दुसरे प्रेम - 'काव्यद्विदल'

Submitted by रसप on 19 July, 2012 - 00:47

‎'मराठी कविता समूहा'च्या 'काव्यद्विदल - भाग -१' मध्ये माझा सहभाग -

प्रथम काव्यदल -

उगाच पळणे प्रेमापासुन सहजच मिळताना
मनातले समजून टाळणे सगळे दिसताना
मग नकळत फुलते कळी कोवळी हसते बावरते
हे असे नेहमी होते माझे मनास हरताना

मनात गाणे गुणगुणतो पण ओठांवर बंदी
मोजत बसतो उगाच पडल्या खड्ड्यांची रुंदी
मी कितीकितीदा पाउल माझे जपून चालवले
पण वळणावरती मलाच चढते गाण्याची धुंदी

धडपडणे ही सवयच माझी, अंगी बाणवली
सपाट रस्त्यानेही मजला घसरण दाखवली
पाहून घसरलो डोळे केवळ, हसू कधी हळवे
अन कधी पाहुनी छबीस दिवसा स्वप्ने रंगवली

मनात माझ्या कधी कुणाचा दरवळला चाफा
आठवणींच्या कल्लोळाचा भवताली ताफा
मज कधी वाटले जखडुन घ्यावे मिठीत कोणाला
पण लिहून कविता फक्त उठवल्या शब्दांच्या वाफा

'हाहाहाहा' हसू नका ही दु:खाची स्टोरी !
मनास जपतो किती तरीही होते हे चोरी
मी बांध घालतो रोज नव्याने कितीकदा ह्याला
पण देउन जाती सुंदर ललना कविता ही कोरी..!

....रसप....
१५ जुलै २०१२
पहिल्या दोन ओळीत २६ (१६,१०) मात्रा आणि शेवटच्या दोन ओळींत २८ (१८, १०) मात्रा.
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/blog-post_18.html

द्वितीय काव्यदल -

बावऱ्या राधेचा सावळा कान्हा
मोहवी सुरांनी सांज जाताना
झाकोळदिशांनी ओघळे नभ
तहान वेगळी आज ओठांना

सांडला सुगंध बासरीतून
लाजला मोगरा फिका होऊन
पावले ओढते नादमाधुरी
तहान शमेना होतां तल्लीन

राधेची यमुना विसावा घेई
गहिऱ्या गहिऱ्या तळाशी नेई
कान्हाच जाहली एकटी राधा
तहान प्रेमाची यमुना होई

राधेला एव्हढी आस लागली
कान्हाची बनावे सदा सावली
तहान रहावी नेहमी मनी
सावळ्या रंगात राधा रंगली

कधीच राधेने नाही जाणले
कान्हाने विश्वाला साऱ्या व्यापले
राधेच्या प्रेमाला दुसरे स्थान
पहिले स्थान ना कोणा लाभले

....रसप....
१८ जुलै २०१२
(अक्षरछंद. असा कुठला छंद आहे की नाही, माहित नाही पण प्रत्येक ओळीत ११ अक्षरं आहेत.)
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/blog-post_19.html

गुलमोहर: 

छान आहेत दोन्ही रचना

या काव्य प्रकारास काव्यदल असे का म्हटले आहे ?
याची ठळक वैशिष्ठ्ये कोणती?

रसप खरेच नवनवीन अर्थमाधुर्यपूर्ण कवितेचे रचनाप्रयोग करीत असता तुम्ही . पु.ले.शु.