दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते! ( तरही)

Submitted by सुचेता जोशी on 3 August, 2012 - 02:01

व्यक्त थोडेसे तरी अव्यक्त थोडे राहते..
दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते!

वर्ष, महिने, तारखा येतात अन जातातही...
काय कोणावाचुनी येथे कुणाचे आडते ?

हे धमाके, खून-दंगे, जाळ-पोळी रोजच्या...
आज स्वातंत्र्यातही भीती उद्याची ग्रासते

'पूर्ण नव्हते व्हायचे तर का मनी डोकावती?'
भूतकाळातील स्वप्नांना जरा खडसावते

ऊन, वारा, पावसाची ना तमा काही हिला...
बारमाही चंचला मदमस्त फांदी डोलते

( देवपूरकर सरांच्या मिस-याने प्रभावित होऊन गझलेतील पहिला प्रयत्न,
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावॅ.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तांत्रिक बाबी - 'आडते' हे अडते या शब्दाचे भ्रष्ट रूप आहे. 'थांबते' हा शब्द घेतला तर ती सूट घ्यावी लागणार नाही.

'मांत्रिक' -

मतल्यातील दोन्ही ओळी स्वतंत्रपणे छान आहेत. पण पहिल्या ओळीवरून दुसर्‍या ओळीवर सुलभपणे जाता येत नाही. (म्हणजे प्रभावी समारोप होताना दिसत नाही). व्यक्त, अव्यक्त याच्याशी मिळतीजुळती संकल्पना दुसर्‍या ओळीत घेतली असतीत तर छान झाले असते.

>>>व्यक्त थोडेसे तरी अव्यक्त थोडे राहते..
दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते!<<<

हा मतला जर असा केला तर प्रभावी समारोप होऊ शकेल. (अर्थात प्रोफेसरांच्या मिसर्‍याला मग जागा उरणार नाही हे खरे)

व्यक्त झालेही तरी अव्यक्त थोडे राहते
अर्थ शब्दांनाच येथे ... कोण डोळे वाचते

काही ना काही कारणाने, शेर बदलावेसे वाटले म्हणून बदलून देत आहे. कृपया गैरसमज नसावा. ही सुधारणा अथवा सल्ला नसून निव्वळ तुम्ही विचारलेत म्हणून मनातले लिहीत आहे.

वर्ष, महिने, तारखा येतात अन जातातही...
काय कोणावाचुनी येथे कुणाचे आडते ? <<<

वर्ष, महिने, तारखा हे मोठ्या काळाकडून लहान काळाकडे येणे झाले, जे या शेरापुरते उलटे वाटत आहे.

शेर सपाट झाला आहे. (म्हणजे सरळ सरळ आपले काहीतरी सांगितल्यासारखा)

लोक काळाच्या प्रवाहातील थेंबांसारखे
थांबले कोणी कुणासाठी कधी ना पाहते

हे धमाके, खून-दंगे, जाळ-पोळी रोजच्या...
आज स्वातंत्र्यातही भीती उद्याची ग्रासते<<<

एकंदर गझलेच्या मूडहून वेगळा शेर आहे. (अर्थात, गझलतंत्रानुसार योग्यच आहे). (धमाके हा हिंदी शब्द आहे. स्फोट वापरता यावा असे वाटते).

'पूर्ण नव्हते व्हायचे तर का मनी डोकावते?'
भूतकाळातील स्वप्नांना जरा खडसावते<<<

डोकावते हे रूप 'स्वप्नांना' या अनेकवचनाला योग्य नाही. 'डोकावता' असे केल्यास योग्य होईल. (तसेही , शेर स्वप्नांना उद्देशून असताना ती ' जायचे होतेच तर तू यायचे नव्हतेस न' ही स्त्रीलिंगाला उद्देशून ओळ कशी काय बसली असती?) (असो).

दुसर्‍या ओळीतील 'जरा' ऐवजी 'सदा' या शब्दाने 'जरा' मधील भरतीपणा किंचित कमी व्हावा.

हा शेर एकंदर छान आहे. पण अधिक गोटीबंद व्हावा असे वाटते. (तसेच, अधिक खोलही व्हावा, असेही वाटते).

ऊन, वारा, पावसाची ना तमा काही हिला...
बारमाही चंचला मदमस्त फांदी डोलते

काही हिला - अशा शब्दांमध्ये 'ही' व 'हि' अशा अक्षरांचे जोडून येणे काही वेळा अस्पष्ट उच्चारांस कारणीभूत ठरू शकते. (हीपेक्षा इतर अक्षरांना अधिक लागू) त्यामुळे 'ना हिला काही तमा' असे अधिक उच्चारसुलभ व्हावे.

दुसरी ओळ काव्यसुंदर असली तरी बारमाही, चंचला व मदमस्त ही निव्वळ विशेषणे झाली. पहिल्या ओळीची उंची गाठली जात नाही. (अर्थात, लाईव्ह मुशायर्‍यांत असल्यांच ओळींना टाळ्या मिळतील, पण गझलकाराने स्वतः अधिक विचार करायला हवा असे मला वाटते).

(यात 'चंचला' हे आपले उपनाम तर नाही ना? तसे असल्यास अधिक छान वाटले असते)

ऊन वारा पावसाची बाळगावी का तमा
जी स्वतःच्या मोसमांनी या जगाला सुखवते - असे एक मला सुचले.

(बाकी चंचला हे उपनाम मस्त होईल) (हे अवांतर)

एकंदर शुभेच्छा

-'बेफिकीर'!

बापरे इतक्या पटकन इतक सार सुचत असत गझलेत?

मी ३ दिवस करत होते ही गझल....

एकदंरीत गझल हे काही आपल क्षेत्र नाही बुवा....पळ काढलेलाच बरा इथून Sad

खूप खूप आभार आपले अगदी मनापासून.

अहो तुम्ही ज्यांच्याकडून प्रेरणा घेतलीत ते प्रोफेसर बावीस बावीस वर्षे एक एक शेर करतात आणि थांबतात.

मी केव्हाच इथून पळ काढलेला आहे. तुम्ही काढलात तरी हरकत नाही.

धागा तुम्हाला फक्त अप्रकाशित करता येतो. उडवण्यासाठी त्यात काही धार्मिक वगैरे असावे लागते. तुमच्या गझलेत तसा एकच शेर आहे, तोही जनरल शेर आहे. जरा वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर एक शेर करून त्याची रिक्षा कशी फिरवायची ही बॅन झालेल्या आय डींना विचारा. मग धागा आपसूक उडेल.