दर्शनी अण्णा हजारे नाव आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 20 July, 2012 - 09:28

गझल
दर्शनी अण्णा हजारे नाव आहे!
एक ते आदर्श खेडेगाव आहे!!

पद, प्रतिष्ठा अन् उपाध्या गौण सारे;
शुद्ध चारित्र्यास येथे भाव आहे!

नेहरू, गांधी, अटलजी वाजपेयी!
आज त्यांचे फक्त उरले नाव आहे!!

दंगली जातीय अन् या जाळपोळी;
राजकारण हे नव्हे.....हा डाव आहे!

तेलगी, “आदर्श”, स्पेक्ट्रम, कैक गफले!
माणसांची ही अघोरी हाव आहे!!

मॉल, मल्टीप्लेक्स, ई बैंकिंगसेवा.....
माणसा! प्रगती तुझी भरधाव आहे!

परग्रहावर जायची करतात भाषा!
पाहिला कोणी धरेचा ठाव आहे?

वल्गनांनी, घोषणांनी, कान किटले!
देशसेवा दूर....नुसता आव आहे!!

पाच वर्षांनीच येतो कळवळा तो......
कळवळ्याचा फक्त आविर्भाव आहे!

आज आखाडी अमावस्या असावी;
कोंबडीला, बोकडाला भाव आहे!

मार तू आता हतोडा......ऎक माझे!
हीच आहे वेळ, जेव्हा ताव आहे!!

स्वप्न साकारेल जे जपलेस तूही.....
तू खडा टाकून बघ, तुज वाव आहे!

जिंकते दुर्दैव की, मी?.....तेच पाहू......
हिकमतीने घातला मी घाव आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

आरटीओ, इन्कम टॅक्स अशा सरकारी हापिसातल्या कविता स्पर्धेतली कविता वाटली. माफ करा... तुमच्या गझला नजाकतभ-या असतात. फक्त रतीब घालत असल्याप्रमाणे त्या येतात म्हणून पाहणं होत नाही.

अशा गझला प्रसवल्या गेल्या तर वाचण्याचा हूरुप राहणार नाही. स्पष्ट मताबद्दल मनापासून माफी मागतो. माझी खरंच इतकी पात्रता नाही.

किरणजी! प्रांजळ आभिप्रायाबद्दल धन्यवाद!
माझी ही गझल आपल्या अभिरुचीच्या कसोटीवर उतरली नाही त्याबद्दल क्षमस्व!
आहो, मी साधा भूशास्त्राचा मास्तर आहे! आरटीओ, इन्कम टॅक्स अशा सरकारी हापिसात चिकटण्याइतका मी महान नाही हो! पुढील रतीब घालताना त्याला ही झालर येणार नाही याचा कटाक्ष ठेवेन!

..........प्रा.सतीश देवपूरकर

चान्गली आहे ही गझल , इतकी वाईट नाही आहे...(अर्थात किरणच्या वैयक्तिक मताविषयीही मला पूर्ण आदर आहे)