निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता गुरुदत्त

Submitted by अशोक. on 1 August, 2012 - 05:56

गुरुदत्त भाग-१

(क्षमस्व : पहिल्या भागानंतर साधारणतः एका आठवड्याच्या आत दुसरा भाग देणे अपेक्षित असते. गुरुदत्तवरील हा आज देत असलेला दुसरा भाग जवळपास तयारही होताच; पण मध्येच राजेश खन्नाच्या मृत्युने करोडो रसिकांना जो धक्का दिला त्याचे पडसाद सार्‍या देशातच नव्हे तर परदेशातही उमटले आणि मग आंतरजालीय दुनियेच्या चर्चेतही त्याने जवळपास आठदहा दिवस सर्वांच्या डोळ्यातून पाणी काढले, जे त्याच्यावरील प्रेमाचे द्योतकच मानले जावे. त्या दरम्यान चित्रपटसृष्टीच्या अन्य घटकावर वर वाचनही कुणाला नकोसे झाल्याचे जाणवत होते....सबब 'गुरुदत्त भाग-२' ला तात्पुरता विश्राम दिला होता. असो.)

baazi.jpg१. बाझी (१९५१):

१९४८ ते १९५० या काळात देव आनंदने हिंदी चित्रपटसृष्टीत नायक म्हणून चांगलेच पाय रोवले आणि एकीकडे राजकपूर हा जसा सर्वसामान्यांच्या सुखदु:खाचा प्रतिनिधी तर दुसरीकडे दिलीपकुमार भग्न हृदयी आणि गंभीर प्रवृत्तीचा नायक म्हणून गाजण्यास सुरुवात झाली, त्याचवेळी देव आनंदने कॉलेजकुमार आणि कन्यका यांच्यात कमालीची लोकप्रियता मिळविण्यास सुरुवात केली होती. या यशामुळेच त्याने आपला भाऊ चेतन आनंदसमवेत 'नवकेतन' फिल्मकंपनीची स्थापना करून पहिल्या चित्रपटनिर्मितीचीही तयारी केली. पुण्यातील प्रभातमधून बाहेर पडताना आपल्या मित्राला...गुरुदत्तला...दिलेल्या वचनानुसार देव आनंदने नवकेतनच्या 'बाझी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्याच्यावर सोपविली आणि आतापर्यंत ग्यान मुखर्जीचा सहाय्यक म्हणून काम करणार्‍या गुरुदत्तचा 'दिग्दर्शक' म्हणून 'बाझी' तयार होऊ लागला. चित्रपटाच्या नावाप्रमाणे 'जुगार' हे कथानक प्रधान होते आणि बेकारीचे चटके बसलेला एक टॅक्सी ड्रायव्हर - मदन - मित्राच्यासोबतीने अधुनमधून एका जुगारी अड्ड्यावर जात असतो. तिथे त्याची भेट क्लबची कॅबरे डान्सर (गीता बाली) त्याच्या प्रेमात पडते पण मदनला आपल्या क्षयग्रस असलेल्या बहिणीच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक त्या खर्चाची तरतूद प्राधान्याने करणे गरजेचे असल्याने तसेच नोकरी नसल्याने अगदी मनाविरुद्ध 'स्टार क्लब'च्या जुगारी टेबलवर बसतो. विशेष म्हणजे याच क्लबच्या मालकाची डॉक्टर असणारी मुलगी रजनी, मदनच्या बहिणीचे ऑपरेशन करणार असते. रजनीचे काम कल्पना कार्तिकने केले होते....[जी पुढे प्रत्यक्ष जीवनात सौ.देव आनंद बनली]. पुढे हा प्रेमाचा त्रिकोण आणि मग मदनला 'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले...' असे प्रोत्साहन देणारी नीना...तिचा त्या बॉसने खून करणे...तो आळ मदनवर येणे...पुढे खरा खुनी पकडला जाणे, आणि मग त्याच्या बहिणीवर त्या दरम्यान यशस्वी शस्त्रक्रिया करणारी डॉ.रजनी हिने मदनची जेलबाहेर वाट पाहणे...असा सुखान्त.

एक बेकार तरुण, अर्धवेळेचा टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यातही पैशासाठी जुगारही खेळणारा...ही सारी लक्षणे खरेतर सामाजिकदृष्ट्या नायकाची नव्हेत, पण गुरुदत्तने अशारितीने नायकाला सादर केले की त्या वेळेच्या तरुण पिढीला तो असा काही भावला (त्यातही एक सुशिक्षित तरुणी, जी चक्क डॉक्टर आहे, अशा आवारा टाईप तरुणाच्या प्रेमात पडते हेही आमआदमीला सुखावणारी बाब वाटायची. 'लखपती की छोरी' एका भणंगाच्या प्रेमात हे फॉर्मट जबरदस्ट अपीलिंग ठरले होते त्या काळातील कित्येक चित्रपटात) की गुरुदत्त आणि नवकेतन दोघांनाही कमालीची लोकप्रियता लाभली आणि एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून गुरुदत्तची कारकिर्दही "बाझी" पासून सुरू झाली. "टॅक्सी ड्रायव्हर" हे पात्र इतके लोकप्रिय झाले की पुढे चेतन आनंदने देवला घेऊन याच नावाने चित्रपटही निर्माण केला. तोही तितकाच लोकप्रिय ठरला.

पुढेतर टॅक्सी वा कार वा घोडागाडी अशी वाहने गुरुदत्तसाठी 'लकी' शाबीत ठरली की काय असेच वाटावे या रितीने गुरुदत्तने त्यांचा वापर आपल्या चित्रपटातून केला. 'मि.अ‍ॅण्ड मिसेस ५५' मधील नायक-नायिकेचे संवाद कारमध्येच...'आरपार' मध्ये परत टॅक्सी, चालत्या गाडीतच नायिकेने गाणे म्हणत नायकाचा रुसवा दूर करणे, 'साहिब बिवी और गुलाम' मध्ये बग्गीत 'बिवी' चा निर्घृण खून होणे.

"बाझी" चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगसमयी गुरुदत्तची गीता रॉय या बंगाली गायिकेशी चांगलीच ओळख झाली. स्वतः गुरुदत्त उत्कृष्ट बंगाली भाषा बोलत असल्याने मग या ओळखीचे प्रेमातही रुपांतर झाले. पण रॉय फॅमिलीला आपल्या मुलीने बेभरवशाच्या म्हटल्या जाणार्‍या चित्रपटसृष्टीतील एखाद्या युवकाबरोबर विवाह करावा असे वाटत नसल्याने; "बाझी" आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरून आणि गुरुदत्तचे मुंबईत बस्तान बसूनही तो विवाह लागलीच होऊ शकला नाही. तरीही गीता रॉय हिने पुढील दोन वर्षे आपल्या आईवडिलांची मने वळविण्यात घालविली आणि अखेरीस १९५३ मध्ये गीता रॉय गीता दत्त झाली.

वयाच्या १५ व्या वर्षी गीता रॉयने देशात आपल्या आवाजाने कमालीची लोकप्रियता मिळविली होती. "मेरा सुंदर सपना सपना बीत गया" ह्या १९४७ मध्ये आलेल्या 'दो भाई' मधील गाण्यामुळे तिचे नाव सर्व सिनेरसिकांच्या हृदयात बसले होते. त्या घटकेपासून तिची लोकप्रियता इतकी वाढली होती की गुरुदत्तने जाणीवपूर्वक 'बाझी' च्या शूटिंगचा पहिला सीन गीता रॉयच्या आवाजातील 'तदबीर से बिगडे हुई तकदीर बना ले' या गाण्याने केली होती.

'मेरा सुंदर सपना बीत गया...' ह्यातील दर्दभर्‍या भावनेमुळे गुरुदत्त त्या आवाजाकडे ओढला गेला आणि गीताच्या दुर्दैवामुळे त्या गीतातील भाव तिच्या प्रत्यक्ष जीवनातही प्रखरतेने उमटला. या जोडप्याचा संसार चारचौघांसारखा सुरू झाला असेच म्हटले पाहिजे. १९५४ मध्ये प्रथम पुत्र तरुण तर १९५६ मध्ये अरुणचा जन्म झाला तर १९६२ मध्ये नीनाचा जन्म. बाझीची नायिका गीता बाली हिचे पडद्यावर नाव होते 'नीना' आणि गीता बाली ही गुरुदत्त आणि देव आनंद या दोघांचीही अत्यंत खेळकर अशी मैत्रीण होती. खरेतर गीताबाली हिनेच पुढाकार घेऊन गुरुदत्त आणि देव आनंद या दोघांचेही विवाह घडवून आणले होते. त्या मैत्रीची आठवण म्हणून आपल्या मुलीचे नाव गुरुदत्तने 'नीना' असे ठेवले.

Ajaal.jpg२. जाल [१९५२] :
'बाझी' चित्रपटातील सहनायिका कल्पना कार्तिक हिला गुरुदत्तने त्या चित्रपटात योग्य तो न्याय दिला नाही असे नवकेतनचे दुसरे भागीदार चेतन आनंद यांचे मत पडले होते आणि त्यावरून त्यांचा आणि गुरुदत्तचा सेटवर खटकाही उडाला होता. देव आनंदने जरी आपल्या मित्राची बाजू घेऊन त्याच्या मर्जीप्रमाणे चित्रपट तयार केला असला तरीही गुरुदत्तने नवकेतनच्या दुसर्‍या चित्रपटाची जबाबदारी स्वतःकडे न घेता स्वतंत्रपणे चित्रपटनिर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्राला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने आपल्या निर्मितीमध्ये देव आनंद यालाच नायकाची भूमिका दिली. हा चित्रपट होता 'जाल' (जाळे). नायिका अर्थातच दोन्ही मित्रांची लाडकी मैत्रीण गीताबाली होती. गोव्याच्या ख्रिश्चन कम्युनिटीवर आणि तेथील रितीरिवाजावर बेतलेल्या कथेला नायकाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची डूब होती. मुंबईहून गोव्यात मुद्दाम स्थायिक झालेला टोनी [देव आनंद] हा सोन्याचा तस्कर आणि दगाबाज प्रवृत्तीचा असूनही मारिया [गीताबाली] त्याच्या प्रेमात पडते आणि टोनीला ओळखणारी तिची मैत्रीण तिला धोक्याची सूचना देऊनही प्रेमाच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारी मारिया सल्ला न ऐकता टोनीला योग्य मार्गावर कशी आणते, अशी सर्वसाधारण कथा, मग त्यात बाकीचा मसाला होताच. गोव्याच्या सुंदर लोकेशन्सवर थेट तिथे जाऊन चित्रीत केलेला हा खास गोवानीज् टच असलेला चित्रपट. 'गोवा' चांगलाच लोकप्रिय झाला त्या साली. [उत्तर हिंदुस्थानातील सिनेरसिकांना तर 'टोनी, मारिया, लिसा, गोमेझ, सायमन, कार्लो ही ख्रिश्चन नावेच इतकी भावली की त्या भागात त्याकाळी सुरू झालेल्या कित्येक दुकानांना अशी पात्रांची नावे दिली जात होती. उदा. 'टोनी टी हाऊस, मारिया बॅन्गल्स, लिसा सायकल मार्ट]. देव आनंद गीताबाली गीता दत्त हेमंत कुमार एस.डी.बर्मन आणि गुरुदत्त या सर्वांच्या योग्य त्या सहभागाने अगदी हिट ठरला यात नवल नव्हते.

'जाल' मधील हेमंतकुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील "ये रात ये चांदनी फिर कहाँ...सुन जा दिल की दास्ताँ" ही रचना आज ६० वर्षानंतरही ऐकत राहावी अशीच ठरली.

baazi2_630.jpg३ व ४ बाझ आणि आरपार :

"बाझी" आणि "जाल" या लागोपाठच्या दोन्ही चित्रपटांच्या यशाने सुखावलेल्या गुरुदत्तने मग गीताबाली हिच्या थोरल्या बहिणीच्या भागीदारीत एच.जी.फिल्म्सची स्थापना केली आणि 'बाझ' (ससाणा) या चित्रपटाची घोषणा झाली. नायिका अर्थातच गीताबाली होतीच पण देव आनंद या चित्रपटासाठी नायक म्हणून उपलब्ध होऊ शकला नाही, त्याला कारण म्हणजे त्याच दरम्यान त्याची देशात वाढलेली लोकप्रियता आणि मग साहजिकच तारखांचा होऊ शकणारा गोंधळ. गुरुदत्तच्या काहीशा अस्वस्थ तापट स्वभावामुळे तो सेटवर सारे तयार आहेत आणि अमुक एक कलाकार शूटिंगसाठी अजून आलेला नाही हे पाहून संतापत असे. देव आनंद हा तर मित्रच, पण तोही जर दिलेल्या तारखेस वा वेळेत चित्रीकरणास येणार नसेल तर मग त्याला न घेतलेलेच बरे, असा विचार करून मग गुरुदत्तने स्वतःच 'बाझ' चा नायक म्हणून कॅमेर्‍याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

दुर्दैवाने आजही भारतीय चित्रपटप्रेमींना 'दर्यासारंग' वा समुद्रावरील साहससफारी अशा कथानकावरील चित्रपट भावत नाहीत. दुसरीकडे हॉलीवूडमध्ये अशा "सी अ‍ॅडव्हेन्चर्स" सिनेमांना प्रचंड लोकप्रियता लाभत असल्याचे आपण पाहतो. अर्थात त्याला कारण म्हणजे समुद्राशी निगडीत असलेल्या कथानकांना 'स्पेशल इफेक्टस' ची जी साथ लाभते ती हिंदी कलाकृतींना कधीच लाभल्याचा इतिहास नाही. १६ व्या शतकातील चाचेगिरी आणि समुद्रावरील राज्य अशा काहीशा धोपट कथानकावर आधारित पोर्तुगीज परंपरेची छाप असलेल्या चित्रपटाचा नायक गुरुदत्त बिलकुल शोभून दिसला नाही. चित्रपट कोसळणार होताच, तसा तो कोसळलाही. फक्त या चित्रपटामुळे गीता दत्तच्या सल्ल्यावरून गुरुदत्तने ओ.पी.नय्यर याना संगीताची जबाबदारी दिली आणि मग पुढे ओ.पी. आणि गुरुदत्त पक्के दोस्तही बनले. या चित्रपटाचे दुसरे एक वैशिष्ठ्य म्हणजे बद्रुद्दिन काझी या मूळात बेस्टचा कंडक्टर असलेल्या अभिनेत्याच्या नावाचे गुरुदत्तने फिल्मी बारसे केले आणि त्याला नाव दिले "जॉनी वॉकर". गुरुदत्तच्या खास मित्रापैकी एक असलेला जॉनी वॉकर बाझी आणि जाल मध्येही होताच, पण श्रेयनामावलीत 'बद्रुद्दिन काझी' या नावाने. 'बाझ' पासून तो सर्वत्र लोकप्रिय झाला आणि मग 'जॉनी वॉकर' हे घराघरातील असे काही नाव झाले की, पुढे तर चक्क त्याच्या नावाने सिनेमाही निघाला.

baazi3.jpg
मूळचे नागपूरचे असलेले लेखक अब्रार अल्वी या चित्रपटाच्या दरम्यान गुरुदत्तच्या सहवासात आले आणि गुरुदत्त टीमचे कायमचे सदस्यही बनून गेले; आणि बाझच्या अपयशाने खचलेल्या गुरुदत्तला पुन्हा उत्साहित करण्यासाठी अल्वी यानीच कथा लिहिली 'आरपार'; जी 'गुरुदत्त फिल्म्स' ची स्वत:ची अशी पहिली स्वतंत्र निर्मिती ठरली. अब्रार अल्वी याना चित्रपटातील अकृत्रिम, पोशाखी, सरंजामशाहीचे द्योतक असणार्‍या लांबलचक संवादाविषयी अगदी तिटकारा होता. त्याना असे वाटत की चित्रपटातील संवाद ऐकताना प्रेक्षकाला असे वाटत गेले पाहिजे की अरेच्या हे तर मी देखील म्हणू शकतो, माझेच बोल नायक पडद्यावर म्हणत आहे. 'आरपार' चित्रपटाची कथा एका टॅक्सी ड्रायव्हरची नायक कालूची, ज्याने रस्त्यावरील वेगमर्यादा पाळली नाही म्हणून कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचा मालक पुन्हा त्याला टॅक्सी देण्यास नकार देतो. विमनस्क अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर भटकत असताना नायिका निक्की (श्यामा) आपल्या बंद पडलेल्या गाडीशेजारी मदतीसाठी उभी असलेली दिसते. कालू तिची गाडी दुरुस्त करून देतो. पुढे रस्त्यावरील असाच एक बेकार मित्र (जगदीप) याच्या मदतीने तो निक्कीच्या वडिलाच्या मोटार गॅरेजमध्ये तिच्याच शिफारशीवर मॅकॅनिक म्हणून नोकरीस लागतो. निक्की आणि कालूचे प्रेमही त्या दरम्यान फुलू लागते. गॅरेज मालकाला पत्ता लागतो आणि कालूला गचांडी बसते. परत बेकार झालेल्या कालूकडे बॅन्क लुटीसाठी सज्ज झालेल्या एक गॅन्गचे लक्ष जाते आणि लूट पळवून नेण्यासाठी असा एक कुशल ड्रायव्हर त्याना हवाच असल्याने कालूला तसले काम मिळते. कॅबरे डान्सर (शकिला) त्यातील धोके त्याला सांगते आणि त्यातून बाहेर पडण्यास सहाय्यही करते, पण कालू निक्कीला विसरू शकत नाही हे पाहून मत्सरी झालेली ती डान्सर आपल्या साथिदारांच्या मदतीने निक्कीचे अपहरण करते...मग तिची सुटका, आणि शेवट गोड इ.इ. नेहमीचे कथानक....लखपतीची कन्या आणि चहाला महाग असलेला बेकार तरूण...मग दोघांचे मिलन कसे होईल याची चिंता करणारा थिएटरमधील भारावलेला प्रेक्षक. गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील हा चित्रपट गाजलाच अन् त्यातील ओ.पी.नय्यरची सर्वतोमुखी झालेली गाणी..."सुन सुन सुन जालिमा कैसा प्यार कैसी जीत रे..." "हूं अभी मैं जवाँ ऐ दिल...", 'कभी आर कभी पार लागा तीर-ए-नझर"..."मोहब्बत कर लो, जी भर लो, अजी किस ने रोका है, पर बडे गझब की बात है इस मे भि धोका है..." आदी गाणी 'हमेशा जवाँ गीत" गटातीलच आहेत. 'आरपार' च्या अफाट यशात ओपी संगीताचा खर्‍या अर्थाने सिंहाचा वाटा होता.

या चित्रपटात गुरुदत्त दोन सुंदरींनी मागे लागावे असा 'नायक' म्हणून शोभलाही आणि त्याचा नायक म्हणून आपणच पुढील चित्रपटात काम करावे हा निर्धारही पक्का झाला...पुढील चित्रपट होता 'मि. अ‍ॅण्ड मिसेस ५५"..आणि त्याच्यासमोर नायिका म्हणून उभी राहणार होती, शुक्राची चांदणी "मधुबाला".

baazi4.JPG५. "मि.अ‍ॅण्ड मिसेस ५५" ~ आपल्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे म्हणून धडपडणारी एक युरोपिअन युवती त्यासाठी अमेरिकेतील एका बेकार कलाकाराशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते, तेवढ्याच काळापुरते की जोपर्यंत तिला कायद्याने अमेरिकन सिटिझनशिप मिळत नाही तोपर्यंतच. चाळीसच्या दशकातील एका हॉलीवूड सिनेमातील या कल्पनेवर आधारित अब्रार अल्वी यानी त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगसाठी 'मॉडर्न मॅरेज' नावाचे नाटक लिहिले होते. पुढे त्याची प्रत गुरुदत्तच्या वाचनात आल्यावर या कथेला भारतीय बाज देऊन ती पडद्यावर तशाच मौजमजेत आणली तर प्रेक्षकाला नक्कीच भावेल अशी गुरुदत्तची खात्री झाली. आणि मग त्यातून साकारली 'मि.अ‍ॅण्ड मिसेस ५५' चित्रपटाचे कथानक. 'स्त्री ही नेहमी स्वतंत्रच राहिली पाहिजे, तिने पुरुषाची गुलामगिरी पत्करता कामा नये...' असा आधुनिक विचार करणारी सितादेवी (ललिता पवार) आपल्या गर्भश्रीमंत कैलासवासी भावाच्या मुलीने अनिताने लग्न न करताच राहावे याचा प्रयत्न करीत असते. अनिता (मधुबाला) एका टेनिसपटूच्या प्रेमात आहे, पण तो तिच्यापेक्षा विंबल्डन महत्वाचे मानत असल्याने तिला कसे झिडकारायचे या प्रयत्नात असतानाच तो जॉनी वॉकरची मदत घेतो आणि पुढे अजाणतेपणी अनिता आणि प्रीतम (एक धडपडणारा कार्टून चित्रकार...गुरुदत्त) एकमेकाच्या प्रेमात पडतात; पण ज्यावेळी सितादेवीला कळते की आपल्या स्वर्गीय बंधूने आपली ७० लाखाची इस्टेट अनिताच्या नावावर या अटीवर ठेवली आहे की तिने वयाची २१ वर्षे पूर्ण होताच विवाह केला पाहिजे अन्यथा ती सारी इस्टेट अनाथाश्रमाला दिली जाईल. इतका पैसा हातचा जाणार म्हणून धास्तावलेल्या सितादेवी 'भाड्याने जावई' आणण्याचे ठरवितात, तो नेमका मिळतो प्रीतम. सुरुवातीला असले काम करणे अपमानास्पद असल्याने प्रीतम नकार देतोच, पण त्या बंगल्यातील अनिताच्या फोटोकडे लक्ष जाताच त्याला समजते की हीच ती जिच्या प्रेमात आपण पडलो आहोत (दोघांची टेनिस कोर्ट आणि थिएटरमध्ये भेट झालेली असतेच). तो होकार देतो, पण तो पर्यंत त्याला एक सज्जन समजणारी अनिता, प्रीतमने पैशासाठी आपल्याशी 'कॉन्ट्रॅक्ट मॅरेज' केले आहे हे समजल्यावर त्याचा द्वेष तिरस्कार करायला सुरुवात करते, पण प्रीतम आशा न सोडता तिला आपल्या प्रेमानेच कसे जिंकायचे ते ठरवितो आणि त्यात तो यशस्वीही होतो, हे सांगणारी ही हलकीफुलकी कथा. मधुबाला यात नायिका म्हणून अशी काही खुलली आणि देखणेपणाने वावरली तिला तोड नव्हती.

मधुबालेच्या सौंदर्याला साजेशीच अशी गाणी ओ.पी.नय्यर यानी या चित्रपटासाठी दिली. "ठंडी हवा काली घटा आ ही गयी झुमके" हे गीतादत्तचे, "जाने कहाँ मेरा जिगर गया जी.." हे जॉनी वॉकर आणि नूर वर चित्रीत झालेले मजेशीर गाणे (ह्या नूर अभिनेत्रीशीच जॉनी वॉकरने विवाह केला), गुरुदत्तच्या तोंडी असलेले "दिलपर हुवा ऐसा जादू तबियत निखर गई...", गुरुदत्त मधुबाला जोडीचे "चल दिये बंदा नवाझ..." हे खेळकर गाणे...सारी मधुर. पण या सर्वावर कडी करणारे ठरले ते गीतादत्तचे 'प्रीतम आन मिलो...प्रीतम आन मिलो...दुखिया जिया बुलाये, प्रीतम आन मिलो". मुळात सी.एच.आत्मा याने गायलेल्या या सोलो गीताने ओ.पी.नय्यरला सिनेसृष्टीत नाव तर मिळवून दिले होते पण काम नाही. पुढे गुरुदत्तच्या टीममध्ये सामील झाल्यावर नय्यरना प्रसिद्धी लाभली आणि मग 'मी. अ‍ॅण्ड मिसेस ५५' साठी त्यानी पुन्हा एकदा हेच 'प्रीतम...' गीत गीतादत्तच्या आवाजात सादर केले, जे मधुबालेच्या भूमिकेशी एकदम तंतोतंत जुळले.

या चित्रपटाच्या आर्थिक यशाने सुखावलेला गुरुदत्त आता हलक्याफुलक्या कथानकाकडून गंभीर वाटू शकणार्‍या कथांकडे लक्ष देणार होता आणि त्यासाठी त्याला हवा होता एक असा चेहरा की जो गीताबाली आणि मधुबालासारखा प्रसिद्ध नाही, पण गुरुदत्तच्या सहवासात त्या चेहर्‍याला भरपूर प्रसिद्धी मिळत राहील. त्याने मग अशा नायिकेचा शोध सुरू केला...अन् ती त्याला मिळाली ते मुंबई दिल्ली कलकत्यात नव्हे तर हैद्राबादमध्ये...नाव होते "वहिदा रेहमान", जी पुढे बनणार होती त्याच्यासाठी 'गुलाबो, शांती, जमीला, जब्बाँ...' आणि जिच्यामुळे त्याचे व्यक्तिगत जीवनही उध्वस्त होणार होते...झालेही.

AWaheeda.jpg
(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहीतीपूर्ण आणि छान लेख, गुरुदत्त यांच्याबद्दल बरिच नविन माहीती मिळाली.
पु.भा.प्र.

धन्यवाद..

मामा
लेख प्रकाशित केलाय असं तिथे उल्लेख आला, आणि शोधुन पहिल्यांदा तो वाचून काढला... अप्रतिम झालाय लेख.
मि. &मिसेस ५५ पाहिलाय मी. गाणी अतिशय सुरेख आहेत.
खूप सुंदर लेख आहे ... प्रचंड आवडला..

थॅन्क्स विजयराव.....दिपाली.....दक्षिणा...झकासराव

आज १ ऑगस्ट पासून 'गुलमोहर' विभागाची रचना बदलली असल्याने तिथे लेख लिहिणे वा वाचणे काहीसे अडचणीचे झाले आहे असे वाटते. काहीना हा लेख दिसतो तर काहीना नाही.

तरीही तुम्हाला दिसल्यानंतर, तो वाचून छान प्रतिक्रियाही दिली त्याबद्दल आभारी आहे.

...आणि होय दक्षिणा...'मि. अ‍ॅण्ड मिसेस ५५' हा सर्वार्थाने कधीही न कोमेजून जाणारा एक हिंदी चित्रपट असून यामधील मधुबाला खर्‍या अर्थाने अल्लड युवती वाटते. "मला सोडून तो नालायक टेनिसपटू विम्बल्डनला गेला...त्याचे वाटोळे होवो' म्हणत त्याच्या नावाने बोटे मोडणारी मधुबाला एकदम झकासच.

अशोकसर हा लेख तुम्ही "सार्वजनिक" करा म्हणजे सर्वांना तो दिसेल, सध्या हा लेख "फक्त ग्रूप सभासदांसाठी" आहे म्हणून तो इतरांना दिसत नाही.

धन्यवाद....

अरेच्या ? व्हॉट डज दॅट मीन, विजयराव ? आणि ते 'सार्वजनिक' करायचे म्हणजे काय करावे लागते, तेही सांगून टाका.

तसा मी या नेट तंत्रज्ञानात अजून केजीचाच विद्यार्थी आहे.

सहीच्...........मामा लै भारी जमलाय हा लेख्.........छान माहीती मिळालीया वाचुन्.........आणि प्रचि तर भारीच....... Happy

जिओ मामा जिओ.......... Happy

अशोकराव - तुमचे सर्व लेख असले भारी असतात की एकदा वाचायला सुरवात केली की शेवट येईपर्यंत थांबताच येत नाही - त्यात गुरुदत्तवरचा लेख म्हटल्यावर अधाशासारखाच वाचला - सॉल्लीड जमलाय लेख, त्या जमान्यातले इतके बारकावे देता तुम्ही की क्षणभर आपण त्याच काळात वावरतोय असे वाटू लागते..... लेखणीत जादू आहे तुमच्या...

@विजय आंग्रे
मी कुठल्याही ग्रुपचा सभासद (कसे व्हायचे अजून तरी समजले नाही) झालो नाही तरी मला ते दिसले. कि मला प्रशासकांनीच अंदाजाने यात टाकले कोण जाणे.
@अशोक
पहिला भाग वाचला होताच. आपला या बाबतीतील अभ्यास आणि माहितीचा अवाका जबरदस्त म्हणावा लागेल. त्याशिवाय लेखांचा आराखडाही अतिशय नीटनेटका आणि प्रमाणबद्ध असतो. योग्य ठिकाणी टाकलेली प्रकाशचित्रे लेखाचे आकर्षणच. लेखाचा तपशील तर दर्जेदार आणि खिळवून ठेवणारा.

हार्दिक धन्यवाद!

मामा भारीच जमलाय लेख.
लेखणीत जादू आहे तुमच्या...>>>>>>अनुमोदन.
इतक्या सगळ्या चित्रपटांविषयी लिहुन पण कुठे फापट्पसारा होउ दिलेला नाही तुम्ही.
सह्ही........:)

मामा लेखनाच्या संपादनात जा,
लेखाच्या शेवटी सगळ्यात खाली गृप असं दिसेल त्याखाली सार्वजनिक असं आहे तिथे क्लिक करा.. म्हणजे लेख सार्वजनिक होईल.

अशोकराव, दणदणीत लेख. सॉलिड जमलाय. फोटोही एकापेक्षा एक आहेत. यातला 'बाझ' सोडला तर बाकी सिनेमे पाहीलेत. तोही लवकरच पाहीन. गुरुदत्तचा मी पंखा आहेच. तुमच्या कृपेने माझे त्यांच्या एसीत रुपांतर होईल. आता तिसर्‍या भागासाठी दवंडी पिटायला लावू नका म्हणजे मिळवलं. Happy

मोहन की मीरा, योगुली, जगावेगळी, आबासाहेब...
धन्यवाद, उत्साह वाढविण्यासाठी देत असलेल्या प्रतिक्रियांबद्दल.

@ शशांक पुरंदरे ~ मागे एकदा आपले सदस्य श्री.दिनेशदा म्हणाले होते की गुरुदत्तच्या प्रत्येक चित्रपटावर स्वतंत्र धागा निघू शकतो. नेमकी हीच माझी स्थिती झाली. असे दिसू लागले की एकट्या "बाझी" वरच माझ्याकडून चक्क दोन पाने भरतील एवढा मजकूर लिहिला गेला आहे...मग विस्तार भयास्तव थांबलो. इतकी विलक्षण प्रतिभा होती त्या कलाकाराकडे.

"प्यासा" आणि "कागझ के फूल" साठी स्वतंत्र धागा होईलच.

@ मी-भास्कर ~ मी त्या काळातच वाढलो असल्याने अगदी थिएटरमध्येच बसून लिहितो आहे की काय असेच वाटत होते. फार हळव्या आठवणी आहेत त्या काळातील सार्‍याच अशा मनस्वी कलाकारांबाबत. लिहून झाल्यावर 'एडिटिंग' करणेही अगदी जीवावर येते, इतकी मी त्यांच्या जीवनात गुंतून जातो. पण एखाद्या लेखाने इथली किती जागा घ्यावी ही मर्यादाही सांभाळणे गरजेचे असते.

@ दिनेशदा ~ कबूल करायला हरकत नाही; पण मला लेख लिहायला जितके जमते तितके हे फोटो त्या त्या ठिकाणी कसे द्यायचे याचे तंत्र अजून तितकेसे जमलेले नाही. दक्षिणा हिची शिकवणी लावली आहे. बघू मॅडम किती शिकवितात.

@ कौतुक शिरोडकर ~ आय अ‍ॅग्री. काहीसा वेळ झाला या दुसर्‍या भागाला. हेही पटते की पहिला भाग मनी गुंजत असतानाच दुसरा भाग पटलावर यावा. पण सुरुवातीलाच केलेल्या 'राजेश खन्ना' खुलाश्यानुसार जाणीवपूर्वक लेख बाजूला ठेवला होता. तुमचे रुपांतर 'एसी' त करायला मला नक्कीच भावेल.

अशोक पाटील

गुरुदत्तच्या प्रत्येक चित्रपटावर स्वतंत्र धागा निघू शकतो. नेमकी हीच माझी स्थिती झाली. >>>>> अशोकराव येऊ द्यात की मग - इथे अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांना हे सर्व वाचायला आवडेलच....
जरुर यावर विचार करुन लिहिण्याचे करावेच ही आग्रहाची, प्रेमळ विनंती......

अरेच्या रैना.....हे 'गाथा' काय प्रकरण आहे ? आत्ताच तुम्ही लिहिलेले वाचले, दक्षिणाच्या प्रतिक्रियेनंतर.

अशोकजी,

गुरुदत्त वरचा लेख सुंदर आहे. 'आरपार ' चा उल्लेख झाला म्हणून एक आठवण ....

ओ.पी.नय्यर ह्याने आधी संगीत दिलेले चित्रपट चालले नव्हते आणि त्याचे गुरुदत्त कडे राहिलेले पैसे गुरुदत्त देवू शकत नव्हता. ओ.पी. चे नुकतेच लग्न झालेले होते आणि संसार चालवणे त्याला अशक्य झाले होते म्हणून तो बायकोला घेवून परत गावी निघाला होता. शेवटचे गुरु ला भेटायला म्हणून तो बायकोला गाडीत बसवुन त्याच्या घरी जातो आणि त्याला सांगतो की माझे पैसे संपले आहेत मी गावी चाललो. गुरूला वाईट वाटते, तो थोडा वेळ विचार करतो आणि त्याला थोडे रुपये देवून नवीन चित्रपटाचा करार करतो आणि त्याला मुंबईत थांबायला सांगतो. तो चित्रपट व त्याचे संगीत सुपर डुपर हिट होते, तो चित्रपट म्हणजे - 'आरपार'.

ह्या चित्रपटातूनच जगदीप ची कारकीर्द सुरु होते.

धन्यवाद सर्वांना.

@ किरण ~ "क्रमशः" होणे अपरिहार्यच आहे, इतकी माहिती देता येते लेख लिहिण्यास चालू केल्याक्षणी, की विस्तार भयास्तव कुठेतरी 'ब्रेक' घेणे फार गरजेचे असते. त्यातही गुरुदत्तचे भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात माईल स्टोन म्हणावे अशा "प्यासा" आणि "कागझ के फूल" याना एका पॅराग्राफमध्ये बसविणे फार अन्यायाचे होईल. किमान त्यांच्यासाठी तरी क्रमशः स्वीकारले जावे.

@ योगी ~ होय. ओ.पी.नय्यर यांचा हाच नव्हे तर चित्रपट जगतातील त्यांच्या अनुभवावरील अनेक किस्से आम्ही थेट त्यांच्या तोंडूनच इथे कोल्हापूरात ऐकले होते. "बाझ" या गुरुदत्त यांच्या चित्रपटापासून त्यांची संगीत दिग्दर्शकाची कारकिर्द सुरू झाली होती. त्यामध्ये तलत मेहमूदच्या आवाजात गुरुदत्तसाठी एक गाणेही रेकॉर्ड केले, जे गुरुदत्तसाठी एकमेव ठरले; अन्यथा पूर्ण सिने कारकिर्दीत रफींच्याच आवाजात त्यांची सारी गाणी आहेत.

'बाझ' चालला तरच कामाचे पैसे असे ठरले होते (पूर्वी अनेक स्वतंत्र निर्माते हीच पद्धत अंमलात आणत. नायक नायिकांना बाजारात 'नाव' असेल तर त्याना अ‍ॅडव्हान्स देवून बूक केले जाई, आणि चित्रपटाने चांगला धंदा केला तर कराराची बाकीची रक्कम, तीही हप्त्याहप्त्याने), पण तो तर साफ कोसळला असल्याने नय्यरच नव्हे तर अन्य कित्येकांच्या दोन वेळेच्या जेवणाचे फाके पडले होते. नय्यर निराशेने अमृतसरला परतण्याच्या विचारात होते, पण तितक्यात 'आरपार' ची तयारी गुरुदत्तने केली....आणि मग ज्याला "पॉप्युलर" म्हटले जाते अशा संगीताची बांधणी नय्यरनी अशी काही केली की त्यातील प्रत्येक गाणे १९५४-५५ च्या प्रेक्षकाच्या तोंडी रंगू लागले.

..आणि जगदीप, जॉनी वॉकर, रेहमान, मिनू मुमताझ, शकिला, नूर आदी अनेक कलाकारांचा ताफा गुरुदत्तने गोळा केला होताच. यातील रेहमान हा तर त्याचा खास मित्रच. त्याच्याविषयी पुढील लेखात उल्लेख येईलच.

अशोक पाटील

अशोकजी

क्रमशः बद्दल तक्रार नाही हो. उलट त्या फ्लो मधे वाचत जाताना अचानक क्रमशः ची पाटी आल्याने चुटपुट लागून राहिली. जालावर लिखाण किती अवघड आहे याची कल्पना आहेच. त्यातून कालबद्ध माहिती जमवून, अचूकता तपासून प्रसिद्ध करणं हे वेळखाऊच आहे.

मला तर एका वेळेला चार ओळी लिखाण करणंच जमतं. Happy

किरण...

"त्यातून कालबद्ध माहिती जमवून, अचूकता तपासून प्रसिद्ध करणं हे वेळखाऊच आहे."

~ राईट. पण माझ्या नजरेतून तुम्ही या प्रक्रियेकडे पाहाल तर तुम्हाला आढळून येईल की तसा शोध घेणे आणि त्या अनुषंगाने लिहिणे फार आनंददायी गोष्ट बनते. मी तर थेट त्या काळातच पोचतो....हळवाही होतो असे म्हटले तरी चालेल.

दुसरीकडे अर्थात हेही खरे की तुम्ही जे चार ओळीत सांगू शकता ते मी चाळीस ओळीत सांगूनदेखील मिळवू शकत नाही.

गोमेला ४० पाय आहेत म्हणून ४ पायाच्या हरणापेक्षा ती श्रेष्ठ ठरत नाही, असेच काहीसे.

दोन्ही लेख आवड्ले. प्र. चि. पण छानच आहेत. शेवटचा वहीदाचा अफलातून ! क्रमशः आले की जास्त वाचायला मिळते असा माझा अनुभव. तेव्हा लिहीता हात आखडता घेऊ नका ही विनंती.

ओ.पी. वरुन आठवले....

ओ.पी. शेवटी शेवटी ठाण्याला रहात होते. शैलेश भागवत ( प्रसिध्ध शेहेनाई वादक) व त्यांचे बंधु रश्मीन भागवत ह्यांनी त्यांची फार काळजी घेतली. ते आमच्या घरा पासुन २ इमारती सोडुन रहात होते. सकाळी जाताना एक टोपी वाला म्हातारा नेहेमी भागवतांच्या घरात दिसायचा... एक दिवस बाबांनी बातमी आणली की ते ओ.पी. नय्यर आहेत. फार फार आश्चर्य वाटले होते.... येवढा मोठ्ठा संगीतकार त्याच्या शेवटाला अशा गुमनामीत राहीला. नंतर ते वारलेच....