लीला नायडू - एक आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेली अभिनेत्री!

Submitted by अजित अन्नछत्रे on 5 August, 2012 - 03:43

(२८ जुलै २०१२ रोजी लीला नायडू यांच्या मृत्युला ३ वर्षे पूर्ण झाली, त्याबद्दल त्याना ही छोटीशी श्रद्धांजली!)

Leela_Naidu.jpg

बॉलीवूड मध्ये लीला नायडू सारखे आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या नायिका फारच कमी पहावयास मिळतील (मधुबाला, सुचित्रा सेन आणि माधुरी दीक्षित यांचा अपवाद सोडला तर)! "वोग" (Vogue ) सारख्या आंतरराष्ट्रीय आणि ख्यातनाम मासिकाने १९५०-६० च्या दशकात या आकर्षक आणि डौलदार व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्रीचा समावेश "जगातील १० अति सुंदर" महिलांमध्ये उगाचच केला नव्हता!

लीला नायडू यांचा जन्म १९४० साली मुंबईत झाला. त्यांचे पिता, डॉ. रामैय्या नायडू एक ख्यातनाम अणु संशोधक होते तर आई स्विस मुळाची भारतीय संस्कृतीची (Indology)अभ्यासिका होती – त्यांच्या कडूनच लीला नायडू यांना भारतीय आणि युरोपियन मिश्रित सौंदर्याचा वारसा मिळाला होता! त्यामुळेच त्यांच्या सौंदर्यातील वेगळेपणा हा त्या काळच्या हिरोइन्स (नर्गिस, मीना कुमारी इ.) मध्ये उठून दिसायचा. त्याना १९५४ साली "मिस इंडिया" हा किताबहि मिळाला होता.

हृषीकेश मुखर्जी यांनी डायरेक्ट केलेला "अनुराधा" हा लीला नायडू यांचा बॉलीवूड मधील पहिला चित्रपट! या चित्रपटात त्यांनी अशा एकाकी पडलेल्या पत्नीची भूमिका अतिशय उठावदार पणे केली कि जी आपले सारे गानविश्वातील करिअर आपल्या डॉक्टर पतीकरता (बलराज सहानी) करिता सोडून देते. या चित्रपटाची गणना एका महान बॉलीवूड चित्रपटांमध्ये होते. पंडित रविशंकर यांनी दिलेले अतिश्रवणीय संगीत (जाने कैसे सपनोमे, कैसे दिन बीते इ. गाणी) आणि बलराज सहानी यांचा दमदार अभिनय ह्या "अनुराधा" या चित्रपटाच्या इतर जमेच्या बाजू! या चित्रपटाला १९६१ चा भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि बर्लिन आंतराराष्ट्रीय फिल्मोत्सव पुरस्कार मिळाला!

"येह रास्ते हैं प्यारके" हा त्यांचा अजून एक गाजलेला चित्रपट (१९६३)! ह्या चित्रपटाची कथा त्या वेळच्या गाजलेल्या "नानावटी प्रेमप्रकरण" यावर आधारित होती. ह्या चित्रपटात सुनील दत्त, रेहमान आणि लीला नायडू यांनी हा प्रेमाचा त्रिकोण अतिशय समर्थपणे साकारला आहे. खरे तर, ही अपारंपारिक भूमिका स्वीकारावयास त्या वेळच्या कोणत्याही प्रसिद्ध नायिका तयार नव्हत्या. पण लीला नायडू यांचा दाखविलेला धीटपणा त्यांच्या चांगलाच उपयोगी पडला आणि हा चित्रपट हिट ठरला!

जेम्स आईव्हरी यांचा "The householder" (१९६३) आणि श्याम बेनेगल यांचा "त्रिकाल" (१९८५) हे लीला नायडू यांचे इतर गाजलेले चित्रपट! श्याम बेनेगल तर लीला नायडू यांच्या अभिनया बद्दल म्हणतात "It was a sheer haunting experience to work with Leela Naidu, who breethed innocence and serenity in her performance!”

परंतु, इतक्या प्रतिभाशाली अभिनेत्रीला केवळ बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट मिळाले - कदाचित त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि तेजस्वी प्रतिभा त्यांच्या प्रगतीआड आली असावी!

लीला नायडू यांचे वैयक्तिक आयुष्य तितके सुखकारक नव्हते. त्यांचे दोनदा लग्न आणि घटस्फोट झाले - टिक्की ओबेरॉय (ओबेरॉय हॉटेल्स चे मालक) आणि डोम मोरास (कवी आणि लेखक) यांच्याबरोबर! त्यांनी आपल्या जीवनाची शेवटची काही वर्षे एकाकीपाणेच घालविली. या एकटेपणात त्यांना जे. कृष्णमुर्ती यांच्या शिकवणुकीची खूप साथ मिळाली.

अखेर २८ जुलै २००९ या दिवशी लीला नायडू यांनी शेवटचा श्वास घेतला - त्याना ही भावपूर्ण श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यांचा फक्त अनुराधा पाहिला आहे खूप वर्षांपुर्वी टिव्हीवर. बलराज सहानी आवडते होतेच पण लीला नायडूंची भुमिका आणि सौंदर्य अगदीच लक्षात राहिलं Happy

बिनधास्त, थोडक्यात पण चांगलं लिहिलं आहे. त्यांचे इतकेच सिनेमे होते का?

थोडक्यात पण अगदी छान आढावा घेतला आहे. ह्या अभिनेत्रीबद्दल खरंच काहीही माहिती नाही. पण तुम्ही लिहिल्यामुळे ती कळाली. धन्यवाद.

अश्विनि के. आणि शांकली, आपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद!

माझ्या माहितीतील तर लीला नायडू यांचे इतकेच सिनेमे आहेत (कदाचित माझी माहिती अपुरीही असू शकेल - कुणाला अधिक माहिती असल्यास जरूर कळवावी).

पण काही किस्से इथे नमूद करावेसे वाटतात!

'The Householder' मधील लीला नायडू यांचे काम पाहून अंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय दिग्दर्शक श्री सत्यजित रे इतके प्रभावित झाले होते कि त्यांनी लीला नायडू याना पुढच्या सिनेमा साठी घ्यायचे ठरविले होते - पण हा सिनेमा कधी साकारालाच नाही!

असेच 'गाईड' सिनेमा बद्दल झाले - गाईडच्या रोल करीता विजयानंद लीला नायडू याना घेण्याच्या विचारात होते. पण लीला नायडू या trained dancer नसल्यामुळे त्यांना हा रोल मिळू शकला नाही आणि शेवटी हा रोल वहिदा रेहमान यांना मिळाला!

ये रास्ते है प्यार के या सिनेमाची कथा कुणीतरी मध्यंतरी ऐकवली होती म्हणून गूगल सर्च दिला तेव्हां हे नानावटी प्रकरण वगैरे कळालं. त्यांचे त्यावेळचे प्रचि पाहून आश्चर्यचकित झालो होतो.

छान लेख. आणि स्मृती पण. खरेच एक क्लासिक ब्युटी. डॉमच्या बरोबर राहताना झालेल्या मानसिक त्रासा बद्दल त्यांनि लिहीले आहे. पूर्वी सावी मासिकात दर महिन्याला एका स्त्रीची जीवनकहाणी लिहून येत असे त्यात वाचले होते. विचित्र सिल्क नावाच्या सिल्क/ प्युअर शिफॉन साड्यांच्या जाहिरातीत त्या मॉडेल असत. वरचा फोटो फार छान आहे.

बिनधास्त जी...

काय आठवणी जागृत केल्या तुम्ही ! झटदिशी त्या दशकात मी पोचलो जिथे चर्चा होती ती चित्रपटाची नव्हे तर 'लीला नायडू' या नव्या अभिनेत्रीच्या स्वर्गीय सौंदर्याची.

सत्यजीत रे सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविले गेलेले दिग्दर्शक ज्यावेळी "गॉडफादर" मार्लन ब्रॅण्डोला साईन करतात 'जर्नी' साठी त्यावेळी त्याच्या दर्जाला रुबाबाला साजेशी अशी भारतीय युवती नायिकेसाठी निश्चित करतात आणि ती होती 'लीला नायडू' हे वाचल्यावर जी विलक्षण हुरहूर निर्माण झाली होती आम्हा सर्व सिनेरसिकांसाठी ती आजही तुमच्या या लेखाच्या निमित्ताने झाली. हा लेख वाचून आणि फोटो पाहून त्रिचन्नापल्ली इथे आता स्थायिक झालेल्या 'त्या' काळातील मित्राला मी सकाळीसकाळी फोनवरून 'लीला' आठवून दिली....आणि तो टेबलवर नाष्टा न करताच बसून राहिला आहे असे त्याच्या पत्नीने हसतहसत मला सांगितले....इतके भावविश्व आमचे व्यापले होते अल्पशी सिनेकारकिर्द असलेल्या या कमालीच्या व्यक्तिमत्वाच्या अभिनेत्रीने.....तिच्या खानदानी सौंदर्याची बरोबरी करीत होत्या त्या केवळ जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी.

"सबटल ब्यूटी.....मिस्टेरिअस ब्यूटी....इल्युसिव्ह ब्यूटी...हार्ड टु ग्रास्प ब्यूटी....." या सर्व विशेषणांपेक्षा तिच्यासाठी त्यावेळेच्या पत्रकारांनी 'व्होग ब्यूटी' हे अत्यंत सार्थ विशेषण राखले होते. हे 'व्होग' म्हणजे काय ? हे आम्हाला त्यावेळी जरी समजले नसले तर पुढे त्यामागचा इतिहास कळाल्यावर मग तर लीला नायडूविषयी जास्तच प्रीति निर्माण झाली होती.

व्वा....लेखासाठी तुम्ही निवडलेल्या फोटोलाही दाद द्यावी लागेल.

एका सुरेख-सुंदर आठवणीबद्दल तुम्हाला धन्यवाद.

["गाईड" ~ सुरुवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन आनंद यांच्याकडे होते, त्यानी रोझीसाठी लीला नायडू यांच्या नावाचा विचार पक्का केला होता. नायिका नृत्यात तरबेज असली पाहिजे ही तर निर्विवाद अट होतीच, त्याबाबत चेतन आणि देव आनंद नंतर विचार करणार होते, पण त्याच दरम्यान भारत सरकारकडून चेतन आनंद याना त्यांच्या 'हकिकत' चित्रपटासाठी कर्ज मंजूर झाल्याची बातमी आल्याने चेतनने धाकट्या भावाला विनंती करून 'गाईड' मधून अंग काढून घेतले. साहजिकच नवे दिग्दर्शक म्हणून विजय आनंद यांचा पर्याय होता. त्यानी याच अटीवर चित्रपट स्वीकारला की रोझीसाठी वहिदा रेहमान हिच्याशिवाय पर्याय नाही. बाकी इतिहास सर्वाना ज्ञात आहेच...असो]

अशोक पाटील

हाये रे वो दिन क्युं ना आये
जा जा के रीतु समझाये........

लीला नायडु म्हंटले की मला पटकन हेच गाणे आठवते. एकदा तब्येत बरी न्हवती म्हणुन कॉलेजला दांडी मारली होती. त्या वेळेस कुठल्या तरी च्यानल वर "अनुराधा" लागला होता. त्यातली अप्रतिम गाणी , बलराज सहानी आणि लीला नायडु !!!!! एकदम खतरा कॉम्बो..अजुनही खाली मान घालुन वरील गाणं म्हणणारी त्यांची छबी डोळ्या समोर येते. मग इतरही गाणी आठवतात " जाने कैसे सपनो मे खो गयी अखियाँ "

एकदम सटल लुक आणि खानदानी व्यक्तीमत्व. शेवट वाचल्यावर जाणवले, की सौंदर्य शापित असतात का? बहुतेक सौंदर्यवतींच्या वाटेला उध्वस्त प्रेम कहाण्या , एकटे पणा आलेला वाचतो आपण.... शेवटी नशीब!!!!

काय कातिल आठवण.... अप्रतिम लेख.

थोडक्यात पण अगदी छान आढावा घेतला आहे. ह्या अभिनेत्रीबद्दल खरंच काहीही माहिती नाही. पण तुम्ही लिहिल्यामुळे ती कळाली. धन्यवाद. >>+१०

"अनुराधा" हा माझा वन ऑफ दि फेवरिट्स - कथानक, दिग्दर्शन, अभिनय, पात्र निवड या सर्व बाबी अतिशय उत्कृष्ट व अतिशय सुमधुर संगीत.

लेखाकरता मनापासून धन्यवाद.....

या अभिनेत्रीबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. धन्यवाद!

हा लेख बराचसा खालील मूळ इंग्रजी लेखाचं भाषांतर वाटतोय.. या लेखात त्याचा उल्लेख करायला हवा होता असं मला वाटतं.

http://www.independent.co.uk/news/obituaries/leela-naidu-miss-india-of-1...

मित्रानो,

लीला नायडू यांच्या बद्दल माहिती बऱ्याच websites वर मिळेल. त्यातील काही खाली देत आहे:

१) http://en.wikipedia.org/wiki/Leela_naidu
२) http://articles.timesofindia.indiatimes.com/keyword/leela-naidu
३) http://www.independent.co.uk/news/obituaries/leela-naidu-miss-india-of-1...
४) http://www.youtube.com/watch?v=_-9F6p6LkOs
५) http://kpjayan.blogspot.com/2011/03/leela-patch-work-life-leela-naidu.html
६) http://www.penguinbooksindia.com/en/node/112
७) http://en.wikipedia.org/wiki/Anuradha_(film)
८) http://www.zimbio.com/Leela+naidu
९) http://www.thedailystar.net/newDesign/news-details.php?nid=९९५२३
१०) http://www.openthemagazine.com/article/books/the-many-lives-of-leela-naidu

आणि अनेक! त्यांच्या जीवनाबद्दल बरीच पुस्तके पण लिहिली गेलेली आहेत.

२८ जुलै २०१२ रोजी त्यांच्या मृत्युला ३ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांच्या कांही आठवणी ताज्या करावायाशा वाटल्या.

Happy reading !!

पारंपारिक भारतीय चेहर्‍यांपेक्षा थोडा वेगळा चेहरा. तिन्ही चित्रपट मी पाहिलेत.
त्रिकाल मधे त्यांची वृद्धेची छोटी भुमिका होती. गोव्यातले कथानक असणार्‍या या चित्रपटात, बर्‍याच कलावती होत्या, नीना गुप्ता, सबीरा मर्चंट, आलिशा चिनॉय पण होत्या.

सुन्दर लेख ! या अभिनेत्रिबद्दल काहिच माहिती नव्हते. धन्यवाद बिनधास्तजी.

लीला नायडू - नाव माहीत होतं, लहापणी छायागीतमधे बघितल्याचंही आठवतय..
लेखाने बरच काही माहीत करून दिलं... धन्यवाद

दुर्दैवाने मला या अभिनेत्रीबद्दल काहीही माहिती नाही. नाव सुद्धा पहिल्यांदाच वाचतेय इथे. Sad पण तुम्ही चांगला आढावा घेतलाय, शिवाय फोटो ही सुरेख निवडलाय.

लीला नायडु... उफ्फ्फ्.. कयामत सौंदर्य.. Happy मधे एकदा वाचनात होते कि त्यांना वर्ल्ड्ज टॉपटेन नायिकंमध्ये स्थान होते मर्लिन मॅन्रो बरोबर... आणि खरेच होते ते.. Happy