आठवणींच कपाट- भाग ५

Submitted by विनीता देशपांडे on 5 August, 2012 - 10:54

३०/५/१९७७
किती दिवस झालेत डायरी लिहायला जमलेच नाही. कदाचित आयुष्य सुरळीत सुरु आहे म्हणून किंवा कुठलीच उर्मी उरली नाही म्हणून......एकेक दिवस पुढे सरकत होता त्यासोबत माझे आयुष्य पण.
घरुन कॉलेजला बसने येणे जाणे करतांना बरीच नवीन मित्र मैत्रिणी झाल्यात.....नाहीतर होस्टेलमधे राहून मी त्या ठराविक ग्रुपमधेच वावरत होते. असं मला प्रकर्षाने जाणवलं. विचारांच्या देवाणघेवाणात मला इतरांच्या आयुष्याबद्दल कळत होते. नंदिनी घरची बेताची परिस्थिती...पण डॉक्टर व्हायच्या स्वप्नासाठी ती बसचा पास आमच्या स्टॉपपासून काढला होता...तेवढेच पैसे वाचतील....पण त्यासाठी कुठल्याकुठून पायी यायची. राजन कोल्हटकर दोन वर्ष सिनिअर एक पण पुस्तक किंवा नोट्स विकत न घेता पास होत होता...त्याच आश्रयस्थान म्हणजे आमची लायब्ररी.....ग्रेची एम्ब्रियॉलॉजी जेवढी त्यानी वाचली तेवढी अख्या कॉलेजमधे कोणीच वाचली नसवी. सोनल कदम....रुक्मिणी राजे.....यांच्याशी गप्पा मारतांना छान वाटायच.
माझ्या आयुष्यात खूप वर्षांनी मित्रमैत्रीणींचा प्रवेष झाला होता.....
अ‍ॅप्रन घालुन बसमधे बसल्यावर हल्ली कंडक्टर पास बघत नव्हता...किंवा आमच्या पैकी कोणी तो रिन्युव नसेल केला तर ज्याचा चालू आहे तो एक जण दाखवुन मोकळा होत असे....बस मधल्या गप्पा रंगत होत्या.
हळूहळू मी सर्वांसाठी काहीतरी खायला आणू लागले.
१५/६/१९७७
परिक्षेला अजून सहा महिने होते....पण अभ्यासही भरपूर आहे......मीही प्रत्येक नोटस विकत घेणे हळूहळू बंद केले. लायब्ररीतल्या चकरा वाढल्या....सिनिअरस्च्या मदतीने पुस्तक शोधून नोट्स काढून अभ्यास करु लागले.
आता माणसांच्या डिसेक्शनची भिती अजिबात वाटत नव्हती....डबा खायला आधी आम्ही कॉलेजच्या इमारतीच्या बाहेर जायचो पण आता सगळ्याच वासांची सवय झाली होती. थोडक्यात डॉक्टरकी माझ्या अंगात भिनायला लागली......शेजार पाजारचे सर्दी खोकल्याचे औषध विचारायचे किंवा अमका डॉक्टर चांगला का...कुठल्या डॉक्टरपाशी जाऊ असे प्रश्न विचारले की आईबाबांना मी डॉक्टर झाल्यासारखीच वाटायची.
आत्या मावशी तर पत्रात हमखास आमची डॉक्टरीणबाई काय म्हणते? म्हणून उल्लेख करत.

३०/६/१९७७
आमचे आयुष्य आता सुरळीत चालू आहे. प्रसन्नाचे पत्र येत रहातात. कुमुदचे खूप दिवसांनी पत्र आले....म्हणुन डायरी आठवली....ती चंद्रपूरच्या जवळ एका कॅम्पला जाणार आहे....सुमीकडे दोन दिवस रहाणार आहे....तेव्हा या दोघींच्या आठवणीने मन भरुन आले. किती गोष्टी आम्ही एकमेकींशी शेअर करत होतो......पहिला शाळेचा दिवस...पहिला निकाल....पहिला कॉलेजचा दिवस.....पहिले प्रेम.....खूपशा आठवणी दाटून आल्यात.
लहानपणाच्यां या आठवणीतही वेगळेच सुख दडले असते नाही.....आमच्या शाळेतले काही फोटो सामान लावतांना दिसलेत ते मी या डायरीत चिपकवून ठवेलेत. बार्‍यांच जणांचा काहीच पत्ता नव्हता....कोण कुठे गेलेत.....काही ऋणानुबंधाच्या गाठी जोडून...ठाउक पण नव्हते आयुष्यात पुन्हा कधी भेटतील का? आणि समजा भेटलेच तर ओळखतील का? काय मजा असते ना ....आपल्याला आयुष्याच्या प्रवासात कितीतरी माणसं भेटतात...काही शेवट पर्यन्त सोबत रहातात, बाकी अर्ध्यावाटेवर सोडून जातात....

२५/७/१९७७
आज आमच्या बॅचची हॉस्पिटला रवानगी करण्यात आली.....आम्हाला आजवर हॉस्पिटलला दिवसभरासाठी पाठवले नव्हते. तास दोनतास आम्ही तिथे घालवलेत. कॉलेजमधे सिनिअरस कडून जे ऐकण्यात आले हॉस्पिटलबद्दल तेवढीच माहिती होती......एक पांढरी टोपीवाला मारोती आम्हाला " गाईड ’ करत होता...आधी फाईलींग "शिश्टीम" त्याने समजवून सांगितली....तेवढ्यात एका सिस्टरने आमचा ताबा घेतला...केस पेपर कसे वाचायचे...समजायचे....प्रत्येक पेशंट्चे वेळापत्रक..त्यांच्या तपासण्या सगळी बेसीक माहिती आम्हाला मिळाली...नंतर आम्हाला जनरल वार्डात नेण्यात आले. तिथे आमचे ग्रुप करुन एक एका डॉक्टारच्या मागे आमच्या पाच -सहा जणांचा तांडा चालला होता. ते जे सांगत आम्ही टिपून घेत होतो. त्यांना स्टेथिस्कोप देण्यापासून तर ते रोगाचे निदान कसे करतात...कुठली औषधं देतात...हे करतांना आधी मजा आली.......पण दिवसाला पन्नास साठ पेशंट तपासून आम्ही दमलो होतो. डॉक्टर मात्र दमलेले वाटले नाही...डॉ.देवाशिष गोडबोले. अतिशय गंभीर आणि टू द पॉईंट बोलणारे. आम्ही जरा जरी मस्ती करण्याचा प्रयत्न केला की त्यांची करडी नजर बघून डोळे आपोआप खाली झाले.
आजचा दिवस टायरींग गेला. पण रात्री घरी आल्यावर आईच्या हातचं गरम गरम जेवणाने सगळा थकवाच घालवला.

२०/८/१९७७
हल्ली रोजच थकायला होतं आहे........घरी आले की अभ्यास पण नको वाटतो.. होस्टेलला राहून लागलेल्या सगळ्याच सवयी मोडल्यात. कपडे आईच धुते...खोली आईच आवरते....आई माझी खूप काळजी घेते.
कुमुद्च पत्र येउन आठ दिवस झालीत पण वाचायला जमलं नाही.....आज अभ्यासाला दांडी.....कुमुदच्या पत्रात नेहमीचच....सुमीचा संसार छान सुरु आहे......पण तू एकदा तिला भेट असा आग्रह होता....परस्पर काही निर्णय घेतलेत आपल्या भाउरायांनी आणि गार्गी-२ उर्फ सुमीबाईंनी समजवून सांग पण नक्की काय त्याचा उल्लेख केला नाही.....आता मला कळणार तरी कसे तिला काय झाले ते. आता ही हुरहुर कारण कळल्याशिवाय जाणार नाही.....आईला काही माहिती आहे का उद्या विचारु. विचार सारण्यासाठी मी रेडिओ लावला....हवामहल कार्यक्रम नुकताच संपला. माझा वाढदिवसाचे प्रसन्नाने पाठवलेले पत्र परत परत वाचते...तिथे एन.डी.ऎत पण पठ्ठ्याने आपल्या मिस्कील स्वभावाने सार्‍यानां जिंकले.....दरवेळेस नव्या मित्राचा उल्लेख असतो.....
आता असं वाटायला लागले माझे मेडिकलचा अभ्यास लवकर लवकर संपावा आणि लवकर लवकर लग्न करुन टाकावं....माझ्या या विचारांचे मलाच आश्चर्य वाटले. मी आजवर कधीच असा कधीच विचार केला नव्हता. मला हे काय होतं आहे. असले विचार येताच मी माझं ध्येय काय आहे स्वत:लाच बजावून सांगते.
३०/९/१९७७
परीक्षा जवळ आली आहे....खूप अभ्यास करायला हवा....आजच सुनंदा भेटली.....खूप काळजीत दिसली. फार बोलली नाही. नंतर कळले तिचे नापास होण्याचे दुसरे वर्ष आता एकच अटेम्ट बाकी होता....नाहीतर अ‍ॅडमिशन कॅन्सल.....ऐकून माझ्या पोटात गोळाच आला.........
आज परत हॉस्पिटल राउंड झाला......जनरल वार्डात राघव नावाच्या मुलाची डेथ झाली ...नातेवाईकांचा गलका...त्यांच रडण ऐकवत नव्हते.....हातातोंडाशी आलेला मुलचा अपघात आणि जब्बर मारामुळे उपचारादरम्यान मृत्यू.....आम्ही सारेच हळहळलो...बिचारा शुध्दीवर पण आला नव्हता. का कोण जाणे त्या किंकाळ्या अजून ऐकु येते होत्या. खर तर आजवर इतके पेशंट्स तपासले.....कित्येक पेशंट्सने माझ्यासमोर दम तोडला असेल...पण हा राघव डोळ्यापुढून जात नव्हता. त्याच्या आईवडिलांकडे बघवत नव्हते...त्यांच्या डोळ्यात..दु:ख, काळजी,..असह्यता दिसत होती.

१५/१०/१९७७
परिक्षेची नोटीस आज बोर्डावर लागली....आणि सर्वांचे चेहरे मला गंभीर वाटू लागले....अर्थात मी पण गंभीर झालेच....पहिली परीक्षा पहिली टर्म....दीड वर्षांनंतर अखेर परीक्षेचे दिवस खूपच जवळ आल्याचे वाटले. मी थोडी उत्सुक आहे थोडी काळजीत आहे.....संमिश्र विचारांमधे माझा अभ्यास सुरु आहे. एव्हाना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आमच्या अंगवळणी पडलं होतं.....तिथला स्टाफ...ड्यूटी बदलायच्या आधीची धावपळ..
तेवढ्यात इमरजन्सी आली तर विचारुच नका....या रोजच्या घाईत ती घाई...दिवसातून एका पेशंट्चे केस पेपर किती जणं हाताळत असतील. प्रत्येक वार्डात पेशंट्सच्या लांबच लांब रांगा.... बरेच पेशंट्स जे जवळच्या गावाहून यायचे, त्यांच्या नातेवाइकांचे तिथेच बस्तान असायचे.....कधी झाडाखाली...बहूतेक करुन कॅन्टीनच्या जवळपास ही मंडळी कायम घुटमळतांना दिसायची. त्यांची स्टाफ सोबत बाचाबाची चालत असायची. एका पेशंटसाठी इतकेजणं बघून मला आश्चर्य वाटायचं...यांना काही काम वैगरे नसतं का रे मी एकदा शेखरला विचारलेच....नसावच...मी तरी इथे एका पेशंट जवळ कायम घोळकाच बघितला....एखाद दुसरा एकटा दुकटा असतो.....केसपेपरचे इकडून तिकडे होणे......पेशंट्सच्या नावातील गडबड या सर्वांची सवय होते आहे.....आधी मी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायची पण राजन...नंदिनीचे आभार त्यांनी मला ही स्थिती हाताळण्यास शिकवले......एवढे मोठे कॉलेज......एवढा स्टाफ...रोजचे हजारोंनी तयार होणारे केस पेपरस...थोडा गोंधळ होणारच अशी मी अथक प्रयत्नांनी मी ही मनाची समजूत काढली.

३०/११/१९७७
ऐन दिवाळीत आमची परीक्षा.....शिवाय ओरलस आणि प्रॅक्टिकलस बद्दल खूप ऐकलं आहे, एकवेळ पेपर सोपा आणि छान जाईल पण ओरल्स ते खूपच टफ असतं..... हे मेडिकल कॉलेज यासाठी प्रसिध्द असल्याचं मला कळलं...त्यामुळे जरा टेन्शन आलं......सबमिशन्स सगळे आटोपले. आपल्याला चांगले सिनिअरस भेटलेत तर मेडिकलच्या पहिल्या परिक्षेची वाट सुलभ होते असे माझ्या लक्षात आले. कुठलासा कॅम्प आहे आणि फर्स्ट टर्मच्या मुलांना कंपल्सरी आहे ही चर्चा उडत उडत ऐकली.....नंतर कळले नवीन मुलांच रॅगींग घेता यावे म्हणून सिनिअरस ने पसरवलेली अफवा होती.
सुधाआजीचे पत्र आले होते.....मुंबईला तिला करमत नाही....मला वरुन निरोप येईल त्या आधी एकदा भेटून जा लिहिले आहे.....हे आमच्या सुधाआजीचे स्पेशल टॉक - ती सरळ सरळ कधीच बोलायाची नाही...विरुध्दार्थी किंवा इनडायरेक्ट. मला तर नेहमीच त्रास द्यायची...चिंगे माझी म्हैस गेली गोठा सोडून आण तिला पकडून म्हणजे आजीकडचं दूध संपल आहे....ते आणून दे, आज गॅस ऐकतच नाही म्हणजे तो संपला आहे.
त्यांच्या आठवणीने मला आणि आईला गलबलून आले.
सुधाआजीच्या विषयामुळे मला प्रसन्नासोबत घालवले क्षण आठवलेत.....ती गच्ची...मावळतीचा सूर्य...कधी भरभरुन गप्पा...कधी.....निशब्द्ता......हातातहात घालून केलेली ती भटकंती.... तसे क्षण माझ्या आयुष्यात परत आलेच नाही. प्रसन्नाशी मोकळेपणानी गप्पा मारायला या दीड दोन वर्षात वेळच मिळाला नाही. आज बाबांनी आमच्या बद्दल प्रसन्नाच्या आईवडिलांशी बोलू का? म्हणुन विचारले. आणि प्रसन्नाला पत्र लिहिले.... या बाबतीत त्याचे मत गरजेचे होते.

२०/१२/१९७७
प्रसन्नाने परत.....आठ-दहा ओळी हा-हा-हा-हा लिहून पाठवल्यात....तुला काय वाटलं माझ्या घरच्यांना कल्पना नाही...माझ्या आईने तुझ्यासाठी शालु पसंत करुन ठेवला आहे.....दागिने झालेत......कारण मला माहित आहे....तुला खरेदी, नटणे यात इंटरेस्ट नाही.....आणि माझ्या आईची निवड तुला आवडेल......
आणि गार्गी प्रसन्ना केतकर....नावाच्या चार-पाच ओळी........हे माझं स्वप्न आहे प्रिये....खरतर तुच वाघिण निघाली.....मी वाघ होउन घरच्यांसमोर केव्हा जाउ याचाच विचार करतो आहे.
प्रसन्नाची ही गम्मत मला अजिबात आवडली नाही. मी पण त्याला लवकर वाघ हो...घरच्यांना सांग एवढ्याच ओळींच पत्र पाठवले. तर त्याने चक्क कोरा कागद कागद धाडला...एक नोट तेवढी लिहिली होती- "आईबाबा सध्या रावळपिंडीला आहे......पुण्यात बाबा येणार तेव्हा बोलतो तू काळजी करु नकोस....आणि हो मी ट्रेनींगला जाणार...कुठे...काय सध्या सांगत नाही....पण महिनाभर तरी पत्र पाठवू शकणार नाही. जायच्या आधी नक्की पत्र पाठवीन."
प्रसन्नाची भेटही नाही आता पत्र पण येणार नाही या कल्पनेने मला रडायलाच आले.

२५/१/१९७८
काय भरकन संपले हे वर्ष आणि पहिल्या महिन्याचा शेवटचा हप्ता येउन ठेपला. प्रसन्ना त्याच्या आईवडिलांशी बोलला...लगेचच त्याच्या वडिलांचे पत्र आले....त्यांनी त्याचे ट्रेनींग संपले की रीतसर साखरपुडा उरकुन घेउ लिहिले होते. मावशीकडे फेब्रुवरी मधे अमेयची मुंज ठरली आहे... यवतमाळला मला जाणे जमेल असे वाटत नाही. नेमकी तेव्हाच साकोलीला आमचा आठ दिवसांचा कॅम्प आहे. आणि कॅम्पला जावे तर लागणारच.
अशा कॅम्पमधे खूप काही शिकायला मिळतं......कमीतकमी मेडिकल इंस्ट्रुमेन्ट्स वापरुन उपचार कसे करायचे...डिसिज़न मेकिंग स्कील आपोआप येते....आपला कॉन्फिडन्स वाढतो....... अजून बरेच काही.
साकोली गाव छोटस......जंगलानी वेढलेलं.....सरकारी दवाखान्यात इन्जेक्शन असेल तरच लोकं यायचे नाही तर वैदूबाबाचे औषध जास्त करुन घेतात. फर्स्टएड ,हायजीन, स्वच्छता शिकवता शिकवता...आमची पुरेवाट झाली. आपात्कालीन परिस्थितीत भंडारा किंवा गोंदियाच्या दवाखान्यात जावे लागतं. ओ.टी..लॅब...असलेला दवाखान्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले होते... आमचा सर्व्हे कम चेकअप कॅम्प मस्त झाला.

२८/२/१९७७
प्रसन्नाने महिनाभर पत्र लिहू शकणार नाही असे पत्रात लिहिले होते...त्याची जुनीच पत्र मी रोज वाचते.
आजच सावित्रीकडून आमच्या होस्टेलची मेट्रन पळून गेल्याचे कळले......तिच्याशी माझा फार दिवस सबंध आला नव्हता.....होस्टेलवर काही मुलींनी नवीन वर्षाची पार्टीचा गोंधळ घातला आणि बरेच काही कानावर आले...त्या मुलींचा निकाल राखून ठेवणार अशी नोटीस बोर्डावर वाचली तेव्हा हे प्रकरण कळले.....बरे झाले आपण होस्टेल सोडले...एवढ्या मोठ्या कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आवारात नेअहमीच काहीबाही ऐकायला मिळायचे....आमचा ग्रुप या भानगडीत पडत नसे......आमचा अभ्यास...लायब्ररी....गप्पा मस्त चालले होते आयुष्य.
आजकाल डायरी लिहायला होतच नाही......पण अधून अधून लिहिले की बरे वाटते.
आठवणींना उजळण्याची मला सवय लागली होती.
१८/३/१९७७
सुमीच्या दुसर्‍या अ‍ॅबॉर्शनबद्द्ल आईकडून कळले....पहिले तर तिने आणि सुहासदाला एवढ्यात मुल नको म्हणून कोणालाच न कळवता परस्पर अ‍ॅबॉर्शन उरकून घेतले होते....या वेळेस दोन महिन्याचच गर्भ पडून गेला...चंद्रपूरलाच क्युरीटीन करुन घेतले......मला हे ऐकून रागच आला....एरवी मी कुठली गोष्ट सांगत नाही म्हणून वारंवार रुसणारी सुमी मला आठवली...तिचा अबोला...मझ्या मनधरण्या...आणि आता एवढी मोठी गोष्ट पठ्ठीने साधे कळवले नाही.
कुमुद समिती आणि आश्रमशाळेच्या कामात खूप गुंतलेली दिसली....ते तिच्यासाठी चांगलच होतं .ती दुसर्‍या लग्नाचा विषय काढू द्यायची नाही. नरुमावशीची तब्येत बरी नसते....कुमुदच्या काळजीने अजून खराब होते आहे. काकांना जाऊन वर्ष होईल...दादा वहिनी सगळं सांभाळतात. कुमुदने घरी शिकवणीचे वर्ग सुरु केलेत आणि आश्रमशाळेत पार्टटाईम जॉब करते. दिवसेनदिवस तिचा अलिप्तपणा वाढतच आहे. एका प्रसंगाने एका हसर्‍या खेळत्या मुलीचे आयुष्यच उध्वस्त केले......नको नको तेच मला का आठवते ठाउक नाही. मी खूपदा विसरण्याचा प्रयत्न करते....मीच विसरु शकत नाही तर ती कशी काय विसरणार ? हे तिचं प्रारब्ध आहे ? आई म्हणायची कितीही काही झालं तरी ज्याचे भोग त्याला मिळणारच. काही जखमांच ओझं वागवतच आपल्याला आयुष्याचा प्रवास करावा लागतो.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.......<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

हे सर्व वाचून नचिकेतला तो मेडिकल कॉलेजमधे पोहचल्याचा भास झाला. आजी त्याला जेवायला बोलवत होती. त्याचे लक्ष कशातच नव्हते. काळया सावळ्या धीट मुलीची आगळी वेगळी प्रेम कहाणी...काय झालं असेल, तिचं आणि प्रसन्नाचे लग्न झाले का? कोण ही जिची डायरी माझ्या आईने आजवर जपून ठेवली.
माझा त्याच्याशी काय सबंध...नचिकेतला खूप सारे प्रश्न सतावत होते. नेमकी अनुही नाही घरात. खाली जाउन कसे बसे त्याने जेवण पोटात ढकलले...आजी आजोबांची वामकुक्षीची वेळ झाली होती. तो परत आपल्या खोलीत आला.....डायरीतले फोटो तो सारखे पहात होता...एका रुवाबदार तरुणाचा फोटो...हा नक्कीच प्रसन्ना असणारं काय भारदस्त व्यक्तिमत्व आहे. खरच प्रेमात पडण्यासारखा....पण कुमुद..सुमी...गार्गी...कोणीच कळत नव्हते....नकळत ही गोष्ट पडद्यावर घडते आहे आपण ती एकटेच बघत आहोत असा त्याला भास झाला.
दुपारचे अडीच वाजले होते. अनु यायला अजून बराच वेळ आहे.
नचिकेतने परत डायरी वाचायला सुरवात केली.
२७/५/१९७७
कडाक्याच उन आहे...सकाळी सकाळीच बस मधे झावा लागत आहेत. आज नंदु -नंदिनी आली नाही.
आमच्या ग्रुप मधले सारेच जण पास झाले....आता काय लगेचच पूढच्या टर्मची तयारी करायची...अभ्यास वाढत आहे. बाबांनी साखरपुड्याची तारीख काढली.....जुलै मधे १४ तारखेला...साखरपुडा नागपूरला करायचा ठरवला. लग्नाचे बघु...प्रसन्नाला विचारु असे त्याचे बाबा म्हणत आहेत. मला मेडिकल पूर्ण झाल्याशिवाय लग्नाचा विचारच करायचा नाही...
रविवारी धनवटेरंगमंदीर मधे पुस्तकांचे प्रदर्शन लागले आहे.....जायला हवे...बर्‍याच दिवसात सिनेमा नाही....रेडिओ तेवढा सोबत करतो. घरी असलेली सगळीच पुस्तकं वाचलीत. आता नवीन काहीतरी वाचायला हवे. हल्ली विरंगुळा म्हणून मी आठवणींमधे जास्तच रमते मला लक्षात आलं.
१५/६/१९७७
प्रदर्शनातून बरीच पुस्तकं विकत घेतलीत....बाबांचाच वाचनाचा छंद मला लागला.तांबे, बोरकर, कुसुमाग्रज माझे आवडते कवी. सुरेश भटांचे रुपगंधा ही मिळाले. प्रसन्नाचे पत्र वाचतांना त्यांचीच एक कविता आठवली
तू लिहेलेल्या
चारच रेशमी ओळींच्या कोशात
माझ्या स्वप्नांचे फुलपाखरु
काना.मात्रा आणि वेलांट्यांत
पाय अखडून
पहुडले आहे...
आपले न फुटलेले पंख
सहीजवळ मागत !
मला वाटले भटांनी या ओळी माझ्यासाठीच लिहिल्यात. आजवर मी भटांच्या कविता वाचल्या नाहीत. ते फक्त गज़लच लिहितात आणि मला ती समजत नाही म्हणून मी ते टाळत होते. पण आज त्यांच्या कविता वारंवार वाचावश्या वाटताहेत.....जणु माझ्या मानातील गुज माझी हुरहुर त्यांच्या शब्दात पकडली गेली.

१८/७/१९७७
प्रसन्नासोबत आठ दिवस कसे पटकन सरले. खूप दिवसांनी आम्हाला आमच्या साठी खूपखूप वेळ मिळाला......प्रत्येक क्षण मी वेचायचा प्रयत्न करत होते....त्याच्या सहवासतला एकएक क्षण मी जपून ठेवला. परत तो निघण्याचा आणि माझ्या हुरहुरण्याचा क्षण आला. यावेळेस काय कोण जाणे मनाला रुखरुख लागल्या सारखी वाटली. आपल्या नेहमीच्या मन वळवण्यात पटाइत असलेल्या प्रसन्नाने मला मनवलेच....परत आणा भाका....डोळ्यातले गुज आणि विरहाच्या वेदनांनी होणारे दु:खाचे आभास.....मला हे क्षण नकोसे झालेत. एकदा वाटले हे शिक्षण...सगळं सगळं सोडून आत्ताच त्याच्या सोबत निघून जावे. आजवर मी आणि माझे मन इतके हतबल कधीच झाले नव्हते.
आठवते-
बांधला होता
उगीच आपला
अंधारच्या किनार्‍यावर
वार्‍याच्या निसटत्या वाळूत
चिमिणीचा खोपा
लपण्यासाठी !
आज हा खोपा मला हरवल्यासारखा निसटल्यासारखा वाटत आहे.

२७/७/१९७७
इतक्यात प्रसन्नाची आठवण जरा जास्तच येते आहे. कदाचित आईबाबांनी हे हेरलं असावं. बाबांनी नटसम्राट नाटकाची तिकिटं आणलीत. डॉ.लागु त्यांचे आवडते नट. त्यांना प्रत्यक्ष बघता याव म्हणून दुसर्‍या रांगेच तिकिट त्यांनी आपल्या एका विद्यार्थीकडुन काढून घेतले. या नाटकाविषयी खूप ऐकले आणि खरच बघण्याचा योग आला. नाटक छानच होते. अप्पा बेलवलकर...आणि सरकार खूप दिवस डोक्यात घर घरुन होते. डोळ्यासमोर नाटक आणि मनामधे प्रसन्ना अशा दूहेरी मनस्थितीत मी बघितले. आमचा आता साखरपुडा पण झाला आहे, तरी एक अनामिक हूरहूर मनाला सतत बोचत आहे.

२१/८/१९७७
यंदाही माझा वाढदिवस आला आणि गेला.....मित्र-मैत्रिणींना कॅंन्टीन मधे ट्रीट....धमाल..मस्ती आणि गप्पा.
सुनंदा खूप दिवसात कॅंम्पसमधे दिसलीच नाही....सावित्रीकडून ती मेडिकल सोडून गेल्याचे कळले. कॉलेजमधे अनेक प्रेमकथा जन्माला येत होत्या काही तुटत होत्या. मी या सर्वांपासून अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करत आहे.
आमच्या ग्रुप मधे सगळ्यांनाच माझ्या साखरपुड्याबद्दल माहिती झाले होते त्यामुळे माझ्याभोवती अधून मधुन संधीसाधु मुलांचा तांडा फिरायचा आता तो फिरणे एकदमच बंद झाले. दुरुन हाय हेलोच होउ लागले...
नंदिनी, सोनल, मंजिरी कॅंन्टीनमधे बसुन चिडवत होत्या....तुझ्या साखरपुड्यामुळे आता ते आमच्या सुध्दा मागे येइनासे झाले. नंदू अर्थात नंदिनी, सोनु अर्थात सोनल,मंजू अर्थात मंजिरी, शेखू अर्थात शेखर,मंगू अर्थात मंगला,जयू अर्थात जयमाला, धनू अर्थात धनश्री अशी माझा ऊ-कारत्मक ग्रुप...सारेच अभ्यासू.....फालतू उनाडक्या, भानगडींमधी आम्हाला अजिबात रस नव्हताच. याच ग्रुपने माझ्या गार्गीचे गारु असे नामकरण केले.
सेकन्ड टर्म सुरु झाली आहे......कॅम्पसमधे नानाप्रकारच्या बातम्या ऐकायला यायच्या. आम्ही इतर कार्यक्रमांत भाग घ्यायचा नाही असं ठरवलं....पण वादविवाद स्पर्धा मात्र आम्ही सोडत नाही. शेखू...धनू.....शाब्दिक मस्त असायचे...दोघेही तावातावात बोलतात आणि समोरच्याला आपले म्हणणे पटवूनच देतात.....त्यांच्या राज्यात आजवर ही स्पर्धा कोणीच जिंकली नाही. असे आमचे सेकण्ड टर्म दंगा मस्ती आणि अभ्यासात सुरळीत चालले होते.

१७/९/१९७७
सध्याचे शेड्युल खूपच बिज़ी आहे.....कॉलेजलापण लवकर जाते. एक्स्ट्रा लेक्चरस असल्याने जावेच लागते. मुंबईहुन बाबांच्या ऑफिसमधे अर्चना आत्याचा फोन आला होता...सुधा आजीला अजिबात बर नाही आहे...सारखी तुमची आठवण काढताहेत...एकदा भेटायला या. आईची ईच्छा दिसली....आणि सहाजिकच आहे म्हणा इतक्या वर्षांचा सहवास...दूर असले तरी माया थोडीच कमी होणार....मी दोघांना बळे बळेच जायला तयार केले. घरी काय चारदिवस माझ्या मैत्रिणी राहतील बाबा उद्याच तिकिटं काढणार होती. मैत्रीणीतर टपलेल्याच असतात...झालं चार दिवस आमचं घर गोकुळ होणार. आईने चार दिवसांसाठी चिवडा ,लाडू, शंकरपाळे..काय काय पदार्थ करुन ठेवलेत. स्वैंपाकासाठी बाई लावली. बाप रे! घराची जवाबदारी अंगावर पडताच....जुने-पुराणे दिवस आठवले. आईला बरे नसतांना मी एकदा घेतली होती..तेव्हा मला कळले घर सांभाळणे म्हणजे काय असतं ते.

१५/१०/१९७७
पूढच्या महिन्यात आईबाबांचा लग्नाचा एकविसाव्वा वाढदिवस आहे. काहीतरी विशेष केले पाहिजे. सुमीचे पत्र आले...तब्येत बरी नाही आहे....नवरात्रात तिला फुडपॉयज़निंग झाले त्याचा अजूनही त्रास होतो आहे.
पठ्ठी पथ्य नीट पाळत असेल का ? औषध व्यवस्थित घेत असेल का? याबाबतीत ती एकदम आळशी आहे. या उलट कुमुद वेळचेवेळ सगळ करते.
कुमुदला आश्रमशाळेच्या संस्थापकाच्या मुलाने मागणी घातली. सलील गुंदेचा....मारवाडी पण खूप वर्षांपासून कुमुदला ओळखतो आणि तिची पार्श्वभुमी माहित असून तो तयार झाला...कुमुद्च्या घरच्यांनी लगेच हो म्हंटले....पण कुमुद तयार होइना...दादा नागपूरला आला असतांना मला कुमुदशी बोलायला सांगितले. कुमुदला मी लगेच पत्र लिहिले. आयुष्यालाही एकदा दुसरा चान्स देउन बघाव.....सगळ्यांनी समजावल्यामुळे ती लग्नाला तयार झाली.

४/११/१९७७
आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस छान झाला. आत्याची खूप दिवसांनी भेट झाली...ती पंधरा दिवस सुहासदा-सुमीकडे राहून आल्यामुळे मला त्यांची बित्तंबातमी कळली...अजूनही आत्या तिला सुनबाई म्हणतच नाही...तुझी मैत्रीण तुझी मैत्रीण म्हणते.
कुमुदचे मला पत्र आले...चान्स देणार दुसरा आणि शेवटचा...एकदा परत डाव मांडून बघते...नियतीला काय मंजुर ते बघू.
आमच्यासाठी ती तयार झाली हेच खूप होते. असो. लग्न वर्धेला १८/१२/१९७७ ला साध्या पध्दतीने करण्याचे ठरले.
मी जाणारच. खरच हे ऐकून मला खूप आनंद झाला.
यंदाची दिवाळी स्पिरीट आणि औषधांच्या वासातच गेली. मेडिकल म्हंटले की सणवार...सगळच विसरायच.
आमचे आयुष्य म्हणजे....पेशंट्स....दवाखाना....निर्जीव शरीराची कापाकापी....आणि स्पिरीट-फिनाईलचा संमिश्र वास.
एखाद्याला जर रात्री झोप येत नसेल तर फिनाईल किंवा डेटॉल का नाही हुंगलं नाहीतर बोनसेट डोळ्यापुढे ठेवायचा. असली विचारणा व्हायची. आमच्या कॉलेजमधे सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर प्रमाणात होत असतात....ते सार अरेंज करणारा ग्रुपच वेगळा आहे...अगदी रांगोळीपासून ते निवेदन आणि बॅनर्सपण तेच तयार करत....ही मंडळी अभ्यास केव्हा करतात....मला न उमगलेले कोडेच आहे हे...अणि हे सगळं सांभाळत ते कॉलेजमधे टॉप करायचे. मी अगदी सुरवातीला इमारतीच्या रौप्यमहोत्सवासाठी काम केले...पण नंतर समजले की ते किती क्लेषदायक असते ते, तेव्हापासून आजवर कुठलाच कार्यक्रमात मी भाग घेतला नाही, घेणार नाही.

२०/१२/१९७७
कुमुदचे लग्न अगदी साध्यापध्दतीने झाले. सलील गुंदेचा माणुस समजुतदार आणि साधा वाटला. चला कुमुदच्या आयुष्यात प्रेमाचे क्षण आले या कल्पनेनेच मला बरे वाटले. त्याचे वर्धेला स्वत:चे वर्कशॉप आहे....शटरस आणि इतर लोखंडीकामाचे.
आर्थिक परिस्थिती चांगलीच आहे....त्याचे आईवडिल आत्या मामा मिळून अनाथ मुलांसाठी संस्था चालवतात....
कॉलनीत या लग्नाबद्दल लोकं नको नको ते बोलले..हे मला लग्नात सुमीच्या वहिनीकडून कळलं. पण कुमुद सेटल झाली याच्या आनंदात या गोष्टींना काहीच अर्थ नव्हता.
उद्यापासून माझी हॉस्पिटलला फुल टाईम ड्यूटी आहे.....एकच आठवडा.

३/१/१९७८
परत एकदा कॅलेंडरवर नवीन वर्ष बदलले......माझ्यासाठी हे वर्ष काय घेउन आलाय काय माहिती. प्रसन्नाचे पत्र खूप दिवसात आले नाही. मनाला उगीच हूरहूर लागते आणि जीव कासावीस होतो. कशातच लक्ष लागत नाही.
गेला आठवडा खूपच हेक्टीक गेला....दिवसाला चाळीस पन्नास पेशंट्स.......वेगवेगळे डॉक्टरस...प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा कोणी चिडकं तर कोणी भरभर बोलणारे...कोणी काहीच न बोलणारे...कोणी तुटक वागणारे. जनरल वार्डातल्या अकरा नंबरच्या बेडवरील पेशंट्ला औषधाचा डोज़ किती दिला हे डॉ. दिक्षित सांगायलाच तयार नाहीत. ग्रॅम..मिलीग्रॅमसाठी त्यांनी मला खूप छळलं. शेवटी सिस्टरच्या विनवण्या करुन ते मिळवले तेव्हा कुठे माझा रिपोर्ट तयार झाला.
देव करो आणि ओरलला हे सर न येवोत.......काही डॉक्टरस फारच हेकड तर काही अति फ्रेंडली वागत असे. यात देवघरे डॉक्टरांचा कधी कधी खूप राग यायचा. ते कायम गरज असो वा नसो मदतीचा हात आधी पुढे करायचे.....शेखू म्हणायचा हे आम्हाला अशी मदत का नाही करत...
कॉलेजमधले बरे वाईट अनुभव माझे जीवन समृध्द करत आहेत.....या वर्षीची नवी बॅच छान आहे. या बॅचमधे मुलीच जास्त आहेत.

२५/३/१९७८
गेला महिना कसा गेला ते कळलेच नाही.......असे पहिल्यांदाच झाले मी गेल्या महिन्यात एकदाही डायरी लिहिली नाही. कवितेचा नेम तर गेल्यातच जमा आहे....अताशा एकदापण लिहायला मिळू नये म्हणजे काय.
सुधा आजी वारल्याची बातमी कळली.....सुटली एकदाची...खरच अंथरुणावर आयुष्य किती अगतिक होउन जाते ते मी खूपदा हॉस्पिटला बघितले आहे.
अंथरुणाला खिळलेल्या पेशंटसच्या डोळ्यात मला नेहमीच मृत्यूची आस दिसायची.....जगणं देखिल असह्य आणि अगतिक व्हावं मला बरेचदा बघवत नव्हते.
अताशा हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या कथा परीचित होत होत्या.....जगणे आणि मरणे यातील विसंगती मी बघत होते...अनुभवत होते.
दोन दिवस उपचाराला आलेला रुग्ण कधी ठणठणीत बरा होत असे...तर कधी थेट स्मशानात जात असे. आयुष्याचा हा लपंडाव तर अजून बरीच वर्षे चालणार आहे.
मी कितीही धीट असले तरी बर्न वार्डात मी कधीच जात नाही. मागे एकदा गेले तेव्हा मलाच चक्कर आली ......भीषण..विदारक...जखमांमधे गुंडाळुन ठेवलेले जीवन-मृत्यूच्या दारात अडकलेले ते अर्धमेले जीव मी बघुच शकले नाही. या रुग्णांसाठी आपण काहीच न करु शकण्याच्या जाणीवाने हुंदके अनावर होतात आणि आपल्याला चीड आली असता ती कोणावर व्यक्तही करता येत नाही.

१०/४/१९७८
सेकन्ड टर्मचे जरा नाही भरपूर टेन्शन आले आहे......अर्धा जीव अभ्यासात...अर्धा प्रसन्नात गुंतला आहे.......बरेच दिवसात त्याचे पत्र आले नाही.....खूप दिवसांनी माझ्या खिडकीतून चंद्र बघायला वेळ मिळाला. आज तोही उदास उदास वाटत आहे. प्रसन्नाचे पत्र आले नाही की मन खूपच उदास उदास होतं आणि
हल्ली तर एकटच रहावं जवळ कोणीच नको...एकांत आणि मी हवाहवासा वाटतो.
नंतर प्रसन्नाचा फोटो बघितला आणि लगेच हे मळभ दूर होउन जाते.
कधी कधी
कधी कधी कोणाची सोबत ही नकोशी होते
कोणात अडकायच नाही,कोणाला गुंफायच नाही
आपण असच चालत रहावं......एकटं.....
कधी कधी आठवणी ही नकोशा होतात
उगाच उगाळायच्या नाही,उजाळायच्या नाही
आपण असच चालत रहावं....एकटं....
कधी कधी सगळे आवाज नकोसे होतात
तो गोंगाट..ती कलकल... ऐकायची नाही
आपण असच चालत रहावं....एकटं....
निशब्द...निसंग...चालत रहावं..एकटं...
अनाहुतपणे...सोबत असुन नसल्यासारख
शब्दांच्यापलीकडच्,आठवणींच्यापलीकडच
अंतर्मन आवाज न करता बोलतं....मग
आपल्याला...ती सोबत..त्या आठवणी....ते आवाज..
सगळच हवहवस वाटत..........

अरे मला तर चक्क कवितेच्या ओळीच सुचल्या...माझी ही दुसरी कविता.....खरच प्रेमात जादु आहे ना.मी तीच तर अनुभवते आहे.

१८/५/१९७८
आज कॉलेजमधे फारच गोंधळ होता.....कारण काय तर नम्रता वर्मा आणि अनिल खंडागळेच जोरदार भांडण झालीत. फिजीओलॉजीत बेडकाच्या डिसेक्शन वरुन भांडण झाले..... मग कळले अनिलने नम्रताने केलेले डिसेक्शन ती डिपार्ट्मेन्ट्च्या बाहेर गेलेली बघून तिला न विचारताच स्वत:च्या नावे खपवून मोकळा झाला.
असले किस्से कॉलेजवर नेहमीच घडत असे. पण या वरुन नम्रताने आकाश पाताळ एक केले...
आणि दोघांना डीन ने बोलावल्यमुळे प्रकरण जरा जास्तच पेटले.
मला पॅथलॉजी आणि फरमॅकॉलॉजी मधुन पॅथलॉजी जास्त आवडले.
मी इतक्यात कमी बोलते...अशी आईची तक्रार असे....माझ्याही ते लक्षात आले....कॉलेजवरुन घरी आल्यावर मी दोघांशी खूप गप्पा करायची....शेजारचे...नातेवाइक यांची चौकशी करायचे...त्यामुळे मी कोणाला भेटत नसले तरी सर्वांबद्दल माहिती असे. पण गेल्या महिन्यापासून माझ्यातला हा बदलं मलाही जाणवला. आता मी सरळ आपल्या खोलीत जाउन एकटीच विचार करत बसते. नंतर अभ्यास....

२५/६/१९७८
प्रसन्नाचे पत्र आले....पुढच्या महिन्यात येणार आहे....हे वाचूनच माझ्या अख्या देहाला गारवा मिळाल्याचा भास झाला. निदान या बातमीमुळे माझी परिक्षा नीट पार पडणार....वियोग मनाला व्याकुळ करतो..
मग उगाच आठवणीत मन रमवायच.....उगीचच विविध कल्पना करत मनाशीच हासायच.....मनाचे हे खेळ मला कधी हवेहवेसे वाटतात कधी एकदम नकोसे...प्रेमात असच होत का ?

१७/७/१९७८
कुमुदचे पत्र वाचून आनंद झाला...नव्या संसारात रुळली तर.....सुहास-सुमी पण मजेत.....सुमीला जवळच्या शाळेत नोकरी लागली....छान झाले.
आज पाउस सकाळ पासून थांबलाच नव्हता.......घरी परतले ते चिंब भिजूनच.....कदाचित म्हणूनच आजची संध्याकाळ आळसावल्यासारखी वाटते......त्यात आईच्या हातचा आल्याचा चहा आणि बाबांची खास फरमाईश अर्थात भजे.
आणि प्रसन्नाची आठवण नाही झाली तर ती गार्गी कशी.....अरे मानवा माझी प्रत्येक संध्याकाळ तुझ्या आठवणीत रात्र होते...आणि तुझी ? तू येणारच आहेस ना तेव्हा सगळा हिशेब मागणार.

१६/८/१९७८
आता प्रसन्नाच्या येऊन जाण्याने आठवणींत भर पडली. रोज रात्री एकेक आठवण उकलत बसणं माझा आवडता छंदच झाला आहे. तीच पत्र तेच फोटो......माझ्या आयुष्यात नवे वळण केव्हा येणार कोण जाणे ?
बस झाली अ‍ॅनॅटॉमी...फिजीऑलॉजी, ई एन टी, अ‍ॅपथॅलमॉलॉजी, नक्रॉस्कपि, हिमोसाईटालॉजी....तेच पेशंटच विहळणे...रडणे...कधी कधी या सगळ्यातून पळून जावसं वाटतं.
मी रोज किती जणांच्या दु:खावर फुंकर घालते ...पेशंटला बरं कसं वाटेल याची धडपड करत असते पण माझ्या मनात रोज दु:खाचे वादळ उठते त्याला कोण फुंकर घालणार....मी माझं दु:ख का जपून ठेवते माहिती आहे, कदाचित तो येईल आणि माझी सगळी दु:ख एका स्पर्शाने मिटवून टाकेल या आशेत. माझे दु:ख ते काय माझ्या आशा-अपेक्षांचे ओझेच ना, ते उतरेपर्यन्त ते दु:खच ना. या विचारात गर्क असतांना मला काही ओळी सुचल्यात.
निष्प्राण देहावर
संवेदनेचे व्रण
उमटत नसतात
म्हणून मनातलं
दु:ख उमजत नसतं
ते नजरेनं टिपुन
मोरपिशी स्पर्शात
उकलायच असतं.
उगीच दःखावर
फुंकर घालायची नसते
अश्रुंचे साठलेले दव
विरुन जातात
ते अधरांनी टिपुन
सुख स्वप्नांच्या देशात
घेउन जायच असत.
म्हणून दु:ख उकलयच नसतं
ते मनात जपायच असतं
ते मनात जपायच असतं
२५/८/१९७८
याही वाढदिवसाला प्रसन्ना जवळ नव्हता. निदान माझा एक वाढदिवस तरी दोघांनी मिळून साजरा करावा असं मला मनापासून वाटत असे. पण माझे हे स्वप्न केव्हा पूर्ण होणार माहित नाही. गेल्या दोन वर्षात मी ट्रीपला गेलेच नव्हते. त्यामुळे सगळ्यांच्या आग्रहाखातर पावसाळी सहलला जावेच लागणार......मी नाही म्हणून बघितले पण नंदू..धनू ऐकनात. सुमी-कुमुद नंतर माझा हा लाडका ग्रुप....राजनच ऐकून फारच वाईट वाटले.....त्याचे बाबा दुसर लग्न करुन घर सोडून गेले...
याचा राजनवर खूपच परिणाम झाला. तो हल्ली क्लासेसला दांड्या मारु लागला आहे. काल हॉस्पिटल राउंडवर भेटला नाही. राजनशी बोलायलाच हवे. शेखर, रविन्द्र, नंदू..सगळ्यांनी मिळुन त्याला कॅन्टीनमधे बोलावले. आणि आमच्या राउंड टेबल कॉनफरन्स मधे तो फसलाच त्याला कल्पनाच नव्हती आम्ही सारे मिळून त्याच्याशी या विषयावर बोलू. फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन मधे आधी सिगरेट मग इतर...तू कोणत्या स्टेजला आहेस...शेखरने पहिलीच गुगली टाकली......आमच्या सोबत का रहात नाहीस.......त्या टारगट मुलांसोबत वेळ घालवण वाढले आहे. प्रश्नांच्या भडिमाराने त्याने त्रस्त होउन आमच्या पुढ्यात हात टेकले. शेवटी त्याला तुझा बाप मेला अस समज आणि अभ्यासात लक्ष दे......स्पष्ट पणे सांगणारी आमची धन्नो......या मुळे रुळावरुन घसरलेल्या आमच्या मित्राची गाडी रुळावर आली इतकं नक्की.

२४/९/१९७८
सहल मस्त झाली....यात अनेक गुपीत उघडतात म्हणुनच तर सहलीला जायला सारेच एवढे उत्सुक असतात. जो तो आपआपली जोडी घेउन फिरतो. मी पहिल्यांदाच निसर्ग एवढा जवळून बघितला. चिखलदरा इथे पावसाळ्यातच येण्यात मजा आहे. मी कधीच इतकावेळ पाण्यात भिजले नव्हते. धमाल मस्ती गाणी चिडवणे....रुटीनला हटून असं जगणं मला आवडलं. एक क्षण असे वाटले की माझ्यात भिनलेले स्पिरीट...डेटॉल...सार्‍या औषधांचे वास या पाण्यात वाहून गेलेत. धबधब्यातून बाहेर निघायची इच्छाच होत नव्हती.
जानकी मॅडम...गंधे सर..कुलकर्णी सर यांनी आम्हाला धमाल करु दिली. इतर वेळेस खूप सक्तीने वागणारे प्रत्यक्षात इतके हसरे आणि फ्रेंडली असतील असे मला कधीच वाटले नाही. निदान या अनुभवानंतर मी कुलकर्णी सरांना खवीस म्हणणार नाही आणि जानकी मॅडमला निरुपमा राय.

७/११/१९७८
यंदाचीही दिवाळी अशीच अभ्यासात गेली. प्रसन्नाचे पुण्यातले ट्रेनिंग पूढच्या वर्षी संपणार मग एक वर्षाचे आय.एम.एचे ट्रेनींग....मग पोस्टींग, बस अजून दोन अडीच वर्ष तग धरायची मग काय सगळ मनासारख होणार. एम.बी.बी.एस झाले की प्रसन्ना राहिल तिथे मी इंटर्नशीप करेन.
मेडिकलला असल्यामुळे म्हणून असेल कदाचित शारिरिक दु:खापतीबद्दल काहीच वाटेनासे झाले. इतके निरनिराळे आजार आणि व्याधी जवळून बघितल्यात वेदनांमधे, लोकांना अक्षरश: पोळताना बघितले.....पण प्रत्येकाच्या डोळ्यात जगण्याची आस बघून नवल वाटायच. कित्येकांना तर कल्पना असायची आपण एवढेच दिवस जगणार तरी जगण्याचा मोह..ओढ अनावर होतांना मी बघितला आहे .डॉक्टर काहीतरी चमत्कार करतील आणि आपण वाचू नाहीतर आयुष्य थोडं तरी वाढेल या अपेक्षा मी त्यांच्या डोळ्यात अनुभवल्या.

१५/१२/१९७८
आयुष्य कसं नेहमी सारखं सुरळीत चालले आहे. सुहासदाचा काल फोन होता जरा काळजीत वाटला. पूढच्या आठवड्यात तो आणि सुमी चेकअपसाठी येणार आहेत. मी या संदर्भात आमचे गायनिक डॉ.मधुसुदन काणे यांच्याशी बोलली. त्यांनी तपासण्या लिहून दिल्यात. बघायचं काय होते ते.
खूप दिवसात कुमुदबद्दल काही कळले नाही. हल्ली तिचे पत्र येणेही कमी झाले आहे.
संसारात चांगलीच रमलेली दिसते.

१३/३/१९७९
सलग दोन महिन्यांपासून मी डायरी लिहिली नाही. खरच वेळ झाला नाही की मीच टाळत होते ठाउक नाही.
लिहिणार तरी काय नेहमीचच रुटीन....मी या रुटीनला इतके अंगवळणी पडले होते की आयुष्यातील रटाळपणा लिहावसाच वाटला नाही. मात्र माझी डायरी मी न चुकता वाचायची. रोज प्रसन्नाचे पत्र वाचून फोटो बघून मला आठवणींच्या गावी जायला आवडायला लगले. कधी कधी आधीची गार्गी आठवली की हसायला यायचे...आधीची गार्गी आणि आताची गार्गी किती फरक आहे या दोघीं मधे. मला आता वेध लागले होते ते केव्हा एकदा मेडिकल पूर्ण करते याचे.

१८/६/१९७९
सुहासदा-सुमीची ट्रीट्मेन्ट संपली....डॉक्टर काणेंनी इतक्यात चान्स घेऊ नका म्हणून सांगितले. दोघं खूपच उदास झालीत. त्यांनी पहिलं अ‍ॅबॉरशनचे वेळी घरच्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. कोणालाच न सांगता आटपुन घेतलं त्याच वेळीस काहीतरी कॉम्पलिकेशनस झाले आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्या दोघांना टेन्शन मधे बघून माझा जीवच कासावीस झाला. आत्ता पर्यन्त दोघांच्या मनासारख झालं आहे आणि पूढे पण होऊ देत रे देवा !
मला आता तिसर्‍या टर्मच टेन्शन आले आहे...नाही होतेच ते सेकन्ड टर्मपासून....आता ते वाढले आहे इतकेच.
विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर एक वेगळेच एक्सप्रेशन आणि टेन्शन दिसेल , तो सतत लायब्ररीत जात असेलं तर तो नक्कीच थर्डटर्मचा विद्यार्थी आहे असे समजावे अशी आख्यायिका प्रसिध्द आहे.
माझ्या चेहर्‍यावर पण ते झळकत आहे.

१५/८/१९७९
प्रसन्नाचा एन.डी.एमधला मुक्काम वाढला.....नवीन आलेल्या बॅचसोबत तो हिमाचल प्रदेशमधे ट्रेकिंग कॅम्पला जाणार आणि परत आल्यावर त्याचे आय.एम.ए,देहरादूनचे ट्रेनींग सुरु होणार.
याला पत्र पाठवायला वेळच मिळाला नाही का ? असो त्याचं जुनं पत्र वाचायला काढलं. मी आज वाचते आहे ते त्याचं तिसरं पत्र....सोन्या..मन्या गार्गी, त्याने मला प्रिय वैगरे कधीच लिहिले नाही......असलंच काहीस लिहायचा. प्रत्येक पत्रात तो आपण वर ॐ किंवा श्री लिहितो तो स्प्रिंग टर्म
किंवा ऑटम टर्म लिहायचा....कारण एन.डी.ए ट्रेनींग मधे जानेवरी ते जून स्प्रिंग टर्म आणि जूलै ते डिसेंबर ऑटम टर्म असते. त्याचे पत्र पण गमती-जमतीने भरली आहेत. म्हणून तर मी दररोज ती वाचते......ती वाचतांना असं वाटतं प्रसन्ना स्वत: ते सार सांगतो आहे....आणि मी ऐकते आहे.
या पत्रात त्याने त्याच्या ब्रॅव्हो या स्क्वॉड्रन बद्द्ल लिहिलं आहे. इतकच काय या ब्रॅव्होच्या लोगोचा रंग पिवळा-निळा आहे हे पण लिहिलं आहे..
त्यांच्या पिकॉक-बे वर स्विमींग कॉम्पिटशन मधे तो दुसरा आला. तर ड्रील करतांना धक्का लागून दहा जण कशी पडली आणि त्यांना पडतांना बघून याने अजून धक्का दिला तर पूढचे दहा जण पडले......शिक्षा झाली ते पण लिहिले.
प्रत्येक पत्रात मला हसू येईलं असं लिहितो.....मला माहित आहे रे प्रसन्ना ....तुला मी रडलेले अजिबात आवडत नाही.....आणि तुझ्या आठवणीने रडलेले तर मुळीच नाही. जिवापाड प्रेम म्हणतात ते यालाच.
२८/९/१९७९
आज एका चमत्कारी ऑनररी डॉक्टरच्या हाताखाली काम करायला मिळालं. डॉक्टर पैठनकर.....विलक्षण हुशार.....डायग्नोसिस एकदम करेक्ट......जशी प्रत्येक डॉक्टराला मेडिकलला ऑनररी डॉक्टर होण्याची इच्छा असते तशी आम्हा स्टुडन्ट्सची या डॉक्टरच्या हाताखाली काम करण्याचे इच्छा असते.....शिस्तप्रिय....गंभीर.....आणि गती म्हणाल तर एक साधारण डॉक्टर जर तासाल दहा पेशंट्स बघतात तर हे वीस बघतात. सपाटून आणि झपाटून काम करण्याची त्यांची पध्दत...विषयाला सोडून बोलणार्‍याले ते ग्रुपमधून काढून टाकत. पण त्यांच्यासोबत राहून जे शिकायला मिळतं ते अमेझिंग असतं. त्यांच्या हाताखाली काम करणार्‍यांना देखिल कॅम्पसमधे आदराने बघत असे.
प्रसन्ना रोव्हर कॅम्पला जाणार आहे....जागेच नाव तो सांगत नसेच......आणि नंतर त्याला देहरादूनला जायचे आहे. म्हणजे परत पत्र पाठ्वू शकणार नाही.
आम्ही जरी एकमेकांच्या दूर असलो तरी हा विरह आम्हा दोघांना जवळ आणत आहे......
१५/१०/१९७९
आत्या आणि सुमी नागपुरला आलेत. आनंदाची बातमी आहे. यावेळेस आत्याने सांगितले नागपूरला जाउन तपासण्या करायच्या. उद्या डॉक्टर काणेंना भेटावं लागेल. आज सुमीशी भरपूर गप्पा मारणार आणि डायरी पण उद्याच लिहिणार. इतक्या दिवसांपासून गुणगुणते आहे आज लिहूनच टाकते :
मैत्री……
कधी गुंतलेले,कधी गुंफलेले
मनामधे खोल रुतलेले
अधे मधे न उमगणारे.......मैत्रीचे नाते
कधी अव्यक्त्,कधी अवास्तव
तरीही शाश्वत अन विश्वस्त
अधे मधे निशब्द...........मैत्रीचे नाते
कधी बेभान्,कधी बेधुंद
निसटलेला तोल सावरणारे
अधे मधे अलिप्त..............मैत्रीचे नाते
कधी पाण्यात, कधी आरश्यात
प्रतिबिंबासारखे अधर
दुधसागरासारखे शुभ्र........मैत्रीचे नाते

१९/११/१९७९
चार दिवस सुमी राहून गेली......सगळ्याच आठवणी आम्ही उजळत बसलो होतो. आणि ते उजळता उजळता आमचा मैत्रीचा गोफ अधिकच घट्ट झाला. सुमीला आणी मला कुमुदची इतक्यात काहीच खबरबात कळली नाही. आज ती पण असायला हवी होती. आठवणी म्हणजे तरी काय आयुष्याच्या नव्या वळणावर मागे वळून बघणे.....काय चुकलं...काय हरवलं......काय सुटलं......हा हिशेब करत ते गवसेल या आशेत पूढचा प्रवासाला मार्गस्थ होणं.

२५/११/१९७९
खूप खूप दिवसांनी कुमुदच पत्र आलं.......जरा हायसच वाटलं. मला अनाहूतच गेल्यावेळेसची माझी घालमेल आठवली. ती मजेत आहे.........समिती आणि आश्रम सांभाळते. पत्रात सलीलचे कौतुक केले होते.....संसार सुखी करायचा असेल तर पैसा लागतोच पण मनं जुळावी लागतात....एकमेकांपाशी प्रामाणिकपण व्यक्त होणं महत्वाचं असतं......विश्वास आपोआप दृढ होतो.....माझे आईबाबा नाही का एकमेकांच्या मनातलं लगेच हेरतात. रुसवे-फुगवे आमच्या घरी यांना जागाच नाही.

४/१२/१९७९
प्रसन्नाचे अजून एक जूने पत्र......"माझी मनाली...सोनाली...काय सांगू तुझी खूप आठवण येत आहे.....पण मी सध्या ग्रीनहॉर्न कॅम्पवर आलो आहे.....आत्ता माझ्या समोर सुंदर तलाव आहे आणि त्यात दोन...तीन बदकं पोहत आहेत. भोवती दाट जंगल आहे.....आणि तू माझ्या जवळ नाहीस.....काल ट्रेकींग करतांना माझा यूनिफॉर्म चक्क फाटला म्हणजे कोचा पडला आणि तू शिवायला नाहीस......आज मी पहिल्यांदा इन्स्ट्रकटरची नजर चुकवून सिगारेट ओढली....आणि हवेत विरणारा धूर पहायला तू नाहीस.......काल मी परवा केलेल्या चूकीची शिक्षा भोगत होतो....सर्व कॅडेट्स चे उष्टे भांडे घासत होतो...पाणि टाकायला तू जवळ नाहीस...
आज...काल...आज...काय काय घडतय.....म्हणून तर तुला पत्र लिहतोय....
हा म्हणजे पत्रात काय काय लिहिल सांगताच यायच नाही.....वाचून माझ्या मनातलं मळभ दूर होउन जातं इतकं नक्की. हे पत्रच तर माझं जगण सुसह्य करतात.

१५/१२/१९७९
आज कॉलेजमधे दिवस हेक्टीक गेला. आम्हाला एकूण दहा डिलीवरीज़ काराव्या लागतात त्यापैकी एकाची संपूर्ण माहिती सगळ्या तपशीलासह....पेशंटचे नाव....वय...तारीख....बाळाचे डिटेल्स....त्याचे वजन...इत्यादी इत्यादी....आज माझा त्याच्यात संपूर्ण दिवस गेला. लेबर रुममधे आज तब्बल नउ डिलीवरीज़ होत्या....नुसतीच धावपळ त्यात दोन सिस्टर आजारी असल्याने आल्याच नव्हत्या.......माझी एकच केस होती...पण परिस्थिती बघून मला मदतीला जावेच लागले.....दिप्ती...शशि.....मला मदत करायचे...आता माझी टर्न.....पण तिसरी टर्म सुरु झाली रे झाली....नोट्स..काय अगदी गरज पडली तर अ‍ॅप्रनची देखिल अदला बदलं होते.....हो कुठल्या डिपार्ट्मेन्ट मधे स्वच्छच अ‍ॅप्रन घालावा लागतो खास करुन पॅथलॉजीला....
प्रसन्नाचा फोटो......माझ्या मेडिकलच्या मैत्रीणींनी बघितलं तर सगळ्याच फिदा होतील याच्यावर....यूनिफार्ममधे अजून रुवाबदार दिसतो......
१०/१/१९८०
प्रसन्ना कॅम्पवरुन पुण्याला आला आणि देहरादूनला ट्रेनींगसाठी गेलापण......फोनवर एवढच बोलला...सविस्तर पत्र लवकर पाठवतो म्हणाला....म्हणजे हा नक्की कॅम्पच्या गमती जमती लिहून पाठवणार.
ट्रेकिंग प्रसन्नाला खूप आवडत....आणि त्यात तो एक्सपर्ट आहे...मागे माथेरान...नाशिक....आणि पुण्याभोवतीचे सगळेच डोंगर चढून झालेत. तो स्विमींग चॅम्पिअन आहे...आणि मला दोन्ही येत नाही. खूप उंचावरुन खाली बघितलं तरी मला गरगरतं. प्रसन्ना डेअर डेवील...मला मात्र असल्या अ‍ॅडवेन्चरसची भिती वाटते. कोण म्हणतं एक विचार करणार्‍यांची मनं जुळतात वैगरे...स्वभावाने......सवयीने.....विचाराने.....आम्ही दोन टोकं.
तो माणूसवेडा...मी आपल्यातच रमणारी....त्याला भरपूर मित्र मैत्रिणी...माझ्या दोनचार.....तो शिस्तप्रिय....थोडक्यात घड्याळकाका.....रोज त्याच वेळेवर उठण....झोपण.....मला सकाळची झोप अत्यंत प्रिय...रविवारी मी आठ-नउ वाजल्याशिवाय उठत नाही......तो निसर्गात रमणारा...जंगलात...डोंगरात भटकणारा..माझा निसर्ग मी माझ्या खिडकीतून बघते रात्रीचा चंद्र आणि चांदण्या आणि आजवर शाळा-कॉलेजमधे ज्या सहलींना गेली तेवढाच. त्याची रहणी टापटीप...आर्मीछाप...मला नटण्यामुरडण्याची हौसच नाही.
कपड्यांबद्दल तो नेहमीच चूझी....आणि परफेक्ट मॅचींग....मी आईने आणलेले कपडे कुठलीच तक्रार न करता घालणारी ....माझं वाचनात लक्ष...त्याला वाचन फार नाही आवडत....मी एकांतप्रिय त्याला गोंधळ..दंगा मस्ती आवडते...आणि आमचं एकमेकांवर प्रेम जीवापाड प्रेम आहे. आहे ना हे गुलाबी कोडं ....कसं काय माहित नाही पण आहे खरं.

२६/२/१९८०
आज बाबांची तब्येत ठीक नाही...त्यांना कसचे तरी टेन्शन आहे असं मला दोन दिवसापासून वाटतं आहे.
ते तर काही सांगणार नाही. उद्या वर्धेला पण जाणार म्हणतात....नक्की काय ते विचारायला पाहिजे.
राजन आणि नंदूचे एम.बी.बी.एस झाले.....दोघ किती आनंदात होती.... इंटर्नशीपसाठी प्रयत्न करत आहेत....
आणि साईड बाय साईड डॉक्टर पैठनकर यांच्या क्लिनीकवर जाणार....त्यांचे निदान आर्थिक प्रश्न सुटाणार होते. धनश्रीचे तीन विषय राहिले.......येत्या सहा महिन्यात काढेलं म्हणाली तर आहे.

४/३/१९८०
वर्धेवरुन आल्यापासून बाबा काळजीत वाटले......वर्धेला भाडेकरुंनी तीन महिन्याच भाडं बॅंकेत जमा केलं नव्हतं........मी सरळ त्यांना काढून टाका म्हटलं तर ते किती चिडलेत.......भांडारकर काका आमचे भाडेकरु त्यांची फॅक्टरी बंद पडल्यामुळे त्यांना भाडं भरता आलं नाही......बाबांनी ओळखीच्या लोकांकडे शब्द टाकला होता. माझे बाबाना....वरुन म्हणतात कसे....त्यांना बेघर करण्याच दुष्कर्म मी करणार नाही....त्यांच्या बायकोने घरी मेस सुरु केली आहे...त्यांच्या नोकरीच जमेल....देतील पैसे सावकाश....ही वेळ सावरण्याची आहे मैना....सावरायचं की मोडायचं हे आपल्या हाती असतं.....आणि आपण जे करतो त्यावरुन आपल्यात किती माणुसकी आहे हे सिध्द होतं...
जर मी त्यांना घर सोडायला सांगितलं असतं तर कदाचित त्यांचे हे दिवस कसेबसे निभले असते...पण माझ्या मनात शल्य राहून गेले असते....जन्मभरासाठी...आणि पैसा आपल्याजवळ आपल्यापूरता आहे ना..
एक लक्षात ठेव आयुष्यात मनात जन्मभरासाठी शल्य बोचत राहिल असं काही करु नकोसं.
आज माझ्या बाबांसाठी माझा आदर खूप वाढला.

१५/४/१९८०
बस काही महिन्यात प्रसन्नाचे आय.एम.एचे ट्रेनींग संपणार नंतर पोस्टींग.......तो प्रयन्त माझे एम.बी.बे.एस
पूर्ण होणार आणि आमच्या दोघांच स्वप्न . या कल्पनेने आनंद झाला खरा....मनात एक हूरहूर दाटून आली.
प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र हाच विचार करायची.
रोज रात्री मी......डायरी....पत्र......आणि निशब्द एकांत... अशा एकांतात स्वत:शीच संवाद चालायचा आणि नकळत ओळी सुचायच्या.... ...मी पत्रात लिहून पाठवायची.....या आठवणींची सोबत नसती तर ?
आज पण चार ओळी ओठावर घुटमळून गेल्या.
सांकव
एका कातरवेळी..मी अन माझे एकटेपण
खुप दूरवर चालत आले, लागला
एक अपरिचित सांकव...पार करु कि नको
या घालमेलीत केव्हा तरी पार केला
आठवणी..जीवघेण्या अन निशब्द
माझ्यापुढ्यात येउन उभ्या
हातात हात घालुन त्याही चालु लागल्या
काहि कडु काहि गोड
भुतकाळ हळुहळु सरकत होता
सार्‍या आठवणी हातपाय पसरुन बसल्या
चांगलाच रंगला होता आमचा संवाद
तेवढ्यात आली काळोखाचे एक तिरिप
आणि आठवणींचा हात माझ्या हातुन सुटला
मी घाबरले...पण.जाता जाता कळत नकळत
माझ्या मुठीत हव्यहव्याशा आठवणी
राहून गेल्या ...आताशा मी रोज येते या सांकवावर
कातरवेळी ,मुठभर आठवणी घेउन.
१७/५/१९८०
आज वर्धेवरुन भांडारकर काकांचा फोन आला...त्यांना एका कंपनीत नोकरी लागली.......भाडं जमेल तसं देईन...
म्हणतांना त्यांचा आवाज कापरा झाला....सारखं तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही म्हणत होते....माझे बाबा ग्रेट आहेत. त्यांचा आजपर्यन्त कुठलाच निर्णय चुकला नाही.

२७/६/१९८०
आज कुमुदचा फोन आला. सहसा ती फोन करत नाही....आवाजात विलक्षण भिती होती. सलीलच्या वर्कशॉपला शॉर्ट सर्किट होउन आग लागली....बरच नुकसान झालं......या आगीत सलील गंभीर जखमी झाला......मी एकून सर्द झाले....अंग थरथरायला लागलं...कुमुदचा केवीलवाणी चेहरा सारखा डोळ्यापूढे येत होता.....पहाटेच वर्धेसाठी निघायचं.

७/७/१९८०
कुमुद उध्वस्त झाली होती. सलील सत्तर टक्के भाजला होता...वाचण तसं कठीणच दिसत होतं. एकतर पोलीस केस त्यातून परिस्थिती त्याला नागपूरला हालवण्यासारखी मुळीच नव्हती. दोन दिवस वाट बघून त्याला नागपूरला आणले......मेडिकलमधे बर्न वार्डात मला असं याव लागेलं याची स्वप्नात कल्पना केली नव्हती. कुमुद थिजून गेली....नशिबाने दुसरा डाव उधळून लावला होता....तिला सावरायचं तरी कसं..निरंजन दादा सुन्न होता, गुंदेचा कुटुंब कोसळून गेले....अनेकांना आधार देणार्‍यांचा आधार आज निराधार झाला.
सलील शुध्दीवर आला ,त्याचं जीवघेण कण्हणं जीव कासावीस करत होतं. मलाच आधाराची गरज भासली..
मी त्याच्या वेदना कमी करु शकले नाही....ही खंत मनं खात आहे.
सलीलच्या डोळ्यात मुक्तीची आस दिसली...त्याला मृत्यूची चाहूल लागली.....कुमुदला कापत्या आवाजात म्हणाला...माझी तुझी साथ इतकीच...... आणि माझ्यानंतर सर्वांना सावरशील ना....थिजलेली कुमुद मला मिठी मारुन रडत होती......तुझ्या पोटात वाढणार्‍या आपल्या बाळासाठी. मी आणि आई हे एकून गांगरुन गेलो. सलीलने प्राण सोडला आणि सारेच कोसळले.
दोन्ही वेळेस ती उध्वस्त होतांना मी साक्षीदार होते. यालाच प्राक्तन म्हणतात का? माझ्या निष्पाप मैत्रीणीच्या भाळी काय लिहिलं आहे ? एका क्षणात माझा ईश्वर निष्ठा...शक्तीवरुन विश्वासच उडाला.
माझ्यातच बळ नाही मी तिला कशी सावरणार...आईबाबा...निरंजन दादा...गुंदेचा कुटुंब....आम्ही पूढच्या विधीसाठी वर्धेला रवाना झालो. मी तिला माझ्यासोबत नागपूरला चलण्यास आग्रह केला ती तयार नाही झाली.
ती एकटी नव्हती....दोन जिवांची होती. जड अंत:करणानी मी कुमुदला सोडून नागपूरला आले.
कशातच लक्ष लागत नाही....सारखा तिचा चेहरा डोळ्यापूढे येतो.

१७/८/१९८०
निरंजन दादाचा फोन आला...कुमुद बर्‍यापैकी सावरली. तिने सासरी रहाण्याचा निर्णय घेतला. मला तिचे वाक्य आठवले....दुसरा डाव मांडून बघते...बघू नियतीला काय मंजूर ते.......किती क्रुर आहे नियती....संसारसुख दिलं पण किती....जेमतेम तीन वर्षांच. सुमी तिला भेटून आली. मला आत्याकडून परवाच सुमी आता दोन जीवांची झाल्याचं कळलं. ती नागपूरला डॉक्टरांना दाखवायला येणारच आहे. माझं काय प्राक्तन आहे......माझ्या दोन्ही मैत्रिणी दोन जीवांच्या एक सुखात तर दुसरी दु:खात.

२५/८/१९८०
सुमीच्या सर्व तपासण्या झाल्यात....डॉक्टर काणेंनी खूप काळजी घ्यायला सांगितली. सुमीला सुखाची चाहूल लागली असली तरी ती ते व्यक्त करु शकत नव्हती. आजवर आम्ही तिघींनी आयुष्यातली प्रत्येक गोष्ट शेअर केली.....एकमेकींना समजून घेतलं...वेळप्रसंगी आधार दिला....सुख-दु:ख शेअर केली.....पण आजचा क्षण काय विचित्र आहे आम्ही ना दु:ख व्यक्त करु शकतो ना सुख.
नेहमी भेटल्यावर सतत बोलणार्‍या आम्ही आज निशब्द झालो.....
सुमीची डिलीवरी वर्धेलाच करणार.

२/९/१९८०
प्रसन्नाचं मला लांबलचक पत्र आलं. मी स्वत:ला सावरले....तो मात्र माझी काळजी करत होता.....त्याचं हे सेन्टीमेन्टल पत्र वाचून आधीची पत्र त्यानी पाठवलीत असं कोणीही म्हणणार नाही. किती समजुतदार आहे हा. मला त्यांच्या पाठीशी उभी रहा सांगणारा हा माझ्या भावना माझं मनं किती जपतो. आम्ही परस्परात इतके गुंतलो आहे एक उदास झाला तर त्याची चाहूल दुसर्‍याला आपसुक लागते.
१४/१०/१९८०
माझ्या खोलीतल्या खिडकीत..जून्या कुंडीत एकानिळ्या करड्या चिमणीनं घरट तयार केलेलं दिसलं....आता माझी डायरी..आणि आठवणी तिला रोज सांगायची. दिवसभर ती हिंडायची संध्याकाळी परत घरट्यात..
अगदी विन्दांच्या निळ्यापक्ष्यासारखी.
परिक्षा जवळ आली...अभ्यासाचा हल्ली ताण पडतो आहे....मन अस्थिर असेल तर कशातच लक्ष लागत नाही.
आजवर मी माझ्या विचारांचा आणि मनातील भावनांच्या चढउताराचा अभ्यासावर परिणाम होउ दिला नाही.
ते मळभ तात्पुरते बाजूला ठेवून मी अभ्यास करायची...पण... आठवणींच मळभ परत दाटुन आलं. अनेक विचारांचे तरंग मनाच्या तळ्यात उठले. विचित्र मनस्थितीत मी गुंतत गेले,विचारांचा हा गुंता सोडवायचा होता.यात दंग असतांना माझे मन कधी पक्षी होउन गेलं कळलेच नाही.

काही केल्या, काही केल्या
निळा पक्षी जात नाही
प्रकाशाचे पंख सान
निळी चोच, निळी मान
निळे डोळे, निळे गान
निळी चाल, निळा ढंग
त्याने चढे आकाशाला
निळा रंग.
विचारांना झटकण्याचा प्रयत्न विन्दांसारखा मी पण करुन पाहिला पण तो निष्फळ ठरला .हा पक्षी जणु माझ्या अंतर्मनातील द्वंद्वाचे प्रतीकच.,जो विचार बुद्दी झट्कुन टाकण्यच प्रयत्न करते.. मन त्याचा तेवढाच विचार करायला लावते. माझे आयुष्य इतरांसारखेच.....तरी ..कुठेतरी मी हरवले होते .....
पुन्हा तोच निळा पक्षी आला....आता मी एकटेपणाची आणि त्या चिमणीची वाट पाहु लागले.
आज या विचारांची गर्तता गहन होती.
"असली ही जात न्यारी,
बसे माझ्या निंबावरी;
पृथ्वीमध्ये पाळे खोल;
तरी सुध्दा जाई तोल....अनंताचा खड्डा खोल"
विचारांच्या खोल गर्ततेत हा अनुभव प्रत्येकाच मन घेत असेलं, विन्दांना या ओळीतून नेमक काय सुचवाच होतं? मनावरचा ताबा आधी ढळतो, की विचारांवरचा?
इतके वर्ष मी काय केलं ? घर आणि घरपण जपण्यातच गुंग होते. तोच माझा छंद...तोच माझा नाद. पण मला आयुष्यात एवढच साधायच होत ? याच इच्छा याच आकांक्षा होत्या. घरातल, घरच्यांच समाधान मी साधल होतं पण माझं ..? माझं समाधान यातच होतं तर एवढ सगळ साधून मला कशाची हुरहुर लागली आहे ? एवढे प्रश्न स्वत:ला विचारुन माझा मन आणि विचार या दोघांवरचा सयंम सुटला होता. घरपण साधता साधता प्रसन्नाशी मी प्रतारणा तर करत नव्हते ना ?
" मी सर्वसामान्य..माझं आयुष्य सर्वसामान्य...सार काही सुरळीत चालु असतांना मन अस्थिर का? हा धागा काही केल्या सापडत न्हवता. मी या वर जेवढा विचार करायची तेवढी अस्वस्थता वाढत होती."
तर्काच्या या गोफणीने, फेकितसे काही जड ;
आणि पाने आघाताने करतात तडफड;
टिकाळीला निळा पक्षी, जसा धड तसा धड
... ...उंच जागा अवघड.
विन्दांप्रमाणेच माझी विचार शक्ती आज मनाच्या अधीन झाली होती. कसली ही तगमग, अतृप्ततेची बोच का म्हणून मला छळत होती काहीच कळत नव्हते. खरच ही जागा उंच आणि अवघड होती. अंतर्मनाचा आवाज बुध्दीपर्यंत पोहचवण्याचा माझा मीच प्रयत्न करायलाच हवा.गोफणीने वार करायलाच हवा.मी या द्विधा मनस्थितीतुन बाहेर पडायलाच हवे.
याचे गान याचे गान,अमृताची जणू सुई
पांघरुण घेतो जाड,तरी टोचे,झोप नाही
जागविते मेलेल्याला ,जागृतांना करे घाई
याचे गान याचे गान,स्वरालाच नुरे भान
नाही तार नाही मंद्र ,चोची मधे धरी चंद्र
काही केल्या निळा पक्षी जात नाही
या मनस्थितीत, या परिस्थितीत मला गोफणी ने नेम साधता येइल का ? पण प्रयत्न तर करायलाच हवा.
२८/१०/१९८०
चौदा तारखेच पानं मी परत परत वाचलं मी अगतिक होईल कधीच वाटले नव्हते.....पण मनं बर्‍यापैकी हलकं झालं. आपण जेव्हा बुध्दी आणि मनं विचार करुन थकून जात असतीलं, व्यक्त होण्याचे सारे मार्ग बंद असतीलं अशा वेळीस अशीच प्रतिक्रिया उमटत असावी...या सार्‍या जाणीवा बाजूला ठेवून मी मन घट्ट केलं
माझं ध्येय समोर आणलं आणि ते पूर्ण करण्याचा संकल्प केला. या विवशतेच्या खुणा माझ्या चेहर्‍यावर न दिसाव्या म्हणून मी नॉर्मल असल्याचा आव आणला.
थोडक्यात आधीची आणि आत्ताची गार्गीत नवा बदलं जोडला गेला.

>>>>>>>>>>>>>>>>>>.........<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
नचिकेत वाचून सुन्न झाला.......तो गार्गीबद्दल विचार करु लागला......काय विलक्षण बाई आहे ही. माझा आणि हिचा काय सबंध....गार्गी देवदत्त खानोलकर....नाव आठवायचा प्रयत्न केला पण काहीच आठवेना.
कुमुद नाव आईच्या तोंडून एकल्याचे त्याला पुसटसे आठवत होते....निरंजन....हे नाव एकल्यासारखे वाटले. पण डॉक्टर गार्गी हे व्यक्तिमत्व म्हणजे स्थिर वृत्ती...स्थिर प्रवृत्ती...जबरदस्त विचार क्षमता.....कार्यक्षमता.....आयुष्याकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन......स्वत:तले बदलं टिपणारी....एक परफेक्ट ह्यूमन बींग.
अनुला यायला वेळ आहे......."तासाभरात येते" तिचा मॅसेज त्याने वाचला. त्याला अनुचेच आश्चर्य वाटले......हे सार वाचल्यावर ती इतके कशी नॉर्मल राहू शकते. उगाच डायरीतल्या पात्रांमधे अनु कोणासारखी शोधू लागला...माझी अनु वेगळीच...समंजस....सोज्वळ....थोडी गार्गीसारअखी थोडी सुमीसारखी....नचिकेतला अपल्याच विचारांच हसू आलं.
तेवढ्यात त्याला आजीने चहासाठी आवाज दिला...आजीला विचारु का ? ती यापैकी कोणाला तरी नक्कीच ओळखत असणार.....नचिकेतच्या मनात आले.
का रे नचि बरं वाटतं का ? औषध घेतलं का ? गरम काही खायला करुन देऊ का ? आजीच्या प्रश्नांवरुन त्याला आपण सीक लीव्हवर असल्याचे लक्षात आले.
या डायरीच्या कथानकात तो इतका गुंतला आज आपण सुट्टीवर आहो हे विसरुन गेला...दुपार केव्हा झाली हे कळलचं नाही...पेपेर वाचायचा राहून गेला........"बाप रे" भानावर येत त्याने चहा संपवला आणि परत पळत खोलीत आला....आणि डायरी काढली....जूने फोटो परत एकदा बघितले पण त्याला संदर्भ लागला नाही.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.......<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या आधीचे भाग वेळेअभावी वाचले नाहीत... हा भागही माझ्या जन्माच्या वेळच्या तारखा बघून वाचला.. आठवणींची कपाटे खोलत राहा.. वेळ मिळेल तसे मागचे पुढचे वाचेन.. Happy

विनीता देशपांडे,

ही कथा अतिशय मनोवेधक आहे. गुंतवून आणि गुंगवून ठेवते. प्रत्यक्ष गार्गीचे आयुष्य जगताहोत असा भास होतो.

अवांतर :
१. साकव हा शब्द विदर्भातही वापरतात हे पाहून मौज वाटली. माझ्या माहितीप्रमाणे कोकणात हा शब्द प्रचलित आहे.
२. गार्गीच्या लयबद्ध कवितांची जागा मध्यंतरी मुक्तछंदाने घेतली. आता परत यमक सुरू झालेय. काय सुचवायचंय बरं यातून?

आ.न.,
-गा.पै.

गामापैलवान, नमस्कार....आपल्या प्रतिसादाबद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद.

आपल्या निरिक्षण शक्तीची दाद देते.
अवांतर: १) साकव हा शब्द जरी कोकणातला असला तरी विदर्भाला तो परका नाही. साधारण सन १९९५-९६ सालची गोष्ट आहे, बालभारती, मराठी इयत्ता ३ री किंवा ४थी च्या पाठ्यपुस्तकात "साकव" हा धडा होता. साकवचा अर्थ तात्पुरता पुल असा आहे. माहित नाही...इतके वर्ष साकव हा शब्द मनात खोल रुतून बसला होता.
कवितेच्या निमेत्ताने बाहेर पडला एवढच. (आणि हो विदर्भातही कोकणातली लोकं रहातात हो)
२) गार्गीच्या कवितांमधे लयबद्द कवितांची जागा मुक्तछंदाने घेतली याला काही विशेष कारण तसे नाही. आयुष्याच्या प्रवासात तिला अनेक गोष्टी उलगडत गेल्यात....आयुष्याच्या वळणांवर तिच्यात होणारे बदल एवढच काय ते मला सुचवायच होतं