अपेक्षा नको!

Submitted by आनंदयात्री on 9 August, 2012 - 08:18

अजून क्षणभर जगता यावे म्हणून मी रेंगाळत होतो
मुठीत आल्या वाळूलाही नजराणा मी समजत होतो!

कधी वाटले, प्रेम खुशीने झोळीमध्ये दिलेस माझ्या
कधी वाटले, भीक तुझ्या प्रेमाची कणभर मागत होतो

तळव्यावरती अलगद जपले होते अपुले रेशिमनाते
जपता जपता नकळत त्याला प्रेमाने चुरगाळत होतो

वर्तमान हा जगता जगता निसटुन गेला, कळले नाही!
गतकाळाचे बोट धरुन मी भविष्याकडे चालत होतो

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/08/blog-post_6499.html)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!<<< वा सुंदर

गझल छानच आहे

(आपल्या गझलांचा फ्लेवर - गेल्या काही गझलांपासून - बदलून नवाच होत आहे असे मला वाटले, नक्की माहीत नाही) Happy

खुपच सुंदर Happy

वर्तमान हा जगता जगता निसटुन गेला, कळले नाही!
गतकाळाचे बोट धरून मी भविष्याकडे चालत होतो .. छान

शेवटचा शेर देखिल वेगळा आणि छानच आहे.

कधी वाटले, प्रेम खुशीने झोळीमध्ये दिलेस माझ्या
कधी वाटले, भीक तुझ्या प्रेमाची कणभर मागत होतो

तळव्यावरती अलगद जपले होते अपुले रेशिमनाते
जपता जपता नकळत त्याला प्रेमाने चुरगाळत होतो

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!
>>>

आहाहा!
अप्रतिम गझल Happy

>>
'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!
<<

अरे वा! Happy

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!......वाह क्या बात!

Happy वा!

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो! >>>

आह!

संपूर्ण गजल आवडली..........अप्रतिम.......

अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!
क्या बात है..

बाकी गझल ठीक-ठाक वाटली..

शेवटचा शेर चांगला आहे, आवडला.

गतकाळाचे बोट धरून मी भविष्याकडे चालत होतो>>> धरुन असे करावे लागेल, तसे केले तरी लय थोडी बिघडतेच आहे.

शुभेच्छा!

जपता जपता नकळत त्याला प्रेमाने चुरगाळत होतो

अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो! >>>>>> क्या बात है.... आवडेश Happy

वा! छान लिहीलेय नचिकेत.
हा फॉर्म ऐकायला सोपा वाटला तरी लिहीताना थोडा अवघड आहे. कारण ओळ मोठी असल्यामुळे आपण वहावत जाऊन भरीचे शब्द घालू शकतो आणि ओळी आणि पर्यायाने शेर डायल्यूट होऊ शकतात. तू तसे होऊ दिले नाहीस. मस्तच.

ओळ मोठी असल्यामुळे आपण वहावत जाऊन भरीचे शब्द घालू शकतो आणि ओळी आणि पर्यायाने शेर डायल्यूट होऊ शकतात.<<<

काल हे लिहिणार होतो, पण वैयक्तीक मत म्हणून जवळच ठेवले.

अर्थाच्या लांबीपेक्षा वृत्ताची लांबी अधिक मोठी असल्याचा भास काही ओळींमध्ये झाला Happy

कृ गै न

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो! >>>>
वाह!

<<<कधी वाटले, प्रेम खुशीने झोळीमध्ये दिलेस माझ्या
कधी वाटले, भीक तुझ्या प्रेमाची कणभर मागत होतो>>> व्वाह!!!

<<<तळव्यावरती अलगद जपले होते अपुले रेशिमनाते
जपता जपता नकळत त्याला प्रेमाने चुरगाळत होतो>>> चुरगाळणे पॉजिटीव्हली कसे घ्यावे?

<<<वर्तमान हा जगता जगता निसटुन गेला, कळले नाही!
गतकाळाचे बोट धरून मी भविष्याकडे चालत होतो>>> सुंदरच!!! Happy

>> चुरगाळणे पॉजिटीव्हली कसे घ्यावे?
नाहीच आहे ते पॉझिटिव. आपल्याला (आपण जे) प्रेमाने, हक्काने (करतोय असे) वाटते त्याचा प्रेयसाला त्रास, काच होऊ शकतो पण तो आपल्याला जाणवत नाही. (असे असावे.) नचिकेत सांगेलच.

सर्वांचे मनापासून आभार! Happy

आपल्या गझलांचा फ्लेवर - गेल्या काही गझलांपासून - बदलून नवाच होत आहे असे मला वाटले,

धन्यवाद! I will take it as a compliment! Happy

विजयजी, तो शब्द 'धरुन' असाच हवा आहे. बदल केलाय. धन्यवाद.
वैभव, तुमचेही आभार!

संघमित्रा, बर्‍याच दिवसांनी? Happy धन्यवाद!

हर्षल,
नाहीच आहे ते पॉझिटिव. आपल्याला (आपण जे) प्रेमाने, हक्काने (करतोय असे) वाटते त्याचा प्रेयसाला त्रास, काच होऊ शकतो पण तो आपल्याला जाणवत नाही.

+१

Happy

मस्त!!
कधी वाटले, प्रेम खुशीने झोळीमध्ये दिलेस माझ्या
कधी वाटले, भीक तुझ्या प्रेमाची कणभर मागत होतो>> ह्यातली आगतिगता

तळव्यावरती अलगद जपले होते अपुले रेशिमनाते
जपता जपता नकळत त्याला प्रेमाने चुरगाळत होतो>> ह्यातली अहेतूक चूकी ठळकपणे लक्षात येतेय...

मस्त मस्त!

निशिकांतजी! गझल छान आहे, आवडली! फक्त काही ठिकाणी –हस्वदीर्घाच्या चुका जरा खटकल्या ज्या गीतात चालून जातात, पण गझलेत नाही.
शेर नंबर ३,४ आणि ५.........सुंदर.
फक्त “अपुले” ऎवजी “आपुले” हवे........शेर नंबर ३मधे.
“निसटुन” ऎवजी “निसटून” असे हवे...........शेर नंबर४मधे.

शेर नंबर १ व २ खयाल आवडले. अभिव्यक्ती अजून प्रासादिक करता व खुलवता आली असती. मी आपले पहिले २ शेर
खालीलप्रमाणे वाचून पाहिले. पहा कसे वाटतात ते. आपली मते जरूर कळवावीत,म्हणजे प्रांजळ व सशक्त संवाद व्हावा.

शेर नंबर १.........

क्षण सोनेरी जगता यावे, म्हणून मी रेंगाळत होतो!
मुठीत आलेल्या वाळूलाही सोने मी समजत होतो!!

शेर नंबर २.............

कधी वाटले आपखुशीने तुझे प्रेम अपसूक मिळाले!
कधी वाटले, भीक तुझ्या प्रेमाची कणभर मागत होतो!!

.............प्रा.सतीश देवपूरकर

Pages