आरशामधल्या तिलाही, पाहुनी ती लाजते!

Submitted by सतीश देवपूरकर on 18 July, 2012 - 00:58

गझल
आरशामधल्या तिलाही, पाहुनी ती लाजते!
हाय! एकांतातही ती केवढी संकोचते!!

चुकवते डोळा तिचा ती, पाहताना दर्पणी;
आपलीही द्रुष्ट केव्हा आपल्याला लागते!

का करू तुलना कुणाशी? का करू भांडण तरी?
आपल्याशी आपली स्पर्धा असावी वाटते!

मी स्वत: पडतो मधे, तेव्हा कुठे बसते घडी!
तोवरी, माझ्यासवे, धुसफूस माझी चालते!!

मी कसे बांधू मनाला दावणीला, सांग ना;
सोडले तर धावते! अन् पकडले तर चावते!!

ही बनेलांचीच दुनिया, मी स्वभावाने मऊ!
मी भिडस्तासारखा म्हणुनी जगाचे फावते!!

कोंडतो डोळ्यात अश्रू, हुंदक्यांना रोखतो;
मी किती समजावतो पण, वेदना आक्रंदते!

बाचकी सा-या स्मृतींची टाकली माळ्यावरी;
काय मी सांगू? मनाला काय आता डाचते?

मायबोलीवर पडे पाऊस गझलांचा किती!
फक्त एखादी गझल हृदयात माझ्या पोचते!!

वाहते रस्ते! अहोरात्री इथे वर्दळ किती!
काम असल्यासारखे प्रत्येक व्यक्ती धावते!!

मी कुठेही येत नाही, जात नाही अन् तरी;
का असे वाटे? कुणी माझ्यामधे डोकावते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

मी कसे बांधू मनाला दावणीला, सांग ना;
सोडले तर धावते! अन् पकडले तर चावते!! << व्वा सर >>

मायबोलीवर पडे पाऊस गझलांचा किती!
फक्त एखादी गझल हृदयात माझ्या पोचते!! << सही >>

सुंदर गझल

मी स्वत: पडतो मधे, तेव्हा कुठे बसते घडी!
तोवरी, माझ्यासवे, धुसफूस माझी चालते!!

वाहते रस्ते! अहोरात्री इथे वर्दळ किती!
काम असल्यासारखे प्रत्येक व्यक्ती धावते!! <<<

आवडले

मी स्वत: पडतो मधे, तेव्हा कुठे बसते घडी!
तोवरी, माझ्यासवे, धुसफूस माझी चालते!!>> हा आवडलाच!! Happy

आरशामधल्या तिलाही, पाहुनी ती लाजते!
हाय! एकांतातही ती केवढी संकोचते!!...मस्त मतला.. अख्खी गझल जोमदार छानच