"शोध कवितेचा"

Submitted by आशूडी on 30 July, 2012 - 03:33

'कविता' म्हटले की तीन ताड लांब जाणारी मी आणि माझ्यासारखे अनेक जण असतील. याला दोन करणे असू शकतात. एक म्हणजे अत्यंत प्रतिभावान कवींच्या अप्रतिम कविता -त्यांच्या उच्च आशयगर्भतेमुळे आणि माझ्या थिट्या ग्रहणशक्तीमुळे न उमगणे. दुसरे म्हणजे पावसाळ्यात जसे सगळीकडे स्वाभाविक हिरवे रान फुटते तशा प्रसंगोत्पात तसेच शीघ्रकवितांचा जाच. कविता कशी वाचता वाचता उमलत जायला हवी. दुसऱ्याने समजावून सांगितलेल्या कवितेच्या अर्थात काय अर्थ? ही उगाचच असलेली शेखी. त्यामुळे आम्ही कवितांच्या वाट्याला मुळी जातच नाही. मनातल्या मनात मात्र, सुंदर सुंदर कविता ज्यांना तोंडपाठ असतात, अर्थ समजतात, त्या शब्दांची खोली, उंची जे नीट मोजू मापू शकतात त्यांचा किंचित हेवा वाटत असतो. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असे ओळखून आम्ही आपले क्रमिक पुस्तकात शिकलेल्या,त्याही अर्धवटच आठवणाऱ्या कवितांवर समाधान मानतो. वर, छोट्या पोरासोरांपुढे, आमच्या वेळी... सुद्धा बोलून घेतो.

बऱ्याचदा याहीपलीकडे जाऊन एक कविता असते. आठवणीतली कविता. एखादी कविता वाचनात येते आणि मनात घर करून बसते. कधी ती आपलीच एखादी अलवार आठवण जपत असते तर कधी ती आपल्या एखाद्या स्वप्नांचे रंगच पुढ्यात मांडून बसते. तिचा तो हट्ट, आविर्भाव फार देखणा असतो. हुसकून न लावता येणाऱ्या गोंडस चिमुकल्यासारखा. ती कविता इतकी आवडते कि मनात तिची एक प्रतिमा, एक रुपडं तिच्या चालीसकट जिवंत होतं. खूप दिवस आपण तिला गुणगुणत राहतो आणि मग रोजच्या धबडग्यात तिचं बोट सुटतं. ती हरवलेली आपल्याला कळतही नाही. लक्षात येतं तेव्हा अर्थातच खूप उशीर झालेला असतो. अब आपको दवा कि नही दुआ की जरुरत है, हे आपलं आपल्यालाच कळून चुकतं. ना शब्द आठवत असतात, ना कवी! नाव विसरलेले अत्तर शोधण्याचा प्रकार हा! सांगणार कसं? इथे सुरु होतो "शोध कवितेचा!"

'कल्पक' निर्मित 'शोध कवितेचा' हा नितांत सुंदर कार्यक्रम. कवितांवर आधारित असला तरी तुमच्याकडे फारशी कवी वृत्ती असायची गरज नाही किंवा हे हौशीनवकवी संमेलनही नाही. 'जे न देखे रवी ते देखे कवी' असे काहीतरी अद्भुत, चमत्कारिक कवीकल्पनानी सजलेल्या , कवींच्या प्रतिभेची थोरवी गाणाऱ्या लांबसडक क्लिष्ट वाक्यांचा नीरस शोधनिबंधही नाही. कधी ना कधी, कुठेतरी तुम्ही वाचलेल्या, ऐकलेल्या तुम्हाला आवडलेल्या अनेक अजरामर कवितांचा हा काव्यहार! आपल्याला आवडलेल्या अनेक कवितांची रुणझुणती गाणी झाली, पण काही कविता या तशाच दुडक्या चालीत बागडत राहिल्या. किंबहुना त्यातच त्यांचे सौंदर्य आहे. अशा काही निवडक छंदबद्ध, नादमधुर कविता सादर करण्यामागचा हेतू एकच, आठवणींना उजाळा. हे सादरीकरणही प्रभावी, नाट्यमय अन प्रवाही! एकातून एक कविता नकळत ओवत जाणारे. आपल्याला आवडणार्या त्या नाजूक, अल्लड, भावूक कविता आपल्यासोबत आणखी किती जणांना आपापल्या गतायुष्यात घेऊन जातायत हे पाहणे म्हणजे एक अलौकिक अनुभव. त्या कवितांना सुसंगत अशी ती पाठ्यपुस्तकातच केवळ दिसणारी व्यक्तींची रेखाचित्रे वय विसरायला लावतात. आपल्याला शाळेच्या बाकावर नेऊन बसवतात!

उत्कृष्ट संगीत,गायक कलाकार सुरेख नेपथ्य, वेशभूषा आणि हौशी, मेहनती दर्जेदार कलाकार यामुळे मुळातच हिरयासम लाखात एक असणाऱ्या या कवितांना सुवर्णाचे कोंदण लाभले आहे. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना- 'ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करणे' ही तळमळ. आजच्या मनोरंजनाच्या, करमणुकीच्या, माध्यमांच्या,प्रलोभनांच्या चकचकाटातही ज्यांना भुरळ पडणार नाही असा एक वर्ग आहे, तो ज्येष्ठ नागरिकांचा. तेव्हा त्यांचे मन रिझवेल असे काहीतरी करावे अशी तीव्र इच्छा श्री. महेश पाटणकरांची. तेव्हा त्या काळाचे व्यवच्छेदक लक्षण काय, तर तोंडपाठ कविता! मग त्यांच्या या सेकंड इनिंग मध्ये किंवा 'दुसऱ्या' बालपणात त्या कविताच त्यांच्या भेटीला आल्या तर..? ठरले. आणि सुरु झाला 'शोध कवितेचा'. कोणत्याही स्पोन्सरर शिवाय केवळ स्वेच्छेने तयार झालेली ही टीम केवळ अंगभूत कलागुणांच्या व त्यावर घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर रसिकांची दाद घेऊन जाते.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की याकरता कोणत्याही खास रंगमंचाची आवश्यकता नाही! त्यांचा रंगमंच खरोखरीच हलता आहे! विंग पासून पडद्यापर्यंत संपूर्ण सेट केवळ अर्ध्या तासात उभारता येतो. आणि केवळ याचमुळे आजवर चौतीस ज्येष्ठ नागरिक संघात, अनेक गृहसंमेलनात, एकसष्ठी, सहस्त्रचंद्रदर्शन, लग्नाचे वाढदिवस अशा समयोचित प्रसंगी अनेकांना याचा बसल्या जागी आस्वाद घेता आला. काल या कार्यक्रमाच्या एक्कावन्नाव्या प्रयोगाला जाण्याचा योग आला आणि पहिले पन्नास का चुकवले याची रुखरुख लागून राहिली. माझ्यासोबत या कार्यक्रमाला पाचव्यांदा आलेले लोकही होते! खरं सांगायचे तर कुणालाच तो कार्यक्रम संपायला नको होता. अशाच एकामागून एक कविता नाचत पुढे याव्यात आणि आम्हीही त्यांच्या तालावर डोलत राहावे.. कितीतरी वेळ! तेव्हा हा कार्यक्रम फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नसून सर्वांसाठी आहे असा जाहीर निर्वाळा माझ्यासारख्याच अनेक कनिष्ठानीही दिला. या उलट, एकांनी तर अशीही पावती दिली की "या कविता ऐकून आम्ही एकदम साठ वर्षांनी लहान होतो, मग आम्ही ज्येष्ठ नागरिक कसे?!"

तेव्हा सांगायचे कारण, म्हणजे हा कार्यक्रम सध्या तरी विनामूल्य / ऐच्छिक देणगी वर आहे. तुम्ही एकदा पाहून, तुमच्या खास समारंभांना तो आयोजित करून घरातील सर्वांनाच एक अविस्मरणीय अशी भेट देऊ शकता! या कार्यक्रमाला जाण्याची इच्छा असल्यास मला विपु करा, मी पुढच्या प्रयोगाबद्दल जरूर कळवेन. अधिक माहिती हवी असल्यास तीही कळवण्याची व्यवस्था करेन.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.