आठवणींच कपाट-भाग ३ + भाग ४

Submitted by विनीता देशपांडे on 1 August, 2012 - 00:06

१०/१२/१९७५
बर्‍याच दिवसांनी आमचं रोजच बस्तान बसल. सारे जण नेहमी प्रमाणे कामाला लागले. आईच्या तब्येतीत बरीच सुधारणा होत आहे. शेजारच्या सुधाआजी सोबत शेजारच्या आळीतील काही बायका आईची तब्येत बघायला आल्या आणि आईला ती अंगणात कशी पाय घसरुन पडली हे सांगतांना खूप वैताग आला होता. सहाजिकच आहे...तीच कथा रोज सर्वांना सांगत बसायची..आणि येणार्‍यांना पण माहिती असतांना पडणार्‍याच्या तोंडून तेच ऐकून काय नवीन मिळत ठाउक नाही. काय गम्मत आहे ना....जगण्यातल्या या गमती मला आता कळायला लागल्या होत्या. सुमी वरचेवर येउन जाते. आईच्या आजारपणात समिती सुटली. आचार्यबाईपण भेटायला येउन गेल्यात. .
बाकी ओळखीच्या मंडळींची चक्कर असतेच...येणार्‍या जाणार्‍यांमूळे घरातलं काम वाढलं आहे...परिणाम म्हणजे माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. परिक्षा जवळ आली आहे ...अभ्यासाला लागलच पाहिजे. बाबांना आईच्या आजारपणाचा शारिरिक नव्हे तर मानसिक थकवा आला होता..हे माझ्या लक्षात आलं. आपल्या अगदी जवळच्या माणसाला काही दुखापत झाली की जीव कसा कळवळतो......असो...माझ्या वागण्यातला बदलं सर्वांनाच जाणवला बहुधा...माझ घरभर धावणे...सतत मस्ती करणे एकाएकी बंदच झाले.
शेवटी आई चिडून म्हणाली....ए मैने एवढ पोक्त व्हायची पण गरज नाही हं मला माझी पुर्वीच्या गार्गीची एखादी झलक तरी पाहु दे..बाबांनीही याला दुजोरा दिला...आणि परत आमच घर हसू-खिदळू लागले.
आजच्या ओळी खास माझ्या आईसाठी : कवि यशवंत यांची आई कविता
आई ! तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचें
माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे त्या शांत चंद्रिकेचें
वात्सल्य गाढ पोटी त्या मेघमंडळाचे
वास्त्व्य या गुणांचे आई, तुझ्यात साचें
११/०१/१९७६
कॅलेण्डरवर नवीन वर्ष केव्हा सुरु झाल कळलच नाही. समितीचा कॅम्प यंदा यवतमाळला आहे. आईच्या आजारपणामुळे मला जाता येणार नाही.
सुमी हल्ली अबोल झाली आहे. सारख वाटतय तिला काही तरी सांगायच आहे. सुहास आणि सुमी प्रकरणाचा छडा लावायच राहून गेलं. ते माझ्या नकळत परस्परांना भेटतात...हे मला कळलं होत.. ते मी फार मनावर घेतलं नव्हतं....हल्ली सुहासदाच्या बोलण्यात तिचा बरेचदा उल्लेख असतो....नाही तो माझ्याशी फक्त तिच्या विषयावरच बोलतो....हे मला आधी कसं कळलं नाही....मी किती बावळट आहे याची आज मला प्रचिती आली. साधी शंका पण माझ्या मनात येऊ नये म्हणजे काय? उद्याच सुमीला गाठायच आणि थेट विचारुन टाकायचं...मग ठरलं तर.

१५/०१/१९७६
सुमे कुमुदसाठी रुखवंताच काय काय केलं ? एक माझ्या नावाच करुन टाक. मी सुहासदाच्या विषयाला कशी सुरवात करु या संभ्रमात मी तिला काही तरी विचारायच म्हणुन विचारले...."हो मला माहितच होतं बाईसाहेब, नशीब पाच तारखेला विचारले नाही ते" कुचकटपणे ती बोलली आणि खूप सार्‍या गोष्टी माझ्यापूढ्यात आणत म्हणते कशी उचला कुठल हवं ते .
हे तू एकटीने केले की....कुमुदचीच मदत घेतली का ?मी चेष्टेने बोलली.
तिला तो नेहमीसारखा लटका राग यावा या प्रयत्नात मी होते. ओढत, ताणत, गप्पांमधे गुंतवत मी तिला गच्चीवर आणले. सुहासदादा आला आहे....हे म्हणताच स्वारीच्या चेहर्‍यावरचे रंगच बदललेत...आणि तिच्या डोळ्यातली आतुरता मी टिपताच तिला माझा हेतू लक्षात आला. आणि काय मस्त लाजली सुमी.
व्वा.....सुमीने कबूल केले...पठ्ठीने केवढा वेळ घेतला हे सांगायला....आता सुहासदाला गाठायला पाहिजे. या दोघांच्या प्रेमकथेचा आनंद त्यांच्यापेक्षा मलाच अधिक झाला. कदाचित माझ्या आयुष्यातील आणि माझ्या समोर घडणारी पहिली वहिली प्रेम कहाणी आहे.
संध्याकाळी सुहासदाला मी बोलावलेच होते. प्रेमाची कबुली कोणी कोणाला पहिले दिली ? मी हे विचारताच दोघ एकमेकांकडे बघू लागलेत.

८/०२/१९७६
परीक्षा जवळ आली आहे...अभ्यासाला लागले....आजच कुमुदची मांडव परतणी झाली....गेला आठवडा कुमुदच्या लग्नाच्या धावपळीत गेला. खूप धमाल केली आम्ही मैत्रीणींनी....राहून राहून मला कुमुदची सासरची मंडळी खटकत होती...नवरा मुलगा कुमुदपूढे जरा मोठाच वाटत होता. घेणं-देणं यावरुन वरातीत बरीच चर्चा झाली असावी, मला त्यात रस नव्हता म्हणून मी फार लक्ष दिले नाही त्या सबंधी बर्‍याच गोष्टी कानावर आल्यात सुमीच म्हणण असं तिचं लग्न तू मनाने स्विकारले नाही म्हणून तुला असं वाटतं असावं. देव करो आणि सगळं चांगल होवो.
कुमुदवर फार विचार करायचा मी टाळत होते...कारण त्याचा मला विचार न करताही त्रास होत होता.
एक अनामिक भय त्या विचारांसोबत मला घेरुन टाकतं. मी सुमीशी आणि सुहासदाशी पण बोलले , दोघांनी मला उडवून लावलं कागदी विमानासारख. मलाही वाटले कदाचित हे माझ्या मनाचेच खेळ असतील .
आता अभ्यासाला लागले पाहिजे. परीक्षा जवळ आली आहे.

२५/०३/१९७६
आज बरेच दिवसांनी आईला अंगणात फिरतांना बघून छान वाटलं. शेजारच्या सुधाआजीकडे त्यांची मुलगी आणि त्यांचा नातु..नात खूपसे पाहुणे आले होते. आईनी त्यांच्या कडे श्रीखंडाचा चक्का नेउन द्द्यायला सांगितला......ते उद्या संध्याकाळी चहापानासाठी येणार हे आईने आत्तापर्यन्त मला दहावेळा तरी सांगितले. तू आजारपणातून नुकतीच उठली आहे हे कळत त्यांना हे मी आईला शंभरवेळा सांगुन उपयोग झाला नाही. चहासोबत पोहे आलेच......मी चक्का द्यायला गेले तेव्हा अंगणात एक उंच सावळासा रुवाबदार मुलगा पुस्तक वाचत होता...कोण होता तो ? अर्चना आत्याला नमस्कार करुन मी निघणार तोच ती म्हणाली प्रसन्नाला भेटलीस का ? म्हणजे तो प्रसन्ना होता तर......मी ओळखलेच नाही त्याला.....लहानपणी आम्ही खूप खेळायचो. प्रसन्नाची बाराव्वीची परिक्षा आटोपली आणि इथे सुट्ट्यांमधे राहून तो एन.डी.एची प्रवेष परिक्षेची तयारी करणार आहे ..तेवढीच सुधाआजीला सोबतपण होईल. सुधाआजीच्या आनंदाच रहस्य हे आहे म्हणजे मला विसरणार का आजी मी गमतीने म्हंटले... तर आजी म्हणते कशी आधी त्याला पूर्ण वर्धा दाखव कामं समजवून सांग मग मी विसरेन तुला. सारेच जण हसलो. ओके तर ही ती चिंगी मला वाटलच......प्रसन्ना स्वयंपाकघरात ये तो म्हणाला. "चिंगी" ऐकुन मी त्याच्याकडे रागाने बघितले तर म्हणतो कसा अजूनही तू मारक्या म्हशी सारखी बघते.....आमचा प्रेमळ संवाद आईच्या हाक मारण्याने लवकर संपला...तू येच घरी...मग दाखवते तुला इंगा....प्रसन्नाला मी वॉर्निंग देऊन आले.

२६/०३/१९७६
"प्रेमा काय देउ तुला...भाग्य दिले तू मला..."कवितेऐवजी मराठी गाण्याच्या ओळी माझ्या ओठावर कशाकाय आल्या.?
आज काही वेगळच वाटतय. मी सारखी प्रसन्नाबद्दल का विचार करतेय......तोच ज्याच्याशी मी लहानपनी खूप भांडायची...मारामारी करायची......सारखा त्याचा बोलका चेहरा डोळ्यासमोर येतो आहे...त्याने मला चिंगी म्हंटले तरी फारसा रागही आला नाही. मी हट्टाने इतक्या वर्षात कोणालाच चिंगी म्हणू दिले नाही.
कशामुळे आज मला माझ्या डायरीत काय लिहावं हे सुचत नाही आहे. कुठल्याच कवितेच्या ओळी आठवत नाही.. आठवले ते गाणे.
माझं मलाच कळेना मला काय होतं आहे.
१/४/१९७६
आज प्रसन्नाने मला एप्रिलफूल ठरवले.....मला थोडासाही राग आला नाही...तो रोज त्याच्या वडिलांचे मिलिटरीतले किस्से सांगायचा.....त्याचे कॉलेज...त्याचे मित्र...याबद्दल तो नहमी गप्पा मारत असे. वडिल कर्नल आणि आई सोशल वर्कर..त्यामुळे तिच्या कामाच्या गप्पा. तो लहान असतांना एकदा त्याच्या आईने एका नेपाळी अनाथ मुलाची सोय होत नाही म्हणून चक्क घरीच आणले...तो त्यांच्या सोबत आठ दिवस राहिला....त्याच्या खोड्या प्रसन्नाने सांगितल्या.....त्याला नाक नाही म्हणून तो आईशी खूप भांडला....मला असा भाऊ नको म्हणून. लहानपणी तो आई सोबत खूप फिरायचा. आई एका मिटींगमधे बिझी आहे बघून त्याने वॉचमनची खूर्ची लपवून ठेवली. सतत खोड्या सतत मस्ती...एकदा एका पार्कमधे खेळायला गेला आणि झाडावर चढून बसला ते खाली उतरायलाच तयार होईना...शेवटी आईसक्रीमचे अमीश दाखवून खाली उतरवले.
त्याच्या बाबांचा सैन्यात दरारा होता.....मुंबईमधे दहशतवाद्यांच्या हल्यात त्यांचा एक पाय निकामी झाला. म्हणून आई वर्धेला येऊ शकली नाही.
त्याच्या लहानपणीच्या आणि कॉलेजच्या खोड्या एकून मी खूप हासायची.
२९/३/१९७६
प्रसन्ना...नावाप्रमाणेच प्रसन्न आणि हसरा मुलगा....माझी आणि त्याची छान मैत्री जुळली आहे. त्याला वर्धा दाखवायच्या निमित्ताने मी त्याच्या सोबत खूप फिरते. तो एन.डी.ए ची तयारी करत आहे. हल्ली रोज कॉलेजपर्यन्त मला आणि सुमीला सोबत सोडायला येतोय...का कोण जाणे तो सोबत यावा असे मला वाटू लागले आहे.....झालं पुढच्या आठवड्यात कॉलेजला सुट्ट्या लागतील अणि परीक्षा.....
आपण विचार बदलण्यासाठी काय काय करतो आणि परत तेच विचार फिरुन येतात..मीही किती प्रयत्न केला तरी प्रसन्नाचे विचार डोक्यातून जातच नव्हते.
मात्र हे विचार झटकून आभ्यासाला लागलं पाहिजे......चांगले मार्क मिळालेच पाहिजे... मेडिकलला जायचे आहे.
आई-बाबांच स्वप्न पूर्ण करायच आहे. या जाणीवेकडे वळून मी बळे बळे त्या विचारांचा निरोप घेतला.

१५/४/१९७६
हे दिवस कसे सरले ते कळलेच नाही. अभ्यास-परिक्षा आणि प्रसन्ना काही काळ माझं हेच जग होत.
परीक्षा संपली एकदाची आणि मी या जगातून बाहेर आले.....सिनेमाला जायचा कार्यक्रम ठरतोय...नेहमीप्रमाणेच प्रत्येकाच्या आईवडिलांच्या मनधरणेत वेळ जाईल....कुमुदच पत्र यावेळी सुमीकडे आले...उद्द्या वाचू....तसं मागच्या पत्रात विशेष काही लिहिले नव्हते...उन्हाळ्यात येईल असाच उल्लेख होता...प्रत्येकाचे सुट्टीचे बेत ठरत होते....मी दरवर्षीप्रमाणे काही दिवस आत्याकडे आणि मावशीकडे जाउन येणार. रमाकांत कांकाची बदली यवतमाळला झाली...बहुतेक मावशीसोबत तिचं घर लावयला जाईन म्हणतेय पण बघू.....प्रसन्ना ट्रेकिंगला गेला आहे. तो आल्यावर ठरवू.
मी प्रसन्नात गुंतत चालले हे माझ्या लक्षात नाही आलं, ते लक्षात आणुन दिले ते सुमीने.
काय प्रत्येक गोष्ट हल्ली तू प्रसन्नाला विचारुन करतेस...सुमीने माझ्यावर टोमणा हाणलाच. तू नाही सुहासदाला विचारुन सार करत....मी म्हटल्यावर म्हणते कशी......आम्ही प्रेमाची कबुली दिली एकमेकांना...आपण उरकलेत का हे विधी...आम्हाला न सांगता परस्पर...तेव्हा माझ्या लक्षात आले प्रत्येक गोष्ट मी त्याला सांगूनच करतेय....अर्थात नकळत घडत गेलं आणि मला आज उमगलं.
१७/४/१९७६
कुमुदच पत्र मी आणि सुमीने वाचले....पण वाचून तिला आमचे पत्र मिळत नसल्याचे कळल्यामुळे दोघी विचारात होतो. तिच्या वहिनीला घरी गाठायच ठरवलं...उगीच काहीतरी बिनसल्याची मला कुणकुण वाटत होती.. तिच्या घरुन फार काही कळलं नाही. कुमुद ठीक असेल ना ? याच काळजीत आम्ही दोघी होतो. ती इतक्या दूर परभणीला जाउन बसली...तिथून तिची खबरबात तरी कशी मिळवायची ?
प्रसन्नाशी बोलू या विषयावर...पण तो तरी कुठे आलाय ?
कुमुद्ने लग्नाची घाई केली याची रुखरुख नेहमीच असायची पण तिच्या निर्विकार पत्रामुळे ती अजूनच वाढत गेली. कोणाला बोलायच...तिच्या आईवडिलांना विचारलं तर ते ती खुशाल असल्याच कळवतात.ती संसारात इतकी गुंतली की तिला आम्हाला काहीच लिहावसं वाटलं नाही...पण नवर्‍याबद्दल तिने कधिच काही लिहिले नाही. मलाही तेव्हा आईच्या आजारपणामुळे कुमुदशी फार बोलताही आलं नाही. मी आणि सुमी तिच्या काळजीत होतो... इतक्यात काही सणवारही नाहीत की ती त्या कारणाने वर्धेत येईल. इकडे आठ दिवसात येतो सांगुन गेलेला प्रसन्नाचा ही पत्ता नव्हता.
१९/४/१९७६
प्रसन्ना कालच यायला हवा होता...वाट बघण्यात हूरहूरणे नकळत मला आवडायला लागले होते. आजची संध्याकाळ अशीच वाट बघण्यात गेली..त्यालाही माझ्याबद्दल असेच वाटत असेल का? या विचारात तिन्ही सांजेला मावळतीचा सूर्य बघताच बा.भ.बोरकरांची कविता आठवून गेली.
फांदीसारखी झुकते सांज, जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होउन पेंगुळपांगुळ होते जग
गगनभरल्या आठवणींचे गर्द झाडींत शिरते थवे
ओला काळोख आळत येतो उकत्याझाकत्या काजव्यांसवे
अशा वेळी दूरचा दिवा जवळ येतो पाण्यावरुन
वारा तारा छेडीत घुमतो उदास उदास सूर भरुन
डोळ्यांमधे जमते पाणे : कशासाठी कळत नाही
उरभरल्या उशासाला कुठेच वाट मिळत नाहीं
आज माझी अशीच अवस्था आहे....माझ्या डोळ्यात पाणी आले खरे ,का आले मलाच कळत नाही.
मनाची घालमेल का चालली ते कळत नाही...एरवी सडेतोड..निर्भिड मी...आज एखाद्या ऋषिकन्येप्रमाणे
गोगलगाय होउन प्रश्नांचा गुंता सोडवत बसले असे माझे मलाच वाटत आहे. कोणाला सांगता येत नाही...आणि मनात कोंडून ठेवता येत नाही...अशा दुहेरी मनस्थितीत मी पुरते अडकले आहे. अशा भारावलेल्या क्षणांत आईबाबा..सुमी..कुमुद...कुठल्याच विषयांवर विचार करावसा वाटत नाही.

२१/०४/१९७६
प्रसन्ना आज आला....आणि तो आल्या आल्या माझा लटका राग त्याला दाखविण्याची काय गरज होती.. नकळत मी असे करुन बसली...आता वाटतय त्याला तेव्हाच चांगल खडसावून विचारलं असतं.... माझा मूळ स्वभाव वाढत्या वयासोबत बदलत चालला का ? का तो प्रसन्ना आहे म्हणून मी त्याच्याशी रोखठोक बोलू शकली नाही. असो....सुमी म्हणाली..काही दिवस वाट बघं नंतर सरळ तुच त्याला तुझं त्याच्यावर प्रेम आहे सरळ सांगून टाक....हे वाटतं इतक सोप्प आहे....मला जमेल....माझा धीटपणा कुठे गेला..?
या एका गोष्टीचा माझ्यावर इतका परिणाम व्हावा कि माझं आभ्यास..माझं डॉक्टर व्हायच स्वप्न या सार्‍याचा मला विसर पडला. अंतर्मनातील या विचारांच्या लहरींना मी दूर सारण्याचा मी खूप प्रयत्न केला, सगळे प्रयत्न व्यर्थ ठरलेत, परत फिरुन तेचे विचार मनात येत आहेत.
कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरी ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?
उरी या हात ठेवोनी उरीचा शूल कां जाई ?
समुद्री चौंकडे पाणे, पिण्याला थेंबही नाही,.....
........पुढें जाऊं ? वळूं मागें ? करुं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करे हेवा !
भा.रा.तांबेंच्या कळा ज्या लागल्या जीवा यासारखी माझी अवस्था झाली आहे. विचारांच्या वलयात मला एक गोष्ट लक्षात आली आपण अगतिक असता देवाची आठवण नकळत होते. अशीच देवाची आठवण मला आईच्या ऑपरेशनच्या वेळेस नकळत आली होती.
माझ्या साठी ईश्वर कधीच कुठले एक नाव नव्हते. माझ्या कुटुंबाचे आराध्य दैवत जरी तुळजाभवानी असली तरी माझ्यासाठी माझा देव म्हणजे एक सात्विक शक्ती आहे. मी कुठल्याच देवतेची पूजा करत नाही. मात्र माझ्यात नांदणार्‍या चिरंतन शक्ती पूढे मी नेहमीच नतमस्तक होते. माझा देव माझ्यातच खोल मनाच्या गाभार्‍यात कुठेतरी दडून बसला आहे. त्याला ठाऊक आहे मी अगतिक झाले की त्याचे नाव माझ्या ओठावर आपोआप येईलं, याचीच तर तो वाट बघतं आहे. तुझ्या दु:खात तुझ्या एकटेपणात तुझ्यासोबत कोणी नसले तरी मी आहे याची जाणीव मला तो नेहमीच करुन देतो.
माझा देव आणि दैव आयुष्याच्या कुठल्या मार्गावर आणून सोडतो ठाउक नाही...का कोण जाणे हा विचार करताच एका अनामिक भितीने माझे सर्वांग शहारुन गेले.
२७/०४/१९७६
प्रसन्नाच्या डोळ्यात मी काहीतरी शोधत होते आणि तो माझ्या डोळ्यात....दोघांनाही ठाउक होते....पण प्रेम व्यक्त कोणीच करत नव्हते. अशा अव्यक्त प्रेमात गुंतणे त्यालाही आवडंल असाव, मला तर आवडतच होते.
एकमेकांच्या सहावासात आम्ही बरेच दिवस घालवलेत..खूप गप्पा मारल्या. यातून आम्ही एकमेकांच्या आणखिन जवळ येत होतो. सुमी मला समजवून थकून गेली... हे अव्यक्त प्रेम कधी तरी व्यक्त होणार, तो एक दिवस येणार मी त्या दिवसाची वाट बघत आहे.
४/५/१९७६
आज सुहासदा भेटायला आला होता. परभणीला त्याच्या कोणी ओळखीच त्याला सापडलं . सुमीने विचारलेच कोण...मला खर त्यात काही रस नव्हता...मला फक्त कुमुद बद्दल जाणून घ्यायचे होते बस्स....त्याच्या मित्राच्या वहिनीच माहेर परभणीच होतं...सुमीने त्याला रागावूनच विचारले आधी नाही का सांगायचे ?
असो....त्यांना कुमुदच्या सासरची संपूर्ण माहिती दे आणि बातमी काढायला सांग ना. सुमीने फरमान काढलं.
ए बयाबाई...मी सांगितलं, वहिनींचा भाऊ आला आहे सारंग त्याच्याशीच ओळख करुन देत होता तेव्हा लक्षात आले.. कुमुदबद्दल त्याला माहिती आहे का विचारावं. तो परवा जाणार आहे.. धीरेनभाईंच्या दुकानात दुपारी साडेचार वाजता फोन करणार आहे.
....मी आईशी बोलते आपण दोघी जाउ त्यांना भेटायला....मग ठरलं तर
प्रसन्ना आणि सुहास धीरेनभाईंच्या दुकानातून परस्पर निरंजन दादाकडे येणार होते.

८/५/१९७६
ठरल्या प्रमाणे आज आमचे मिशन कुमुद यशस्वी झाले....पण जे आम्हाला कळले ते इतके विदारक होते की मन आणि बुध्दी दोघांना ते पटत नव्हते.....तिच्या आईबाबांना भेटू का ? मग तिच्या दादा-वहिनीला भेटून कानावर घालू असं ठरलं . मी कुमुदच्या लग्नाबद्दल आधीच बोलले असते तर...पण तेव्हा कुठे हे सार माहित होते आपल्याला वाटले तिच्या आईवडिलांनी मुलाकडची चौकशी केलीच असेल ते...माझ्या मनातील शंका अशी खरी ठरेल स्वप्नात पण वाटले नव्हते...ते उगाच त्या क्षणी मला वाटून गेले आणि मी बोलून गेले....माझी चुक काय?
प्रसन्नाला माझ्या मनाची घालमेल कळली...."हे सारे खरे आहे म्हणून तुला असे वाटतं आहे...समजा हे खरे नसते तर उगाच कुमुदच आयुष्य आपण दुषित केल्याची खंत तुला जन्मभर पुरली असती."..
झाल्या गेल्याचा विचार करु नको...निदान तुझ्याकडून मला ते अपेक्षित नाही....त्याच्या या अधिकाराने बोलण्याचे मला नवल वाटले...किती खर बोलला तो...पुढे काय?
१०/५/१९७६
आज आम्ही माझ्या घरी कुमुदच्या दादा-वहिनीला बोलावून सारे सांगितले..त्यांचा विश्वास बसत नव्हता. मग ठरलं खर खोट तपासून बघण्यासाठी निरोप न देता कुमुदचा भाऊ निरंजनदादा, सुहासदा आणि कुमुदचे काका परभणीला जातील. संगीता वहिनीने त्यांच्या माहेरचा पत्ता दिला. भावाला फोन करुन सांगितले. येत्या पंधरा तारखेला जायचं ठरलं. मला आज माझ्या आई बाबांचा अभिमान वाटला...त्यांनी माझ्या मैत्रीसाठी मी म्हटलं तसं केलं. माझ्याप्रमाणे त्यांनाही कुमुदची काळजी वाटत होतीच. संगीता वहिनीने खूप मदत केली.
१२/०५/१९७६
सुधा आजीच्या गच्चीवर आम्ही दोघं मावळतीचा सूर्य बघत बसलो होतो...दोघंही निशब्द..आज दोघांच्या मधे शब्दही नकोसा झाला....सतत एकमेकांच्या भेटीसाठी बोलण्यासाठी आतूर असलेलो आज आम्ही निशब्द का होतो हे आम्हाला तरी कुठी माहिती होते. कुमुदबद्दल खूप काळजी वाटते का? प्रसन्नाने बोलण्याचा प्रयत्न करत म्हंटलं. पण त्या विषयी माझी बोलण्याचे इच्छा नाही हे जाणून तो बोलायचा थांबला. राहू दे कोणीच बोलू नाही. तू, मी आणि शांतता छान वाटतय....त्यालाही अजून कुणाबद्दलही विचार करायची इच्छा होत नव्हती. संधिप्रकाशाची चाहूल लागताच केशरी-नारंगी छटा आकाशात विखुरल्या आणि प्रसन्नाने माझा हात हातात घेत त्याच्या प्रेमाची कबुली दिली. मी ही लगेच दिली.....की (आपोआप आली).
माझा आनंद माझ्यातच मावत नाहीया.. ज्या क्षणांची मी वाट बघत होते तोच क्षण माझ्यासमोर उभा आहे. तो क्षण चिरंतन इथेच गोठून जावा मला वाटत आहे.....आज या क्षणात मलाच कवितेच्या काही ओळी स्फुरल्यात :
तुझी भेट व्हावी

केशरी सांज यावी अन
माझी तुझी भेट व्हावी
दिस-रात क्षितीजावरती
तू अन मी काठावरती
नदीत अंधुक साउली पडावी
तुझी माझी भेट व्हावी

पाउले वाजता स्वप्नांची
माझी तुझी भेट व्हावी
प्रेमगीताच्या तालावरती
ओठ तुझे माझे भिजती
अंगअंग शहारुन जाता
तुझी माझी भेट व्हावी
मंतरलेल्या या अवस्थेत मला एवढ्याच ओळी सुचल्यात...

१५/५/१९७६
निकालाचे दिवस जवळ येत आहेत...हा विचार मनात जरी आला तरी एक अनामिक भिती दाटून येते ना. मेडिकलची प्रवेशपरिक्षेची पण मी तयारी करतच आहे...पण राहून राहून प्रसन्ना डोळ्यापुढे येउन माझ्या अभ्यासात व्यत्यय आणतो. हळुहळु स्वप्नात गुंगणे मलाही आवडायला लागले.
आणि नकळत मी कालची कविता आज पूर्ण केली :
उमलता पाकळी फुलांची
माझी तुझी भेट व्हावी
मृदु गंधाची चढता बेधुंदी
आभास तुझा धरा-अंबरी
भास-आभासाच्या गुंग धुंदीत
तुझी माझी भेट व्हावी

उकलता गुंफण स्मृतींची
माझी तुझी भेट व्हावी
गुंफता गुंफता गोफ अंतरी
भेट आपुली आसुसलेली
अशीच मंतरलेली रोज नव्याने
तुझी माझी भेट व्हावी
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>....<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

नचिकेत हे वाचून स्तब्ध झाला होता. त्याला यावर काय रिअ‍ॅक्शन असावी हेच सुचत नव्हते. मात्र तो डायरीतील कथानकात गुंतत होता. डायरीतील नावांचे संदर्भ त्याच्या वर्तमान आयुष्यात अद्द्याप जुळत नव्हते. डायरीतील गार्गी आणि त्याची आई गार्गी यात खूप फरक होता. माझी आई साधी-सरळ-अबोल-गोरी-समंजस आणि डॉक्टर तर नव्हतीच आणि हे देवदत्त खानोलकर कोण ? लहानपणी हे नाव ऐकल्याच त्याला पुसटस आठवत होतं...पण नेमक काही आठवत नव्हतं. सुमी अधून मधून आजी आपल्या आईला म्हणते, हे नाव त्याने कुठेतरी ऐकले होते....सुन्न झालेल्या नचिकेतला नात्यांचा गुंता सोसत नव्हता..सोडवत नव्हता.
परत परत सारे जुने फोटो बघून पण काही लक्षात येत नव्हतं.
सुहास हे नाव त्याच्या वडिलांच पण तरीही कुठलेच धागेदोरे जुळत नव्हते. अनु शांत झोपली होती.
तिच्या बोलण्यावरुन त्याचा या सर्वांशी संबध होता पण नेमका केव्हा ? कुठे ? कसा ? या प्रश्नांची उत्तरे तो शोधत होता. नात्यांचा गुंता उकलतं नव्हता. वेगवेगळे अंदाज मनात सारखे घुटमळत होते. नचिकेतने परत डायरीचे पानं वाचायला सुरवात केली...
ही आगळी वेगळी प्रेमकहाणी ..."केशरी सांज यावी..तुझीमाझी भेट व्हावी "या ओळींनी त्यालाही मंत्रमुग्ध केले होते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.........<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
(क्रमशः)

आठवणींच कपाट भा-४

१७/५/१९७६
आज परभणीहुन सारे जण परतलेत हे सुमीकडून कळताच मी सारे काम सोडून कुमुदच घर गाठलं.
कुमुदने दारातच मला मिठी मारली आणि धाय मोकलून रडायला लागली. तीन महिन्यांचा साठलेला आक्रोश आज तिच्या डोळ्यातून वाहत होता. कुमुदची अवस्था फारच वाईट होती. चेहरा ओढलेला, खचलेली, आणि भेदरलेली पाहून घरातील कोणाचेच अश्रु थांबत नव्हते. काका-काकु दादा- वहिनी सारेच स्तब्ध होते. सुमीने तिला सावरत आत नेले. कुमुदची अवस्था बघवत नव्हती..तिच्या मानसिक आणि शारिरिक यातनांच्या खुणा तिच्या अंगभर दिसत होत्या. आईवडिलांच्या चेहर्‍यावर पश्चाताप झळकत होता....कोणाच प्राक्तन दीन असू शकेल पण इतके क्रुर आणि निर्दयी असू शकते याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता. माझं मन विषण्ण झालं होतं....एका क्षणात माझ्या ईश्वरनिष्ठा..भाग्य...दैव....सार्‍या संकल्पनांना तडा गेला होता. सत्य कडू असते...ते पचवता येईल एकवेळ, जर सत्य भयानक आणि विदारक असेल तर ?
१६/५/१९७६
आज प्रसन्ना पण एन.डी.एच्या परिक्षेसाठी पुण्याला निघाला. आमचा हात हातातून सुटतं नव्हता. प्लीज़ रडू नको...त्याच्या सांगण्यावरुन मी माझे अश्रु ह्रदयात कोंडण्याचा प्रयत्न करत होते. आणाभाका...पत्र लिहिण्याचं वचन..डोळ्यातूनच सगळी देवाण घेवाण झाली. माझा निकाल लागे पर्यन्त थांबला असता....गार्गी उगाच काही बोलू नको तुला माहिती आहे माझं ध्येय तुझ्या ध्येया इतकच महत्वाचं आहे. माझं माझ्या आईबाबांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. आम्ही दोघं दोन किनारे असच मला या क्षणी वाटत होतं...आपण कधी भेटणार...कुठे..कसं भेटणार या नाहक प्रश्नांनी माझी दैना केली. आणि नको नको म्हणतांना तो क्षण आलाचं.
माझ्या आयुष्यात एकाएकी पोकळी तयार झाल्यासारखी वाटली.

४/६/१९७६
मधले दिवस कसे गेले कळलेच नाही. कुमुदला सावरण्याची धडपड सुरु होती. तिने परत शिक्षण सुरु करावे या एकमताला कुमुद तयार झाली...परत बाराव्वीची परिक्षा देउन सोबत तिने टायपिंग सारखे वर्गही सुरु केले. आधीच अबोल..अलिप्त असणारी कुमुद आता कोमेजून गेली होती. आता ती सगळ्यांशी बोलणे टाळू लागली. आचार्यबाईंच्या मदतीने ती समितीत जाऊ लागली. दुभंगलेल्या संसाराच ओझं आम्ही कमी करु शकत नव्हतो मात्र त्याची तीव्रता कमी करण्याचा जो तो प्रयत्न करत आहे.
सुमी-सुहास प्रेमकहाणी पण सुरळीत चालू आहे...सुहासदा नोकरीसाठी एकदोनदा नागपुर-यवतमाळला जाउन आला..पण नोकरीचे अजून काही होत नव्हते....मागे बाबांनी त्याला बॅंकेची परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.... त्याची नोकरी करत पुढे शिकण्याची जिद्द होती...आणि सहकारी बॅंकेत सहा महिन्याच्या प्रोबेशनवर त्याची चंद्र्पुर येथे नेमणुक करण्यात आली. खरतर आनंदाची बातमी होती...पण सुमीच्या डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते.....अग प्रेमासाठी पोट भरण्याची व्यवस्था नको का करायला ? सुहासदाने खूप समजवून सांगितले...पण वियोगाच्या कल्पनेनेच सुमी फारच घाबरली होती.
आपलं पूढे काय ? या काळजीत ती का खंगते मला काय सुहासदाला कळलं नाही.
येत्या दहा तारखेला निकाल आहे....बघू काय होतंय....मेडिकलची प्रवेशपरिक्षा पण जवळ आली आहे.

१५/६/१९७६
सुहासदाने त्याचे आणि सुमीच्या प्रेमाबद्दल घरी सांगितले...कोणी आडकाठी घ्यायचा प्रश्नच नव्हता..सुहासदाच्या चंद्रपुरला जायच्या आधी दोघांचा घाईघाईत साखरपुडा आटोपला. आईबाबांच्या मदतीने ही प्रेमकहाणी मार्गाला लागली...लग्नाचं सुमीच्या शिक्षणानंतर करायचं ठरलं. आणाभाका घेत सुहासदा चंद्रपुरला निघाला. सुमी हिरमुसली. जवळ जवळ दहा दिवस...ती शकुंतलेसारखी पत्राची वाट पहात होती. पहिलं पत्र मिळालं तेव्हा बाईसाहेबांची कळी खुलली.
माझा अपेक्षेप्रमाणे निकाल लागला....मला ७७% मार्क पडलेत.....मेडिकलच्या प्रवेशपरिक्षेच्या निकालावर सार अवलंबून होतं. आधी मेडिकलला जायचं ही कल्पना सुखदायक वाटायची. जसे जसे जायचे दिवस जवळ येत होते तसे लहानपण, मैत्रिणी, माझं घर, आईबाबा या सर्वांना सोडून जावं लागणार ही कल्पना असह्य वाटत होती.
१६/६/१९७६
मेडिकलची अ‍ॅडमिशन पक्की झाली....नागपुरला जायच... आता जावच लागणार.
आमची पण सुमी-सुहास सारखी ताटातुट होणार या भितीने माझ्या पोटातही गोळा येते होता.
.....तसे वर्धा नागपुर अंतर फार नाही. मी मनोमन माझीच समजूत काढत होते.
आईबाबा ,कुमुद, सुमी, आणि प्रसन्ना या सर्वांना सोडून मी तरी राहू शकणार होते का ? हा प्रश्न सारखा छळत होता.
नागपुरला जाउन रहाण्याची सोय....जेवणाची सोय सगळच बघायचं होतं. बाबांनी चारपाच दिवसांची रजा टाकली. माझी रहाण्याची व्यवस्था होई पर्यन्त आम्ही दोन-तीन दिवस बाबांच्या मित्राकडे रहाणार.
नागपूरला जायच्या आधी एकदा माझी शाळा डोळे भरुन बघून आले.....
शाळा..नवे दप्तर...नवी पाटी..नवे पुस्तकं...नवी पेन्सील...कोर्‍या वह्या....सगळं आठवलं.
पटांगणात ते बेभान धावण..मधल्या सुट्टीतला डबा...मैत्रिणींनी आणलेली बोरं, चिंचा, दात आंबट होई पर्यन्त खाल्लेले ते आवळे... देवळातल्या पारावरच जांभाळाच झाड, त्याची जांभळ तर जीभ जड होई पर्यन्त खाल्ली.
मुलांना वाकुल्या दाखवणं. निकालाच्या दिवशी आलेला वैताग....ते गॅदरींगचे दिवस, दिवसभर चालणारी नाटकांची आणि नाचाची तालीम. नाचाची रोज जोडी बदलयाची...वैतागून बाई नाचाचं गाण बदलून टाकायच्या. बागेत जाणारी सहल....सहलीतली धमाल...बागेतल्या कारंज्यात भिजण्यासाठी मुद्दाम केलेली धक्का-बुक्की. एका मैत्रिणीच्या चुकीचा वाटून घेतलेला मार....सगळयातच...आपली भागीदारी. चौथीत पहिल्यांदाच वापरलेले शाईचे पेन....गणवेषावर पडलेला त्याचा भला मोठा डाग....बाईंचा डोळा चुकवून....तिघी चौघींनी डबक्यातल्या पाण्यानं तो काढला....त्यावर ओला खडू फिरवण्याची शक्कल माझीच...कारण आईचा धाक. धाकातच जाणारा रोज गणिताचा तास....भूगोलाच्या वर्गात येणारी पेंग...इतिहासाच्या पुस्तकात सगळ्यांनाच शिवाजी करुन टाकलं..... अगदी गांधी..टिळक..फुले...नेहरु कोणालाच नाही सोडलं....चार दिवस वर्गाबाहेर.....बाहेरुन वर्ग कसा दिसतो याचं वर्णन मी सगळ्यांची नक्कल करुन दाखवली. अजिंक्य कशी तिरपी मान हालवतो, बाईंची पाठ फिरली की संदीप हळूच खिशातून फुटाणे कसा खातो. रजनी बाईंचा डोळा चुकवून कसा कंगवा करते. अभिजीत सतत खाली मान घालून असतो हा गैरसमज मीच तर दूर केला...तो खाली मान करुन एक डुलकी घेऊनच घ्यायचा. मैदानी स्पर्धेत तर धमाल असायची. शिक्षक वैतागून जायचे. कितीतरी गमती शाळेच्या या परिसरात मी केल्या,अनुभवल्या, आणि हे सगळं सोडून जायचं म्हणजे त्रास होतं होता.
कसे भरकन सरले हे शाळेचे दिवस.....हा अनुभव आता आठवणीत जपायचा.
माझं कॉलेज....पहिल्याच दिवशी उशीर झाला....घाबरत घाबरत वर्गात गेले...कोणी काहीच म्हटले नाही....मग हळूहळू अंगात धीटाई आली. काही मैत्रिणी शाळेतल्या काही नवीन.. इथेही खूप धमाल केली....गृहपाठ केला नसेल तर शेवतच्या बाकावर जाऊन बिनधास्त गृहपाठ करायचे...तास विज्ञानाचा पुस्तक गणिताचे गृहपाठ इंग्रजीचा. गॅदरिंगची मजा जी कॉलेजमधे असते ती कुठेच नसते..वादविवाद स्पर्धेची मी आतुरतेनी वाट बघायची......खेळ...खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल,
स्पर्धा आम्ही खूप गाजवल्या. भरपूर बक्षीस मिळाली..भरपूर मार खाल्ला. आमची सहल...तर कुठे जाते हे कधीच महत्वाचे नव्हते...कोण कोण येणार आहे हे खूप महत्वाचे असायचे. लायब्ररीत पुस्तक कमी वाचली..बेत जास्त आखलेत..आज काय करायचं...कोणी कुठे भेटायचं...कॉलेज झाल्यावर आम्ही गेटजवळ मोठ्ठ वडाच झाड होतं तिथे नेमाने रोज भेटायचो...नंतर त्याला सेकन्ड ईअर कट्टा असे नावच पडले....नंतर ईअर पण निघून आता अख्ख कॉलेज सेकन्ड कट्टा म्हणूनच ओळखतं.
आता या आठवणींना मी माझ्यासोबत घेऊन जाणार. खरच सांगण सोप्प असतं....करणं त्याहून कठीण हे मला आज कळलं. मी मेडिकलला जाणार या कल्पनेने खूप आनंदात होते..प्रत्यक्षात जेव्हा सोडून जायची वेळ जवळ आली होती तर माझा पाय निघत नव्हता.

२०/०६/१९७६
चार दिवसांपासून माझ्या सामानाची बांधाबांध चालली होती. काल आत्या येऊन गेली..मावशीने यवतमाळवरुन पत्र पाठवले होते. नागपुरला जायचा दिवस उजाडला.....सार्‍यांचेच मनं जड झाली होती...आईचे अश्रु थांबत नव्हते...सुमी..कुमुद हात सोडत नव्हत्या....दूर उभा राहून प्रसन्ना माझ्याकड बघत आहे असा मला भास झाला...आणि हा विचार कासावीस करु गेला....काल संध्याकाळीच आम्ही फोनवर किती वेळ बोललो.....दूर जाण्याने प्रेम कधी कमी होत नाही हे मी त्याला खूपदा सांगून झाले...पण तो ऐकेल तर ना....सारखा प्रसन्नाचा उदास चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता.
सुधाआजीने मीठमोहरी ओवाळून टाकली. लिमये काका येऊन गेले. नरुमावशीने माझ्या आवडीचे बेसनाचे लाडू करुन आणले. कुमुदचे हुंदके थांबत नव्हते....सुमीने मला रुमाल दिला. त्यावर गार्गी अक्षराचे भरतकाम बघून मला रडायलाच आले. गौराबाईसुध्दा रडत होती. सगळ्यांनी माझी रडत पाठवणी केली. जसं बसनी वर्धा मागे टाकलं त्या क्षणाला मला खूप गहिवरुन आलं, आपण सगळं सोडून दूर चाललो ही भावना खरच भयावह असते. मी आपल्या लोकांना सोडून जाण्याचे दु:ख आणि नवीन वातावरण कसे असेल...नवीन लोकं अशी असतील या विवंचनेत होती. नव्या ठिकाणी जाण्याची ओढ होती एकीकडे जुने सुटत असल्याचे दु:ख अशा संमिश्र कोंडीत मी अडकले होते. कानात आईबाबांचे शब्द घुमत होते.. इकडची काळजी करु नको...खूप अभ्यास कर डॉक्टर हो आणि लवकर परत ये.
२२/६/१९७६
उद्या मेडिकल कॉलेजच्या आवारातील होस्टेलमधे रुम बघायला जायचं आहे. बाबा आधीच बघून आले. संध्याकाळी मी सर्व सामानासकट होस्टेलला जायच ठरलं. देशमुख काका आणि काकुंनी खूप मदत केली...काही लागले तर कळव घरी येत जा निरोपांची देवाण घेवाण झाली.
मला होस्टेलला सोडून बाबा वर्धेसाठी रवाना झाले.
पहिल्यांदा मी एका अनोळखी जागी एकटी रहाणार....मला काहीच सुचत नव्हतं. नवी खोली..नवी मैत्रीण..सुनंदा तिच्या सोबत या खोलीत रहायचे. हव तेवढं सामान बाहेर काढून मी बाकी सामान पेटीतच ठेवले आणि ती पलंगाखाली ढकलून दिली. खोलीचा अंदाज घेत असतांना, कुठे काय आहे हे बघत होती तोच मेट्रनने खाली हॉलमधे बोलवले असा निरोप आला.
मी डायरी टेबलच्या ड्रावर मधे टाकत सुनंदासोबत खाली हॉल मधे आले....मला सगळेच नवीन होते....माझ्यासारख्या नव्या मुली दिसल्या..पण आमच्या सिनीअरने आम्हाला एकमेकांशी बोलू दिले नाही. मेट्रनने नव्या मुलींना होस्टेलचे नियम सांगितले. वेळ पाळण्याचे आव्हान करत मिटींग बरखास्त झाली. जेवण होते का? लगेच लक्षात आले जेवणाला नावं ठेवायचे नाही. कोबी-बटाटा भाजी...,आमटी, पोळ्या...पराठे..चपाती यात मोडणाराएक प्रकार.लोणचं नाही लोणच्याचा रस्सा होता. जेवतांना मी फारशी कुणाशी बोलले नाही. सरळ आपल्या खोलीत आले. रात्री बरोबर नऊ वाजता मेट्रन लाईट बंद करते...पंखा गोल फिरतांना दिसला. मी झोपायचा प्रयत्न करु लागली.
२३/६/१९७६
काल रात्रभर कड बदलत होते..डोळा लागलाच नाही....विचारांच थैमान डोक्यात मावेनास झाल आहे. सारखा प्रसन्नाचा चेहरा डोळ्यासमोर येत आहे. नवीन वातावरणात रुळण फारच कठीण आहे. राहून राहून घरची आठवण येत आहे....आयुष्यात एक पोकळी निर्माण झाल्यासारख वाटत आहे. बाबा म्हणतात आयुष्याचा आपण जेव्हा नव्याने प्रवास सुरु करतो तेव्हा खूपशा आवडत्या नावडत्या गोष्टी जुन्या वळणावर सोडून द्याव्या लागतात. त्याच्यासकट प्रवास खूप त्रासदायक ठरु शकतो. कदाचित मला याचाच तर त्रास होत नाही ना ? पण काय काय सोडायच जुन्या वळणावर....गुंता नुसता विचारांचा गुंता...मेडिकल पूर्ण करायच तर हा गुंता सोडवायलाच हवा...मला इथे रुळायलाच हवे...मीच माझी समजुत काढली.
२४/६/१९७६
वेग वेगळ्या स्वभावाच्या लोकांशी जुळवून घेत काम करणं हा माझ्या आयुष्यातील पहिलावहिला प्रसंग. ते सगळे असे एकदमच भेटतील असं कधीच वाटलं नाही....इथला स्टाफ बहुभाषिक...प्रत्येकाचा निराळा ढंग....वेगळी चाल.
सकाळ पासून रात्री पर्यन्त...विविध विचारांची लोक भेटलीत...त्यांना आपल्या पद्धतीने डील करणे म्हणजे महा कठीण काम.....आजवर मी जे मला पटलं तेच केले...पण आता असं नाही...मला पटेल असं करायला भरपूर गोष्टींचा विचार करावा लागतो...असो...प्रसन्नाची आठवण आली कि काहीच सुचत नाही. खूप दिवसांनी आज कविता आठवली ,ठरवून पण रोज दोन ओळी लिहायला जमले नाही. "पांखरा ! येशिल का परतून" ना.वा.टिळक यांच्या कवितेतील प्रसन्नासाठी आजच्या ओळी :
पांखरा येशिल का परतून
मत्प्रेमाने दिल्या खुणांतून
एक तरी आठवून ? पांखरा !
हवेसवें मिसळल्या माझिया
निश्वासा वळ्खून ? पांखरा !
वार्‍यावरचा तरंग चंचल
जाशिल तू भड्कून ! पांखरा !
थांब घेउ दे रुप तुझें हें
ह्रदयी पूर्ण भरुन ! पांखरा !

२८/६/१९७६
सध्या अभ्यास सुरु झालेलाच नाही. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ला एक राउंड झाला. सर्वत्र स्पिरिट आणि फिनाइल चा संमिश्र कोंदट वास येत होता. कोणी पांढरे कोणी पिंगट पांढरे अ‍ॅपरन घालून घोळ्क्यात उभे होते. मग कळले ती नोटिस-बोर्ड समोरील गर्दी होती. मी वेळापत्रक लिहून घेतले आणि त्या घोळक्यात नकळत सामील झाले. तिथेच चार-पाच जणांशी तोंड ओळख झाली. त्या लोकांशी ओळख होई पर्यन्त मी नागपुर शहरात देशमुख काका-काकु, सुनंदा, मेट्रन या व्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हते.
होस्टेल आणि कॉलेज मधलं अंतर फार नव्हत...एक पायवाट आहे...आणि भोवती बोरी..बाभळीची गर्द झाडी आहे....होस्टेलची रुम ठीकठाक आहे....पहिल्या मजल्यावर सहा नंबरची रुम....त्यात दोन आवाज करणारे पलंग....दोन कोपर्‍यात दोन टेबलं...एक लाकडी कपाट त्यात दोन बाजु..एक सुनंदाची एक माझी. एक मोठी खिडकी ज्याचे गज गंजलेत. आणि त्यावर दिमाखात लोंबणारा निळा जाडाभराडा पडदा. जवळच कॉमन टॉयलेट - बाथरुम आहेत. सकाळी आठ वाजेपर्यन्त गरम पाणी येतं. मेस तर एकदम खास आहे....मोठा ब्रिटिश कालीन लाकडी लांबच लांब दोन टेबलं त्यालाच मॅचिंग नवीन तीन चार आठ सीटर टेबलं..अवती भवती..काही स्टुल..काही खुर्च्या. मेसमधे काम करणारे चार मेंचट अन तेलकट आचारी.. एक शिपाई कम हरकाम्या...आणि एक मेट्रन..दिसायला जरी रोड असली तरी आवाज भारदस्त अशा वातावरणात मला किमान चार-पाच वर्ष काढायची आहेत.......मी कपाटात सगळं सामान ठेवलं. नवी चादर ,उशीचे अभ्रे आणि पांघरुण काढले. कपडे वाळत घालायला जागा नव्हती सगळ्यांनी आपल्या खोलीतच व्यवस्था केली होती. सामान बांधले तीच सुतळी मी खोलीत माझ्या पलंगाजवळ बांधली..सुनंदाने बांधली तशी. खिडकी मला खूप आवडली. ती खूप मोठी होती....त्याच्या कठडयावर बसता येत होतं. खिडकितून मावळतीचा सूर्य दिसला की प्रसन्नाची आठवण रोजच येते.
३०/६/१९७६
आज आईला सविस्तर पत्र टाकलय....त्यावरुन सुमीचे पत्र वाचायचे राहून गेल्याचं लक्षात आल. येऊन दहा दिवस झाले नाही तर बाईसाहेबांनी पत्रही पाठवले. मी उत्सुकतेनी पत्र वाचायला घेतले. कुमुदची कॉलेजमधे अ‍ॅडमिशन झाली. सुहासदा शनिवारी येऊन गेला. सुधा आजीची तब्येत ठीक नव्हती पण आता ठीक आहे. आई बाबा ठीक.......नेहमीचाच पत्रातला मजकुर. माझा नागपुरला यायचा निर्णय योग्य ना ? का ठाउक नाही पण माझ्या या निर्णायावर प्रसन्ना फारसा खुश वाटला नाही. माझ्या मनाचे खेळ सुरु झाले.
कॉलेजमधे लेक्चरस सुरु झाले.....सिनिअरस थोडा थोडा त्रास देत आहेत....त्यांची छोटी छोटी कामं कारावी लागतात.....प्रॅक्टिकल्स पण सुरु झालेत...डिसेक्शन सेशनला सारेच घाबरत होते..मलाही दडपण होतच....

७/७/१९७६
बरेच दिवस झालेत डायरी लिहूहू...वेळ मिळत नाही असे नाही...पण काय लिहु सुचत नाही. असो. हॉस्पिटल
मधल्या वासाची सवय झाली..आधी जेवण कसं तरी वाटायच पण आता काही वाटत नाही..सेम तसच डिसेक्शन सेशनला झालं. प्राण्यांचे डिसेक्शन केल्यावर मी कितीदा हात धुवून जेवायला बसायची.....पण हल्ली अ‍ॅनॅटॉमी डिपार्ट्मेन्टला एकटी जायला भितीही वाटत नाही आणि फॉर्म्यालिनचा वासही जीवघेणा वाटत नाही.
थोडक्यात काय मी या वातावरणात रुळू लागले आहे. ग्रुप डिस्कशन ला वेगळीच मजा येते. आज तर नुसते इंट्रोडक्शन झाले....बापरे! कुठून कुठून मुलं आली आहेत. बर्‍याचजणांशी ओळख झाली. कॉलेजमधे एकटं फिरायला भिती वाटते.
कॉलेज ते होस्टेल मार्गावर बर्‍याच मुली भेटतात....हळूहळू ओळख होते आहे.
आज आईचे पत्र वाचून डोळ्यात पाणी आलं. सुनंदाने हेरलं. ती जवळ येऊन बसली. आल्यापासून पहिल्यांदाच आम्ही खूप गप्पा मारल्या. ती कोकणातली. घरी आंब्याची..फणसाची बाग आहे, काजूचा व्यवसाय आहे.म्हणुन ती मला नेहमी काजू खायला देते, मला आज कळलं. तिला बघितले की सुमीची आठवण येते. ती मला दोन वर्ष सिनीअर, तिच्यामुळेच मला इतर सिनिअर कडून त्रास कमी होतो आणि मुख्य म्हणजे माझ्या नोटसचा प्रॉब्लेम सुटला. सुमीने आर्ट्सला अ‍ॅडमिशन घेतली.....आधी ती बी.ए.स्सी करणार होती मग हा बदलं मला आईच्या पत्रातून कळला. प्रसन्ना येत्या शनिवारी येणार आहे....त्याला भेटण्यासाठी मी किती आतूर आहे माझं मलाच माहिती......प्रसन्ना मला कधी एकदा भेटतो असं वाटत आहे.
१०/७/१९७६
आजचा दिवस मी कधीच विसरु शकत नाही..आज अ‍ॅनॅटॉमीमधे पहिल्यांदाच माणसाचा देह कापाकापीसाठी दिला.....समोर पुस्तक ठेउन आकृतीत बघून स्नायु..रक्तवाहिन्या...शोधत होतो...पहिल्यांदा मला मळमळलच...जीवच होत नव्हता...हात धजत नव्हता...मेंदुला पार मुंग्या आल्या होत्या....डोळे मिटून कुठल्या देवाच स्मरण करु या विचारात होते....ग्रुप लीडर निर्विकार चेहर्‍याने..भाजी निवडावी तसे एक एक अवयव शोधुन माहिती देत होता...त्याला अर्थाचत या सर्वांची सवय होती म्हणूनच नवीन बॅचला प्रत्येक ग्रुपला एक सिनिअर ग्रुप लीडर म्हणुन नेमून दिला, तो ही फक्त पंधरा दिवसांसाठीच नंतर आम्हाला आमचे शोध लावायचे....आज तर घशात अन्नही जाईना. यापूढे कुठलीच कविता काय काहीच आठवत नाही आहे. एक मुलगी तर चक्कर येऊनच पडली. परत येतांना चौफेर नजर फिरवली तेव्हा सगळी कडे प्रेतच प्रेत सॉरी बॉडीज़ होत्या....कुणी तरुण, कुणी म्हातारं, कुठून आले असतील हे सारे....त्यांच्या उरल्या-सुरल्या निष्प्राण अस्तित्वावर आम्ही मेडिकलचे स्टुडन्ट्स घाला घालत होतो, ते केवळ "व्हॉट इज़ इनसाईड ह्यूमन बॉडी ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी. काही जणांना ही कापाकापी खूप आवडते...काही नवीन सापडलं तर धावत धावत येऊन सगळ्यांना सांगतात.
१५/७/१९७६
प्रसन्नाला भेटून खूप छान वाटलं. पहिल्यांदा त्याने मला एक घड्याळ भेट दिले....त्याला माहित होते प्रियकराकडून भेटवस्तु घेणे...हॉटेलमधे जाणे....मला फारसे पटत नव्हते....माझा रिझल्ट..मेडिकलची अ‍ॅडमिशन सगळं मिळून दिलेली ती भेट मला खूपच आवडली. मी किती वेडी त्याच्यासाठी काहीच आणले नाही....तेव्हा त्याने उद्या येतांना तुझी माझी भेट व्हावी ही कविता मला लिहून मला भेट दे असे म्हंटल्यावर मला केवढा आनंद झाला मी शब्दात सांगू शकत नाही. खरचं मला कळतच नाही....मी एखादं पेन त्याच्यासाठी नक्कीच घेऊ शकली असती......अश्यावेळेस माझं डोकं चालतच नाही. आज सुमीची आठवण आली,ती असती तर हे घेऊन ठेव ते घेऊन ठेव केलं असतं. सुहासदाल तर ती कायम काहीना काही भेटवस्तु देत असते.
येतांना प्रसन्नासोबत बाबांनी पैसे पाठवले ...आईने खूप सारा खाउ पाठवला तो तर या चिमण्यांच्या तावडीत दोन दिवसात पार होणार.
खूप वेळ आम्ही निशब्द होतो....खूपशा आणाभाका...शपथा यावर दोघांचाही विश्वास नव्हता....साक्षीला आमची आमच्यासाठी धडधडणारी ह्रदयेच पुरेशी आहेत...खरच इतकं समजुतदार आणि शब्दांच्यापलीकडच आमच प्रेम कुणाला कळावं असेही कधी वाटले नाही. ते फक्त आमचं आणि आमच्यासाठी होतं.

२८/०७/१९७६
माझा पत्रव्यवहार घरी आईबाबा-सुमी,कुमुद-प्रसन्ना नियमित सुरु आहे....मी आता मेडिकल कॉलेजमधे चांगलीच रुळली आहे....माझी भिती तर कुठल्या कुठे पळाली....आता अ‍ॅनॅटॉमीमधे मी एकटीपण जाऊ शकते...थँक गॉड तशी वेल अजून आली नाही.
मला लायब्ररीत जाउन अभ्यास करायला आवडतं...मी तास न तास तिथे बसायची नोट्स काढायची...
माझ्यासारखीच एक कला नावाची मुलगी पण तिथे येऊन तास न तास बसली असायची माझी अन तिची छान मैत्री झाली...
मात्र रोज रात्री डायरी काढली की मला घरची आठवण येते....त्या गप्पा....समिती....आईबाबा...सगळ मी खूप मिस करत होते आणि एकेक क्षण मागे सोडत पुढे जात होते. आज मला बाबांनी सांगितलेल्या वाक्याचा खरा अर्थ कळला.....नव्या प्रवासात जुने काही आवडते-नावडते सोडून द्यावे लागते नाही तर प्रवास क्लेषदायक होतो...जशी जशी मी या नवीन वातावरणात रुळत होते मला वाटत होते कि माझे जुने क्षण माझ्या मुठीतून सुटत आहेत. आता आहेत काही आठवणी त्यातील बर्‍याच क्षीण झाल्यात.
सुमीने आमचा कॉलेजमधला ग्रुप फोटो पाठवला होता...ती आठवण मी याच डायरीत शेवटच्या पानावर चिटकवुन ठेवली आहे....काही आठवणी आपणच जपायच्या म्हणून....
प्रसन्नाचे पत्र आले.....ते तर मी रोज वाचते...
माझ्या एका किस्स्यावर चार ओळी हा हा हा हा लिहुन पाठवले.....जर तिथे असतो तर तेवढाच हसलो असतो.....मन्या तुझे मेडिकलचे किस्से लिहून पाठवत जा....पण जरा हा म्हणे तो म्हणे....नाही लिहिलेस तरी कळेल मला...मला माझच हसू आले ,खरच त्याला पत्र लिहितांना सुचतच नव्हते..एक तर पहिल्यांदाच लिहित होते आणि दुसरे म्हणजे मी नावांसकट त्यात प्रत्येकवेळेस "म्हणे" जोडून लिहिले होते....प्रत्यक्षात बोलणे वेगळे आणि लिहिणे वेगळे तेव्हा मला कळले मी तावातावत खूप बोलू शकते पण लिहू शकत नाही...हा माझ्याबद्दल मला शोध खूप दिवसांनी लागला...होतं मला असं अधूनमधुन..मलाच मी उमगते कधी कधी.

१४/०८/१९७६
आज माझा वाढदिवस. आज मला भेटायला आईबाबा दोघेही आले होते..अख्खा दिवस मी बाहेरच होते.
आईने काय काय आणले..नवे ड्रेस...खायचे पदार्थ...मला भेटून आई आनंदात होती पण तिची तब्येत बरी वाटली नाही. थोडी रोडावली होती.
इतक्या दिवसांनी भेटल्यावर काय बोलायचे सुचतच नव्हते....माझा मागचा वाढदिवस किती छान साजरा केला होता....यावेळेस....ज्या लोकांना माहिती होत गेलं त्यांनी विश केले....पण कोरड्या मनाने...
का कोण जाणे इतक्या दिवसात माझी कोणाशी खास एकदम खास मैत्री जुळलीच नाही.बहुधा मीच टाळते, मला उगीच वाटून गेले. जाता जाता आईची सुचनांची यादी वाचणे सुरु झाले आणि जड अंत:करणांनी दोघे वर्धेला रवाना झालेत.
आईबाबांना सोडून आले तेव्हा पोर्चमधे कला भेटली...चेहरा केवढा रडवेला झाला होता तिचा....ती धावतच तिच्या खोलीकडे जातांना मी बघितले...तिची खोली दुसर्‍या मजल्यावर...पण जाउन तर बघायलाच हवे..
रस्त्यात तिची रुममेट सावित्री दिसली. दोघींनी तिला खूप विचारायचा प्रयत्न केला पण पठ्ठी काहीच बोलली नाही. शेवटी मी माझ्या रुममधे निघून आले. उद्या बोलू तिच्याशी असे मनोमन ठरवले.
प्रसन्नाचे वाढदिवसाचे शुभेच्छा कार्ड आले त्याच्यावर हात फिरवतांना मला क्षणभर त्याचाच भास झाला.
किती छळतात हे आभास. मी ते कार्ड उशीखाली ठेऊन झोपली.

१८/०९/१९७६
बाबा भेटायला येउन गेले आणि डायरीची आठवण झाली..बाबांनी काही फोटो आणलेत, मी ते या डायरीत चिपकवून ठेवले....मी खाली नाव ,तारीख लिहिणार होते.. मग वाटले माझीच डायरी माझ्यासाठी म्ह्णून कुठलाच तपशील न लिहिता तसेच ठेवले. त्यात एक प्रसन्नाचा फोटो आहे. सुनंदाने मला डायरीबद्दल विचारायचा खूप प्रयत्न केला..मझ्या आधीच्या आयुष्याची खूप विचारपूस केली...पण मला काहीच सांगावसं वाटलं नाही, कदाचित ती इतकी क्लोज आली नसावी...कारण मलाही माहित नाही पण सांगावस वाटलं नाही. खरच सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर नाही करु शकत..मुख्य म्हणजे मलाही आवडत असं अव्यक्त रहायला. बाबांना मला सोडून जातांना गहिवरुन येतं. आज तर ते माझा हात सोडत नव्हते.

२४/१०/१९७६
मेडिकलला आल्यावर सणवार सगळं विसराव लागतं..मला तर एकादशी..नवरात्र आले गेले कळलेच नाही. दसर्‍य़ाची तेवढी सुट्टी होती..तरी गंधे सरांनी वर्ग घेतलाच. चतुर्थी तेवढी लक्षात रहायची कारण त्यादिवशी मेस मधे साबुदाणा खिचडी आणि वडा मिळायचा. आता मेस मधलं जेवण आवडायला लागलं. आम्ही तर घरच जेवलो तर नक्की अपचन होईल मिस्कीलपणे म्हणायचो...मेट्रनला सगळे गिलहरी म्हणायचे...मी पण म्हणायला लागले..का तर ती खारीसारखी झपाझप आणि तिरकी चालायची...एका लठ्ठ आचार्‍याला आम्ही गेंदाफुल म्हणायचो तर शिपायाला सगळे सलाम म्हणायचो तो ज्याला त्याला सलाम करत फिरायचा.
आज कलाबद्दल खूप चौकशी केली पण ती सुट्टी घेउन घरी गेली ती अजून आली नव्हती...ती का गेली कोणाला काहीच माहित नव्हते. सावित्रीला काहीच माहित नव्हते. आज ओपीडीत फ्रॅक्चरच प्लास्टर कसं बांधायचं ते शिकवलं.
सुरवातीला मला जमेना. सिस्टर नंदा यात एक्स्पर्ट.....तिने सांगितले आणि मला जमले......हळूहळू इथल्या स्टाफशी मैत्री झाली....काही स्वभावानं खूप चांगले...आम्हाला मदत करणारे..कोणी आमची मजा पहाणारे...रोज नवीन अनुभवाचा डोज़ मिळायचाच.
३१/१०/१९७६
दिवाळीच्या चार दिवस सुट्ट्या मिळाल्या मी वर्धेला आजच निघणार होते पण बाबांना मीच घ्यायला येउ नका म्हंटल...पोहचायला रात्र झाली असती म्हणून मी उद्या सकाळी निघायच ठरवलं....बरीच जण गावी जाणार होती काही गेली पण होती. प्रसन्ना परवाच वर्धेला पोहचला होता...माझ्यासाठी सरप्राईज आहे असे पत्रात लिहून पाठवले होते. मला त्याला केव्हा भेटीन असे झाले होते. उद्या मी माझ्या घरी असणार हा आनंद माझ्यातच मावत नव्हता. सामान विशेष न्यायचे नव्हते, असं म्हणता म्हणता बरच सामान घेतलं. चादरी धुवायच्या होत्या, ड्रेसेस धुवायचे होते. एक क्षण वाटलं हा पडदा घेऊन जावा आणि गौराबाईकडून स्वच्छ करुन आणावा.

३/११/१९७६
वर्धेला आली काय झाले जायची वेळ पण जवळ आली..दिवाळी छान झाली.....कुमुद सुमी किती बदलल्यात.
कुमुद तर काहीच बोलली नाही...काका-काकुंच्या आग्रहास्तव दुसर्‍या लग्नाबद्दल मी तिच्याशी बोलून पाहिलं
पण पहिली जखम तिने ओलीच ठेवल्याचे मला आणि सुमीला लक्षात आले...ते सुख तिच्या नशीबी नाही हेच धरुन बसली आहे....तिला समुपदेशकाची गरज आहे मला लक्षात आले पण माझ्या जवळ इतका वेळ नव्हता. सुमी-सुहासदाचे लग्नाची तारीख निघाली....एप्रिल महिन्यात...तिचे शिक्षण ती आता चंद्रपूरला जाउन पूर्ण करणार म्हणे...मला खूप आनंद झाला.
प्रसन्नाने विचारले आपले काय ? मी निरुत्तर झाले. खरच आमचं काय ? मी या बद्दल कधी विचारच केला नाही. मी अजून एम बी बी एस ची पहिली परिक्षा दिली नाही....
गम्मत केली असे जरी प्रसन्नाने म्हंटले असले तरी एक काळजी त्याच्या डोळ्यात तरंगून गेल्याचे मी बघितले.
माझं सरप्राईज कुठे ? मी उत्सुकतेने विचारले. तोच त्याने माझ्या हातावर एक बॅग ठेवली....त्यात खूप सुंदर साडी होती.
कोसा..खूप महाग असेल ना ? मी बावळटपणा केलाच. अरे मी कुठे नेसते साडी ? मग नेस. मला जाम आवडली, वाटलं तू यात खूप सुंदर दिसशील म्हणून घेतली. अर्धे पैसे आईनी दिले....ग्रेट ते पण सांगितलं. मी साडी वैगरे घेतो नाही सांगितले....थोडे पैसे कमी पडतात म्हटल्यावर तिनेच दिले. माझ्यासाठी हे पण सरप्राईज़च होतं.
१८/११/१९७६
आज खूप दिवसांनी डायरी लिहायला वेळ मिळाला. कॉलेजमधे आल्यावर कलाबद्दल जे कळले ते माझ्या मनाला पटणारे नव्हते...मला अजूनही तिने आत्महत्या केल्यावर विश्वास बसत नाही आहे. ती अतिशय हूशार होती. आम्ही लायब्ररीत किती गप्पा मारायचो. खूप चर्चा झाली या विषयावर...पण खर कारण काय आहे ते कोणालाच ठाउक नव्हते. तिची रुममेट सावित्रीकडून सुनंदाला बरीच माहिती मिळली. खरतर मला असल्या प्रकरणात रस नाही... आत्महत्या म्हणजे माझाच जीव थरथरला....असं काही आयुष्यात घडावं की आपलाच जीव आपल्याला जड व्हावा...जीव घेतांना किती यातना झाल्या असतील तिला.....हा विचार येताच अंगभर शहारे आलेत.
थोडक्यात प्रेमप्रकारण.....प्रेमाने जीव घेतला...कन्डोलन्स मधे फारशी कुणाशी न बोलणार्‍या कले बद्दल अजून बरीच माहिती कळली...आणि एका अबोल-समंजस-अवेळी जीव जाणार्‍या देहाला मी श्रध्दांजली वाहिली...

१५/१२/१९७६
भरपूर आभ्यासामुळे आजकाल डायरी लिहिणे जमतच नाही. "वेळ मिळेल तसं लिहिणार" निदान हा नेम तरी मी चुकवणार नाही...कारण हल्ली मनातले बोलून सांगण्यापेक्षा लिहिणे मी जास्त पसंत करते. त्याने मनातले ओझे जरा तरी कमी झाल्यासारखे वाटते. इथे मेडिकलला आल्यापासून एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे, मी एवढी मनमिळाउ...धीट.. मी इथल्या वास्तुत रुळली....वातावरणातही रुळली ,पण कळत नकळत माणसात रुळलीच नाही. किंवा मी नवीन लोकांमधे गुंतण्याचा फारसा प्रयत्नच केला नाही. माझे मलाच कळत नव्हते. प्रसन्नाची बरीच पत्र आहेत रोज झोपायच्या आधी न विसरता वाचते....बहुतेक आईबाबांना आमच्या दोघांबद्दल कळले असा माझा अंदाज आहे. कारण गेल्या आठवड्यात बाबा भेटायला आले आणि त्यांनी मला विविध प्रकारे विचारायचा प्रयत्न केलेला मला आठवतो आहे. कधी कधी या गोष्टींचा विचार केल्यावर मन सुन्न होउन जातं. सुमी-सुहास सारखी आमची प्रेमकथा यशस्वी होणार ना ? उगाच मनात कसले कसले विचार यायचे.......भविष्याचे स्वप्न दोघांनी मिळून बघितले...ते दोघांनीच पूर्ण करायचे. प्रसन्नाचे हे वाक्य आठवले की मनात गोळा झालेले सारे मळभ अलगद दूर होउन जातात.

२८/१२/१९७६
कल्चरल अ‍ॅक्टिवीटी साठी सहा जणांसोबत माझी पण नेमणुक झाली आहे. २७मार्चला आमचा इमारतीला
एकवीस वर्ष पूर्ण होतील म्हणून एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. आता आभ्यासासोबत ही जवाबदारी पण पेलावी लागणार. आज ग्रुप डिस्कशन मधे रणजीत केवढा चिडला होता..कुमार आणि त्याची बाचाबाची नेहमीचीच....पण कलाचा विषय निघाला आणि सगळ्यांचा मूडच बदलला....बहुतेक या सर्वांना तिच्याबद्दल माहिती होती....मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला...पण कुठून माझ्यातली उत्कंठा ओठावर आली आणि उत्सुकतेने मी तिच्या आत्महत्येच कारण विचारलं.
मी ऐकून एक क्षण स्तब्धच झाले...एवढा मोठा झंझावात तिच्या आयुष्यात आला आणि सोबत तिलाच घेउन गेला. आधी तिची कीव आली , नंतर मात्र खूप राग आला.....मोलाचे जीवन तिने सहज संपवले तेही त्या संपावण्यासाठी बाध्य करणार्‍या नराधमाला कुठलीच शिक्षा न करता.
या प्रकरणात शशिकांत दवेसरांचे नाव पुढे आले आणि कलाच्या आईवडिलांनी तक्रार करता आजच त्यांना मेडिकल कॉलेजमधून निलंबित केले होते. पण एवढीच शिक्षा पुरेशी आहे....यावरुन रणजीत आणि कुमारच वाजलं....कोणाततरी अन्यायाविरुध्द मनात त्वेष धगधगत आहे हा विचार माझ्या मनात आला आणि बरं वाटलं. पण दवे संरांचे हात बरेच लांब होते..फारशी चर्चा न होता हे प्रकरण लवकरच आटोपण्यात आले. हे आटोपशीर घेणार्‍यांची मला खूप चीड आली.
आपल्याच भोवताली कसल्या प्रकारचे लोकं रहातात आणि आपण किती अनभिज्ञ असतो. या प्रकरणापासून मी मात्र सर्वांमधे मिसळू लागले...इतरांबद्दल माहिती घेऊ लागले. माझ्यातला हा बदलं मलाच आवडला.

१०/१/१९७७
दिवस भराभर पूढे सरकत होते. कुमुदचे पत्र वाचून छान वाटले. आता तिची गाडी बर्‍यापैकी रुळावर आलेली दिसतेय. कॉलेज करता करता ती वर्धेच्या एका आश्रम शाळेत लहान मुलांना शिकवायला जाते हे वाचून ती कुठेतरी गुंतते आहे याच समाधान वाटलं. आचार्यबाईंच तर तिच्या शिवाय पानही हालत नाही. ती पूढच्या आठवड्यात नागपूरला समितीच्या कामासाठी येणार आहे..भगिनी सभागृह..धंतोलीला आहे...एखादे प्रॅक्टिकल चुकवून भेटून येईन. कॅलेंडरवर नवीन वर्षांच पान केव्हाच बदलले.....यंदाही मला कळलेच नाही. आईला बरं नसल्याचा निरोप मिळला तेव्हा पासून कशातच लक्ष लागत नव्हत....उद्या सकाळी वर्धेला जाउन बघाव लागणार....
मी नागपूरला आल्यापासून आई एकटी पडली असेल...केव्हा एकदा घरी जाते आणि आईला भेटते असे झाले आहे.

१७/१/१९७७
आईला भेटून बरे वाटले. बाबांचा नोकरी सोडण्याचा निर्णय मला फारसा पटला नाही. परवा बाबा नागपूरला मुलाखतीसाठी येणार आहेत. बघु काय होते ते. लिमये काकांचे भाऊ एका कॉमर्स कॉलेज मधे लेक्चरर आहेत...त्यांनीच बोलावले होते.
आईचे काय , नागपूर म्हटलं तर लगेचच तयार होईल. बरेच दिवसांनी आम्ही एकत्र जेवण केले. आईने माझ्यासाठी माझ्या आवडीची गूळपोळी केली.....रात्री अंगणात पत्ते खेळलो. गप्पा झाल्या. सकाळी मी निघाले तर आईच्या डोळ्याला आसवांची धार लागलेली.

२२/१/१९७७
आज मी आणि बाबा कॉफी हाउस मधे भेटलो. बाबा जरा गंभीर वाटले. नोकरी सोडण्याच जवळ जवळ त्यांच निश्चित झाले आहे. जी.एस. कॉमर्स कॉलेज मधे लेक्चरर चा जॉब आहे..पगारपण चांगला...आम्ही नागपूरला येउ...तुझे शिक्षण व्यवस्थित होईल. काय मग हो म्हणू ? आई तर एका पायावर तयार आहे. हो म्हणतो.....तीन महिन्याचा नोटीस पिरेड....नवीन सेशन ला जॉइन होतो. किती सहजपणे या कॉफी शॉप मधे आमच्या भविष्याचा, आमचे आयुष्य बदलवणारा एक मोठा निर्णय झाला. बाबांच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून मला ही आनंद झाला. वर्धेच घर भाड्याने द्यायचे ठरले. हे आता जरी सोपे वाटत असले तरी वर्धा सोडतांना त्यांना किती त्रास होणार याची मला कल्पना आहे.
माझ्या आयुष्यातला हा पहिला निर्णय प्रसन्नाला न सांगता सवरता घेतल्याचे मला वाटले.

२२/२/१९७७
संक्रात आली आणि गेली...कुमुद्ची भेट आज का आठवली माहित नाही. आधी सतत हसणारा चेहरा आता गंभीर झाला होता...आयुष्याकडून आता तिला कुठलीच अपेक्षा नव्हती...एक प्रसंग माणसाल केवढा बदलून टाकतो...कुमुद कलासारखी भित्री निघाली नाही याचे मनात कुठेतरी समाधान होते. आजही थरथरणारी कुमुद आठवते तिने जे सांगितले ते आज आठवले तरी अंगावर काटा उठतो.....तिने नरक यातना भोगल्या होत्या. आपल्या विलासासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो याचे प्रचिती कुमुदच्या आयुष्यात डोकावल्यावर आली.
केवळ वंशाला वारस मिळावा म्हणुन ते लग्न होते.....नवर्‍याची लफडी ती बघत होती...ऐकत होती...आणि तिच्या विरोधाची शिक्षा तिला बेदम मार आणि मानहानीच्या रुपात मिळाली.
एकीने विरोधच केला नाही...एकीने केला तर त्याची शिक्षा भयंकर भोगावी लगली. पण ती त्या नरकातून सुटली..मात्र आधीची कुमुद मात्र हरवून गेली.

२५/२/१९७७
प्रसन्नाच्या पत्रात आमचे नागपूरला येणे त्याला कितपत रुचले-पटले काहीच कल्पना येते नव्हती. आईबाबांच्या येण्याने सुधाआजी एकटी पडणार होती. प्रसन्नाला या बद्द्ल काहीच विचारले नाही किंवा सांगितले नाही का कोण जाणे मला रुखरुख वाटत आहे.....खरतर हा बाबांचा निर्णय होता...पण तरी प्रसन्नाला काय वाटेल याचाच विचार करत होती. आई मात्र नागपुरला जायचे ठरल्यापासून खूप आनंदात आहे. प्रसन्नाची प्रतिक्रिया कळावी म्हणून पत्राची वाट बघत आहे.. या खेपेस पत्राला खूपच उशीर झाला.
उगाच " थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता" गाणे आठवून गेले. आणि माझ्या लक्षात आले आपण इतक्यात कविता..मराठी गाणे गुणगुणणे विसरलो...कित्येक दिवसात एखादि कविता वाचली नव्हती.
माझे मलाच नवल वाटले...मी मेडिकलच्या अभ्यासात इतके गुंतले की माझ्या आवडी निवडी जपण्याचेच विसरली...असो आता लक्षात आले तर निदान कवितेच्या दोन ओळी तरी लिहू. पण खूप वेळापासून कुठलीच कविता आठवत नाही आहे.
माझ्यातलं मी पण
उलगडत नाही कधी कधी
दुखात होणारे सुखाचे भास
उमगत नाही कधी कधी
फसव्या क्षणातली हुरहुर
आवरत नाही कधी कधी
अधीर भावनांना टिपण्याचा
धीर होत नाही कधी कधी
अव्यक्त संवेदना शब्दात पकडणं
जमत नाही कधी कधी
सगळ्यांच्याच आयुष्यात
होत का अस कधी कधी?
१०/३/१९७७
प्रसन्नाचे पत्र फारच उशीरा मिळाले.....पण बाबा नागपूरला स्थायिक होणार याचा त्याने आनंदच व्यक्त केला होता.......सुधाआजी म्हणजे आम्ही नकळत आणि सहज स्विकारलेली जवाबदारी. आम्हा सर्वांचेच नागपूरला येणे म्हणजे सुधा आजी एकटी पडणार नेमकी हीच जाणीव मला टोचत आहे हे माझ्या लक्षात आले. माझा मझ्याशी प्रामाणिक संवाद मला बर्‍याच प्रश्नांना सोडवण्यात मदत करत असतो.
बाबा कालच नागपूरला आले...आज घराचे नक्की करणार होते...पण नेमका आज माझा बॉडी डिसेक्शनच्या दुसर्‍या टर्मचा पहिलाच दिवस होता. मी तुम्हाला आवडले तर फायनल करा सांगून मोकळे झाले. जाता जाता बाबा गॅसचा नंबर पण लावून गेलेत. बापरे बाबा शिफ्टींगसाठी किती एक्साईट आहेत. मला तर मझ्या अभ्यासातून वेळच होत नव्हता. त्यात कार्यक्रम जवळ येते होता. आमचे नाटक बर्‍यापैकी बसले होते. ते वेळेवर फसले नाही म्हणजे मिळवली.

२९/३/१९७७
कार्यक्रम छान झाला ...मलाच हायस वाटलं. बर्‍या टाळ्या पडल्यात.
.....सुमी-सुहासच्या लग्नाची तारीख जवळ आली...आईने नेहमीप्रमाणे माझे कपडे..वैगरे सगळीच तयारी करुन ठेवली असेलच....मला या गोष्टींमधे कधीच रस नव्हता.
आणि आई हे सगळं करुन ठेवायची. तिने सांगितलेले मी निमुटपणे घालायची. सुमीने किती वेळा खरेदी बघायला बोलावले होते पण जमतच नाही. झाले पंधरा वीस दिवसात होस्टेलही सोडावे लागणार...पण सोडतांना अजिबात दु;ख वैगरे होत नाहीए आहे....कदाचित रहायला जरी बाहेर गेले तरी या शिकायला या वास्तुतच यायचे किंवा मी कोणातच न गुंतल्यामुळे मला काहीच वाटत नसावे. फक्त होस्टेलमधल्या आतल्या बातम्या कळणार नव्हत्या...कदाचित नोट्स मिळायला त्रास होईल एवढच.....सुनंदाला सोडतांना फार त्रास झाला नाही. तशी ती कॉलेजमधे भेटणारच आणि आमची मैत्री तशी खूप गहिरी झालीच नाही. आता जेवणाचे हाल होणार नाही, मेट्रानचा करडा आवाज कानावर पडणार नाही,आंघोळीसाठी नंबर लावायची गरज नाही.

१२/४/१९७७
सुमी-सुहासदाचे लग्न आटोपले....सुमीने लग्नात सर्व हौस पूर्ण करुन घेतली....सुहासला हट्टाने नाव गार्गी ठेवायला लावले. तेव्हा मला कळले बाईसाहेबांना माझं नाव खूप आवडायचे......पण सुमी इतक तोंडात बसले होते की कोणी गार्गी म्हणेल असे वाटत नव्हते.....लग्नाला प्रसन्ना आला होता. त्याचे एन.डी.ए मधे इंटरस्टेट स्पर्धेत सिलेक्शन झाले....त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.....माझं लक्ष सुमीच्या लग्नात कमी आणि प्रसन्नात जास्त होते....लग्न लावून मी त्याच दिवशी नागपूरला परतले. सुमी पाठवणीला रडलीच नाही म्हणून नातेवाइकांनी बराच गोंधळ घातला...पण त्या नवरा नवरीला कसलीच फिकिर नव्हती.....चारदिवसात मांडवपरतणी आटपून ती चंद्रपूरला गेली. अर्थात हा वृत्तांत मला नंतर कुमुद कडून कळला.
तिकडे आईबाबांची नागपूरला यायची तयारी सुरु झाली. ते पण लग्नासाठीच थांबले होते. सगळ्यात वाईट जर कोणाला वाटत असेल तर ते सुधाआजीला.....आजीची तब्येत ठीक नसते आणि सध्या त्यांना सोबतीची गरज आहे. बाबांनी त्यांच्या मुलींना कळवले होते....त्यातली मुंबईची सुगंधा आत्या येणार आहे आणि सुधा आजीला घेउन जाणार असे कळवले. आईबाबांना तेवढेच बरे वाटले.

२५/४/१९७७
सर्वांचे निरोप घेउन आईबाबा नागपूरला आलेत...धंतोलीतले ते घर छोटसच आणि टुमदार आहे. आम्ही तिघांनी घर लावले...सजवले...अंगणात बाग तयार केली आहे....नवीन रोपे आणायला हवीत. माझी खोली लावतांना आई माझ्या बोन सेट ला काय घाबरली. मी तो खुंटीला अडकवुन ठेवला तर तिने तो मला काढायला लावला.
केव्हाची ती घरभर गंगाजल शिंपडत आहे...मी आणि बाबा खूप हसलो..शेवटी तो सेट माझ्या खोलीला लागुन जिन्याची खोली आहे तिथे ठेवायचे ठरले. आता प्रश्न आहे तो माझ्या कॉलेजला येण्या जाण्याचा. होस्टेलला राहिल्यामुळे नागपूरची, तिथल्या रस्त्यांची ओळख झाली नव्हतीच. बाबांनीच बस बसस्टॉपची चौकशी केली...आणि माझे बसने येणे जाणे सुरु झाले. घरुन थोडं लवकरच निघावं लागत आहे...खाण्यापिण्याचे हाल संपलेत त्याचा आनंद जास्त आहे.
२९/४/१९७७
"आता मात्र आईबाबांना सांगावच लागणार" प्रसन्नाने माझ्याच ओळी मला परत पत्रात लिहून पाठवल्या " मला वाटले तू वाघिण आहेस खानोलकरांची, देवदत्ताला सांगण्याचे धाडस नाही का तुझ्यात ?" या ठळक अक्षारातील ओळीतून मी काय अंदाज बांधायचा.....सरळ सरळ जाउन सांग....मला काहीच कळत नव्हते....कसे सांगू.....तर पत्राच्या मागच्या बाजुला त्याने लिहुन पाठवलेले मला दिसले...."भिउ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" याच्या मिस्कीलपणाची आता कमाल झाली . अग तू नाही सांगितले तरी त्यांना कळणारच कारण आता तुला मी पत्र होस्टेलला न पाठवता घरी पाठवणार...सांग कुठे पाठवू घरी की होस्टेल ला?
नको होस्टेलला नकोच तिथे तर सगळेजण यावरुन मला छळ छळ छळतील, आणि पूढचे शिक्षण कठीण होउन बसेल. त्यापेक्षा घरी सांगितलेले बरे. खरतर मला त्यांना खूप सांगायची ईच्छा आहे पण कसं सांगणार या भितीने कधी धीरच झाला नाही.
शेवटी मी आईबाबांना सांगायचे ठरविले.....बहुतेक आईबाबा हरकत घेणार नाही...अस राहून राहून वाटत होतं....गेल्या वर्षभरात माझी धीटाइ कमी झाल्याचे मला वाटले....हा माझ्यातला बदलं मला मान्य करावसा वाटत नव्हता...मग संध्याकाळी आईबाबांना मी सगळा धीर गोळा करुन प्रसन्नाबद्दल सांगितले.......पाच सात मिनीटे दोघं काहीच बोलेना....माझा पडलेला चेहरा बघून मग बाबाच मिस्कील हसले....आणि आईने तर तिला शंका असल्याची गुगलीच टाकली......
आज मला खूप हलकं आणि मोकळ वाटत आहे.....मनावरच ओझ कमी झाल्यासारख वाटलं. मुख्य म्हणजे आईबाबांनी ते न कुरकुरता स्विकारले, मला इतर आईवडिलांप्रमाणे कुठलेच दुषण दिले नाही....यासाठी पाठवले का शिक्षणाला वैगरे....अशावेळेस घरच्यांनी समजून घेणे फार महत्वाचे आहे आणि माझ्या घरच्यांनी घेतले त्याचा मला अभिमान वाटत आहे...आणि आज आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवण्याची खंत...अपराधीपणाची बोच आपोआप निवळली.
आता मला आमचे प्रेम यशस्वी होणार वैगरे काळजी कधीच वाटणार नाही.
कित्येक दिवसांनी मी मोकळेपणानी डायरी लिहिली.....पुन्हा नव्याने आयुष्याची घडी बसली....
खूप दिवसांनी कवितेचे पुस्तक हाती घेतले....आणि बोरकरांची क्षितिजी आले भरते गं ही कविता आठवली
क्षितिजी आलें भरते ग
घनात कुंकुम खिरते ग
झाले अंबर
झुलते झुंबर
हवेत अत्तर तरते ग

लाजण झाली धरती ग
साजण कांठावरती ग
उन्हात पान
मनात गान
ओलावुन थरथरते ग

नातें अपुलें न्हाते ग
होउन ऋतुरस गाते ग
तृणात मोती
जळांत ज्योती
लावित आले परते ग
>>>>>>>>>>>>>>>>>>>.............<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

नचिकेत ए नचिकेत......अनुने खूपदा आवाज दिला......पण तो गाढ झोपला होता...तिने हळुच डायरी बाजुला केली ए.सीचे टेम्परेचर वाढवले.....आज तर त्याची ऑफिसला दांडीच आहे.
तो डायरी वाचून काय विचार करत असेल.....नेमकी आजच तिला गाईडने बोलावले नाहीतर नचिकेतला सोडून जायची तिला ईच्छा होत नव्हती. खरं प्रेम काय असतं हे तिला डायरी वाचूनच कळलं होतं आणि आपल्या सासुबाईंचा तिला मनोमन खूप अभिमान वाटला. त्यापेक्षाही ग्रेट म्हणजे बाबा....काहीच न बोलता त्यांनी सार सावरलं किती मोठ मन म्हणाव त्यांच. आपल्या आयुष्यात अस काही घडेल तिला वाटलच नव्हतं. खरच किती आगळी वेगळी जगा वेगळी प्रेमकहाणीचा आपण निसटता का होईना एक भाग आहोत याचा तिला आनंदच होत होता.
आजी...तुमचा स्वैयंपाक झाला आहे....तुम्ही आणि आजोबा औषधं घ्यायला विसरु नका.....आजोबांच कानाच मशीन त्यांना लावून देत अनु सुचना देत होती.
टी.व्हीवर साममराठी चॅनल लावून ठेवलं..आजींना रिमोट ने लावाता येत नाही.....न विसरता अनुने सारी काम उरकलीत. आजी मी येतेच चार वाजेपर्यन्त...नचिकेत उठला की तो त्याचं घेईल खाउन तुम्ही काळजी करु नका....आजी आपल्या नातसुनेकडे कौतुकाने बघत होत्या.
तेवढ्यात नचिकेत उठलाच...त्याला चहा नाश्ता देउन अनु तयार झाली. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव टिपायचा ती प्रयत्न करत होती..पण तो ट्रान्समधे हरवला होता हे बघून ती काहीच बोलली नाही.
नचिकेतने सांगितले पोहचली-निघाली की फोन कर....फोन सायलंट मोडवर टाकुन त्याने परत डायरी वाचायला घेतली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुंतवुन ठेवले आहे या कथेने. रोज वाट बघत असते. पुढचे भाग पटापट येऊ द्यात. माझ्या निवडक दहात Happy

अंजली नमस्कार.....आधीचे भाग....हितगुज ग्रुप गुलमोहर कथा/कादंबरी मधे आहे

कथे खरेच खूप छान सुरू आहे. आवडली.
पण एक दोन गोष्टी खटकल्या <<त्याच्या बाबांचा सैन्यात दरारा होता.....मुंबईमधे दहशतवाद्यांच्या हल्यात त्यांचा एक पाय निकामी झाला. म्हणून आई वर्धेला येऊ शकली नाही.>> ७७ साली मुंबईत दहशतवादी हल्ले झाले नव्हते.
आणि दुसरे म्हणजे << मेडिकलच्या प्रवेशपरिक्षेच्या निकालावर सार अवलंबून होतं. >> त्यावेळी मेडिकलला प्रवेश परिक्षा नव्हती.
अर्थात या दोन्ही गोष्टींचा कथानकाशी काहीही संबंध नाही आहे. पण तरिही खूपतातच .
क्रुपया गैरसमज नको. प्लीज दिवे घ्या.

रितेश नमस्कार, खरतर कादंबरीतील कथान पूर्णतः काल्पनिक आहे. पण आपण नमूद केले तसे दहशत वाद्यांचा हल्ला आणि प्रवेशप्रक्रिया....ही कादंबरी पूर्ण झाली आहे. कथानकात आवश्यक तो बदल नक्कीच करेन.आणि माझ्या पूढच्या लेखनात तत्कालीन वास्तव्यशी साधर्म साधण्याचा प्रयत्न करेन
परत एकदा धन्यवाद