प्रश्न काही...

Submitted by वैभव फाटक on 20 July, 2012 - 02:10

हासणाऱ्या चेहऱ्याच्या आड होते प्रश्न काही
उत्तरे शोधूनही, ओसाड होते प्रश्न काही

चार चौघातून फिरता, ना कधी वाट्यास गेले
एकट्याला घेरणारे, भ्याड होते प्रश्न काही

लपवलेले मी जरा दु:खास माझ्या, पाहिल्यावर
प्राक्तनाने टाकलेली, धाड होते प्रश्न काही

उत्तरे माझ्याकडे नाहीत हे ठाउक तरीही
येउनी भंडावणारे, द्वाड होते प्रश्न काही

अनुभवाला लावले मी समजण्यासाठी पणाला
सर्व पाने गूढ ऐसे, बाड होते प्रश्न काही

----- ( वैभव फाटक - १८ जुलै २०१२ ) -----

http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/07/blog-post_18.html

गुलमोहर: 

चार चौघातून फिरता, ना कधी वाट्यास गेले
एकट्याला घेरणारे, भ्याड होते प्रश्न काही<<< मस्त शेर

द्वाड हा शेरही छान आहे

छान....

वैभवजी! छान आहे आपली गझल! आवडली! रदीफ व सर्व काफिये आवडले.
आपले खयालही आवडले.
आपल्या गझलेचा बारकईने आभ्यास केल्यावर मला जे सुचले ते आपल्या आस्वादासाठी देत आहे....................

शेर नंबर १ (मतला)

उला मिसरा खूपच आवडला. सानी मिसरा असा जोडून पाहिला...........
उत्तरांच्या आडही ओसाड होते प्रश्न काही!
.................................................................................................शेर नंबर २ हा शेर मी असा लिहून पाहिला...........

एकटे गाठून मजवर वार करती पाठमोरे!
शूर म्हणणारे स्वत:ला, भ्याड होते प्रश्न काही!!
.................................................................................................

शेर नंबर ३..... सानी मिसरा सुंदर आहे. उला मिसरा असा मी जोडून पाहिला.........

हे असे माझ्या सुखावर घातले कोणी दरोडे?
................................................................................................

शेर नंबर ४.....सानी मिसरा छान! थोडीशी शब्दयोजना बदलून, व उला मिसरा बदलून मी हा शेर असा लिहून पाहिला..............
मीच लाडावून त्यांना ठेवले होते असे की,
का म्हणू? भंडावणारे, द्वाड होते प्रश्न काही!
.................................................................................................

शेर नंबर ५ “बाड” काफियाला मी असा न्याय देवून पाहिला...........

काळजाची कैक पाने लागली एकाच प्रश्ना.........
उत्तरे कैसी लिहू मी? बाड होते प्रश्न काही!
...............................................................................................
..........प्रा.सतीश देवपूरकर

टीप: वैभवजी! आपली प्रांजळ मते कळवावीत. वाचायला आवडतील!
.............................................................................................