ऋणानुबंधाची हळवीशी सवे आठवण नेऊ..

Submitted by रसप on 22 July, 2012 - 00:35

काय खरे अन काय असावे खोटे कळतच नाही
दिसते सारे डोळ्यांनी पण काही पटतच नाही
सुखात मी अन सुखात तूही तरी पुरे ना वाटे
कधी कधी ह्या हसण्यामागे 'हसणे' असतच नाही

मनास माझ्या समजावुन मी नवीन स्वप्ने देतो
एक उराशी, एक उशाशी, एक कुशीला घेतो
तरी पुन्हा का निवांत वेळी भरून काही येते ?
स्वप्नपाखरांच्या सोबत मी तुझ्याच गावी येतो..

पुरे जाहले नवीन स्वप्ने रोज पाहणे आता
पुरे जाहले वैशाखाच्या झळा सोसणे आता
पुन्हा एकदा श्रावण होउन रिमझिम तू बरसावे
पुरे जाहले स्वत: स्वत:ला व्यर्थ भिजवणे आता

जरी वाटले बंधनांस मी साऱ्या उधळुन द्यावे..
तरी शक्य नाही आता हे तुला तुझेही ठावे
सांग कशाला कुढत बसावे जीवन सुंदर आहे
मृगजळ पाहुन, सारे सोडुन, कशास धावुन जावे ?

थेंब दवाचा गालावरती हलके टिपून घे ना
तुझ्याचसाठी मी लिहिलेली कविता लिहून घे ना
भास जरासा माझा होता दे तू मंद उसासा
रडून झाले बरेच आता किंचित हसून घे ना !

हव्याहव्याश्या पळवाटांनी वळणे टाळुन जाऊ
आडोश्याच्या मुक्कामावर सोबत आपण येऊ
कधी न जुळणाऱ्या वाटांवर सखे चालणे अपुले
ऋणानुबंधाची हळवीशी सवे आठवण नेऊ

....रसप....
२१ जुलै २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/blog-post_22.html

गुलमोहर: