हॉकी

Submitted by भरत. on 27 July, 2012 - 07:41

१४ दिवस , ३८४ खेळाडू आणि २ सुवर्णपदक : पुरुष आणि महिला विभाग

हॉकीच्या प्रत्येक संघात ११ खेळाडू आणि ५ अतिरिक्त खेळाडू असतात, जे गरजेनुसार बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरू शकतात. हॉकीचा सामना प्रत्येकी ३५ मिनिटांच्या दोन भागांत असा ७० मिनिटे चालतो. ऑलिंपिकमध्ये (पुरुष आणि महिला अशा विभागांत, प्रत्येकी) १२ देशांच्या संघांना प्रवेश मिळतो. १२ संघ दोन गटांत विभागले जातात. प्रत्येक संघ आपल्या गटातल्या अन्य ५ संघांशी एकेकदा भिडतो. सामना जिंकल्यास ३ तर बरोबरीत राखल्यास १ गुण मिळतो. प्रत्येक गटातले सर्वाधिक गुण मिळावणारे दोन संघ उपांत्य फ़ेरीत एकमेकांशी झुंजतात. उपांत्य किंवा अंतिम फ़ेरीच्या सामन्यात नियोजित वेळेत बरोबरी राहिली तर १५ मिनिटांचा अधिक वेळ मिळतो. त्यानंतरही बरोबरी सुटली नाही तर पेनल्टी शूट्-आउटवर विजेता निवडला जातो. दोन्ही संघ आळीपाळीने पाच-पाच पेनल्टी स्ट्रोक्स घेतात. विजेता मिळेपर्यंत असाच आणखी एकेक पेनल्टी स्ट्रोक घेतला जातो.

पुरुष हॉकीचा समावेश ऑलिंपिक्स मध्ये १९०८ साली तर महिला-हॉकीचा समावेश १९८० साली झाला. ऑलिंपिकमधल्या हॉकी पिचचा रंग नेहमी हिरवा असतो, मात्र लंडन ऑलिंपिक्ससाठी निळ्या पिच असतील. सामने २९ जुलै ते ११ ऑगस्ट या काळात खेळले जातील.

भारतीय हॉकी संघाची ऑलिंपिक इतिहासातली कामगिरी सोनेरी {(८ सुवर्ण १९२८-३२-३६-४८-५२-५६ अशी सहा सलग, १९६४ आणि १९८०), १ रौप्य(१९६०) आणि २ कांस्य पदके(१९६८-७२)} असली तरी गेल्या, २००८च्या बीजिंग ऑलिंपिक्ससाठी भारतीय संघ पात्र होऊ शकला नव्हता. लंडन ऑलिंपिक्सकरिता भारतीय संघाचा समावेश ब गटात असून त्यांचा सामना नेदरलंड्स (३० जुलै) न्युझिलंड (१ ऑगस्ट) जर्मनी (३ ऑगस्ट) , कोरिया (५ ऑगस्ट) आणि बेल्जियम (७ ऑगस्ट) या संघांशी होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संघांचे दोनच गट आहेत हे माहित नव्हतं.

हॉलंड, न्यूझीलंड, जर्मनी, कोरिया यांना हरवणं कठीणच दिसतंय. बेल्जियमच्या हॉकी संघाबद्दल फारशी माहिती नाही. भारत प्राथमिक फेरी तरी पार करेल की नाही शंका आहे Sad

कालची मॅच मस्त झाली.. पण एकूणच आपल्या लोकांना मध्यफळीत सुधारणा करायची प्रचंड गरज आहे... तिथेच मार खात होते.. बॉल पझेशन फारच कमी होते.. ते वाढल्यास बाकीच्या संघाना आपला धोका जास्त वाटेल.. पुढची मॅच न्यूझीलंड बरोबर आहे जी जिंकायची शक्यता आहे..

भारतीय हॉकी संघाने (शेवटून) पहिले स्थान मिळवून ऑलिंपिकमधला सगळ्यात मोठ्या आकड्याचा क्रमांक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. तसेच संपूर्ण स्पर्धेत विरुद्ध संघाला एकदाही पराभूत होऊ दिलेले नाही. Lol याचसाठी केला होता सारा अट्टाहास!