भेटले नाही कुणी, केव्हा किना-यासारखे!

Submitted by सतीश देवपूरकर on 10 August, 2012 - 08:45

गझल
भेटले नाही कुणी, केव्हा किना-यासारखे!
शेवटी आयुष्य, वणवणलेच वा-यासारखे!!

स्वप्न घर बांधावयाचे, हे असे साकारले......
घर उभे साक्षात वाळूच्या ढिगा-यासारखे!

ब्रह्मदेवालाच यावे वाटते निपटायला;
काय माझे व्याप, विश्वाच्या पसा-यासारखे?

फक्त मतल्याचा प्रथम मिसराच मी उच्चारला....
तोच सळसळले तनूवरती शहा-यासारखे!

वीष सापाचे असो वा विंचवाचेही असो!
लोक वापरती मला, आता उता-यासारखे!!

पीस पत्ते जीवना! जितके पिसायाचे तुला;
हात शिवशिवतात माझेही जुगा-यासारखे!

ही अनासक्ती, विरक्ती, ना उगा आली मला;
राज्यही केले! कधी, जगलो भिका-यासारखे!

जीवनाच्या जंगलामध्ये खुबीने राहतो!
लोक वावरतात रस्त्यांवर शिका-यासारखे!!

गूज हृदयातील ना आले तुझ्या गझलेमधे;
शेर झाले सर्व....शब्दांच्या पिसा-यासारखे!

लागलो हातास मी नाही कुणाच्याही कधी;
होय, माझे वागणे, होतेच पा-यासारखे!

लाख टाळा नाव माझे, लाखदा वगळा मला....
स्थान गगनातील माझे शुक्रता-यासारखे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा...अप्रतिम गझल ..आणि खालील शेर तर खासच------

जीवनाच्या जंगलामध्ये खुबीने राहतो!
लोक वावरतात रस्त्यांवर शिका-यासारखे!!

ही अनासक्ती, विरक्ती, ना उगा आली मला;
राज्यही केले! कधी, जगलो भिका-यासारखे!.

याहीवेळी नेहमीचाच 'तेच्-ते'पणा अगदी जस्साच्यातस्सा उतरवलात सर .................

वा वा
_/\_

ही अनासक्ती, विरक्ती, ना उगा आली मला;
राज्यही केले! कधी, जगलो भिका-यासारखे!

जीवनाच्या जंगलामध्ये खुबीने राहतो!
लोक वावरतात रस्त्यांवर शिका-यासारखे!!

फार फार आवडली... फार सुंदर..