मनात चुकचुकून गेली. चालता चालता सर्व जकातीवर पोहोचले. पुढे मालवणला जाणारा रस्ता व वालावल, कवठीला जाणारा रस्ता असे मुख्य रस्त्याला दोन फाटे फुटले. ती सुधीर सोबत चालणारी माणस मालवणला जाणाऱ्या रस्त्याला लागली. सुधीर वालावलीच्या रस्त्याने जात असल्याचे पाहून ती माणस क्षणभर घुटमळली काहीतरी कुजबूजली. त्यांच्यातील आबाने सुधीरला अडवत विचारले,
" सायबांनू नये दिसतास, म्हटला नये ईलास काय गावात?"

त्यावर सुधीर म्हणाला,
"नाही माझं घर आहे वालावलला. शेवटची गाडी चुकली म्हणून आज चालत जाव लागतय".

त्यावर पुन्हा आबा म्हणाला, "नाय, म्हटला सांभाळून जावा, वालावलीक जातास म्हणून म्हणतय. हल्ली कसलाच काय सांगाक येणा नाय".
त्याच्या बोलण्याचा रोख सुधीरच्या कुशाग्र बुद्धीने लगेच हेरला. ते मघासपासून ज्या चव्हाठ्याच्या देवचाराबद्दल बोलत होते ते नेरुर चव्हाठा गाव सुधीरच्या रस्त्यातच लागे. सुधीर म्हणाला,
"आता काय करणार बाबा, नवीन नोकरी म्हटल की असे प्रसंग यायचेच".

त्यावर तो तीसरा माणूस बाळा कुरकुरला,
"ता बरोबर आसा तुमचा सायबांनू पण एकटे जाताहास त्या रस्त्यान म्हणान...".

त्याला मद्धेच अडवत मघासपासून गपचुप ऎकणारा सदा त्या दोघांवर डाफरला,
"गप रवा रे, सायबांका घाबरव नकास",
व सुधीरला ऊद्देशून म्हणाला,
"सायबांनू तुम्ही हेंच्या गोष्टीवर लक्ष देव नकास, तुम्ही आपले जावा बेगीना. घराकडे लवकर पोचलेला बरा".
त्यावर त्या माणसांची पुढील प्रतिक्रीया ऐकण्यास सुधीर थांबला नाही तो पुढे निघाला.

आता पुढे सुधीरला एकटेच चालावे लागणार होते. आतापर्यंत त्या तिघांनी सोबत आणलेल्या पलीत्याचा ऊजेड होता, पण आता तोही नसल्यामुळे सुधीरला गुडूप्प काळोखात चालण्यास त्रास होत होता. त्यामूळे तो थोडा अस्वस्थ झाला. रातकिड्यांची आर्त किरकिर त्याच्या कानांना सलत होती. मद्धेच घुबडाचा ऊ..ऊ.. असा आवाज काळजाचा थरकाप ऊडवी. बरे समोरचे काही दिसत नसल्यामुळे पुढे पाऊल टाकतानाही मनात दहा विचार येत. त्यातून रस्त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांची भिती ही होतीच. सुधीर कसाबसा एक दिड कि.मी. चालला न चालला असेल तेवढ्यात समोरुन कुणी धावत आपल्या अंगावर येत असल्याचा भास त्याला झाला. त्याचे पाय जागीच खिळले. कीकीकीकी..... करत एका पक्षाने त्याच्या डोक्यावरुन झेप घेतली. झप झप पंखांचा आवाज करत तो पक्षी क्षणार्धात काळोखात गुडूप्प झाला. परंतू त्याच्या अचानक आलेल्या दिर्घ किंकाळीने सुधीरच्या मनाचा ठाव घेतला. भितीमुळे त्याचे सर्वांग शहारले. त्याचे सारे अवसान गळले व तो आपली सर्व शक्ती एकवटून पळत सुटला. त्याला काळोखाची, रस्त्यातील खाचखळग्यांची, सरपटणाऱ्या जीवांची कशाचीच तमा ऊरली नाही. अर्धा एक कि.मी धावून नंतर मात्र तो जाम थकला. त्याच्या जोरात धडधडणाऱ्या हृदयावर, तीव्र झालेल्या श्वासांवर त्याचा ताबा ऊरला नव्हता. त्याचे पायही धावून दूखू लागले होते त्यामुळे पुन्हा त्याची चाल मंद झाली. त्याचे सर्वांग घामाने डबडबले होते. तरीही तो चालत होता. त्याचे शरीर धावून धावून थकले खरे, पण मनांतील विचार अजूनही धावतच होते. चालता चालता तो मघासचे त्या माणसांचे बोलणे आठवू लागला. असा खराच जर चव्हाठ्यावर कुणी देवचार असला, तर काय करावे? याचा तो नकळत विचार करु लागला. काळोखात आपण कुठे पोहोचलो? किती वाजले? या गोष्टींचा काहीच पत्ता लागत नव्हता. परंतू आपण चव्हाठ्याच्या नक्कीच जवळ पोहोचलो हे तो जाणुन होता. त्याचे विचार त्याला काही काळ मागे घेऊन गेले. त्याला त्याच्या भाओजींनी एकदा सांगीतलेली गोष्ट आठवली. त्याचे भाओजीं म्हणजे निधड्या छातीचा माणूस रात्री बेरात्रीची परवा न करता ते कुठेही फिरत. त्यानांही एकदा असाच कुठल्याश्या देवचाराचा अनूभव आल्याबद्दल ते बोलले होते. एका कुठल्याश्या रस्त्यावरुन जात असताना कुणीतरी आपला पाठलाग करत असल्याचा त्यांना भास होई. भासच कशाला चक्क कुणी माणूसही दिसे. तो नेहमी ठरावीक अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग करी व मग अचानक मागच्यामागे अदृष्य होई. ही घटना बरेचदा त्यांच्यासोबत घडल्याचे त्यांनी सुधीरला सांगीतले होते. तेव्हा ते म्हणाले होते की “जोपर्यंत आपण घाबरत नाही, तोपर्यंत कुणीही आपणास घाबरवू शकत नाही. अशावेळी जर आपण घाबरलो तर संपलो”. ही त्यांची वाक्ये आठवून सुधीरला थोडा धीर आला. आता पुढे जे होईल ते पाहून घेऊ असा त्याने मनाचा ठांम निग्रह केला. एकाएकी त्याच्या मनातली भिती गायब झाली व तो त्वेशाने चालू लागला.
थोडे पुढे चालून गेल्यावर कुणीतरी आपल्या मागून चालत येत असल्याचे सुधीरच्या निदर्शनास आले. परंतू आता तो घाबरणारा नव्ह्ता. पाठीमागे चालणाऱ्या ईसमावर लक्ष न देता सुधीर पुढे निघाला. सुधीरच्या पाठी चालणाऱ्या ईसमाकडे काठी होती. त्या काठीला त्याने घुंगरु बांधले होते. तो ती काठी रस्त्यावर जोरात आपटे त्यासरशी कट्टछम्म असा आवाज निघे. कट्टछम्म कट्टछम्म अश्या त्याच्या काठीतून येणाऱ्या विचीत्र आवाजामूळे हाच तो चव्हाठ्यावरचा देवचार असावा हे सुधीरने केंव्हाच जाणले होते. परंतू सुधीरला आता कशाचीच तमा ऊरली नव्हती.
सुधीरला त्याचे ते जोरात काठी आपटणे व काठी आपटून त्यातून निघणारा तो विचीत्र आवाज हा जणू तो आपला ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे असे भासले. परंतु सुधीर डगमगणारा नव्हता. सुधीरच्या पायात त्या काळचे लाकडी सोल चे जुने बुट होते. तो आपले पाय जोरात आपटत चालू लागला. त्यामूळे त्याच्या लाकडी बुटांचाही टॉक टॉक असा आवाज होऊ लागला. असे करुन तो त्या देवचारास ’ये काय ते कर माझे, मी घाबरत नाही’ अशी चेतावणी देण्याचा प्रयत्न करत होता.
थोडावेळ असेच चालले होते. जस जसा चव्हाठ्यावरील तो त्या देवचाराचा पिंपळ पार जवळ येऊ लागला तस तसा त्या सुधीरच्या मागून चालणाऱ्या देवचाराच्या काठीचा तो भयावह आवाज वाढू लागला. आता पुढे काय होणार याचा अंदाज बांधणे सुधीरला कठीण होऊ लागले होते. तरीही तो नेटाने आपले बुट वाजवत चालला होता.
ते थंडीचे दिवस होते. रात्र जसजशी वाढत होती तसतसा हवेतील गारवाही वाढत होता. सुधीर त्या चव्हाठ्यावरील पिंपळ पाराच्या अगदी जवळ पोहोचला होता. रस्त्यात आडवा आलेला तो अस्ताव्यस्त पिंपळ, निळसर रात्रप्रकाशात फारच भयावह वाटत होता. सुधीरने पिंपळ पार ओलांडला व थोडा पुढे गेला. तेंव्हा त्याच्या असे निदर्शनास आले की तो पाठीमागून चालणाऱ्या देवचाराच्या काठीचा आवाज आता पूर्णपणे थांबला होता. सुधीरने त्या अंधारातही डोळे फ़ाडून मागे बघण्याचा प्रयत्न केला. त्याला तो देवचार त्या पारावर बसल्याचे आढळले. सुधीर क्षणभर थांबुन पाहू लागला. त्या पारावर बसलेल्या देवचाराने माचीस पेटवली त्या जळणाऱ्या काडीच्या काहीक्षणीक ऊजेडात सुधीरला तो देवचार पूर्णपणे दिसला. त्याने खाकी हाफ पॅंट व पांढरा सदरा घातल्याचे सुधीरला आढळले. तो माचीस जाळून आपली विडी पेटवाण्याचा प्रयत्न करत होता. त्याने दोन तीन प्रयत्नात आपली विडी पेटवली व एक जोराचा झूरका मारला. का कोण जाणे? सुधीरच्या अंगात एकाएकी बळ संचारले त्याने या साऱ्या प्रकरणाची शहानीशा करण्याचे ठरवले. तो पुन्हा मागे त्या देवचार बसलेल्या ठीकाणापर्यंत गेला.
"कोण आहेस तू?" सुधीरने गंभीर व कडक आवाजात त्याला विचारले. त्याच्या त्या प्रश्नावर तो देवचार थरथर कापू लागला. सुधीरला त्याचे असे करणे विचीत्र भासले.
तो पुन्हा गरजला, "बोल, कोण आहेस तू? खर बोल".
त्यावर तो देवचार कापऱ्या आवाजात म्हणाला, "सायबांनू तुम्ही जावा हयसुन अजीबात हय थांबू नकास".
त्यावर सुधीर पुन्हा गरजला, "पहिले तू कोण आहेस ते सांग?".
या त्याच्या प्रश्नासरशी त्या देवचाराने हातातील माचीस पुन्हा एकदा पेटवली व त्या भगभगत्या काडीच्या मंद ऊजेडात त्याने सुधीरला आपादमस्तक न्याहाळले. व तो बोलु लागला "आता तुमका काय सांगु सायबांनू, मी काळश्याचो, माझा नाव विजय. हय वालावलीक घाडी वाड्यात स्वरगत केलय. माझी बायल पोटूशी आसा म्हणान तिका म्हायेरपणाक धाडलेलय. आज सांजीकच सासरवाडीतसुन बोलावणा ईला. माजे कामधंदे आटपीसरच माका रात झाली. पण मी ठरवलय कायय झाला तरी आजच्या आज सासरवाडीक जावक होया. म्हणान आता मी थय जाय होतय. बरोबर चुडी आणलेलय ती वाटेकच ईजली. कसो बसो या काळोखातसुन नेरराक पोचलय. पण काय सांगु तुमका सायबांनु माझ्या पुढे चव्हाठ्यावरचो देवचार जाय होतो. तो आपले पाय आपटीत जाय होतो. मी जाम घाबारलय, पण थोड्या येळान तो खय नायसोच झालो आणि मी दम घेवक हय बसलय. तुम्ही आपले जावा सायबांनु त्या देवचाराचा काय खरा नाय. माका आपली सवय आसा". एवढे बोलुन त्याने पुन्हा आपल्या विडीचा झुरका मारला.
त्याला तिथेच सोडुन सुधीर पुन्हा मार्गस्थ झाला. जाताना त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा !!! फारच छान!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

गावाक अशे बरेचशे गोष्टी जुन्या माणसांकडना आयकाक मिळतत.जमल्यास सगळाच मालवणीत लिवा, बरा वाटला.

व्वा! मस्त लिहीलेय. Happy
गावाक अशे बरेचशे गोष्टी जुन्या माणसांकडना आयकाक मिळतत.जमल्यास सगळाच मालवणीत लिवा, बरा वाटला.>>>>>>>>१००००००% Happy

गावाक अशे बरेचशे गोष्टी जुन्या माणसांकडना आयकाक मिळतत.जमल्यास सगळाच मालवणीत लिवा, बरा वाटला.>> अगदी अगदी!!!

कोकणातंच अशा गोष्टी फार ऐकायला मिळतात. आमच्या घाटाकडे असली काही भानगड फारशी नसते.
असो. गोष्ट आवडली.

आडस.. Happy

मालवणी वाचून इतक्यां बरां वाटलां म्हणान सांगा..!

तुमचो लेख जुनो आसलो तरी मीया नयो आसंय हंयसर..
तेकालागान ही प्रतिक्रिया इतक्या उसरा दीतंय..

मस्त Happy

Pages