आठवणींच कपाट भाग-६

Submitted by विनीता देशपांडे on 6 August, 2012 - 00:40

१७/११/१९८०
प्रसन्नाचं ट्रेनींग संपत आलं.....त्याची पासिंग आउट परेडची तयारी सुरु आहे. तो आल्यावर सगळे प्लॅन करता येतील...
आज हॉस्पिटलचा राउंड घेतांना जनरल वार्डातील एकोणीस नंबर बेडवरती आजी रडतांना दिसल्यात. त्यांना दोन तीन दिवसात डिस्चार्ज मिळणार.....ठणठणीत बर्‍या झाल्यात तरी रडत होत्या. मी मेले असते तर लेकरांनी आनंदात स्मशानात नेली असती...बरी झाले आता कुठे जाऊ.......मी एकून गारच झाले.....सिस्टरने सांगितले....आजरपणाचा खर्च म्हणून यांनी मुलांनी दिलेले पेपर्सवर सह्या केल्या...कालपासून कोणी भेटायला पण आले नाही.....डिस्चार्ज मिळाल्यावर कुठे जाणार म्हणून केव्हाच्या रडत आहेत......
आमच्या स्टाफला त्यांच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगितलए आणि मी डॉ.कदमांना भेटायला गेले.....
मी अशा प्रसंगाला पहिल्यांदाच सामोरे जात आहे बघून डॉ.कदमांनी अशा बर्‍याच केसमधे होतं सांगताच....पूढे काय ?माझ्या चेहर्‍यावरचे भाव बघून....त्यांनी बघतो असे आश्वासनं दिलं

८/१२/१९८०
बेड नंबर एकोणीस या विषयावर आमच्या ग्रुपने बरीच चर्चा केली...तेव्हा असली पहिली केस नाही अशाच प्रकारच्या भरपूर केसेस इथे होतात....त्यांच पूढे काय होतं यासाठी मेडिकल जवाबदार नाही....मेडिकलची ड्यूटी....पेशंटला बरे करणे......मग अशा लोकांची जवाबदारी घेणार कोण ?
यावर आम्ही ऐन परिक्षेच्या दिवसात सर्व्हे करायचा ठरवला...प्रत्येक डिपार्टमेन्ट मधे जाउन अशा केसेसचे माहिती मिळावायची.....ठरलं....पण क्रायटेरिया काय ?......गरजू ?.....ज्येष्ठ नागरिक ?...महिला ?....लहान मुलं ? आणि आत्तापर्यन्त तर किती पेशंट्स असतील. शेवटी या वर्षातील सगळ्या डिपार्टमेन्टमधून असा केसेस गोळा करायच्या..... असं ठरलं.....
१५/१२/१९८०
ओरल्स.....प्रॅक्टिकल्स...आणि सर्व्हे.....यात मी गुंतले होते.....हळूहळू आमचा ग्रुप मोठा झाला .आम्ही बारा जण होतो आत चाळीस जण झालोत.....ज्या ज्या डिपार्टमेन्टला आम्ही जायचो याबद्द्ल ऐकून तो ग्रुपमधे सामील होत गेला. आम्ही माहिती गोळा करत होतो...पण पूढे काय ? आपण कुठल्या प्रकारे त्यांना मदत हरु शकतो ? यावर चर्चा करायला आम्ही आज कॅन्टीन मधे जमलो......बरेच सजेशन्स मिळालेत...पण सम्जा लहान मुलगा असेल....तर त्याला अनाथाआश्रमात सोडायचं...महिला असेल तर तिला रोजगार मिळवून द्यायचा...ज्येष्ठ असतील तर त्यांना वृध्दाश्रमात पाठवायचं....पण हे सार करायचं कोणी....आपण आहोत तोवर आपण जातीने लक्ष देउन करु . आपल्यानंतर ? याला एक परमनंट सोल्यूशन हवं.....एखाद्या वर्षाचा उपक्रम म्हणून नको.....
सिस्टर बेला आमच्या या सर्व्हेला खूप दिवसांपासून न्याहळत होती....आम्ही तिला मिटींगमधे बोलावलं.
तिच्या बहिणीला तिसरी मुलगी झाली आणि नवर्‍याने दवाखाण्यातच तिला आता घरी येऊ नको असे सांगितले. बेलानी तिला आधर दिला....मेडिकलच्या कॅन्टीनमधे ती सध्या पोळ्या करते.....तिला अश्या लोकांना मदत करायची ईच्छा आहे......राजनने एक वही आणली.....त्यात या उपक्रमातील सदस्यांची यादी तयार केली...कोण कशी मदत करु ईच्छितात ते त्यांच्या नावापुढे लिहिण्यात आले...त्यानूसार केसेसचे वाटप करण्यात आले...आधी जून्या मग नवीन केसेसला प्राधान्य देण्यात आले. सदस्य फी...प्रत्येकी दहा रुपये महिना आकारण्यात आली...

१८/१२/१९८०
सदस्यांची फी आणि हिशेब शेखर आणि नरेन्द्र सांभाळत होते....मग माझ्या बाबांच्या आग्रहाखातर बॅंकेत खाते उघडण्यात आले...काते उघडायच्या अनुषंगाने....सोसायटी...चे रजिश्ट्रेशन करायचे ठरले....पण मेडिकल मॅनेजमेन्ट यासाठी परवानगी देईनात.
आम्ही आमच्या कॅम्पसमधले दयाळू-मायाळू डॉक्टरांना गाठलं.
२७/१२/१९८०
आमच्या या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळत गेला. डॉक्टर पैठनकरांनी मध्यस्थी केली आणि आमची सोसायटी...मिशन यशस्वी झालें. सर्वानुमते या सोसायटीचे नाव हेल्पिंग हॅंड सोसायटी ठेवण्यात आले.
कमिटी तयार झाले....डेटा कलेक्शनसाठी मेडिकलचा स्टाफ पूढे आला....सिस्टरस...वॉर्डबॉय...सगळेच या मिशनमधे सामील झालेत. आज हेल्पिंग हॅंडच्या लोगोचे पण औपचारिक उदघाटन झाले....पॅथलॉजी डिपार्टमेन्टच्या लॅबच्या दोन स्टोअररुममधली रिकामी रुम आम्हाला आमच्या उपक्रमासाठी मिळाली....
फिजिऑलॉजीताल दोन रॅक्स , कॅन्टीनमधाला जूना टेबलं आणि कॉलेज स्टाफरुम मधून चार खूर्च्या मिळाल्यात असे आमचे अनेकांच्या हेल्पिंग हॅन्डमुळे " हेल्पिंग हॅन्ड" चे ऑफिस सुरु झाले.
माझ्या एका विचाराचा असा मदतीचा वृक्ष तयार होईल मी कधी कल्पनाच केली नाही.
आईबाबांच्या डोळ्यात कौतुक बघून मला समाधान मिळालं. कॉलेजमधे मला आता सारेच ओळखु लागले....
डॉक्टर पैठनकरांनी मला त्यांच्या क्लिनीकवर बोलवलं. मी णि बाबा गेलो....त्यांनी माझं खूप कौतूक केले...आणि इंटर्नशीपसाठी विचारले......त्यांच पुण्यात हॉस्पिटलचं काम जवळ जवळ पूर्ण होत आले होते.....
त्यांना वाटलं पुणे म्हंटल्यावर मी जाणार का नाही. इथल्या डीनशी मी बोलतो. तू काळजी करु नको....माझ्या आनंदाला उधाण आलं. प्रसन्नाजवळ जाण्याचा थेट मार्ग मला मिळाला.
माझा विश्वास बसत नव्हता.
१०/१/१९८१
प्रसन्नाला पुण्याचं पोस्टींग मिळालं...अर्थात ही जादू त्याच्या बाबांनी केली...त्याला दुसरीकडेच मिळणार होतं. अर्चनाआत्याला बरं नव्हत.....बाबांच्या पायाच ऑपरेशन करायचं होतं.....आधी पुण्यात ये लग्न कर नंतर दोघं कुठेही रहा.
सध्या घरी यायला उशीर होतो....सगळ आटपून एच.एच चे (हेल्पिंगहॅन्ड) काम बघावं लागतं. माझ्या खिडकीतली चिमणी पिलांसकट उडून गेली होती..घरट बरेच दिवस तसचं पडून होतं. मी रितं घरट बघत आठवणीत रमते.
परांजपे शाळेनी दोन मुलांना दत्तक घेउन त्यांच्या शिक्षणाची आणि रहाण्याचे सोय केली. बेडनंबर एकोणीसच्या आजी...सुमन कापसे यांना वृध्दाश्रमात पाठवलं. चालू महिन्याचा खर्च एच.एच.ने केला..मात्र पूढचा खर्च त्यांच्या मुलांनी करायचं कबूल केलं.
आमची संस्था हळू हळू स्थिर होतं आहे....नवे सदस्य..नवे विचार रुजतात आहे....एकंदरीत एच.एच.चा उद्येश्य सफलं झाल्याचा मला खूप आनंद झाला.
या संस्थेच्या व्यापात मी इतके गुंतले माझ्या भोवती मीच रचलेले आठवणींचे आणि एकाकीपणाचे वलय आता विरायला लागलं आहे.

१०/२/१९८१
सुमीचं पत्र आलं. ती दोन दिवसांपूर्वीच बाळंतपणासाठी वर्धेला आली. कुमुद बरी आहे...पूर्वीची कुमुद हरवून गेली...ती जगते आहे ते फक्त तिच्या बाळासाठी....तिच्या सासुसासर्‍यांनी मुलाच्या मृत्यूला कुमुदला जवाबदार ठरवलं....जे लोकं आपण चांगली म्हणत होतो त्यांचे रंग आता दिसायला लागलेत. आश्रमात आणि तिथल्या मुलांमधे ती खूप गुंतली आहे......पठ्ठी ऐकत नव्हती. निरंजन दादा तिला बळजबरीने माहेरी घेऊन आला....ती डिलेवरीसाठी नागपूरला येणार होती...पण आता माझ्याच दवाखाण्यात नाव नोंदवले आहे....
तिच्यासाठी मी माझे डोहाळजेवण रद्द केले.....त्यामुळे तू आता डिलीवरीच्या तेव्हाच ये......गार्गी नक्की ये मला फार भिती वाटते आहे.......सुहासच टेन्शन डिलेवरी होईपर्यन्त जाणार नाही.
मला एप्रिल महिन्यात दोघींसाठी जावं लागणार.

१५/२/१९८१
एच.एच.चे काम छान सुरु आहे....प्रसन्नाच्या आईबाबांच पत्र आलं. त्यांना माझा हा उपक्रम खूप आवडला.
अर्चना आत्या तर सोशल वर्कर आहे तिने माझं कौतूक केलं. या मुळे आईबाबा आनंदात आहे. त्यांचा आनंद आणि समाधान माझं. बाबांनी माझ्या इंटर्नशीप बद्दल सांगितले...अर्चना आत्या पुण्यात माझी रहायची सोय करते म्हणाली. आता ती आमची पण लेक आहे ...यावर माझ्या आईबाबांचे डोळे पाणावले..
लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्यात. पूढच्या महिन्यात प्रसन्ना आईबाबांसोबत येणार आहे.
माझे स्वप्न पूर्ण होणार.... मनात इतके दिवस जपून ठेवलेली हूरहूर मी चारी दिशांना उधळून टाकणार.
आनंदात मी प्रसन्नाचे पत्र वाचायला घेतले.
"माझी गोंडस..लोभस..मैना... तुझ्या आठवणीनं माझी झाली दैना......केव्हा भेटशील सोचें दिन और रैना
...का घेतलंस माझ्या मनीचं चैना......दोनो घुमने जायेंगे चाईना " काय जमली ना मला कविता.....तुझ्या कवितांचा असर....
बापरे...याची कविता ....तू भेटच दाखवते तुला !! तुला शिकविन चांगलाच धडा.....ती फुलराणी मधला संवाद उगाच आठवून गेला.
सगळच कसं व्यवस्थित चाललं आहे....मी उगाच धास्ती घेतली....माझं मलाच वाटलं.
नंदूच पण लग्न ठरलं......
धन्नोच तर प्रेमविवाह कॉलेज मधे चर्चेचा विषय झाला. धीरज केशवानी......कोणाच्याच घरचे तयार झाले नाही सरळ लग्न करुन मोकळी.
निरंजन दादा तिला माहेरी घेऊन आला..
१०/३/१९८१
प्रसन्ना आला....कित्ती दिवसांनी आम्ही भेटलो.....अंबाझरीच्या तलावावर.....खूप गप्पा खूप गोष्टी.....मन वार्‍यासारखे उधाण झाले......चार दिवस आम्ही सोबत घालवले...कोणाच्याच चिडवण्याची टोमण्यांची पर्वा न करता आम्ही दोघं मस्त फिरलो.....तेलंखेडीला तर तिथल्या मारोतीच्या पयथ्याशीच दोन तास बसलो.
या खेपेस त्याने आ.एम.ए मधल्या कुठल्याच गोष्टी सांगितल्या नाही मला जरा आश्चर्यच वाटलं .प्रसन्ना निघायचा दिवस आला....मला म्हणे चिंगी रडू नकोस.....मी सांगत होतो ना ....दोघांच स्वप्न दोघांनी मिळून पूर्ण करायचं. झालं थोडीशी कळ सोस....मग आपलं आयुष्य इंद्रधनुषी रंगाच होईल. त्याने जातांना मला दोन पत्र दिलेत. इतक्यात नको वाचू माझं पत्र आलं नाही तर वाच. मला एक क्षण सुचल नाही. तो थोडा उदास दिसला मला वाटलं माझ्या वियोगाने होणार्‍या दु:खामुळे असावा. मी काही विचारायच्या आत त्याने मला ए तुझी एखादी कविता दे ना. त्याची "ऐ "म्हणायची लकब मला आवडायची. लग्नाची तारीख पूढच्या भेटीत काढू...पण मी जोर दिल्यामूळे. तुझी परिक्षा आटोपल्यावरचा पहिला मुहुर्त..मला माझ्या तपाच फळ मिळाल्यासारख वाटलं. आज माझा आनंद कुठेच मावत नव्हता.
इतकं बोललो तरी मन भरत नव्हतं आणि रितंही होत नव्हतं. थोडक्यात एकमेकांना सोडून रहाण आता जड वाटत आहे......बळे बळेच आम्ही निरोप घेतला.
......आणि माझ्या तृप्त मनातून सहज स्फुरलेल्या या ओळी.
शब्दांनी यावे
जसे पावसाचे थेंब
भाव साकारावा
जसा इंद्रधनचे रंग
अर्थ एकरुप जशी
भिजे धरा चिंब
श्वासात खोल घ्यावा
शब्द मृदगंध
या गंधात मन
होईल बेधुंद
या धुंदीत गावे
प्रीतीचे गीत.
२/४/१९८१
प्रसन्ना नेहमीच जातांना जीवाला हूरहूर लावून जातो. परत आठवणींचा ताफा माझ्या दिशेनी येऊ लागला...
का दरवेळेस एकमेकांच्या सहवासातील क्षणं माझ्या कडे आशेने बघतात ? मी स्वत:ला वेगळ्या विषयांकडे वळवण्याचे सारे प्रयत्न विफल झालेत...आठवणींचा निळा पक्षी माझ्याकडे झेपावलाच. माझी डायरी...आठवणी आणि फोटो........मी बर्‍याच दिवसांनी या खिडकीत आले....त्या चिमणीचं घरट वार्‍याने पडलं पण काही काटक्या तशाच होत्या. माझंही तसच आहे ना ?
पूढच्या आठवड्यात वर्धेला जायचं आहे....आईपण येणार आहे....
दोघींची सुखरुप डिलीवरी झाली पाहिजे.

७/४/१९८१
हॉस्पिटलमधे आज गदारोळ झाला.....जनरल वार्डातील बेडनंबर एकवीसच्या पेशंट रघुवीर ने आत्महत्या केली.....जेमतेम तीशीचा असेल...आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली....खरच त्या वेदना आम्हालाच बघवत नव्ह्त्या.....कॅन्सरने तो तसाही मरणारच होता...त्याने आधीच माघार घेतली....
" त्याला आपल्या आईवडिलांचं दु:ख बघवत नव्ह्तं.....त्यांचे पैसे संपत आले....त्याचा बाप साधारण माणूस आजारपणासाठी खूप खर्च केला...शेवटी त्याने स्वत:ची आणि त्यांची एका झटक्यात सुटका केली. गेम खल्लास " दत्ता आमचा वॉर्डबॉय मला सांगत होता.
रोज रोज या यातना मी उघड्या डोळ्याने पहायचे.....काहींच्या कमी करण्यात यश मिळायचं...काहींच नाही.....जन्ममृत्यूच्या काठावर सगळ ज्ञान...विज्ञान...बुध्दी...नवी औषधं.....नवे शोध.....सारं काही मातीमोल ठरतं...यालाच कोणी देव नाव देत कोणी दैव...हा जो कोणी आहे त्याची शक्ती आणि लीला दोन्ही अगाध आहेत. याच्या पूढे सारेच नतमस्तक होणारं.
रघुवीर सारख्या केसेस नेहमीच व्हायच्या....काळाच्या ओघात आठवणीतून निसटून जायच्या...मात्र त्यातला काही अंश मनात उरुन जायचा. मी अनुभवलेल्या प्रत्येक केसेसवर मी लिहायला घेतले तर एक थिसीस तयार होईल....पण काही आठवणी मनात काही कागदावरच ठीक आहेत.

९/४/१९८१
मेडिकल मधल्या अनुभवांनी यांनी मला खूप कणखर बनवलं....विपरीत परिस्थितीत धैर्याने सामोरे जाणे.....सावरणे....स्थिती आणि भोवतालची माणसं...निर्णय घेण्याची क्षमता....माझे व्यक्तिमत्व घडवण्यात मेडिकलचा फार मोठा वाटा आहे. एच.एच्या सभासद दिवसेंदिवस वाढत आहे....सगळ्यांच्या सहकार्याने एकेक पेशंट सेटल होत आहे. आज आमची मिटींग घेतली मी आठवडाभर नाही....त्यामुळे माझ्या केसेस..सगळ्यांना समजवून सांगितल्या...या एच एने मला खूपसारे मित्र-मैत्रिणी दिलेतं. विचारांच्या देवाण घेवाणात मला नवे लोकं नवे विचार उमगत गेले..मला मी लहानपणाची हट्टी आणि कोणाचं मत न विचारता स्वत:चं मत इतरांवर लादलेल आठवून हसू आलं. मी काय होते आणि आज काय आहे...माझ्यातले बदलं मी नेहमीच आढावा घेत रहाते किंवा मला आवडतं आपणच आपल्यात डोकवणं.

१५/४/१९८१
कुमुदला कालच दवाखाण्यात आणलं....कळा तिला सोसवत नव्हत्या....एवढ्या वेदनांमधे सुमीची चौकशी करायच हिला सुचलं कसं. तिला एक आठवडा वेळ आहे. मी लहानपणच्या आठवणीत रमवायचा प्रयत्न केला...तर कशाला आनंदी क्षाणांना जागं करतेस....त्यानां माझ दु:ख नको देऊ...हे ऐकून माझी विकेटच उडाली....".माझी काळजी करु नको हे दु:ख क्षणभंगूर आहे....माझ्या उरात याच्या हजारपट दु:खाचा साठा आहे....मी आजवर त्याच्यासकट जगत आले" हे ऐकून......माझे विरहाचे दु:ख मला तिच्या दु:खापूढे थिटे वाटले.....मी जवळची मैत्रीण तिच्या वेदना मी साहू शकत नाही.....कमी करु शकत नाही. हा विचार करुन मी अस्वस्थ झाले. गुंदेचा कुटुंबाने कोणीच येणार नाही आणि आमच्या कुटुंबाचा आधार ज्याने हिरावला त्याचं तोंड पहायचं नाही, असा निरोप एका नातेवाइकाकडून पाठवला. कुमुदने पोटातल्या गोळ्यासाठी खूप ऐकले.....पण ती आता आई होणार होती....त्या क्षणी तिला एकच काळजी वाटत होती...ती या बाळाला घेउन कुठे जाईलं, कसा सांभाळ करणार.....निरंजन दादावर एकाची जवाबदारी वाढवायची....या विचारांनी ती हैराण होती.....मी तिला फसवे आश्वासनं देत होती.......
आणि तिन्ही सांजेला कुमुदने एका गोंडस बाळाला जन्म दिला. कुमुदच्या डोळ्यात तीच काळजी बघून मला धस्स झालं. बाळ-बाळंतीण सुखरुप आहे.....पण पूढे काय ?
यासर्वात मला निरंजन दादा आणि वहिनीचं कौतुक वाटलं...ते दोघ कुमुदच्या पाठीशे होते. त्याला त्याचा संसार आहे त्याला दोन मुलं पण दोघांच्या चेहर्‍यावर कुमुद आणि तिच्या बाळाच आम्हाला करायला कसं जमेल हा भाव नव्हता. दु:खात, संकटात जी आपला साथ सोडत नाही ती खरी आपली माणसं.

१८/४/१९८१
दोन दिवस दवाखाना..डब्बा पोहचवणे...यातच गेलेत....मी दुपारी निघणार तेवढ्यात सुहासदाचा फोन आला....निघू नकोस...सुमीला त्रास होतो आहे..आम्ही तिला घेउन तिथेच येत आहोत.
सुमीची तब्येत ठीक नव्हती....नॉर्मल डिलीवरी शक्य नव्हतीच....मी डॉक्टर पेंडसेंना भेटायला गेले.....ओळखीचे असल्यामुळे त्यांनी मला ओ.टी.मधे येण्याची परवानगी दिली. तिला ताबडतोप ओ.टीत नेले.....एनस्थेशिया दिला.....सुहासदाने इतर सोपस्कार पूर्ण केले...मी फॉर्म वाचला...त्याने बाळाचा नाही सुमीचे जीवदान मागितले. मला प्रेमाची दुसरी बाजू मी अनुभवली....बाळंतपण कठीण होते.....बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा आवळल्या गेला...आणि बाळ जन्मल्यावर रडलेच नाही....पेडिट्रीशिअन प्रयत्न करत आहे.....बाळ इनक्यूबेटर मधे चोवीस तास ऑबज़रवेशन खाली आहे. काचेच्या पेटीतला इवलासा जीव श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता....तिचं नाव मी कांचन ठेवलं...तिचं सोनेरी गोरेपण काचेच्या पेटीत चमकत होतं.
२०/४/१९८१
कुमुदची डिलीवरी नॉर्मल झाली . तिला आज डिस्चार्ज मिळणार होता. पण सुमी आणि सुमीचं बाळ बघते आणि मग घरी जाते हट्टालाच पेटली. सुमीच्या बाळाची तब्येत अचानक बिघडली...आणि मृत्यू शी झुंज देता देता थकलेल्या इवल्या कांचनचा श्वासोश्वास थांबला. मी मेडिकलमधे अशा किती केसेस जवळून बघितल्या.....पण आज जी कळ माझ्या काळजात उठली ती या आधी कधीच अनुभवली नव्हती. सुमीची भूल उतरली नव्हती....मी आणि कुमुद दोघींना काय बोलावं कळत नव्हत.....सुमीला सावरायला हवं.....सुहासदाचा भकास चेहरा बघवत नव्हता. आम्ही सगळेच सुन्न झाले होतो , कोणी कोणाशीच बोलतं नव्हतं.....आणि अचानक कुमुद उठली...एक वेगळीच चमक तिच्या डोळ्यात मी बघितली...मी काही अंदाज घेण्याच्या आधीच ती तिच्या बाळाला छातीशी धरुन सुमीच्या खोलीकडे धावली. आम्ही सगळेच तिच्या मागे धावलो.....अणि बघता बघता आमच्या समोर रिकाम्या पाळण्यात बाळा टाकून आपल्या खोलीकडे गेली. हे सार अचानक आणि अनपेक्षित होतं कोणालाच बोलण्याचा धीर झाला नाही......मी धावत तिच्या खोलीत गेले...ती ओक्शाबक्शी रडत होती.......मला आवरण्याचा धीर झाला नाही.....आम्ही खूप वेळ रडत होतो.......कसंबसं आम्हा दोघींना आईनी सावरलं. सुहासदा मागोमाग आला....कुमुदचे हुंदके थांबत नव्हते. स्वत:ला सावरत ती सुहासदा ला आवाज दिला...तो खाली मान घालून उभा होता......प्लीज.....माझ्यासाठी एवढ करं....एवढ्या मोठ्या जगात मी एकटी या बाळाला घेउन कशी जगू....मी आजवर याच्यासाठी जगले......आता कुठलं ओझ पेलायची माझ्यात ताकद नाही.......सलीलसोबत माझ्यातलं बळ संपल.....आयुष्याने दिलेले घाव मी सहन केले आता सहनशक्ती संपली.....हात जोडून यातलं सुमीला काहीच सांगू नको...मला माहित आहे ती बाळासाठी किती अधीर आहे ......कुमुदसाठी...सुमीसाठी सुहासदानी ते बाळ छातीशी घट्ट धरलं. कोणीच या विषयावर बोलणार नव्हतं.
२१/४/१९८१
सुमीला बाळाला पाहून केवढा आनंद झाला.......डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं. आम्ही सिस्टर...डॉक्टर सर्वांना याबाबतीत सुमीला काहीच न सांगण्याची विनंती केली......डॉ.पेंडसेना दोघींबद्दल सगळ माहितीच होतं. आईने ती बाजू सावरली......संध्याकाळी सुमीने सुहासदाला कुमुदबद्दल विचारले......जड मनाने त्याने कुमुदच बाळ गेल्याच सांगितलं. सुमी खुप हळहळली.....कुमुद खोलीत आली आणि दोघी खूप रडल्या....सुमी....अग माझं बाळ तुझच आहे......हे ऐकून तर आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं.
कुमुद डिस्चार्ज घेउन घरी गेली.....सुमी चार दिवस दवाखान्यात रहावं लागणार....

२४/४/१९८१
मी कुमुदच्या घरी गेले तर कुमुद सामानाची बांधाबांधी करत होती....ही ओली बाळंतीण काय करते, कुठे जाणार.....कुमुद माझ्या कुशीत शिरुन रडायला लगली. तिचा आवेग कमी होई पर्यन्त रडू दिलं...तिच्या मनातलं मळभ निवळायलाच हवं. मी तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला असला वेडेपणा करु नकोस...आपण मार्ग शोधू. आईनी तिला धीर दिला...कुमुदला नागपूरला घेउन जायचा माझा विचार मी आईला सांगितला....तिला पटणार मला ठाउक होते...कुमुदला जागा बदलण्याची आवश्यकता होती. कदाचित हे दु:ख त्यामुळे कमी होईलं.
मला आणि आईला उद्या निघायलाअ हवं. निरंजनदादा कुमुदला दहा दिवसांनी नागपूरला सोडणार आहे....कुमुदला आरामाची गरजं आहे....सुमी-सुहासदाला भेटून आम्ही निघालो....सुमीला बाळचा आनंद झाला पण तो व्यक्त करता येत नव्हता.....आम्ही सारे तिला काहीच न झाल्याचे भासवत होतो पण कोणापासून दु:ख लपवून आनंदाचा उसना आव आणता येत नाही. सुमीला वाटलं आम्हाला कुमुदबद्द्ल वाईट वाटत आहे....माहित नाही हे गुपित किती दिवस गुप्त रहातं .

२६/४/१९८१
या धावपळीत प्रसन्नाचे पत्र आले का विचारायचं राहून गेले. दोन दिवस वाट बघू. एच.ए.च्या ऑफिसमधे कुमुदची आठवण आली....तिच्यासाठी कुठलं काम मिळू शकेल का मी या विचारात होते. खरत तिला अजून एखाद महिना आरामाची गरज आहे. कॉलेजमधे बरीच कामं होती.....पेन्डींग कामं...आणि केसपेपर स्टडी करता करता नाकी नउ आले......अभ्यासतर पुष्कळ बाकी होता. सुमी-कुमुदचा विचार मला कुठलंच काम सुचू देत नव्हते.....आईबाबांनी मला सावरलं....समजवून सांगितलं....या प्रसंगाची नुसती आठवण आली तरी माझ्या हदयाचे ठोके वाढायचे.....एक आई असा निर्णय घेऊ शकते....आपलं बाळ दुसर्‍याच्या पदरात टाकणं...मैत्रीण असली म्हणून काय झालं....आईबाबांशी बोलले...आईचं म्हणण कुमुद जवळ पर्याय नव्हता,तिचं जेमतेम शिक्षण...भावावर आणखी किती ओझं टाकणार हा विचार.......ती आधीच खचलेली त्यात बाळाच संगोपन एकटीने करायचे सोपी गोष्ट नाही.....सुमीकडे तिच बाळ सुरक्षित आहे...त्याचे संगोपन नीट होईल या विचाराने तिने हा घेतलेला निर्णय योग्य. तुला आई झाल्यावर कळतील या गोष्टी...प्रत्येक आई आधी आपल्या बाळाची सुरक्षा बघते.....मग ते बाळ चिमणीचं असो किंवा वाघिणीच.

१०/५/१९८१
प्रसन्नाचा फोन आला आणि पत्र पण .हे पत्र त्याने दहा दिवसापूर्वी पाठवले होते. कुठल्या तरी महत्वाच्या कामात बिझी आहे.....बहुतेक मी देहरादूनला जाईन. सुमी-कुमुद बद्दल वाचलं.....भेटल्यावर बोलू.....कुमुदनी योग्य निर्णय घेतला. तिला वर्धा सोडण्याची घाई करु देउ नको.....तिच्या साठी सेवाग्रामला काम आहे....तिला समजवून सांग...तू तिला नागपूरला आणलं हे बर केलं. मी कुमुदला पत्र दाखवलं. तिला हायसं वाटलं.
कुमुद आल्यापासून आज माझ्याशी खूप बोलली...आणि ते गरजेचं होतं.....बाळाची आठवण येत होती.....
पण ते सुखरुप आहे या कल्पनेने ती आपल्या ममतेवर मात करायचा प्रयत्न करत होती.
सेवाग्राम.....हो प्रसन्नाचा खास मित्र जयदीप......दिपाली सरदेसाई त्या वकिल आहेत....त्यांच्याकडे तर नाही ना...याने अर्धवट माहिती दिली. असो त्याने सांगितले आहे तर नक्कीच काम होणार.....

२५/५/१९८१
बरेच दिवसांनी परिस्थिती स्थिर असल्याचे जाणवते आहे......सुमी-सुहासदा आनंदात आहेत......कुमुद सावरायचा प्रयत्न करते आहे..... घरच्या घरी बारसं केलं . नाव नचिकेत ठेवलं.
माझी फायनलची तयारी सुरु आहे.....मधला काळ मन हेलावणारा होता...अभ्यास झालाच नाही....तरी बरं एच.एचे काम सगळे मिळून बघतात....आज मी ओर्थोपेडिकच्या ओ.पी.डीत भयंकर केस बघितली....एका अपघातात पेशंटला अंगभर फ्रॅक्चर झालं होतं....अख्खा शरीर प्लॅस्टरमधे गुंडाळल्या गेलं......शिवाय पाठीला असं खरचटलं होते की त्याला ठेवायच कसं का प्रश्न सगळ्यांना पडला होता.....हात...पात...कॉलर बोन...अ‍ॅन्कल सारेच अवयव तुटलेले....सगळ्याच टिश्यू नाजुक अवस्थेत होते......पण दामोदर.....गेली पंधरावर्षांपासून तो या डिपार्टमेन्टमधे काम करतो त्याने पेशंटला धक्का न लावता प्लॅस्टर केले....इतकी सफाईतर माझ्या हातात नाहीच......मी चकित झाले.
फायनलची परिक्षा जवळ येत होती आणि माझे टेन्शन वाढत होते......यंदाही एका झटक्यात विषय निघायला हवेत......नाहीतर अजून सहा महिने मुक्काम वाढेलं. मी माझं मन अभ्यासाकडे वळवत आहे..
>>>>>>>>>>>>>>>>>>>.....<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
नचिकेतला एक क्षण सुचेना......बाळाचं नाव त्याने वाचले आणि त्या क्षणी तो सगळंच विसरला...ती डायरी...डायरीतील माणसं, त्याला एकच कळत होतं आपण सुहास आणि गार्गी चा मुलगा नाही...मी कुमुद चा मुलगा... त्याला दरदरुन घाम फूटला . आईबाबांनी हे सत्य माझ्यापासून लपवून ठेवलं.....
त्याला पूढे डायरी वाचायची ईच्छाच होत नव्हती.....
..आता काय उरलं आहे त्यात....गार्गी-प्रसन्नाचं लग्न झाले असेल.....भारतात कुठेतरी सेटलं झाले असतील....मुलं बाळं...
मजेत असतील....मी कोण आहे हे मला कळलेच नसते तर....
तेवढ्यात अनु आली......नचिकेतला या अवस्थेत बघून तिला थोडा धक्का बसला....पण तिला माहिती होतं आज ना उद्या त्याला हे सत्य कळणारच.....तिने ती डायरी उचलली आणि ती आईबाबांच्याअ कपाटात ठेवायला जाणार तेवढ्यात नचिकेत म्हणाला....ठेव ती तिथेच....मला पूर्ण वाचायची आहे.
तुला माहित आहे मी कोण ?...अनुला गदगद हालवत तो म्हणाला.
मी कुमुद आणि सलील गुंदेचाचा मुलगा आहे.
नाही.....नाही तू त्यांचा मुलगा नाही. थंडपणे अनु म्हणाली.
तू पूर्ण डायरी वाच. आणि डायरीच्या मागे आतल्या मिनी पॉकेटमधे एक पत्र दुमडून ठेवलं आहे ते नक्की वाचं.
नचिकेत अजूनच त्रस्त झाला......मी कुमुद-सलीलचा मुलगा नाही. मग मी कोण आहे.?
तू डायरी वाच...मी कॉफी आणते.
अनुचे हे वाक्य ऐकून त्याने परत डायरीचे पान वाचायला सुरवात केली.

१/६/१९८१
आज कॉलेजला सुट्टी आहे....बरेच दिवसांनी मी घरी होते.....पण आज सकाळ पासूनच उदास आहे....मी विचारलं पण काही बोलली नाही.....थोड्या वेळाने बघितलं आई तुळशी वृंदावनपाशी रडत आहे.....मी धावतच गेले मला वाटलं तिला बरं वाटत नसावं पण तसं काहीच नव्हतं.....आधी आई काही सांगायला तयार होईना..पण मी आग्रह केला तेव्हा तिने सांगितले. माझे आजोबा वारले....पण आई माझे आजोबा ?आधी तर मला कळलेच नाही. कोणते आजोबा ?...कुठले आजोबा ? नंतर सांगेन म्हणून आई घरात गेली.
मला एक मावशी आणि एक आत्या आहे, बाकी कुठले नातेवाईक मला आठवत नव्हते. आजोबा मी कधीच कोणाच्या तोंडून नाव ऐकले नाही..माझे बाबा देवदत्त प्रभाकर खानोलकर. दुपारी आईला गाठलं...आणि मागे लागली.....शेवटी माझ्या हट्टाला वैतागून ती म्हणाली सांगते पण बाबांना काही सांगू नको.
तुझी मावशी मनाली आणि मी चैताली दोघी यवतमाळच्या आश्रमात लहानाचे मोठे झालो. मी आश्रमात आली तेव्हा मी चार वर्षाची आणि मनाली एक वर्षाची होती. आम्हाला तिथे एका आजीबाईने सोडले. ती कुठली...कोण काहेच कळले नाही. आमचे आईवडिल....आमची जात....धर्म आम्हाला काहीच माहित नाही.....तुझ्या बाबांच पोस्टींग यवतमाळच्या ब्रॅंच ला झाले....मी नुकतेच बी.ए करुन नोकरीच्या शोधात होते....बॅंकेची परिक्षा द्यायची म्हणून बॅंकेत चौकशीसाठी गेले. तिथेच तुझ्या बाबांची आणि माझी भेट झाली...आमची मैत्री आणि नंतर प्रेम....ह्यांनी मला आश्रमात येऊन मागणी घातली... ते आपल्या घरी भुसावळला गेले...आपल्या आईवडिलांना समजवून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना हे लग्न मान्य नव्हतं. तुझ्या बाबांना दोन भाऊ...तीन बहिणी...त्यातल्या शामला आत्याचा प्रेमविवाह त्यांना आवडला नाही...आधी तुझे बाबा आणि आत्या दोघांना तुम्ही आम्हाला मेले...आणि आम्ही तुम्हाला.....या घरची पायरी मी हयात असतांना आणि नसल्यावर चढायची नाही...म्हणून सक्त ताकिद दिली. आश्रमवाल्यांनी आमचं लग्न लावून दिलं. तेव्हा पासून बाबांनी बॅंकेत नोकरी करत आपलं पूढचं शिक्षण पूर्ण केलं. मनाली आमच्यासोबत रहात असे.मोठ्या मनानं त्यांनी मनालीची जवाबदारी स्विकारली. ती दिसायला चांगली , यांच्या बॅंकेत एकजण काम करायचे...त्यांनी आपल्या भावासाठी मागून घेतली......आत्याला पण मामांना नोकरी नव्हती म्हणून आपल्याकडेच ठेवलं....नोकरी लागताच दोघांच लग्न आम्ही लावून दिलं. मला वाटलं त्यांना त्यांच्या आईवडिलांची आठवण येत असणारं, लग्नानंतर मी एकदा हट्ट करुन भुसावळला गेले होते...पण त्यांनी आम्हाला हाकलून दिलं. तुझ्या दोन काकांनी पण सबंध ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हापासून ह्यांनी त्यांच नाव टाकलं ते टाकलं. आणि नंतर मागे वळून बघितलेच नाही.
तेव्हांच आम्ही ठरवलं आपल्या बाळाचं संगोपन करतांना असल्या चुका करायच्या नाहीत.
माझ्या बाबांबद्दल मला आदर आणि अभिमान तर आहेच आता माझं ते श्रध्दास्थान आहे.
पण आई मला कधी बोलली नाही....तुझ्या बाबांचे आदेश आहेत न सांगण्याचे....ते न सांगण्याचा उद्येश्य एवढाच..जो भूतकाळ आपण बदलू शकत नाही....मनं वळवू शकत नाही....मग ते उगाळून...उजळून काय उपयोग....समजा तुला कळलं असते तर तू काय केले असते....नुसती हळहळली असती.....परिस्थिती बदलली नसती....आणि नेमका बाबांचा हाचं स्वभाव तू घेतलास...
सकाळीच मला आत्याकडून आजोबा गेल्याचं कळलं. आधी माझं बोलणं पूर्ण ऐकून घे.....माझ्या तोंडावर हात ठेवत आई म्हाणली...अगदी बाबांसारखीच ग...घाई रिअ‍ॅक्शन द्यायची घाई...मी रडत होते...कारण मला वाईट वाटलं.....वडिलांच्या पाया तर पडताच आले नाही....शेवटची भेट पण झाली नाही.....रक्ताचं नातं इतकं कच्च असतं का मला राहून राहून वाटतं होतं आणि या दोघांमधे वितुष्ट येण्याचं कारण तसं बघितलं तर मीचं आहे ना......म्हणून वाईट वाटलं एवढचं. आत्याशिवाय मला काका-काकू...दोन आत्या आहेत हे कळलं पण बाबा म्हणतात तेच खरं..मला माहित असून उपयोग काय ?...मला एकचं आत्या आहे आणि एकच मावशी.
बसं....मात्र आई बरेच दिवसांनी मोकळेपणानं बोलली.....तिच्या मनातलं मळभ दूर झालं.

३/६/१९८१
आपण कितीही विचार केला तरी आपलं मन भलत्याच विचारांमागे धावत सुटतं......मी त्याला वठणीवर आणण्याचा प्रयत्न करायचे ते परत आठवणींच्या मागे धावायचे.........अभ्यासात लक्ष नाही किंवा अभ्यास करायचा नाही असे नव्हतेच....तरी आज माझे मन थार्‍यावर नव्हतेच......प्रसन्नाची आठवण रोज येते....आजच नेमकी मन कावरे बावरे का? व्याकूळ का ? कळत नव्हते.
अभ्यासाचे पुस्तक बंद करुन मी टेबलावर आपटले.....खिडकीत आले......जून्या कुंडीत नवीन एक घरटं दिसलं.
खरच ही नवी चिमणी केव्हा आली मला कळलेच नाही. परिक्षा डोक्यावर आहे पण आज अभ्यास होईलं असे वाटत नाही. असं मला कधीच होत नाही.....मी नेहमीच आठवणी मनाच्या खोल कप्प्यात बंद करुन ठेवते त्याचा माझ्या अभ्यासावर कधीच परिणाम होउ देत नाही...आज का हूरहूर दाटून येते आहे ?

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज झपाट्याने सगळे भाग वाचले. कथानकात गुंतून व्हायला होतंय अगदी.

डायरी स्वरुपाचे लेखन सही जमले आहे अगदी. अगदी खरोखरीच एखादी डायरी वाचकांपुढे मांडावी इतके डीट्टो! त्या त्या दिवसाच्या फुटकळ घटना, व्यक्ती ज्यांचा मूळ कथानकाशी खरे म्हणजे काहीच संबंध नाही, पण डायरी लिहिणार्‍या व्यक्तीसाठी त्या घटना वा व्य्कती ह्या दिवसभरातल्या घटनांच्या नोंदीचा भाग असतात. हेच लिखाण जर का केवळ एक कथा (प्रथमपुरुषी निवेदन) ह्या स्वरुपात टाकली असती तर ह्या फुटकळ नोंदी खटकल्या असत्या. पण डायरी स्वरुपात असल्याने परफेक्ट वाटताहेत.

पुढचे भाग लवकर येऊ द्यात! Happy

निंबुडास १००% अनुमोदन! अशी दैनंदिनी लिहिण्यापेक्षा वाचण्याने वाचकास अधिक समाधान लाभते.

कथेच्या आशयासोबत रूपडं सुरेखच आहे.

-गा.पै.