१..२...३....४.......

Submitted by मी मुक्ता.. on 9 August, 2012 - 05:50

१) जनरलायजेशन.. प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र अभ्यास करणं खूप बोजड होईल म्हणून साधारणपणे समान गुणधर्म असलेल्या गोष्टींचा एक गट करायचा.. मग त्यातूनही प्रत्येकाचे काही वेगळे गुणधर्म रहातातच, त्याचा वेगळ्याने अभ्यास करायचा..म्हणजे एकूण एकच. माझं जनरलायजेशन केलेलं मला आवडत नाही. चांगलं म्हटलेलंही आवडत नाही, वाईट म्हटलेलंही.. आवडत नाही म्हणण्यापेक्षा पटत नाही. मी चांगली किंवा वाईट कशी असू शकते? मी माझ्याइतकीच चांगली आणि वाईट आहे, कमी नाही जास्त नाही. पण आता कोणत्याही एका बाजूला जायचं म्हणजे परत जनरलायजेशन आलं. म्हणजे शेवटी सगळंच व्यर्थ.. चांगली, वाईट, स्त्री, पुरुष, हिंदु, मुस्लिम, गरीब, श्रीमंत.. सगळेजण सगळच काही.. शेवटी प्रत्येकाचा स्वतंत्र संच आलाच.. तरीही जनरलायजेशन होऊ शकतं. असं का?
------------------------------------------------------------------------------
२) मायकेल अँजेलो म्हणे वयाच्या ६५ व्या वर्षी प्रेमात पडलेला, त्या काळात त्याने कविता लिहिल्या आणि ती मेल्यावर कधीच नाही लिहिल्या. अमृता-इमरोज ने कधीच एकमेकांना I love you म्हटलं नाही.. हे प्रेम आहे तर मला वाटतं ते काय आहे? ते प्रेमच याची खात्री आहे मला पण मी आयुष्यात इतक्या वेळा पडलेय आणि एकाच वेळी अनेक व्यक्तिंच्या प्रेमात अजूनही असते, मग हे काय आहे? आपुलकी, आकर्षण, जवळिक, सख्य याच्या नक्की कोणत्या प्रमाणातल्या मिश्रणाला प्रेम म्हणतात? आणि कोणतंही प्रमाण असलं तरी प्रत्येकाला एकदातरी ते प्रेमासारखं वाटतं. मग नक्की 'ती' जी सो कॉल्ड उदात्त भावना आहे ती प्रत्येकाला स्पर्श करते का? करत नसेल तर मनात निर्माण झालेल्या कुठल्यातरी थातुरमातुर भावनेलाच मी प्रेम समजते की काय? मला 'तसं' प्रेम कधीच होणार नाही का?
--------------------------------------------------------------------------------
३) मी थर्ड क्लास लेखक आहे. अभिजात १स्ट क्लास, आपल्या पीढीपुरते तरी प्रभाव पाडणारे सेकंड आणि मग राहिलेली रद्दड.. मी.. अभिजातपणाचा दूरदूरपर्यंत पत्ता नाही. मी जो विचार करते तो, थोडाफार विचार करणार्‍या सगळ्यांनीच केलेला असतो, तो सगळ्यांनीच केलेला विचार असला तरी ज्यामुळे तो वाचनीय होतो ती मांडण्याची शैली वगैरे मुळातच नाही आहे. म्हणून मी लिहिलं नाही इतके दिवस. सर्जनशीलतेचा इतका कडकडीत दुष्काळ का?
---------------------------------------------------------------------------------
४) लढत-विव्हळत, प्रत्येक क्षणी नव्याने निराश करणार्‍या आयुष्यासोबत जे काहीतरी करतेय मी ते काय आहे? इतके पैलू की कशालाच न्याय देता येऊ नये. इतकी उत्तरं की कोणताच प्रश्न सुटू नये. इतके मार्ग तरी कोणताच सरळ वाटू नये. कशालाच काही अर्थ नाही असंही वाटावं. त्यात अर्थ भरावा हे ही पटावं. पटूनही काही नीट जमू नये. जमलं तरी समाधान वाट्याला येऊ नये. मरण्याच्या क्षणातच आयुष्य कळत असेल तर......?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैली वगैरे माझ्यामते दुय्यम आहे, तुम्हाला काही अगदी आतून, मनातून सांगायचे आहे; सांगितले नाही तर गुदमरायला होईल अशी अवस्था आली की जे लिहाल ते भिडतेच.
कशाला काही अर्थ नसतोच, हे एकदा स्वतःशीच सरळ, स्वच्छपणे कबूल केले की मग फार मजा येते

कशाला काही अर्थ नसतोच, हे एकदा स्वतःशीच सरळ, स्वच्छपणे कबूल केले की मग फार मजा येते
>>>
समोर येणार प्रत्येक क्षण इतक्याच निरिच्छपणे जगता आला तर क्या बात! कि नै??

अहंह, निंबुडा, निरिच्छपणा या अर्थाने नाहीए म्हणत मी, ती फार वेगळी बाब आहे.
स्वतःला, दसर्‍याला आणि कशालाच एका मर्यादेबाहेर जास्त सिरिअसली न घेणे या अर्थाने मी म्हणतोय.

आगाऊ, निंबुडा
Happy अगदी अगदी.. कशाला काही अर्थ नाही हे कबूल केलच आहे पण सांगितले नाही तर गुदमरायला होईल असं झालं की बाहेर पडतं.. Happy
आणि निरिच्छपणा किंवा सेरिअसली न घेण्यापेक्षा मला वाटतं Live it and leave it चा फंडा मला जमायला लागलाय. त्यामुळे त्या त्या गोष्टीला पुरेसा (म्हणजे आपल्याकडून जमेल तेवढा) न्यायही देता येतो आणि त्यात अडकूनही पडायला होत नाही.. काय?

या. वेलकम.
या प्रश्नांची उत्तरे मिळता मिळत नाहीत. ते प्रश्न पडणेही तुमच्या हातात नाही.
नंतर काही वाटेनासे होईपर्यंतचा निबरपणा येऊ दे नको. 'दर्द का चाँद बुझ गया' हे दर्दपेक्षा वाईट एकुण असे वाटते.
कशातच काही अर्थ नाही हे तर पहिले you care चे द्योतक Wink नाण्याची फक्त उलटी बाजू.

>>दर्द का चाँद बुझ गया' हे दर्दपेक्षा वाईट एकुण असे वाटते.
+१
बुद्ध स्थितीला पोचणारे थोडेच असणार.

रैना.. Happy वेलकम माझ्यासाठीच होतं का? मी अ‍ॅक्च्युअली खूप महिन्यांनी आले इकडे त्यामुळे 'वेलकम' केल्याबद्दल आधी धन्यवाद आणि मग प्रतिसादाबद्दल.. Happy
ह्म्म.. 'दर्द का चाँद बुझ गया' कदाचित हे खरच वाईट असावं. नक्की काय ते अजून माहिती नाही.
आणि कशातच काही नाही इथे एक विचित्र विरोधाभास आहे असं मला वाटतं. you care equally for everything and hence you dont care..

म्रुदुला,
बुद्ध स्थितीला पोचणारे थोडेच असणार..>> खरय.. Happy यावर आधीच लिहून झालय. प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

मुक्ताबाई,

>> you care equally for everything and hence you dont care..

कशावरून यालाच समदृष्टी म्हणत नसतील?

आ.न.,
-गा.पै.

म्हणत असतील ना.. नावं अनेक असू शकतात. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की शक्यतो करुन care हा कायम रिलेटिव्हली वापरला जातो. If you care equally, then its not actually the care.. Obviously it may not mean 'dont care' as well.. Happy कसंही सांगितलं तरी एकूण एकच.. नाही का?

The tragedy of modern man is not that he knows less and less about the meaning of his own life, but that it bothers him less and less.
- Vaclav Havel
हॅव्हेलच्या म्हणण्यात दम आहेच. जगणे आणि असणे यात फरक आहेच.
पण सृजनाच्या दुष्काळामुळे किती चिंतित व्हायचे? अभिजातपणाच्या किती मागे लागायचे?
जगणे आणि असणे यांत महदंतर असले तरी असणे हा जगण्याचा एक अविभाज्य भाग आहेच ना?
'अट्टाहासाने जगण्या'पेक्षा कधीकधी 'केवळ असण्या'ने आपण जास्त समृद्ध होऊ शकतो असे वाटते.

बाकी, ४ नंतरची टिंबे सर्वात महत्त्वाची. प्रश्न पडत राहिले की आनंद होतो. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीयेत हे माहिती झाले की फार म्हणजे फारच आनंद होतो. त्यांच्यासमवेतच प्रवास आहे हे फार सुखद वाटते. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नकोत बुवा.

वरच्या हॅव्हेलला आणि तुमच्या १, २, ३, ४ ला आपले चार झब्बू (क्रम प्रत्येकाने आपला आपणच लावलेला बरा) -
१. सर्वज्ञ -
असते ज्यांचे हृदय बँकेत सुरक्षित;
इन्क्रीमेंट आणि प्रमोशन
वांझेच्या विटाळासारखे निश्चित;
त्यांना सर्वच असते माहित.....
कविताही!
(- भट)
किंवा
२. मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो
आडवाटेने पिसाटाच्यापरी बेहोष झालो
ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता
मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता.
(- महानोर)
किंवा
३. घाव तो बुजला जरी, उरली तरी पण खूण ही,
ते रहस्यच लोपले, पण राहिली कुणकूण ही.
(ना.घ.)
किंवा
४. दुनिया ना जीत पाओ तो हारो ना खुद को तुम
थोडी बहुत तो झहन में नाराजगी रहे
(निदा फाजली)

ता.क. कोणाच्याही असल्या तरी या सर्व केवळ सूचनाच. आदेश नव्हेत. स्वतःला आदेश फक्त स्वतःचेच.

अरभाट,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.!
पण ह्या हॅव्हेलचं म्हणणं काही आपल्याला पटलं नाही ब्वा..! हे म्हणजे "आमच्या काळी कसे सगळे प्रामाणिक होते" असं म्हणण्यासारखं वाटतं. माणूस अनादी-अनंत काळापासून तसाच आहे.. जसा होता तसा. त्याला प्रश्नही तितकेच पडतात कारण अभिव्यक्तीच्या पद्धती उत्क्रांत होत गेल्यात फक्त, माणसाचं मन नाही. त्यामुळे आजकालचा माणूस बॉदर करत नाही हे काही खरं नाही. आणि आधीचे सगळेच बॉदर करत होते असाही याचा अर्थ नाही. ते प्रमाण सर्वकाळ सर्व समाजात स्थिर असतं.

असणे जगण्याचा भाग आहे. असणे माणसाला समृद्ध करते हे तर खरच पण असे क्षण तसे कमीच. बाकीच्या असलेल्या क्षणांचं जगणं करण्यासाठीच हा सर्जनाचा, अभिजाततेचा अट्टहास. हट्टाने असता येत नाही. एकतर तुम्ही असता किंवा नसता पण हट्टाने असण्याचं जगणं करण्याचा प्रयत्न करुच शकतो.

बाकी झब्बू उत्तम.. Happy Happy

कधीकधी हा शब्द महत्त्वाचा. प्रत्येक क्षणाला झगडूनच भेटावे का? कधी अट्टाहासाचे प्रयत्न करावेत आणि कधी नाही (going with the flow), हे कसे कळेल?

बाप रे! हे फार पुढचे प्रश्न झाले.

मी या जगात कशाला आलो? हा प्रश्न सुटला की मग वरच्या प्रश्नांचा विचार करता येईल मला!

मुक्ताबाई,

असण्याचं जगणं करण्यासाठी अट्टाहास करावा लागतो हे अगदी खरंय. अट्टाहास म्हणजे एक प्रकारचा अहंकारच नाही का? इथे बघा अहंकार म्हणजे काय ते. मात्र हा इथला अहंकार केवळ अवगुणांची पाठराखण करीत आहे. पण याउलट जर तो गुणांची पुष्टी करीत असेल तर...?

मला म्हणायचंय की अशाच सद्गुणार्थी अहंकारामुळे तुम्ही स्वत:स स्त्री समजत आहात. म्हणून समत्वदृष्टीने ('I care equally for everyone' असं) वागणं तुमच्यातल्या स्त्रीत्वाच्या विरुद्ध आहे. प्रत्यक्षात तुम्ही स्त्री आणि पुरूष यांच्या दोघांच्याही पल्याड आहात. केवळ दैववशात (वा पूर्वपुण्याई म्हणा हवं तर) तुम्हाला स्त्रीत्वाच्या पलीकडे काय असतं ते अनुभवायला मिळालं आहे. आणि तेच सत्य आहे. कारण त्यापासून स्त्रीत्व उगम पावलंय. (संदर्भ : तुम्हीच म्हणालात की '...it doesn't mean I don't care.')

मग थेट भिडा की सत्याला! पहिल्यांदा तुमचं स्त्री म्हणून अस्तित्व लयास जातंय की काय अशी भीती वाटेल. पण तरीही गच्च आवळून धराच सत्याला म्हणतो मी! आज इथे मायबोलीवर कित्येक लोक थेट सत्याला भिडू शकत नाहीत. तुम्हाला संधी मिळाली आहे तर सोडू नका.

पुढील वाटचालीस शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

स्वतःच्या सर्वकष mediocrity ची जाणीव होणे आणि त्याने काळीज पोखरत राहणे हे स्वागतार्ह असले तरी भयाणच की. पण साक्षेपाने पाहिले तर अंतर्बाह्य भोसकणारी ती तीव्र टोकेही बोथट होतात आणि अंती जीवनानुभवाच्या व्यामिश्र रेट्यात तर त्याची बारीकशी बाह्य टोचणी ती काय उरते. तुम्हाला काय वाटते ?

धन्यवाद आनंदयात्री.. Happy

अरभाट,
प्रत्येक क्षणाला झगडूनच भेटावे का? कधी अट्टाहासाचे प्रयत्न करावेत आणि कधी नाही (going with the flow), हे कसे कळेल?>> मला वाटतं हा खूपच सापेक्ष मुद्दा आहे. मी कुठेतरी वाचलेलं की life is all about holding on and letting go.. याचा अर्थ मला असा लागला की, जोवर आपण एखाद्या क्षणात आहे तोवर आपलं १००% द्यावं आनि ते निघून जातानाही त्याला तितक्यात स्थितप्रज्ञपणे निघून जाऊ द्यावं. कदाचित हे ज्याचं त्यालाच उमगत असावं की 'हे पकडून ठेवायचंय' आणि 'हे सोडून द्यायचा क्षण आलाय'.. Happy

चिमण.. Happy हे सगळे 'या जगात आपण येण्यामागचा अर्थ काय' या एकाच प्रश्नाचे विविध पैलू आहेत असं वाटतं मला. एक आधी सोडवू, दुसरा नंतर असं नाही म्हणता येणार..

गामापैलवान,
अट्टाहास म्हणजे एक प्रकारचा अहंकारच नाही का>> अर्थातच आहे. माणसाला अहंकार आहे ही फार गरजेची गोष्ट वाटते मला. माणसाला अस्तित्वाचा अहंकार नसता तर स्वतःच्या क्षुद्रतेच्या जाणिवेने मेल्याहून मेल्यासारखा झाला असता तो. प्रगती अशक्य झाली असती. मुळातच इतक्या नगण्य अस्तित्वातदेखिल अहंकार देण्यामागचं तेच प्रयोजन असावं निर्मिकाचं.

आणि समत्वदृष्टी ही सार्वकालिन असत नाही. म्हणजे अजून माझी तरी झेप तेवढी नाही. तिचा साक्षात्कार होतो. काही क्षणांत तिचा अनुभव होतो पण अजून आत्मसात होत नाही. तिथवर पोहचण्याचा प्रवास मोठा आहे. आणि 'त्या' सत्याला भिडण्यासाठी लागणारं मानसिक बळ मिळवणही अवघड आहे.

पण त्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.! Happy

ट्यागो,
सद्गुरुवाचोनी सापडेना सोय, गुरुबिन कौन बतावे राह वगैरे वगैरे म्हटलंच आहे की.. Happy

धन्यवाद बस्के.. Happy

मोगॅम्बोजी,
ती टोके बोथट व्हावीच लागतात. किंबहुना ती व्हावी यासाठीच हा पसारा मांडला गेला असावा. ती टोके कायम तीव्रतेने खुपणारी असती तर माणसाच्या आयुष्याचे संदर्भच बदलले असते.. कदाचित इथवर पोचलाच नसता मानव समाज.. म्हणून तर अशी टोके सगळ्यांनाच जाणवत नाहीत. जाणवली तरी बोथट होतात. पण ही अधूनमधून लागणारी टोचणीसुद्धा तसं पाहता खूप समृद्ध करुन जाते. Happy

सजीव असल्याने पडणारे प्रश्न आहेत. मेल्यावर हे प्रश्न पडत नसावेत असा अंदाज आहे.

हयात जाताना प्रश्नाचे उत्तर कळुदे
उभा न ठाको प्रश्न पुन्हा या प्रश्नांनंतर

(नेहमीप्रमाणे एक जुना शेर आठवलाच माझा)

जिवंत असताना प्रश्नही जिवंत राहतात. मग ते साचले, उचंबळून यायला लागले की व्यक्त केले जातात. व्यक्त करण्याची पद्धत माणसानुसार निरनिराळी. मग अशा, वरच्या प्रकारे व्यक्त झाले की चर्चा होते. प्रत्येकजण प्रश्नांच्या आगीत आपला एक चमचा तेल ओतून जातो आणि आग सर्वव्यापी होण्याचा प्रयत्न करत बसते.

न्यूट्रल राहणे संतांना जमले असे म्हणतात, पण ते सिद्ध होण्यासाठी ज्ञानेश्वरांची समाधी खोलून पाहायला लागेल किंवा यानातून पुष्पक विमानाचा शोध घेत बसावे लागेल. नाहीतर 'पता लगा' तेही न्यूट्रल नाही होऊ शकले. पण त्यांच्या नावाचा जयघोष चालूच आहे.

मग न्यूट्रल होणे (सामान्यांना तर कल्पनेतही) शक्यच नसले तर न्यूट्रल होता येत नाही याची चिंता सोडायला लागणार. किंवा मग त्या चिंतेला देहाचा, चेहर्‍याचा एक भाग करून वावरत राहावे लागणार. हेही ठीक. धान्य दळले जाते त्याप्रमाणे आपापले चेहरे आणि देह घेऊन लोक हे प्रश्न एकमेकांवर आदळत दळत राहतात, ठेवतात.

पण ते स्मूथ, सरळ व पोझिंग न करता व्यक्त केले, दळले तर उत्तमच! उगाच कविता या सदरात ते द्यायचे, त्यासाठी शब्द, प्रतिमा, अलंकार आणि यमकांना आशयाच्या खलबत्त्यात कुटायचे आणि अनाकलनीय ग्रेस होऊन महान ठरायचे यापेक्षा सरळ स्वच्छ लिहिलेले बरे.

(हा प्रतिसाद माझ्या आधीच्या प्रतिसादाचा 'टोन' जर कोणाला गैर वाटला असला तर तो समज घालवण्यासाठी)