कांदासंस्थानाचे चिलखती उत्तर

Submitted by ३_१४ अदिती on 19 July, 2012 - 00:02

कांदा संस्थान, दि. १८ जुलै. - संस्थानात खास भरवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थानाच्याच संशोधन संस्थेत बनवलेल्या चिलखताची चाचणी दाखवण्यात आली. कांदा संस्थान ग्रामपंचायतीतल्या सर्व स्तरातल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पात सहभाग घेतल्याचे आवर्जून सांगण्यात आले. काय आहे हे चिलखत? ऐकू या संस्थानाच्या संशोधन संस्थेच्या प्रभारी श्रीमती ज्योतीकिरण छेदी यांच्याच शब्दांत.

""असभ्य पुरूषांचा उपद्रव न झालेली स्त्री दाखवा, १०० कांदे मिळवा" या आमच्या योजनेला अतिशय गेल्या वर्षी अतिशय थंडा प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही पारितोषिकाचे मूल्य दुपटीने वाढवले. तरीही कोणीही मुलगी, स्त्री समोर आली नाही. सर्व कांदे सडून गेले तेव्हा संस्थानाच्या संस्कृतीरक्षण समितीच्या अहवालात यावर कडक ताशेरे ओढण्यात आले. आणि सूचनांमधे आमच्या संशोधन संस्थेने या प्रकरणात लक्ष घालण्याचाही एक मुद्दा होता. आमच्या संस्थेने हा मुद्दा मनावर घेऊन एक नवीन चिलखत तयार केलेलं आहे.

"संस्कृतीरक्षण हा या चिलखताचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही बघतच आहात त्याप्रमाणे हे चिलखत खांद्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत मुली आणि स्त्रियांचे शरीर झाकते. पबमधे मुली एकेकट्या जातात, तोकडे कपडे घालून अचकट विचकट अंगविक्षेप करतात. या मुलींकडून अनेक पातळ्यांवर संस्कृतीभंजन होते. एकतर या मुली पबमधे जातात, दुसरं म्हणजे दारू पितात. आपल्या संस्कृतीत चौदा विद्या, चौसष्ट कलांमधे पुरुषांना मोहून घेणारे नृत्य करणे याचाही समावेश असेल तरीही पाश्चिमात्यांच्या पबमधे असे कृत्य करणे हा आपल्या महान संस्कृतीवर आघात आहे. हे चिलखत घातल्यामुळे त्यांच्याकडूनही संपूर्ण संस्कृतीरक्षण होईल. एकतर या चिलखतामुळे या मुलींचे सर्व शरीर झाकले जाईल. शिवाय चिलखताची रचनाही अशा प्रकारे केली गेली आहे की एकदा ते चढवल्यावर मुलींना अचकट विचकट अंगविक्षेपही करता येणार नाहीत. कोणी केलीच तर इतर कोणाला ते समजणारही नाही.

"शिवाय कोणा पुरूषांनी त्यांचा विनयभंग अथवा त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यास तो असफल होईल. या चिलखताला एक पासकोड आहे. तो आकडा फक्त चिलखत घालणार्‍या मुलीलाच माहित असेल. हा आकडा टाकल्याशिवाय हे चिलखत अनलॉक होणार नाही. अगदी सुर्‍याच्या वारांनीसुद्धा या चिलखतावर फारतर ओरखडे उठतात याचे प्रात्यक्षिक आपण पाहूच. अफजलखानाच्या वारांनी जसा शिवाजीवर काहीही परिणाम झाला नाही तशा प्रकारची सुरक्षितता या चिलखतामधून सर्व चवचाल, उठवळ आणि बाजारबसव्या मुलींनाही मिळेल. आपोआपच आपली महान संस्कृती जपली जाईल."

श्रीमती छेदी यांच्या या भाषणानंतर चिलखताचा चाचणी प्रयोग करण्यात आला. ज्योतीकिरणताईंनी स्वतःच हे चिलखत अंगावर चढवून चिलखत सर्वांग झाकते, कोणत्याही प्रकारचे अंगविक्षेप केल्यास फक्त समोरच्या पुरूषाला झुकून आदर दाखवल्यासारखेच दिसते आणि चिलखतावर मटनाचा सुरा वापरल्यास फक्त मामुली ओरखडे उठतात याचे प्रत्यक्ष दर्शन घडवले. त्यापुढच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठीही ताईंनी उत्सुकता दाखवली. हा त्याचा अहवालः

प्रश्न १. चिलखत तयार करण्यापेक्षा निदान संस्थानाततरी पब्जवर बंदी का आणत नाही?

या प्रश्नाचं उत्तर संस्कृतीरक्षण समितीचे अध्यक्ष आणि संस्थानाचे तहसीलदार इमरान काटकर यांनी दिले. "पब्जवर बंदी आणणं सध्याच्या कायद्याप्रमाणे शक्य नाही. कांदा संस्थानाच्या घटनेप्रमाणे अस्तित्त्वात असणारा कायदा बदलण्यासाठी लोकांच्या दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल आणि बहुसंख्य मतदारांना पब्ज हवे आहेत. दुर्दैवाने कांदा संस्थानातली निम्मी लोकसंख्या तरूणांची आहे आणि या पिढीचा पब्जना संपूर्ण पाठींबा आहे. याचा दोष सर्वथा शिक्षण मंडळावर येतो. त्यांनी योग्य अभ्यासक्रमाची रचना केली नाही. त्याशिवाय इंटरनेट, जगभरातले चित्रपट तरूण पिढीला उपलब्ध होणे, बाहेरच्या देशात लिहीलं जाणारं साहित्य आमच्या तरूण पिढीला उपलब्ध होणे यांसारखे दुर्दैवी प्रकार आज घडत आहेत. या सगळ्यामुळे जग कुठे जात आहे याचं भान तरूण पिढीला आलं तरी आपल्या संस्कृतीचं महत्त्व ही पिढी समजून घेत नाही. आमच्यासारख्यांची 'ओल्ड फॅशन्ड' म्हणून टिंगल होते आणि बहुसंख्येच्या जोरावर हे तरूण आम्हाला बाजूला सारत आहेत."

प्रश्न २. संस्कृतीचा र्‍हास तुम्हाला थांबवायचा आहे आणि यामागची तुमची तळमळ, प्रामाणिकपणा स्पृहणीय आहे. परंतु तरूण पिढीला तुमची संस्कृती मान्य नसल्यामुळे तोकड्या कपड्यांतल्या तरूण मुली हे चिलखत वापरतीलच यासाठी तुम्ही काही उपाययोजना केली आहे का? काही पब-कायदे वगैरे??

ज्योतिकिरण ताईंनी याचे उत्तर दिले, "पब्जमध्ये जाताना हे चिलखत अनिवार्य करण्याचा आमचा विचार आहे. त्या कायद्याने मूळ धरलं की त्याचा विस्तार करून बसमध्ये, ट्रेनमध्ये, अथवा गर्दीच्या कुठच्याही ठिकाणी जाताना हे चिलखत घालावं लागेल अशा तरतुदी करणार आहोत. अनेक स्त्रियांनी अशा ठिकाणी छेड काढली जाण्याची तक्रार केलेली आहेच. त्यांच्या संरक्षणासाठीच हा कायदा असेल. मोटरसायकलवर किंवा स्कूटरवर बसताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसते का? तसंच. तरूण वर्गात, विशेषकरून मुलींमधे आमची ही योजना अप्रिय असेल याची आम्हाला कल्पना आहे. पण गोड बोलून, बोलण्यात गुंगवून तरूण मुलींना हे चिलखत घालण्यास प्रवृत्त करण्याकडे आमचा सध्या कल आहे. कायद्याची मदत घेणं किती किचकट काम आहे हे मगाशी श्री. काटकर यांनी सांगितलंच आहे. त्यापेक्षा आम्ही सध्या लोकप्रियतेसाठी प्रयत्न करत आहोत. या तरूण मुली कितीही तोकडे कपडे घालून आल्या तरीही त्यांच्यावर टीका करायची नाही ही आमची पहिली पायरी आहे. त्याशिवाय या चिलखताबरोबर आम्ही नेकलेस फुकट देणार आहोत. हा साधासुधा नेकलेस नाही. याच्या पेंडंटमधे वाघनखं आहेत. ही वाघनखं मुलींना वेळप्रसंगी स्वसंरक्षणासाठीही वापरता येतील. ही वाघनखं खास पॅरीसहून शिक्षण घेऊन आलेल्या आमच्या खास फॅशन डिझायनरने बनवलेली आहे. आज बाजारात या फॅशन डिझायनरची चलती असल्यामुळे त्यांच्या ब्रँडनेममुळेही अनेक मुली हे चिलखत आणि वाघनखं घेऊन वापरण्यास उद्युक्त होतील. शिवाय या उत्पादनाची जाहिरात प्रसिद्ध अभिनेत्री सखी सामंत करत आहेत. त्यांच्या प्रसिद्धी आणि प्रतिमेचाही या उत्पादनास फायदा होईल."

प्रश्न ३. स्त्रियांचे शीलरक्षण वगळता या उत्पादनाचा इतर काही हेतू आहे का?

"अर्थातच!" श्री. काटकर आणि श्रीमती छेदी एकमुखाने उत्तरले. "स्त्रियांच्या खांद्यावर संस्कृतीरक्षणाची आणि पुढची आरोग्यवंत पिढी जन्माला घालण्याची मोठी जबाबदारी आहे. यातली पहिली जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही हे चिलखत बनवले आहेच. पण दुसर्‍या जबाबदारीसाठी, पुढच्या पिढीचा विचार करता स्त्रियांनी दारू न पिणे, तोकडे कपडे न घालणे आणि अचकट विचकट अंगविक्षेप न करणे हे फार महत्त्वाचे आहे. चिलखत घातल्यामुळे स्त्रियांचे शरीर पूर्ण झाकले जाईल. स्त्रियांनी दारू न प्यायल्यामुळे स्त्रियांच्या अंगावर असणार्‍या या दोन महान जबाबदार्‍या पार पडतील याबद्दल आम्हाला शंका नाही."

प्रश्न ४. पण या जबाबदार्‍या जेवढ्या स्त्रियांच्या आहेत त्या पुरूषांच्याही नाहीत का? आणि नक्की कोणती संस्कृती जपण्याबद्दल तुम्ही बोलत आहात? आपली मराठमोळ्या नऊवारीची संस्कृती पाचवारीने मोडून काढली, त्याबद्दल तुम्हाला आक्षेप नाही का?

"तुमच्यासारख्या तर्कटी शंकेखोरांमुळेच आपली संस्कृती नाश पावते आहे. स्त्रिया दारू पितात, पबमधे जातात म्हणूनच पुरूषांना त्यांच्यावर हात टाकण्याची मुभा मिळते. आणि पुरुषांनी लाजलज्जा सोडली म्हणून स्त्रियांनी सोडावी असं तुम्हाला सुचवायचं आहे का? पुरूष आदीम काळापासून दारू पितात म्हणून स्त्रियांनीही दारू प्यावी असं तुम्ही सुचवता आहात का? त्यातून पुरूष दारू प्यायले किंवा पुरूषांनी अचकट विचकट अंगविक्षेप केले तरीही स्त्रिया त्यांचं काहीही बिघडवू शकत नाहीत. स्त्रियांची अब्रू मात्र काचेच्या भांड्याप्रमाणे असते. एकदा फुटली की परत जोडता येत नाही. पुरूषांवर कधी बलात्कार होतो काय? पुरूषांना संस्कृतीरक्षण आणि चिलखताची काहीही गरज नाही." -- श्री. काटकर आणि आमदार श्री. रामशास्त्री फुटाणे

प्रश्न ५. तुमच्या या चिलखताचा साडीधारी स्त्रियांना काहीही उपयोग नाही. साडी नेसणार्‍या स्त्रियांच्या शीलरक्षणाचं काय?

"साडी नेसणार्‍या स्त्रिया या मुळातच शालीन आणि सुस्वरूप असतात. त्यांच्या मागे गावगुंड लागत नाहीत. उत्तान वागणार्‍या स्त्रियांनाच याचा त्रास होतो. मुळात साडी नेसून स्त्रिया संस्कृतीरक्षण करत आहेत, त्यांना या चिलखताची मुळी गरजच नाही. साडी नेसणार्‍या स्त्रिया पबमधे जात नाहीत, वा दारू पीत नाहीत. त्यांच्यामुळे बलात्कारी आणि विनयभंग करणार्‍यांना प्रेरणा मिळत नाही. या लोकांना असं वागण्याची प्रेरणा पाश्चात्य पेहेराव करणार्‍या मुलींमुळेच मिळते. तोकडे कपडे घालून, रेव्हपार्ट्यातून नशापाणी करून, रस्त्यावर अचकट विचकट अंग विक्षेप करीत जाणार्‍या मुलींनीच समाज आणि संस्कृतीचं नुकसान केलेलं आहे." -- आ. रामशास्त्री फुटाणे

प्रश्न ६. गावगुंडांना अटकाव करण्याऐवजी तुम्ही मुलींचं व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आणत आहात असं तुम्हाला वाटत नाही का? संस्थानाची वाटचाल सौदी अरेबियासारख्या देशांकडे होते असं तुम्हाला वाटत नाही का?

श्रीमती छेदी यांनी थोडं विचारमग्न होऊन याचं उत्तर दिलं, "हे पहा, पब्जमुळे हे गावगुंड फैलावतात. मुळात पब्ज बंद केले तर गुंडगिरी कमी होईल. पण ही आजची तरूण पिढी ऐकत नाही. इथे सौदी अरेबियाचा संबंध आलाच कुठे? स्त्रियांनी त्यांचा चेहेरा उघडा ठेवण्याला आमचा काहीही विरोध नाही." त्याला श्री. काटकर आणि श्री. फुटाणे यांनी पुरवणी जोडली, "व्यक्तीस्वातंत्र्य? अहो महान संस्कृतीसमोर कसलं आलंय व्यक्तीस्वातंत्र्य? आधी संस्कृती जपा मग सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला सर्वांना आपोआप मिळेलच. आपल्या महान सांस्कृतिक ठेव्यांमधला हा श्लोक तुम्ही ऐकला असेलचः
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ।
यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ॥
अर्थात, जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवता नांदतात. जिथे स्त्रियांचा अपमान होतो तिथे सर्व क्रिया, योजना असफल होतात. कांदा संस्थानात नेहेमीच स्त्रियांचा सन्मान होतो. आमच्या ज्योतीकिरणताई पहा किती मोठ्या अधिकारपदावर आहेत! आमच्या संस्थानात स्त्रियांच्या रक्षणासाठी संशोधकही कामाला लागले आहेत. आम्हाला या योजनेत निश्चित सफलता मिळेल. आमेन"

पत्रकार परिषदेच्या शेवटी आ. रामशास्त्री फुटाणे यांच्या आमदारनिधीचा वापर करून सदर चिलखते गटारी अमावस्येच्या मुहूर्तावर सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याचे सर्वांना सांगण्यात आले. शिवाय सर्व महिला पत्रकारांना एकेक चिलखत आणि वाघनखांच्या नेकलेसची जोडी देऊन सन्मानित करण्यात आले.

(पत्रकारभवनाबाहेर आल्यावर सर्व महिला पत्रकारांनी एकमुखाने या चिलखतांचा निषेध केला, आपापली चिलखतं समोरच्या कचरापेटीत भिरकावून दिली आणि नेकलेसची फॅशन आवडल्याचे सांगत ते आपल्या झोळ्यांमधे टाकले.)

प्रेरणेसाठी अनिकेत सुळे यांचे हे ब्लॉगपोस्ट, ममता शर्मा आणि इतर अनेकांचे आभार.

गुलमोहर: 

छान आहे. आवडलं. Happy

काटकर, छेदी आणि फुटाणे यांनी मायबोलीवर हे मुद्दे खूप वेळा आणि खूप जोरकसपणे मांडलेले आहेत. Proud

मामी, काटकर, छेदी आणि फुटाणे हे लोकं प्रत्यक्षातही मला अनेकदा भेटलेले आहेत. अशा प्रकारचे सल्ले अनेक वेळा या लोकांकडून ऐकलेलेही आहेत. गुवाहाटीच्या या निषेधार्ह घटनेच्या निमित्ताने या लोकांचं मायबोली, वेगवेगळे ब्लॉग्ज, बातम्यांच्या वाहिन्या, सगळीकडे पुन्हा दर्शन झालं हे ही तेवढंच खरं.

सुसुकु, काटकर, छेदी आणि फुटाणे हे लोकं मला विनोदी वाटत नाहीत, केविलवाणे वाटतात. कोणतीतरी संस्कृती जपायचा आटोकाट प्रयत्न इतरांनी करावा अशी आस लावून बसलेले, त्यासाठी सतत उपदेशकाचा अंगरखा पांघरलेले. या लोकांशी तार्किक चर्चा करून स्वतःचंच डोकं फोडण्याचा प्रयत्न मी अनेकदा केला; स्वतःवरच वैतागले आणि तिरकसपणे लिहीलं.

स्नेहश्री, धन्यवाद.

ज्योतीकिरणताईंनी स्वतःच हे चिलखत अंगावर चढवून चिलखत सर्वांग झाकते, कोणत्याही प्रकारचे अंगविक्षेप केल्यास फक्त समोरच्या पुरूषाला झुकून आदर दाखवल्यासारखेच दिसते
यावर प्रश्न क्र. ७: हे चिलखत घालण्यापूर्वी सुद्धा कितीहि अंगविक्षेप केले तरी कुणाहि पुरुषाची नजर ज्योतिकिरण ताईंकडे पडत नसे. आता चिलखत घातल्यावर त्यात काही फरक पडल्याचे कसे समजले?
महिला पत्रकारांचे अभिनंदन!

आदिती,

>> काटकर, छेदी आणि फुटाणे हे लोकं मला विनोदी वाटत नाहीत, केविलवाणे वाटतात.

स्त्रीवर जी बंधने घातलीत ती तिला वेठबिगार बनवण्यासाठी नव्हे. तर तिचं मन अधिक संवेदनशील असतं म्हणून. या बंधनांना झुगारणारी स्त्री ही रंगीबेरंगी कपडे घालणारा पुरूष बनते. तिच्याकडे कोणी (पुरूष) लक्ष देत नाही. असं लक्ष दिलं गेलं तरी ते खूपदा केवळ वासनापूर्तीपुरतंच मर्यादित असतं.

इथे इंग्लंडमध्ये एकाकी बायकांची संख्या पराकोटीची वाढलीये. याला कारण म्हणजे एकंदरीत स्त्रीवर्गाचा उच्छृंखलपणा! एकदा हात पोळले गेलेले पुरूष दुसर्‍यांदा बाईच्या वाटेला जात नाहीत. आणि गेले तर केवळ अंगसंगापुरतेच जातात. यात वाईटाबरोबर चांगल्या स्त्रियाही भरडल्या जातात. तुम्हाला "संस्कृतीरक्षक" केविलवाणे वाटतात, पण इथे तर एकाकी बायकांचं सगळं आयुष्यंच केविलवाणं बनलंय! असाच प्रकार भारतातदेखील व्हायला हवा आहे का?

बघा पटतंय का ते. पटायला पाहिजे असा आग्रह मी नाही धरू शकत.

आ.न.,
-गा.पै.

आवडलं.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार कांद्याशेजारच्या बटाटा संस्थानच्या ग्रामपंचायतीने स्त्रियांनी मोबाइल फोन वापरण्यावर आणि चाळीस वर्षांखालील स्त्रीने घरातील पुरुषाच्या सोबतीशिवाय घराबाहेर पडण्यावर बंदी घालायचे ठरवले आहे.

झक्की: ज्योतीकिरणताईंबद्दल व्यक्तिगत नको होऊ या कसें! पण महिला पत्रकारांचे अभिनंदनच.

भरतः बटाटा संस्थान कांदा संस्थानाचा नेहेमीच आदर्श राहिलेलं आहे. Lol

गामा पैलवानः
>> तिचं मन अधिक संवेदनशील असतं म्हणून. <<
नाही बुवा, मी बाई आहे तरी मला असं काही वाटत नाही. माझ्या ओळखीतल्या आणि नात्यातल्या बायकांकडे बघून असं वाटत नाही आणि फेसबुकावर अनोळखी स्त्री-पुरूषांचे पोस्ट्स पाहूनही असं वाटत नाही. आणि मानसशास्त्रज्ञांनाही असं काही वाटत नाही.
थोडं रडा-बिडायला आलं तर त्याला भावना व्यक्त करणं असं म्हणतात. जशा शिव्या पुरुषांचा राग व्यक्त करतात म्हणून पुरूष स्त्रियांपेक्षा अधिक रागीट होत नाहीत तसंच. फारतर स्त्रिया आपलं दु:ख आणि पुरूष आपला राग मोकळेपणी व्यक्त करतात असं म्हणता येईल.

>> बंधनांना झुगारणारी स्त्री ही रंगीबेरंगी कपडे घालणारा पुरूष बनते. तिच्याकडे कोणी (पुरूष) लक्ष देत नाही. असं लक्ष दिलं गेलं तरी ते खूपदा केवळ वासनापूर्तीपुरतंच मर्यादित असतं. <<
नाही बुवा. असंही काही आही. मी बरीचशी बंधनं झुगारणारी आहे. माझं शरीर अजूनही स्त्रीचं असल्याचंच माझे हॉर्मोन्स आणि डॉक्टर्स सांगतात. माझा एक नवराही आहे, त्याचंही म्हणणं मी बाई आहे असंच आहे. शिवाय माझे इतर अनेक पुरूष मित्र आहेत जे माझ्याकडे वासनापूर्तीकरता लक्ष देत नाहीतच.
माझ्यासारख्या माझ्या ओळखीतल्या, खूप नाही तरी, काही स्त्रिया बंधनं झुगारणार्‍या आहेत. प्रत्यक्ष ओळखीतल्या आहेत, फेसबुकावर मैत्री झालेल्या आहेत. नात्यातल्याही आहेत. त्यांचाही असा काही अनुभव नाही.
बाय द वे, रंगीबेरंगी कपडे पुरूषही घालतात. गोविंदाची एकेकाळी थट्टा उडवली गेली, पण 'दिल चाहता है'मधलं 'कोई कहे' गाणं पहा, त्यातले कॉलेजच्या मुलांचे म्हणून दाखवलेले कपडे पहा. प्रत्यक्ष दुनियेत फॅब इंडीयातले पुरूषांचे कुडते पहा, ते पण झकास रंगांचे असतात. पाश्चात्य पेहेरावांत हवाई शर्ट बघा, ते पण पाश्चात्य पुरूषांमधे प्रसिद्ध आहेत. आपल्या सरदार लोकांच्या पगड्या बघा. पाश्चात्य फॉर्मल कपड्यांत टाय बघा.

>> इंग्लंडमध्ये एकाकी बायकांची संख्या पराकोटीची वाढलीये. <<
बायकांना एकटं जगायची सवय पिढ्यानपिढ्या आहे. एकतर परकर्‍या मुलींचं लहान वयात म्हातार्‍यांशी लग्न लावून देण्याची पद्धत होती. वैधव्यामुळे एकटं रहायला लागायचं. त्यानंतर व्हायची युद्धं, त्यातही पुरूष/नवरे मरायचे. त्यामुळे कोणत्याही गावात गेल्यावर विधवांची संख्या लक्षणीय असायची. त्याशिवाय दारू (ही बायका कमी प्रमाणात घ्यायच्या), खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांच्यामुळेही पुरूषांची शरीरं बायकांच्या शरीरांआधी मान टाकतात. त्यामुळेही विधवांचं प्रमाण अधिक असतं. आजही कोणत्याही प्रगत देशाची लोकसंख्या पहा. साठीच्या पुढच्या लोकसंख्येत बायकांचं प्रमाण लक्षणीयरित्या अधिक असतं. एकटं जगणं हा प्रश्न बायकांनी आपला आपला सोडवायला कधीकाळीच सुरूवात केली आहे. पुरूषच मागे आहेत.
उदाहरणार्थ जपान हा अन्यथा प्रगत समजला जाणारा देश स्त्री-पुरूष समतेच्या बाबतीत कमी प्रगत समजला जातो. तिथली काही आकडेवारी पहा: (संदर्भ)
Age structure
65 years and over: 22.9% (male 12,275,829/female 16,658,016) (2011 est.)
Sex ratio
at birth: 1.056 male(s)/female

ज्या देशात पुरूष अपत्याला अधिक महत्त्व आहे आणि वैज्ञानिक, वैद्यकीय प्रगतीही खूप आहे तिथे, पुरूष बालकं स्त्री बालकांपेक्षा संख्येने किंचित अधिक असतात. पण ६५ वर्षांच्यावरच्या लोकांमधे हे प्रमाण एका पुरूषामधे १.३६ स्त्रिया असं होतं.

युकेमधेही हाच प्रकार दिसतो जिथे पुरूषांना अधिक महत्त्व असण्याच्या पारंपरिकतेला पुरतं झटकून टाकलं आहे. हे चित्र पहा. विकीपीडीयाच्या माहितीप्रमाणे तिथेही वृद्धांमधे स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. इथे अधिक आकडेवारी आहे.

इंग्लंडातच काय, भारतातही एकटं रहाणार्‍या बायकांची संख्या वाढली आहे. आणि गंमत म्हणजे या बायका आपल्या निवडीने एकट्या रहातात. मस्त, टुकटुकीत, मजेत. माझ्या ओळखीतही आहेत अशा काही! शिवाय नवरे जिवंत असोत, नसोत, आजकाल भारतातही म्हातार्‍या बायका आपल्या शाळेतल्या मैत्रीणींना शोधून बायका-बायकाच मौजमजा करायला, पिकनिक वगैरे करायला बाहेर पडतात माहित्ये का?

मी तीन वर्ष इंग्लंडात राहिले होते. मला नाही ब्वॉ तुम्ही म्हणता तसा अनुभव आला. ना ऑफिसात, ना खेळायला जायचे तिथे, ना पब्जमधे, ना बारमधे! अशा प्रकारच्या बातम्याही कधी बीबीसीवर पाहिल्या नाहीत आणि वाचल्या नाहीत. ना ब्रिटीश कलीग्जकडून काही कानावर आलं. तुमचे कल्पनेत बांधलेले इमले मलातरी खोटेच वाटत आहेत. तुमच्या इमल्यांना आधार देणार्‍या काही बातम्या, आकडेवारी, संशोधन वगैरे दाखवा त्याशिवाय माझा नाही तुमच्या या विधानांवर विश्वास बसणार.

आदिती,

तुम्ही एखाद्या अपवाद असाल म्हणून सगळ्या बायका तुमच्यासारख्या होत नाहीत.

>> तुमचे कल्पनेत बांधलेले इमले मलातरी खोटेच वाटत आहेत. तुमच्या इमल्यांना आधार देणार्‍या काही
>> बातम्या, आकडेवारी, संशोधन वगैरे दाखवा त्याशिवाय माझा नाही तुमच्या या विधानांवर विश्वास बसणार.

आपण sexual revolution ही संज्ञा ऐकली असेल. तिच्यामुळे ब्रिटनमधली एक आख्खी पिढी एकपालकी कुटुंबात वाढली. एका पालकावर मुळे वाढवण्याचा अतोनात ताण येतो हे आपण ऐकलं असेल. यामुळे मुलांकडे नीट लक्ष पुरवता येत नाही आणि त्यातून मुले गुन्हेगारीच्या तडाख्यात सापडायची शक्यता वाढते.

तुम्हाला नवरा आहे आणि सोबत मुलांना वाढवण्यासाठी सपोर्ट सिस्टीम आहे. मात्र या गोष्टी पुढील पिढीच्या नशिबी नसणार असे दिसतेय. सुमारे १० वर्षांपूर्वीच्या (इ.स.२००३) आकडेवारीप्रमाणे जवळजवळ ७०% अमेरिकी मुले सर्वसामान्य चौसोपी कुटुंबाव्यतिरिक्त (न्यूक्लियर फॅमिली) दुसर्‍याच प्रकारच्या कुटुंबात वाढलेली आहेत. ही अमेरिकी आकडेवारी असली तरी ब्रिटनही त्याच वाटेने जात आहे. ही बीबीसीवरील बातमी बघा : http://news.bbc.co.uk/1/hi/uk/6542031.stm आपल्या ब्रिटनमधल्या वास्तव्यात आपल्याला काहीच कसं दिसलं नाही याचं नवल वाटतं.

जी आज इंग्लंडअमेरिकेत होतं ते उद्या भारतात होतंय. म्हणून भारताच्या भावी पिढीच्या जडणघडणीचा अंदाज यायला एव्हढी आकडेवारी पुरेशी आहे.

जाताजाता : आपल्याकडून "एकटे असणे" आणि "एकाकी असणे" याबाबतीत गल्लत तर झालेली नाहीना?

आ.न.,
-गा.पै.

त्या बातमीप्रमाणे:
१. या सगळ्याचा कार्यकारणभाव स्त्रियांच्या उच्छृंखलपणाशी जोडलेला नाही.
२. ४०% लग्न द्वितीय विवाह असतात असा उल्लेख आहे. बाई-बुवा असा उल्लेख नाही, त्यामुळे अर्ध्या पुरूषांचा द्वितीय विवाह होतो असं सेफली मानता यावं. मग "एकदा हात पोळले गेलेले पुरूष दुसर्‍यांदा बाईच्या वाटेला जात नाहीत." याचा संबंधच काय?
भारतात नाही एका बाईकडून मूल न होण्यामुळे "हात पोळलेले" पुरूष त्याच कारणासाठी सर्रास दुसरं, तिसरं लग्न करायचे?
त्याशिवाय
३. लग्न एकट्या बाईचं होत नाही, बाई आणि बुवाचं होतं. त्यामुळे लग्न मोडण्याची जबाबदारी फक्त बाईची कशी? (बाई-बाईचं लग्न झाल्यास त्यातून नैसर्गिकरित्या प्रजोत्पत्ती होत नाही, म्हणून त्याचा विचार केला नाही.)

मला तीन वर्षांत इंग्लंडात 'भरडले' जाण्याचा अनुभव नाही एवढंच. माझ्या इतर ब्रिटीश मैत्रिणींनाही असा अनुभव नाही.

भारतात एकेकाळी असणार्‍या विधवा, विशेषतः बालविधवा एकाकी नसायच्या? त्यांना खेळाबागडायच्या वयातही मित्र-मैत्रिणी असायचे काय?

हे कल्पनेतले इमले नाही तर मग काय आहे?

आदिती, लगे रहो.

अलीकडेच कानावर पडलेलं एक वाक्य : आपल्या मुलीला आपण छेडछाडीपासून स्व-संरक्षण कसे करावे हे शिकवतो तसे आपल्या मुलाला छेडछाड करू नये हे शिकवतो का?

<एकंदरीत स्त्रीवर्गाचा उच्छृंखलपणा! एकदा हात पोळले गेलेले पुरूष दुसर्‍यांदा बाईच्या वाटेला जात नाही>
म्हणजे आपल्या वाटेला जाणार्‍या पुरुषाचे हात पोळणार नाहीत याची काळजी घेणे ही स्त्रीचीच जबाबदारी आहे. त्यामुळे तो नवनवीन स्त्रियांच्या वाटेला जायला मोकळा राहील. (उदा: प्रथम पत्नी निवर्तल्यास तिच्या चितेची आग विझण्याआधीच सप्तपदीची तयारी करता यावी. अन्य वाटांबद्दल लिहीत नाही Wink ) पुरुषाच्या या वागण्याला उच्छृंखलपणा अजिबात म्हणू नये. (मात्र हेच स्त्रीचा पती निवर्तल्यास तिने त्याच्या मृतदेहाबरोबर स्वतःला जाळून घ्यावे किंवा जन्मभर त्याच्या नावाने पोळत रहावे).

आदिती, लग्न टिकवण्याची जबाबदारी आणि गरजही फक्त स्त्रीसाठीच असतात हे तुम्हाला नसावे.

गामा पैलवान,
काय हे!! Unlike करायची सोय असती तर केले असते.

वेलडन अदिती.
डोके फोडण्यासाठी शुभेच्छा.

मामी, रैना:
डोकेफोड करून पुरेसं रक्त आल्यामुळे का होईना, माझी खाज शमलेली आहे. त्यामुळे छेदी आणि काटकर आले नाहीत हे उत्तमच झालं. Lol
एवढं करूनही छेदी आणि काटकर आलेच तर कांदा संस्थानात 'स्लट वॉक' आयोजित करता येईल.

भरतः
>> आपल्या मुलीला आपण छेडछाडीपासून स्व-संरक्षण कसे करावे हे शिकवतो तसे आपल्या मुलाला छेडछाड करू नये हे शिकवतो का? <<
अगदी, exactly, bull's eye!

मुलींच्या कपड्यांबद्दल अजून एखादी गोष्ट लिहीण्याची कल्पना 'द अनियन'वरच्या एका बातमीमुळे आली होती. तिथे आजच तशाच अर्थाची एक बातमी आलेली आहे.
Area Daughter Wearing Next To Nothing
http://www.theonion.com/articles/area-daughter-wearing-next-to-nothing,1...

>>त्याशिवाय या चिलखताबरोबर आम्ही नेकलेस फुकट देणार आहोत. <<

उत्तम कल्पना. पण आधि चिलखत आणि मग तो नेकलेस घालायची सूचना द्यायला विसरू नका. नाहीतर तो आत आणि त्यावर चिलखत घातले तर उपयोग काय नेकलेसचा? बाहेर दिसायला नको का तो?

३_१४ अदिती,

लिहा की! तुमच्या नायिकेच्या कामाची फळं कुणाला भोगावी लागतात ते इथे दिसेल.
http://www.thesun.co.uk/sol/homepage/woman/3098623/Meet-the-25-year-old-...

आ.न.,
-गा.पै.

>>एवढं करूनही छेदी आणि काटकर आलेच तर कांदा संस्थानात 'स्लट वॉक' आयोजित करता येईल.<<
असलं ब्रम्हास्त्र जवळ असल्यावर 'चिलखता'चा खटाटोप कशाकरता? 'स्लट' चाच उपयोग चिलखत म्हणून होणार नाही का?
पहा विचार करा.