वडापावची कहाणी

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 July, 2012 - 01:56

शेवाळ्याचा दगडाला चिकटुन रहाणे,हा स्थाईभाव आहे.त्याच प्रकारचा स्थाईभाव घेऊन हा पदार्थ जन्माला आला.वडा हा भारतीय खाद्य संस्क्रुतितला पदार्थ पावाला ईंग्रजांच्या आमदानीत चिकटला असावा.हे दोन्ही पदार्थ एकमेकाला असे काही चिकटले,की त्यांच वेगवेगळ अस्तित्व ,हे एकमेकाशिवाय सिद्ध करता येत नाही.किंवा सिद्ध करायला गेलं,तर काही ठिकाणी सिद्ध करणाय्राचा वडाच झाला असं दिसुन येईल. या भारतीय वड्याला पाव कोणत्या दिवशी पावला?हे शोधणं म्हणजे केलेल्या पोळ्यांपैकी कोणती पोळी तव्याला प्रथम चिकटली,हे शोधण्या ईतकं अवघड आहे.शोध घेणं हे संशोधकांचं काम...(आपण त्यातले नाही.)ह्या सर्वसामान्यांपर्यत पोहोचलेल्या असामान्य पदार्थाचं जन्मस्थान म्हणजे,वडापावची ती दिव्य गाडी...तुंम्ही कल्पना करा,संध्याकाळची वेळ आहे.आपण आपल्या कामाच्या ठिकाणाहुन परतत आहोत.रोजच्या कामामुळे आलेला कं-टाळा आपण टाळू शकत नाही आहोत.दिवस-भराची ती संध्या ''काळ'' होऊन आपल्यावर उलटत आहे.त्यामुळे आपल्याला घर,मनसोक्त जेवण वगैरे सर्वसामान्य,किंवा काही असामान्य स्वप्न (---गरजे नुसार जागा भराव्या) दिसत आहेत.पण स्वप्नांचा सत्यात उतरण्याशी काहिच संमंध नसतो,त्याप्रमाणे वहातुकीच्या जाळ्यात अडकुन आपलं स्वप्न फोल ठरु पाहतय...तेवढ्यात वाळवंटात पाणी मिळावं,त्याप्रमाणे ही वडापावची गाडी आपल्याला येउन मिळते.

आहाहा हा हा,काय त्या गाडिचं आणी गाडिवाल्याचं वर्णन कराव?ती गाडी आणी कुठलंही शनी मारुतीचं देउळ सारखच.(तेल हा दोहोंचा कॉमन फेक्टर...ते वहावल्या शिवाय मजा येत नाही...नाही का?) तिथला तो तेलाचा दगडी दिवा,तर ईकडे तेलाची कढई...एकीकडे पोटच्या भावनेची आहुती दिव्यात,तर दुसरिकडे आहुतिची भावना पोटात.तिकडे रुईच्या पानांच्या माळा,तर ईकडे गिह्राईकांनी हातपुसुन टाकलेल्या कागदांच्या बोळ्यांमधे वडापाववाल्याचा गाळा.तो वडापाववाला आणी त्याची तुलना ,,,करायचीच झाली तर एखादे जुने भटजी यांच्याशीच करता येईल.पंचांम्रुत हळदी कुंकू यांच्या डागांनी मळलेलं,आणी होमाच्या ठिणग्यांनी भोकं पडलेलं धोतर,आणी कढईतुन उडणारं तेल,डाळीचं पीठ यांनी डाग पडलेला व हातातल्या विडीचे झुरके घेताना भोकं पडलेला शर्ट/पायजमा---हे सर्व ईतिहास जमा होईल कि काय?अशी भीती वाटू लागलीये.म्हणजे भटजींच्या हातुन बादलीत धुवायला पडणारी दर्भ किंवा दुर्वांची जुडी,आणी वडापाववाल्याच्या हातुन कढईत पडणारी झाय्राची उडी...वस्तुनिष्ठ भेद वगळता,दोघांचा उद्देश संस्क्रुति संरक्षण हाच.ती आद्य संस्क्रुती,तर ही खाद्य संस्क्रुती...भटजींच्या पुढचं होमकुंड जस,काही आहुती आजुबाजुला पडल्या नसतिल तर पाहायला निरस वाटतं,तितकच कढईच्या व स्टोव्हच्या आजुबाजुनी पीठ न सांडणं हे ही.
खरंतर भारतीय संस्क्रुतीचं रक्षण करणाय्रा ह्या वडापाव वाल्याला पोलिस संरक्षण दिलं पाहिजे.पण नको,लांब उभ राहुन गाडी न उचलली जाण्याकरता,एरवी हप्ते खातात...ते हप्ता हप्ता गाडिभोवती उभं राहायला लागलं,तर वडापावही खाऊ लागतील.कोपय्रा कोपय्रावर पानवाले असु शकतात,मग वडापाव वाल्यांनीच कोणाची गाडी मारलीये?पुण्याच्या काही भागांमधे वडापाव वाल्यांची संख्या दुर्मिळ होऊ लागलीये.(चायनीजचा प्रताप,चीनी एकंदरीत आपल्याला वाईटच...)जसं पानवाले संस्क्रुतिचं आद्य लक्षण म्हणजे सर्वात स्वस्त तंबाखु भक्षण,तसच वडापावचं नाही का?खाद्य संस्क्रुतितल्या ह्या सर्वात स्वस्त पदार्थाला भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणुन नामांकित किंवा मानांकित करायला हव.पण याच्या आड येत असतिल तर त्या आरोग्यादायी दुष्ट संकल्पना...म्हणे खराब तेलामुळे हार्टला धोका उत्पन्न होतो.खाद्य संस्क्रुतिवर मनापासुन प्रेम करणाय्रांच्या हार्टवर-एटेक करण्याचा यांना काय अधिकार?एकतर त्या आरोग्यदायी खाद्यपदार्थ पुरवणाय्रा हॉटेलात जाऊन,मेनुकार्ड पाहाताना व जिभेवर ताबा ठेवताना अर्धपोटानी तोबा तोबा म्हणत परतायची पाळी येते.अहो,पन्नास पैसे ते दिड रुपाया ईतक्या सस्त्यात ज्या वडापावनी माझ्या किर्रर्र शालेय कारकिरर्दितली मधली सुट्टी भागवली किंवा गाजवली,त्या वडापावला मी का म्हणुन अंतर द्यावं?शाळे बाहेरील ''स्वस्त खाद्य विक्री योजने''तील पदार्थ ज्यानी खाल्ले नाहीत,त्यानी शाळा नुसती अभ्यासाला लाऊन खाल्ली...

अलीकडे आमचा हा वडापाव ए ग्रेड किंवा तत्सम बड्या हॉटेलातही जाऊन बसलाय.म्हणजे जायला आमची हरकत नाही काही,पण स्वच्छतेच्या नावाखाली किंमती वाढवतात,आणी नको नको ती नावं देऊन चव बिघडवतात. उदा-घराघरातुन होणारी पिठलं-भाकरी ''आवर महाराष्ट्रीयन स्पेशालीटीज''- zunka bhaakar-असं म्हणणाय्रा हॉटेलात जाऊन भलतीच महागात लागली.म्हणजे मुळात स्वस्त पदार्थांमागेही महागाई लागली.ब्रेड-वडा,ब्रेड-मिसेल आणी किंमत वाचली की ब्रम्हांड दिसेल...म्हणजे ५ ते ७ रुपायतला वडापाव,''ब्रेडवडा-वुईथ चिली फ्राय" झाला,की किंमत वाचुन वडापाव अईवजी हाय खायची वेळ येईल.कुठल्याही गोष्टीला ईंग्लीश शिक्के मारले की हवा तो 'ठसा' उमटवता येत असावा.खाद्य संस्क्रुतितला अस्सल भक्त वडापावला वडापाव व मिसळपावला मिसळपावच म्हणतो.उगीच त्या मिसळीत कधीच न मिसळु शकणाय्रा ब्रेड मिसेलची भेसळ करीत नाही.भुरक्याशिवाय जेवण म्हणजे-झुरक्याशिवाय विडी-आणी झुरक्याशिवाय विडी म्हणजे-वल्ह्या शिवाय होडी,असल्या त्रिसुत्रीतच अस्सल खाद्यभक्ताला गोडी वाटते.त्यामुळे पावा शिवाय वडा,म्हणजे पाण्याशिवाय घडा हे तो मान्यच करतो.

अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची ही आधुनिक मेनुकार्डावली पहा,(ह्यात काही घरगुती पदार्थपण आंम्ही कल्पनेनी मिक्स केलेत,किंवा मिक्स करणाय्रांच्या कल्पनेला काही नवे विचार दिलेत.)तत्पुर्वी आंम्ही खाद्यसंस्क्रुतिच्या निस्सीम उपासकाला म्हणजे ज्याला मनापासुन-''उपास का आला?''...असा प्रश्न पडतो-त्याला,खाद्याभक्त का म्हणतो?ते सांगतो.खाद्याची भक्ती करण्यापेक्षा तो भक्तीनी खाद्य खातो म्हणुन...(खाणाय्राला 'खादाड' ही उपाधी ज्याची खाता खाता दाढ पडली,त्यानी दिलेली असावी.हे म्हणजे आवडीनी चींचा,कैय्रा खाणाय्राला 'अंबट शऊकिन'म्हणण्यासारखं आहे.)असो आपण आता मेनुकार्डावली पाहुयात.अता या मधे- पहिलं पदार्थाचं मुळ नाव,नंतर हॉटेलवाल्यानी केलेलं बारसं(का तेरावं?),आणी पुढे किंमत वाचुन उमटलेली प्रतिक्रीया(अर्थातच आमची...)असं दिलय.

१)मऊभात,मेतकुट,लोणचं---सॉफ्टीराईस वुईथ लोन्चा + फ्री-यलो मेजिक मसाला---आज ईथं आलो कशाला...?
२)फोडणीची पोळी/पोळीचा लाडू---चपाती की करामात ईन टू टाईप्स,स्वीट & चीली---पैसे पुरले नाहीत,म्हणुन नेसुचीही सोडुन दीली...
३)गवल्यांची खीर---समथिंग ट्रेडिशनल,द खीर ऑफ गवला---पोटाला बरा पण पाकिटाला भोवला...
४)तांदळाच्या पिठीची तिखटा/मिठाची उकड---दी उकड ऑफ ताँदुल पीठी---याच्यापेक्षा बय्रा पिठल्यातल्या गाठी...
५)फोडणीचा भात---राईस मे छुपी तडके की बात---किंमत वाचल्यावर चोळत राहिलो हात...

आईचा मायेचा हात लागल्या शिवाय ह्यातल्या एकाही पदार्थाला चव येऊच शकत नाही.हे यांना कस कळणार? पण अता आया नोकरीला लागल्या मुळे पोरांना सांभाळणारी पाळणाघरं आल्यापासुन जो बेचवपणा,मुलांच्या आयुष्यात येतोय,तोच बेचवपणा या असल्या हॉटेलांमधल्या पदार्थात.
असो,काही ठिकाणी वडापाववर माश्या बसल्याशिवाय त्याची चव वाढतच नाही,असही आंम्हाला अढळलेलं आहे.त्याचप्रमाणे वडे व त्याचे शेजारी भजी,ह्यांन्ना ठेवायचं ताटही अस्सल वडापाववाला जर्मनसिलव्हरचचं ठेवतो.असंही पाहाण्यात आहे.बरोबरच आहे हो त्यांचही,उगीचच स्वच्छतेच्या नावाखाली स्टेन-लेस-स्टीलचं किंवा अतीस्वाभिमानी मराठीत ज्याला डाग रहित पोलादाच म्हणतात,तसलं ताट ठेऊन गिह्राईकाला चांदी लावण्यात काय अर्थ आहे?

वडापाव बरोबर तळलेली मिर्ची ज्यानी शोधली तो धन्य होय.(वडापाव मागुन आली आणी तिखट झाली-ही म्हण अत्ता लिहिता लिहिता आली...ह्ही ह्ही) हे नातं पुढेपुढे ईतकं गडद झालं,की मिर्चीशिवाय वडापाव म्हणजे खुर्ची शिवाय राजकारण.पण काही ठिकाणी ह्या मिर्ची नामक खुर्चीला ओढुन,आदल्या दिवशिची शिळी भज्यांची पिल्लं,म्हणजे त्याचा चुरा,सुक खोबरं आणी लसुण ह्याच्या चटणीनी ''जन जागरण एकता मंच''अस वेगळ नाव शोभावं त्या प्रमाणे अपक्ष राहुन जागा जिंकलीये....
वडापाववाल्यांच्या धार्मिकतेबाबतही आंम्ही अभ्यास केलाय.काही वडापाववाले गाडीवर एखाद्या देवाची तसबीर लावतात.तीला फुलं,हार,उतबत्ती,हळद-कुंकू करतात.आणी पहिल्या घाण्यातला वडा ठेवतात.तर काहीजण,धंदा हाच माझा देव ह्या भावनेनी गाडी समोर नारळ फोडतात.त्याचे तुकडे येणाय्रा(रोजच्या)गिह्राईकांना सेल्फ सर्व्हिस या तत्वावर देतात.तर काहीजण,गिह्राईक हाच माझा देव,या भावनेनी रोज ताजेच पाव गिह्राईकांच्या मुखी कसे पडतील,हे पहातात.वडे/भजी ठेवायच्या ताटातलं एखादं भज,किंवा ती पिल्लं(?)कोणी उचललीच,तर...ठेवा...असं न ओरडता,''खा हो,खाण्यानी आंम्ही लहान थोडेच होणार आहोत?"असं आत्मीयतेनी म्हणतात,आणी गिह्राईकाचा दुवा घेउन जातात.

मला तर अस वाटत,की हा वडा तेलाच्या कढईत डुंबण्याविषयी जर स्वगत प्रकट करु लागला,तर-''तु तेलं की घागर है,तेरे ईक बुंद के प्यासे हम...'लोटा' जो दीया तूने,तले जाएंगे कहाँसे हम'' असं म्हणेल.तसच एखादा खाद्यभक्त आठ-वडा भर वडापावच्या वासवरच राहिला तर तो म्हणेल-''वडा ना भजे क्या खांऊ मै?,वडे के बिना पेट है सूना''...मग हा विरह सहन न होऊन वडा देखिल दुरुनच म्हणेल-''तलते गया जीवन मेरा,तुम बिन लगे ये सफर अधुरा...तुम बिन लगे ये सफर अधुरा''....तर अशी आहे ही या वडापावची कहाणी.पण कहाणी म्हणण्यापेक्षा याला कहाणाच म्हणावं.कारण प्रत्येक घाण्यातुन चवीचा वासयुक्त बहाणा करत,वरुन शिवाय-''हां...अता भूक लागली हे ना,मंग अता कचकुन कनाकना हाना"असं जो वडा आमच्या मायबोली,'सनसनीत म्हह्राटीत'आंतरिक कळवळ्यानी म्हणतो,त्या वडापावचा हा कहाणाच आहे.माझ्या आप्तांना सुद्धा, मी शेवटची ईच्छा म्हणुन,''दाहाव्याला घाटावर भाताचे पिंड न ठेवता,वडापावच ठेव.कारण तीच माझी जन्मोजन्मीची ठेव आहे.आणी म्हणुनच मी मला दिसेल त्या कावळ्यात शिरुन वडापावला टोच मारुन वर गेल्याची(का खाली आल्याची?)पोच पावती देईन.''असच सांगुन ठेवणारे.लोक कबुतरांना दाणे टाकतात.मी कावळ्यांना वडापाव टाकायला सुरवात केलिये.मी ईहलोकी काव़ळा जगतात भरपुर वशिला लाउन ठेवलाय,त्याशिवाय वरच्या म्युन्सीपाल्टीतली कामं होत नसणारच.पण कावळा प्रश्न अता बास.वडापाव हा मुळ प्रश्न आहे.तेंव्हा कावळ्या कडे का-वळा?आपण परत वडापावकडे वळु.

मी भारत सरकारला पुन्हा विनंती करतो,की भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर असेल,तर वडापावला आद्य-खाद्य नामांकन देउन,मला वन्स-मोर द्यावा.तसच आमच्या वडापावला पंचतारांकित हॉटेलांमधे नेउ नका,कारण तिथे खाण्याच्या गोष्टींना सजावटीत वाया घालवतात.वडापावला सजावटीत शोभा न येता,तो त्याची खय्रा अर्थानी 'शोभा' केली,म्हणुन त्याच वाटित सजा मिळाल्यासारखा ओरडताना मी स्वप्नात पाहिलाय.अहो,आमच्या साध्या रुमाला एवढ्या कागदात बसणाय्रा वडापावला,हे लोक पराती एवढ्या डिशमधे ठेउन,ढालीवर तिरक्या तलवारी लावतात,तश्या वर गोंडस तळलेल्या मिर्च्या ठेवतिल.कडेनी बीट,गाजंरं,कोबी ह्याची अतीव सुंदर दिसणारी(म्हणजेच मुळ संऊदर्याला डसणारी) चित्रविचित्र डिझाईनं लावतील.आणी किंमत असेल शं-भर ते दीडशे रुपये.वर चव नाही ती नाहीच.अहो असणार कशी?चवीवर अभ्यास करुन तयार केलेल्या(ना)पाक क्रुतीं मधली नाटकं ही...अभिनयापेक्षा नुसतं नेपथ्यच भरकोस असेल तर ते नाटक कोसभर तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल का?...देवापेक्षा मखराचा आणी देवळापेक्षा शिखराचा भाव वाढला,की हे असच होतं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाद्य संस्क्रुतिवर मनापासुन प्रेम करणाय्रांच्या हार्टवर-एटेक करण्याचा यांना काय अधिकार? Lol
खुसखुशीत लेख .. खास तुझ्या शैलीतला !

अत्रुप्त आत्मा,
तुमच॑ हे वडापुराण वाचताना तो॑डाला खुप पाणी सुटत॑ आणि शेवटी लेखाच्या खाली तुम्ही वडापावाच॑ दर्शन घडवता. खरोखर आता वडापाव खाण्याची तिव्र ईच्छा झाली आहे. तुमचा निरोप घेऊन रोडलगतच॑ एखाद॑ खाद्यम॑दिर गाठतो आणि यथेच्छ वडापाव खातो.
खाद्यभक्ता॑चा विजय असो !

superb

@अजूनही फोटो दिसत नाहिये.>>> अब हमारे प्रयत्न खतम हुए...दक्षाकाकू Sad ,इस बार हमने फोटू पिकासा से डाल्या है,जो सभी साइट पे दिखता है ।

लै म्हंजी लैच भारी आत्मारामा Happy
दक्शे, संध्याकाळी घरी जाताना वडापाव खाऊन जा, गेलाबाजार गुगलवर वडापावचे चित्र बघून जा, नाहीतर आत्मारामाला आणि पुण्यातील सर्व वडापाववाल्यांना रात्रभर उचक्या लागत राहतील Lol

लेख लांबला..पण ब्येष्ट... वडापाव..!!!
मला एक प्रश्न आहे सगळे वडापावचे फोटो हे असे न्यूज पेपर वर ठेऊन` का असतात? परवाच्या आमच्या येथिल आमेरिकन घरात बनलेल्या वडापावचा फोटो देखिल पेपर वर ठेउन काढला होता Lol
आणि न तळलेली मिरची बघुन जरा हिरमोड झाला... आणि वडापाव खायला न मिळाल्याने आमचा ही अत्रुप्त आत्मा... Happy

@मला एक प्रश्न आहे सगळे वडापावचे फोटो हे असे न्यूज पेपर वर ठेऊन` का असतात? परवाच्या आमच्या येथिल आमेरिकन घरात बनलेल्या वडापावचा फोटो देखिल पेपर वर ठेउन काढला होता हाहा>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif खाण्याचा आणी पेपरचा अंतर्बाह्य/बहुआयामी समंध आहे हो....!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/animated-laughing-smiley-emoticon.gif

मी ज्या दिवशी हा फोटो पाहिला त्यादिवशी पहिल्यांदाच जीव अजिबातच जळला नाही कारण घरी लपवलेला वडापाव होता, बरोबर तळलेली मिरची, लसणीची चटणी असा सगळा सरंजाम होता.

लिखाण आवडले. प्रत्येक ओळ वाचताना मला पुलंची सारखी आठवण येत होती. नव्हे! पुलंचाच लेख वाचतोय असे वाटत होते. आपण शाब्दिक कोट्या छान करता.

बरेच दिवस विचार करत होतो कि 'प्रत्येक ओळ वाचताना मला पुलंची सारखी आठवण येत होती.' असं मी कोणत्या लेखाला उद्देशून लिहिलं होतं बरे?!!! मला काही आठवेना. सर्फिंग करता करता पुन्हा हा लेख माझ्या नजरेस पडला आणि मला आठवलं. अरे! हाच तर तो लेख!!! मला कित्ती आनंद झालाय म्हणून सांगू!!! व्वा: लई भारी!!!