गार व्यथांचा वारा सुटला, बहुदा जखमा हालत होत्या.

Submitted by devendra gadekar on 19 July, 2012 - 01:01

हृदयाच्या या झाडावरती,कैक भावना नांदत होत्या
गार व्यथांचा वारा सुटला, बहुदा जखमा हालत होत्या.

गावोगावी शहरो शहरी ,घरोघरी अन रस्त्यावरती
प्रेमाच्या या नावाखाली ,कैक वासना रांगत होत्या.

आकाशाच्या पोटात सदा ,तोच भुकेचा सूर्य उगवतो
कैक जणांच्या अपुऱ्या इच्छा, पलंगावरी जागत होत्या ...

ओसाड असे शेत पेरले ,बापाच्या राखेनी जेंव्हा
दुष्काळ दिसे डोळ्यात तरी,आणि चिता आभाळत होत्या

भक्ती कधीच मेली होती,देव ही दगड झाला होता ,
देवळातल्या दानपेटीत,फक्त मागण्या धावत होत्या.

गुलमोहर: 

मला प्रत्येक खयाल आवडला. मतला चित्रदर्शी वाटला, पुढचे चारही शेर सामाजिक अंगाचे असूनही अभिव्यक्ती नावीन्यपूर्ण वाटली. एक दोन ठिकाणी लय अडखळली. त्यात बदल करणे शक्य आहे असे वाटले. (जसे 'आकाशाच्या पोटात सदा' ऐवजी 'आकाशाच्या पोटी सदैव' असे काहीसे, कृ गै न)

सर गैरसमज अजिबात होणार नाही आणि तिये करायचे धाडस हि करणार नाही ..
गझल या क्षेत्रात मी अजून पोटातच आहे ..जन्म व्यायचा आहे माझा ..
आपण जे सुचविले ते नक्कीच दुरुस्त करायचा प्रयत्न करेल ..
मनापासून आभार आपले

वाहवा,चांगली आश्वासक गझल.

काही ठिकाणी लय सापडत नाही ,परंतु खयाल आवडले,

देवेंद्रजी! छान आहे, गझल! खयाल सुंदर आहेत. वृत्तहाताळणी सुरेख!
फक्त आता शेर थेट व स्पष्ट कसा करता येईल, याकडे लक्ष द्यावे.
काही ठिकाणी अभिव्यक्ती थेट होण्यासाठी काही गोष्टी सुचवाव्या वाटल्या.

मतला..........
सुंदर खयाल.
बहुदा शब्द......... बहुधा असा लिहावा.
जखमा हालत होत्या ऐवजी जखमा ठणकत होत्या म्हणावेसे वाटून गेले.
वारा सुटला आहे, म्हणून हालण्याची क्रिया ओघाने येते बरोबर, पण जखमा हालत होत्या असे आपण म्हणत नाही. ठणकण्यामधेही/ठणक्यामधेही... वेदनांची हालचाल/जागृती प्रतित होते.

२रा शेर......सुंदर!

३रा शेर........अस्पष्ट वाटला. हा शेर मी असा लिहून पाहिला.........
गाढ झोपुनी, उठल्यावरती, सूर्य उगवता पहात होता.........
पलंगावरी, कैक जणांच्या अपु-या इच्छा जागत होत्या!

४था शेर...........
खयाल अजून स्पष्ट हवा होता असे वाटून गेले.
मी हा शेर असा लिहून पाहिला..........

राख मायबापांची कामी आली..... शेते पेरायाला!
दुष्काळातच डोळे मिटले, परी चिता आभाळत होत्या!!
५वा शेर......छान!
मागण्या धावत होत्या...........ऎवजी मागण्या साठत होत्या करावेसे वाटले.
आपल्या पुढील गझल लेखनास व शिक्षणास माझ्या शुभेच्छा!
..............प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................................

देवेंद्रजी
नशीबवान आहात . आपल्या गझलेस प्रथमच माझे 'पर्यायीगझल' -गुरु खुद्द देवपूरकर सर यांनी पर्याय सुचवले आहेत
त्याचा योग्य तो लाभ उठवावा ही विनंती

आपला नम्र
वैवकु

छान.

वैवकु, वैभवजी आणि देव काका आपण सर्वांनी सुचवलेल्या बाबींवर नक्कीच विचार करेल ..आणि पुढच्या वेळेस चुका होवू नये हा प्रयत्न करेल ,,,,