वाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली! (उत्तरार्ध)

Submitted by आनंदयात्री on 23 July, 2012 - 04:26

वाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली! (पूर्वार्ध)

रात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझप्रमाणे वाजत होता. साडेसहापर्यंत मी आणि कोंबडा दोघेच बहुधा जागे होतो. दार उघडले आणि बाहेर धुक्याशी भेट झाली -

अखेर पावणेसात वाजता सूरजला उठवले. आजीबाईंच्या मुलाचा पत्ताच नव्हता. आम्हाला लवकरात लवकर तैलबैला गाठायचे होते. म्हणजे मग उरलेल्या दिवसात काहीतरी प्लॅन करता आला असता. अखेर त्याची वाट पाहून आजीबाईंना मानधन दिले आणि निघालो. तर देवळापाशी एक म्हातारबा भेटले. त्यांनी 'कुठे निघालात' वगैरे चौकशी केली आणि 'थांबा गण्याला बोलावतो, तो तुम्हाला घालवून देईल' असे सांगून थांबवले. गण्याऐवजी आजीबाईंचाच मुलगा, रमेश आला आणि आम्ही (एकदाचे) निघालो. सात वाजून तीस मिनिटे!

गावाशेजारच्या आदिवासी वस्तीमधून ओढ्याच्या दिशेने निघालो. वस्तीमधल्या दोन बायकांचा हा 'हृद्य' संवाद -
पहिली - "कुटं निघाले हे दोगेच?"
दुसरी - "मजा करायला निघाले असतील"
पहिली - "पाठीवर बोचकी घेऊन डोंगर चडण्यात कसली मजा?"

मी एवढंच बोलणं ऐकलं. मला तोरणा-रायगड ट्रेकमध्ये कोदापूर एसटीचा कंडक्टर आठवला. 'आयला पैसे देऊन वर जीवाला त्रास' असं आमच्या पाठीवरच्या सॅक्सकडे बघून तो बोलला होता. चालायचंच!

गावामागच्या ओढ्याला पाणी असेल, तर मात्र लेण्यांकडेही आणि वाघजाई घाटाकडेही जाता येत नाही. (इति रमेश!) आमच्या सुदैवाने पाणी फारच कमी होते आणि पाऊसही नव्हता. लेण्या अथवा तैलबैलाकडे हा ओढा ओलांडावाच लागतो.

ठाणाळेतून थेट लेण्यांकडे जाणारी व लेण्या वगळून तैलबैलाकडे जाणारी वाट या दोन वेगळ्या वाटा आहेत. आम्ही लेण्या वगळल्या होत्या. अर्थात वाटेत एका पठारावरून लेण्यांकडे वाट जाते. त्याचे वर्णन पुढे येईलच. ओढा ओलांडून पलिकडच्या काठाने डोंगराला डावीकडून वळसा घालावा लागतो. थोडं चालल्यावर कातळात कोरलेल्या पायर्‍या लागल्या.

जवळच पाण्याची दोन टाकीही दिसली. (पाणी पिण्यायोग्य नाही).

कालच्या तुलनेमध्ये माझी तब्येत बरीच बरी होती. वेग कमी असला तरी न थांबता सलग चढत होतो. पण या टाक्यांशेजारून वाहणारा एक झरा दिसला आणि थोडी पोटपूजा करायला थांबलो. त्या ठिकाणापासून दिसणारी ठाणाळेशेजारची आदिवासी वस्ती -

या टाक्यांच्या बाजूने डावीकडून वाट वर चढते व एका पठारावर येते.

इथून समोरच्या कुडाच्या फुलाशेजारून वाट वाघजाई घाटाकडे जाते आणि उजवीकडची लेण्यांकडे जाते. या झाडाला बारमाही फुले असतात असे कळल्यामुळे लेण्यांच्या वाटेसाठी हे खुणेचे झाड म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही.

हे पठार पार करून आम्ही सरळ पुढच्या टेकाडाला डावा वळसा मारून निघालो. आजूबाजूला दगडधोड्यांच्या राशी दिसल्या.

या टेकाडाच्या डाव्या अंगाला एक धनगरबाईची झोपडी आहे. सर्व धनगरवाडा डोंगराच्या पायथ्याला आहे. डावी वाट झोपडीच्या दिशेने, उजवी वाघजाई घाटाच्या दिशेने -

त्या टेकाडावर आलो आणि गेले पंधरा-सोळा तास जिच्यावाचून जीव तगमगत होता, ती झुळूक एकदाची सुरू झाली. मग पार सवाष्ण घाट सुरू होईपर्यंत वारा सोबत होता. या टेकाडावरून दरीच्या कडेकडेने पायवाट वर चढते.

उजव्या हाताला खाली पठार, त्यापलिकडे काल आम्ही अडकलो होतो तो डोंगर आणि त्यापलीकडे नाडसूर, ठाणाळे गावे दिसतात.

कुडाच्या फुलाकडून लेण्यांकडे येणार्‍या पायवाटेचा टेकाडावरून घेतलेला फोटो -

इतका वेळ डाव्या बाजूने किंवा डावीकडे सुरू असलेली वाटचाल संपवून आम्ही टॉवरच्या दिशेने निघालो. लेण्या आम्ही चढत होतो त्याच डोंगराच्या पोटात होत्या. वाटेत रमेशला अळुची फ़ळे सापडली. आकारावरून आधी मी 'ही न पिकलेली आलुबुखार असावीत' अशी समजूत करून घेतली होती. पण ते आलुबुखार वेगळे हे कळल्यावर केवळ त्या दोघांनी खाल्ली, म्हणून मीही बिंधास्तपणे खाऊन टाकली. (चव बरी होती!)

वाघजाई मंदिराच्या जवळ या पायर्‍या लागतात. वाघजाई मंदिराशेजारूनच एक मोठा धबधबा वाहतो.

मंदिरातली पंच-दैवते -

धबधब्याजवळून दिसणारे विहंगम दृश्य -

त्या संपूर्ण कड्यावरून काही अंतरावरून एकूण दोन धबधबे खाली उड्या घेतात आणि त्यांचाच पुढे ओढा बनून ठाणाळे गावामागून वाहतो. वाघजाई देवीचे छोटेखानी मंदिर खूप शांत आणि रम्य आहे. (वाघजाई घाट नक्की कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे मात्र मला शेवटपर्यंत कळले नाही. प्रचलित नाव आहे, म्हणून वाघजाई घाट म्हणायचे!)

एव्हाना सव्वादहा वाजले होते. आम्ही पावणेतीन तासात वाघजाईपाशी पोचलो होतो. आता अख्खा दिवस हातात होता. त्यामुळे मग तैलबैलाकडे न जाता सुधागडासमोरच्या सवाष्ण घाटाने खाली उतरायचे ठरवले. पुढे पाणी मिळेल न मिळेल असे वाटल्यामुळे इथेच धबधब्यापाशी थोडावेळ थांबून उरलेला ब्रेकफास्ट कम लंच करून घ्यायचे ठरवले. पुढे मग दहा मिनिटात तैलाबैला पठार गाठले.
तैलबैला भिंतींचे झालेले पहिले दर्शन -

झूम करून -

तैलबैलाला पहिल्यांदा आलो होतो ते लोणावळ्याकडून! या वेळी दुसर्‍या बाजूने भेट होत होती! पण काहीही म्हणा, तैलबैलाच्या भिंतींच्या नुसत्या दर्शनानेही माझ्या मनात नेहमीच भीती, आदर, आनंद, सुख अशा अनेक भावना एकाच वेळी येतात..

इथून एक बैलगाडीवाट तैलबैलाकडे जाते. 'त्या वाटेने पुन्हा केव्हातरी' असे म्हणून आम्ही दक्षिण दिशेच्या कड्याकडे निघालो. आता जितके चढून घाटावर आलो होतो, तितकेच पुन्हा उतरून घाटाखाली जायचे होते.

हा दुसरा ओढा कड्यावरून झेप घेऊन लेण्यांशेजारून कोसळतो .

याच ओढ्याशेजारी कड्याजवळ या पायर्‍या दिसतात (या कुठेही उतरत नाहीत, सबब ही आपली वाट नव्हे!)

सवाष्ण घाटाच्या दिशेने निघालो तेव्हा वाटेत हे विस्तीर्ण पठार लागले -

वाटेत दिसलेले हे टिपीकल फोटोजेनिक झाड -

हळदीची रोपे -

सह्याद्री घाटाखालून चढायच्या आणि उतरायच्या असंख्य घाटवाटा आहेत. कुठूनही चढायचा सरासरी वेळ तीन तास आणि उतरायचा दोन तास असे गणित आता तयार झाले आहे!

सवाष्ण घाटाच्या माथ्यावरून दिसणारा सुधागड -

सुधागडला दोन दरवाजे व एक चोर दरवाजा आहे, असे रमेशने सांगितले. त्यापैकी खालील फोटोमधल्या हिरव्या बेचक्यातून एक चोरवाट आहे -

सवाष्ण घाटाच्या 'बारशा'ची कहाणी मनोरंजक आहे. कोण्या काळी (पहिल्या काळात - इति रमेश!) एक सवाष्ण घरातून पळाली आणि डोंगर उतरून जायला या वाटेवर आली. वाट न सापडल्यामुळे कातळातच पायर्‍या खणती झाली, आणि अखेर इथेच दिव्यलोकी प्रयाण करती झाली, म्हणून हा सवाष्ण घाट! मला ते नावच इतके आवडले की आता घाट प्रत्यक्ष कसा असेल हे पाहायला मी अगदी आतूर झालो होतो.

... आणि घाटवाट सुंदरच होती. एका बाजूला सरळ खोल दरी, दुसर्‍या बाजूला डोंगरभिंत, मध्ये तीव्र तिरप्या उताराची पायवाट अशी सुरूवात असलेला घाट सुंदर का असणार नाही? घाटवाटेची ही सुरूवात -

वाटेत कातळात कोरलेल्या या पायर्‍या लागल्या ('त्या' सवाष्णीने खोदलेल्या असाव्यात. इथेच जवळपास तिची समाधीही आहे, तो फोटो हुकला)

पण हे फक्त सुरुवातीच्या थोड्या अंतरापुरतेच! काही वेळातच वाट दाट झाडीत शिरली. चिखलमातीतून पायवाटेने निघालो. पहिल्या पावसाने जमिनीबरोबरच एका दगडालाही शेवाळी शाल पांघरली होती -

वाटेत एक बांधकाम लागले. (स्थानिक लोकांपैकी कुणीतरी वाडा/गोठा बांधला असावा)

तसेच खाली उतरत उतरत तासा-दीडतासाने बहिरमपाडा या गावामध्ये शिरलो. एव्हाना एक वाजला होता. एकूण साडेपाच(च) तासात चढून उतरलो होतो. मागच्या परीक्षेत राहिलेला बॅकलॉग पुढच्या परीक्षेत डिस्टींक्शनने भरुन निघावा असे काहीसे वाटत होते.

बहिरमपाड्यातून एक लाँगशॉट - डावीकडचा डोंगर म्हणजे तैलबैलासमोरील पठार, त्याच्या उजवीकडच्या किनारीवर सवाष्ण घाट. उजवीकडे सुधागड.

उकाडा, दमटपणा, घाम हे त्रास पुन्हा सुरू झाले होते. त्यात बहिरमपाडा ते धोंडसे आणि धोंडसे ते वैतागवाडी (हे गावाचे नाव आहे!) असे दोन-अडीच किमी चालायचे होते. ते चालून वैतागवाडीतून टमटमने पाली, पालीहून खोपोलीला पोचलो तेव्हा तीन वाजले होते.

इथून सूरज खोपोली लोकलने मुंबईला गेला. खोपोली स्टँडात उभी असलेली पुणे एशियाड, गर्दी होती म्हणून सोडली आणि मग बराच वेळ पुण्याकडे जाणारी एसटी आलीच नाही. अखेर एका टेंपोतून लोणावळा गाठले आणि 'जब वी मेट' मधल्या करिना स्टाईलने कर्जत-पुणे शटल प्लॅटफॉर्महून सुटत असताना (सॅकसकट) धावतच पकडली.

पहिल्या दिवशी तब्येत बिघडली नसती तर सुधागडसुद्धा झाला असता खरा, पण जो अनुभव मिळाला, तो मिळाला नसता. आपल्या वाट्याला आलेले हे अनुभवाचे दान बिनतक्रार स्वीकारणे ही भटकंतीमधल्या आनंदाची खरी गंमत आहे!

दोस्तहो, या वाटेने फारसे कुणी गेल्याचे, व गेल्यावर त्याबद्दल लिहिल्याचे माहित नाही. त्यामुळे काही बारकाव्यांसकट ही भ्रमंती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. इतके वर्णन वाचूनही जर तुम्ही या ट्रेकमध्ये वाट चुकलात, तरी हरकत नाही. कारण, 'वाट चुकण्याच्या आणि ती आपली आपण शोधण्याच्या' एका अत्युत्तम आनंदाचा अनुभव तुम्हाला मिळालेला असेल!

जाता जाता - या भागामध्ये उन्हाळ्यात अथवा कोरड्या ऋतुमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. वाघजाई मंदिरापाशी असणार्‍या पाण्याशिवाय, थेट ठाणाळे गावापर्यंत कुठेही पाणी नाही. काही वर्षांपूर्वी या भागात सॅकमध्ये पुरेसे पाणी न घेता आलेल्या एका भटक्याचा तडफडून मृत्यू झाल्याची कथा गावात बर्‍याच जणांनी आम्हाला सांगितली. पावसाळ्यामध्ये सुरू असणारे दोन धबधबे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बंद होतात. तेव्हा भटक्यांनी पुरेसे पाणी सोबत बाळगावे, ही सूचना!

पुन्हा भेटूच!

(समाप्त)
- नचिकेत जोशी
ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/07/blog-post_20.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन, आणि प्रकाशचित्रे ही मस्त! खासकरुन तैलबैल्या भितींच्या पार्श्वभुमीवर काढलेला शेवटचा फोटो.

_/|\_ ग्रेट वर्क

नचि,

अपेक्षेप्रमाणे हाही भाग मस्तच... अप्रतीम फोटो आणी वर्णन.....

आमच्या ६ वर्षांपुर्वी केलेल्या सवाष्णी घाटाच्या ट्रेकची आठवण झाली Happy

सुधागड आणी तेलबैला परीसरात ५-७ घाटवाटा तरी आहेत आणी बहुतांशी अजूनही गावकर्‍यांच्या वापरात आहेत.

वाघजाई घाट आणी सवाष्णी घाट (या घाटाचे मुळ नाव घोडेजिनचा घाट असे आहे :)) हे देश आणी कोकण यांना जोडण्यार्‍या प्राचीन व्यापारी मार्गातले घाट आहेत. नागोठणे आणी चौल ह्या कोकणातील बंदरातील माल वरघाटी बैलांच्या पाठीवरून याच मार्गे वरघाटी पोहोचवत असत. याच घाटांच्या संरक्षणासाठी घाटाखाली सरसगड, सुधागड आणी वरती तेलेबैला आणी घनगड अश्या दुर्गांची निर्मीती झाली. जवळच्या ठाणाळे आणी खडसांबळे ह्या लेण्यांच्या काळ बघता (अंदाजे ई.पु. २ रे शतक) आणी घाटवाट आणी लेणी यांच्या परस्पर संबंध बघता याही घाटवाटा आणी पर्यायाने हे किल्ले तेवढे प्राचीन असलेच पाहीजेत (सुधागड धोंडश्याच्या वाटेने चढताना लागण्यार्‍या तानाजी टाक्याची रचना बघता हा किल्ला तेवढा प्राचीन असलाच पाहीजे)....

हजारो वर्षांपासून वाहती वाट असलेले हे घाट कोकण आणी देशपठार यांना जोडणारे असल्याने याच घाटाने जनसंस्कृतीची देवाणघेवाण झाली असली पाहीजे आणी घाटवाटांच्या संरक्षणाच्या निमित्ताने सैन्यसंस्कृतीचीही सुरुवात झाली असली पाहीजे...

गेली काही वर्षे सह्याद्रीतील घाटवाटा आणी लेण्यांच्या भटकंतीतून बरेच काही शिकायला मिळाले..खासकरुन लोणावळा ते ताम्हीणी आणी पुढे माणंगाव ते खेड पर्यंतचा भाग हा घाटवाटा फिरण्याच्या दृष्टीने मस्तच आहे आणी माझा खास आवडीचा विषय पण आहे..

सुधागड परीसरातील घाटवाटांपैकी वाघजाई आणी सवाष्णी ह्या घाटवाटा तश्या बर्‍याच प्रसिद्ध पण त्याही शिवाय पाच पायर्‍यांची वाट (भोरप नाळ. ही तेलबैला गावातून सरळ सुधागड किल्याखालील बाजारपेठ मारूतीजवळ ऊतरते), नाणदांड घाट, नाळेची वाट, घोणदांड घाट, घुटक्याची वाट अश्या अजून काही अप्रसिद्ध आणी भटक्यांना नविन वाटा कोकणातून सुधागडाला उतरतात.

या परीसरातील घाटवाटा आणी लेण्यांवर लिहीण्या सारेखे बरेच आहे पण प्रतीसादात न लिहीता वेगळा लेख लिहायला हवा...

तुम्ही गेलात त्याच्याच आसपास मी घनगड - नाणदांड घाट - सुधागड असा भन्नाट ट्रेक केला..बाकी सगळ्या घाटवाटा झाल्यात आणी आता पावसाळा संपल्या नंतर राहीलेली घुटक्याची वाट करायचा विचार आहे...

वाटेत कातळात कोरलेल्या या पायर्‍या लागल्या ('त्या' सवाष्णीने खोदलेल्या असाव्यात. इथेच जवळपास तिची समाधीही आहे, तो फोटो हुकला)>>>> याच्याच जवळ एक खडकात पाण्याचे टाके आहे..

वाटेत एक बांधकाम लागले. (स्थानिक लोकांपैकी कुणीतरी वाडा/गोठा बांधला असावा)>>>> याच घराच्या/गोठ्याच्या पुढून एक वाट तोडीशी उजवीकडे वळून थेट ठाणाळे लेण्यात जाते :)...

जातिवंत भटके आहात तुम्ही लोक - जे वेगवेगळे गड चढता, वेगवेगळ्या वाटा शोधता.......एकंदरीत चालण्यातली सगळी मजा अनुभवता ..........
सर्व फोटो व वर्णन मस्तच........

सर्वांचे आभार! Happy

मनोज, झकास माहिती..
याच्याच जवळ एक खडकात पाण्याचे टाके आहे..
हो.. बरोबर.

याच घराच्या/गोठ्याच्या पुढून एक वाट तोडीशी उजवीकडे वळून थेट ठाणाळे लेण्यात जाते

करेक्ट... वाटेच्या दिशेवरून तो अंदाज बांधला होता, फक्त खात्री नसल्यामुळे इथे लिहिलं नाही...