वेडं होऊन जगावं..!!

Submitted by poojas on 1 August, 2012 - 05:11

शहाणं होऊन कुणाचं भलं झालंय ??
म्हटलं वेडं होऊन बघावं..
शहाण्यासारखे सगळेच वागतात..
आपण वेडं होऊन जगावं..!!

वेड लागल्याशिवाय म्हणे
इतिहास कधीच घडत नसतो..
तहान लागल्याखेरिज कुणी
विहीर सुद्धा खणत नसतो..
आपण आपलं.. आपल्या पुरतं
पाणी चाखून निघावं..
शहाण्यासारखे सगळेच वागतात..
आपण वेडं होऊन जगावं..!!

वर्षोंवर्ष नद्या वाहतात..
समुद्राला जाऊन मिळतात..
प्रवाहातले दगड गोटे..
गुळ्गुळीत होत जातात..
आपण मात्र प्रवाहाच्या
विरोधात निघावं..
शहाण्यासारखे सगळेच वागतात..
आपण वेडं होऊन जगावं..!!

कारण.. इथल्या जगात कुणीच
कुणासाठी थांबत नाही..
प्रत्येकाचे डावपेच..
कुणालाही सांगत नाही..
आपली वाट आपण शोधून
पुढल्या शोधात निघावं..
शहाण्यासारखे सगळेच वागतात..
आपण वेडं होऊन जगावं..!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users