आनंद - चित्रपट कविता

Submitted by रसप on 18 July, 2012 - 05:50

Picture3.png

क्षणही आयुष्याचा
उगाच रडलो नाही
नियतीशी असेन हरलो
मृत्यूशी हरलो नाही

एकेक घाव तो जपला
जो खोल-खोल मज रुतला
झेलले उरावर सारे
मी पाठ फिरवली नाही

मावळत्या सायंकाळी
रंगांची उधळण झाली
मी कुठल्या एका रंगी
हटकून रंगलो नाही

प्रत्येक रंग मी ल्यालो
अन् सर्व रसांना प्यालो
आनंद वाटला येथे
दु:ख़ास दावले नाही

.…रसप….
१५ मार्च २००९

गुलमोहर: 

‎.
रडू कशाला कुढू कशाला
मनसुमनाला खुडू कशाला
अजून मी मातीस मिळालो नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

पाउल थकले चालुन चालुन
डोळे शिणले जागुन जागुन
अजून माझे रक्त गोठले नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

मी श्वासाला उधार माझ्या
प्रारब्धाची शिकार माझ्या
अजून बाजी तरी संपली नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

मृत्यूशी संवाद रोजचा
आयुष्याशी वाद रोजचा
अजून उर्मी, माज सोडला नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

उद्यास आहे वेळ जरासा
आज खेळतो खेळ जरासा
अजून मी हसण्यास विसरलो नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

मित्रांचा आनंद पाहतो
कातरवेळी रंग रंगतो
अजून मी सोहळ्यास जगलो नाही
जिवंत आहे तोवर मेलो नाही

....रसप....
२८ डिसेंबर २०११
जब तक ज़िंदा हूँ, मरा नहीं
जब मर गया तो साला मैं ही नहीं

तो सुपरस्टार होता. कदाचित पब्लिकला वेड लावणारा पहिला सुपरस्टार होता. मान वाकडी-वाकडी करत बोलणं.. डोळे मिचकावणं.. नाचताना हात दुमडून गोल फिरणं.. ह्या सगळ्या त्याच्या 'अदा' आजही त्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात.. असा होता 'राजेश खन्ना'.

एक अभिनेता म्हणून किंवा एक हिरो म्हणून मला तो कधी फार आवडलाही नाही आणि फार नावडलाही नाही. पण आनंद, बावर्ची आणि अमर प्रेम मधला राजेश खन्ना मी कधीच विसरू शकत नाही. 'आनंद' वर मी जितकं प्रेम केलंय तितकं मी कुठल्याच व्यक्तिरेखेवर केलं नाही. आज काकाजी गेल्याचं दु:ख आनंद दूर गेल्याचं दु:ख वाटतंय.

पण as the man himself said - आनंद मरा नहीं.. आनंद मरतें नहीं......

रेस्ट इन पीस राजेश 'आनंद' खन्ना....!

आनंद, बावर्ची आणि अमर प्रेम मधला राजेश खन्ना मी कधीच विसरू शकत नाही. आज काकाजी गेल्याचं दु:ख आनंद दूर गेल्याचं दु:ख वाटतंय. >>>> +१००

रणजित,

तुझ्या या कविता म्हणजे
राजेश खन्नाला वाहिलेली
समर्पक श्रद्धांजली आहे.

(कविता आवडल्या हे वेगळे सांगणे नलगे)

रणजितजी
आपल्या या कविता म्हणजे
राजेश खन्नाला वाहिलेली
समर्पक श्रद्धांजली आहे.
सुंदर.