तुमचीच गोष्ट.... बिन नावाची!!

Submitted by स्मितहास्य on 4 August, 2012 - 00:39

श्रावण नुकताच संपलेला. सप्टेंबरमधला तो एक दिवस, वेळ सकाळी आठची. "तो" वडाळा स्टेशनवर उभा, आठची पनवेल पकडायला. जसे आपण सगळे इंजिनिअरिंग स्टुडंट्स म्हणवतो, तसाच तो हि नुकताच इंजिनिअरिंग स्टुडंट बनलेला.

ट्रॅकजवळील गवताची पाती, नुकताच पडलेल्या उन्हामुळे स्वत:च्या हिरवट-पिवळ्या रंगांच्या दवबिंदूत चकचकीत अविष्कार दाखवित होती.

तो फर्स्ट क्लासला उभा. तीन नंबर प्लॅट्फॉर्मवर ८.१० ची अंधेरी पनवेल आली. त्यांच्या समोर लेडीज फर्स्टक्लास आला. "ती" गोरीपान... नाजूक. उभ्या-उभ्याच त्याची नजर तिच्यावर खिळली. अचानक मोबाईलचे सिम ब्लॉक व्हावे तसे झाले. "ती" मात्र स्वत:च्याच धुंदीत. कानात इअरफोन आणि गाण्याचे शब्द गुलाबी ओठांवर.

च्यायला, ही लोकल कशी मधे आली.... ? आमचे सिम अ‍ॅक्टिव झाले. अरे, आपली ट्रेन आली. "तो" पटकन चढला. डबा रिकामा असूनही पलिकडच्या दरवाज्यात जाऊन उभा राहीला. पुन्हा सिम ब्लॉक.......
"ती" तिथेच होती. Thank god!! बहुतेक गाणं संपलं असावं, ती मोबाईल हाताळत इकडे-तिकडे बघत होती. नजरानजर झाली, "cute रे...." तिचे डोळे, टपोरे आणि तेजस्वी. तिचीपण नजर अडकली. आमचा "तो" पण काही कमी नव्हता. ऊंच, सतत खेळून खेळून गोर्‍याचा गव्हाळ झालेला. व्हाईट शर्ट, ब्लू जीन्स. कडक एकदम. "ती" मात्र लगेच भानावर आली, "तो" लांब जाऊ लागला.

आयला...!! तिने लूक दिला. पण नेमकी तेव्हाच आपली ट्रेन का सुटली? त्या दिवशी तो तसाच तिथे दरवाजात उभा राहून गेला. खारघरपर्यंत. "तिला" आठवत. कॉलेजमधेपण अधून-मधून आठवण येत राहीली.

स्थळः कॉलेज कॅन्टीन
वेळः ........ काय करायची आहे. (असेही बरेचसे लेक्चर्स तिथेच होतात आपले Happy )

"ती" परत आठवली. त्याला जाणवलं, आपण गुंतलो यार तिच्यात. उद्या परत तिला पाहू... स्वतःशीच इरादा पक्का केला.
पण राव......... देव प्रसन्न झाला. इतके महिने करत असलेला गुरूवारचा उपवास फळला. "ती" कॅन्टीनमधे...
तशीच अगदी. गोड, क्युट, नाजूक. "तो" लगेच अँगल लावून बसला. मित्रांना कळायला नको ना. "ती" तिच्या मैत्रीणींसोबत. "तिच्या" टेबलावरचा डोसा मी गार होतोय, सांगत होता. तिच्या मैत्रीणी आणि ती, पोरिंचा टिपीकल टाईमपास... मोबाईल फोटोशूट. "ती" ने लगेच पोझपण दिली. डोशामधून बघत एक स्माईल, तेच टपोरे डोळे.. चकमणारे.......!

आमचं सिम ब्लॉक....! चमत्कार.... ! तिचंपण सिम ब्लॉक. भिडली नजरेला नजर....! पण as usual, तीच भानावर आली. यावेळी एका चिमट्यामुळे. झाला फोटो काढून? म्हणत तिची एक मैत्रीण डिस्टर्ब बनली. "ती" पण लाजली. मनातच. आपल्या मैत्रीणींना कळायला नको.

आमचं सिम अ‍ॅक्टिव झालं, गार डोसा संपवून "ती" निघाली. जातांना दरवाजातून मागे वळली.... असं दाखवायला की, काही राहिलं तर नाही ना, पण तो तर बहाणा होता, व्हाईट शर्ट - ब्लू जीन्सला बघायचा.
"ती" वळली.. आयल्ला! आपल्यालाच बघितलं.
काय सांगू राव, फर्स्ट इयरला री-चेकिंगमधे सगळ्या केट्या सुटल्यावरपण इतका आनंद झाला नव्हता, जेवढा "तिच्या" look मधे मिळाला.
त्याने एकदम दृढ निश्चय केला, या गुरूवारपासून इज्जतमधे उपवास. वेफर्स, उपवासाच्या नावाखाली सतत "आमचं सिम बंद" , "तिला" मिळवायचंय.

स्थळः वडाळा
आठची पनवेल एक नंबर प्लॅटफॉर्मवर यायला बराच अवधी होता. "ती" आली. म्हणजे ८.१० अंधेरी-पनवेल, म्हणजे "ती" च ना स्मित. लेडीज फर्स्टक्लास दिसला. ती.. तिथे, तशीच. भुरभुर उडणारे सोनेरी केस....
आश्चर्य, "ती" ची नजर शोधत होती. आम्ही तयारंच होतो. सकाळी ५ ला उठून, "आर्म्स" मारून, एकदम पोझमधे उभे होतो, "तो" दिसल्यावर तिचं गुगल बंद झालं. आज टी-शर्ट मधे मस्त दिसतोय, अगदी हट्टा-कट्टा.
"तो", आज अजूनंच क्यूट दिसतेय, व्हाईट कुर्ता - ब्लू जीन्स.

न राहवून तिने स्माईल दिलं. आम्ही तर त्याचीच वाट पहात होतो. मग त्यानेही मी आज ब्रश केलाय चा पुरावा दिला. त्याने तिला हात दाखवला, तिने स्माईल. त्याच्या आजूबाजूचे त्याच्याकडे हेव्याने बघू लागले.

खल्ल्लास. पोरीच्या एका स्टेप अहेडवर त्याने शंभर स्टेप्स अहेड घेतल्या. तेवढ्यातंच तिला हातानेच "मी येतो तुझ्या ट्रेनला" असा सिग्नल दिला. ती प्रश्नार्थक. कधी नव्हे तो फुट ओव्हर ब्रीज लांब, मोठा वाटला.
तिकडे आठची पनवेल "मी रिकामी" म्हणून आली. त्यांच मात्र सिम ब्लॉक. एकंच लक्ष्य अवस्थेत तिच्या डब्याजवळ गेला.

तिचं गुगल परत थांबलं. पण ती पुढे नाही आली. तो मात्र म्हटलं ना, शंभर स्टेप्स अहेड घेऊन बसला, लगतच्या फर्स्टक्लासला चढला. लेडीज फर्स्टक्लास दिसत होता. फक्त जाळीच होती. "व्हीडिओ कोच" चा पूर्ण फायदा त्याने घेतला. मग "तो" ने पण स्टेप अहेड केलं. ती आणि मधे जाळी.

जुजबी ओळखीच्या गोष्टी केल्या. दोघे एकाच सेमीस्टरला, ब्रांच वेगळ्या. त्याला हायसं वाटलं आणि तिलाही. मग तिने परत कानात गाणी, ओठांवर शब्द आणले आणि पाठ फिरवली. कुर्ला आलं ना. गर्दी झाली. "तो" मात्र अजून आर्म्स, ट्रायसेप्स , काय काय या सगळ्यांच्या पोझ देत उभा राहिला. "ती" ची मात्र पाठंच. उभा राहून पाय दुखले, पाय अवघडले.. पण "ति"च्यासाठी सबकुछ माफ. Happy
खारघरला उतरून बोलावं तिच्याशी तर साले सगळे मित्र हजर. तिनेपण काही "घास" नाही टाकले. म्युचुअल अंडरस्टँडींग हेच! हा साक्षात्कार झाला. या दिवसांनंतर त्यांच्या जवळ येण्याच्या प्रवासाला कधी मेगाब्लॉक लागलाच नाही मग.

फोन्स, SMSes, सगळ्यात महत्वाचं, फेसबूकवर तिच्या "फ्रेंडलिस्ट" मधे "मानाचं स्थान" मिळाल्यावर अर्धी लढाईच जिंकली. एकमेकांच्या आवडी-निवडी जुळल्या.. एवढ्या की ,एकमेकांच्या असाइन्मेंट्स पूर्ण होऊ लागल्या. बराच काळ लोटला. सुखाचे क्षण आले. लेक्चर्स बंक झाले आणि बंक मारणारे आपले बंकर्स लिटील् वर्ल्ड, रघुलिला या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊ लागले.

दिवसामागून रात्र येते, तसंच सुखानंतर दु:ख. परिक्षा गेल्या, रिझल्ट्स येऊ लागला, मग तर काय, सिद्धिविनायक, महालक्ष्मी, माऊंट मेरी, इस्कॉन मंदीर अशा "धार्मिक" स्थळांना बंकर पोहोचले. दु:ख आलेच शेवटी. केट्या लागल्या. पण दु:ख हलकं करायला "मैत्री" चा खांदा होता. एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या म्हणीचा साक्षात्कार झाला.

दिवसांमागून दिवस गेले. वर्ष लोटलं.
टी.ई (थर्ड इयर) संपत आलं.
On a very fine day म्हणावं, तसं Rhythms च्या एका दिवशी, रोझ डे च्या रोजी. "ती"च्या गुलाबी ओठांसारखं गुलाब द्यायचं असा इरादा पक्का झाला.
रोझ डे आला. तो. लाल टीशर्ट ( आर्म्स मारूनंच) ब्लू जीन्स. "ती" व्हाईट-पिंक काँबिनेशनचा एक छानसा ड्रेस. "ती"ची मनोमन इच्छा, त्याने गुलाब द्यावं आपल्याला, Excited खूप.

"तो" मग कॉलेजमधे लवकर जाऊन, परत फेसवॉशचा फेस करून, जेल लावून, स्वतःशीच "आल इज वेल" चा मंत्र जाप करत काँफिडन्स लेव्हल वाढवत बसला.

ती आली. भेट झाली. तोंडं बंद झाली तर मन गोंधळ घालू लागतं. हा देत का नाहीये गुलाब? आणलं असेल ना त्याने? का त्याला कुणीतरी दिलं? त्याच्या मनातही गोंधळ. आता लगेच काढून देऊ का? तिने चमाट दिली तर?

नाही रे! इज्जतमधे अ‍ॅक्सेप्ट करेल. Reply आजंच देईल का?

जाऊ दे, संध्याकाळी देऊ. पण तोवर घरी गेली तर.... नाही नाही, पिक्चरला घेऊन जातो ,सुरूवातीला अंधारातच देतो, जे व्हायचं ते अंधारात होऊ दे. पण च्यायला पैसे नाहीत आज, आणि दुपारचा शो म्हटला तरी दिडशेचा रेट असणार. पिक्चर कँन्सल.

मी दोन मिनीटांत आलो असे म्हणून तो तिला कँपसमधेच थांबवून वळला. परिक्षा अभ्यासाची असो वा प्रेमाची, वॉशरूमसारख्या "संवेदनशील" स्थळाला भेट दिल्याशिवाय "तो" लोकांची कामं होत नाहीत. स्मित तुटलेल्या चौकोनी आरशाच्या त्रिकोणात स्वत:लाच मनोमन शिव्या घातल्या. "लुख्खा" म्हणून हिणवलं. काय घाबरायचं तिला म्हणून काँफिडन्स बूस्ट केला. पुन्हा एकदा जेल आणि पाणी चोपडलं आणि तिच्यासमोर गेला.
परत मनात गोंधळ, जाऊ दे.. आज नकोच. गुरूवारी देऊ. व्हॅलेंटाईन डे गुरूवारी आहे ना. ऊपवास आहे. बाप्पा सांभाळून घेईल, आणि अचानक मनाने डोक्याचं ऐकणं बंद केलं. कॉरिडोरच्या कोपर्‍यात जिथे इतरांच लक्ष नाही अशा ठिकाणी उभे असतांना, बॅग उघडली.

"ती" वॉव, हा आता बॅगमधून गुलाब काढणार, मी ते अ‍ॅक्सेप्ट करणार या विचारांनीच मनातल्या लाजेला ओठांवर स्माईल आणून व्यक्त केरून गेली.

"तो" आधी पाणी पिऊन घेऊ म्हणत, बॅगमधून पाण्याची बाटली काढत तिला विचारलं, तुला हवं?
ती. किती घाबरतोय हा? मी तुझीच आहे रे. एकदा तरी बोल. पण त्याचं ही बरोबर आहे. May be मी नाही म्हणेन म्हणून थोडा नर्व्हस असेल. पण आता जर का नाही बोलू शकला, तर मीच विचारेन. I can understand you असं मनाशीच म्हणत पाणी नको म्हणाली.

झालंच तर, डील डन म्हणत त्याने गुलाब काढलं. सकाळी घरून निघाल्यापासून नवीन लॅपटॉप बॅगमधे असता तरी इतकं सांभाळलं नसतं एव्ढ्या काळजीने न चुरगळलेलं, तिच्या ओठांइतकंच गुलाबी, नाजूक आणि त्याच्या मनातल्या भावनांइतकंच ताजं, टवटवीत गुलाब अखेर बाहेर डोकावलं. तो क्षण होताच असा की जिथे शब्द कोणत्याच जोडीला सापडत नाहीत. तिथे असतात फक्त भावना.

"हे तुझ्यासाठी", जिथे दोन शब्दांत प्रेम व्यक्त होते, तिथे गुगलच्या दोन हजार रिझल्ट्स्ची खरंच गरज होती का हे आठवून तो स्वतःवर हसला. गुलाबामुळे आधीच ती लाजलेली. त्यात तो बावळटासारखा हसला. "ती"ने लगेच विचारलं, "का हसलास" ?
त्याने "नथिंग" म्हणत मान डोलावली.
"थँक्स"! ती म्हणाली. "तू का थँक्स बोलतेयस? त्याच्या या प्रश्नावर ती स्वताच्या बावळटपणावर हसली.
दोघेही मनोमन "कमिटेड" झाले.

"तो" तुला एक विचारायचं होतं.
"हो विचार ना, विचारतोस का त्यासाठी"?
"ओके, अं. वेल, तुझ्याकडे थोडासा वेळ असेल तर तुला तुझं उर्वरित आयुष्य माझ्यासोबत घालवायला आवडेल"?

परिक्षेच्या कडक सुपर्व्हिजनमधे पण सक्सेसफुल कॉपी मारून पास झाल्यावर एवढी छाती नव्हती फुगली, तेवढी लेकाची फुगली. "बोल्लो की नाय...." असं स्वतःलाच काँग्रेट्स करत म्हणाला. ती खूप लाजली. "ती"ला शब्दच सुचत नव्हते. नुसतंच छान छान वाटत होतं.

"तू खूप गोड लाजतेस", मुंबई - पुणे - मुंबईतला डायलॉग करेक्ट टायमिंगला ओकल्याने "तो" प्रचंड काँफिडंट.
"जा ना" !!! नको ना छळू!! "ती"चा प्रेमळ नकार.
जाऊ मी?? म्हणत उगाच जागच्या जागी पाय उचलले.
"नको ना...." "ती"ने प्रेमाने त्याला हाताने थांबवत म्हटले.
"हो..... मला नक्की आवडेल तुझ्यासोबत आयुष्यातले सगळे श्वास क्षणोक्षणी शेअर करायला. Love u too.....

खुप खुष..... अति खुष. टी.ई मध्येच जणू काही मायक्रोसॉफ्ट्चा जॉब लागल्यासारखा. आता तर काय... रानच मोकळं मिळालं होतं. "तो" असो वा "ती", अशा गोष्टी जगाला ओरडून सांगावाश्या वाटतात. पण सुरूवातीचा आठवडा, जास्तीत - जास्त महिनाभर "तेरी भी चुप मेरी भी चुप". मग रिलेशनशीप स्टेटस "कमिटेड" केलं जातं. मित्र - मैत्रीणींना बातमी कळवली जाते. त्यांच चिडवणं सुरू, अ‍ॅक्चुअली "तो" आनि "ती" सगळं एंजॉय करू लागलेले.
मग काय, रात्री झोपल्यावर हळूच उशीखाली "खामोश" फोन घुमू लागतो. मधी msg पुरताच तर कधी "मला झोप येत नाहीए, तुझी आठवण येतेय. उठ!! अशा विविध कारणांसाठी.

मग "तो" च्या मोबाईलचं मेमरी कार्ड, इनबॉक्स "ती"च्या फोटोज, sms ने भरतं. Where as "ती"चे msgbox शक्यतो नेहमीच empty. त्याच्या msg वाचून rply दिला की लगेच delet. "ती"चा फोन घरी सगळे हाताळायचे. पण "ती"चं मेल बॉक्स "तो"च्याच मेल ने भरलेलं. कधी ग्रीटींग्स तर कधी कचरा forward करायचा. Whatsapp!! चा चांगलाच वापर केला जात होता. ज्याचं स्वस्त आऊटगोईंग त्याचं सिमकार्ड घेत सर्व्हीस प्रोव्हायडरची कंपनी भरली जात होती आणि ज्याचं फ्री GPRS जितके दिवस तितके दिवस, वापरल्यावर ते सिम फेकून त्या कंपनीला लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरू होते.

असाच एक दिवस, तो आणि ती गप्पा मारत होते. "ती", "तुला नाचता येतं? मला आवडतं पण येत नाही रे!"
"तो", "हो तर, वर्षातून दोनदा रोड शो करतो मी आणि माझा ग्रुप, ते पण शेकडो लोकांसमोर".
"ती", "काय बोलतोस, कधी रे करता तुम्ही??"
"तो", गणपती आणतांना आणि नेतांना, मिरवणूकीत सगळे नाचत असतात, मग मी पण. त्याच्या ह्या असल्या स्ट्रीट शो वर दोघेही हसले. "ती" सिरीयल होती, म्हणजे ठराविक मालिका पाहणारी. अशा गोड गोड क्षणी, "ती"चं मन बर्‍याचदा "बडे अच्छे लगते है" चं गाणं गाऊ लागायचं, "धीरे धीरे, होले होले" म्हणत. आणि तो टिपीकल फिल्मी, RHTDM मधला maddy बनलेला असायचा.

पण "तो" होता छान. कुणालाही मदत करायला म्हणा, स्वतः करू शकत असेल तर एकदाही विचार न करता करायचा. मनात काही ठेवायचा नाही. एखादी गोष्ट पटली नाही तर सरळ शब्दांत सांगणारा, पण भावूक.

ती बरीच प्रॅक्टीकल. काही गोष्टी आयुष्यात By Hook or Crook होणारंच, या विचारांची. बर्‍याचदा मनावर दगड ठेऊन, डोक्याने विचार करणारी.

बी.ई चालू होतं. दोघंही बरेच सेन्सीबल झालेले. तरी, ती त्याचा लाड करायची, तो "ती"चे हट्ट पुरवायचा.. देवाने काय सेटिंग केली आहे "ती" बनवतांना, ते त्यालाच माहीत. या "ती" प्रकारच्या प्राण्याला रूसायला खूप आवडतं, "तो" लोकांमधेपण अ‍ॅडव्हान्स्ड सेटिंग आहे बरं का, "तो" लोकांना "ती"चे रूसवे काढायला आवडतात.

"तो" आणि "ती" यांची मने तारूण्याच्या स्वप्नात खूप भरार्‍या मारत होती. कधी कधी "तो" आणि "ती"चे extreme विचार जुळायचे. "तो" आपण एकदा ना हिला खारघर हिलवर नेऊन "रब ने बना दी जोडी" स्टाईल प्रपोज करू. पण दुर्दैव..... MSEB मधे एवढी वट नव्हती. Sad
बी.ई चा पावसाळा चालू होता. "तो" बर्‍याचदा छत्री घरीच ठेऊन यायचा. कारण स्पष्ट आहे ना, "ती"चे ओले केस जेव्हा "ती"च्या गालावर चिकटायचे, तेव्हा I wish मी ते केस असतो, असा विचार येणं स्वाभाविकच. अशावेळी मीत्र कॉलेजमधल्या सरांचे शब्द आठवायचे, "ज्यादा टेंन्शन नही लेनेका, वो येरळा के पिछे जा के एक कटिंग मारनेका".

पाऊस, ती, तो आणि एकच छत्री. अशावेळी एकच कटिंग दोघांत "एक मै और एक तू" करत पिण्याची मजा औरच. माहीत नाही का, जगातल्या प्रत्येक "तो" आणि "ती" लोकांना हा पावसाळा त्यांना आपली सेटिंग लावणारा किंवा रिलेशन strong करणारा वाटतो.
माझं सजेशन, काही वाद झाले असतील, पावसात जाऊन sort करा. It works. नाही झाले तर All characters and incidents in this story are fictitious हे लक्षात ठेवावे. Happy
असो...

बी.ई त कंपन्या आल्या, तो भावूक म्हणून त्याची इच्छा आपल्या दोघांना एकाच कंपनीने उचलावं. ती प्रॅक्टिकल, असं शक्य नाही यावर काँफिडंट. असंच झालं. दोघं वेगवेगळ्या कंपनीत सिलेक्ट झाले. तो, नाराज. ती या नाराजीतही त्याला आनंद शोधून द्यायचं काम करते. बघ, दोघंही मुंबईतंच आहोत ना, काहींना बँगलोर, चेन्नई, पुणे अशा ठिकाणी पाठवलंय. मग कसे भेटलो असतो आपण? "ती"च्या या युक्तीवादावर "तो"च्या डोक्यात ट्युबलाईट पेटली. किती नीट हिने गोष्टी क्लियर केल्या. अजून छान असती असा विचार करत मन बोलून गेले. "क्यू पेहले ना.... आयी तुम.......", गजनीतलं हे गाणं गुणगुणत मन मोकळं झालं. म्हटलं ना, "तो" फिल्मी होता.

बी.ई संपलं. सुट्ट्यांमधे तर फेसबुकशिवाय पर्याय नव्हता. मग रात्री २ - ३ पर्यंत स्काइपचा योग्य वापर व्हायचा. महिन्यातून एक - दोन भेटी, त्यात एखादा सिनेमा. अपॉइंट्मेंट लेटर्स आले, जॉब चालू झाला.

विकेंडला भेट व्हायची. "ती" दिसली की आठवडाभरचा स्ट्रेस कुठल्या कुठे जायचा. आपला हिला पटवण्याचा निर्णय योग्य होता याची राहून राहून जाणीव व्हायची. "ती" एक एक गोष्ट सांगत बसायची आणि तो तिचे बोलके डोळे, शेजारी बसल्यावर दोघांच्या हाताच्या करंगळीचा एकमेकांना होणाता स्पर्श ह्यात तिचा सहवास शोधायचा. पुढचे सहा दिवस "ती"ला न भेटता राहता यावे यासाठी आठवणी जमवायचा. चौपाटीला बसल्यावर वार्‍याने तिचे केस जेव्हा त्याच्या चेहर्‍यावर यायचेम तेव्हा त्याला खूप छान वाटायचं.. ऊन तेव्हा चांदणं वाटायचं. बोलतांना सतत जेव्हा ती हातानेच केस सावरत कानामागे टाकायची, तो तिच्या या अदेवर स्वतःलाच हरवून बसायचा. तिच्याशी काही गोष्टींवर वाद घालतांना मुद्दाम हरायचा, तिला जिंकल्यासारखं वाटलं की, "तो" ला जग जिंकल्यासारखं वाटायचं.

अशाच एका विकेंडला तो आणि ती भेटले. तो भलताच खुशीत होता. त्याला एवढं खूष पाहून तिच्या चेहर्‍यावर हसू उमटलं. "ती"चा त्याच्यावर एवढा जीव होता की, त्याच्या दु:खाचे अश्रु "ती"च्या डोळ्यातून यायचे, तसंच त्याचा आनंद "ती"च्या ओठांवर.

माझ्याशी लग्न करशील? त्याचा आल्या - आल्या पहिला प्रश्न. ती अचानक आलेल्या प्रश्नाने स्वतःमधेच हरवलेली, पण खूष. ऑफकोर्स म्हणत त्याला उभ्या - उभ्याच एक छोटीशी मिठी देत.

तो, घरी सांगितले आज ४ वर्षे एकत्र आहोत, त्यांनी तुला अ‍ॅक्सेप्ट केलंय. तुझ्या घरी बोलणी करायची तयारी दाखवली आहे. तू घरी काही हिंट दिलीये? "नाही रे, " बाबांची भिती वाटते. Don't know केव्हा सांगेन. तिच्या या उत्तरावर तो किंचीत नाराज. तो दिवस बराचसा अबोलका गेलेला. सुर्य मावळतीला पोहोचला होता.

बरेच विकेंड्स गेले. तो तिच्यासाठी "ती"ला पटेल अशाप्रकारे गोष्टी हँडल करत होता. तुला जमत नसेल तर काळजी करू नकोस, माझे पॅरेंट्स बोलतील तुझ्य घरच्यांशी.
ती "नको". जर बाबांनी तुझा, तुझ्या पॅरेंट्सचा insult केला तर मला खूप guilty वाटेल.
त्या दिवशी मात्र तो खूप नाराज झाला. ती स्वत:हूनपण घरी बोलायला तयार नव्हती. त्याची घुसमट होत होती. "ती" इकडे बाबा तिकडे "तो" अशा अवस्थेत.

हळूहळू विकेंड्स अबोल जाऊ लागलेले.

तो विकेंड वाशीत ठरलेला. तो आला ती नव्हती. तो फोन करत होता. ती उचलत नव्हती. काळजी, टेंशन अशा मिश्र भावनांनी तो गोंधळलेला. स्टेशनमधून गर्दी येतंच होती. तेवढ्यात ती दिसली, तो धावतंच पुढे गेला. उशीर का झाला? कळवायचं तरी. "ती", काही नाही, असंच. तू नको टेंशन घेत जाऊस. तिच्या या तुटक उत्तरावर तो निशब्द......

असं का बोलते ही? एकदम तोडून. भांडून आली असेल बहुतेक, मूड खराब आहे. बोलायलापण काही सुचत नाहीये, घरी सांगितलं आहे हा हिने? बर्‍याच अबोल वेळेनंतर त्यानेच विचारलं, " Is everything alright? तू घरी कळवलंस??" ती मानेनेच नकार देत म्हणाली, माझ्यासाठी स्थळं येऊ लागली आहेत. बाबा विचारतात त्याबद्दल, पण माझा धीरच होत नाही सांगायला. माझं ऑफिस सकट सगळं बंद होईल. विकेंड्च्या भेटी सुद्धा. मी नाही सांगू शकणार.

तो, "बरं" मी प्रयत्न करतो.
ती, अजिबात नाही. तू का नाही समजू शकत मला........ मला नाही जमत बोलायला, आणि हे ही सांगू शकत नाही की कधी सांगू शकेन.....

तिच्या भरलेल्या कपातली कॉफी पूर्ण गार झालेली, पण त्याच्या कोकच्या बाटलीला रिकामं ही होता आलं नव्हतं.
बराच वेळ असाच गेला.
"चल निघू" म्हणत त्याने अबोला संपविण्याचा प्रयत्न केला. ती उठली. हॉटेल बाहेरच एका कॉर्नरला चालता चालता थांबली. साहजिकंच "तो" ही.

ती, "माझ्यासाठी तू नेहमी एवढं केलंस, अजून एक करशील प्लीज" ?
तो, "तू विचारतेस का? फक्त बोल. हवं ते करेन. पण तू खूष रहा."

ती, आयुष्य माझंच आहे, पण वेळ माझी अजिबात नाही. आपण पुढे जाऊ शकत नाही. एका मोठ्या पॉजनंतर ती बोलली.
"त्याच्या चेहर्‍यावर ऊन पडलं होतं, मनात विचारांनी थैमान घातलं.हजारो प्रश्न, पण हृदयावर प्रचंड ओझं आल्यासारखं. शब्दच फुटेना तोंडून. जीभ एकदम कोरडी पडली. कर्णकर्कश हॉर्न्स ऐकू येत होते. लगतच्याच रस्त्यावर गुंतागुंतीची ट्रॅफिक लागली होती.
लाल सिग्नल लागला होता आणि तो बदलतंच नव्हता.
बर्‍याच वेळाने त्याने बळ एकटवून "ती"ला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. तेवढ्यात "ती" बोलली, "प्लीज मला काही विचारू नकोस." माझा तुझ्याएवढा जीव कुणावरच नाहीये. मी तुला कितीवेळ होल्डवर ठेऊ? मी चुकीची असेन, i mean आहे पण या घडीला हाच माझा निर्णय आहे.
तो काहीच बोलू शकला नाही. बोलायची शक्तीच जणू गेल्यासारखी.
त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच "ती"च्या समोर अश्रु आले. त्याच्या चेहर्‍यावर पडलेलं ऊन, त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांमुळे तिच्या डोळ्यात चमकून गेलं.
मान खाली घालत ती म्हणाली, "आज तू सोडायलाही येऊ नकोस, मी ट्रेनने जाते एकटी. तू माझ्यामागून जा or बसने जा. काळजी घे तुझी. माझ्यासाठी".
"तु ही", तो बोलला.

त्याचं अश्रुंवरचं नियंत्रण सुटत आलेलं. तिलाही ते कळलं.
"रिक्षा" हाक मारत तिने रिक्षा थांबवली. बसली. "वाशी स्टेशन" एवढंच डोळे पुसत म्हणाली. त्याला काही कळायच्या आत रिक्षाने वळून मार्ग धरला. रिक्षा थांबवयला तो पुढे आला तोच, इकडचा सिग्नल सुटला. पुढे जाताच येईना. झेब्रा क्रॉसिंगचा लाल सिग्नल थांब म्हणाला होता.....

दिवस येणारे गप्पच जात होते. काही दिवसांनी "तो" आणि "ती"ने आपापलं FB अकाऊंट लॉक केलं.
मनं तुटली, तिथेच शब्द आणि संपर्कही.......

बरेच महिने उलटले तिचे लग्न ठरले अर्थात "ती"च्या आई-बाबांच्या संमतीनेच. "तो" तर या सीन मध्येच नाही. दोन दिवस उरलेले. संध्याकाळी गेस्ट्स येणार होते. ती ऑफिसवरून लवकर आली. घरी आली तर तिला धक्काच बसला. "ती"ची आई तिचं कपाट साफ करत होती, आणि तिच्या बाबांच्या हाती "ती"ची ती बॅग होती, ज्यात "ती"च्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर अशा ४ वर्षांच्या आठवणी होत्या.
त्याचे ग्रिटिंग्स, फोटोज, क्लासमधे एकमेकांना लिहिलेली पत्रं, गिफ्ट्स, चॉकलेट्सचे कव्हर्स एकूण-एक.

ते पाहताच ती थरथर कापू लागली. घरात एक पाय टाकताच, तशीच तिच्या बाबांना बोलली, I Am Sorry बाबा, तुमच्या उपरोक्ष मी हे केलं. पण तसं आता काहीच नाहीये.

बाबा नजरेला नजर देऊन फक्त बघत होते. "ती"ला मात्र त्यांच्या रागाचा चढता पाराच जाणवत होता.

होता तो चांगला. ४ वर्ष सगळंच नीट होतं. But i know तुम्हाला पटणार नाही म्हणून ६ महिन्यांपूर्वीच मीच त्या रिलेशनशीपला फुलस्टॉप दिलाय. I Am Sorry की मी असं केलं but believe me तुम्ही जिथे ठरवलंय, तिथेच लग्न करेन, मी नाही तुमच्या शब्दाबाहेर.

"ती" रडायला लागली. भितीने ओठ पांढरेफटक पडलेले... पुढे शब्दंच फुटेना तेव्हा रडता रडता श्वास अडकून दम लागला.

"ती"चे बाबा आत गेले. पाण्याचा ग्लास तिला देत शांत हो एवढंच बोलले.

भेदरलेल्या नजरेने ती बाबांकडे पाहत होती. आईलापण काही सुचेना झालेले. पाहुणे यायची वेळ जवळ येत होती. मुलाकडच्या मंडळींनी तिचे दागिने, शालू इतर गोष्टी तयार केलेल्या.

"ती"चं रडणं शांत झालेलं. "ती"च्या बाबांनी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवत फक्त एक वाक्य बोलले,
"एकदा सांगून बघायचं होतं बेटा, तुझे बाबा एवढेपण वाईट नाहीयेत. तुझ्या आनंदात माझा आनंद सापडलाच असता ना............. सगळं का संपवलंस?"

हे ऐकून तिच्या अश्रुंचा बांध परत फुटला होता.....
ज्याचा अर्थातच काही उपयोग नव्हता.

"तो" ह्या सिनमध्ये कुठेच नव्हता आणि आता कधीच येणार पण नव्हता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही आवडली..
(फुलवलीयेत चांगली अन त्यामुळे नकळत गुंतल्या गेले कथेत म्हणून )

पु.ले.शु. Happy

चार वर्षात जी 'तो' ला ओळ्खू शकली ती वडीलांना का नाही ओळखू शकली??????????
पण चांगली लिहीली आहे. पुलेशु

पुढचा भाग लिही
आई वडिल नेहमीच आपल्या मुलांना समजुन घेतात
फक्त तसा संवाद हवा
मी जर "ती" च्या जागी असते तर माझ्या घरी अशी वेळ कधीच आली नसती
प्लिज शेवट सुखाचा कर Happy
फिल्मी वाटला तरी चालेल Happy
बाकी कथा मस्तच जमलीये Happy

मला आवडली... छोटे छोटे प्रसंग छान रंगवलेत.
तरीही प्रश्नं आहेच की...(आई-)वडिलांविषयी ती इतकी अनभिज्ञ का?
स्टाईल खास आहे कथा खुलवण्याची... लिही गं... खूप लिही.

मस्त लिहिली आहे. पण पटली नाही. आय मीन- ती घरी काहीच सांगत नाही- ते का? कास्ट वेगळ्या होत्या? का इतर काही कारण?