मन श्रावणी श्रावणी..!

Submitted by प्राजु on 25 July, 2012 - 02:36

ऊन्ह श्रावणी नभाचे, अंग ओले सोनसळी
हळदीचा माखलेला, साज ल्याली फ़ूल कळी

आला हिरवा शिरवा, भिजे शहारूनी माती
विरताना धुक्यातूनी, निखळला ओला मोती

ऊन पावसाची प्रिती, छंद श्रावणास जुना
सात रंगात शोधतो, मिलनाच्या खाणाखुणा

सडा प्राजक्ताचा दारी, मोती पोवळ्याची रास
क्षण भंगूर आयुष्य, परी गंधण्याचा ध्यास

अंग वेलीचे ओलेते, निरखून आईन्यात
लाजे नवरीच्या परी, हसे बघून पाण्यात

असे श्रावणाला पिसे, गंधाळल्या ताटव्यांचे
हातावर रंगलेल्या, मेंदीच्या गं आठवांचे

सख्या श्रावणाची ओढ, मन झिंगून झिंगून
तृषा युगांची शमूनी, सुख आले ओथंबून

अशी सोवळी ओलेती, ऊन-पावसाची लेणी
मन माझे बहरुनी, झाले श्रावणी श्रावणी..

-प्राजु

गुलमोहर: 

अहाहा
मस्त गं प्राजु
_/\_
श्रावणचिम्ब कविता!!!
काहीही कर ...हिचं गाणं व्हायलाच पाहिजे बघ !!

अंग वेलीचे ओलेते, निरखून आईन्यात
लाजे नवरीच्या परी, हसे बघून पाण्यात>> आईन्यात ऐवजी, दर्पणात योग्य वाटेल.

व्वा ! फ्रेश फील देणारी कविता .... आवडली.

"असे श्रावणाला पिसे, गंधाळल्या ताटव्यांचे
हातावर रंगलेल्या, मेंदीच्या गं आठवांचे

सख्या श्रावणाची ओढ, मन झिंगून झिंगून
तृषा युगांची शमूनी, सुख आले ओथंबून" >>> या ओळी अधिक आवडल्या.

क्या बात, फार छान फील आहे कवितेचा

सडा प्राजक्ताचा दारी, मोती पोवळ्याची रास
क्षण भंगूर आयुष्य, परी गंधण्याचा ध्यास>> फारच सुंदर Happy

अशी सोवळी ओलेती, ऊन-पावसाची लेणी
मन माझे बहरुनी, झाले श्रावणी श्रावणी..

खूप दिवसांनी मराठी कवितेला असे श्रावण-लेणे मिळाले, अभिनंदन प्राजु.

सडा प्राजक्ताचा दारी, मोती पोवळ्याची रास
क्षण भंगूर आयुष्य, परी गंधण्याचा ध्यास

अतिशय सुंदर

ऊन पावसाची प्रिती, छंद श्रावणास जुना
सात रंगात शोधतो, मिलनाच्या खाणाखुणा

सडा प्राजक्ताचा दारी, मोती पोवळ्याची रास
क्षण भंगूर आयुष्य, परी गंधण्याचा ध्यास

असे श्रावणाला पिसे, गंधाळल्या ताटव्यांचे
हातावर रंगलेल्या, मेंदीच्या गं आठवांचे

>>

आहाहा!
प्रचंड आवडली Happy

फार सुंदर...
सात रंगात शोधतो, मिलनाच्या खाणाखुणा
सडा प्राजक्ताचा दारी, मोती पोवळ्याची रास
क्षण भंगूर आयुष्य, परी गंधण्याचा ध्यास
या ओळी जास्त आवडल्या.