स्वप्नांची तुडवीत जंगले, युगे युगे मी चालत आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 16 July, 2012 - 11:14

गझल
स्वप्नांची तुडवीत जंगले, युगे युगे मी चालत आहे!
सत्याचा एखादा रस्ता, अजूनही मी शोधत आहे!!

हर यात्रा होवो हजयात्रा! हीच कामना हृदयी माझ्या;
अशाचसाठी मी पापाचा विचार सुद्धा टाळत आहे!

या गर्दीला कुठे माहिती, एकाकीपण कशास म्हणती?
विरहव्यथेचा वणवा मजला, क्षणाक्षणाला जाळत आहे!

वठलेल्या झाडास विचारा, पानगळीचे दु:ख काय ते;
पूर्वी पाने ढाळत होते, आता अश्रू ढाळत आहे!

कितीक दु:खे आली गेली, नुरली त्यांची कुठे निशाणी;
दु:ख तुझे, पण; अहोरात्र मी हृदयाशी कवटाळत आहे!

हसू चेह-यावर ठेवोनी वाट आसवांना केली मी,
कळू दिले ना कोणालाही, काय काय मी सोसत आहे!

काय हवे नेमके कळेना, इच्छांचे भारे डोक्यावर;
पळभरचे सुख मिळवायाला जो तो नुसता धावत आहे!

रानफुलांची व्यथा समजली बागेमधल्या कळ्याफुलांना;
हरेक व्यक्ती कुंतलामधे फुले कागदी माळत आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

<<<स्वप्नांची तुडवीत जंगले, युगे युगे मी चालत आहे!
सत्याचा एखादा रस्ता, अजूनही मी शोधत आहे!!

हर यात्रा होवो हजयात्रा! हीच कामना हृदयी माझ्या;
अशाचसाठी मी पापाचा विचार सुद्धा टाळत आहे!>>>

हे शेर आणि

<<कळू दिले ना कोणालाही, काय काय मी सोसत आहे!>>>>

ही ओळ आणि पुन्हा

<<<काय हवे नेमके कळेना, इच्छांचे भारे डोक्यावर;>>>

ही ओळ,

हे सर्व आवडले

====================

चौथा शेर - ओळींची अदलाबदल केल्यास (जमीनच बदलेल हे माहीत आहे) अधिक प्रभावी व्हावा

====================

<<<हसू चेह-यावर ठेवोनी वाट आसवांना केली मी,
कळू दिले ना कोणालाही, काय काय मी सोसत आहे!>>>

पहिल्या ओळीतील 'केली मी' चे 'करतो मी' असे केल्यास 'काळ' समान राहावा

====================

-'बेफिकीर'!

धन्यवाद भूषणराव, आपल्या प्रातिसादाबद्दल!
वाट आसवांना करतो मी, असे म्हटले तर, दुसरी ओळ कानाला खटकते का?
शेर असा होतो..........

हसू चेह-यावर ठेवोनी वाट आसवांना करतो मी,
कळू दिले ना कोणालाही, काय काय मी सोसत आहे!

दुस-या ओळीत कळू दिले चालेल का? कळू देत ना असे करायला लागेल का? पण मग जरा कानाला खटकते का?
>.........प्रा.सतीश देवपूरकर
................................................................................................

छान गझल..!

वठलेल्या झाडास विचारा, पानगळीचे दु:ख काय ते;
पूर्वी पाने ढाळत होते, आता अश्रू ढाळत आहे!........ इथे ' होती' असं असायला हवं नां?

बेफिकीरजी! धन्यवाद!
दुस-या ओळीत थोडी लय खटकते का?(कळू देत नाही कोणाला......)
........प्रा.सतीश देवपूरकर

ऑर्फिअस..
(झाड) पूर्वी पाने ढाळत होते...........बरोबर!
(झाड) पूर्वी पाने ढाळत होती.........खटकते व्याकरणाच्या दृष्टीने.

कोणालाही कळवत नाही - असे म्हणा!

सुलभतेकडे अधिकाधिक जाता येते हे आपणांस मी काय सांगावे

बाकी......

>>>दुस-या ओळीत थोडी लय खटकते का?(कळू देत नाही कोणाला......)
<<<

असे काही होत नाही आहे, नीट वाचता येत आहे ओळ