आठवणींच कपाट भाग- ७

Submitted by विनीता देशपांडे on 7 August, 2012 - 01:22

७/६/१९८१
आज रोज सारखी खुप दमले आहे. मी बळेबळेच अभ्यास बंद करुन झोपी जाणार तेवढ्यात ....रात्री अकराच्या सुमारास फोन वाजला.....इतक्या रात्री कोणाचा फोन आला या भितीने आम्ही तिघेही हॉलमधे आलो. फोन प्रसन्नाच्या बाबांचा होता...त्याचा देहरादूनला अपघात झाला एवढच सांगितले.....तो कसा आहे...कुठे आहे.........माझ्या डोक्यात विचित्र विचार येउ लागले...हातापायाला मुंग्या आल्या.....शरीर बधीर झाले...... प्रसन्नाचे आईबाबा पुण्याहून देहरादूनला निघणार होते.....काळजी करु नको तो सुखरुप आहे. आम्ही तिकडे पोहचल्यावर फोन करतो.
त्या क्षणी मला प्रसन्नाला भेटायचे होते....कसा असेल तो...त्याला खूप लागले का ?.....त्याला त्रास होत असेल....असल्या जीवघेण्या विचारांनी कंठ दाटून येत होता....हुंदके आवरत नव्हते. फोनची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.

९/६/१९८१
प्रसन्नाच्या काळजीन जीव वरखाली होत होता. कालपासून आत्याच्या फोनची वाट बघत होते.
सकाळी फोन खणखणला आणि सगळेच धावलो. बाबांनी जे सांगितले धक्कादायकच होते. प्रसन्ना आपल्या रेजीमेन्टच्या सहा कॅडेटसोबत शिवालीक हिल्सवर ट्रेकींगसाठी गेला होता......दुसर्‍याच दिवशी बेसकॅप्मचा संपर्क तुटला होता आणि ते त्या हिल्समधे नेमके कुठे अडकले आहेत याचा शोध सुरु होता.
त्यांना जौन्सर बवार गावातील काही लोकांनी बघितले....बटालिअनची एक तुकडी त्यांना शोधायला गेली आहे.
ती परतली की फोन करणार.......मला काहीच सुचत नव्हते देव करो प्रसन्ना सुखरुप परत येउ देत.
निरोपाची वाट बघायची.......मला वाट पहाणे अशक्य होत होते.
१२/६/१९८१
डायरी उघडली खरी पण नुसतेच पानं चाळत बसले.
..प्रत्येक क्षण प्रसन्नाच्या काळजीनं जीव कासावीस होत होता.....
खरंतर परवाच कळले प्रसन्ना सुखरुप आहे. तो सापडला पण जखमी अवस्थेत. ट्रेकिंग करतांना कदाचित पाय सटकून घसरला....काय झाले कसे झाले या पेक्षा महत्वाचे होते ते त्याच्या सुखरुप असण्याचे. माझी घालमेल माझा त्रागा.... आई-बाबांना ही कळला असावा म्हणूनच त्यांनी माझ्या देहरादूनला जाण्याचा निर्णय मान्य केला. बाबांनी सगळी व्यवस्था केली. आधी दिल्ली नंतर देहरादून . दिल्लीला प्रसन्नाचा मित्र बलजित घ्यायला येणार होता.
१४/६/१९८१
आजच बाबांनी गाडीत बसवले.....अकराशे पैकी निम्मा प्रवास मी पार केला होता. एकटीच प्रसन्नाच्या ओढीने उरलेला पार करणार . दिल्लीहून अजून अडिचशे किलोमीटर पुढे जाऊन प्रसन्ना भेटणार होता. प्रवास करण्या पलीकडे माझ्या जवळ पर्याय उरला नव्हता. विचरांच्या गर्दीने भांबावलेल्या अवस्थेत डायरी पण लिहवत नाही. डब्यात अंधार झाला... मी ही डोळे मिटून घेतले.

२३/६/१९८१
मी आज डायरी आर्मी हॉस्पिटलमधे बसून लिहिते आहे....प्रसन्ना माझ्या समोर बेडवर जीवन-मृत्यूशी झुंजतो आहे...माझी आज तीच अवस्था आहे जी मी इतके वर्षांपासून मेडिकल कॉलेजमधे अनुभवत होते.....मला आज पेशंटच्या नातलगांची तळमळ..त्यांची वेदना कळली....आपल्या जवळचा व्यक्तीला असे पाहून नक्की काय वाटतं ते कळलं.
अर्चना आत्या..बाबा सगळे काळजीत होते.....प्रसन्ना शुध्दीवर येत नव्हता.....जर बाहेरचा मार आहे तर आत्ता पर्यन्त तो शुध्दीवर यायला हवा.....मला आर्मी हॉस्पिटलचे डॉक्टर रिपोर्ट दाखवत नव्हते......हेड इनज्यूरी आहे...पण डोक्याला मार फार लागलाच नव्ह्ता....आईबाबांच्या आग्रहाखातर मी त्याची शुध्दीवर येण्याची वाट पाहू लागली.....बारा तास...पंधरा तास...वीस तास....झाले तो शुध्दीवर आलाच नाही.....मला रिपोर्ट दाखवला नाही....मी डॉक्टर आहे....मला ते का दाखवतं नाही कळत नव्हतं...बलजीतच्या कानावर घातलं....प्रसन्नाच्या इतर मित्रांच्या कानावर घातलं....त्यांनाही काही कळेना......
नाइलाजाने त्यांनी रिपोर्ट दाखवलेत.

२४/६/१९८१
आज पहाटे थोड्यावेळासाठी प्रसन्ना शुध्दीवर आला.....त्याचं सार अंग दु:खत असल्याचं मला त्यानं इशारा करुन सांगण्याचा प्रयत्न केला....... बाबांनी प्रसन्नाला पुण्यात न्यायची परवानगी मागितली...पण तो पूर्ण शुध्दीवर येई पर्यन्त त्यांनी नेऊ शकत नाही असे सांगितले. माझे इथे येणे..प्रसन्ना भेटणे हे विधीलिखित होते का ? याला काय म्हणतात देव की दैव ?
माझा प्रसन्ना सुखरुप होता. आज आईबाबांशी फोनवर बोलले. त्यांनाही समाधान वाटले. आज खूप दिवसांनी मला, आत्या आणि बाबांना शांत झोप लागणार.
२६/६/१९८१
अ‍ॅनस्थेशियेचा असर उतरत होता तसा प्रसन्ना आणि इतर शुध्दीवर येत होते....त्यांची जीभ जड झाली होती..हातपाय हालवतांना त्रास होत होता...अंगभर मुंग्या लागल्या सारखं वाटत होतं ..बोलतांना त्रास होत होता....प्रसन्नाने मला बघितले आणि खूप वेळ हात सोडला नाही. वेळ लागेल पण सगळे ठीक होतील...
मी परिक्षा अर्धी सोडून आल्याचे आत्ता जाणवले......आता काय परत महिन्यांनी द्यायची.....माझ्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून मी किती अभ्यास केला....पण नियतीला मंजूर नव्हतं. माझ्या तोंडून पहिल्यांदा नियती शब्द निघाला आणि माझे मलाच आश्चर्य वाटले. आठवड्यापासून प्रसन्नाला बघते आहे.....मला जनरल वार्डातील पेशंटचे नातेवाईक व्हरांडयात ताटकळत का बसलेले असतात आज कळलं. बर्नवार्डात मरायला टेकलेल्या पेशंटच्या डोळ्यात आपल्या माणसांसाठी जगण्याची ईच्छा असते...स्वत:साठी नाही....हे उमगलं.
बाळंतीणीच्या कळांनी का आईच्या डोळ्यात पाणी येते हे समजलं....परिस्थिती माणसाचा श्रेष्ठ गुरु बाबा का म्हणतात ते आज कळलं......गेल्या दहा बारा दिवसात मी खूप काही शिकले......ही शिदोरी माझ्या पूढच्या आयुष्याला कामी पडणार..नक्कीच.
>>>>>>>>>>>>>>>>>...............<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
नचिकेतला काहीच कळत नव्हतं......हे काय घडतयं....ही डायरी नक्की कुणाबद्द्ल आहे?
एखादा चित्रपट बघावा तसं काहीसं या डायरीत घडत आहे.....त्या गार्गीला सलाम...पण ही आत्ता कुठे असेल ? तिचं आणि प्रसन्नाचं लग्न झालं असेल का? या प्रश्नांची उत्तरं मिळावे म्हणून तो परत डायरी वाचू लागला.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.................<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
१०/७/१९८१
मी प्रसन्नाला पुण्याला सोडून मी नागपूरला आले. फोनवरुन आईबाबांना जरी कळले होते तरी आम्ही प्रसंगातील गंभीरता त्यांना सांगितली नव्हती.....मला तर आईने कुशीतच घेतले......मला पण त्यांना बघून खूप रडू आले.......या प्रसंगात ते माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले........कॉलेजमधे मी परिक्षा सोडून का गेले ?...काय झालं..सगळ्यांचा एकच गलका झाला...शेखर. आणि इतर मैत्रीणींनी मात्र मला रामायण सांगायच्या भानगडीत पडू नको....तोंडावर नाही नंतर आपल्या मागे उगाच प्रकरण चिघळतं..तू फायनला नाही म्हंटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. थोडक्यात सांगून मोकळी हो.
.....आता परत परिक्षेची तयारी...परत अभ्यास....खूप आठवणी...जीवनाचे मला गवसलेले सार...घेऊन मी नव्या उमेदीने कामाला लागले. एच.एचे काम झपाट्याने वाढत आहे. मी नसतांना बरेच पेशंटस सेटल झाले....दिपक...निलीमा....नवे मेंबर काम बघत आहेत. आजच डॉ.पैठणकरांना भेटून माझी इंटर्नशिप बद्दल बोलायच होत..
आज कुमुद आणि सुमीला फोन केला. कुमुद फोनवर बोलली..पण सुमी तर घरी नव्हती. बाळाला घेऊन कदाचित डॉक्टरकडे गेली असणार.
आईबाबांना खूपदा विचारलं. पण दोघे तो विषय टाळत होते.
शेवटी मी चिडून आईला विचारले प्लीज़ आई टाळू नकोस.....सुमी-सुहासदा-नचिकेत कसे आहेत ? मला का सांगत नाही.
शेवटी बाबांनी सांगितले त्यानी माझ्या पायाखालची जमीन सरकलीच. मला दोघींना फोन करायचा धीरच झाला नाही.
खूप प्रयत्नाने मी स्वत:ला सांभाळले....रविवारी वर्धेला जायच ठरवून...रुटीन कामात लक्ष देण्याचा मी फसवा प्रयत्न करत आहे. राहून राहून दोघींचे चेहरे डोळ्यापूढे येतात. बाळं मी बघितले तेव्हा ठीक होते. निमोनिया झाला.....अ‍ॅडमिट केले पण बाळ वाचले नाही.
१८/७/१९८१
अर्चना आत्यचा फोन आला...प्रसन्नाच्या तब्येतीत बरीच सुधारणा आहे...आजकाल मी आठवणी उगाळत बसत नाही....डायरीतील जुनी पानं वाचली . मी अशी होते हे माझचं मला आश्चर्य वाटायचं... हल्ली सतत सुहासदा-सुमी -कुमुद डोळ्यापूढे येत होती.
प्रसन्नाने दिलेली दोन पत्र मी वाचलीच नाही हो त्यानेच सांगितले माझे पत्र मिळाले नाही तेव्हा ही पत्र वाचशील. आज मी एक पत्र वाचायला घेतलं..माझ्या लाडक्या दोडक्या चिंगीला...
"हे पत्र मला तुझी आठवण आली म्हणून लिहिले.....आज सोमनाथ स्टेडिअम मधे कार्यक्रम होता...खूप बोर झाला म्हनून सरळ उठून आलो आणि तुला पत्र लिहायला घेतले...मला तुझ्या सारखे पत्र लिहिता येत नाही....कॅन्टीनच जेवण बोअर झालं की तुझ्या हातंच अर्ध जळकं अर्ध कच्च थालिपिठ आठवतं. तू माझ्या साठी सुधाआजीच्या गच्चीवर घेउन आली होती...
शूटींग प्रॅक्टीस करतांना तूझं रागानं बघणं आठवतं.....मी तुला चिंगी म्हंटलं की मारक्या म्हशी सारखी बघायची.....घोड्यावर बसतांना तुझा हट्टी स्वभाव आठवतो....नाही म्हणजे नाही...नाहीच...तूच ठरवणार ते सगळं बरोबर....हल्ली तुझी आठवण यायला कुठलही कारण चालतं....असो. तू इतक्यात एकही कविता मला पाठवली नाही.
मी बलजीत...प्रवीण..हेमंत...राजशेखर लपून सिनेमाला जाणार होतो पण आमचा डाव फसला.
त्यात काय पुन्हा प्रयत्न करु.
( वेड्या गार्गीचा
शहाणा प्रसन्ना)

खरचं माझ्या शहाण्या मी इतक्यात तुझ्याशिवाय दुसरा कुठलाच विचार केला नाही रे...या चार ओळी खास तुझ्यासाठी:
व्याकूळ डोळ्यात ओघळत्या आसवात
आठवणींचा पक्षी,आज पापणीत आला
मनाच्या गाभार्‍यातील धीर थरथरला
तेच शब्द तिच विराणी आळवू नको रे
सूटला धीट ताबा आता सावरु नाको रे"

२०/७/१९८१
प्रसन्नाला रोज फोन करते...हळूहळू तब्येतीत सुधारणा होतं आहे.....आई-बाबा भेटायला पुण्याला जाणारं.
डॉ. देवाशिष गोडबोलेंनी मला जनरल वार्डात बोलवले.....मी गेले तेव्हा... सेकन्ड टर्मच्या बॅचचा तांडा त्यांच्या मागे होता. माझ्या बद्दलं त्यांना उडत उडत बातमी लागली असणारं....आता हे खूप दिवस चालणारं माझ्या लक्षात आले...संपर्कात आलेल्या डॉक्टरांना परिक्षा का दिली नाही याचे एक्सप्लेनेशन द्यावेच लागणार.त्यातून माझी सुटका नाही....
हल्ली घरी यायला उशीर होतो....पण आता मला डायरी....एकांत...आठवणींची गरज भासत नाही...या स्थितीला काय म्हणायचे......सवय बदलली...की विचारांवर मन...मनातील सतत उठणार्‍या तरंगांना मी हावी होऊ देत नाही......की मी आतून बाहेरून माझं एकच अस्तित्व आहे...ते म्हणजे गार्गीचं.....मी यापैकी कुठल्यातरी अवस्थेत आहे हे मात्र नक्की. सवयीप्रमाणे मी माझ्यातला बदल टिपण्याचा प्रयत्न करत आहे.

१४/८/१९८१
आज माझा वाढदिवस...........काय कमाल आहे प्रत्येक वाढदिवसाला मला प्रसन्ना जवळ हवा असे वाटत असे पण आज मला अजिबात वाटले नाही.....तो आहेच माझ्यासोबत पावलो पावली.....मीच माझ्यातून हरवून टाकला होता काही काळ.
भावना आपल्याला विवश करतात....आणि मग आपण कुठल्याही थराला जाऊन विचार करतो....

२०/८/१९८१
आज प्रसन्ना माझ्याशी फोनवर बोललां. आणि बरेच दिवसांनी सलणार्‍या मनाला गारवा मिळाला. मी इकडे झपाटून अभ्यासाला लागले......आता दुसरा कुठलाच विचार करायचा नाही...खूपदा ठरवते पण सुमी-सुहास आणि कुमुद या तिघांचा चेहरा आणि बाळ डोळ्यापूढून जातच नाही.
आज एक अवघड डिलेवरी झाली......बाळ बाळंतीण सुखरुप पाहून मलाच हायस वाटलं.
रेकॉर्डशीटवर नाव बघितले....सुमन महाजन. ती बाळाकडे बघायला तयार नव्हती
....नवर्‍याने सोडली तिला...सिस्टर म्हणाली. मी तिला समजवून सांगितले. पण काही उपयोग झाला नाही.इतर कामाच्या नादात ही केस मी विसरुन गेले.
खर तर आज खूप काम झालं...एच.एच्या ऑफिसमधे जायचा कंटाळा पण आला होता.तरी एक चक्कर टाकलीच नुकतीच एका तान्ह्या बाळाची केस आली...केसपेपरवर नाव होतं सुमन महाजन. मी आधी चरकलेच...
"ती बाळाला ठेवून पळून गेली." दिपक ने सांगितले. अनाथाअश्रमात कळवलं आहे...पण निदान पंधरा दिवस तरी बाळ हॉस्पिटलमधेच ठेवाव लागेल.
माझ्या आयुष्यातला कसला घटनाक्रम आहे आधी कुमुद..सुमी..प्रसन्ना आणि चिमुकला जीव. मी एका समस्येतून सुटते. तर दुसरी तयारच असते. ...मनात एक निश्चय केला.....निलीमा, दिपक ही केस मी बघते.
मी घरी आले. आईबाबांशी चर्चा केली. सुहासदा आणि सुमीला नागपूरला बोलवलं.

२/९/१९८१
आज रीतसर अडॉप्शन प्रोसिजर झाली. दोघांच्या चेहर्‍यावर समाधान बघून बरं वाटलं. दोघे यासाठी तयार होतील असे वाटलेच नाही......पण सुमीला परत चान्स घेणे शक्य नाही हे मला डॉ.पेंडसेंनी आधीच सांगितले होते....सुमीला बाळ हवे होते....आणि सुमन महाजनला नको...परत एकदा सगळ्यांच्या चेहर्‍यावर आनंद बघून मला आनंद झाला.
आनंद..समाधान आपल्याच भोवती असतो तो शोधावा लागतो...थोडेसे प्रयत्न...कोणाचे निमित्य...होऊन तो आपल्या अंगणात येतोच...सुहासदा-सुमी आयुष्यभर बाळासाठी आसुसले असते....आणि मी हे बाळ त्यांच्या पदरात घालण्याचं निमित्य ठरले.
दोघांनी बाळाचं नाव नचिकेत ठेवले.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>........<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
नचिकेतच्या हातून डायरी खाली पडली.
तू वाचलं सगळं. नचिकेत
हो... अनु
तूला माहिती आहे मी कोणाचा मुलगा आहे? नचिकेत
हो, सुमिता सुहास बोधनकरचा. अनु
नाही! सुमन महाजनचा..नचिकेत
नाही! नीट वाचं. सुमन महाजन ने नऊ महिन्यात फक्त पोटात ठेवलं. सुमिता सुहास बोधनकर या दोघांनी तुला गेले तीस वर्ष आपल्या ह्रदयाच्या कोंदणात ठेवलं आणि अजून तू तिथेच आहेस. ...अनु
अजूनही माझ्यावर प्रेम करतेस....नचिकेत
हो...मला प्रेम म्हणजे काय हे गार्गीने शिकवले.....अनु
वेडेपणा करु नको.....विसरुन जा असं नाही म्हणणार मी...पण तुला कळलेले सत्य आपल्या नात्यांच्या मधे आणु नकोस एवढच सांगेन मी...अनु
हा संवाद संपला आणि नचिकेत अनुच्या मांडीवर डोकं ठेऊन रडू लागला.
शांत झाल्यावर त्याने विचारले...प्रसन्ना-गार्गीचे लग्न झाले ?
तू वाच..म्हणजे कळेलं..अनु
तू म्हणालीस ते पत्र कुठे आहे ? आधी डायरी वाच. थोडच राहिले आहे. तो परत डायरी वाचू लागला....
क्रमशः( उद्या भाग८ अंतिम भाग)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचा भाग लवकर येउ दे! आज सकाळपासून १०-१२ वेळा मायबोलीवर आले...पुढचा भाग आला का ते बघायला Happy

विनीता, gr8 छान गुंतवून ठेवलेत आणि पटापट भाग टाकून आम्हा वाचकांचे मन जिंकलेत.
खरोखरच एखाद्याची डायरी वाचल्या सारखी वाटतेय. लिखाणाची शैली खरोखर मस्त आहे.

पुढचा भाग लवकर येउ दे! आज सकाळपासून १०-१२ वेळा मायबोलीवर आले...पुढचा भाग आला का ते बघायला Happy

>>>>>>>>>> डिट्टो!!!