दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते!

Submitted by सतीश देवपूरकर on 1 August, 2012 - 10:53

गझल
दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते!
त्यातही जो हासतो, त्यालाच जगणे साधते!!

शोक गेलेल्या क्षणांचा, वा उद्याची काळजी;
वर्तमानाला ग्रहण दोन्ही प्रकारे लागते!

लाभली सौंदर्यदृष्टी माणसाचे भाग्य हे!
पाहिले निरखून तर, हे विश्व सुंदर वाटते!!

मार्ग आपोआप मिळतो, फक्त श्रद्धा पाहिजे!
दाट काळोखात सुद्धा, वाट श्रद्धा काढते!!

भंगते धरणी, कधी आभाळ सुद्धा फाटते;
प्रेम हा रेशीम धागा सर्व काही जोडते!

ईश्वरी अस्तिव असते दोन व्यक्तींच्यामधे;
ईश्वरी होता कृपा नाते जिवाचे जन्मते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळी नक्कीच आहे ही गझल सर आपली..!!!
आवडली

प्रेम हा रेशीम धागा सर्व काही जोडते! >>>>
भाषिक / व्याकरणशुद्धतेच्या दृष्टीने ही ओळ खटकते आहे असे वाटले
मी ती अशी वाचली ..............

प्रेम हे 'रेशीम-नाते' सर्व काही जोडते

कणखरजी वेळ लागणारच जर ते बेफीन्सारखी गझल करायला शिकत असावेत अजून तर ...........!

सन्दर्भः 'बेफिकिर'गझलेत प्रोफेसर असावे लागते
तात्पर्यः या वरील सन्दर्भित ओळीच्या 'चाली'त प्रो. साहेबान्ची ही प्रस्तुत गझल वाचावी !!

वैवकुजी!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
“प्रेम हा रेशीम धागा सर्व काही जोडते!”
मला तरी ही ओळ भाषिक वा व्याकराणीय दृष्ट्या सदोष वाटत नाही वा कानाला खटकतही नाही.
खुलासा करतो का ते..........
वरील ओळ गद्यात अशी लिहिता येईल..............
प्रेम हा (एक) रेशीम धागा (आहे) जो, सर्व काही (म्हणजे जे फाटले वा भंगले आहे) ते जोडते.
काय खटकते इथे?

इथे भंगणे, फाटणे उला मिस-यात आल्याने सांधण्यासाठी वा शिवण्यासाठी “धागा”
या शब्दाची योजना सानी मिस-यात केली आहे.
धागा (पु) म्हणून हा धागा!
काय जोडते?.........सर्व काही जोडते........जे काही भंगते, जे काही फाटते ते जोडते. इथे जोडतेचा संबंध काय जोडतेशी आहे, कोण जोडतेशी नाही.
म्हणून “जोडते” हा काफिया मला या शेरात सुयोग्य व निर्दोष वाटत आहे.

टीप: मला माझा पिंड, माझी तबीयत कळते.
मला तूर्तास तरी कुणासारखेही व्हायची गरज वाटत नाही.
जो मी जसा आहे तसा मजेत आहे.
कुढणे, झुरणे, जळणे, हांजी हांजी करणे माझ्या स्वभावात नाही.

जाता जाता एक शेर देतो..........

घोटाळता न आले मज, भोवती कुणाच्या;
माझ्याशिवाय बाकी सारे हुशार होते!

मला वाटते माझे म्हणणे आपल्या पर्यंत पोचले असावे, तेव्हा इथेच थांबतो!
.........प्रा.सतीश देवपूरकर
अवांतर..........आपण लिहिलेला संदर्भ, तात्पर्य वगैरे मला तरी असंबद्ध व बाष्कळ वाटत आहे.
.................................................................................................

विजयराव!
प्रांजळ प्रतिसादाबबद्दल धन्यवाद!
बिनउपदेशपर, चमकदार अभिव्यक्तीची, हेच काफिये वापरून अधिक मौज आणणारी गझल आपण रचलीत तर मला वाचायला आवडेल!
...........प्रा.सतीश देवपूरकर

विजयराव!
न ठरवता आपोआप जर अशी गझल (कोणतेही काफिये, कोणताही रदीफ, कोणतेही वृत्त, कोणताही आशय असलेली) झाली तर जरूर कळवा. आस्वाद घ्यायला आवडेल!
गझल बिनउपदेशपर, चमकदार व अधिक मौज आणणारी असावी!
..........प्रा.सतीश देवपूरकर
अवांतर:
विजयराव! आता पोस्ट केलेल्या माझ्या गझला माझ्या नावावरील लेखन या शब्दावर क्लिक केल्याशिवाय दिसत नाहीत का? मी गुलमोहर गझल ग्रुपचा मेंबर झालो आहे. शिवाय मी माझे सर्व लिखाण सार्वजनीक असे करतो(क्लिक करून).
कृपया मार्गदर्शन कराल काय? आता जो बदल झालेला आहे गुलमोहरमधे तो मला समजून सांगाल काय?
.........प्रा.सतीश देवपूरकर

समजून सांगाल काय?>>> 'समजावून ' असे हवे सर !!

_______________________________________________

प्रेम हा रेशीम धागा सर्व काही जोडते! >>>>
भाषिक / व्याकरणशुद्धतेच्या दृष्टीने ही ओळ खटकते आहे असे वाटले

खुलासा करतो ;का ते .........

१) मुळात 'रेशीम धागा' हा एकसंध शब्द 'रेशीमधागा' असा आहे ( आपण डिक्शनरीत तपासू शकता )

२) अशावेळी क्रियापादाचे रूप 'जोडतो' असे हवे रेशीमधागा ..'हा' ..पुल्लिंगी आहे म्हणून !
<<<<<<<<< प्रेम हा रेशीम धागा सर्वकाही जोडतो

३) आपण दिलेला अन्वय भलताच बालिश आहे समोर घास दिसत असताना सरळ सरळ तोंडात घालण्याऐवजी घास उजव्या हातात घेवून मग उजवा हात डाव्या कानामागून फिरवून घास खाल्ल्यासारखे वाटते !!
त्यातही गफलत झाली आहेच ...कंस चुकीच्या पद्धतीनी मांडला गेलाय ..कसा तो पहा .....

(म्हणजे जे फाटले वा भंगले आहे) ते जोडते .......
ऐवजी
(म्हणजे जे फाटले वा भंगले आहे ते ...)..जोडते >>.असे'च' हवे सर !!
केवळ जोडते हे क्रियापदाचे स्वरूप कसे बरोबर आहे हे सांगायला म्हणून , ते हा शब्द कंसाबाहेर लिहिणे हा आपल्या सारख्या जेष्ठ / ज्ञानी व्यक्तीने अब्रू वाचावायसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न वाटतो सर असे प्लीज करू नये .(तुम्हाला माझी शपथ !!)

४)(म्हणजे जे फाटले वा भंगले आहे ते )जोडते .....असा अन्वय लावल्यास देखील क्रियापद चुकतेच आहे
प्रेम हा 'रेशीमधागा' (प्रेमरूपी/'प्रेमाचा हा' ... रेशीमधागा)हा कर्ता आहे जो सर्व काही जोडतो असे वक्तव्य करायचे आहे आपणास हो ना ?

५)जोडते ही शब्दरचना कवाफी साठी अनिवार्य आहे
त्यासाठी उपमा /तिचे लिंग जे मूळ रचनेत पु. आहे ते स्त्री . /न .करावे लागेल
रेशीमधागा (पु) चे रेशीमनाते (न.) करता येते ..

अशाने रचना अधिक प्रासादिक होते आहे सौन्दर्यबोधाच्या दृष्टीनेही हे सरस आहे .

असो
त्यासाठी 'प्रेम हा ...' अशी सुरुवात बदलून' प्रेम हे ..'असे करावे लागेल .मग ही ओळ अशी होते आहे

प्रेम हे रेशीमनाते (रेशीम-नाते)...सर्व काही जोडते !!

६) वरील सर्व मुद्दे न पटल्यास आपण शेवटचा उपाय करून पाहू शकता

हे प्रेम , रेशीम (...आणि... ) धागा , सर्वकाही जोडते >>>>असा अन्वय काढा !!

म्हणजे त्याकरिता फक्त, 'हा' ऐवजी "हे" एवढास्साच बदल करावा लागेल सर तुम्हाला (भले अशाने 'हे' हा भरीचा शब्द का वाटेना !!)

प्रेम हे ; रेशीम + धागा , सर्वकाही जोडते !!

धन्यवाद !!

टीप :
वैभवा 'पर्यायित्' प्रोफेसर असावे लागते

संदर्भ : बेफिकीर गझलेत प्रोफेसर असावे लागते

होप्स.......इथेतरी आपणास संदर्भ असंबद्ध व बाष्कळ वाटू नये हीच विठ्ठलचरणी प्रार्थना ।!!

उत्तर जरूर सांगावे
प्रतीक्षा करतो
आपला प्रिय एकलव्य (पर्यायी अर्जुन)
वैवकु

'प्रेम हा रेशीम धागा सर्व काही जोडते! >>>>
भाषिक / व्याकरणशुद्धतेच्या दृष्टीने ही ओळ खटकते आहे असे वाटले.'

वैभव, आज रक्षा-बंधन, त्या संदर्भात
' रेशमाचे प्रेम-बंधन सर्व काही जोडते..'
असे सुचवावेसे वाटले..

प्रोफेसरसाहेब, गझल आवडली.