सचोटी

Submitted by sarati on 29 July, 2012 - 06:10

त्याचे असे झाले ,
त्या दिवशी दिवाळीच्या खरेदी साठी बाहेर पडायचेच होते , हाताला घड्याळ लावले , तर ते बंद पडलेले!
मग जरा आवरा आवर करताना लक्षात आले हीच कथा अजून २ ठेवणीतल्या घड्याळांची ..
मग सगळीच घेतली बरोबर...सेल घालून आणूया म्हणलं...

नेहेमीच्या दुकानात तोबा गर्दी ...( तीही खरं तर नेहेमीचीच ...पण आज दिवाळी ची खास होती )
लगेच मिळतील असे वाटेना ,
दुकानदार आपुलकीने म्हणाला , बाजारात जाऊन या , मी करून ठेवतो,
आणि वाजवीच होते ते, माझाही वेळ वाचत होता , मी चटकन गेले.
साधारण तासाभराने मी पुन्हा दुकानात
मी --घड्याळे दिली होती सेल घालायला ,
दुकानदार -- ( माझ्याकडे न बघता) किती होती?
मी -- तीन
दु -- ही घ्या ...
आणि अरे देवा , शी ही माझी नाहीत ...मी जवळ जवळ किंचाळलेच
मग मात्र एकदम डोक्याला हातच लावला त्याने ...तुमची TITAN ची होती? एक slim watch होतं?
मी आत्ताच दिली एकाला...
माझी घड्याळे त्याने चुकीने दुसऱ्याच माणसाला दिली होती आणि त्याची तीन माझ्यासमोर धरली होती
माझी कशी घड्याळे होती त्याला स्पष्ट आठवत होते ,
अशी कशी आपण न पडताळून पाहता दिली याचा त्याला वैताग ही आला होता,

मी आता उद्या गावाला जायचे आणि एक नाही तीन घड्याळे गायब म्हणून चिडचिडलेली , हिरमुसलेली...
कुठल्या मुहूर्तावर अशी दुर्बुद्धी झाली कोण जाणे आम्हाला दोघांनाही वाटत होते...

दु-- हवे असेल तर माझ्या दुकानातले एखादे घड्याळ घालून जा गावाला!
मी -- हातावर घालायला आहे तसं अजून एक घड्याळ माझ्याकडे! ( चेहरा किती शिष्ठ केला असेल हे वेगळे सांगायला नको)

पण त्रागा करून उपयोग नव्हता ...

दुकानदार स्वत:ची चूक मान्य करून मला घड्याळे देण्यास तयार होता, मला मात्र माझीच घड्याळे हवी होती ...
त्या बरोबर असलेल्या माझ्या आठवणी , आपुलकी, जिव्हाळा वगैरे. ते मला कसं मिळेल या विचाराने मी अस्वस्थ !
"मेरा सो जावे नही , जो जावे सो मेरा नही " हा विचार तसा पचवणे कठीणच!

ज्याने नेली घड्याळे तो परत आणून देईल का?
आहे का जगात सचोटी शिल्लक? लहान पणी शिकलेली लाकूडतोड्याची गोष्ट आठवली...
सोन्याची कुऱ्हाड मिळूनही लोखंडाची होती माझी म्हणणारा आहे या जगात?
बघू या असे ठरले...
दिवाळी झाली , चांगले आठ पंधरा दिवस गेले ... घड्याळे नेणारा येत नाही हे पक्के झाले.
( या दरम्यान दुकानदाराने फोन वरून संपर्क ठेवला होता हे विशेष)

घरात सतत चर्चा , घड्याळे घ्यायची तर त्या दुकानदाराला का भुर्दंड ?
न घ्यावी तर माझी नव्यासारखी चांगली तीन महागडी घड्याळे गमवायची? तेही माझी काहीच चूक नसताना?

अखेर ठरवले , त्याच्या दुकानात आवडली तरच घड्याळे घ्यायची.
पाहिलात फोटो , तीनच्या जागी दोन घड्याळे मी घेतली , त्यानेही ती अत्यंत निखळ पणे दिली,
व्यवस्थित पणे दुकान चालवताना अशी चूक कशी झाली हातून याची हळहळ त्याला दिवाळी भर होत होती ( हे त्याच्याच सौभाग्यवतीने केलेले कथन) , तुम्ही न्याच घड्याळे , नाहीतर माझ्या लक्षात राहणार नाहीं, हा पवित्रा!

आता माझ्याकडे त्या जुन्या आठवणी आणि ती जुनी घड्याळे नाहीत,
पण एक संपन्न करणारा अनुभव आहे ,
जेंव्हा जेंव्हा मी ही घड्याळे वापरीन तेंव्हा मला नीतीने धंदा करणारा ,
खऱ्या अर्थाने गिह्राइकाची खोटी न होऊ देणारा दुकानदार आठवेल.

आता सांगा जगात सचोटी शिल्लक आहे म्हणायची की नाहीं ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: